“मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे”
“देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.
१, २. देवासाठी आपल्या कर्तव्यावर विचार करणे यथायोग्य का आहे?
“परमेश्वर तुजजवळ काय मागतो?” हा प्रश्न पुरातन काळात एका संदेष्ट्याने उभा केला. मग त्याने यहोवा काय अपेक्षितो हे स्पष्ट केले, अर्थात नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे.—मीखा ६:८.
२ व्यक्तिवैशिष्ट्य आणि स्वातंत्र्याच्या या काळात, देव आपल्याकडून काही अपेक्षितो ही कल्पना काहींना तितकी रुचत नाही. कर्तव्याची जाणीव करून दिली जाणे हे त्यांना नको असते. तथापि, उपदेशकातील शलमोनाच्या निष्कर्षाविषयी काय? “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.
३. उपदेशकाच्या पुस्तकावर आपण गांभिर्याने का विचार करावा?
३ आपल्या जीवनातील परिस्थिती कोणत्याही असोत अथवा जीवनाबद्दल आपला कोणताही दृष्टिकोन असो, शलमोनाच्या या सारांशाचा संदर्भ लक्षात घेतल्यास आपल्याला मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. या ईश्वरप्रेरित पुस्तकाच्या लेखकाने अर्थात राजा शलमोनाने अगदी आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टी विचारात घेतल्या. काहीजण लगेच म्हणतील की त्याचे स्पष्टीकरण मुळातच नकारात्मक आहे. तथापि, ते देवाने प्रेरित केले होते आणि ते आपल्याला आपले कार्य आणि आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो हे तोलून पाहण्यास सहायक ठरू शकते, शिवाय असे केल्याने आपला आनंदही द्विगुणित होऊ शकतो.
जीवनाच्या मूलभूत गरजा भागवणे
४. शलमोनाने उपदेशकात कशाविषयी परीक्षण आणि चर्चा केली?
४ शलमोनाने ‘मनुष्यांच्या मागे लागलेल्या कष्टांविषयी’ सखोल परीक्षण केले. “ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले.” “कष्ट” म्हणताना शलमोन एखाद्या विशिष्ट कार्याविषयी नव्हे, तर स्त्रीपुरुष आपल्या सबंध जीवनात जे काही करतात त्या सर्व गोष्टींविषयी बोलत होता. (उपदेशक १:१३) आता आपण काही मुख्य उद्योग किंवा कष्टदायक कार्य विचारात घेऊ आणि त्यानंतर आपले स्वतःचे कार्य आणि आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो ते पडताळून पाहू.
५. मानवांचा एक मुख्य उद्योग कोणता आहे?
५ निश्चितच पुष्कळशा कार्यांचा आणि उद्योगांचा मूळ हेतू म्हणजे पैसाच असतो. आज काही गर्भश्रीमंत लोकांचा पैशांविषयी जसा बेपर्वा दृष्टिकोन असतो तसाच शलमोनाचाही होता असे म्हणणे योग्य ठरणार नाही. काही प्रमाणात पैसा असण्याची गरज त्याने नक्कीच ओळखली; वैराग्यासारखे किंवा दारिद्र्यात जीवन जगण्यापेक्षा पुरेशी संपत्ती हाती असणे आवश्यक आहे हे त्याने मान्य केले. (उपदेशक ७:११, १२) पण, पैसा आणि पैसा देऊन मिळवता येणाऱ्या गोष्टी काही वेळा जीवनात प्रमुख ध्येय बनू शकतात हे कदाचित तुमच्या पाहण्यात आले असावे आणि हे श्रीमंत असो किंवा गरीब, सर्वांच्याच बाबतीत घडू शकते.
६. येशूच्या एका दाखल्यातून तसेच शलमोनाच्या स्वतःच्या अनुभवावरून आपल्याला पैशाविषयी काय शिकायला मिळते?
६ येशूने दिलेला एका श्रीमंत माणसाचा दाखला आठवा; या माणसाचे काही केल्या समाधान होत नसल्यामुळे तो आणखीन संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण देवाच्या नजरेत तो मूर्ख ठरला. का? कारण “कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५-२१) आपल्याला असलेल्या अनुभवापेक्षा कदाचित पुष्कळ व्यापक असलेला—शलमोनाचा अनुभव—येशूच्या शब्दांना पुष्टी देतो. उपदेशक २:४-९ येथील मजकूर वाचा. काही काळाकरता शलमोनाने धनप्राप्तीकडे आपले चित्त लावले. त्याने आलिशान महाल आणि बागबगिचे उभारले. अमाप संपत्ती असल्यामुळे अनेक सुंदर उपस्त्रिया ठेवणे त्याला सहज शक्य झाले. पैशाने किंवा त्याच्या उपभोगाने शलमोनाला मनःपूर्वक संतोष, काही मिळवल्याचे समाधान किंवा त्याच्या जीवनाला अर्थ दिला का? त्याने सालसपणे उत्तर दिले: “मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तो पाहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.”—उपदेशक २:११; ४:८.
७. (अ) पैशाच्या उपयोगितेविषयी अनुभवावरून काय शाबीत होते? (ब) शलमोनाच्या निष्कर्षाला पुष्टी देणारे तुमचे स्वतःचे निरीक्षण काय आहे?
७ ही यथातथ्य वस्तुस्थिती अनेकांच्या जीवनात स्पष्ट पाहायला मिळते. सांपत्तिक सुस्थितीमुळे आपले सर्व प्रश्न मुळीच सुटत नाहीत हे मानावेच लागेल. काही प्रश्न कदाचित सुटतील, उदाहरणार्थ, पैसा असल्यास एखाद्याला खाण्यापिण्याच्या वस्तू आणि कपडालत्ता मिळवणे सोपे जाईल. पण कितीही मिळवले तरीसुद्धा, माणूस एका वेळी कपड्यांचा एकच जोड घालू शकतो आणि मर्यादित प्रमाणातच खाऊ पिऊ शकतो. शिवाय घटस्फोट, मद्य किंवा अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि कौटुंबिक झगडे यांमुळे उद्विग्न जीवन जगणाऱ्या श्रीमंत लोकांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. जे. पी. गेट्टी नावाच्या एका करोडपतीने म्हटले: “पैशाचा सुखाशी संबंध असतोच असे काही नाही. सहसा त्याचा संबंध दुःखाशीच असतो असं वाटतं.” म्हणूनच, धनाचा लोभ व्यर्थ असतो असे शलमोनाने काही उगाच म्हटलेले नाही. या सत्याची शलमोनाच्या अभिप्रायाशी तुलना करून पाहा: “कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.”—उपदेशक ५:१०-१२.
८. पैशाच्या महत्त्वावर अनावश्यक जोर न देण्यामागे कोणते कारण आहे?
८ पैसा आणि संपत्ती असूनही माणसाला भविष्याविषयी समाधान लाभत नसते. तुमच्याजवळ जितका जास्त पैसा आणि संपत्ती असते तितकीच त्यांच्या सुरक्षेविषयीची काळजीही वाढते, शिवाय, उद्या काय होणार याबद्दल तुम्हाला शाश्वती नसतेच. हा सर्व पैसा अडका आणि आपला जीवही तुम्हाला उद्या गमवावा लागला तर? (उपदेशक ५:१३-१७; ९:११, १२) त्याअर्थी, आपल्या जीवनामागे किंवा आपण जे कष्ट करतो त्यामागे पैसा आणि संपत्ती मिळवण्यापेक्षाही आणखीन उदात्त, आणखीन चिरस्थायी असा उद्देश असावयास हवा.
कुटुंब, प्रसिद्धी आणि सत्ता
९. शलमोनाच्या विश्लेषणात कौटुंबिक संबंधाचाही समावेश होणे योग्य का आहे?
९ शलमोनाने केलेल्या जीवनाच्या विश्लेषणात, त्याने कौटुंबिक नात्यात गुंतण्याच्या विषयाचीही दखल घेतली होती. बायबलमध्ये कौटुंबिक जीवनाविषयी महत्त्वपूर्ण उल्लेख आढळतात आणि ते मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करण्यातून मिळणाऱ्या आनंदाविषयीही सांगते. (उत्पत्ति २:२२-२४; स्तोत्र १२७:३-५; नीतिसूत्रे ५:१५, १८-२०; ६:२०; मार्क १०:६-९; इफिसकर ५:२२-३३) तथापि, जीवनात हेच सर्वात महत्त्वाचे आहे का? काही संस्कृतींत विवाह, मुले आणि कौटुंबिक अनुबंध यांना जे महत्त्व दिले जाते त्यावरून तरी असेच दिसते, की अनेकांच्या मते हेच जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे. तरीसुद्धा, उपदेशक ६:३ या वचनाप्रमाणे शंभर मुले असूनही जीवनात समाधान मिळेलच असे नाही. आपल्या मुलांनी जीवनात काही मिळवावे आणि आपली मुले यशस्वी व्हावीत या इच्छेने कितीतरी आईवडिलांनी असंख्य त्याग केले असतील. हा त्यांचा मोठेपणा असला तरीसुद्धा, प्राणी स्वाभाविकतः करतात त्याप्रमाणे आपण मानवांनीही केवळ पुढच्या पिढीला जन्म देण्यासाठी अस्तित्वात असावे ही आपल्या निर्माणकर्त्याची निश्चितच आपल्याकरता योजना नसावी.
१०. कौटुंबिक नात्यांवर अवाजवी लक्ष केंद्रित करणे व्यर्थ का ठरू शकते?
१० शलमोनाने विचारवंतपणे कौटुंबिक जीवनासंबंधी काही सत्यांवर प्रकाश टाकला. उदाहरणार्थ, एखादा आपल्या मुलाबाळांसाठी आणि नातवंडासाठी तरतूद करण्यात पुर्णपणे गुंतून जातो. पण, त्याची मुले आणि नातवंडे समंजस निघतीलच याची खात्री आहे का? की त्याने रक्ताचे पाणी करून कमावलेली संपत्ती ते असमंजसपणे उधळून टाकतील? असे झाले तर ते केवढे “व्यर्थ व मोठे अनिष्ट” ठरेल!—उपदेशक २:१८-२१; १ राजे १२:८; २ इतिहास १२:१-४, ९.
११, १२. (अ) काहीजण जीवनात कोणत्या ध्येयांमागे लागले आहेत? (ब) प्रसिद्धीमागे लागणे यास एक “वायफळ उद्योग” का म्हणता येईल?
११ काहींनी याविरुद्ध असलेली एक टोकाची भूमिका घेऊन, इतरांमध्ये प्रसिद्धी आणि सत्ता मिळवण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी कौटुंबिक जीवनाकडे दुर्लक्ष केले आहे. हा अवगुण सहसा पुरुषांमध्ये पाहायला मिळतो. तुमच्या शाळासोबत्यांमध्ये, सहकर्मचाऱ्यांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये तुम्हाला याचा प्रत्यय आला आहे का? लोकांनी आपली दखल घ्यावी, चारचौघांत आपण उठून दिसावे किंवा आपल्याला इतरांवर वर्चस्व करण्याची संधी मिळावी म्हणून अनेक जण खटाटोप करत असतात. तथापि, यात खरोखरच काही अर्थ आहे का?
१२ काही जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी कसे झटतात त्याचा विचार करा, मग ती लहान प्रमाणावर असो किंवा मोठ्या. शाळेत, आपल्या शेजारात आणि वेगवेगळ्या सामाजिक गटांतही आपल्याला हे पाहायला मिळते. कला आणि मनोरंजनाच्या क्षेत्रांत तसेच राजकारणात ज्यांना नाव कमवायचे असते ते या आकांक्षेने जणू झपाटलेले असतात. पण, खरे पाहता हा मुळात व्यर्थ उद्योग नव्हे का? शलमोनाने यास अगदी अचूकपणे “वायफळ उद्योग” म्हटले. (उपदेशक ४:४) कोणा तरुणाला एखाद्या क्लबमध्ये, क्रिडा संघात किंवा एखाद्या म्युझिकल ग्रूपमध्ये प्रसिद्धी जरी मिळाली—अथवा, कोणा स्त्रीपुरुषांना एखाद्या कंपनीत किंवा विशिष्ट समाजात नावलौकिक जरी मिळाला—तरीसुद्धा, किती लोकांना याची माहिती असेल? जगाच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्यांना (एवढेच काय, त्याच देशात राहणाऱ्यांना) तरी या व्यक्तीच्या अस्तित्वाविषयी माहिती असेल का? ते या व्यक्तीला जे काही थोडेबहुत नाव मिळाले आहे त्याविषयी काहीही माहिती न मिळता रोजच्यासारखेच जगत राहणार नाहीत का? तसेच नोकरीवर, एखाद्या गावात किंवा एखाद्या समूहात कोणी व्यक्ती सत्ता किंवा अधिकार मिळवते, तिच्याविषयीही हेच म्हणता येईल.
१३. (अ) प्रसिद्धी किंवा सत्ताधिकार मिळवण्याचा प्रयास करण्याविषयी एक योग्य दृष्टिकोन राखण्यास उपदेशक ९:४, ५ आपल्याला कशी मदत पुरवतात? (ब) सद्य जीवन एवढेच सर्वकाही असल्यास आपल्याला कोणत्या निर्मम वस्तुस्थिती मानाव्या लागतील? (तळटीप पाहा.)
१३ दीर्घ पल्ल्यात, अशा प्रसिद्धीतून किंवा सत्ताधिकारातून काय निष्पन्न होते? एक पिढी जाते आणि दुसरी येते तसतसे हे प्रसिद्ध किंवा सत्ताधारी लोक काळाच्या पडद्याआड होतात आणि त्यांची स्मृतीही नाहीशी होते. बहुतांश राजकारणी आणि लष्करी नेत्यांप्रमाणेच, अनेक वास्तुशिल्पकार, संगीतकार आणि इतर कलाकार, समाज सुधारक आदिही यास अपवाद नाहीत. या वेगवेगळ्या क्षेत्रांत १७०० आणि १८०० च्या कालावधीत कार्य केलेल्या किती विशिष्ट व्यक्तींबद्दल तुम्हाला माहिती आहे? शलमोनाने काढलेला निष्कर्ष योग्यच होता, तो म्हणाला: “मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही . . . त्यांचे स्मरण कोणास राहत नाही.” (उपदेशक ९:४, ५) आणि जर सद्य जीवन एवढेच सर्वकाही असले तर मग नाव व्हावे किंवा सत्ता मिळावी म्हणून खपणे खरोखरच व्यर्थ आहे.a
आपला केंद्रस्थ उद्देश आणि कर्तव्य
१४. उपदेशकाच्या पुस्तकातून व्यक्तिगतरित्या आपल्याला का फायदा मिळू शकतो?
१४ लोक ज्या निरनिराळ्या कार्यांना, ध्येयांना आणि सुखोपभोगाला आपल्या जीवनात केंद्रस्थान देतात त्यांपैकी अनेकांचा शलमोनाने उल्लेख केला नाही. तरीही त्याने जे लिहिले ते पुरेसे आहे. या पुस्तकाचे आपण केलेले विश्लेषण निराशावादी किंवा नकारात्मक होते असे समजण्यात येऊ नये, कारण आपल्या फायद्यासाठी यहोवा देवाने मुद्दामहून प्रेरित केलेल्या बायबलमधील एका पुस्तकावर आपण वास्तववादी पुनर्विचार केला आहे. आपल्या जीवनाबद्दल आणि आपण कोणत्या गोष्टींवर जीवन केंद्रीत करतो याविषयीच्या आपल्या दृष्टिकोनात सुयोग्य फेरबदल करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला मदत करू शकते. (उपदेशक ७:२; २ तीमथ्य ३:१६, १७) विशेषतः, यहोवाच्या मदतीने शलमोन ज्या निष्कर्षांवर पोहंचला ते अतिशय फायदेकारक आहेत.
१५, १६. (अ) जीवनाचा आनंद लुटण्याविषयी शलमोनाचा कसा दृष्टिकोन होता? (ब) जीवनात आनंद मिळवण्यासाठी कोणती रास्त अट असल्याचे शलमोनाने सांगितले?
१५ शलमोनाने वारंवार उठवलेला एक मुद्दा असा की खऱ्या देवाच्या सेवकांना आपल्या कार्यांत त्याच्या नजरेत आनंद मिळाला पाहिजे. “मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.” (उपदेशक २:२४; ३:१२, १३; ५:१८; ८:१५) शलमोन चैनबाजीला प्रोत्साहन देत नव्हता हे लक्षात घ्या; तसेच त्याने “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे,” अशा प्रवृत्तीबद्दलही आपल्या लिखाणातून पसंती व्यक्त केली नाही. (१ करिंथकर १५:१४, ३२-३४) त्याचे तात्पर्य असे होते की जीवनात ‘हित साधत’ असतानाच एखाद्याने खाण्यापिण्यासारख्या सर्वसाधारण सुखांचा उपभोग घ्यावा. अर्थातच, यामुळे निर्माणकर्त्याची इच्छा निर्विवादपणे आपल्या जीवनाचे केंद्रस्थान घेते आणि आपल्याकरता खरोखर काय हिताचे आहे हे तोच ठरवतो.—स्तोत्र २५:८; उपदेशक ९:१; मार्क १०:१७, १८; रोमकर १२:२.
१६ शलमोनाने लिहिले: “जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.” (उपदेशक ९:७-९) खरोखर यहोवाला आनंदविणाऱ्या कार्यांत क्रियाशील असणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाचे जीवन सार्थक आणि संतोषप्रद असते. त्याअर्थी सतत देवाला विचारात घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते. मानवी युक्तीवादातून जीवनाकडे पाहणाऱ्या अधिकांश लोकांच्या दृष्टिकोनापेक्षा हा दृष्टिकोन किती वेगळा आहे!
१७, १८. (अ) जीवनाच्या वास्तविकतांना अनेकांची कशी प्रतिक्रिया असते? (ब) आपण कोणता परिणाम नेहमी लक्षात ठेवावा?
१७ काही धर्म मृत्योपरांत जीवनाबद्दल शिकवत असले तरीसुद्धा, अनेक लोकांच्या मते याच जीवनाची शाश्वती आहे. परिणामी, कदाचित तुमच्या पाहण्यात आले असावे की त्यांची प्रतिक्रिया शलमोनाने वर्णन केल्याप्रमाणे असते: “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत होते.” (उपदेशक ८:११) सर्वच जण दृष्कृत्यांत आकंठ बुडत नसले तरीसुद्धा, त्यांच्या जीवनातून स्पष्ट दिसते की त्यांना केवळ वर्तमानाची काळजी असते. म्हणूनच पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, इतरांवर सत्ता, कौटुंबिक नातीगोती आदि गोष्टींना ते नको तितके महत्त्व देतात. तथापि, शलमोनाने तो विचार तेवढ्यावरच सोडला नाही. तो पुढे म्हणाला: “पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल; पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही, कारण तो देवाला भिऊन वागत नाही.” (उपदेशक ८:१२, १३) होय, शलमोनाला खात्री होती की आपण ‘खऱ्या देवाला भिऊन वागल्यास’ आपले कल्याणच होईल. कितपत कल्याण? त्याने केलेल्या तुलनेत आपल्याला याचे उत्तर सापडते. यहोवा आपले “आयुष्य दीर्घ” करू शकतो.
१८ ज्यांचे फारसे वय झालेले नाही त्यांनी विशेषतः, देवाला भिऊन वागल्यास त्यांचे कल्याण होईल या संपूर्णपणे विश्वासहार्य वस्तुस्थितीवर मनन करावे. कदाचित तुम्ही स्वतः पाहिले असेल, सर्वात वेगवान धावपटू देखील अडखळून पडून स्पर्धा हारण्याची शक्यता असते. शक्तिशाली असूनही एखादी सेना युद्धात पराजित होऊ शकते. मुत्सद्दी उद्योगपतीही उद्या रस्त्यावर येऊ शकतो. अशाच प्रकारच्या इतरही अशाश्वत गोष्टींमुळे जीवनाचे काहीच खात्रीने सांगता येत नाही. पण, तुम्ही खात्री बाळगू शकता ती याची की, देवाच्या नितीनियमांच्या मर्यादेत राहणे आणि त्याच्या इच्छेनुसार जीवनात हित साधणे हाच जीवनाचा आनंद लुटण्याचा सर्वात शहाणपणाचा आणि खात्रीलायक मार्ग आहे. (उपदेशक ९:११) यात बायबलमधून देवाची इच्छा काय ते शिकून घेणे, आपले जीवन त्याला समर्पित करणे आणि एक बाप्तिस्मा घेतलेला ख्रिश्चन बनणे हे गोवलेले आहे.—मत्तय २८:१९, २०.
१९. तरुण लोक आपल्या जीवनाचा कशाप्रकारे उपयोग करू शकतात, तथापि, शहाणपणाचा मार्ग कोणता आहे?
१९ निर्माणकर्ता युवकांना किंवा इतरांनाही त्याचा सल्ला अनुसरण्यास भाग पाडणार नाही. ते स्वतःस शिक्षण घेण्यासाठी, मानवी ज्ञान देणाऱ्या असंख्य पुस्तकांच्या अभ्यासासाठी आमरण वाहून घेण्याचे निवडू शकतात. शेवटी मात्र ते देहास शिणवणारेच ठरेल. किंवा ते आपल्या अपरिपूर्ण मानवी अंतःकरणाच्या इच्छेनुसार डोळ्यांना आकर्षक दिसणाऱ्या गोष्टींकडे वळू शकतात. याचेही पर्यवसान दुःखातच होईल यात शंका नाही आणि या मार्गाने घालवलेले जीवन अगदीच व्यर्थ असल्याचे कालांतराने सिद्ध होईल. (उपदेशक ११:९–१२:१२ १ योहान २:१५-१७) म्हणूनच शलमोन तरुणांना एक आव्हान करतो—एक असे आव्हान ज्यावर आपण सर्वांनी, मग आपले वय कितीही असले तरीही, गांभिर्याने विचार करायला पाहिजे: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यांत मला काही सुख नाही असे तू म्हणशील.”—उपदेशक १२:१.
२०. उपदेशकातील संदेशाविषयीच्या कोणत्या दृष्टिकोनास संतुलित म्हणता येईल?
२० तर मग आपण कोणता निष्कर्ष काढावा? शलमोनाने काढलेल्या निष्कर्षाविषयी काय? त्याने ‘ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती पाहिली; तो पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय.’ (उपदेशक १:१४) उपदेशक पुस्तकातील शब्द एखाद्या उपेक्षावादी, असंतुष्ट माणसाचे नाहीत. ते तर देवाच्या प्रेरित वचनात समाविष्ट आहेत आणि या कारणाने, आपण त्यांवर जरूर विचार करावा.
२१, २२. (अ) शलमोनाने जीवनाचे कोणते पैलू विचारात घेतले? (ब) त्याने कोणता बुद्धीमान निष्कर्ष काढला? (क) उपदेशकातील मजकुराचे परीक्षण केल्यावर तुम्हाला कसे वाटते?
२१ शलमोनाने मानवाचे कष्ट, त्याचे संघर्ष आणि त्याच्या आकांक्षांचा अभ्यास केला. सहसा घडणाऱ्या गोष्टी, अर्थात अनेकांच्या वाट्याला येणारी निराशा आणि वैफल्य यांस त्याने विचारात घेतले. त्याने मानवी अपरिपूर्णतेविषयी आणि त्यामुळे घडणाऱ्या मृत्यूविषयीही विचार मांडले. शिवाय, मृत लोकांच्या स्थितीबद्दल आणि भविष्यात त्यांना जीवन मिळवण्याची काही आशा आहे किंवा नाही याबद्दलही त्याने देवाकडील ज्ञानाचा आपल्या लिखाणात समावेश केला. हे सर्व विश्लेषण एका अशा माणसाने केले ज्याच्याजवळ देवाकरवी वृद्धिंगत करण्यात आलेली बुद्धी होती, खरोखर एका अशा माणसाने, जो आजवर होऊन गेलेल्या माणसांपैकी सर्वात बुद्धीमान होता. यास्तव, त्याने काढलेला निष्कर्ष ज्या कोणाला खरोखरचे अर्थपूर्ण जीवन जगायचे आहे त्या सर्वांच्या फायद्याकरता पवित्र शास्त्रवचनांत अंतर्भूत करण्यात आला. याअर्थी आपण त्याजशी सहमत होऊ नये का?
२२ “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करितांना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.”—उपदेशक १२:१३, १४.
[तळटीपा]
a टेहळणी बुरुजने एकदा ही मर्मस्पर्शी टिप्पणी केली होती: “व्यर्थ ध्येयांसाठी जीवन वाया घालवू नये . . . हेच जीवन सर्वकाही असल्यास, काहीच उपयोगाचे नाही. जीवन, हवेत फेकलेल्या एखाद्या चेंडूसारखे आहे, उंच हवेत भिरकावल्यावर तो क्षणार्धात पुन्हा जमिनीवर पडतो. जीवन ओझरत्या सावलीसारखे, कोमेजून जाणाऱ्या फुलासारखे, पाहता पाहता सुकून जाणाऱ्या गवताच्या पातीसारखे आहे. . . . अनादि काळाच्या पारड्यात आपले जीवन मात्र धुळीचा एक कण नाही का? अमर्याद काळाच्या प्रवाहात निव्वळ एक थेंब, नव्हे बुडबुडाच. खरोखर शलमोनाने जीवनातील विविध प्रपंचांचा, उद्योगांचा अभ्यास केल्यावर अगदी रास्तपणे त्या सर्वांना व्यर्थ म्हटले. आपण जन्माला येतो आणि पाहता पाहता निघूनही जातो, नसतोच आलो तरी कुणाचे काय बिघडले असते असे वाटल्याशिवाय राहात नाही, कोट्यवधी माणसे येतात आणि जातात, त्यांच्या गर्दीत आपल्या अस्तित्वाची जास्तीतजास्त किती लोकांना जाणीव असणार. हा जीवनाबद्दलचा उपेक्षावादी, उदासीन, निराशावादी किंवा विकृत दृष्टिकोन नाही. हेच वास्तव आहे, एक निर्मम सत्य, हा वस्तुस्थितीला धरून असलेला दृष्टिकोन आहे, अर्थात, सद्य जीवन एवढेच सर्वकाही असले तर.”—ऑगस्ट १, १९५७, पृष्ठ ४७२.
तुम्हाला आठवते का?
◻ तुमच्या जीवनात संपत्तीचे स्थान तुम्ही शहाणपणाने कसे ठरवू शकता?
◻ आपण कुटुंब, प्रसिद्धी किंवा इतरांवर वर्चस्व मिळवण्याला अवाजवी महत्त्व का देऊ नये?
◻ मौजमजा करण्याविषयी शलमोनाने कोणत्या ईश्वरी मनोवृत्तीला बढावा दिला?
◻ उपदेशक पुस्तकावर विचार केल्यावर तुम्हाला कशाप्रकारे फायदा झाला आहे?
[१५ पानांवरील चित्र]
पैसा आणि संपत्ती असूनही समाधान मिळेलच असे नाही
[१७ पानांवरील चित्र]
तरुण लोक खात्री बाळगू शकतात की देवाला भिऊन वागल्यास त्यांचे कल्याण होईल