वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 २/१५ पृ. ४-७
  • दुःख नसेल तेव्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दुःख नसेल तेव्हा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्याने तत्काळ आपल्या इच्छेची अंमलबजावणी का केली नाही?
  • त्याने लोकांना चांगली कृत्ये करण्यास भाग पाडावे
  • बळी पडलेल्या निरपराध जिवांचे काय होणार?
  • दुःख सोसणाऱ्‍यांना खरे समाधान?
  • ‘सर्व गोष्टींचे पूर्वस्थितीला पोहंचविले जाणे’
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • दुःखितांना सांत्वन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • देव दुःख काढून का टाकत नाही?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • दुःख सहन करणे आपल्याकरता लाभदायक ठरू शकते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 २/१५ पृ. ४-७

दुःख नसेल तेव्हा

मानवजातीसाठी देवाच्या मूळ उद्देशात दुःखाचा समावेश नव्हता. त्याने दुःख योजले नाही किंवा ते अस्तित्वात राहावे असेही तो इच्छित नाही. आता तुम्ही विचाराल की, ‘जर हे खरं आहे, तर मग दुःख अस्तित्वात आलंच कसं, शिवाय, देवाने आजपर्यंत त्याचं अस्तित्व का राहू दिलंय?’—पडताळा याकोब १:१३.

या प्रश्‍नांची उत्तरे, मानवी इतिहासाच्या सर्वात पुरातन अहवालात अर्थात बायबलमध्ये, खासकरून उत्पत्ति या पुस्तकात सापडतात. यात आपल्या मूळ पालकांनी म्हणजेच आदाम व हव्वा यांनी देवाविरुद्ध विद्रोह करण्यात दियाबल सैतानाच्या पावलावर पाऊल ठेवले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या कृतींमुळे काही असे मूलभूत वादविषय निर्माण झाले ज्यांमुळे विश्‍वव्यापी कायदा व व्यवस्थेच्या आधारालाच मुळात आव्हान करण्यात आले. बऱ्‍यावाईटाचा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला आहे असा दावा करून त्यांनी देवाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध आक्षेप घेतला. मानवजातीवर राज्य करण्याच्या तसेच “बरेवाईट” ठरविणारा एकमात्र नियंता असण्याच्या देवाच्या अधिकारावर त्यांनी हरकत घेतली.—उत्पत्ति २:१५-१७; ३:१-५.

त्याने तत्काळ आपल्या इच्छेची अंमलबजावणी का केली नाही?

तुम्हाला कदाचित प्रश्‍न पडेल की, ‘देवाने तत्काळ आपल्या इच्छेची अंमलबजावणी का केली नाही?’ अनेक जण हे किती सहज बोलून जातात. ते म्हणतात, ‘देवाजवळ सामर्थ्य होतं ना. मग त्याने विद्रोह करणाऱ्‍यांचा नाश करण्यासाठी ते उपयोगात आणायला हवं होतं.’ (स्तोत्र १४७:५) तथापि, क्षणभर विचार करा, ‘स्वतःच्या इच्छेची अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधिकाराचा वापर करणाऱ्‍यांचे मी खरंच मनापासून समर्थन करतो/करते का? सैनिकी तुकड्यांचा वापर करून एखादा हुकुमशहा जेव्हा आपल्या विरोधकांची कत्तल करतो, तेव्हा मला साहजिकच त्याच्याबद्दल तिटकारा वाटत नाही का?’ कोणत्याही शहाण्या माणसाला अशा निर्घृण कृत्याचा वीट येईल.

‘पण देवाने सामर्थ्य उपयोगात आणलं असतं, तर कोणीही आक्षेप घेतला नसता,’ असे कदाचित तुम्ही म्हणाल. पण, तुम्ही हे खात्रीपूर्वक बोलताहात का? लोक देवाच्या सामर्थ्याच्या अंमलबजावणीविषयी आक्षेप घेतात ही वस्तुस्थिती नाही का? काहीवेळा, त्याने आपले सामर्थ्य का उपयोगात आणले नाही, याबद्दल ते हरकत घेतात, उदाहरणार्थ, दुष्टाईसंबंधी त्याच्या सोशीकपणावर ते आक्षेप घेतात. इतर वेळी त्याने आपल्या सामर्थ्याचा का वापर केला असा सवाल ते करतात. देवाने आपल्या वैऱ्‍यांविरुद्ध सामर्थ्याचा वापर करण्यासंबंधी विश्‍वासू अब्राहामाने देखील हरकत घेतली होती. देवाने सदोमाचा नाश करण्याचे ठरवले तेव्हाचा प्रसंग आठवा. दुष्ट लोकांसोबत चांगल्यांचाही नाश तर होणार नाही, अशी अब्राहामाला भीती वाटली; अर्थात ती त्याची चूक होती. तो मोठ्याने म्हणाला: “या प्रकारची कृति तुजपासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध करणे तुजपासून दूर राहो.” (उत्पत्ति १८:२५) आज अब्राहामासारख्या सत्पुरुषांनाही देवाच्या निरंकुश सामर्थ्याचा गैरवापर होणार नाही याविषयी खात्री पटवून देण्याची गरज आहे.

अर्थात, देव तत्क्षणी आदाम, हव्वा व सैतान यांचा नाश करू शकत होता. तथापि, इतर देवदुतांवर किंवा भविष्यात जन्माला येणाऱ्‍या इतरांना, देवाने केलेल्या गोष्टींविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मनावर याचा कसा परिणाम झाला असता त्याचा विचार करा. त्यांच्या मनात देवाच्या शासनाच्या न्याय्यपणाविषयी कदाचित संतापजनक प्रश्‍न घोळत राहिले नसते का? यामुळे, नीत्शेच्या शब्दांत, देव खरोखरच एकप्रकारचा अत्याचारी जुलूमशहा आहे, विरोध करणाऱ्‍यांचा क्रूरपणे सर्वनाश करणारा आहे हे आरोप साधार ठरले नसते का?

त्याने लोकांना चांगली कृत्ये करण्यास भाग पाडावे

‘देव लोकांना चांगली कृत्ये करण्यास भाग पाडू शकत नाही का?’ असे कदाचित काहीजण विचारतील. तथापि, जरा यावरही विचार करा. सबंध इतिहासात, वेगवेगळ्या सरकारांनी लोकांना आपल्या विचारसरणीनुसार जगण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे. काही सरकारांनी किंवा वैयक्‍तिक शासकांनी माणसाच्या बुद्धीवर नियंत्रण मिळविण्याकरता निरनिराळ्या पद्धतींचा प्रयोग करून पाहिला आहे; स्वतंत्र इच्छेच्या आधारे जाणतेपणाने निर्णय घेण्याच्या अद्‌भुत देणगीपासून लोकांना वंचित करून, काहींनी औषधांच्या किंवा शस्त्रक्रियेच्या साहाय्याने त्यांच्या बुद्धीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतंत्र नैतिक निर्णय घेण्याच्या आपल्या क्षमतेचा गैरवापर होण्याची शक्यता असूनही स्वतंत्र नैतिक प्राणी असण्याची आपली ही देणगी आपण जपत नाही का? एखाद्या सरकारने किंवा शासकाने हे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपण ते खपवून घेतो का?

तर मग, सामर्थ्याचा वापर करून कायद्याची अंमलबजावणी करण्याव्यतिरिक्‍त देवासमोर कोणता पर्याय होता? यहोवा देवाने ठरवले की त्याचे कायदे अव्हेरणाऱ्‍यांना त्याच्या शासनापासून तात्पुरत्या कालावधीपर्यंत स्वातंत्र्य देणे हाच या विद्रोहावर सर्वोत्तम उपाय होता. असे केल्यामुळे आदाम व हव्वा यांपासून उत्पन्‍न झालेल्या मानवी कुटुंबाला देवाच्या कायद्यांच्या बंधनाशिवाय स्वशासन करण्याकरता ठराविक कालावधी मिळणार होता. देवाने असे का केले? काही वेळा देव आपल्या इच्छेची अंमलबजावणी करण्याकरता स्वतःच्या अपरिमित सामर्थ्याचा वापर करत असला तरीसुद्धा, त्याची शासनपद्धती नेहमीच उचित आणि न्याय्य असते तसेच, त्याच्याविरुद्ध विद्रोह केल्यास पुढेमागे कधीतरी नाश हा ठरलेलाच आहे, या वस्तुस्थितींना पुष्टी देणारा निर्विवाद पुरावा कालांतराने आपोआप निर्माण होईल याची देवाला कल्पना असल्यामुळे त्याने असे केले.—अनुवाद ३२:४; ईयोब ३४:१०-१२; यिर्मया १०:२३.

बळी पडलेल्या निरपराध जिवांचे काय होणार?

‘पण काळाच्या ओघात बळी पडलेल्या निरपराध जिवांचे काय होणार?’ असा कदाचित तुम्हाला प्रश्‍न पडला असावा. ‘केवळ न्यायाचा एखादा मुद्दा शाबीत व्हावा म्हणून का त्यांनी एवढे कष्ट सोसावे?’ नाही, देवाने केवळ कोणतातरी न्यायाचा मुद्दा शाबीत करण्यासाठी दुष्टपणा चालू दिलेला नाही. उलटपक्षी, तोच केवळ सार्वभौम असून त्याने निर्माण केलेल्या सर्व प्राणिमात्रांच्या शांती आणि आनंदासाठी त्याचे कायदे पाळणे अत्यावश्‍यक आहे हे मूळ सत्य सर्वकाळासाठी शाबीत करावे म्हणूनच त्याने दुष्टपणा खपवून घेतला आहे.

आठवणीत ठेवण्यालायक एक महत्त्वाचा मुद्दा असा की, यामुळे मानवजातीला जो काही अपाय घडला असेल तो पूर्णपणे भरून काढण्यास देव समर्थ आहे. कालांतराने, या तात्पुरत्या कष्टाच्या व दुःखाच्या काळाचा फायदेकारक परिणाम घडून येईल याची त्याला जाणीव आहे. एखाद्या जीवघेण्या रोगापासून संरक्षण देण्यासाठी डॉक्टर लहान बाळाला लस टोचतात तेव्हा आई आपल्या बाळाला कशी घट्ट धरून ठेवते त्याचा विचार करा. आपल्या बाळाला वेदना व्हाव्यात असे कोणत्याही आईला वाटत नाही. कोणत्याही डॉक्टरला आपल्या रुग्णाला मुद्दामहून त्रास द्यावासा वाटत नाही. त्यावेळेस जरी बाळाला वेदनेचे कारण कळत नसले तरीसुद्धा ती वेदना का होऊ दिली याची त्याला कालांतराने जाणीव होईल.

दुःख सोसणाऱ्‍यांना खरे समाधान?

दुःख सोसणाऱ्‍यांना हे सारे समजले तरीही तेवढ्याने त्यांना समाधान मिळू शकत नाही, असे काही जण कदाचित म्हणतील. हॅन्स कुंग यांनी म्हटल्याप्रमाणे, दुःखाच्या अस्तित्वामागचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिल्यास “दुःख सोसणाऱ्‍याला साहाय्य मिळेल अशी अपेक्षा करणे, म्हणजे अन्‍नपदार्थांच्या घटकांविषयी भाषण ऐकल्यावर भुकेल्या माणसाची भूक भागेल असे म्हणण्यासारखे आहे.” ते विचारतात: “दुःखाने पुरते त्रस्त झालेल्या माणसासमोर कितीही चाणाक्ष युक्‍तीवाद मांडला तरी त्यामुळे त्याला खरोखर सांत्वन मिळणार आहे का?” खरेच आहे, देवाचे वचन बायबल याकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यांनी मांडलेला “चाणाक्ष युक्‍तिवाद,” दुःख सोसणाऱ्‍यांना सांत्वन देऊ शकलेला नाही. मानवांनी दुःख सोसावे अशी देवाचीच योजना होती आणि पृथ्वी ही स्वर्गलोकांत जीवन मिळण्यापूर्वीचे दुःखसागर किंवा कर्मभूमी म्हणून घडवण्यात आली होती असे सुचवण्याद्वारे या मानवी युक्‍तिवादांनी समस्येत आणखीनच भर पाडली आहे. देवाचा हा केवढा अपमान!

परंतु, बायबल नक्कीच खरे समाधान देते. ते दुःखाच्या अस्तित्वाचे सुसंगत स्पष्टीकरण तर देतेच पण त्यासोबत तात्पुरत्या काळासाठी दुःखाला अनुमती दिल्यामुळे जे काही नुकसान झाले असेल ते सर्व भरून काढण्याविषयीच्या देवाच्या आश्‍वासनावर ते भरवसा पण वाढवते.

‘सर्व गोष्टींचे पूर्वस्थितीला पोहंचविले जाणे’

फार लवकर देव सर्व गोष्टी पूर्वस्थितीला नेईल, अर्थात त्याने निर्माण केलेल्या पहिल्या मानवांनी विद्रोह करण्यापूर्वी त्या गोष्टी जशा होत्या तशाच तो पुन्हा करील. मानवाच्या स्वतंत्र शासनाचा त्याचा नियुक्‍त काळ आता जवळजवळ संपत आला आहे. आपण नेमक्या त्याच काळात जगत आहोत जेव्हा देव ‘येशूला पाठवील, ज्याला सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत स्वर्गात राहणे प्राप्त आहे.’—प्रेषितांची कृत्ये ३:२०, २१.

येशू ख्रिस्त काय करील? तो देवाच्या विरोधकांना पृथ्वीवरून नाहीसे करील. (२ थेस्सलनीकाकर १:६-१०) मानवी हुकूमशहा करतात तसा हा तडकाफडकी नाश असणार नाही. मानवाच्या अंदाधुंदीच्या राज्यकारभारामुळे निष्पन्‍न झालेल्या भयंकर परिणामांना पुष्टी देणाऱ्‍या पुराव्यांची रास जमली आहे आणि त्यावरून दिसून येईल की लवकरच देव जेव्हा आपल्या इच्छेची अंमलबजावणी करण्याकरता आपल्या अपरिमित सामर्थ्याचा वापर करील तेव्हा ते संपूर्णतः न्यायसंगत असेल. (प्रकटीकरण ११:१७, १८) सुरवातीला, पूर्वी पृथ्वीवर कधी आले नव्हते असे नोहाच्या दिवसांतील जलप्रलयासारखेच, पण त्यापेक्षा कितीतरी मोठे “संकट” येईल. (मत्तय २४:२१, २९-३१, ३६-३९) जे लोक या ‘मोठ्या संकटातून’ बचावतील ते देवाने ‘आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितलेल्या’ सर्व अभिवचनांची पूर्णता झालेली पाहतील, आणि यामुळे “विश्रांतीचे समय” अनुभवतील. (प्रेषितांची कृत्ये ३:१९; प्रकटीकरण ७:१४-१७) देवाने कोणती अभिवचने दिली आहेत?

देवाचे प्राचीन काळातील संदेष्टे सांगतात की युद्ध आणि रक्‍तपातामुळे झालेल्या दुःखाचा शेवट होईल. उदाहरणार्थ, स्तोत्र ४६:९ आपल्याला सांगते की, “तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.” त्यानंतर कधीही विध्वंसक युद्धांमध्ये, कोणी निरपराध जण बळी पडणार नाही; कोणाचीही निर्वासितांसारखी दयनीय स्थिती होणार नाही, तसेच अमानुष युद्धांत कोणावर बलात्कार होण्याची, पांगळे होण्याची अथवा जीव जाण्याची वेळ येणार नाही! संदेष्टा यशया म्हणतो: “एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४.

संदेष्टे, गुन्हेगारी आणि अन्यायामुळे होणाऱ्‍या दुःखाचाही शेवट होण्याबद्दल सांगतात. नीतिसूत्रे २:२१, २२ येथे अभिवचन दिले आहे, की पृथ्वीवर ‘सरळ जनच वस्ती करितील’ आणि वेदना आणि दुःख देणाऱ्‍यांचे “निर्मूलन होईल.” यापुढे “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान” करणार नाही. (उपदेशक ८:९) सर्व दुष्ट लोकांना कायमचे नाहीसे करण्यात येईल. (स्तोत्र ३७:१०, ३८) सर्वजण शांती आणि सुरक्षिततेत, दुःखाविना जगू शकतील.—मीखा ४:४.

याशिवाय संदेष्टे, शारीरिक आणि भावनिक विकारांमुळे होणारे दुःख नाहीसे होण्याविषयीही अभिवचन देतात. (यशया ३३:२४) यशया खात्री देतो की अंध, कर्णबधिर, अपंग आणि वेगवेगळ्या रोगांमुळे आणि व्याधींमुळे पीडित झालेल्यांना निरोगी बनवण्यात येईल. (यशया ३५:५, ६) देव मृत्यूच्या दुष्परिणामांचेही नुकसान भरून काढेल. येशूने भविष्यवाद केला की, “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९) प्रेषित योहानाला दृष्टान्तात “नवे आकाश व नवी पृथ्वी” दिसली तेव्हा त्याला सांगण्यात आले की “देव . . . त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्‍यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:१-४) कल्पना करा! कष्ट, अश्रू, शोक, मृत्यू—कसलेच दुःख यापुढे राहणार नाही!

दुःख चालू दिलेल्या या तात्पुरत्या कालावधीत ज्याही दुःखद घटना घडल्या त्या सर्वांवर उपाय करण्यात येईल. मानवी जीवनातील कष्ट आणि दुःख जे देवाने कधीच योजले नव्हते, त्याच्या कटू स्मृती देखील पूर्णपणे नाहीशा करण्यात येतील. यशयाने भाकीत केले, ‘पूर्वीच्या कष्टांचा विसर पडेल. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत.’ (यशया ६५:१६, १७) परिपूर्ण मानवजातीने एका परादीस पृथ्वीवर संपूर्ण शांती आणि सौख्यानंदात जगावे हा देवाचा मानवजातीसाठी असलेला मूळ उद्देश पूर्णार्थाने साध्य होईल. (यशया ४५:१८) त्याच्या सार्वभौमत्वाविषयी कणमात्रही शंका उरणार नाही. देव जेव्हा सर्व दुःखाचा नाश करील आणि नीत्शेच्या आरोपानुसार, तो “जुलूमशहा, फसव्या, तोतया, जल्लाद” नसून नेहमीच आपल्या निरंकुश सामर्थ्याची अंमलबजावणी प्रेम, बुद्धी आणि न्यायाने करतो हे जेव्हा तो शाबीत करील, त्या काळात जगण्याचा सुहक्क अकल्पनीयपणे अद्‌भुत असेल!

[५ पानांवरील चित्र]

काही शासकांनी माणसाच्या बुद्धीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयोग करून, स्वतंत्र इच्छेपासून लोकांना वंचित केले आहे

[Picture Credit Line on page 5]

UPI/Bettmann

[७ पानांवरील चित्र]

दुःख नाहीसे झाल्यावर सर्वजण जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगतील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा