“तुम्ही अनेकांच्या जीवनांवर प्रभाव टाकला त्यांच्यापैकी मी एक आहे”
जानेवारी १९९६ मध्ये कॅरल ब्रेन ट्युमरने आजारी पडली. त्यावेळी ती साठीच्या आसपास होती आणि तरीही ती प्रत्येकाला उत्तेजन देण्यात नेहमी आनंदी आणि आवेशी होती. परंतु डॉक्टर आता हाताबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. मृत्यूशी झुंज देत असताना कॅरलला एक पत्र मिळाले:
“प्रिय कॅरल:
“तुमच्या ढासळत्या प्रकृतीचे मला दुःख वाटते. सुदैवाची गोष्ट म्हणजे, आपल्याकडे खरी आशा आहे आणि तिच्याविषयी समजण्यासाठी तसेच तिच्यात आनंद करण्यासाठी बायबल आपल्याला मदत करते. यहोवाच्या राज्याने या पृथ्वीवर आधिपत्य करण्याची ही आशा आहे जेणेकरून आपण परादीसमय पृथ्वीमध्ये राहू शकतो आणि त्या वेळेची आपण सर्व जण वाट पाहत आहोत.
“मला तुम्हाला हे कळविण्याची इच्छा आहे, की तुमच्या व्यक्तिगत प्रचार कार्यामुळे अनेक लोकांचा सार्वकालिक मृत्यूपासून बचाव झाला आहे. मी त्यांच्यापैकी एक आहे. आपली पहिली भेट तुम्हाला आठवते की नाही हे मला नक्की सांगता येणार नाही. त्यावेळी मी २० वर्षांचा होतो. माझे केस वाढलेले होते, मी मादक पदार्थांचा धंदा करत असे आणि टवाळखोर पोरांबरोबर उगाचच भटकत असे. आम्ही स्वतःजवळ बंदुका देखील बाळगत असू आणि आमच्या स्वतःखेरीज इतरांवर आम्ही कधी खरे प्रेम केलेच नाही.
“तुम्ही एका साक्षीदाराबरोबर माझ्या घरी आला आणि मला टेहळणी बुरूज तसेच सावध राहा! दिले. मला नियतकालिके नकोत म्हणून मी तुम्हाला सांगितले आणि तुम्हाला एक डॉलर देण्याचा मी प्रयत्न देखील केला. केवळ देणग्या प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रचार करीत नाहीत, असे तुम्ही मला सांगितले. बायबल वाचण्यासाठी लोकांना मदत करण्यास्तव तुम्ही हे कार्य करीत असल्याचे तुम्ही मला सांगितले. ती नियतकालिके घेऊन मी वाचली की नाही, हे मला नक्की आठवत नाही. पण तुम्ही माझ्या जीवनात सत्याचे बिजारोपण मात्र केले.
“काही वर्षांनंतर गॅरी नामक एक साक्षीदार माझ्या आईच्या घरी आला होता आणि त्यावेळी मी देखील तेथे होतो. काही वर्षांपूर्वी तुम्ही दिलेल्या भेटीविषयी मी त्याला सांगितले. गॅरीने माझ्यासोबत दीर्घ काळापर्यंत बायबलचा अभ्यास केला आणि अखेरीस मी १९८४ मध्ये बाप्तिस्मा घेतला. आता मी माझ्या मुलांना देवाच्या राज्याच्या सत्याविषयी शिकवत आहे.
“तुमच्या विश्वासू सेवेच्या वर्षांदरम्यान तुम्ही माझ्यासारख्या कितीतरी जनांच्या जीवनांवर प्रभाव टाकला त्यांच्यापैकी मी एक आहे. तथापि, तुमच्या या प्रेमळ कृपाळूपणामुळे मला तसेच माझ्या कुटुंबाला महान देव अर्थात यहोवा आणि त्याचा पुत्र ख्रिस्त येशू यांना ओळखण्यास शक्य झाले आहे. नव्या व्यवस्थीकरणामध्ये तुम्हाला भेटता येईल त्या दिवसाची मी वाट पाहात आहे जेव्हा यहोवा सर्व लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून टाकील आणि त्यापुढे मरण देखील नसेल.—प्रकटीकरण २१:४.
“मला तसेच माझ्या कुटुंबाला तुम्हाला ओळखण्याची आणि तुमच्या साक्षकार्याचा एक भाग होण्याची जी संधी मिळाली त्यामुळे आम्हाला आनंद होतो. आभारी आहे.
“बंधुप्रेमाने पुरे करतो,
पीटर”
सहा महिन्यांच्या आजारानंतर कॅरल मार्च १९९६ मध्ये मरण पावली, आवेशी सुवार्तिक या नात्याने तिने आपल्या ३५ वर्षांच्या कालावधीत सत्याच्या अनेक बिजांचे रोपण केले आहे. तिला हे समजले होते, की बिजाला केव्हा फळ येईल हे कोणाला ठाऊक नाही, कदाचित अनेक वर्षानंतर सुद्धा.—मत्तय १३:२३.