यहोवावरील माझ्या विश्वासामुळे टिकलो
आजरनार दा पाइशाँ यांच्याद्वारे कथित
माझा एकुलता एक मुलगा पाऊल ब्राँकायटिसने मरण पावला त्यावेळी तो फक्त ११ महिन्यांचा होता. त्यानंतर तीन महिन्यांनी, ऑगस्ट १५, १९४५ रोजी माझी प्रिय पत्नी न्युमोनियाने मरण पावली. या गोष्टीने मला दुःखाच्या आणि निराशेच्या गर्तेत लोटले त्यावेळी मी २८ वर्षांचा होतो. तथापि, यहोवा आणि त्याच्या अभिवचनांवरील विश्वासामुळे मी तग धरू शकलो. हा विश्वास माझ्यामध्ये कसा निर्माण झाला, हे मी तुम्हाला सांगतो.
जानेवारी ५, १९१७ रोजी ब्राझील, साल्वादोर बाहिया राज्यात माझा जन्म झाला आणि तेव्हापासून कॅथलिक चर्चच्या “संतांची” उपासना करण्याचे माझ्या आईने मला शिकवले होते. मी आणि माझ्या भावांनी एकत्र मिळून प्रार्थना करावी म्हणून ती मला आणि माझ्या भावाला भल्या पहाटे उठवत असे. तथापि, माझे पालक आफ्रिकी-ब्राझीलीयन जादूटोणा अनुष्ठानाच्या, कॉन्डोम्बलच्या कार्यक्रमांना देखील जात होते. या श्रद्धाविषयांची मी कदर करीत होतो, परंतु कॅथलिक चर्चच्या किंवा कॅन्डोम्बलमधील तथाकथित संतांवर माझा अजिबात विश्वास नव्हता. ज्या एका खास गोष्टीमुळे मी निराश झालो ती म्हणजे या धर्मांत दिसून येणारा जातीय कलुषितपणा.
काही काळानंतर माझ्या थोरल्या दोघा भावांनी कामाच्या शोधार्थ घर सोडले. त्यानंतर माझ्या वडलांनी आमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले. त्यामुळे माझ्या आईला आणि माझ्या धाकट्या बहिणीला मदतीचा हात म्हणून मला काम शोधावे लागले त्यावेळी मी अवघ्या नऊ वर्षांचा होतो. सुमारे १६ वर्षांनंतर, कारखान्यात माझ्यासोबतच्या कामगाराबरोबर केलेल्या संभाषणांमुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.
यहोवावरील विश्वास संपादणे
सन १९४२ मध्ये माझी आणि फरनॅन्डो तेलजची पहिल्यांदा गाठ पडली. “संतांची” उपासना करणे चुकीचे आहे, असे तो सारखा सांगत असे. (१ करिंथकर १०:१४; १ योहान ५:२१) सुरवातीला खरे तर मी त्याच्याकडे कानाडोळा करत होतो. परंतु त्याचा प्रांजळपणा तसेच रंगभेदाची कोणतीही तमा न बाळगता सर्व लोकांमधील त्याची आस्था पाहून मी आकर्षित झालो आणि बायबलच्या ज्ञानाविषयी, विशेषतः देवाचे राज्य आणि परादीस पृथ्वीबद्दल तो जे म्हणत होता त्याचे मला अप्रूप वाटू लागले. (यशया ९:६, ७; दानीएल २:४४; प्रकटीकरण २१:३, ४) माझ्यातील आस्था पाहून त्याने मला बायबल आणि बायबल आधारित काही साहित्य दिले.
काही आठवड्यांनंतर मी मंडळीच्या पुस्तक अभ्यासाचे निमंत्रण स्वीकारले. हा गट वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या धर्म (इंग्रजी) पुस्तकाचा अभ्यास करत होता. मला अभ्यास आवडला आणि मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व सभांना जाण्यास सुरवात केली. त्याठिकाणी कोणताही जातीय कलुषितपणा नव्हता आणि मला त्यांनी त्यांच्यात लगेच सामावून घेतले होते, यामुळे खरे तर मी प्रभावित झालो. एव्हाना मी लिंडॉराबरोबर प्रियाराधनास सुरवात केली होती. मी काय शिकत होतो हे तिला सांगितल्यानंतर ती देखील माझ्यासोबत सभांना येऊ लागली.
सभांमध्ये प्रचार कार्यावर देण्यात येणारा भर, या आणखी एका गोष्टीमुळे मी प्रभावित झालो. (मत्तय २४:१४; प्रेषितांची कृत्ये २०:२०) पूर्ण-वेळेच्या सेवकांनी अर्थात पायनियरांनी उत्तेजन दिल्यामुळे मी कामासाठी रेल्वेने ये-जा करताना लोकांशी अनौपचारिकरीत्या बोलण्यास सुरवात केली. मला कोणी आस्थेवाईक मिळाल्यास मी त्याचा पत्ता लिहून घेत असे आणि त्याची भेट घेऊन त्याची आस्था वाढविण्याचा प्रयत्न करीत होतो.
या काळाच्या दरम्यान यहोवावरील आणि तो उपयोगात आणत असलेल्या त्याच्या संघटनेवरील माझा विश्वास आणखी दृढ होत होता. अशा प्रकारे, ख्रिस्ती समर्पणावरील बायबल भाषण ऐकल्यानंतर मी एप्रिल १९, १९४३ रोजी अटलांटिक महासागरात बाप्तिस्मा घेतला. त्याच दिवशी नियमित घरोघरच्या सेवाकार्यात मी पहिल्यांदा सहभागी झालो.
दोन आठवड्यांनंतर, मे ५ रोजी मी लिंडॉराबरोबर विवाहबद्ध झालो. त्यानंतर, ऑगस्ट १९४३ मध्ये साल्वादोर शहरात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलनात तिने बाप्तिस्मा घेतला. या संमेलनाविषयी १९७३ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) याने असे म्हटले: “साल्वादोरमधील जाहीर भाषण थांबविण्यात पाळक चळवळीला शक्य झाले तरी . . . मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्याआधी त्यांना तसे करता आले नाही.” अतिशय छळामध्येही यहोवाच्या मार्गदर्शनाच्या पुराव्यामुळे त्याच्यावरील माझ्या विश्वासास बळकटी मिळाली.
मी सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, लिंडॉराच्या बाप्तिस्म्यानंतर केवळ दोन वर्षांनी—आणि आमच्या मुलाच्या मृत्यूच्या तीन महिन्यांनंतर—माझ्या पत्नीचा देहान्त झाला होता. ती फक्त २२ वर्षांची होती. परंतु यहोवावरील माझ्या विश्वासामुळे या कठीण महिन्यांत मला तग धरता आला.
आध्यात्मिक कार्यामुळे टिकलो
सन १९४६ मध्ये म्हणजे माझी पत्नी आणि माझा मुलगा वारल्यानंतर एका वर्षानी, साल्वादोरमध्ये असणाऱ्या मंडळीमध्ये बायबल अभ्यास सेवक म्हणून मला नियुक्त करण्यात आले. त्याच वर्षी ब्राझीलमधील मंडळ्यांत ईश्वरशासित सेवा प्रशाला सुरू करण्यात आली आणि मी बाहिया राज्यातील पहिला प्रशाला संचालक बनलो. त्यानंतर ऑक्टोबर १९४६ मध्ये साउ पाउलु शहरात “आनंदी राष्ट्रे” हे ईश्वरशासित संमेलन भरविण्यात आले होते. मी ज्या मालकाकडे दहा वर्षांपासून कामास होतो तो मला सोडण्यास तयार नव्हता आणि मी जाऊ नये म्हणून त्याने माझ्यावर दबाब सुद्धा आणला. तथापि, संमेलनाला जाणे माझ्यासाठी किती महत्त्वाचे असेल, हे त्याला सांगितल्यानंतर त्याने मला चांगली बक्षिसी दिली आणि प्रवास सुखाचा व्हावा म्हणून शुभेच्छा देखील.
संमेलनाचा कार्यक्रम साउ पाउलु शहराच्या नगरपालिका सभागृहात ब्राझीलच्या—पोर्तुगीज भाषेमध्ये—तसेच इंग्रजी, जर्मन, हंगेरियन, पोलिश आणि रशियन भाषेत संपन्न झाला. या संमेलनामध्ये पोर्तुगीज भाषेतील सावध राहा! नियतकालिक प्रसिद्ध करण्यात आले. जाहीर भाषणासाठी सुमारे १,७०० जण उपस्थित होते—या संमेलनामुळे मी इतका प्रेरित झालो—की नोव्हेंबर १, १९४६ पासून पायनियरींग सुरू करण्यासाठी मी अर्ज भरला.
त्यावेळी आम्ही आमच्या पायनियर कार्यात ग्रामोफोनचा मोठ्या प्रमाणात वापर करत असू. बहुतेक वेळा आम्ही “संरक्षण” नामक भाषण घरमालकाला ऐकवत होतो. त्यानंतर आम्ही म्हणत असू: “अदृश्य शत्रूपासून आपल्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला एका मित्राशी जडून राहिलं पाहिजं आणि हा मित्र देखील अदृश्य आहे. यहोवा हा आपला सर्वोत्तम मित्र आहे आणि आपल्या शत्रूपेक्षा अर्थात सैतानापेक्षा तो फार शक्तिमान आहे. त्यामुळे सैतानापासून आपल्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला यहोवाशी अगदी जडून राहिलं पाहिजं.” त्यानंतर पुढील माहिती देण्यासाठी आम्ही संरक्षण (इंग्रजी) ही पुस्तिका सादर करत असू.
मला पायनियरींग करून अजून एक वर्षही झाले नव्हते, की रीउ दे झानेइरू मधील कॉरिका मंडळीत खास पायनियर या नात्याने सेवा करण्याचे मला निमंत्रण मिळाले. तेथे आम्हाला काही वेळा कड्या विरोधास तोंड द्यावे लागले. इव्हान ब्रेनर या माझ्या साथीदारावर तर एकदा घरमालकाने हात देखील उचलला होता. आसपासच्या लोकांनी पोलिसांना बोलावले आणि आम्हा सर्वांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
प्रश्न विचारत असताना, संतापलेल्या घरमालकाने आमच्यावर शांतीचा भंग केल्याचा आरोप ठेवला. त्याने उगे राहावे म्हणून पोलिस अधिकारी त्याच्यावर खेकसला. त्यानंतर पोलिस अधिकारी आमच्याकडे आला आणि तुम्ही जाऊ शकता, असे त्याने आम्हाला सौम्य आवाजात सांगितले. आमच्यावर आरोप करणाऱ्यास त्याने ताब्यात घेतले आणि हल्ला केल्याच्या आरोप त्याच्यावर लावला. अशा प्रकारच्या परिस्थितींमुळे यहोवावरील माझा विश्वास दृढ झाला.
विस्तृत पूर्ण-वेळेचे सेवाकार्य
देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रमुख शाखा दफ्तरात अर्थात बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी जुलै १, १९४९ रोजी मला बोलविण्यात आले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. तेव्हा ब्राझीलमधील बेथेल, ३३० लिसिनियो कॉरदोसो स्ट्रीट रीउ दे झानेइरू या ठिकाणी वसलेले होते. त्यावेळी संपूर्ण बेथेल कुटुंबात केवळ १७ जण होते. काही काळापर्यंत मी स्थानिक इझेनो दा देन्ट्रो मंडळीत उपस्थित राहत होतो, परंतु त्यानंतर रीउ दे झानेइरू पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बेल्फोर रोझो शहरातील एकमेव मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून मला नियुक्त करण्यात आले.
सप्ताहांत फार गडबडीचे असायचे. मी शनिवारी, बेल्फोर रोझोला रेल्वेने जात असे, दुपारी क्षेत्र सेवेत भाग घेतल्यानंतर संध्याकाळी होणारी ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांसाठी मी उपस्थित राहत असे. त्या रात्री मी बांधवांकडेच राहत असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी क्षेत्र सेवेला जात होतो. दुपारी मी जाहीर बायबल भाषण तसेच टेहळणी बुरूज अभ्यासाला उपस्थित राहत असे आणि रात्री सुमारे साडेनऊ वाजता बेथेलला परत येत असे. आज बेल्फोर रोझोमध्ये १८ मंडळ्या आहेत.
साडेतीन वर्षांच्या या आराखड्यानंतर १९५४ मध्ये रीउ दे झानेइरू येथील साउ क्रिस्टाँ मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून मला पुन्हा एकवार नियुक्त करण्यात आले. पुढील दहा वर्षे मी या मंडळीसोबत सेवा केली.
माझ्या बेथेल नेमणुका
संस्थेची एकमेव मोटारगाडी ठेवण्याची जागा तयार करणे ही माझी बेथेलमधली पहिली नियुक्ती होती, ही मोटारगाडी म्हणजे १९४९ दॉज व्हॅन होती; तिचा रंग चॉकलेटी असल्यामुळे आम्ही तिला चॉकलेट हे टोपणनाव ठेवले होते. मोटार ठेवण्याची जागा तयार झाल्यानंतर स्वयंपाक घरात काम करण्यासाठी माझी नेमणूक करण्यात आली. या ठिकाणी मी तीन वर्षे काम केले. त्यानंतर मला जॉब प्रेस डिपार्टमेंटमध्ये हलविण्यात आले. आता या ठिकाणी काम करून मला ४० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
आमच्याकडील छपाईचे बहुतेक साहित्य दुहाती होते. उदाहरणार्थ, जुनी प्लेटन प्रेस आमच्याकडे अनेक वर्षे होती, प्रेमाने आम्ही तिला सारा हे अब्राहामाच्या पत्नीच्या नावाने संबोधित होतो. ब्रुकलिन, न्युयॉर्क येथील वॉच टावर सोसायटीच्या मुख्यालयाच्या कारखान्यात तिचा कित्येक वर्षे वापर करण्यात आला होता. या प्रेसला सन १९५० च्या दशकात ब्राझीलमध्ये पाठविण्यात आले. येथे अब्राहामाच्या पत्नीप्रमाणे या प्रेसने आपल्या वार्धक्याच्या काळात टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या स्वरूपात फळ उत्पादन केले.
ब्राझीलच्या छपाई कारखान्यात उत्पादन केलेल्या प्रकाशनांची संख्या पाहून मला प्रत्येक वेळी आश्चर्य वाटले आहे. सन १९५३ मध्ये आम्ही संपूर्ण वर्षाभरात ३,२४,४०० नियतकालिके छापली, परंतु आता दर महिन्याचे उत्पादन ३० लाखांपेक्षाही जास्त आहे!
आमच्या बेथेल सुविधा
ब्राझीलमधील आमच्या बेथेल सुविधांतील अनेक वर्षांदरम्यानची वाढ पाहणे रोमहर्षक राहिले आहे. रीउ दे झानेइरू मधील आमच्या बेथेल गृहाच्या मागील बाजूस १९५२ मध्ये आम्ही दुमजली कारखाना उभारला. त्यानंतर सन १९६८ मध्ये बेथेल, साउ पाउलु शहरातील नवीन इमारतीत हलविण्यात आले. आम्ही त्याठिकाणी गेलो तेव्हा ४२ सदस्यांच्या आमच्या बेथेल कुटुंबाला ती जागा मोठी आणि ऐसपैस वाटत होती. भवितव्यातील आमच्या सर्व वाढीची देखभाल करण्यास ही इमारत पुरेशी आहे, असा आम्ही खरोखरच विचार केला होता. तथापि, १९७१ मध्ये पाच मजल्यांच्या आणखी दोन इमारती उभारण्यात आल्या आणि नजीकचा कारखाना विकत घेण्यात आला व त्यात काही फेरफार करून तो या संकुलनास जोडण्यात आला. परंतु काही वर्षांतच राज्य घोषकांमध्ये सतत वाढ होत गेली—आम्ही १९७५ मध्ये १,००,००० ही संख्या पार केली होती—यामुळे ज्यादा जागेची गरज भासली.
यास्तव, साउ पाउलु पासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या सेझारिओ लाँज नामक छोट्याशा शहराजवळ नवीन इमारत संकुलन बांधण्यात आले. सन १९८० मध्ये १७० जणांचे आमचे बेथेल कुटुंब या नवीन ठिकाणी हलविण्यात आले. तेव्हापासून राज्य कार्यामध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये आम्ही आता ४,१०,००० पेक्षा अधिक जण प्रचार कार्यात नियमितपणे भाग घेतो! या राज्य घोषकांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेण्यासाठी आम्हाला बायबल साहित्याच्या छपाईसाठी नवीन कारखाने आणि बेथेल स्वयंसेवकांच्या निवासासाठी निवासी इमारती उभाराव्या लागल्या. आता आमच्या बेथेल कुटुंबात सुमारे १,१०० सदस्य आहेत!
विशेषाधिकारांचे मोल
मी बेथेल सेवेला मोलवान विशेषाधिकार समजतो. मी सुरवातीला पुन्हा विवाह करण्याचा विचार केला होता तरी नंतर मी बेथेलमधील आणि प्रचार कार्यातील माझ्या विशेषाधिकारांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचे निवडले. छपाई कारखान्यातील अनेक युवकांसोबत काम करण्यात आणि त्यांना त्यांच्या नियुक्तींचे प्रशिक्षण देण्यात मला आनंद मिळाला आहे. माझ्या स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांच्याशी वागण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यांचा आवेश आणि निःस्वार्थपणा माझ्यासाठी उत्तेजनाचा मोठा स्रोत राहिला आहे.
अनेक वर्षांच्या दरम्यान कित्येक उत्तम रूममेटच्या सोबतीच्या विशेषाधिराचा मी आनंद घेत आलो आहे. हे खरे आहे, की काही वेळा व्यक्तिमत्त्वातील विभिन्नता आव्हान म्हणून सामोऱ्या आल्या. तथापि, इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू नये, हे मी शिकलो. राईचा पर्वत न करण्याचा आणि स्वतःस अधिक महत्त्व न देण्याचा मी प्रयत्न केला आहे. स्वतःच्या चुकांवर हसल्यामुळे इतरांच्या चुका सहन करण्यास मला मदत मिळाली आहे.
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अधिवेशनांस उपस्थित राहण्यास मिळण्याच्या आणखी एका विशेषाधिकाराचा मी आनंद घेतला. यांपैकी “सार्वकालिक सुवार्ता” हे अधिवेशन सन १९६३ मध्ये न्युयॉर्कमधील यांकी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते आणि दुसरे “पृथ्वीवर शांती” हे आंतरराष्ट्रीय संमेलन सन १९६९ मध्ये त्याच ठिकाणी भरविण्यात आले होते. याचे औचित्य साधून ब्रुकलिन न्युयॉर्कमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाला भेट दिल्याचे मला समाधान लाभले!
दहा वर्षांपर्यंत वडिलांसोबत आळीपाळीने बेथेल कुटुंबाच्या प्रातः उपासनेची अध्यक्षता करण्यात सहभाग घेणे, हा देखील माझ्याकरता एक विशेषाधिकार होता. तथापि, सर्वात महान विशेषाधिकार ज्यामुळे मला खूप आनंद आणि उत्तेजन मिळाले तो विशेषाधिकार म्हणजे प्रामाणिक लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोहंचवणे आणि आपल्या गुरुने अर्थात येशू ख्रिस्ताने देखील हे काम केले.
अलीकडच्या वर्षांमध्ये अर्धांगवायुमुळे जगणे मुश्किलीचे होऊन बसले आहे. बेथेल इस्पितळातील बांधवांची आणि बहिणींची प्रेमळ काळजी माझ्यासाठी नियमित मदतीचा आणि सांत्वनाचा स्रोत राहिली आहे. पूर्ण विश्वासाने मी यहोवाला प्रार्थना करतो, की त्याच्या खऱ्या उपासनेसाठी माझ्या परीने मला जे करता येईल ते करण्यासाठी त्याने मला शक्ती द्यावी.
[२३ पानांवरील चित्र]
सध्या मी जेथे राहतो ती ब्राझील शाखा
[२३ पानांवरील चित्र]
माझ्या पत्नीसोबत, जी सन १९४५ मध्ये मरण पावली