खरा आनंद कोठे प्राप्त होऊ शकतो?
अनेकांना वाटते की, भौतिक वस्तू प्राप्त केल्याने आनंद मिळू शकतो. तुम्हाला काय वाटते? भौतिक वस्तू आपल्या आनंदात भर घालू शकत असल्या, तरी त्यांच्यामुळे आनंद मिळेलच याची खात्री मिळत नाही; त्याचप्रमाणे चैनीच्या वस्तू विश्वास वाढवत नाहीत किंवा आध्यात्मिक गरजाही तृप्त करत नाहीत.
डोंगरावरील प्रवचनात, येशू ख्रिस्त म्हणाला: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:३, NW) येशूने असेही म्हटले: “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”—लूक १२:१५.
अनेकजण अनैतिक शरीरसंबंध ठेवून आणि इतर “देहाची कर्मे” करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. (गलतीकर ५:१९-२१) तथापि, कामुक वासनांच्या आहारी गेल्याने खरा आणि कायमस्वरूपी आनंद मिळत नाही. तर उलट, अशा गोष्टी आचरणाऱ्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही.—१ करिंथकर ६:९, १०.
इतरजण आनंद मिळवण्याच्या शोधात स्वाभिमान वाढवण्याचा प्रयत्न करून आत्म-केंद्रित बनतात. ग्रंथालयांमध्ये आणि पुस्तकालयांमध्ये भरमसाट मार्गदर्शक पुस्तके असतात, पण या प्रकाशनांनी लोकांना कायमस्वरूपी आनंद दिलेला नाही. तर मग, आपल्याला खरा आनंद कोठे मिळू शकतो?
खरोखर आनंदी होण्याकरता, आपण आपली स्वाभाविक आध्यात्मिक गरज ओळखली पाहिजे. येशूने म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य.” अर्थात, ही गरज ओळखून त्याबाबतीत काहीच केले नाही तर आपल्याला काहीएक फायदा होणार नाही. उदाहरणार्थ: मॅरेथॉनमध्ये पळणाऱ्या व्यक्तीने शर्यत संपल्यावर पाण्याची शारीरिक गरज भागवली नाही तर काय होईल? लवकरच निर्जलीकरण होऊन गंभीर अवस्था होणार नाही का? त्याचप्रमाणे, आध्यात्मिक पोषण मिळवण्याच्या आपल्या गरजेकडे आपण लक्ष दिले नाही, तर कालांतराने आपण आध्यात्मिकरित्या शुष्क होऊन जाऊ. यामुळे हर्ष आणि सौख्यानंद नाहीसा होईल.
येशूने स्वतःची आध्यात्मिक गरज ओळखून देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास आणि त्याचे मनन केले. अगदी सहजगत्या पवित्र शास्त्रवचनांतले भाग शोधून तो वाचून दाखवू शकत होता आणि इतरांनाही तेच करण्यास त्याने शिकवले. (लूक ४:१६-२१; पडताळा इफिसकर ४:२०, २१.) आपल्या पित्याची इच्छा करण्याची तुलना येशूने भोजनाशी देखील केली. देवाची इच्छा केल्यामुळे त्याला पुष्कळ आनंद लाभला.—योहान ४:३४.
होय, भौतिक वस्तू संपादन करून खरा आनंद मिळवता येणार नाही; त्याचप्रमाणे पापी शरीराच्या वासना तृप्त केल्यानेही आनंद मिळत नाही. खरा आनंद हा खरा विश्वास आणि यहोवा देवासोबतच्या चांगल्या नातेसंबंधावर आधारित हृदयाची एक अवस्था आहे. तर मग, स्तोत्रकर्त्या दावीदाने उचितपणे असे गायिले: “ज्या लोकांचा देव [यहोवा] आहे ते धन्य.”—स्तोत्र १४४:१५ब.
[२३ पानांवरील चित्र]
विश्वास ठेवल्याने आणि देवासोबत उत्तम नातेसंबंध राखल्याने तुम्हाला खरा आनंद मिळेल