आपले अंतःकरण समजबुद्धीकडे लाव
“बुद्धी यहोवा देतो; त्याच्या मुखांतून ज्ञान व समजबुद्धी येतात.”—नीतिसूत्रे २:६ [NW]
१. आपण आपले अंतःकरण समजबुद्धीकडे कसे लावू शकतो?
यहोवा आपला महान शिक्षक आहे. (यशया ३०:२०, २१) पण, त्याच्या वचनात दिलेल्या ‘देवाविषयीच्या ज्ञानाचा’ लाभ आपण कसा करून घेऊ शकतो? काही अंशी, आपण ‘आपले अंतःकरण समजबुद्धीकडे लावले’ पाहिजे, अर्थात हा गुण संपादण्याची आणि प्रदर्शित करण्याची मनस्वी इच्छा बाळगली पाहिजे. याकरता देवावर विसंबून राहाण्याची गरज आहे, कारण सुज्ञ मनुष्याने म्हटले: “बुद्धी यहोवा देतो; त्याच्या मुखांतून ज्ञान व समजबुद्धी येतात.” (नीतिसूत्रे २:१-६) पण ज्ञान, बुद्धी आणि समजबुद्धी आहेत तरी काय?
२. (अ) ज्ञान काय आहे? (ब) तुम्ही बुद्धीची व्याख्या कशी कराल? (क) समजबुद्धी काय आहे?
२ ज्ञान म्हणजे अनुभव, निरीक्षण किंवा अभ्यासाद्वारे मिळवलेली वस्तुस्थितींची माहिती. बुद्धी म्हणजे ज्ञान अंमलात आणण्याची क्षमता. (मत्तय ११:१९) दोन स्त्रिया एकाच बाळावर आपला हक्क बजावू लागल्या, तेव्हा राजा शलमोनाने बुद्धीने कार्य केले आणि तो मामला मिटवण्यासाठी एखाद्या आईला आपल्या अपत्याबद्दल विलक्षण ममता असते या ज्ञानाचा त्याने उपयोग केला. (१ राजे ३:१६-२८) समजबुद्धी म्हणजे “निष्कर्ष काढण्यातील चोखंदळपणा.” ही, “दोन गोष्टींमधील भेद जाणण्याची मनाची शक्ती अथवा क्षमता आहे.” (वेबस्टर्स युनिव्हर्सल डिक्शनरी) आपण आपले अंतःकरण समजबुद्धीकडे लावल्यास, यहोवा त्याच्या पुत्राद्वारे ती आपल्याला देईल. (२ तीमथ्य २:१, ७) परंतु, समजबुद्धीचा आपल्या जीवनाच्या विविध पैलूंवर कसा परिणाम होऊ शकतो?
समजबुद्धी आणि आपली भाषा
३. तुम्ही नीतिसूत्रे ११:१२, १३ याचे स्पष्टीकरण कसे द्याल आणि “अंतःकरणहीन” असण्याचा अर्थ कसा सांगाल?
३ “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो,” हे जाणण्यास समजबुद्धी आपली मदत करते. (उपदेशक ३:७) हा गुण, आपण काय बोलतो त्याबद्दलही सावध राहण्यास मदत करतो. नीतिसूत्रे ११:१२, १३ [NW] म्हणते: “जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानतो तो अंतःकरणहीन होय, पण समजूतदार मनुष्य मौन धारण करतो. लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण ज्याच्या चित्ती इमान वसते तो गोष्ट गुप्त ठेवतो.” होय, दुसऱ्या व्यक्तीला तुच्छ लेखणारा मनुष्य “अंतःकरणहीन” असतो. विलहेल्म गेझेनियुस या कोशकारांनुसार, अशाप्रकारची व्यक्ती “समंजस नसते.” त्याला अथवा तिला योग्य निर्णयशक्ती नसते, आणि “अंतःकरण” या संज्ञेचा उपयोग केल्यामुळे आंतरिक व्यक्तिमत्त्वाच्या सकारात्मक गुणांचा अभाव असल्याचे दिसून येते. ख्रिस्ती असल्याचा दावा करणारी व्यक्ती आपल्या तोंडावर ताबा न ठेवता निंदा किंवा शिवीगाळ करण्याइतपत मजल मारते तेव्हा मात्र मंडळीतला हा अनुचित प्रकार मिटवण्यासाठी नियुक्त वडिलांनी पाऊल उचलले पाहिजे.—लेवीय १९:१६; स्तोत्र १०१:५; १ करिंथकर ५:११.
४. समजूतदार आणि विश्वासू ख्रिस्ती गुप्त माहितीविषयी काय करतात?
४ “समजूतदार” व्यक्ती, “अंतःकरणहीन” मनुष्यांप्रमाणे नसून उचित वेळी शांत राहतात. त्या गुप्त गोष्टी उघड करत नाहीत. (नीतिसूत्रे २०:१९) बेलगाम भाषेमुळे हानी होऊ शकते हे ठाऊक असल्याने समजूतदार व्यक्तींच्या “चित्ती इमान वसते.” ते सहविश्वासूंप्रती इमानदार असतात आणि सहविश्वासूंना धोक्यात टाकणाऱ्या गुपित गोष्टींची दवंडी पिटत नाहीत. समजूतदार ख्रिश्चनांना मंडळीसंबंधी कोणतीही गुप्त माहिती समजल्यास, आपल्या प्रकाशनाच्या माध्यमाद्वारे त्याविषयी इतरांना कळवणे यहोवाच्या संघटनेला योग्य वाटत नाही तोपर्यंत ते त्याविषयी इतरांना सांगत नाहीत.
समजबुद्धी आणि आपले वर्तन
५. ‘मूर्खजणांचा’ दुर्वर्तनाविषयी काय दृष्टिकोन आहे आणि का?
५ बायबलची नीतिसूत्रे आपल्याला समजबुद्धीचा उपयोग करून अनुचित वर्तन टाळण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे १०:२३ म्हणते: “मूर्खाला दुष्कर्म [दुर्वर्तन] करण्यात मौज वाटते, तशी [समजूतदाराला] ज्ञानात वाटते.” ज्या लोकांना दुर्वर्तन “मौज” वाटते त्यांना आपल्या मार्गाक्रमणाचा भ्रम झालेला असतो आणि सर्वांना देवाला हिशेब द्यायचा आहे असे ते मानत नाहीत. (रोमकर १४:१२) अशा ‘मूर्खजणांची’ कारणमीमांसा इतपत भ्रष्ट होते, की देव आपला अपराध पाहत नाही असे ते समजू लागतात. त्यांच्या कार्यांवरून ते असे म्हणत असतात: “देव नाही.” (स्तोत्र १४:१-३; यशया २९:१५, १६) ईश्वरी तत्त्वांचे मार्गदर्शन स्वीकारत नसल्यामुळे त्यांना समजबुद्धी नसते आणि ते योग्यरितीने निष्कर्ष काढू शकत नाहीत.—नीतिसूत्रे २८:५.
६. दुर्वर्तन मूर्खपणाचे का आहे आणि आपल्याला समजबुद्धी असल्यास आपण यासंबंधी कोणता दृष्टिकोन राखू?
६ दुर्वर्तन ही “मौज” किंवा खेळ नव्हे याची “[समजूतदाराला]” जाण असते. त्यामुळे देव असंतुष्ट होतो व त्याच्याबरोबरील आपला नातेसंबंध बिघडू शकतो हे त्याला ठाऊक असते. अशाप्रकारचे वर्तन मूर्खपणाचे असून त्यामुळे स्वाभिमान नष्ट होतो, लग्ने मोडतात, मन आणि शरीराला हानी पोहंचते आणि आध्यात्मिकता देखील नाहीशी होते. म्हणून आपण आपले मन समजबुद्धीकडे लावू या आणि सर्व प्रकारचे दुर्वर्तन किंवा अनैतिकता टाळू या.—नीतिसूत्रे ५:१-२३.
समजबुद्धी आणि आपले चित्त
७. रागाचे काही शारीरिक परिणाम कोणते आहेत?
७ आपले मन समजबुद्धीकडे लावल्याने आपल्या चित्तावर ताबा ठेवण्यासही मदत मिळते. “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान् होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करितो,” असे नीतिसूत्रे १४:२९ म्हणते. समजूतदार मनुष्य अनावर राग टाळण्याचा यत्न का करतो त्याचे एक कारण म्हणजे रागाचा आपल्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो. राग आणि क्रोध या भावनांमुळे दमा, त्वचा रोग, पचन समस्या आणि अल्सर अशाप्रकारचे आजार एकतर वाढतात किंवा उद्भवतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
८. रागराग केल्याने काय घडू शकते पण समजबुद्धी याबाबतीत आपली कशी मदत करू शकते?
८ पण केवळ आपल्या आरोग्याला हानी पोहंचू नये म्हणूनच आपण समजबुद्धीचा वापर करून ‘मंदक्रोध’ असू नये. रागराग केल्याने नंतर पस्तावा होईल अशी मूर्ख कृत्ये आपल्या हातून घडू शकतात. समजबुद्धी आपल्याला, बेलगाम भाष्याने किंवा उद्दाम वर्तनाने काय घडेल याचा विचार करण्यास लावते आणि अशारितीने एखादी अविचारीपणाची गोष्ट करून आपली “मूर्खता प्रकट” होण्यापासून बचावते. विशेषतः, क्रोधामुळे आपली विचारपद्धत बिघडून आपल्याला योग्य निष्कर्ष काढता येणार नाहीत हे ओळखण्यास समजबुद्धी आपली मदत करते. यामुळे ईश्वरी इच्छा करण्याची आणि देवाच्या नीतिमान तत्त्वांनुरूप जगण्याची क्षमता नष्ट होऊ शकते. होय, राग अनावर होणे आध्यात्मिकरित्या नुकसान करणारे आहे. खरे म्हणजे, “राग” यास ‘देहाच्या तिरस्कारणीय कर्मांमध्ये’ गणलेले असून त्यामुळे देवाच्या राज्यात आपला प्रवेशही होऊ शकणार नाही. (गलतीकर ५:१९-२१) म्हणून, समजूतदार ख्रिस्ती या नात्याने आपण ‘ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमे, रागास मंद’ असू या.—याकोब १:१९.
९. समजबुद्धी आणि बंधूप्रीती आपल्यामधील भेदभाव दूर करण्यास कशी मदत करू शकतात?
९ आपल्याला राग आलाच, तर भांडण वगैरे होऊ नये म्हणून आपण शांत राहावे असे समजबुद्धी सुचवते. नीतिसूत्रे १७:२७ म्हणते: “जो मितभाषण करितो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ति शांत तो समंजस असतो.” रागाच्या भरात काही भलेबुरे तोंडून निघू नये म्हणून ताबा ठेवण्याची गरज आहे हे पाहण्यास समजबुद्धी आणि बंधू प्रीती आपली मदत करतील. जर राग व्यक्त झाला असेल, तर प्रीती आणि नम्रता आपल्याला क्षमा मागण्यास आणि बदल करण्यास प्रवृत्त करतील. पण समजा कोणी आपले मन दुखावले आहे. तर मग, शांती प्रस्थापित करण्याच्या प्रमुख हेतूने आपण एकांतात त्या व्यक्तीसोबत सौम्यतेने आणि नम्रतेने बोलू या.—मत्तय ५:२३, २४; १८:१५-१७.
समजबुद्धी आणि आपले कुटुंब
१०. कौटुंबिक जीवनात बुद्धी आणि समजबुद्धीची काय भूमिका आहे?
१० कौटुंबिक सदस्यांनी बुद्धी आणि समजबुद्धी प्रदर्शित केली पाहिजे कारण या गुणांमुळे घर बांधले जाते. नीतिसूत्रे २४:३, ४ [NW] म्हणते: “बुद्धीने घर बांधले जाते, आणि समजबुद्धीने ते स्थिर राहते. आणि ज्ञानाने त्याच्या कोठड्या सर्व मोलवान व मनोरम द्रव्याने भरून जातात.” बुद्धी आणि समजबुद्धी यशस्वी कौटुंबिक जीवनाकरता उत्तम वीटांसारख्या आहेत. आपल्या मुलांच्या भावना आणि चिंता जाणून घेण्यास समजबुद्धी ख्रिस्ती पालकांना मदत करते. समजूतदार व्यक्ती परस्परसंवाद राखण्यास, दुसऱ्यांचे ऐकण्यास आणि त्याच्या अथवा तिच्या वैवाहिक सोबत्याच्या भावना जाणून घेण्यास समर्थ असते.—नीतिसूत्रे २०:५.
११. समजूतदार विवाहित स्त्री ‘आपले घर कसे बांधू’ शकते?
११ निःसंशये, बुद्धी आणि समजबुद्धी सुखी कौटुंबिक जीवनाकरता आवश्यक आहेत. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे १४:१ म्हणते: “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकिते.” आपल्या पतीच्या अधीन असलेली बुद्धिमान आणि समजूतदार विवाहित स्त्री, घराचे कल्याण व्हावे म्हणून कष्ट करील आणि अशाप्रकारे आपले घर बांधायला मदत करील. आपल्या पतीविषयी नेहमी चांगले बोलून त्याच्याविषयी इतरांचा आदर वाढवणे हा ‘तिचे घर बांधण्याचा’ एक मार्ग आहे. त्याचप्रमाणे, यहोवाची आदरयुक्त भीती बाळगणारी सद्गुणी, समजूतदार स्त्री लोकांकडून स्तुती मिळवते.—नीतिसूत्रे १२:४; ३१:२८, ३०.
समजबुद्धी आणि आपला जीवनक्रम
१२. “अंतःकरणहीन” लोकांचा मूर्खपणाविषयी काय दृष्टिकोन आहे आणि का?
१२ समजबुद्धी आपल्याला सर्व व्यवहारांमध्ये योग्य मार्गाक्रमण राखण्यास मदत करते. हे नीतिसूत्रे १५:२१, [NW] येथे सूचित केलेले असून तेथे म्हटले आहे: “अंतःकरणहीन इसम मूर्खपणात आनंद मानतो पण समजबुद्धी असलेला मनुष्य सरळ मार्गाने जातो.” हे नीतिसूत्र आपण कसे समजून घ्यावे? मूर्खपणाचे किंवा अविचारीपणाचे मार्गाक्रमण, निर्बुद्ध पुरुष, स्त्रिया आणि तरुणांकरता आनंदाचे असते. ते “अंतःकरणहीन,” चांगला हेतू न बाळगणारे असून इतके निर्बुद्ध असतात की त्यांना मूर्खपणाचा आनंद वाटतो.
१३. हसणे आणि पोरकटपणा याबद्दल शलमोनाला काय समजले?
१३ पोरकटपणा निरर्थक आहे हे इस्राएलच्या समजूतदार राजा शलमोनाला कळाले. त्याने कबूल केले: “मग मी आपल्या मनांत म्हटले, चल, हास्यविनोदाने मी तुला अजमावून पाहतो. तर आता तू सुख भोगून घे. पण हेहि व्यर्थ. मी हास्यास म्हटले, तू वेडे आहेस; मी विनोदास म्हटले, तुजपासून काय लाभ?” (उपदेशक २:१, २) समजूतदार पुरुष या नात्याने, हास्य आणि विनोद हेच केवळ समाधान पुरवणारे नाहीत कारण ते खरा आणि कायमचा आनंद निर्माण करत नाहीत हे शलमोनाला कळाले. हसण्यामुळे आपल्या समस्यांचा तात्पुरता विसर पडायला मदत होईल पण नंतर मात्र त्या कदाचित आणखीनच वाढतील. म्हणून शलमोन यथायोग्यपणे हास्याला “वेडे” म्हणू शकला. ते का? कारण निरर्थक हसण्यामुळे योग्य निर्णयशक्ती हरवू शकते. त्यामुळे आपण कदाचित गंभीर विषयांना क्षुल्लक नजरेने पाहू शकतो. राजाच्या दरबारात विनोद करणाऱ्या व्यक्तीची गंमतीदार वागणूक आणि बोली अर्थयुक्त असते असे म्हणता येऊ शकत नाही. हास्य आणि विनोदाविषयी शलमोनाने केलेल्या प्रयोगाचे महत्त्व जाणल्याने ‘देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे’ न होण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.—२ तीमथ्य ३:१, ४.
१४. समजूतदार मनुष्य “सरळ मार्गाने” कसा जातो?
१४ समजूतदार मनुष्य “सरळ मार्गाने” जातो ते कसे? आध्यात्मिक समजबुद्धी आणि देवाच्या तत्त्वांचा अवलंब लोकांना निष्कपट, प्रामाणिक मार्गी लावतात. पंडिता रमाबाईंचा अनुवाद सडेतोडपणे म्हणतो: “बुद्धिहीनाला मूर्खता हर्ष अशी आहे, परंतु ज्ञानवान मनुष्य आपले वर्तन नीट करतो.” आपल्या जीवनात देवाचे वचन लागू केल्याने “समजूतदार मनुष्य” सरळ मार्ग धरतो आणि योग्य-अयोग्य यातील भेद त्याला करता येतो.—इब्री लोकांस ५:१४; १२:१२, १३.
समजबुद्धीकरता नेहमी यहोवाकडे वळा
१५. नीतिसूत्रे २:६-९ मधून आपण काय शिकतो?
१५ जीवनात निष्कपट मार्गाक्रमण ठेवण्याकरता आम्हा सर्वांना आपली अपरिपूर्णता कबूल करून आध्यात्मिक समजबुद्धीकरता यहोवाकडे वळाले पाहिजे. नीतिसूत्रे २:६-९ म्हणते: “कारण [बुद्धी, NW] परमेश्वर देतो; त्याच्या मुखांतून ज्ञान व समजबुद्धी येतात. सरळांसाठी तो यशःप्राप्ति सुलभ करितो; सात्विकपणे चालणाऱ्यांस तो ढाल आहे; अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग संभाळावा. धर्म, नीति व सात्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल.”—पडताळा याकोब ४:६.
१६. यहोवाच्या विरोधात कोणतीही बुद्धी, समजबुद्धी आणि मसलत का नाही बरे?
१६ यहोवावर आपण विसंबून आहोत हे कबूल करून त्याच्या वचनाचा खोल अभ्यास करण्याद्वारे आपण त्याची इच्छा जाणून घेण्याचा नम्रतापूर्वक प्रयत्न करू या. त्याच्याकडे परिपूर्ण अर्थाने बुद्धी आहे, आणि त्याचा सल्ला नेहमीच फायदेकारक असतो. (यशया ४०:१३; रोमकर ११:३४) खरे म्हणजे, त्याच्या वचनाविरुद्ध असलेला कोणताही सल्ला निरुपयोगीच आहे. नीतिसूत्रे २१:३० [NW] म्हणते: “काही बुद्धी, काही समजबुद्धी, किंवा काही मसलत यहोवाच्या विरुद्ध चालत नाही.” (पडताळा नीतिसूत्रे १९:२१) ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ पुरवलेल्या प्रकाशनांच्या साहाय्याने देवाच्या वचनाचा अभ्यास करून मिळवलेल्या आध्यात्मिक समजबुद्धीद्वारेच जीवनात योग्य मार्ग धरण्यास आपल्याला मदत मिळेल. (मत्तय २४:४५-४७) म्हणून, चुकीचा सल्ला वरवरून कितीही उत्तम भासत असला, तरी यहोवाच्या वचनाशी त्याची बरोबरी होऊ शकत नाही हे लक्षात ठेवून त्याच्या सल्ल्याच्या एकमतात आपण आपली जीवनशैली राखू या.
१७. चुकीचा सल्ला दिल्यास काय घडू शकते?
१७ सल्ला देणाऱ्या समजूतदार ख्रिस्ती व्यक्तींना ठाऊक आहे, की त्यांचा सल्ला पूर्णतः देवाच्या वचनावर आधारलेला असावा आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी बायबलचा अभ्यास आणि मनन आवश्यक आहे. (नीतिसूत्रे १५:२८) गंभीर विषयांवरील प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यास पुष्कळ नुकसान होऊ शकते. यास्तव, ख्रिस्ती वडिलांना आध्यात्मिक समजबुद्धीची गरज असते आणि सहविश्वासूंना आध्यात्मिक मदत देण्याचा प्रयत्न करताना त्यांनी यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करायला हवी.
आध्यात्मिक समजबुद्धी विपुलतेत मिळवा
१८. मंडळीत समस्या निर्माण झाल्यास, आध्यात्मिक समतोल राखण्यास समजबुद्धी कशी मदत करू शकते?
१८ यहोवाला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला ‘सर्व गोष्टींची समज’ हवी आहे. (२ तीमथ्य २:७) बायबलचा उत्सुकतेने अभ्यास केल्याने आणि देवाच्या आत्म्याचे व त्याच्या संघटनेचे निर्देशन अनुसरल्याने, चुकीच्या मार्गी लावणाऱ्या परिस्थिती आपल्यासमोर आल्यावर आपण काय करावे ते जाणून घेण्यास आपल्याला मदत मिळेल. उदाहरणार्थ, समजा, मंडळीतली एखादी गोष्ट आपल्या कल्पनेनुसार हाताळण्यात आली नाही. तर मग, यहोवाच्या लोकांसोबत सहवास न ठेवण्याचे आणि देवाची सेवा सोडून देण्याचे हे कारण नाही हे पाहण्यास आध्यात्मिक समजबुद्धी आपली मदत करील. यहोवाची सेवा करण्याचा विशेषाधिकार, आपले आध्यात्मिक स्वातंत्र्य, राज्य उद्घोषक या नात्याने आपल्याला मिळणारा आनंद यांचा जरा विचार करा. आध्यात्मिक समजबुद्धी, उचित दृष्टिकोन राखण्यास आणि आपण देवाला समर्पित आहोत व इतरांनी काही केले तरी आपण त्याच्यासोबतचे नाते जपले पाहिजे हे समजून घेण्यास मदत करते. एखादी समस्या हाताळण्याकरता आपण ईश्वरशासितरित्या काही करू शकत नसल्यास, परिस्थितीचे समाधान होण्याकरता आपण धीर धरून यहोवावर विसंबून राहिले पाहिजे. देवाची सेवा सोडून देण्याऐवजी किंवा निराश होण्याऐवजी आपण ‘देवाची आशा धरली’ पाहिजे.—स्तोत्र ४२:५, ११.
१९. (अ) फिलिप्पैकरांसाठी पौलाने केलेल्या प्रार्थनेचा काय सार होता? (ब) आपल्याला पूर्णतः एखादी गोष्ट समजली नाही तर समजबुद्धी आपली मदत कशी करू शकते?
१९ आध्यात्मिक समजबुद्धी आपल्याला देवाप्रती व त्याच्या लोकांप्रती इमानदार राहण्यास मदत करते. पौलाने फिलिप्पै येथील ख्रिश्चनांना सांगितले: “माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीति [अचूक] ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने [समजबुद्धीने, NW] उत्तरोत्तर अतिशय वाढावी; असे की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.” (फिलिप्पैकर १:९, १०) योग्यप्रकारे तर्क करण्यासाठी आपल्याला ‘अचूक ज्ञान आणि समजबुद्धीची’ आवश्यकता आहे. येथे ‘समजबुद्धी’ असा अनुवादित केलेला ग्रीक शब्द, “संवेदक नैतिक समज” यास सूचित करतो. आपण काही शिकतो तेव्हा देव आणि ख्रिस्तासोबत त्याचा काय संबंध आहे ते आपण समजून घेतले पाहिजे तसेच यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाला आणि तरतुदींना ते कशाप्रकारे उंचावते त्याचे चिंतन केले पाहिजे. यामुळे यहोवा देवाने आणि येशू ख्रिस्ताने आपल्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल आपली समज आणि कृतज्ञता वाढते. आपल्याला एखादी गोष्ट पूर्णपणे समजली नाही, तर देव, ख्रिस्त आणि ईश्वरी उद्देशांबद्दल शिकलेल्या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींवरील विश्वास आपण त्यागू नये हे जाणून घेण्यास समजबुद्धी आपली मदत करील.
२०. आपल्याला विपुल आध्यात्मिक समजबुद्धी कशी लाभू शकते?
२० आपण नेहमीच देवाच्या वचनाच्या सुसंगतेत विचार आणि कृती केली, तर आपल्याला विपुल आध्यात्मिक समजबुद्धी प्राप्त होईल. (२ करिंथकर १३:५) हे सकारात्मक पद्धतीने केल्यास, आपल्याला नम्र असण्यास, कलुषित नसण्यास आणि इतरांची टीका न करण्यास मदत मिळते. समजबुद्धी आपल्याला सुधारणुकीतून लाभ मिळवून घेण्यास आणि अतिमहत्त्वपूर्ण गोष्टींची खात्री करून घेण्यास साहाय्य करील. (नीतिसूत्रे ३:७) तर मग, यहोवाला संतुष्ट करण्याची कामना बाळगून आपण त्याच्या वचनातील अचूक ज्ञानाने समृद्ध होण्याचा यत्न करू या. यामुळे अयोग्य गोष्टींमधून योग्य गोष्ट समजून घेण्यास, खरोखर काय महत्त्वाचे आहे ते ठरवण्यास आणि यहोवासोबतच्या आपल्या मौल्यवान नातेसंबंधाशी इमानदारीने जडून राहण्यास आपण समर्थ होऊ. आपण समजबुद्धीकडे आपले अंतःकरण लावले तरच हे सर्व शक्य होऊ शकते. तरीही, एवढेच पुरेसे नाही. आपण समजबुद्धीला आपले रक्षण करू दिले पाहिजे.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ आपण समजबुद्धीकडे आपले अंतःकरण का लावावे बरे?
◻ समजबुद्धीचा आपल्या भाषणावर आणि वर्तनावर काय परिणाम घडू शकतो?
◻ समजबुद्धीचा आपल्या चित्तावर काय परिणाम होऊ शकतो?
◻ आपण समजबुद्धीकरता नेहमी यहोवाकडे का वळावे?
[१३ पानांवरील चित्र]
समजबुद्धी आपल्याला आपले चित्त ताब्यात ठेवण्यास मदत करते
[१५ पानांवरील चित्र]
पोरकटपणाने समाधान लाभत नाही हे समजूतदार राजा शलमोनाने जाणून घेतले