देवावर विश्वास—याकरता चमत्काराची गरज आहे का?
अलबर्टला नुकतेच विसावे वर्ष लागले तेव्हा तो देवाचा शोध घेऊ लागला. अनेक धर्मांचे परीक्षण करूनही तो असमाधानीच राहिला. बायबलचे काही भाग वाचल्यावर, नोहा, अब्राहाम, सारा आणि मोशे यांसारख्या लोकांबरोबर देवाने कसा व्यवहार केला ते त्याला कळले. अलबर्टला बायबलच्या देवाजवळ असल्यासारखे वाटले. परंतु, देव खरोखरच अस्तित्वात होता याची त्याला खात्री पटली असती का?
एकदा संध्याकाळी, अलबर्ट एका निर्जन ठिकाणी गेला आणि त्याने देवाला प्रार्थना केली, “हे देवा, कृपया, मला तुझे अस्तित्व सिद्ध करणारे कोणतेही चिन्ह दाखव.” तो खूप वेळ थांबून राहिला. पण काहीच घडले नाही तेव्हा त्याच्या आशेचे “रूपांतर निराशा, पोकळपणा, राग यांत झाल्याचे” त्याला आठवते.
अलबर्टप्रमाणे अनेकांना देवाचा शोध करण्यात निरर्थकपणे वेळ घालवल्यासारखे वाटले आहे. ते कदाचित पाळकांच्या भाषणांमुळे गोंधळून गेले असतील किंवा दूरदर्शन सुवार्तिकांच्या विक्रयकलेमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला असेल. काहींना त्यांच्या अनेक शेजाऱ्यांमध्ये स्पष्ट दिसणारा दांभिकपणा पाहूनच कशावर विश्वास ठेवण्याचे निश्चित समजत नाही. पण, प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने आपला पुत्र शलमोन यास निश्चयपूर्वक सांगितले: “जर तू [देवाचा] शोध करशील तर तो तुला सापडेल.”—१ इतिहास २८:९, पं.र.भा.
तर मग देव स्वतःला कशाप्रकारे प्रगट करतो? देव अस्तित्वात आहे हे सिद्ध व्हावे म्हणून तुम्ही एखाद्या चिन्हाची—एखाद्या अलौकिक अनुभवाची अपेक्षा करावी का? टाइम नियतकालिकात आलेल्या एका अलिकडील नोंदीनुसार, दोन तृतीयांशापेक्षा अधिक अमेरिकी लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात. त्या लेखाने अशीही नोंद केली की, “अमेरिकेत सर्वात जलद वाढणारी चर्चेस, ‘चिन्हे आणि चमत्कार’ यांच्या भोवती केंद्रित असलेल्या उपासनांचे कॅरिसमॅटिक व पेन्टेकॉस्टल मंडळ्या आहेत.”
देवावर विश्वास ठेवण्यासाठी ‘चिन्हे आणि चमत्कारांची’ खरोखरीच गरज आहे का? गतकाळामध्ये देवाने चमत्कारांचा उपयोग जरूर केला होता. जसे की: देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या अनुयायांचा छळ करणाऱ्या तार्ससच्या शौलाला जेरूसलेम ते दिमिष्कच्या मार्गावर एक विलक्षण अनुभव आला. पुनरुत्थित येशूशी पडलेल्या या चमत्कारिक गाठीमुळे शौलाचे परिवर्तन घडले. (प्रेषितांची कृत्ये ९:१-२२) अशाप्रकारे पूर्वी छळ करणारा, प्रेषित पौल बनला—ख्रिस्ती धर्माचा प्रमुख समर्थक!
पण चमत्कार नेहमीच अशाप्रकारचे अनुकूल प्रतिसाद उत्पन्न करतात का? देवावर अस्सल विश्वास, एखाद्याला आलेल्या चमत्कारिक अनुभवावर अवलंबून आहे का?
[३ पानांवरील चित्र]
देवाचा पुत्र चमत्कारिकपणे तार्ससच्या शौलाशी बोलला. तुम्हीही चमत्काराची अपेक्षा करावी का?