“त्याला पाहिले नसताहि तुम्ही त्याच्यावर प्रीति करता”
“त्याला पाहिले नसताहि तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. आता जरी त्याला तुम्ही पाहत नाही, तरी त्याच्यावर विश्वास ठेवीत तुम्ही . . . आनंदाने उल्लासता.”—१ पेत्र १:८, ९, पं.र.भा.
१. आज पृथ्वीवरील कोणीही येशूला पाहिले नाही तरी, काही धार्मिक लोक त्याच्याबद्दलची भक्ती कशी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात?
आज पृथ्वीवर हयात असलेल्या कोणीही येशू ख्रिस्ताला पाहिलेले नाही. तरीसुद्धा कोट्यवधी लोक त्याच्यावर प्रीती असल्याचा दावा करतात. दर वर्षी जानेवारी ९ रोजी, फिलिपाईन्सच्या मनीला येथे, वधस्तंभ घेतलेल्या येशू ख्रिस्ताची पूर्ण आकाराची मूर्ती रस्त्यांवरून वाहून नेली जाते. देशातील लोकप्रिय धर्माचे सर्वात भव्य, सर्वात थाटामाटाचे प्रदर्शन असे त्याचे वर्णन केले जाते. उत्साही समूह पुढे ढकलत व रेटत असतो; लोक इतके भ्रमिष्ट झालेले असतात की त्या मूर्तीला हात लावण्याच्या प्रयत्नात ते एकमेकांवरही चढतात. हा सोहळा पाहण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्यांना फक्त तेथील आनंदी मिरवणूक जास्त आकर्षक वाटते. पण, काही लोक प्रांजळपणे येशूकडे आकर्षित होतात यात काही शंका नाही. याचा पुरावा म्हणून ते गळ्यात क्रूसाची लहानशी मूर्ती वागवतील अथवा नियमितरीत्या कदाचित चर्चलाही जातील. परंतु, अशा प्रकारच्या मूर्तिपूजेला खरी उपासना म्हणता येईल का?
२, ३. (अ) येशूच्या अनुयायांपैकी खरे पाहता कोणी त्याला पाहिले व त्याचे बोलणे ऐकले? (ब) पहिल्या शतकातील आणखी कोणी त्याला व्यक्तिगतरीत्या पाहिले नसले तरी त्याच्यावर प्रेम केले व त्याच्यावर विश्वास ठेवला?
२ पहिल्या शतकात, यहुदा, शोमरोन, पेरिआ व गालील या सारख्या रोमी प्रांतांतील हजारो लोक होते ज्यांनी व्यक्तिगतरीत्या येशू ख्रिस्ताला पाहिले व त्याचे बोलणे ऐकले होते. देवाच्या राज्याबद्दलच्या सांत्वनदायक सत्यांचे स्पष्टीकरण देत असताना त्यांनी त्याचे ऐकले. त्याने केलेल्या चमत्कारांचे ते साक्षीदार होते. यातील काही त्याचे समर्पित शिष्य झाले, तो ‘ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र’ असल्याची त्यांना खात्री पटली होती. (मत्तय १६:१६) परंतु प्रेषित पेत्राने ज्यांना त्याचे पहिले प्रेरित पत्र लिहिले ते लोक यांपैकी झाले नव्हते.
३ पेत्राने ज्या लोकांना संबोधून लिहिले ते पंत, गलतिया, कप्पादुकिया, आशिया व बिथुनिया या रोमी प्रांतांत राहणारे होते. ही ठिकाणे आधुनिक दिवसाच्या तुर्कूच्या क्षेत्रातील आहेत. पेत्राने त्यांना लिहिले: “त्याला पाहिले नसताहि तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. आता जरी त्याला तुम्ही पाहत नाही, तरी त्याच्यावर विश्वास ठेवीत तुम्ही अनिर्वाच्य व गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.” (१ पेत्र १:१, ८, ९, पं.र.भा.) येशू ख्रिस्तावर प्रेम करण्यापर्यंत व त्याच्यावर विश्वास ठेवण्यापर्यंत त्यांनी त्याला कशाप्रकारे ओळखले होते?
४, ५. येशूला कधीही न पाहिलेल्या लोकांनी कशाप्रकारे त्याच्यावर प्रेम करण्याबद्दल व त्याच्यावर विश्वास ठेवण्याबद्दल पुरेशा गोष्टी शिकून घेतल्या?
४ स्पष्टपणे, सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या सणाच्या दिवशी उपस्थित असलेल्या लोकसमुदायाला प्रेषित पेत्राने साक्ष दिली तेव्हा काही जण जेरुसलेममध्ये होते. पुष्कळ शिष्य सणानंतर प्रेषितांकडून आणखी प्रशिक्षण मिळण्याकरता जेरुसलेमेतच राहिले. (प्रेषितांची कृत्ये २:९, ४१, ४२; पडताळा १ पेत्र १:१.) वारंवारच्या मिशनरी दौऱ्यांमध्ये, प्रेषित पौलाने आपली आवेशी सेवा, पेत्राने बायबलमधील आपल्या नावाचे पहिले पत्र ज्या लोकांना पाठवले ते लोक ज्या क्षेत्रात राहत होते तेथेही चालू ठेवली.—प्रेषितांची कृत्ये १८:२३; १९:१०; गलतीकर १:१, २.
५ येशूला कधीही न पाहिलेले लोक त्याच्याकडे इतके का आकर्षित झाले होते? आपल्या दिवसांमध्ये संपूर्ण विश्वात कोट्यवधी लोक त्याच्यावर सखोल प्रीती का करतात?
त्यांनी पाहिलेल्या गोष्टी
६. (अ) सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट दिवशी पेत्राला साक्ष देताना तुम्ही ऐकले असते तर तुम्ही काय शिकला असता? (ब) याचा सुमारे ३,००० उपस्थित असलेल्यांवर कसा प्रभाव पडला?
६ सा. यु. ३३ च्या सणाच्या दिवशी पेत्राने त्या समूहाला जे सांगितले त्यावेळी तुम्ही जेरुसलेममध्ये असता तर येशूबद्दल तुम्ही काय शिकला असता? निःसंशये, त्याने केलेल्या चमत्कारांनी दाखवून दिले की त्याला देवाने पाठवले होते. पापी मानवांनी येशूला ठार मारले तरी तो कबरेत राहिला नव्हता तर त्याचे पुनरुत्थान झाले होते व त्याला स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे बसवून उंचावण्यात आले होते. संदेष्ट्यांनी ज्याच्याविषयी लिहिले तो येशू खरोखरच ख्रिस्त मशीहा होता. येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्यात आला होता जेणेकरून ते लागलीच, अनेक राष्ट्रांतील लोकांना देव आपल्या पुत्राकरवी ज्या उत्तम गोष्टी करवून घेत होता त्यांची साक्ष देऊ शकत होते. त्या प्रसंगी पेत्राचे भाषण ऐकलेल्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि सुमारे ३,००० जणांनी ख्रिस्ती शिष्य या नात्याने बाप्तिस्मा घेतला. (प्रेषितांची कृत्ये २:१४-४२) तुम्ही तेथे असता तर अशा प्रकारचे निर्णायक पाऊल तुम्हीही उचलले असते का?
७. (अ) प्रेषित पौलाने अंतुखियामध्ये प्रचार केला तेव्हा तुम्ही तेथे असता तर तुम्ही कदाचित काय शिकला असता? (ब) समूहातील काही जणांनी विश्वासू बनून इतरांना सुवार्तेचा प्रचार करण्यात भाग का घेतला?
७ गलतियाच्या रोमी प्रांतातील अंतुखियात प्रेषित पौलाने ज्या लोकांना शिकवले त्या लोकांमध्ये तुम्हीही उपस्थित असता तर येशूबद्दल तुम्ही आणखी काय शिकला असता? जेरुसलेममधील शासकांद्वारे येशूच्या मृत्युदंडाविषयी संदेष्ट्यांनी भाकीत केले होते याचे स्पष्टीकरण तुम्ही पौलाकडून ऐकले असते. तुम्ही येशूच्या पुनरुत्थानाच्या प्रत्यक्ष साक्षीदारांच्या पुराव्याबद्दलही ऐकले असते. मृतांमधून येशूचे पुनरुत्थान करण्याद्वारे यहोवाने, हा खरोखरच देवाचा पुत्र असल्याची पुष्टी दिली होती, याविषयी पौलाचे स्पष्टीकरण ऐकून तुमच्यावर नक्कीच प्रभाव पडला असता. शिवाय, येशूवरील विश्वासामुळे आपल्या पापांची क्षमा होऊन आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणे शक्य झाल्याचे तुम्ही शिकला असता तेव्हा तुमच्या हृदयात प्रेमभावना उत्पन्न झाली नसती का? (प्रेषितांची कृत्ये १३:१६-४१, ४६, ४७; रोमकर १:४) अंतुखियातील काही जण, ते जे काही ऐकत होते त्याचे महत्त्व जाणल्यामुळे शिष्य बनले, सुवार्तेचा प्रचार करण्याचा अर्थ त्यांना तीव्र छळाचा सामना करावा लागणार होता असा होत असला तरीसुद्धा, त्यांनी इतरांना सुवार्ता सांगण्यात सक्रिय भाग घेतला.—प्रेषितांची कृत्ये १३:४२, ४३, ४८-५२; १४:१-७, २१-२३.
८. पौलाचे पत्र इफिस मंडळीला मिळाले तेव्हा तुम्ही तेथे असता तर तुम्ही काय शिकला असता?
८ इफिस या आशियाच्या रोमी प्रांतातील शिष्यांकरता पौलाने लिहिलेले प्रेरित पत्र त्यांना मिळाले तेव्हा तुम्ही त्या ख्रिस्ती मंडळीशी सहवास राखून असता तर? देवाच्या उद्देशामधील येशूच्या भूमिकेविषयी तुम्ही काय शिकू शकला असता? पौलाने त्या पत्रात, स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी ख्रिस्ताद्वारे देवाच्या एकवाक्यतेत आणल्या जातील, ख्रिस्ताद्वारे देवाचे दान सर्व राष्ट्रांतील लोकांना देण्यात येते, जे लोक त्यांच्या चुकांमुळे देवाच्या नजरेत मृत होते त्यांना येशूवरील विश्वासाद्वारे जिवंत करण्यात येते व या तरतुदीमुळे मानवांना पुन्हा एकदा देवाचे प्रिय पुत्र बनणे शक्य होते, या गोष्टींचे विवरण दिले.—इफिसकर १:१, ५-१०; २:४, ५, ११-१३.
९. (अ) पौलाने इफिसकरांना जे लिहिले त्याचा अर्थ तुम्ही व्यक्तिगतपणे ग्रहण केला आहे की नाही हे समजण्यास तुम्हाला काय मदत करू शकते? (ब) पेत्राने उल्लेखलेल्या रोमी प्रांतातील बांधवांवर ते येशूबद्दल जे काही शिकत होते त्याचा कसा प्रभाव पडला?
९ या सर्व गोष्टींबद्दलच्या तुमच्या कृतज्ञतेने देवाच्या पुत्राबद्दलच्या तुमच्या प्रीतीला आणखी गाढ केले असते का? प्रेषित पौलाने इफिसकराच्या ४ ते ६ अध्यायांमध्ये जे उत्तेजन दिले आहे त्यानुसार त्या प्रीतीने तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पाडला असता का? त्या कृतज्ञतेने तुम्हाला, तुमच्या जीवनातील प्राथमिकतांचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास प्रवृत्त केले असते का? देवाबद्दलच्या प्रीतीमुळे व त्याच्या पुत्राबद्दलच्या कृतज्ञतेमुळे तुम्ही आवश्यक बदल केले असते का जेणेकरून देवाची इच्छा आचरणे खरोखर तुमच्या जीवनातील केंद्रबिंदू असला असता? (इफिसकर ५:१५-१७) आशिया, गलतिया आणि इतर रोमी प्रांतांतील ख्रिश्चनांनी शिकलेल्या गोष्टींचा त्यांच्यावर जसा परिणाम झाला होता त्या संबंधाने प्रेषित पेत्राने त्यांना लिहिले: “[येशू ख्रिस्ताला] पाहिले नसताहि त्याच्यावर तुम्ही प्रीति करता; . . . त्याच्यावर विश्वास ठेवीत तुम्ही अनिर्वाच्य व गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.”—१ पेत्र १:८, ९, पं.र.भा.
१०. (अ) कोणत्या गोष्टीने आरंभीच्या ख्रिश्चनांच्या येशूबद्दलच्या प्रीतीला निःशंकपणे हातभार लावला? (ब) आपल्याला देखील त्याचा कसा लाभ होऊ शकतो?
१० यात काही शंका नाही, की देवाच्या पुत्राच्या प्रीतीला हातभार लावणारे आणखी दुसरे काही तरी होते ज्याची जाणीव पेत्र ज्यांच्याशी बोलला त्या आरंभिक ख्रिश्चनांना झाली. ते काय होते? पेत्राने आपले पहिले पत्र लिहिले तोपर्यंत, निदान दोन शुभवर्तमान—मत्तय आणि लूक—आधीच प्रचलित झाले होते. येशूला न पाहिलेले पहिल्या शतकातील ख्रिश्चन हे शुभवर्तमान अहवाल वाचू शकत होते. आपणही वाचू शकतो. शुभवर्तमान कल्पनामय अहवाल नाहीत; त्यामध्ये सर्वात विश्वसनीय इतिहासाचे सर्व वैशिष्ट्ये आहेत. देवाच्या पुत्राबद्दलची आपली प्रीती गाढ बनवणाऱ्या पुष्कळ गोष्टी त्या प्रेरित अहवालांमध्ये आहेत.
त्याने दाखवलेली भावना
११, १२. येशूने इतर मानवांबद्दल दाखवलेल्या भावनेत असे काय आहे जे तुम्हाला त्याच्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त करते?
११ येशूच्या जीवनाच्या लिखित अहवालातून, त्याने इतरांबरोबर कसा व्यवहार केला ते आपण शिकतो. त्याने दाखवलेली भावना, त्याचा मृत्यू होऊन १,९६० पेक्षा अधिक वर्षे उलटले असले तरी अजूनही लोकांच्या अंतःकरणास भिडते. जिवंत असलेल्या सर्वांवर पापाच्या परिणामाचे ओझे आहे. कोट्यवधी लोक अन्यायाला बळी पडले आहेत, आजारपणासोबत झगडत आहेत किंवा इतर कारणांमुळे त्यांना निराशेने ग्रासले आहे असे वाटते. या सर्वांना येशू म्हणतो: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.
१२ येशूने गरिबांबद्दल, भुकेलेल्यांबद्दल व विलाप करणाऱ्यांबद्दल संवेदनशील चिंता व्यक्त केली. आवश्यक परिस्थितीत तर त्याने चमत्कारिकरीत्या मोठ्या समूहाला खाऊही घातले. (लूक ९:१२-१७) त्याने त्यांना गुलामी परंपरांपासून मुक्त केले. राजनैतिक व आर्थिक जुलमाचा अंत करण्याकरता देवाच्या तरतुदीवर त्यांचा विश्वास देखील वाढवला. आधीच खिन्न झालेल्यांच्या भावना येशूने दाबून टाकल्या नाहीत. कोमलतेने व प्रेमाने त्याने लीन जनांची कुशलरीत्या उभारणी केली. मोडलेल्या व चेपलेल्या बोरूप्रमाणे झालेल्या व विझण्याच्या बेतात असलेल्या मिणमिणत्या वातीप्रमाणे झालेल्या लोकांना त्याने ताजेतवाने केले. तेव्हापासून आजपर्यंत त्याचे नाव, ज्यांनी त्याला पाहिले नाही अशांच्याही अंतःकरणात आशा प्रेरित करते.—मत्तय १२:१५-२१; १५:३-१०.
१३. येशूने पापी लोकांसोबत जसा व्यवहार केला त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित का झाले?
१३ येशूने अपराधाला मान्यता दिली नाही, पण आपल्या जीवनात ज्यांनी पाप केले व पश्चात्ताप प्रकट करून त्याच्याकडे मदतीला आले अशा लोकांबद्दल त्याने समजूतदारपणा दाखवला. (लूक ७:३६-५०) समाजाने धिक्कारलेल्या लोकांना, आध्यात्मिकरीत्या मदत करण्याची संधी मिळेल असे त्याला वाटले तर तो त्यांच्यासोबत बसून जेवत असे. (मत्तय ९:९-१३) त्याने दाखवलेल्या या भावनेमुळे, अशाच परिस्थितीत असलेले व येशूला कधीही न पाहिलेले कोट्यवधी लोक त्याच्याबद्दल जाणून घेण्यास व त्याच्यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त झाले आहेत.
१४. येशूने आजारी, अपंग किंवा शोक करणाऱ्यांना ज्या मार्गाने मदत केली त्याबद्दल तुम्हाला काय अपीलकारक वाटते?
१४ आजारी किंवा अपंगांसोबत येशूने जसा व्यवहार केला त्यावरून त्याच्या प्रेमळपणाचा व दयेचा तसेच त्यांना मुक्तता देण्याच्या त्याच्या क्षमतेचा पुरावा मिळतो. म्हणूनच, कुष्ठरोग झालेला एक मनुष्य येशूकडे येऊन मदतीची याचना करतो तेव्हा येशू त्याच्याकडे पाहून मागे फिरला नाही. शिवाय त्याने त्या मनुष्याला असेही म्हटले नाही, की त्याला त्याच्यावर दया येत असली तरी त्याचा आजार इतका बळावला होता की तो त्याला आता काहीच मदत करू शकत नाही. तो मनुष्य काकुळतीने म्हणाला: “प्रभुजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” येशूने कुचराई न करता लगेचच हात पुढे करून त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” (मत्तय ८:२, ३) दुसऱ्या एके प्रसंगी एका स्त्रीने त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला गपचुप स्पर्श करून बरे होण्याचा प्रयत्न केला. येशू तिच्यासोबत दयाळूपणे व सांत्वनपर पद्धतीने वागला. (लूक ८:४३-४८) तसेच, त्याच्यासमोरून एक प्रेतयात्रा चालली होती तेव्हा, मरण पावलेल्या आपल्या एकुलत्या एका पुत्राबद्दल शोक करणाऱ्या विधवेची त्याला दया आली. स्वतःला चमत्कारिकपणे अन्न पुरवण्यासाठी देव-प्रदत्त शक्तीचा उपयोग करण्यास येशूने नकार दिला असला तरी, त्या मृत मनुष्याला पुनरुत्थित करून त्याला आपल्या मातेस पुन्हा सोपवण्याकरता त्याने त्या शक्तीचा मुक्तपणे उपयोग केला.—लूक ४:२-४; ७:११-१६.
१५. येशूविषयीचे अहवाल वाचण्याद्वारे व त्यावर मनन करण्याद्वारे तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?
१५ आपण हे अहवाल वाचून येशूने दाखवलेल्या भावनेवर मनन करतो तेव्हा, आपल्याला चिरकालासाठी जगता येऊ शकेल या कारणासाठी ज्याने स्वतःचे मानवी जीवन बहाल केले त्याच्याबद्दलची आपली प्रीती आणखी गाढ होते. आपण त्याला कधीही पाहिले नसले तरी त्याच्याकडे आकर्षित होतो व त्याच्या पावलांचे अनुकरण करू इच्छितो.—१ पेत्र २:२१.
देवावरील त्याचा नम्र भरवसा
१६. येशूने कोणावर प्रमुख लक्ष केंद्रित केले व त्याने आपल्याला काय करण्याचे उत्तेजन दिले?
१६ या सर्वांहून अधिक, येशूने स्वतःचे आणि आपले लक्ष त्याचा स्वर्गीय पिता, यहोवा देवाकडे केंद्रित केले. नियमशास्त्रातील सर्वात महान आज्ञेची ओळख त्याने असे म्हणून दिली: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३६, ३७) त्याने आपल्या शिष्यांना सल्ला दिला: “देवावर विश्वास ठेवा.” (मार्क ११:२२) त्यांच्यासमोर विश्वासाची गंभीर परीक्षा उभी राहिली तेव्हा त्याने त्यांना आर्जवले: “प्रार्थना करा.”—मत्तय २६:४१.
१७, १८. (अ) येशूने आपल्या पित्यावरील नम्र भरवसा कसा प्रदर्शित केला? (ब) त्याने जे केले ते आपल्याकरता महत्त्वाचे का आहे?
१७ स्वतः येशूने एक उदाहरण मांडले. प्रार्थना त्याच्या जीवनाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग होती. (मत्तय १४:२३; लूक ९:२८; १८:१) पूर्वी, स्वर्गातील सर्व देवदूत येशूच्या देखरेखीखाली होते, पण आपल्या प्रेषितांची निवड करण्याची वेळ आली तेव्हा, तो स्वतःच्याच निर्णयशक्तीवर विसंबून राहिला नाही. आपल्या पित्याला प्रार्थना करण्यासाठी त्याने नम्रपणे संपूर्ण रात्र घालवली. (लूक ६:१२, १३) येशूला अटक करण्यात आली व यातनामय मृत्यू सोसावा लागला तेव्हाही त्याने आपल्या पित्याला कळकळीने प्रार्थना केली. मी सैतानाला चांगल्या प्रकारे ओळखतो व त्या दुष्टाने माझ्याविरुद्ध काहीही योजिले तरी मी त्याला सहजपणे हाताळू शकतो असा दृष्टिकोन त्याने बाळगला नाही. येशूने हे जाणले होते, की त्याने अपयशी न होणे केवढे महत्त्वपूर्ण होते. येशू अपयशी झाला असता तर त्याच्या पित्याला केवढा मोठा कलंक लागला असता! शिवाय, येशू जे बलिदान देणार होता त्यावर आपल्या आशा आधारित असलेल्या मानवजातीची केवढी मोठी हानी झाली असती!
१८ येशूने, जेरुसलेम येथील एका माडीवरील खोलीत आपल्या शिष्यांसोबत असताना वारंवार प्रार्थना केल्या आणि गेथशेमाने बागेत तर आणखीनच कळकळीने प्रार्थना केली. (मत्तय २६:३६-४४; योहान १७:१-२६; इब्री लोकांस ५:७) वधस्तंभावर यातना सहन करत असताना, त्याला टोमणे मारणाऱ्यांची त्याने निंदा केली नाही. उलट, अजाणतेत कार्य करणाऱ्यांसाठी त्याने अशी प्रार्थना केली: “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही.” (लूक २३:३४) त्याने आपले ध्यान पित्यावर केंद्रित ठेवले, “यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले.” येशूने वधस्तंभावर असताना उद्गारलेले अखेरचे शब्द म्हणजे त्याने आपल्या पित्याला केलेली प्रार्थना होती. (१ पेत्र २:२३; लूक २३:४६) यहोवावर पूर्णपणे विसंबून राहून येशूने, त्याच्या पित्याने त्याच्यावर सोपवलेली नेमणूक विश्वासूपणे पार पाडली याबद्दल आपण किती ऋणी आहोत! आपण येशू ख्रिस्ताला पाहिले नसले तरी, त्याने जे केले त्याबद्दल आपण त्याच्यावर केवढे गाढ प्रेम करतो!
त्याच्याबद्दलची आपली प्रीती व्यक्त करणे
१९. येशूबद्दल प्रीती व्यक्त करताना, पूर्णपणे अनुचित असलेल्या कोणत्या प्रथा आपण टाळू?
१९ आपण ज्या प्रीतीचा दावा करतो ती प्रीती निव्वळ शब्दांपेक्षा कितीतरी अधिक आहे याचा पुरावा आपण कसा देऊ शकतो? येशूने ज्याच्यावर प्रेम केले त्या पित्याने, मूर्त्या बनवून त्यांना उपासनेची प्रतीके मानण्यास मनाई केल्यामुळे, अशाप्रकारची लहान मूर्ती गळ्यातील साखळीत अडकवण्याद्वारे किंवा रस्त्यावर वागवत नेण्याद्वारे आपण येशूचा मुळीच आदर करणार नाही. (निर्गम २०:४, ५; योहान ४:२४) आपण आठवड्यातून अनेकवेळा धार्मिक सेवांना उपस्थित राहत असलो पण आठवड्याच्या इतर दिवशी त्याच्या शिकवणुकींनुसार जगत नसलो तर त्यामुळे येशूचा सन्मान होणार नाही. येशूने म्हटले: “ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीति करितो त्याच्यावर माझा पिता प्रीति करील.”—योहान १४:२१, २३; १५:१०.
२०. आपण खरोखरच येशूवर प्रेम करतो की नाही हे कोणत्या गोष्टी दाखवून देतील?
२० त्याने आपल्याला कोणत्या आज्ञा दिल्या? सर्वात पहिली, खऱ्या देवाची, अर्थात यहोवाची आणि केवळ त्याचीच उपासना करण्याची आज्ञा त्याने दिली. (मत्तय ४:१०; योहान १७:३) देवाच्या उद्देशांतील येशूच्या भूमिकेमुळे त्याने आपल्याला, आपण त्याच्यावर देवाचा पुत्र यानात्याने विश्वास ठेवण्यास व हे, दुष्ट कार्ये टाळण्याद्वारे व प्रकाशात चालण्याद्वारे दाखवावे असे शिकवले. (योहान ३:१६-२१) त्याने आपल्याला, पहिल्याने देवाचे राज्य आणि त्याच्या नीतिमत्वाचा शोध घेण्यास, शारीरिक गरजांविषयीच्या चिंतेआधी यांची चिंता करण्याचा सल्ला दिला. (मत्तय ६:३१-३३) त्याने आपल्यावर प्रेम केले त्याप्रमाणे आपणही इतरांवर प्रेम करावे अशी आज्ञा दिली. (योहान १३:३४; १ पेत्र १:२२) शिवाय त्याच्यासारखे आपणही देवाच्या उद्देशासंबंधाने साक्षीदार व्हावे अशी आज्ञा त्याने आपल्याला दिली. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; प्रकटीकरण ३:१४) सुमारे ५० लाख यहोवाच्या साक्षीदारांनी येशूला पाहिले नाही तरीसुद्धा त्याच्यावरील खऱ्या प्रीतीमुळे ते त्याच्या आज्ञा पाळण्यास प्रवृत्त होतात. त्यांनी येशूला व्यक्तिगतपणे पाहिलेले नसले तरी यामुळे आज्ञाधारक राहण्याचा त्यांचा दृढनिश्चय कमजोर होत नाही. प्रेषित थोमाला त्यांच्या प्रभूने काय म्हटले त्याची ते आठवण करतात: ‘तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवलास? पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.’—योहान २०:२९.
२१. या वर्षी, रविवारी मार्च २३ रोजी होणाऱ्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहिल्याने आपल्याला कसा लाभ मिळतो?
२१ मानवजातीबद्दल देवाच्या प्रीतीच्या सर्वात महान वक्तव्याचे स्मरण करण्यासाठी व त्याचा एकनिष्ठ पुत्र येशू ख्रिस्त याच्या मृत्यूचा स्मरणोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण विश्वभरात रविवार, मार्च २३, १९९७ रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहांमध्ये एकत्र होणाऱ्या लोकांपैकी तुम्हीही असाल अशी आशा केली जाते. त्या प्रसंगी जे काही सांगितले व केले जाणार आहे त्यामुळे यहोवा आणि त्याचा पुत्र या दोघांबद्दलचे आपले प्रेम गाढ व्हावे व देवाच्या आज्ञा पाळण्याची इच्छा वाढावी.—१ योहान ५:३.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ पेत्राचे पहिले पुस्तक ज्यांना उद्देशून लिहिण्यात आले होते त्यांनी कशाप्रकारे येशूला ओळखून त्याच्यावर प्रेम केले?
◻ आरंभीच्या ख्रिश्चनांनी ऐकलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रभावित करतात?
◻ येशूने दाखवलेल्या भावनेत असे काय आहे जे त्याच्याबद्दल तुम्हाला असलेले प्रेम आणखी गाढ बनवते?
◻ येशूचा देवावरील नम्र भरवसा आपल्याकरता अधिक महत्त्वाचा का आहे?
◻ आपण येशू ख्रिस्ताबद्दल प्रीती कशी प्रदर्शित करू शकतो?
[१६, १७ पानांवरील चित्र]
येशूने दाखवलेल्या भावनेमुळे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो