तुमचे जीवन—त्याचा काय उद्देश आहे?
‘मानवपुत्रांनी आपल्या साऱ्या आयुष्यांत ह्या भूतलावर काय केले असता त्यांचे हित होईल याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने मी माझ्या मनाचे संयमन करत होतो.’—उपदेशक २:३.
१, २. स्वतःविषयी माफक प्रमाणात काळजी असणे चुकीचे का नाही?
तुम्हाला स्वतःची काळजी आहे, हो ना? प्रत्येकालाच असते. म्हणूनच तर आपण रोज जेवतो, थकवा आल्यावर विश्रांती घेतो आणि आपल्या जवळच्या माणसांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. काहीवेळा आपण खेळ खेळतो, पोहायला जातो किंवा आपल्या आवडीच्या इतर गोष्टी करतो आणि हे सर्व करताना आपल्याला स्वतःची माफक काळजी आहे हे आपण दाखवून देत असतो.
२ देवाच्या प्रेरणेने शलमोनाने जे लिहिले ते स्वतःविषयी अशी काळजी असण्याला दुजोरा देते; तो म्हणाला: “मनुष्याने खावे, प्यावे आणि आपल्या श्रमांत आपल्या जिवाला सुख भोगू द्यावे यापेक्षा त्याला काही उत्तम नाही.” आपल्या अनुभवाच्या आधारे शलमोन पुढे म्हणतो: “हेहि देवाच्या हातून घडते असे मी पाहिले. कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील, अथवा कोण अधिक सुखाचा उपभोग घेईल?”—उपदेशक २:२४, २५, पं.र.भा.
३. अनेकांसमोर कोणते बुचकळ्यात पाडणारे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत?
३ तथापि, जीवन म्हणजे केवळ खाणे, पिणे, झोपणे आणि काही सत्कृत्ये करणे एवढेच नसते. दुखणी, निराशा आणि काळज्या या देखील आपल्याला असतातच. शिवाय, निरंतर धकाधकीमुळे आपल्या जीवनाला काय अर्थ आहे याविषयी विचार करायला सहसा कोणाला वेळ मिळत नाही. तुमच्या बाबतीतही हे खरे नाही का? द वॉल स्ट्रीट जर्नल या नियतकालिकाचे भूतपूर्व संपादक वरमाँट रॉयस्टर यांनी, मानवाने मोठ्या प्रमाणावर मिळवलेल्या ज्ञान व कौशल्यांना विचारात घेऊन असे लिहिले: “किती विचित्र आहे. स्वतः मानवाचा, त्याच्यासमोर असलेल्या पेचप्रसंगांचा, आणि सबंध विश्वाच्या तुलनेत त्याचा विचार केल्यास, मानवी इतिहासाच्या आरंभी आपण ज्याठिकाणी होतो त्यापेक्षा फारसं पुढे गेलेलो नाही. आपण कोण आहोत, आपण का अस्तित्वात आहोत आणि आपलं भविष्य काय आहे यांसारखे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत.”
४. आपल्यासंबंधाने असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकण्याची आपल्यातील प्रत्येकाची इच्छा का असावी?
४ आपण कोण आहोत? आपण का अस्तित्वात आहोत? आणि आपलं भविष्य काय आहे?, या प्रश्नांना तुमची काय उत्तरे असतील? मागच्या जुलै महिन्यात श्रीयुत रॉयस्टर मरण पावले. त्याअगोदर त्यांना या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली असावीत असे तुम्हाला वाटते का? मुद्द्याचे बोलायचे झाल्यास, तुम्ही ती मिळवू शकता का? आणि जर मिळाली, तर यामुळे तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आनंदी, अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यास कशाप्रकारे मदत मिळू शकेल? आपण हे विचारात घेऊ.
ज्ञानाचा सर्वश्रेष्ठ उगम
५. जीवनाच्या अर्थाविषयीच्या प्रश्नांबद्दल ज्ञानबोध प्राप्त करण्याकरता आपण देवाकडे का वळावे?
५ आपल्याला जीवनाच्या उद्देशाचा शोध परस्पर, कोणाच्याही मदतीशिवाय घ्यावा लागला असता तर आपल्याला फारसे यश आले नसते कारण खूप ज्ञानी आणि अनुभवी असलेल्या अधिकांश स्त्रीपुरुषांच्या बाबतीतही असेच झाले आहे. पण आपल्याला मदत नाही, अशातला भाग नाही. आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला मदत पुरवलेली आहे. खरे पाहता, तो “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत” अस्तित्वात असल्यामुळे आणि विश्वासंबंधी, इतिहासासंबंधी त्याला संपूर्ण माहिती असल्यामुळे तोच ज्ञानबोधाचा सर्वोत्तम उगम नाही का? (स्तोत्र ९०:१, २) त्याने मानवांना निर्माण केले आहे आणि मानवांच्या सर्व घडामोडी त्याने निरखून पाहिल्या आहेत, त्याअर्थी आपण ज्ञानाकरता त्याच्याचकडे वळले पाहिजे, मर्यादित ज्ञान आणि समज असणाऱ्या अपरिपूर्ण मानवांकडे नव्हे.—स्तोत्र १४:१-३; रोमकर ३:१०-१२.
६. (अ) निर्माणकर्त्याने आवश्यक असलेला ज्ञानबोध कशाप्रकारे पुरवला आहे? (ब) यात शलमोनाची काय भूमिका आहे?
६ जीवनाच्या अर्थासंबंधाने निर्माणकर्ता आपल्याला एखादा कानमंत्र देईल अशी जरी आपण अपेक्षा करू शकत नसलो, तरीसुद्धा त्याने आपल्याकरता ज्ञानबोधाचे एक माध्यम—त्याचे प्रेरित वचन, पुरवले आहे. (स्तोत्र ३२:८; १११:१०) याबाबतीत उपदेशकाचे पुस्तक खासकरून उद्बोधक आहे. देवाने या पुस्तकाच्या लेखकाला प्रेरणा दिल्यामुळे, “शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी . . . यांच्याहून अधिक होते.” (१ राजे ३:६-१२; ४:३०-३४) ‘शलमोनाचे शहाणपण’ पाहून त्याला भेटायला आलेली एक राणी एवढी थक्क झाली, की तिने त्याच्याविषयी जे ऐकले होते ते अर्धेही नव्हते आणि ज्यांना त्याच्या शहाणपणाचा लाभ होतो ते धन्य आहेत असे म्हटल्यावाचून तिला राहावले नाही.a (१ राजे १०:४-८) आपल्या निर्माणकर्त्याने शलमोनाच्या लेखणीतून पुरवलेल्या ईश्वरी बुद्धीतून आपल्यालाही ज्ञानबोध आणि आनंद लाभू शकतो.
७. (अ) या भूतलावर चालणाऱ्या पुष्कळशा उद्योगांविषयी शलमोनाने कोणता निष्कर्ष काढला? (ब) शलमोनाचे वास्तववादी मूल्यमापन कोणत्या उदाहरणावरून स्पष्ट होते?
७ उपदेशकाचे पुस्तक देवाने दिलेल्या ज्या ज्ञानाचे दर्शन घडवते त्या ज्ञानाचा शलमोनाच्या मनावर आणि बुद्धीवर प्रभाव पडला होता. वेळ, साधनसंपत्ती आणि ज्ञान असल्यामुळे शलमोनाने ‘या भूतलावर जे काही चालले होते’ त्याचा नीट शोध घेतला. यापैकी पुष्कळसे त्याला “व्यर्थ, वायफळ उद्योग” असल्याचे दिसून आले आणि हा ईश्वरप्रेरित निष्कर्ष, जीवनाच्या उद्देशाविषयी विचार करतेवेळी आपण ध्यानात ठेवण्याजोगा आहे. (उपदेशक १:१३, १४, १६) शलमोन एका प्रामाणिक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून बोलत होता. उदाहरणार्थ, उपदेशक १:१५, १८ येथे आढळणारे त्याचे शब्द विचारात घ्या. शतकानुशतके, माणसाने विविध प्रकारच्या सरकारांना आजमावून पाहिले आहे आणि समस्या सोडवून लोकांना चांगले जीवन द्यावे या इच्छेने काहींनी तर प्रामाणिकपणे प्रयत्नही केले आहेत. तथापि, कोणतेही सरकार या अपरिपूर्ण जगातला “बिघडलेला” कारभार सुधारू शकले आहे का? आणि तुम्हाला कदाचित लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीजवळ जितके अधिक ज्ञान असते तितकेच त्याला आणखी प्रकर्षाने जाणवू लागते की एवढ्या लहानशा आयुष्यात कोणतीही गोष्ट पूर्णपणे सुधारायची म्हटले तर ते अशक्य आहे. या जाणिवेने अनेकजण हवालदिल होतात, पण आपल्याला निराश होण्याची गरज नाही.
८. कोणते चक्र शतकानुशतके अखंड सुरू आहेत?
८ विचारात घेण्याजोगा आणखीन एक मुद्दा म्हणजे पुन्हा पुन्हा फिरून येणारे वेगवेगळे चक्र ज्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो, उदाहरणार्थ, सूर्योदय आणि सूर्यास्त किंवा वायू आणि पाण्याच्या हालचाली. हे चक्र मोशे, शलमोन, नेपोलियन आणि आपल्या पणजोबांच्या काळातही होतेच. आजही ते अखंड सुरू आहेत. शिवाय, “एक पिढी जाते व दुसरी येते.” (उपदेशक १:४-७) मानवाच्या दृष्टीने पाहिल्यास, फारसे काही बदलले नाही. जुन्या काळातील लोकांचे आणि आधुनिक काळातील लोकांचे कार्यविधी, आशा-आकांक्षा आणि साध्यता यांची तुलना करता येण्याजोगी आहे. मानवांपैकी एखाद्याने पुष्कळ नावलौकिक कमावला असेल किंवा रंगरूपामुळे, कलाकौशल्यांमुळे एखादा कदाचित लोकांमध्ये चमकलाही असेल, तरी प्रश्न हा आहे, की आज तो कोठे आहे? तो काळाच्या पडद्याआड जाऊन आता लोकांना कदाचित त्याचा विसरही पडला असेल. हा एक उदासीन दृष्टिकोन नव्हे. पुष्कळशा लोकांना आपल्या पणजी-पणजोबाचे नावसुद्धा माहीत नसते आणि त्यांचा कोठे जन्म झाला त्यांच्यावर कोठे अंत्यसंस्कार करण्यात आले हे देखील त्यांना सांगता येणार नाही. शलमोनाने वास्तववादी दृष्टिकोनातून मानवी कार्ये आणि प्रयत्न व्यर्थ असल्याचे का म्हटले हे आता तुमच्या लक्षात आले असावे.—उपदेशक १:९-११.
९. मानवाच्या परिस्थितीविषयी वास्तववादी ज्ञान प्राप्त केल्याने आपल्याला कशाप्रकारे मदत मिळू शकेल?
९ आपल्याला हवालदिल करण्याऐवजी मानवाच्या खऱ्या परिस्थितीविषयीचे हे ईश्वरी ज्ञान, आपल्यावर एक सकारात्मक परिणाम करू शकते; या ज्ञानामुळे, लवकरच नाहीसे होऊन ज्यांचा विसर पडतो अशा क्षणभंगुर ध्येयांना आणि उद्योगांना अवाजवी महत्त्व देण्याचे आपल्याला टाळता येईल. आपण आपल्या जीवनातून काय मिळवत आहोत आणि काय साध्य करण्याच्या प्रयत्नात आहोत हे ठरवण्यासाठी हे ज्ञान आपल्याला सहायक ठरते. उदाहरणार्थ, वैरागी होण्यापेक्षा आपण संतुलित प्रमाणात खाण्यापिण्यातून आनंद मिळवू शकतो. (उपदेशक २:२४) शिवाय, पुढे आपण पाहणारच आहोत त्याप्रमाणे, शलमोन शेवटी एका अतिशय सकारात्मक आणि आशावादी निष्कर्षावर पोहंचतो. थोडक्यात म्हणजे, आपण आपल्या निर्माणकर्त्यासोबतच्या आपल्या नातेसंबंधाची मनःपूर्वक कदर बाळगली पाहिजे, तोच आपल्याला एक चिरकालीन आनंदाचे, उद्देशपूर्ण भवितव्य मिळवण्यास मदत करू शकतो. शलमोनाने जोर देऊन म्हटले: “आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.
जीवनचक्रांचा विचार करता आपल्या जीवनाचा उद्देश
१०. शलमोनाने प्राण्यांची आणि मनुष्यांची कशी तुलना केली?
१० उपदेशकात आढळणारे ईश्वरी ज्ञान आपल्याला आपल्या जीवनाच्या उद्देशाचा विचार करण्यात आणखीन मदत करू शकते. ते कसे? आपण क्वचितच विचार करत असू अशा वस्तुस्थितींवर शलमोनाने वास्तववादी दृष्टिकोनातून लक्ष केंद्रित केले. यांपैकी एक मानव आणि प्राण्यांतील सारखेपणाविषयी आहे. येशूने आपल्या अनुयायांची तुलना मेंढरांसोबत केली, पण सहसा लोकांना त्यांची तुलना प्राण्यांशी केलेली आवडत नाही. (योहान १०:११-१६) तरीसुद्धा शलमोनाने काही निर्विवाद सत्यांवर प्रकाश टाकला: “देव हे असे मानवपुत्रांकरिता करितो, ते ह्या हेतूने की त्यांना कसोटीस लावावे आणि आपण केवळ पशु आहो हे त्यांस कळून यावे. मानवपुत्रावर प्रसंग येतात तसेच पशूवर येतात; दोघांवरहि एकच प्रसंग येतो; हा मरतो तसाच तोहि मरतो; . . . पशूपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही; कारण सर्व काही व्यर्थ आहे! . . . सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुनः मातीस मिळतात.”—उपदेशक ३:१८-२०.
११. (अ) एखाद्या प्राण्याच्या सर्वसामान्य जीवनचक्राचे कसे वर्णन करता येईल? (ब) अशाप्रकारच्या विश्लेषणाबद्दल तुमचे काय मत आहे?
११ तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या प्राण्याचा विचार करा, उदाहरणार्थ माकड किंवा एखादा ससा. (अनुवाद १४:७; स्तोत्र १०४:१८; नीतिसूत्रे ३०:२६) नाहीतर, खारीचेच उदाहरण घ्या; जगभरात ३०० पेक्षा अधिक प्रकारच्या खारी आहेत. तिचे जीवनचक्र कसे असते? जन्म झाल्यावर, तिला काही आठवड्यांपर्यंत आई दूध पाजते. लवकरच तिच्या अंगावर केस येतात आणि ती आता घरट्यातून बाहेर पडण्याचे साहस करू शकते. मग ती अन्नाच्या शोधात, चहूकडे उड्या मारताना आपल्याला दिसते. पुष्कळदा तर ती जणू आपल्या बाल्यावस्थेचा पुरेपूर आनंद घेत, खेळकरपणे उगाचच उड्या मारत असते. जवळजवळ एक वर्ष वाढ झाल्यावर ती जोडीदार शोधते. आता तिने राहण्याकरता एखाद्या उबदार ठिकाणाची किंवा घरट्याची व्यवस्था करून पिलांची काळजी घेतली पाहिजे. पुरेशी फळे, दाणे वगैरे सापडल्यास खारुताईचे कुटुंब लवकरच धष्टपुष्ट होईल आणि त्यांना आपले घरटे मोठे करण्याची गरज भासू लागेल. तथापि, काही वर्षांतच या प्राण्याला म्हातारपण येते आणि आजार किंवा अपघात होण्याची शक्यता वाढते. सुमारे दहा वर्षे जगल्यावर खार मरते. खारींच्या वेगवेगळ्या प्रकारात थोड्याफार फरकाने, सहसा हेच जीवनचक्र असते.
१२. (अ) खरे पाहता, अनेक मनुष्यांचे जीवनचक्र एखाद्या सर्वसाधारण प्राण्याच्या जीवनासारखेच असते असे का म्हणता येईल? (ब) आपण उदाहरणादाखल विचारात घेतलेला प्राणी पुढच्या वेळेस पाहू तेव्हा कदाचित कोणते विचार आपल्या मनात येतील?
१२ प्राण्यांबद्दल बोलायचे झाल्यास, अशा जीवनचक्रावर बहुधा कोणी हरकत घेणार नाही; नाहीतरी, खारीच्या जीवनात सुयुक्तिक उद्देश असावा असा कोणीच विचार करणार नाही. तथापि, पुष्कळ लोकांचे जीवन देखील यापेक्षा फारसे वेगळे नसते, हे खरे नाही का? त्यांचा जन्म होतो आणि बाल्यावस्थेत त्यांची काळजी घेतली जाते. खाऊनपिऊन धष्टपुष्ट झाल्यावर ते तरुणपणात मौजमजा करतात. लवकरच ते प्रौढ झालेले असतात, मग त्यांना जोडीदार सापडतो आणि ते राहण्यासाठी जागा आणि अन्न पुरवण्यासाठी काम शोधू लागतात. यशस्वी ठरल्यास ते धष्टपुष्ट होऊन आपल्या मुलाबाळांच्या संगोपनासाठी त्यांचे घरदार (घरटे) मोठे करतात. पाहता पाहता दिवस निघून जातात आणि ते म्हातारे होऊ लागतात. जास्तीतजास्त ७० किंवा ८० वर्षे जगल्यावर कदाचित, त्यांचे “कष्टमय व दु:खमय” जीवन संपुष्टात येते. (स्तोत्र ९०:९, १०, १२) पुढच्या वेळेस तुम्ही खार (किंवा तुम्ही उदाहरण म्हणून घेतलेला दुसरा एखादा प्राणी) पाहाल तेव्हा कदाचित तुम्हाला या विचार करायला लावणाऱ्या वस्तुस्थितींची आठवण येईल.
१३. प्राणी आणि मनुष्य या दोघांनाही कोणत्या अंतिम परिणामाला सामोरे जावे लागते?
१३ शलमोनाने माणसांच्या जीवनाची तुलना प्राण्यांशी का केली हे तुमच्या लक्षात आले असावे. त्याने लिहिले: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो . . . जन्मसमय व मृत्युसमय.” ही दुसरी शक्यता माणसांत आणि प्राण्यांत सारखीच असते, “हा मरतो तसाच तोहि मरतो.” शलमोन पुढे म्हणतो: “सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुनः मातीस मिळतात.”—उपदेशक ३:१, २, १९, २०.
१४. काही लोक नेहमीच्या जीवनचक्रात फेरबदल करण्याचा कसा प्रयत्न करतात, पण याचा काय परिणाम होतो?
१४ या वास्तववादी मूल्यमापनाला निराशावादी समजण्यात येऊ नये. काही जण परिस्थितीत बदल घडवण्याचा प्रयत्न करतात हे कबूल आहे, उदाहरणार्थ, काहीजण आपल्या पालकांची जी आर्थिक स्थिती होती ती सुधारण्यासाठी अधिक कष्ट करतात. कदाचित, उच्च दर्जाचे राहणीमान असावे या अपेक्षेने ते अधिक शिक्षण घेतील आणि त्यासोबतच जीवनाबद्दल आपली समज देखील आणखीन प्रगल्भ बनवण्याचा कदाचित प्रयत्न करतील. अथवा, अधिक चांगले आरोग्य मिळवण्यासाठी तसेच, थोडेफार का होईना आपले आयुष्य वाढवण्यासाठी ते व्यायाम आणि पथ्यपाण्याकडे विशेष लक्ष देतील. या प्रयत्नांमुळे कदाचित काही फायदे होतील. तथापि, अशाप्रकारचे प्रयास यशस्वी होतीलच याची कोण खात्री बाळगू शकतो? आणि समजा ते यशस्वी झाले तरीसुद्धा, ते किती काळ टिकणार?
१५. अधिकांश लोकांच्या जीवनाबद्दल कोणत्या गोष्टी निखालसपणे विचारात घेणे महत्त्वाचे आहे?
१५ शलमोनाने विचारले: “व्यर्थतेची वृद्धि करणाऱ्या अशा बहुत गोष्टी आहेत; त्यांपासून मनुष्याला काय लाभ? मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवितो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्चात् . . . काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल?” (उपदेशक ६:११, १२) मृत्यूमुळे लवकरच माणसाचे सर्व प्रयत्न फोल ठरतात, यामुळे, आणखी भौतिक वस्तू मिळवण्याच्या मागे लागण्यात किंवा अमाप संपत्ती प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे शिक्षण घेत राहण्यात खरोखरच फायदा आहे का? तसेच जीवन अगदीच अल्पावधीचे, एखाद्या छायेप्रमाणे असल्यामुळे अनेकांना एखादे विशिष्ट ध्येय प्राप्त करण्यात अपयश आल्यास हे कळून येते की आणखी कशात नव्याने हात घालण्यासाठी त्यांच्याजवळ आता पुरेसा वेळ उरलेला नाही; शिवाय, ‘आपल्या पश्चात’ आपल्या मुलाबाळांचे काय होईल याबद्दलही माणसाला शाश्वती नसते.
चांगले नाव मिळवण्याची वेळ
१६. (अ) प्राणी करू शकत नाहीत असे काय करणे आपल्यासाठी आवश्यक आहे? (ब) कोणत्या आणखी एका वस्तुस्थितीचा आपल्या विचारावर प्रभाव होण्यास हवा?
१६ मानव असल्या कारणाने आपण स्वतःशी विचार करू शकतो की, ‘माझ्या अस्तित्वाला काय अर्थ आहे? ते जन्ममृत्यूच्या विशिष्ट वेळा असणारे एक अपरिवर्तनीय चक्र आहे का?’; तथापि, प्राणी असा विचार करू शकत नाहीत. याबाबतीत, शलमोनाने मनुष्य आणि प्राण्याविषयी उद्गारलेले शब्द आठवून पाहा, तो म्हणतो: “सर्व पुनः मातीस मिळतात.” मृत्यू झाला की एखाद्याचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येते असा याचा अर्थ होतो का? बायबल दाखवते, की मनुष्यांमध्ये शरीराचा नाश झाल्यावरही जिवंत राहणारा अमर जीव नाही. मानवच जीव आहे आणि जो जीव पाप करतो तो मरतो. (यहेज्केल १८:४, २०) शलमोनाने यावर आणखी विश्लेषण मांडले: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ति व्हावयाची नसते; त्यांचे स्मरण कोणास राहत नाही. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.”—उपदेशक ९:५, १०.
१७. उपदेशक ७:१, २ येथील शब्दांनी आपल्याला कशाचा विचार करण्यास भाग पाडले पाहिजे?
१७ ती अपरिहार्य वस्तुस्थिती नजरेपुढे ठेवून या विधानाचा विचार करा: “सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा. भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनांत ही गोष्ट बिंबून राहील.” (उपदेशक ७:१, २) आजवर मृत्यू हाच ‘प्रत्येक मनुष्याचा शेवट राहिला आहे,’ हे आपल्याला मान्य करावेच लागेल. कोणतेही अमृत प्यायल्याने किंवा जीवनसत्वाचे मिश्रण सेवन केल्याने, पथ्यपाणी पाळल्याने किंवा कोणतेही व्यायाम केल्याने आजवर माणसांपैकी कोणीही अमर झालेला नाही. त्याचप्रमाणे मृत्यू झाल्यावर थोड्याच दिवसांत सहसा “त्यांचे स्मरण कोणास राहत नाही.” हे खरे असल्यास, “सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा,” असे का म्हणण्यात आले आहे बरे?
१८. शलमोनाचा पुनरुत्थानावर विश्वास होता याविषयी आपण का खात्री बाळगू शकतो?
१८ आपण याआधीच पाहिल्याप्रमाणे, शलमोन हा वास्तववादी होता. निर्माणकर्त्याच्या दृष्टीत नावलौकिक मिळवलेल्या अब्राहाम, इसहाक आणि याकोब या आपल्या पूर्वजांविषयी शलमोनाला माहीत होते. यहोवा देव अब्राहामाशी परिचित होता आणि यामुळे त्याने अब्राहामाला आणि त्याच्या संततीला आशीर्वादित करण्याचे अभिवचन दिले. (उत्पत्ति १८:१८, १९; २२:१७) खरोखर, अब्राहामाने देवाच्या दृष्टीत नावलौकिक मिळवला व त्याचा मित्र बनला. (२ इतिहास २०:७; यशया ४१:८ याकोब २:२३) आपले व आपल्या मुलाचे जीवन हे केवळ जन्म मृत्यूचे एक अविरत चक्र नाही याची अब्राहामाला जाणीव होती. त्यांचे जीवन नक्कीच तेवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांना पुन्हा जगण्याचे खात्रीलायक भवितव्य होते, त्यांच्याठायी अमर जीव असल्यामुळे नव्हे तर त्यांचे पुनरुत्थान होणार असल्यामुळे. अब्राहामाला पूर्ण खात्री होती की “[इसहाकाला] मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे.”—इब्री लोकांस ११:१७-१९.
१९. उपदेशक ७:१ येथील शब्दांचा अर्थ समजण्यात आपल्याला ईयोबाकडून कोणता ज्ञानबोध मिळू शकतो?
१९ या आधारावर, कशाप्रकारे ‘सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा आहे आणि जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा आहे’ हे समजण्यास मदत मिळते. आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या ईयोबाप्रमाणेच, मानवी जीवनाच्या निर्माणकर्त्याला पुन्हा जीवन देण्याचे सामर्थ्य आहे याची शलमोनालाही खात्री होती. तो मृत मानवांना पुन्हा जिवंत करू शकतो. (ईयोब १४:७-१४) विश्वासू ईयोबाने म्हटले: “तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१५) क्षणभर विचार करून पाहा! आपल्या निर्माणकर्त्याला मृत्यू पावलेल्या त्याच्या निष्ठावान सेवकांसाठी ‘उत्कंठा आहे.’ (“तुला आपली हस्तकृती पुन्हा पाहावी, असे वाटेल.”—सुबोध भाषांतर.) येशू ख्रिस्ताचे खंडणी यज्ञार्पण लागू करण्याद्वारे निर्माणकर्ता मानवांना पुनरुत्थित करू शकतो. (योहान ३:१६; प्रेषितांची कृत्ये २४:१५) स्पष्टपणे मर्त्य प्राण्यांपेक्षा मानव वेगळे असू शकतात.
२०. (अ) मृत्युदिन जन्मदिनापेक्षा बरा असे केव्हा म्हणता येईल? (ब) लाजरच्या पुनरुत्थानाने अनेकांवर कसा परिणाम झाला असावा?
२० याअर्थी, एखाद्याने आपल्या जीवनात मरणाऱ्या विश्वासू जनांना पुनरुत्थित करण्यास समर्थ असलेल्या यहोवाच्या नजरेत नावलौकिक मिळवल्यास त्याचा मृत्युदिन जन्मदिनापेक्षा बरा ठरू शकतो. थोर शलमोनाने अर्थात येशू ख्रिस्ताने हे शाबीत केले. उदाहरणार्थ, त्याने लाजर नावाच्या विश्वासू माणसाला पुन्हा जिवंत केले. (लूक ११:३१; योहान ११:१-४४) साहजिकच, ज्यांनी लाजरला जिवंत होताना पाहिले त्यांच्यावर याचा खूपच परिणाम झाला आणि त्यांनी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला. (योहान ११:४५) त्यांना आपण कोण आहोत आणि आपले भवितव्य काय आहे याची अजिबात कल्पना नसून, आपले जीवन निरुद्देश्य वाटले असावे, असे तुम्हाला वाटते का? उलटपक्षी, निव्वळ जन्म होऊन काही काळ जगून नंतर मरून जाणाऱ्या प्राण्यांसारखे असण्याची आपल्याला गरज नाही याची त्यांना जाणीव होऊ शकली. त्यांच्या जीवनाचा उद्देश येशूच्या पित्याला ओळखून त्याची इच्छा पूर्ण करण्याशी थेटपणे आणि जवळून संबंधित होता. तुमच्याविषयी काय? या चर्चेतून, तुमच्या जीवनाला कशाप्रकारे एक खरा उद्देश असू शकतो आणि असावा हे जाणून घेण्यास किंवा पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास तुम्हाला मदत झाली का?
२१. आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्यासंबंधी आणखी कोणत्या विषयाचे आपल्याला परीक्षण करावयाचे आहे?
२१ तथापि, जगण्यात एक अस्सल आणि यथार्थ उद्देश असणे म्हणजे केवळ मृत्यूबद्दल आणि त्यानंतर पुन्हा जगण्याबद्दल विचार करणे एवढेच नव्हे. आपण आपल्या जीवनात दिवसागणिक काय करत आहोत हे देखील यात समाविष्ट आहे. शलमोनाने देखील उपदेशकात हे स्पष्ट केले व पुढील लेखात आपण याविषयी पाहणार आहोत.
[तळटीपा]
a ‘शबाच्या राणीच्या’ वृत्तान्तात शलमोनाच्या बुद्धीवर अधिक भर आहे आणि या गोष्टीला अनेकदा एक आख्यायिका म्हणण्यात आले आहे (१ राजे १०:१-१३). तथापि, संदर्भावरून दिसते की शलमोनाकडे येण्याचा तिचा उद्देश खरे पाहता व्यापारासंबंधी होता आणि हे समजण्याजोगे आहे; याच्या ऐतिहासिक खरेपणाविषयी संशय घेण्याचे काहीही कारण नाही.”—द इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया (१९८८), चौथा खंड, पृष्ठ ५६७.
तुम्हाला आठवते का?
◻ प्राणी आणि मानव यांची कोणकोणत्या गोष्टींत तुलना करता येईल?
◻ मानवांचे पुष्कळसे उद्योग आणि कार्ये व्यर्थ आहेत या गोष्टीला मृत्यूमुळे का पुष्टी मिळते?
◻ कोणत्याप्रकारे मृत्युदिन जन्मदिनापेक्षा बरा आहे?
◻ आपल्या जीवनात एक अर्थपूर्ण उद्देश असणे कोणत्या नातेसंबंधावर अवलंबून आहे?
[१० पानांवरील चित्र]
तुमच्या आणि प्राण्यांच्या जीवनात कोणता लक्षणीय फरक आहे?