काहीतरी अधिक चांगल्या गोष्टीसाठी पुष्कळ काही त्यागणे
ज्युलिअस ओवो बेलो यांच्याद्वारे कथित
मी ३२ वर्षांपर्यंत आलाड्रा म्हणून काम करत होतो.a विश्वासाने बरे करणे आणि प्रार्थना यांमुळे माझ्या सर्व समस्या सुटतील तसेच माझे सर्व आजार बरे होतील असा माझा विश्वास होता. मी कधीही औषधे विकत घेतली नाहीत किंवा वेदनाक्षामक घेण्याचीही मला गरज पडली नाही. त्या दिवसांत माझ्या कुटुंबातील एकाला सुद्धा इस्पितळात एकदाही दाखल करण्यात आले नव्हते. ज्या ज्यावेळी माझी मुले आजारी पडत असत त्या त्यावेळी ती आजारातून बरी होईपर्यंत मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करत असे. देव माझ्या प्रार्थनांचे उत्तर देत असल्याचे तसेच मला आशीर्वादित करत असल्याचे मला वाटत होते.
पश्चिम नायजेरियाच्या ऑक्युर शहरातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या इग्बे जॉली नामक सामाजिक क्लबचा मी सभासद होतो. माझे मित्र गर्भश्रीमंत असून त्यांचे आमच्या समाजात वजन होते. ऑक्युरचा राजा दिजे याचे माझ्या घरी उठणेबसणे होते.
मी बहुपत्नीक होतो ज्यांत सहा पत्नी आणि मी ठेवलेल्या अनेक स्त्रिया होत्या. माझ्या व्यापाराचीही भरभराट होत होती. माझ्या मते सर्वकाही कसे व्यवस्थित चालले होते. तथापि, येशूने दिलेल्या मोत्याच्या दृष्टान्तातील व्यापाऱ्याप्रमाणे, मला असे काही अगदी मूल्यवान गवसले आणि त्याच्या मोबदल्यात मी माझ्या पाच पत्नी, मी ठेवलेल्या स्त्रिया, चर्च, सामाजिक क्लब आणि जगिक मोठेपण या सर्व बाबींचा त्याग केला.—मत्तय १३:४५, ४६.
मी आलाड्रा कसा झालो
मी आलाड्राबद्दल १९३६ मध्ये पहिल्यांदा ऐकले तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. माझ्या गेब्रिएल नामक मित्राने मला सांगितले: “तू क्राइस्ट अपोस्टोलिक चर्चला गेल्यास तुला तिथं देव बोलत असल्याचं ऐकू येईल.”
“देव कसा बोलतो?” मी विचारले.
त्याने म्हटले: “तूच येऊन प्रत्यक्ष पाहा.”
देवाचे बोलणे ऐकण्यास मी अधीर झालो होतो. त्यामुळे त्या रात्री मी गेब्रिएलसोबत चर्चमध्ये गेलो. उपासकांनी भरलेली ती एक छोटीशी इमारत होती. “लोकहो तुम्ही या! इथं येशू आहे!” असे पुनःपुन्हा म्हणण्यास या मंडळीने सुरवात केली.
असे वारंवार म्हणत असताना कोणीतरी मध्येच ओरडले: “हे पवित्र आत्म्या खाली ये!” कोणीतरी घंटा वाजवली आणि मंडळीमध्ये शांतता पसरली. त्यानंतर एका स्त्रीने उत्तेजित होऊन विचित्र भाषेत पुटपुटण्यास सुरवात केली. अनपेक्षितपणे ती ओरडली: “लोकहो, तुम्ही देवाचा संदेश ऐका! देवाने असे म्हटले आहे: ‘शिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा जेणेकरून ते मानवांची हत्या करणार नाहीत!’” संपूर्ण वातावरण भावनामय झाले होते.
देव तिच्याद्वारे बोलला असे मला वाटले आणि म्हणून मी त्यानंतरच्याच वर्षी बाप्तिस्मा घेऊन क्राइस्ट अपोस्टोलिक चर्चचा सभासद झालो.
यहोवाच्या साक्षीदारांसोबतचा पहिला संपर्क
सन १९५१ मध्ये आडेडजी बोबे नामक साक्षीदाराकडून मी टेहळणी बुरूज नियतकालिकाची प्रत घेतली. नियतकालिक वाचनीय असल्याने मी त्याची वर्गणी केली आणि त्याचे नियमितपणे वाचन करू लागलो. मी १९५२ मध्ये ऑडो ईकीटी येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या चार दिवसाच्या प्रांतीय अधिवेशनास गेलो.
अधिवेशनात मी जे काही पाहिले त्याने मी प्रभावित झालो. मी यहोवाचा साक्षीदार होण्याबद्दल गंभीरपणे विचार केला परंतु नंतर तसा विचार करण्याचे मी सोडून दिले. माझ्या तीन पत्नी आणि त्यावेळी मी ठेवलेली एक स्त्री ही माझी समस्या होती. मी फक्त एका पत्नीसह राहू शकेल असा कोणताही मार्ग नाही, असे मला वाटले.
येथून पुढे माझ्याकडे येऊ नये, असे मी ऑक्युरला परताच आडेडजीला सांगून टाकले आणि टेहळणी बुरूज नियतकालिकाची वर्गणीही मी पुन्हा भरली नाही. माझ्या चर्चच्या कामात मी आणखी पुढे सरसावलो. नाहीतरी क्राइस्ट अपोस्टोलिक चर्चला गेल्यापासून देवाने मला आशीर्वादित केले आहे, असा मी विचार केला. मी तीन पत्नींशी विवाह केला आणि मला पुष्कळ मुले झाली. मी स्वतःचे घर बांधले होते. मी कधीही इस्पितळात दाखल झालो नव्हतो. देव माझ्या प्रार्थनांचे उत्तर देत असल्याचे दिसत असताना मी माझा धर्म का बदलावा?
भ्रमनिरासासहित मोठेपणा प्राप्त होणे
मी चर्चला पुष्कळ पैसे देण्यास सुरवात केली. त्यांनी मला लवकरच चर्चचे वडील बनविले आणि या स्थानामुळे चर्चमध्ये नक्की काय चालते हे मी आता पाहू शकत होतो. मी जे काही पाहिले त्यामुळे मी अस्वस्थ झालो. धर्मोपदेशक आणि “संदेष्टे” यांचे पैशावर प्रेम होते आणि त्यांची हाव पाहून मला धक्काच बसला.
उदाहरणार्थ, मार्च १९६७ मध्ये माझ्या वेगवेगळ्या बायकांना तीन मुले झाली. चर्चमध्ये मुलाचा नामकरण विधी करण्याचा प्रघात होता. यास्तव, मी या विधीची तयारी करणाऱ्या धर्मोपदेशकासाठी बक्षीस—मासे, लिंबू सरबत आणि मद्यार्करहित पेयांच्या बाटल्या घेतल्या.
त्या दिवशी चर्चची सेवा करत असताना या धर्मोपदेशकाने संपूर्ण मंडळीसमोर असे म्हटले: “या चर्चमधील श्रीमंत लोकांनी मला आश्चर्यचकित केले आहे. नामकरण विधी करावा असे त्यांना वाटते खरे परंतु त्यासाठी ते फक्त मद्यार्करहित पेये आणि मासे आणतात. मांस आणत नाही! बोकड आणत नाहीत! जरा कल्पना करा! काइनाने देवाला मोठमोठे कंद अर्पण केले परंतु देवाने त्याचे अर्पण स्वीकारले नाही कारण त्यात रक्त नव्हते. देवाला अशा गोष्टी हव्या आहेत ज्यांत रक्त आहे. हाबेलने प्राणी आणला आणि त्याचे अर्पण स्वीकारण्यात आले.”
मी उठलो आणि तावातावाने चर्चच्या बाहेर निघून गेलो. तथापि, मी अद्यापही चर्चला जातच होतो. मी सामाजिक कार्यांत आणि माझ्या क्लबच्या बैठकींमध्ये जास्तीत-जास्त वेळ घालवू लागलो. कधीतरी मी राज्य सभागृहातील सभांना जात असे आणि आता टेहळणी बुरूज नियतकालिकाची वर्गणी मी पुन्हा भरली होती. तथापि, मी अजूनही यहोवाचा साक्षीदार होण्यास तयार नव्हतो.
यहोवाची सेवा करण्याचा निर्णय
सन १९६८ मध्ये माझ्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण आला. एके दिवशी मी टेहळणी बुरूज नियतकालिक वाचण्यासाठी घेतले त्यात मलावीमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या केलेल्या अमानवी छळाचे वर्णन होते. त्यात एका १५ वर्षांच्या मुलीबद्दल सांगण्यात आले होते तिने आपल्या विश्वासाशी हातमिळवणी करण्यास नकार दिल्याने तिला झाडाला बांधून तिच्यावर सहा वेळा बलात्कार करण्यात आला. हे वाचल्यानंतर मी अगदी सुन्न होऊन ते नियतकालिक वाचण्याचे थांबवले, परंतु मी त्यावर विचार करत राहिलो. अशा प्रकारचा विश्वास माझ्या चर्चमधील एकही मुलगी दाखवणार नाही हे मी ओळखले. त्या संध्याकाळनंतर मी ते नियतकालिक पुन्हा घेतले आणि वाचण्यास सुरवात केली.
बायबलचा गंभीरपणे अभ्यास करण्यास मी सुरवात केली. जसजसे मी अधिक ज्ञान संपादित करत गेलो तसतसे मी हे पाहण्यास सुरवात केली, की आतापर्यंत चर्चने कशा प्रकारे आम्हाला चुकीच्या मार्गाने नेले होते. प्राचीन काळाप्रमाणे, आमचे पाळक “स्वैराचाराखेरीज काही करत नव्हते.” (होशेय ६:९, NW) येशूने ज्या खोट्या संदेष्ट्यांच्या विरोधात इशारा दिला त्यांत अशा लोकांचा समावेश होता! (मत्तय २४:२४) त्यानंतर मी कधीही त्यांच्या दृष्टान्तांवर आणि महत्कृत्यांवर विश्वास ठेवला नाही. खोट्या धर्मातून निघण्याचे आणि इतरांनाही तसे करावे म्हणून त्यांना मदत करण्याचे मी ठरविले.
मी चर्चमध्ये राहावे म्हणून प्रयत्न
चर्च सोडण्याचा मी ठाम निश्चय केल्याचे चर्चच्या वडिलांनी ओळखले तेव्हा त्यांनी माझे मन वळविण्यासाठी एक प्रतिनिधीमंडळ पाठविले. मिळकतीचा एक महत्त्वाचा स्रोत गमावण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी मला बाबा इग्बे म्हणजे ऑक्युर येथील क्राइस्ट अपोस्टोलिक चर्चमध्ये वृत्तव्यवस्थापक बनविण्याची तयारी दर्शवली.
मी त्यांचा प्रस्ताव फेटाळला आणि असे करण्याचे त्यांना कारण दिले. मी म्हटले: “आतापर्यंत चर्च माझ्याशी लबाडी करत आले आहे. ते म्हणतात की चांगले लोक स्वर्गात जातात. परंतु मी बायबल वाचले आहे आणि मला पटले, की केवळ १,४४,००० लोक स्वर्गात जातील. इतर धार्मिक लोक परादीस पृथ्वीवर राहतील.”—मत्तय ५:५; प्रकटीकरण १४:१, ३.
चर्चच्या धर्मोपदेशकाने माझ्या पत्नींना माझ्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला. आमच्या घरी यहोवाच्या साक्षीदारांना येण्यास मज्जाव करावा असे त्याने त्यांना सांगितले. एके दिवशी तर माझ्या एका पत्नीने माझ्या जेवणात विष घातले होते. त्यांपैकी दोघींनी चर्चमध्ये पाहिलेल्या दृष्टान्ताविषयी मला इशारा दिला. चर्च सोडले तर मी मरेल असे त्यांनी दृष्टान्तात पाहिले होते. असे असतानाही, मी माझ्या पत्नींना साक्ष देण्याचे आणि माझ्यासोबत सभांना बोलविण्याचे चालूच ठेवले. मी म्हटले: “तुम्हाला तिथं दुसरे नवरे मिळतील.” तथापि, त्यांपैकी कोणीही आस्था दाखविली नाही उलटपक्षी, मला परावृत्त करण्यासाठी त्या नेहमी प्रयत्न करत राहिल्या.
अखेरीस, मी जेव्हा शेजारील एका शहरातून फेब्रुवारी २, १९७० मध्ये घरी परतलो तेव्हा घरात कोणीच नसल्याचे मला आढळले. माझ्या सर्व पत्नी मुलांसहित पळून गेल्या होत्या.
एका पत्नीला जडून राहणे
‘माझ्या वैवाहिक परिस्थितीत मला आता सुधारणा करता येईल,’ असे मला वाटले. जॅनेट नामक माझ्या पहिल्या पत्नीला मी घरी परत येण्यास सांगितले. ती येण्यास तयारही होती. तथापि, तिच्या कुटुंबानी या विचारास तीव्र विरोध केला. मी जॅनेटला परत बोलावले हे माझ्या इतर पत्नींना समजले तेव्हा त्या तिच्या वडिलाच्या घरी गेल्या आणि तिला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा मात्र तिच्या कुटुंबाने एक बैठक बोलावली.
या बैठकीस सुमारे ८० जण आले होते. कुटुंबप्रमुख असलेल्या जॅनेटच्या काकांनी म्हटले: “तुला आमच्या मुलीशी पुन्हा विवाह करायचा असल्यास तुला इतर बायकांना देखील बरोबर घ्यावं लागेल. परंतु तुला तुझा नवीन धर्म स्वीकारायचा असल्यास आणि एकाच पत्नीसोबत राहायचं असल्यास तू दुसरी बायको पाहा. तू जॅनेटला परत नेल्यास तुझ्या इतर बायका तिला मारून टाकतील आणि आमच्या मुलीने मरावं अशी आमची इच्छा नाही.”
पुष्कळ वाद घातल्यानंतर, एकाच पत्नीसोबत राहण्याच्या माझ्या निर्णयावर मी ठाम असल्याचे त्या कुटुंबाने ओळखले. अखेरीस त्यांनी हात टेकले. तिच्या काकांनी म्हटले: “आम्ही तुझ्या पत्नीला तुझ्यापासून घेणार नाही. तिला तू तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतोस.”
मे २१, १९७० रोजी मी आणि जॅनेटने कायदेशीर विवाह केला. नऊ दिवसानंतर माझा यहोवाचा साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा झाला. त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात जॅनेटचा देखील बाप्तिस्मा झाला.
यहोवाच्या आशीर्वादांचा आनंद घेणे
साक्षीदार झाल्यास आम्ही मरू, असे आमच्या चर्चच्या भूतपूर्व सभासदांनी भाकीत केले होते. या गोष्टीला जवळजवळ ३० वर्षे होऊन गेली. आता जरी मी मरण पावलो तरी यहोवाचा साक्षीदार होणे हे त्या मरणाचे कारण होईल का? आता माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यास ती यहोवाची साक्षीदार झाली म्हणून असे झाले असे कोणी म्हणू शकतो का?
माझ्या १७ मुलांना सत्याचा मार्ग दाखविण्याची मी शिकस्त केली आहे. मी जेव्हा साक्षीदार झालो तेव्हा त्यांतील अनेक जण प्रौढ होते तरी देखील मी त्यांना बायबल अभ्यास करण्याचे उत्तेजन दिले तसेच त्यांना सभांना व अधिवेशनांना घेऊन गेलो. त्यांपैकी पाच जण माझ्यासोबत यहोवाची सेवा करत असल्यामुळे मला आनंद होतो. एक जण माझ्याबरोबर मंडळीत वडील म्हणून काम करतो. दुसरा शेजारील मंडळीत सेवा-सेवक आहे. माझी दोन मुले नियमित पायनियर म्हणून सेवा करतात.
मी जेव्हा सिंहावलोकन करतो तेव्हा आपला सेवक व्हावा म्हणून यहोवाने माझ्यावर केलेली अपात्री कृपा पाहून मला खूपच अप्रूप वाटते. येशूचे शब्द किती खरे आहेत: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही”!—योहान ६:४४.
[तळटीप]
a यारूबा यापासून ध्वनित होणारा अर्थ “प्रार्थना करणारा.” आत्मिकरीत्या बरे करण्याचा अभ्यास करणाऱ्या आफ्रिकी चर्चच्या सभासदाला हे सूचित करते.