तुम्हाला पूर्णपणे सेवा करण्याची उत्कंठा लागली आहे का?
“मला यहोवाचा रागच आला होता. मला पायनियरींग करता यावं म्हणून आमच्या आर्थिक समस्या सोडवाव्यात अशी मी त्याला कितींदा प्रार्थना केली, पण काहीच झालं नाही. सरतेशेवटी, मला माझं पायनियरींग सोडावच लागलं. तुम्हाला सांगते, जे पायनियरींग करू शकत होते त्यांचा मला हेवा वाटू लागला,” असे लॉरा म्हणते.
यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत सेवासेवक म्हणून कार्य करणाऱ्या मायकलच्या बाबतीत काय झाले तेही पाहा. त्याला पर्यवेक्षक होण्याची इच्छा होती. (१ तीमथ्य ३:१) परंतु, त्याची ही तीव्र इच्छा अनेक वर्षांपर्यंत पूर्ण झाली नाही तेव्हा त्याला इतका राग आला, की तो विशेषाधिकार आपल्याला मिळावा असे त्याला पुन्हा कधीच वाटले नाही. तो म्हणतो, “मी निराशेची यातना पुन्हा सहन करू शकलो नाही.”
तुम्हालाही असाच अनुभव आला होता का? तुम्हाला तुमचा एखाद्या आवडत्या ईश्वरशासित विशेषाधिकाराचा त्याग करावा लागला का? उदाहरणार्थ, तुम्हाला पायनियर या नात्याने, पूर्ण वेळेचा राज्य उद्घोषक म्हणून कार्य करण्याचे थांबवावे लागले का? किंवा इतरांना सोपवलेल्या मंडळीतील विशिष्ट जबाबदाऱ्या तुम्हालाही हव्याशा वाटतात का? कदाचित तुम्हाला बेथेलमध्ये अथवा मिशनरी या नात्याने कार्य करण्याची तीव्र इच्छा असेल पण तुमची परिस्थिती तुम्हाला तशी अनुमती देत नाही.
“आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते,” असे नीतिसूत्राचे पुस्तक कबूल करते. (नीतिसूत्रे १३:१२) तुम्हाला हवे असणारे विशेषाधिकार इतरांना मिळतात तेव्हा तुम्हाला असेच वाटेल. देवाचे वचन अशा निराशांचा अनुभव घेतलेल्यांना सूक्ष्मदृष्टी, सांत्वन व आशा प्रदान करते का? होय. खरे पाहता, ८४ वे स्तोत्र अशा एका यहोवाच्या सेवकाचे मनोगत व्यक्त करते ज्याची, यहोवाच्या सेवेविषयीची इच्छा अशाप्रकारे अपूर्णच राहिली.
एका लेव्याची कृतज्ञता
स्तोत्र ८४ रचणारे कोरह पुत्र, लेवी होते जे यहोवाच्या मंदिरात कार्य करीत व आपल्या पवित्र सेवा विशेषाधिकारांचा बहुत आदर करीत होते. त्यांच्यातील एक म्हणतो: ‘हे सेनाधीश यहोवा, तुझे निवासस्थान किती रम्य आहे! माझ्या जिवाला यहोवाच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.’—स्तोत्र ८४:१, २.
या लेव्याला यहोवाच्या मंदिरात काम करण्याची इतकी उत्कंठा लागली होती, की जेरुसलेमला जाणाऱ्या मार्गावरील अगदी साधे दृश्यही त्याला आकर्षक वाटले. तो म्हणतो: “शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्यांचे स्थानच वाटते.” (स्तोत्र ८४:६) होय, रुक्ष ठिकाण त्याला हिरवेगार वाटले.
स्तोत्रकर्ता याजक नसलेला लेवी असल्यामुळे तो दर सहा महिन्यांतून केवळ एकच आठवडा मंदिरात सेवा करू शकत होता. (१ इतिहास २४:१-१९; २ इतिहास २३:८; लूक १:५, ८, ९) उरलेला वेळ तो लेव्यांच्या एखाद्या शहरात आपल्या घरी राहून घालवीत असे. यास्तव, त्याने गायिले: “हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे.” (स्तोत्र ८४:३) मंदिरात कायमचे वस्तीस्थान असलेल्या त्या पक्ष्यांप्रमाणे तो लेवी असता तर त्याला किती आनंद झाला असता!
आपल्याला मंदिरात नेहमीच सेवा करता येत नाही म्हणून त्या लेव्याला सहजपणे राग आला असता. परंतु, त्याला होईल तशी सेवा करण्यात तो संतुष्ट होता व यहोवाची मनःपूर्वक केलेली सेवा परिश्रम घेण्यालायक आहे हे त्याने निश्चितपणे जाणले होते. आपल्या सेवा विशेषाधिकारांमध्ये समाधानी राहण्यासाठी कोणत्या गोष्टीने या लेव्यास मदत केली?
समाधानी असण्यास शिका
“तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूंत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते,” असे तो लेवी म्हणतो. (स्तोत्र ८४:१०) त्याने जाणले, की यहोवाच्या भवनात केवळ एक दिवस घालवणे हा देखील एक अमूल्य सुहक्क आहे. आणि तो लेवी तर मंदिरात एकापेक्षा अधिक दिवस सेवा करू शकत होता. आपल्या विशेषाधिकारात समाधानी असल्यामुळे तो आनंदाने स्तवन करू शकला.
आपल्याबद्दल काय? आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांचा आपण विचार करतो का, की यहोवाच्या सेवेत आपल्याला असलेले सुहक्क आपण विसरून जातो? आपल्या लोकांच्या भक्तीमुळे यहोवाने त्यांना बऱ्याचप्रमाणावर सुहक्क दिले व त्यांच्यावर कामगिरी सोपवली आहे. यामध्ये देखरेखीच्या, मेंढपाळकत्वाच्या, शिक्षण देण्याच्या व पूर्ण वेळ सेवेच्या विविध पैलूंच्या भारी जबाबदाऱ्यांचा समावेश होतो. पण, यहोवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या इतर मौल्यवान गोष्टींचा देखील यात समावेश होतो.
उदाहरणार्थ, ख्रिस्ती सेवेचा विचार करा. प्रेषित पौल सुवार्तेचा प्रचार करण्याच्या आपल्या सुहक्काची तुलना ‘मातीच्या भांड्यातील संपत्तीशी’ करतो. (२ करिंथकर ४:७) अशा प्रकारच्या सेवेला तुम्ही मौल्यवान समजता का? राज्य प्रचार कार्याचा पुरोगामी, येशू ख्रिस्ताने त्यास मौल्यवान समजून आपल्याकरता एक नमुना घालून दिला. (मत्तय ४:१७) “ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही,” असे पौलाने म्हटले.—२ करिंथकर ४:१.
ख्रिस्ती सभा देखील पवित्र तरतूद असून त्यांना आपण हलके समजू नये. सभांमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण प्रशिक्षण मिळते व आवश्यक संगतीचा आनंद आपण लुटतो. सभांमध्ये नियमितरीत्या विवेचने मांडण्याद्वारे व इतर मार्गांनी कार्यक्रमात भाग घेण्याद्वारे आपण जाहीरपणे आपला विश्वास आणि आशा व्यक्त करू शकतो. (इब्री लोकांस १०:२३-२५) खरेच, आपल्या सभा अशी तरतूद आहे ज्यांना आपण प्रिय समजले पाहिजे!
पूर्वी उल्लेखलेल्या मायकलने या आशीर्वादांना मौल्यवान समजले व मनःपूर्वक गुणग्राहकता दाखवली. वडील या नात्याने कार्य करता येत नाही म्हणून निराशेमुळे या आशीर्वादांबद्दलची त्याची गुणग्राहकता तात्पुरती कमी झाली होती. त्यांच्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केल्यावर तो त्याचा मानसिक समतोल पुन्हा प्राप्त करून धीराने यहोवावर विसंबून राहू शकला.
एखादा विशिष्ट सुहक्क नसल्यामुळे असमाधानी होण्याऐवजी, यहोवा आशीर्वादित करत असलेल्या मार्गांचे पुन्हा परीक्षण केल्यास बरे होईल.a ते आशीर्वाद आपल्याला अंधूक दिसत असल्यास त्यांना पुन्हा पाहण्याची गरज भासेल, आपल्या विशेषाधिकारांना व तो आपल्याला कोणकोणत्या प्रकारे आशीर्वाद देत आहे तसेच त्याची स्तुती करण्यासाठी आपला उपयोग करीत आहे हे पाहण्यासाठी आपले डोळे उघडावेत म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो.—नीतिसूत्रे १०:२२.
खास विशेषाधिकार, जसे की वडील होण्याकरता विशिष्ट योग्यतांची आवश्यकता आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९) यास्तव, आपण स्वतःचे परीक्षण करावे, सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास परिश्रमपूर्वक प्रयत्न करावेत.—१ तीमथ्य ४:१२-१५.
निरुत्साहित होऊ नका
सेवेचा एखादा विशिष्ट सुहक्क आपल्याला मिळाला नाही तर, ज्यांना तो सुहक्क मिळाला आहे त्यांच्यावर यहोवाचे अधिक प्रेम आहे किंवा तो आपल्याला काही चांगल्या गोष्टींपासून वंचित ठेवत आहे असा निष्कर्ष मुळीच काढू नका. या सर्वांनी हे सुहक्क ईश्वरशासित नेमणुकीद्वारे नव्हे तर मानवी वशीलेबाजी करून पात्रता नसतानाही मिळवले आहेत असे गृहीत धरून मत्सर बाळगू नका. अशा कल्पनांवर विचार करत बसल्याने हेवा, वाद निर्माण होऊ शकतो व कदाचित आपण पूर्णपणे हार मानू शकतो.—१ करिंथकर ३:३; याकोब ३:१४-१६.
लेखाच्या सुरवातीला उल्लेखलेल्या लॉराने देवाची उपासना करण्याचे सोडून दिले नाही. तिने हळूहळू राग आणि मत्सराच्या भावना काढून टाकल्या. पायनियर होता येत नाही म्हणून आपल्या नकारात्मक प्रतिक्रियेवर मात मिळवण्यास मदत करण्यासाठी लॉराने वारंवार देवाला प्रार्थना केली. शिवाय मंडळीतील योग्यताप्राप्त पुरुषांनी, देवाची तिच्यावर अजूनही प्रीती आहे ही खात्री पटण्यास तिला मदत केली. ती म्हणते: “यहोवाने मला मनाची शांती दिली. आम्हा पतिपत्नीला आता पायनियरींग करता येत नसले तरी, आम्ही पूर्वी जेव्हा पायनियरींग करत होतो त्या काळाच्या आठवणी हृदयात जपून ठेवल्या आहेत व आम्हाला मिळालेल्या अनुभवांमधून शक्ती प्राप्त करतो. तसेच, पायनियरींग करणाऱ्या आमच्या मुलाला देखील आम्ही मदत करतो.” लॉरा आता, पायनियर सेवेत “आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद” करून समाधानी आहे.—रोमकर १२:१५.
साध्य करता येण्याजोगी ध्येये ठेवा
सध्याच्या सेवा सुहक्कात समाधानी होण्याकरता भविष्यात ईश्वरशासित ध्येय ठेवण्याचे थांबवावे असा अर्थ होत नाही. स्वर्गीय पुनरूत्थानाची चर्चा करताना पौल ‘पुढील गोष्टींप्रत प्रगती’ करण्याविषयी बोलला. तो असेही म्हणाला: “आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.” (फिलिप्पैकर ३:१३-१६) ईश्वरशासित ध्येये आपल्याला प्रगती करण्यास मदत करू शकतात. परंतु, एक आव्हान सामोरे येते व ते म्हणजे, वास्तववादी ध्येये ठेवणे.
वास्तववादी ध्येये वाजवी आणि साधण्याजोगी असतात. (फिलिप्पैकर ४:५) याचा अर्थ असा होत नाही, की एखादे ध्येय साध्य करण्याकरता अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागतील म्हणून ते अवास्तववादी आहे. अधूनमधून अनेक ध्येये ठेवून हळूवारपणे अशा प्रकारचे लांब पल्ल्याचे ध्येय गाठता येते. ही ध्येये आध्यात्मिक प्रगतीकरता महत्त्वाचे टप्पे ठरू शकतात. प्रत्येक पायरी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने निराशेऐवजी समाधानाची जाणीव होईल.
उत्तम दृष्टिकोन
पण, आपल्या परिस्थितींमुळे व मर्यादांमुळे काही सुहक्क साधता येणार नाहीत हे जाणणे महत्त्वपूर्ण आहे. त्यांना साधण्याची ध्येये ठेवल्यास केवळ निराशा व वैफल्य पदरी पडेल. अशा ध्येयांना सध्या तरी पुढे ढकलले पाहिजे. ईश्वरी समाधानासाठी प्रार्थना केल्यास व यहोवाच्या इच्छेला आपली प्रमुख बाब बनवल्यास असे करणे कठीण वाटणार नाही. आपल्याला सुहक्क मिळतात तेव्हा आपल्या व्यक्तिगत साध्यतांची मान्यता नव्हे तर, यहोवाची महिमा महत्त्वपूर्ण आहे. (स्तोत्र १६:५, ६; मत्तय ६:३३) बायबल उचितपणे आपल्याला सांगते: “आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.”—नीतिसूत्रे १६:३.
स्तोत्र ८४ चा विचार करताना, स्तोत्रकर्त्याने सेवा विशेषाधिकारांप्रती अशीच मनोवृत्ती ठेवल्याचे आपण पाहतो आणि यहोवाने त्याला बहुत आशीर्वाद दिला. शिवाय, हे स्तोत्र आजही यहोवाच्या लोकांच्या फायद्याचे आहे.
यहोवावर प्रार्थनापूर्वक भरवसा ठेवून तुम्ही, तुम्हाला सध्या असलेले विशेषाधिकार आणि अधिक विशेषाधिकारांची उत्कट इच्छा यामध्ये समतोल राखू शकता. आणखी करण्याच्या तुमच्या इच्छेला, तुमच्याकडे सध्या जे आहे त्याबद्दल आणि यहोवाची अनंतकाळसाठी सेवा करण्याच्या आनंदाबद्दलची गुणग्राहकता हिरावून घेऊ देऊ नका. यहोवावर भरवसा ठेवा कारण, “हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य!” या लेव्याच्या शब्दांत दाखवल्याप्रमाणे यामुळे आनंद मिळतो.—स्तोत्र ८४:१२.
[तळटीपा]
a “तुम्ही पवित्र गोष्टींची कदर बाळगता का?” हा जून १५, १९८८ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी), मधील लेख कृपया पाहा.
[११ पानांवरील चौकट]
आपण साध्य करू शकतो अशी ध्येये
दररोज बायबल वाचणे.—यहोशवा १:८; मत्तय ४:४
शास्त्रवचनीय प्रशिक्षणाद्वारा आपली ग्रहणशक्ती सुधारणे.—इब्री लोकांस ५:१४
देवासोबत निकटचा नातेसंबंध विकसित करणे.—स्तोत्र ७३:२८
आत्म्याची प्रत्येक फळे विकसित करणे.—गलतीकर ५:२२, २३
आपल्या प्रार्थनांच्या दर्जात सुधारणा करणे.—फिलिप्पैकर ४:६, ७
प्रचार करण्यात व शिक्षण देण्यात अधिक प्रभावकारी होणे.—१ तीमथ्य ४:१५, १६
टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचा प्रत्येक अंक वाचून त्यावर मनन करणे.—स्तोत्र ४९:३
[९ पानांवरील चित्र]
व्यक्तिगत ध्येये ठेवताना, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याला पहिले स्थान द्या