वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ३/१ पृ. ३-५
  • येशूचे चमत्कार इतिहास की दंतकथा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूचे चमत्कार इतिहास की दंतकथा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अशक्य?
  • सत्यतेचा पुरावा
  • लौकिक आधार
  • येशूचे चमत्कार—तुम्ही काय शिकू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • चमत्कार खरे की काल्पनिक?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • येशूचे चमत्कार—खरे होते की काल्पनिक?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • पृथ्वीवर असताना येशूने काय केलं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ३/१ पृ. ३-५

येशूचे चमत्कार इतिहास की दंतकथा?

“रात्रीच्या चवथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला.” —मत्तय १४:२५.

आज जगभरातील लाखोजन असा विश्‍वास बाळगतात, की येशू ख्रिस्ताने चमत्कार केले आणि हे देवावर विश्‍वास ठेवण्याइतपत महत्त्वाचे आहे. शुभवर्तमानाचे लेखक—मत्तय, मार्क, लूक आणि योहान—येशूच्या साधारण ३५ चमत्कारांचे वर्णन करतात. तथापि, त्यांचे अहवाल सुचवितात की त्याने अनेक अनैसर्गिक चमत्कार केले.—मत्तय ९:३५; लूक ९:११.

हे चमत्कार मनोरंजनासाठी करण्यात आले नव्हते. येशू देवाचा पुत्र व ज्याची लोक पुष्कळ काळापासून वाट पाहत होते असा मशीहा असल्याचे सिद्ध करण्याचा तो एक भाग होता. (योहान १४:११) मोशेने दासत्वाच्या अधीन असणाऱ्‍या इज्राएल राष्ट्रासमोर स्वतःला उपस्थित केले तेव्हा आश्‍चर्यकारक चिन्हे दाखवली. (निर्गम ४:१-९) मोशेपेक्षा येशू श्रेष्ठ असेल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती आणि त्यामुळे या मशीहाकडून त्याला ईश्‍वरी पाठबळ असल्याची काही चिन्हे दाखवण्याची अपेक्षा करणे देखील तर्कसंगत आहे. (अनुवाद १८:१५) अशाप्रकारे बायबल, “जी महत्कृत्ये, अद्‌भुते व चिन्हे तुम्हाला [यहुद्यांना] दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता पटविलेला असा मनुष्य,” असे येशूचे वर्णन करते.—प्रेषितांची कृत्ये २:२२.

येशू चमत्कार करणारा आहे या बायबलच्या वर्णनाचा गतकाळातील लोकांनी सामान्यतः निःसंशये स्वीकार केला. परंतु अलीकडच्या दशकांमध्ये शुभवर्तमानाच्या अहवालांची समीक्षकांकडून आलोचना झाली आहे. लॉईड ग्रॅहम्‌, बायबलमधील लबाडी आणि दंतकथा (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकामध्ये येशूचे पाण्यावर चालणे या बायबलच्या अहवालाचा उल्लेख करतात आणि असेही म्हणतात की, “यावर शब्दशः विश्‍वास ठेवणे हे फारच अज्ञानतेचे आहे; तरीदेखील लाखोजन यावर अक्षरशः विश्‍वास ठेवतात. यामुळे आपल्या या जगाला काय झाले आहे याचे आपल्याला आश्‍चर्य वाटते. अशाप्रकारची अज्ञानता असताना तुम्ही कोणत्या उत्तम जगाची अपेक्षा कराल?”

अशक्य?

तथापि, अशाप्रकारच्या टीका रास्त नसतात. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया चमत्काराची व्याख्या अशाप्रकारे देतो, “ज्ञात असणाऱ्‍या नैसर्गिक नियमांद्वारे वर्णन करता न येणारी घटना.” या व्याख्येच्या अनुषंगाने रंगीत दुरदर्शन संच, सेल्युलर दूरध्वनी किंवा लॅपटॉप संगणक हे फक्‍त एका शतकापूर्वीचे चमत्कारच ठरले असते! सध्याच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला केवळ वर्णन करता येत नाही म्हणून हटवादी होणे आणि हे अगदी अशक्य आहे असे म्हणणे समंजसपणाचे आहे का?

विचार करण्याजोगी दुसरी वस्तुस्थिती म्हणजे, मूळ ग्रीक भाषा ज्यामध्ये “नवा करार” लिहिण्यात आला त्यात “चमत्कार” यासाठी डायʹनॅ·मिस हा शब्द वापरण्यात आला आणि त्याचा मूलभूत अर्थ “सामर्थ्य” असा होतो. या शब्दाचा उल्लेख “अद्‌भुत कार्य” किंवा ‘योग्यता’ असा देखील करण्यात आला आहे. (लूक ६:१९; १ करिंथकर १२:१०; मत्तय २५:१५) बायबल दावा करते की, येशूचे चमत्कार ‘देवाच्या महान सामर्थ्याचे’ प्रकटीकरण होते. (लूक ९:४३) सर्वशक्‍तीमान देव—जो “महासमर्थ” आहे त्याला अशाप्रकारची कार्ये अशक्य आहेत का?—यशया ४०:२६.

सत्यतेचा पुरावा

चार शुभवर्तमानांचे सूक्ष्म परीक्षण केल्यानंतर त्यांच्या वास्तविकतेचे प्रमाण पटते. विचारणीय मुद्दा हा आहे की, हे अहवाल काल्पनिक कथा आणि दंतकथा यापासून स्पष्टपणे वेगळे आहेत. उदाहरणार्थ, येशूच्या मृत्यूनंतरच्या शतकामध्ये त्याच्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टींचा प्रसार झाला याचा जरा विचार करा. जोडण्यात आलेले पुस्तक, “थॉमस यांचे शुभवर्तमान” सांगते, “येशू हा पाच वर्षांचा मुलगा होता . . .  तेव्हा एका खेड्यातून जात असताना एक मुलगा पळत येऊन त्याच्या खांद्याला धडकला. येशू क्रोधीत झाला आणि त्याला म्हणाला, ‘तु पुढे मार्गक्रमण करणार नाही’ आणि तो मुलगा तत्काळ खाली पडला व मरण पावला.” या गोष्टीतील वास्तविकतेला ओळखणे फारसे अवघड नाही—बनविलेल्या कल्पित गोष्टीचा तो एक भाग आहे. त्याशिवाय, येथे वर्णन केलेले लहरी व निर्दयी मुल आणि बायबलमधील येशू यामध्ये कोणतीही समांतरता नाही.—लूक २:५१, ५२ बरोबर तुलना करा.

सत्य शुभवर्तमान अहवालांचा आता विचार करा. ते अतिशयोक्‍ती आणि काल्पनिक कथांपासून भिन्‍न आहेत. येशूने मनाच्या लहरीमुळे नव्हे तर वास्तविक गरजेसाठी चमत्कार केले. (मार्क १०:४६-५२) येशूने त्याच्या सामर्थ्याचा स्वतःच्या लाभास्तव कधीही वापर केला नाही. (मत्तय ४:२-४) त्याने या सामर्थ्याचा उपयोग देखावा करण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी कधीही केला नाही. वास्तविकपणे, हेरोद या जिज्ञासू राजाची येशूने त्याच्यासाठी “चमत्कार” करावा अशी अपेक्षा होती; परंतु येशूने त्याला “काही उत्तर दिले नाही.”—लूक २३:८, ९.

पेशेवाईक हातचलाखी करणारे, जादूगार आणि प्रार्थनेद्वारे आजार बरे करणाऱ्‍या लोकांपासून येशूचे चमत्कार अगदी वेगळे होते. त्याच्या महत्कृत्यांनी नेहमी देवाचे गौरव केले. (योहान ९:३; ११:१-४) त्याचे चमत्कार भावनावश विधी, जादूमंतर, दिखाऊ गोष्टी, फसवेगिरी आणि मोहिनी विद्या यापासून अलिप्त होते. बार्तीमय नामक आंधळ्याबरोबर येशूची भेट झाली तेव्हा, “गुरुजी, मला दृष्टि प्राप्त व्हावी,” अशी तो ओरड करत होता; येशू त्याला केवळ म्हणाला, “जा, तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टि आली.”—मार्क १०:४६-५२.

शुभवर्तमानाचे अहवाल दर्शवितात त्याप्रमाणे विशेषतः पूर्वयोजित रंगमंच किंवा फसविण्यासाठी केलेली प्रकाशयोजना अशा कोणत्याही साधनाविना येशूने चमत्कार केले. ही महत्कृत्ये बाहेर उघड्यावर, पुष्कळदा अनेकांच्या समोर करण्यात आली होती. (मार्क ५:२४-२९; लूक ७:११-१५) आधुनिक दिवसातील प्रार्थनेद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्‍यांप्रमाणे नव्हे तर आजारी लोकांतील विश्‍वासाच्या अभावामुळे बरे करण्याचे त्याचे प्रयत्न कधीही विफल झाले नाहीत. मत्तय ८:१६ म्हणते, त्याने “सर्व दुखणाइतांना बरे केले.”

विद्वान आर्थर प्रिन्सन हे “अनेक सबळ पुरावे:” ख्रिस्ती विश्‍वासाची साक्ष (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकामध्ये येशूच्या चमत्कारांविषयी म्हणतात: “त्यांची संख्या, तत्कालिकता आणि रोग्यांना पूर्णपणे बरे करणे व मृतांना उठवताना एकदा देखील अपयश न येणे, यामुळे वर्तमान किंवा इतर कोणत्याही युगातील ढोंगी चमत्कारांमधील फार मोठा भेद स्पष्ट होतो.”

लौकिक आधार

प्रिन्सन आणखी एक वादविवाद मांडतात आणि तो शुभवर्तमानाच्या अहवालांची पुष्टी करतो, ते म्हणतात: “त्याने केलेल्या शास्त्रवचनीय चमत्कारांना त्याच्या विरोधकांची मौन स्वीकृती हा एक सबळ पुरावा होऊ शकतो.” येशूची अप्रतिष्ठा करण्याची यहुदी नेत्यांची तीव्र इच्छा होती; परंतु त्याचे चमत्कार सर्वांना माहीत असल्यामुळे त्यांना अमान्य करण्याची विरोधकांची हिंमत झाली नाही. त्यांनी या चमत्कारांचा संबंध दुरात्मिक शक्‍तीशी लावला आणि ते केवळ तेवढेच करू शकत होते. (मत्तय १२:२२-२४) येशूच्या मृत्यूच्या अनेक शतकानंतर देखील यहुदी सांप्रदायाचे लेखक चमत्कारी सामर्थ्याचे समर्थन करीत होते. येशूवरील यहुदी विवेचने (इंग्रजी), या पुस्तकानुरुप तो “जादूटोना करणारा” आहे असा विचार करुन त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. येशूचे चमत्कार दंतकथा असल्याची किंचितही शक्यता असली तर अशाप्रकारचे विवेचन करण्यात आले असते का?

युसेबीयस हे चौथ्या शतकातील चर्च इतिहासकार पुढील पुरावा सादर करतात. ख्रिस्तापासून ते कॉन्स्टटाईनपर्यंतचा चर्चचा इतिहास (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकामध्ये सम्राटाला ख्रिस्ती विश्‍वासाच्या समर्थनपर पत्र लिहिलेल्या कॉडर्टस याचा उल्लेख ते करतात. कॉडर्टस यांनी लिहिले: “आमच्या तारणकर्त्याची कामे नेहमीच लक्षवेधक होती कारण ती सत्य होती—बरे झालेले लोक आणि मेलेल्यातून उठविलेले लोक त्यांना बरे करण्यात आले किंवा मेलेल्यातून उठविण्यात आले त्याचवेळीच केवळ त्यांना पाहण्यात आले नव्हते तर त्यानंतर देखील ते नेहमीच पाहण्यासाठी जिवंत होते; उद्धारकर्ता आमच्यामध्ये होता केवळ तोपर्यंतच नव्हे तर तो निघून गेल्यानंतर देखील; खरे म्हणजे, त्यापैकी काही माझ्या या समयापर्यंत जिवंत आहेत.” विद्वान विल्यम्‌ बार्कले यांनी निरीक्षले, “कॉडर्टस हे म्हणतात, की त्यांच्या समयापर्यंत चमत्कारांचा प्रभाव झालेले जिवंत लोक एक पुरावा ठरू शकत होते. हे असत्य असते तर प्रत्यक्ष साक्षीदारांना खोटे ठरविण्यासाठी रोमन सरकारला फारच सोपे झाले असते.”

येशूच्या चमत्कारांवर विश्‍वास ठेवणे हे समंजसपणाचे, तर्कसंगत आणि पुराव्याच्या पूर्ण एकवाक्यतेत आहे. तथापि, येशूचे चमत्कार मृत इतिहास नव्हेत. इब्रीयांस १३:८ आपल्याला याचे स्मरण करून देते की, “येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.” होय, तो आज स्वर्गांमध्ये जिवंत आहे आणि पृथ्वीवर मानवी रुपात असताना त्याने वापरलेल्या सामर्थ्यापेक्षा फार मोठ्याप्रमाणात चमत्कारी सामर्थ्याचा उपयोग करण्यास तो समर्थ आहे. याशिवाय, त्याच्या चमत्कारांविषयी शुभवर्तमान (१) आज ख्रिश्‍चनांना व्यावहारिक धडे शिकवतात, (२) येशूच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या आकर्षक बाबींविषयी प्रकट करतात आणि (३) नजीकच्या काळावर ज्यामध्ये मोठ्याप्रमाणात नेत्रदीपक घटना घडतील त्यावर लक्ष केंद्रित करतात!

या मुद्यांना स्पष्ट करण्यासाठी आमचा पुढील लेख तीन सुप्रसिद्ध बायबल वृतांतावर लक्ष केंद्रित करील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा