वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१५ पृ. ८-१३
  • जेरुसलेम—“थोर राजाची नगरी”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जेरुसलेम—“थोर राजाची नगरी”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘यहोवाच्या सिंहासनाचे’ स्थान
  • शांतिपूर्ण नगरी शेवटी ओसाड झाली
  • शेजारील खोट्या धर्मांच्या राष्ट्रांचा विरोध
  • मशीहाचे आगमन!
  • कायमच्या शांतीची झलक
  • आपल्या नावासारखेच जेरुसलेम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तेजस्वी नगरी
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१५ पृ. ८-१३

जेरुसलेम—“थोर राजाची नगरी”

‘यरुशलेमची शपथ वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे.’—मत्तय ५:३४, ३५.

१, २. जेरुसलेमच्या बाबतीत काही लोकांना कोणता प्रश्‍न पडतो?

जेरुसलेम—या नावाशीच विविध धर्मांच्या लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. या शहराचा बातम्यांमध्ये बहुतेकवेळा उल्लेख होत असल्यामुळे आपल्यांपैकी प्रत्येकाला या प्राचीन शहराची कल्पना ही आहेच. पण अनेक अहवाल दाखवून देतात की जेरुसलेममधील शांतीचे वातावरण कायम टिकलेले नाही, आणि याविषयी खरे तर खंत वाटते.

२ या कारणामुळे बायबलचे अनेक वाचक विचारात पडतील. पूर्वी जेरुसलेम या शहराला शालेम या संक्षिप्त नावाने ओळखण्यात येत असे, ज्याचा अर्थ होता, “शांती.” (उत्पत्ति १४:१८; स्तोत्र ७६:२; इब्री लोकांस ७:१, २) त्यामुळे ‘या शहराच्या नावाचा अर्थ शांती असा असताना, अलीकडे तेथे इतके अशांतीचे वातावरण का आहे,’ असा विचार कदाचित तुमच्या मनात डोकावेल.

३. जेरुसलेमविषयी भरवशाची माहिती आपल्याला कोठे मिळू शकते?

३ या प्रश्‍नाचे उत्तर पाहण्यासाठी आपल्याला इतिहासात फार मागे जाऊन प्राचीन काळातल्या जेरुसलेमची ओळख करून घ्यावी लागेल. पण काही लोक कदाचित म्हणतील, ‘इतका जुना इतिहास वाचायला आमच्याकडे तेवढा वेळ हवा ना?’ पण जेरुसलेमच्या सुरवातीच्या इतिहासाचे अचूक ज्ञान घेणे आपल्याकरता फार आवश्‍यक आहे. याचे कारण म्हणजे: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) जेरुसलेमविषयी बायबलमध्ये दिलेली माहिती जाणून घेतल्याने आपल्याला सांत्वन तर मिळतेच, शिवाय अशी आशाही मिळते, की भविष्यात केवळ त्या शहरातच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीवर शांती असेल.

‘यहोवाच्या सिंहासनाचे’ स्थान

४, ५. देवाचा उद्देश पूर्ण करण्यात जेरुसलेमची जी मुख्य भूमिका होती, ती पार पाडण्यात दावीदाची कशाप्रकारे मदत झाली?

४ सा.यु.पू. ११ व्या शतकात, एक सुरक्षित आणि शांतिपूर्ण देशाची राजधानी म्हणून जेरुसलेम नावारुपास आले. या प्राचीन इस्राएल देशावर राज्य करण्यासाठी स्वतः यहोवा देवाने दावीद या तरुणाचा अभिषेक घडवून आणला. देशाचा सर्व कारभार जेरुसलेममधून चालवण्यात येत असल्यामुळे एका अर्थाने दावीद आणि त्याचे राजकीय वंशज खुद्द “यहोवाच्या राज्याच्या राजासनावर” किंवा ‘यहोवाच्या सिंहासनावर’ विराजमान झाले होते.—१ इतिहास २८:५, पं.र.भा.; २९:२३.

५ देवाला भिऊन चालणाऱ्‍या यहुदा वंशाच्या दावीदाने मूर्तिपूजक यबुशी लोकांच्या हातून जेरुसलेम शहर काबीज केले. त्यावेळी या शहराचा विस्तार सीयोन या डोंगरापर्यंतच मर्यादित होता, पण पुढे या शहरासाठी सीयोन आणि जेरुसलेम ही दोन्ही नावे अदलूनबदलून वापरण्यात येऊ लागली. काही काळानंतर, दावीदाने इस्राएलसोबत देवाने केलेल्या कराराचा कोश जेरुसलेममध्ये आणून एका तंबूत ठेवला. पुष्कळ वर्षांआधी त्या पवित्र कोशावर असलेल्या मेघातून देव त्याचा संदेष्टा मोशे याच्यासोबत बोलत असे. (निर्गम २५:१, २१, २२; लेवीय १६:२; १ इतिहास १५:१-३) इस्राएल देशाचा खरा राजा यहोवा असल्यामुळे हा कोश त्याच्या उपस्थितीचे चिन्ह होते. अशारितीने, जेरुसलेम शहरातून प्रत्यक्षात यहोवा देवच राज्य करत होता, असे दोन अर्थांनी म्हणता येत होते.

६. दावीद आणि जेरुसलेम यांविषयी यहोवाने कोणते अभिवचन दिले?

६ सीयोन किंवा जेरुसलेम हे दावीदाच्या राजेशाही घराण्याचे प्रतीक होते; यहोवाने दावीदाला वचन दिले होते, की त्याच्या राजेशाही घराण्याचा कधी अंत होणार नाही. दुसऱ्‍या शब्दांत, देवाचा अभिषिक्‍त जन अर्थात मशीहा किंवा ख्रिस्तa म्हणून सदासर्वकाळ राज्य करण्याचा हक्क वारशाने दावीदाच्या वंशजाला प्राप्त होणार होता. (स्तोत्र १३२:११-१४; लूक १:३१-३३) शिवाय, ‘यहोवाच्या सिंहासनाचा’ हा कायमचा वारसदार केवळ जेरुसलेमवर नव्हे, तर संपूर्ण जगावर राज्य करेल, हेही बायबल दाखवून देते.—स्तोत्र २:६-८; दानीएल ७:१३, १४.

७. दावीदाने शुद्ध उपासनेचा कशाप्रकारे प्रसार केला?

७ देवाच्या अभिषिक्‍ताला अर्थात दावीदाला राजासनावरून हटविण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. उलट, असा प्रयत्न करणाऱ्‍या शत्रुराष्ट्रांचेच पतन झाले आणि वाग्दत्त देशाचा देवाने ठरवल्यानुसार दूरदूरपर्यंत विस्तार झाला. या परिस्थितीचा उपयोग दावीदाने शुद्ध उपासनेचा चहूकडे प्रसार करण्यासाठी केला. आणि दावीद आपल्या अनेक स्तोत्रांत सीयोनचा खरा राजा या अर्थाने यहोवाची स्तुती करतो.—२ शमुवेल ८:१-१५; स्तोत्र ९:१, ११; २४:१, ३, ७-१०; ६५:१, २; ६८:१, २४, २९; ११०:१, २; १२२:१-४.

८, ९. शलमोन राजाच्या राज्यात खऱ्‍या उपासनेची कशी वाढ झाली?

८ दावीदाचा पुत्र शलमोन याच्या राज्यकाळात यहोवाच्या उपासनेत कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शलमोनाने उत्तर दिशेला जेरुसलेमच्या सीमा वाढवत नेल्या आणि मोरिया पर्वतालाही (सध्याचे डोम ऑफ द रॉक) आपल्या राज्यात सामील केले. या उंच पर्वतावर यहोवाची स्तुती करण्याकरता एक महान मंदिर बांधण्याची सुसंधी त्याला मिळाली. त्या मंदिराच्या परम पवित्रस्थानी कराराचा कोश ठेवण्यात आला होता.—१ राजे ६:१-३८.

९ जेरुसलेम हे यहोवाच्या उपासनेचे केंद्रस्थान होते आणि इस्राएलींनी जोपर्यंत आपले तन, मन आणि धन लावून यहोवाची उपासना केली, तोपर्यंत त्यांच्या देशात उदंड शांती होती. शास्त्रवचनांमध्ये या परिस्थितीचे अतिशय सुंदर शब्दांत वर्णन करण्यात आले आहे: “यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनाऱ्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत. . . . आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे [शलमोनाचे] सख्य असे. . . . सारे यहूदी व इस्राएल आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्‍यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकीर्दीत निर्भय राहत होते.”—१ राजे ४:२०, २४, २५.

१०, ११. शलमोनाच्या राज्याविषयी बायबलमध्ये जे सांगण्यात आले आहे त्याची पुरातनवस्तुशास्त्राद्वारे कशी खात्री पटते?

१० पुरातनवस्तू शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या गोष्टींवरून शलमोनाच्या राज्यातील समृद्धीची खात्री पटते. इस्राएल देशाचे पुरातनवस्तुशास्त्र (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात प्राध्यापक योहानन आहारोनी असे म्हणतात: “राजेशाही दरबारामध्ये चहूबाजूंनी येणाऱ्‍या धनसंपत्तीमुळे आणि व्यापाराच्या भरभराटीमुळे . . . पाहता पाहता संपूर्ण राज्यात समृद्धी पसरली . . . आणि या समृद्धीची झलक . . . केवळ येथल्या चैनीच्या वस्तूंतच नव्हे, तर विशेषतः येथे गवसलेल्या चीनीमातीच्या वस्तूंमध्येही प्रकर्षाने जाणवते. मातीच्या भांड्यांच्या गुणवत्तेत आणि ती तयार करण्याच्या प्रक्रियेत कधी नव्हे इतकी प्रगती झाली होती.”

११ जेरी एम. लँडे यांनीही आपल्या पुस्तकात सांगितल्यानुसार, “शलमोनाच्या राज्यात अवघ्या तीस वर्षांत जेवढा विकास झाला तेवढा आधीच्या दोनशे वर्षांतही झालेला नव्हता. पुरातन वस्तूंचा शोध घेताना शलमोनाच्या काळातील गवसलेल्या मोठमोठ्या ऐतिहासिक वास्तू, उंचच उंच तटबंदी असलेली शहरे, त्यातील गजबजलेल्या वस्त्या, जवळजवळ बांधलेली श्रीमंत लोकांची मोठमोठाली घरे इत्यादींचे अवशेष, तसेच कुंभारांच्या कौशल्यात आणि भांडी बनविण्याच्या त्यांच्या पद्धतीत अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रगती झाल्याचे आपल्याला दिसून येते. दूरदूरच्या देशात तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे अवशेषही आपल्याला येथे पाहायला मिळतात; त्याअर्थी त्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापारही मोठ्या प्रमाणावर होत असावा असे दिसते.”—दावीदाचे घराणे. (इंग्रजी)

शांतिपूर्ण नगरी शेवटी ओसाड झाली

१२, १३. जेरुसलेममधील खऱ्‍या उपासनेच्या भरभराटीला उतरती कळा कशी लागली?

१२ जेरुसलेम शहरात यहोवाचे पवित्र स्थान असल्यामुळे या शहरात शांती आणि सुबत्ता कायम राहावी अशी प्रार्थना करणे महत्त्वाचे होते. दावीदाने लिहिले: “यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीति करणाऱ्‍यांचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांति वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धि नांदो. माझे बंधु व माझे मित्र ह्‍यांच्याकरिता तुझ्यामध्ये शांति वसो अशी मी प्रार्थना करीन.” (स्तोत्र १२२:६-८) या शांतिमय शहरात शलमोनाने एक भव्य-दिव्य मंदिर उभारण्याचे महान कार्य पार पाडले, पण शेवटी त्याने अनेक मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह केला. या स्त्रियांनी शलमोनाला त्याच्या म्हातारपणात खोट्या देवांच्या उपासनेस बढावा देण्याकरता फुसलावले. या धर्मत्यागामुळे संपूर्ण राष्ट्रावर विपरीत परिणाम झाला. शहरातील आणि त्यातील रहिवाशांची शांती नाहीशी झाली.—१ राजे ११:१-८; १४:२१-२४.

१३ शलमोनाचा पुत्र रहबाम याने राज्यकारभार हाती घेतल्यावर काही काळातच इस्राएलच्या दहा वंशांनी बंड केले आणि उत्तरेकडे एक वेगळे राज्य स्थापन केले. त्यांच्या मूर्तिपूजक उपासनेमुळे देवाने अश्‍शुर लोकांच्या हातून त्यांच्या राज्याचे पतन होऊ दिले. (१ राजे १२:१६-३०) दक्षिणेच्या दोन वंशांनी बनलेल्या यहुदा राज्याची अद्यापही जेरुसलेमच राजधानी होती. परंतु काही काळानंतर त्यांनीही शुद्ध उपासनेकडे पाठ फिरवली. म्हणून देवाने त्या मार्गभ्रष्ट झालेल्या शहराला बॅबिलोनी लोकांच्या हाती सा.यु.पू. ६०७ मध्ये नाश होण्यासाठी सोपवून दिले. या यहुद्यांना बॅबिलोनच्या कैदेत ७० वर्षे काढावी लागली. त्यानंतर केवळ देवाच्या दयेमुळे जेरुसलेमला जाऊन खऱ्‍या उपासनेची पुन्हा एकदा सुरवात करण्यास त्यांना शक्य झाले.—२ इतिहास ३६:१५-२१.

१४, १५. यहुदी बॅबिलोनमधून परतल्यावर जेरुसलेमला आपले पूर्वीचे महत्त्व कसे प्राप्त झाले, पण आताच्या स्थितीत कोणता फरक होता?

१४ आता सुमारे ७० वर्षे ओसाड राहिलेल्या या शहरातील पडीक इमारतींमध्ये कदाचित झाडे-झुडपे वाढली असावीत. जेरुसलेमच्या तटबंदीला ज्या ठिकाणी वेशी व बुरूज होते त्याठिकाणी आता खिंडारे पडली होती. असे असतानाही, परतलेल्या यहुद्यांनी हाय खाल्ली नाही. त्यांनी आधी जेथे मंदिर होते त्या ठिकाणी एक वेदी उभारली आणि त्या वेदीवर ते यहोवाला दररोज अर्पणे वाहू लागले.

१५ सुरवात चांगली झाली होती; पण तरीही, नव्याने वसलेले हे जेरुसलेम शहर पुन्हा कधीही दावीद वंशाच्या राजाची राजधानी होणार नव्हते. उलट, यहुद्यांवर बॅबिलोन्यांनी नेमलेला प्रांताधिकारी शासन करू लागला. त्यांना आपल्या पर्शियन अधिकाऱ्‍यांना करही द्यावा लागत असे. (नहेम्या ९:३४-३७) पण या ‘तुडवलेल्या’ स्थितीतही जेरुसलेम हे संपूर्ण पृथ्वीवरचे एकमेव असे शहर होते ज्यावर यहोवा देवाची विशेष मर्जी होती. (लूक २१:२४) जेरुसलेम शहर शुद्ध उपासनेचे केंद्रस्थान होते. त्यामुळे दावीद राजाच्या वंशाद्वारे संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्याचा केवळ देवाला अधिकार आहे याचेही हे शहर एक ज्वलंत प्रतीक होते.

शेजारील खोट्या धर्मांच्या राष्ट्रांचा विरोध

१६. बॅबिलोनमधून परतलेल्या यहुद्यांनी जेरुसलेमचे पुनर्वसन करण्याचे काम अर्ध्यावरच का सोडले?

१६ बॅबिलोनमधून परतेल्या यहुद्यांनी लगेच नव्या मंदिराची पायाभरणी केली. पण खोट्या धर्माचे पालन करणाऱ्‍या शेजारील राष्ट्रांनी पारसचा राजा अर्तहशश्‍त याच्या नावे एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी यहुद्यांची निंदा केली होती आणि यहुदी पुढे बंड करून उठतील असेही त्यांनी त्या पत्रात म्हटले होते. याचा परिणाम असा झाला, की अर्तहशश्‍तने जेरुसलेममधील बांधकामावर बंदी घातली. त्याकाळी तुम्ही जेरुसलेममध्ये असता, तर आता या शहराचे काय होणार, असा विचार तुमच्याही मनात नक्कीच आला असता. आणि जे व्हायचे तेच झाले, यहुद्यांनी मंदिराचे काम अर्ध्यावर सोडून दिले आणि धनदौलतीच्या मागे लागले.—एज्रा ४:११-२४; हाग्गय १:२-६.

१७, १८. जेरुसलेमची पुनर्बांधणी व्हावी म्हणून यहोवाने कोणाचा उपयोग केला?

१७ बॅबिलोनमधून यहुद्यांना परत येऊन १७ वर्षे झाल्यानंतर देवाने आपल्या लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी हाग्गय आणि जखऱ्‍या या संदेष्ट्यांचा उपयोग केला. यहुद्यांना पश्‍चात्ताप झाला आणि त्यांनी मंदिराच्या बांधकामाला पुन्हा सुरवात केली. दरम्यान, दारयावेश हा पारसाचा राजा झाला होता. त्याने जेरुसलेम मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरू करावे, अशी कोरेश राजाने दिलेली आज्ञा अंमलात आणण्याचे ठरवले. दारयावेशने यहुद्यांच्या शेजारील राष्ट्रांना एक पत्र पाठवून बजावले की त्यांनी ‘यरुशलेमपासून दूर व्हावे’ आणि हे बांधकाम पूर्ण करण्याकरता राजाला मिळणाऱ्‍या करातून आर्थिक साहाय्य करावे.—एज्रा ६:१-१३.

१८ बॅबिलोनमधून परतल्यानंतर २२ व्या वर्षी यहुद्यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. ही महान घटना त्यांनी साहजिकच मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरी केली असेल. परंतु अद्यापही, पडझड झालेला जेरुसलेमचा आणि त्याच्या तटबंदीचा पुष्कळसा भाग तसाच होता. “नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एज्रा याजक यांच्या काळी” मात्र या शहराच्या उर्वरित बांधकामाकडे लक्ष देण्यात आले. (नहेम्या १२:२६, २७) उपलब्ध पुराव्यानुसार, सा.यु.पू. पाचव्या शतकापर्यंत जेरुसलेमच्या पुनर्वसनाचे कार्य पूर्ण झाले आणि ते प्राचीन काळातील एक प्रमुख शहर म्हणून पुन्हा नावारूपास आले.

मशीहाचे आगमन!

१९. जेरुसलेमचे अनन्यसाधारण महत्त्व मशीहाने कसे मान्य केले?

१९ आता आपण काही वर्षे पुढे जाऊ आणि संपूर्ण इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना—येशू ख्रिस्ताचा जन्म याविषयी पाहू. यहोवाच्या देवदूताने येशूच्या कुमारी मातेला आधीच सांगितले होते: “प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; . . . व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) यानंतर बऱ्‍याच वर्षांनी येशूने डोंगरावरील प्रसिद्ध प्रवचन दिले. या प्रवचनात त्याने लोकांना उत्तेजन दिले तसेच अनेक विषयांवर सल्लाही दिला. उदाहरणार्थ, आपल्या श्रोत्यांना त्याने आर्जवले, की देवासमोर घेतलेली शपथ त्यांनी पूर्ण करावी, पण क्षुल्लक कारणांकरता त्यांनी वारंवार शपथ घेऊ नये. येशूने म्हटले: “खोटी शपथ वाहू नको तर आपल्या शपथा परमेश्‍वरापुढे खऱ्‍या कर म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेहि तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण तो देवाचे राजासन आहे; पृथ्वीचीहि वाहू नका कारण ती त्याचे पादासन आहे; यरुशलेमेचीहि नका कारण ती थोर राजाची नगरी आहे.” (मत्तय ५:३३-३५) कितीतरी शतकांपासून जेरुसलेम शहराला जे अनन्यसाधारण महत्त्व होते ते स्वतः येशूनेही मान्य केले. ती खरोखर “थोर राजाची” अर्थात यहोवाची नगरी होती.

२०, २१. जेरुसलेमच्या बऱ्‍याच लोकांची वृत्ती कशाप्रकारे अचानक पालटली?

२० आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी येशू जेरुसलेमच्या रहिवाशांसमोर त्यांचा यथोचित अभिषिक्‍त राजा म्हणून आला. या घटनेने रोमांचित होऊन अनेकांनी मोठ्या आनंदाने असे म्हटले: “प्रभुच्या [“यहोवाच्या,” NW] नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो; आमचा पूर्वज दावीद ह्‍याचे येणारे राज्य धन्यवादित असो.”—मार्क ११:१-१०; योहान १२:१२-१५.

२१ परंतु या घटनेच्या एका आठवड्यातच हेच लोक जेरुसलेमच्या धार्मिक पुढाऱ्‍यांचे ऐकून येशूच्या विरोधात गेले. येशूने त्यांना अगदी निक्षून सांगितले की जेरुसलेम शहर आणि संपूर्ण इस्राएल राष्ट्र देवाच्या मर्जीतून उतरल्याशिवाय राहणार नाही. (मत्तय २१:२३; ३३-४५; २२:१-७) उदाहरणार्थ एकदा येशूने म्हटले: “यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्‍ये, व तुझ्याकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणाऱ्‍ये! जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.” (मत्तय २३:३७, ३८) येशूने कोणताही गुन्हा केलेला नसताना त्याच्या विरोधकांनी सा.यु. ३३ च्या वल्हांडणाच्यावेळी जेरुसलेम शहराच्या बाहेर नेऊन त्याला ठार मारले. पण यहोवाने आपल्या या अभिषिक्‍ताचे पुनरुत्थान केले आणि स्वर्गीय सीयोनात अमर आत्मिक जीवन देऊन त्याला महिमावान केले. त्याचा अशाप्रकारे गौरव झाल्यामुळे आपल्या सर्वांचा फायदा होणार आहे.—प्रेषितांची कृत्ये २:३२-३६.

२२. येशूच्या मृत्यूनंतर जेरुसलेमचा उल्लेख कोणत्या अर्थाने करण्यात आला आहे?

२२ तेव्हापासून सीयोन किंवा जेरुसलेमच्या बाबतीत ज्या भविष्यवाण्यांची अद्याप पूर्णता झाली नव्हती त्या सर्व भविष्यवाण्या स्वर्गीय बाबींना किंवा येशूच्या अभिषिक्‍त शिष्यांना लागू होतात असे आपण समजू शकतो. (स्तोत्र २:६-८; ११०:१-४; यशया २:२-४; ६५:१७, १८; जखऱ्‍या १२:३; १४:१२, १६, १७) “यरुशलेम” किंवा “सीयोन” या शब्दांचा येशूच्या मृत्यूनंतर कित्येकवेळा लाक्षणिक अर्थाने उपयोग करण्यात आलेला असून त्याचा वास्तविक शहराशी किंवा स्थानाशी संबंध नाही. (गलतीकर ४:२६; इब्री लोकांस १२:२२; १ पेत्र २:६; प्रकटीकरण ३:१२; १४:१; २१:२, १०) जेरुसलेम आता “थोर राजाची नगरी” राहिली नव्हती याचा शेवटचा पुरावा सा.यु. ७० मध्ये मिळाला. कारण दानीएलाने आणि येशूने केलेल्या भविष्यवाणीनुसार रोमी सैन्यांनी येऊन त्या शहराला नेस्तनाबूद केले. (दानीएल ९:२६; लूक १९:४१-४४) यानंतर पुन्हा कधी पृथ्वीवरील जेरुसलेमला यहोवाच्या नजरेत त्याचे पूर्वीचे खास स्थान प्राप्त होईल असे कोणत्याही बायबल लेखकाने किंवा स्वतः येशूनेही भाकीत केले नाही.—गलतीकर ४:२५; इब्री लोकांस १३:१४.

कायमच्या शांतीची झलक

२३. आपल्याला अद्यापही जेरुसलेमच्या बाबतीत उत्सुकता का असण्यास हवी?

२३ पृथ्वीवरील जेरुसलेमच्या आरंभीच्या इतिहासाचे परीक्षण केल्यानंतर शलमोनाच्या कारकीर्दीत हे शहर “दुहेरी शांतीचे ठिकाण [किंवा आधार]” या आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणेच होते याची पूर्ण खात्री पटते. पण ही केवळ एक पूर्वझलक होती; देवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांना परादीस पृथ्वीवर तशीच उदंड शांती आणि समृद्धी लवकरच लाभणार आहे.—लूक २३:४३.

२४. शलमोनाच्या राज्यातील परिस्थितीवरून आपण काय शिकू शकतो?

२४ स्तोत्राच्या ७२ व्या अध्यायात शलमोनाच्या राज्यातील परिस्थितीचे वर्णन वाचायला मिळते. परंतु हे सुंदर गीत मशीहाद्वारे अर्थात येशू ख्रिस्ताच्या स्वर्गीय राज्याद्वारे मिळणाऱ्‍या आशीर्वादांची एक भविष्यवाणी आहे. त्याच्याविषयी स्तोत्रकर्त्याने आपल्या गीतात असे म्हटले: “त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो. चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांति असो . . . धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्र्‌यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल; भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.”—स्तोत्र ७२:७, ८, १२-१४, १६.

२५. जेरुसलेमविषयी अधिक माहिती घेण्याची आपली इच्छा का असावी?

२५ हे शब्द देवावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांसाठी किती सांत्वनाचे आणि उमेदीचे आहेत, मग ते जेरुसलेममध्ये असोत किंवा पृथ्वीवरील आणखी कोणत्याही ठिकाणी. तुम्ही देखील देवाच्या मशीही राज्याच्या अंमलाखाली जगव्याप्त शांती अनुभवणाऱ्‍यांपैकी होऊ शकता. जेरुसलेमच्या इतिहासाचे ज्ञान घेतल्याने मानवजातीकरता असलेला देवाचा उद्देश समजण्यास आपल्याला मदत होऊ शकते. यहुदी बॅबिलोनमधून परतल्यानंतर सातव्या आणि आठव्या दशकांमध्ये घडलेल्या घटनांचा पुढील लेखांत विचार केला जाईल. थोर राजाने अर्थात यहोवा देवाने आपली उपासना स्वीकारावी असे वाटणाऱ्‍यांना यामुळे सांत्वन मिळते.

[तळटीपा]

a “मशीहा” (हिब्रू शब्दावरून) आणि “ख्रिस्त” (ग्रीक शब्दावरून) या दोन्ही हुद्यांचा अर्थ “अभिषिक्‍त जन” असा होतो.

तुम्हाला आठवते का?

◻ जेरुसलेम ‘यहोवाच्या सिंहासनाचे’ स्थान कसे झाले?

◻ खऱ्‍या उपासनेचा प्रसार करण्यासाठी शलमोनाने कोणती प्रमुख भूमिका पार पाडली?

◻ जेरुसलेम यहोवाच्या उपासनेचे केंद्र राहिले नाही हे आपल्याला कसे कळते?

◻ जेरुसलेमविषयी अधिक जाणून घेण्याची आपल्याला का उत्सुकता आहे?

[१० पानांवरील चित्र]

दक्षिणेकडील पर्वतावर वसलेले दावीदपूर, पण शलमोनाने या शहराच्या सीमा उत्तरेकडे वाढवून मंदिर उभारले

[Credit Line]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

[Picture Credit Line on page 8]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा