वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ३/१५ पृ. ४-७
  • केवळ चमत्कारांनीच विश्‍वास का वाढत नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • केवळ चमत्कारांनीच विश्‍वास का वाढत नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चमत्कारांनी विश्‍वास का वाढवला नाही
  • खऱ्‍या विश्‍वासाचा अर्थ
  • पाहत नसलो तरी विश्‍वास करतो
  • चमत्कार खरे की काल्पनिक?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • येशूचे चमत्कार—तुम्ही काय शिकू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • येशूचे चमत्कार इतिहास की दंतकथा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ३/१५ पृ. ४-७

केवळ चमत्कारांनीच विश्‍वास का वाढत नाही

दृश्‍य गोष्टींवरच विश्‍वास ठेवा. असा अनेकांचा दृष्टिकोन आहे. काहींचे म्हणणे आहे, की देवाने कोणत्यातरी चमत्कारिक मार्गाने स्वतःला प्रगटविले तरच ते त्याच्यावर विश्‍वास ठेवतील. कदाचित ते बरोबरही असू शकेल, पण अशाप्रकारच्या श्रद्धेमुळे अस्सल विश्‍वास उत्पन्‍न होईल का?

कोरह, दाथान व अबीराम या इस्राएलींचेच पाहा. बायबल दाखवते, की इजिप्तवर आलेल्या दहा पीडा, लाल समुद्रातून इस्राएल राष्ट्राचा सुखरूप बचाव व ईजिप्शियन फारो आणि त्याच्या सैनिकी बळाचा विध्वंस, या सर्व गोष्टी त्यांनी डोळ्यांनी पाहिल्या होत्या. (निर्गम ७:१९–११:१०; १२:२९-३२; स्तोत्र १३६:१५) कोरह, दाथान आणि अबीराम यांनी सिनाय पर्वतावर स्वर्गातून आलेली यहोवाची वाणी देखील ऐकली होती. (अनुवाद ४:११, १२) तरीसुद्धा, हे चमत्कार घडून जास्त वेळ उलटला नव्हता तोच, या तीन पुरुषांनी यहोवा आणि त्याच्या नियुक्‍त सेवकांविरुद्ध बंड पुकारले.—गणना १६:१-३५; स्तोत्र १०६:१६-१८.

सुमारे ४० वर्षांनंतर, बलाम नामक एका संदेष्ट्यानेही एक चमत्कार पाहिला. देवदूताने त्याला अडवले असतानाही, देवाचे शत्रू असलेल्या मवाबी लोकांचा त्याने पक्ष घेतला. तो चमत्कार पाहूनही बलाम पुढे गेला आणि यहोवा देवाविरूद्ध आणि त्याच्या लोकांविरूद्ध त्याने पवित्रा घेतला. (गणना २२:१-३५; २ पेत्र २:१५, १६) परंतु, बलामाच्या विश्‍वासाची उणीव यहुदा इस्कर्योतच्या विश्‍वासाच्या उणीवेसमोर फिक्की पडते. येशूचा निकटचा सोबती असून व कित्येक विलक्षण चमत्कार प्रत्यक्ष पाहूनसुद्धा यहुदाने चांदीच्या तीस शिक्क्यांसाठी येशूचा विश्‍वासघात केला.—मत्तय २६:१४-१६, ४७-५०; २७:३-५.

यहुदी धार्मिक नेत्यांनाही येशूच्या अनेक चमत्कारांची जाणीव होती. त्याने लाजरचे पुनरुत्थान केल्यानंतर, “तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करितो,” असेही त्यांनी कबूल केले होते. परंतु, आता जिवंत असलेल्या लाजरला पाहून त्यांची अंतःकरणे सौम्य होऊन त्यांनी विश्‍वास ठेवला का? नाही, मुळीच नाही. उलट, त्यांनी लाजर आणि येशू या दोघांना ठार मारण्याचा कट रचला!—योहान ११:४७-५३; १२:१०.

देवाच्या थेट हस्तक्षेपामुळेसुद्धा त्या दुष्ट मनुष्यांमध्ये विश्‍वास उत्पन्‍न झाला नाही. एके प्रसंगी येशू मंदिराच्या आवारात होता तेव्हा त्याने मोठ्याने प्रार्थना केली: “हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” यहोवाने स्वर्गातून एका वाणीद्वारे लगेचच उत्तर दिले: “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.” पण, या चमत्कारिक घटनेमुळे तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये विश्‍वास उत्पन्‍न झाला नाही. बायबल म्हणते: “त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताहि त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही.”—योहान १२:२८-३०, ३७; पडताळा इफिसकर ३:१७.

चमत्कारांनी विश्‍वास का वाढवला नाही

इतके चमत्कार घडूनही विश्‍वासाची उणीव का होती? येशूने त्याच्या सेवेची सुरवात केली तेव्हा यहुदी धार्मिक नेत्यांनी त्याला नाकारल्याचे पाहून तुम्ही गोंधळून जाल कारण तेव्हा सर्व यहुदी “ख्रिस्त,” किंवा मशीहाची ‘वाट पाहत होते.’ (लूक ३:१५) परंतु खरी समस्या, ते ज्या कारणासाठी त्याची वाट पाहत होते त्यातच होती. कोशकार डब्ल्यू. ई. वाईन एका लोकप्रिय बायबल विद्वानांचे बोल उद्धृत करतात, की यहुदी लोक, त्यांना “पार्थिव विजय” व “भौतिक समृद्धता” देणाऱ्‍या मशीहाच्या कल्पनेने पछाडले होते. यास्तव, सा. यु. २९ मध्ये खरा मशीहा, नम्र, राजकीय नसलेला नासरेथचा येशू प्रकट झाला तेव्हा त्याचा स्वीकार करावयास ते तयार नव्हते. येशूच्या शिकवणुकी तेव्हा अस्तित्वात असलेल्या परिस्थितीत भंग करतील व त्यांच्या प्रमुख हुद्यांना धोक्यात घालतील अशीही धार्मिक नेत्यांना भीती होती. (योहान ११:४८) त्यांच्या पूर्वकल्पित कल्पना व स्वार्थीपणा यामुळे ते येशूच्या चमत्कारांचा अर्थ समजू शकले नाहीत.

यहुदी धार्मिक नेत्यांनी व इतरांनी नंतर, येशूच्या अनुयायांना ईश्‍वरी कृपा मिळाल्याचा चमत्कारिक पुरावा नाकारला. उदाहरणार्थ, जेव्हा त्याच्या प्रेषितांनी जन्मापासून पांगळा असलेल्या एका मनुष्याला बरे केले तेव्हा यहुदी उच्च न्यायालयाच्या क्रोधिष्ठ सदस्यांनी विचारले: “ह्‍या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखरच प्रसिद्ध चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमकरांस कळून चुकले आहे; तेव्हा ते आपणाला नाकारता येत नाही; तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्‍यापुढे तुम्ही ह्‍या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरहि बोलू नये.” (प्रेषितांची कृत्ये ३:१-८; ४:१३-१७) स्पष्टपणे, या आश्‍चर्यकारक चमत्कारामुळे त्या लोकांच्या मनातील विश्‍वास वाढला नाही किंवा उत्पन्‍नही झाला नाही.

स्वाभिमान, गर्व आणि लोभ यांमुळे अनेक जण आपली अंतःकरणे कठोर करण्यास प्रवृत्त झाले आहेत. सुरवातीला उल्लेखलेल्या कोरह, दाथान व अबीराम यांच्या बाबतीत हेच झाले असावे असे दिसते. ईर्ष्या, भय आणि इतर अनेक हानीकारक मनोवृत्तींनी इतरांना अडखळण केले आहे. आपल्याला त्या अवज्ञाकारक देवदूतांची, अर्थात दुरात्म्यांची आठवण करून दिली जाते ज्यांना देवाचे मुख पाहण्याचा विशेषाधिकार होता. (मत्तय १८:१०) त्यांना देवाच्या अस्तित्वाची शंका नाही. होय, ‘भुतेही विश्‍वास धरतात व थरथर कापतात.’ (याकोब २:१९) तरीसुद्धा त्यांची देवावर श्रद्धा नाही.

खऱ्‍या विश्‍वासाचा अर्थ

एखाद्या गोष्टीवर निव्वळ श्रद्धा असणे आणि विश्‍वास असणे यात फरक आहे. ते एखाद्या चमत्काराप्रती क्षणिक भावनात्मक प्रतिक्रिया दाखवण्यापेक्षा वेगळे आहे. इब्री लोकांस ११:१ म्हणते: “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खातरी आहे.” विश्‍वास असलेल्या व्यक्‍तीची खात्री पटलेली असते, की यहोवा देवाने अभिवचन दिलेल्या सर्व गोष्टी जवळजवळ पूर्ण झाल्यातच जमा आहेत. शिवाय, अदृश्‍य वास्तविकतांचा नाकारता न येणारा पुरावा इतका प्रबळ आहे, की विश्‍वास पुराव्याच्या बरोबरीचा आहे असे म्हटले जाते. होय, विश्‍वास पुराव्यांवर आधारित आहे. आणि गत काळात, विश्‍वास उत्पन्‍न करण्यात किंवा वाढवण्यात चमत्कारांनी आपली भूमिका बजावली. येशूने दाखवलेल्या चिन्हांमुळे तोच वचनयुक्‍त मशीहा असल्याची लोकांना खात्री पटली. (मत्तय ८:१६, १७; इब्री लोकांस २:२-४) त्याचप्रमाणे, चमत्कारिकरीत्या बरे करणे व अन्य भाषांमध्ये बोलणे, यांसारख्या देवाच्या पवित्र आत्म्याच्या दानांनी अथवा कार्यकारी शक्‍तीने शाबीत केले, की यहुद्यांवर आता यहोवाची कृपा राहिली नव्हती तर देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने स्थापिलेल्या ख्रिस्ती मंडळीवर त्याची स्वीकृती होती.—१ करिंथकर १२:७-११.

आत्म्याच्या चमत्कारिक दानांपैकी एक, भाकीत करण्याची क्षमता होती. विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांनी हा चमत्कार पाहिला तेव्हा, “तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे,” असे उद्‌गार काढून काही जण यहोवाची उपासना करण्यास प्रवृत्त झाले. (१ करिंथकर १४:२२-२५) परंतु, चमत्कार ख्रिस्ती उपासनेचे कायमचेच वैशिष्ट्य व्हावे असा यहोवा देवाचा उद्देश नव्हता. म्हणूनच, प्रेषित पौलाने लिहिले: “संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील.” (१ करिंथकर १३:८) उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार, ही दाने प्रेषितांच्या व त्यांच्याद्वारे ज्यांना ज्यांना दाने प्राप्त झाली होती त्यांच्या मृत्यूनंतर समाप्त झाली.

मग विश्‍वास बाळगण्यास लोकांना आधाराविना सोडण्यात आले का? नाही, कारण पौलाने म्हटले: “[देवाने] स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्‍नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.” (प्रेषितांची कृत्ये १४:१७) होय, आपल्या सभोवती असलेल्या पुराव्यांना पाहण्यासाठी आपली मने व अंतःकरणे खुली करू इच्छिणाऱ्‍या नम्र जनांना, ‘सृष्टीच्या निर्मितीपासून यहोवा देवाच्या अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना [देवास नाकारणारे] कसलीहि सबब राहू नये.’—रोमकर १:२०.

देवाच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवणे इतकेच पुरेसे नाही. पौलाने आर्जवले: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्‍या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) हे, या नियतकालिकासारख्या ख्रिस्ती प्रकाशनांच्या साहाय्याने शास्त्रवचनांच्या परिश्रमपूर्वक अभ्यासाद्वारे केले जाऊ शकते. देवाचे वचन, बायबलमधील अचूक ज्ञानावर आधारित विश्‍वास कमजोर किंवा वरकरणी नाही. देवाची इच्छा समजून घेणारे व ती विश्‍वासाने पूर्ण करणारे देवाची पवित्र सेवा करीत आहेत.—रोमकर १२:१.

पाहत नसलो तरी विश्‍वास करतो

मृतांतून पुनरुत्थान झालेल्या येशूवर विश्‍वास ठेवण्यास प्रेषित थोमाला कठीण वाटले. त्याने म्हटले: “त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्‍वास धरणारच नाही.” येशूने, त्याला सुळावर चढवल्यामुळे झालेल्या जखमा दिसणारे मानवी शरीर धारण केले तेव्हा थोमाने या चमत्काराला अनुकूल प्रतिसाद दिला. परंतु येशूने म्हटले: “पाहिल्यावाचून विश्‍वास ठेवणारे ते धन्य.”—योहान २०:२५-२९.

आज, लाखो यहोवाचे साक्षीदार ‘डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चालत आहेत.’ (२ करिंथकर ५:७) बायबलमध्ये लिहून ठेवलेले चमत्कार त्यांनी प्रत्यक्ष पाहिले नसले तरी, ते चमत्कार घडले होते असा त्यांचा ठाम विश्‍वास आहे. देव आणि त्याच्या वचनावर साक्षीदार विश्‍वास ठेवतात. त्याच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने ते बायबलच्या शिकवणुकी आणि यहोवा देवाच्या स्वर्गीय राज्याकरवी त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन हा बायबलचा प्रधान विषय समजू शकतात. (मत्तय ६:९, १०; २ तीमथ्य ३:१६, १७) हे खरे ख्रिस्ती बायबलचा सुज्ञ सल्ला आपल्या जीवनात लागू करतात ज्याचा त्यांना बराच फायदा होतो. (स्तोत्र ११९:१०५; यशया ४८:१७, १८) बायबल भविष्यवाण्या आपल्या काळाची ‘शेवटले दिवस’ अशी ओळख करतात हा अखंडनीय पुरावा ते स्वीकारतात आणि देवाचे वचनयुक्‍त नवीन जग अतिशय जवळ असल्याचा त्यांचा विश्‍वास आहे. (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:३-१४; २ पेत्र ३:१३) इतरांना देवाच्या ज्ञानाबद्दल सांगण्यात त्यांना आनंद वाटतो. (नीतिसूत्रे २:१-५) त्यांना ठाऊक आहे, की केवळ शास्त्रवचनांच्या अभ्यासाद्वारेच देवाचा शोध करणाऱ्‍यांना तो सापडू शकतो.—प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७.

आधीच्या लेखातील अलबर्ट आठवतो का? चमत्कारासाठी त्याने केलेली प्रार्थना निरुत्तर होऊन काही दिवस लोटल्यावर यहोवाची साक्षीदार असलेल्या एका वृद्ध स्त्रीने त्याला भेट दिली व काही बायबल आधारित साहित्य दिले. त्यानंतर अलबर्टने गृह बायबल अभ्यास स्वीकारला. बायबलच्या संदेशाशी तो जसजसा परिचित होत गेला तसतसे त्याच्या निराशेचे परिवर्तन आनंदात होऊ लागले. सरतेशेवटी त्याला देवाची ओळख झाल्याचे जाणवू लागले.

शास्त्रवचने आर्जवतात: “परमेश्‍वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा.” (यशया ५५:६) तुम्हीही, देवाकडून एखाद्या आधुनिक दिवसीय चमत्काराची वाट पाहत न बसता त्याच्या वचनातील अचूक ज्ञान प्राप्त करून त्याचा शोध करू शकता. ही एक आवश्‍यकता आहे कारण केवळ चमत्कारानेच विश्‍वास वाढतो असे नाही.

[५ पानांवरील चित्र]

लाजरच्या चमत्कारिक पुनरुत्थानानेही येशूच्या शत्रूंना विश्‍वास ठेवण्यास प्रवृत्त केले नाही

[७ पानांवरील चित्रं]

विश्‍वास बायबलच्या अचूक ज्ञानावर आधारित आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा