त्यांनी यहोवाची इच्छा पूर्ण केली
मशिहा आणि राजा म्हणून येशूला गौरविण्यात येते!
जेरुसलेममध्ये सा.यु. ३३, निसान ९ रोजी गलबला करीत एक जमाव प्रवेश करीत होता तेव्हा अनेक यहुद्यांना त्याचे आश्चर्य वाटले. वल्हांडणाच्या आधी लोकांना शहरात येताना पाहणे असामान्य नव्हते तरी देखील या भेट देणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी वेगळेपण जाणवत होते. गाढवीच्या शिंगरावर स्वार असलेला मनुष्य त्यांच्यातील प्रमुख होता. तो मनुष्य येशू ख्रिस्त होता आणि लोक त्याच्यासमोर वस्त्रे तसेच खजुरीच्या झावळ्या पसरत होते आणि असा गजर करीत होते: “दावीदाच्या पुत्राला होसान्ना परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित! ऊर्ध्वलोकी होसान्ना!” या जमावाला पाहिल्यानंतर जेरुसलेममध्ये आधीपासूनच असणारे लोक या मिरवणुकीत सामील होण्यास प्रेरित झाले.—मत्तय २१:७-९; योहान १२:१२, १३.
त्याला आता जरी गौरविण्यात येत होते तरी आपल्याला पुढे परीक्षांना तोंड द्यायचे आहे, याची येशूला कल्पना होती. केवळ पाच दिवसांत त्याला याच शहरात जिवानिशी मारण्यात येणार होते! होय, येशूला हे ठाऊक होते, की जेरुसलेम हा शत्रूचा मुलूख होता आणि त्याने जाहीररीत्या सर्वांसमक्ष या शहरात प्रवेश केला तेव्हा त्याच्या मनात नेमका हा विचार होता.
प्राचीन भविष्यवाणीची पूर्णता
सा.यु.पू. ५१८ मध्ये जखऱ्याने जेरुसलेममधील येशूच्या विजयसूचक प्रवेशाबद्दल भाकीत केले होते. त्याने लिहिले: “यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. . . . तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदीपासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.”—जखऱ्या ९:९, १०.
यास्तव, निसान ९ रोजी जेरुसलेममधील येशूच्या प्रवेशाने बायबलमधील भविष्यवाणीची पूर्णता केली. ही काही आकस्मिक घटना नव्हती; उलटपक्षी तिची काळजीपूर्वक योजना करण्यात आली होती. जेरुसलेममध्ये प्रवेश करण्याच्या बेतात असताना येशूने आपल्या दोघा शिष्यांना असे मार्गदर्शन केले: “तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील; ती सोडून माझ्याकडे आणा; आणि कोणी तुम्हास काही म्हटले, तर प्रभूला ह्यांची गरज आहे, असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” (मत्तय २१:१-३) पण येशूला जेरुसलेममध्ये गाढवावर बसून का जावयाचे होते आणि समूहाच्या प्रतिक्रियेचा काय पुरावा होता?
राजत्वाची मूलभूत कल्पना
बहुतेक वेळा विदित शब्दापेक्षा दृश्य प्रतिमा अधिक शक्तिशाली असते. अशा प्रकारे यहोवाच्या संदेष्ट्यांनी काही वेळा आपला भविष्यसूचक संदेश नाटकाच्या रूपात स्पष्ट केला. (१ राजे ११:२९-३२; यिर्मया २७:१-६; यहेज्केल ४:१-१७) दळणवळणाच्या या उच्च दृश्य माध्यमांनी अगदी पाषाणहृदयी निरीक्षकाच्या मनावर देखील कायमची छाप पाडली. त्याचप्रमाणे येशूने जेरुसलेममध्ये गाढवावर बसून प्रवेश करण्याद्वारे एक शक्तिशाली संदेश नाटकाच्या रूपात स्पष्ट केला. ते कसे काय?
बायबल काळात गाढवाचा उपयोग सन्माननीय उद्देशासाठी करण्यात येत असे. उदाहरणार्थ, शलमोन राजा स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळी आपल्या वडिलांच्या “खेचरावर” अर्थात गाढवाच्या मिश्रजातीय प्राण्यावर बसून आला होता. (१ राजे १:३३-४०) यास्तव, येशू जेरुसलेममध्ये गाढवावर बसून आला तेव्हा तो स्वतःला राजा या नात्याने सादर करीत आहे, असा याचा अर्थ होणार होता.a समूहाने दाखविलेल्या प्रतिक्रियांनी या संदेशास बळकटी दिली. यामध्ये कोणतीही शंका नाही, की या गटात मोठ्या प्रमाणात गालीली लोक देखील होते, जे आपली वस्त्रे येशूच्या समोर पसरत होते—येहू राजा झाला आहे, असा पुकारा केल्याचे आठवण करून देणारे वक्तव्य होते. (२ राजे ९:१३) “दावीदाचा पुत्र” असा त्यांनी येशूचा उल्लेख केला तेव्हा त्या गोष्टीने राजत्वाच्या त्याच्या कायदेशीर अधिकारावर जोर दिला. (लूक १:३१-३३) त्यांनी खजुरीच्या झावळ्यांचा उपयोग केला तेव्हा त्याच्या राजकीय अधिकारास त्यांची अधीनता स्पष्ट झाली.—पडताळा प्रकटीकरण ७:९, १०.
यास्तव, निसान ९ रोजी जेरुसलेममध्ये आलेल्या या मिरवणुकीने हा स्पष्ट संदेश दिला, की येशू हा देवाचा अभिषिक्त मशिहा आणि राजा होता. अर्थातच, येशूने स्वतःला अशा प्रकारे सादर केले तेव्हा सर्वांनाच आनंद झाला नाही. येशूला अशा प्रकारे राजेशाही आदर दिल्याचे दाखविण्यात आले ते विशेषतः परुशांना अगदी अनुचित वाटले. त्यांनी क्रोधित होऊन येशूकडे अशी मागणी केली: “गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा.” येशूने उत्तर दिले: “मी तुम्हास सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” (लूक १९:३९, ४०) होय, देवाचे राज्य हा येशूच्या प्रचाराचा विषय होता. लोक ऐकोत अथवा न ऐकोत तो आपल्या संदेशाची घोषणा धैर्याने करीत असे.
आपल्यासाठी धडा
जखऱ्या संदेष्ट्याने भाकीत केल्यानुसार जेरुसलेममध्ये प्रवेश करण्यासाठी येशूला फार मोठे धाडस करावे लागले. असे करण्याद्वारे तो आपल्या शत्रूंचा राग आपल्यावर ओढवून घेत होता, हे त्याला माहीत होते. त्याचे स्वर्गारोहण होण्याआधी येशूने आपल्या शिष्यांवर, देव राज्याची सुवार्ता घोषित करण्याची आणि “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” करण्याची कामगिरी सोपवली. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) हे काम पूर्ण करण्यासाठी देखील धैर्य लागते. हा संदेश ऐकून सर्वच लोकांना आनंद होतो असे नाही. कित्येक जण उदासीन प्रतिक्रिया दाखवतात तर काही चक्क विरोध देखील करतात. काही सरकारांनी तर प्रचार कार्यावर बंधने लादली किंवा बंदी घातली आहे.
तरी यहोवाच्या साक्षीदारांना याची जाणीव आहे, की लोक ऐकोत अगर न ऐकोत देवाच्या प्रस्थापित राज्याची घोषणा करणे अगत्याचे आहे. (यहेज्केल २:७) ते, हे जीवनरक्षक काम करण्याचे चालू ठेवतात तेव्हा त्यांना येशूच्या पुढील अभिवचनाची पुन्हा खात्री दिली जाते: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २८:२०.
[तळटीपा]
a मार्कचा अहवाल पुढे असे म्हणतो, की ते असे शिंगरू होते ‘ज्याच्यावर अद्याप कोणी बसले नव्हते.’ (मार्क ११:२) उघडपणे, अद्याप उपयोगात न आणलेला प्राणी विशेषतः पवित्र उद्देशांसाठी योग्य होता.—पडताळा गणना १९:२; अनुवाद २१:३; १ शमुवेल ६:७.