वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १/१ पृ. १२-२२
  • यहोवाच्या भवनाचे महान वैभव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या भवनाचे महान वैभव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विपुल “शिधासामुग्री”
  • विश्‍वभरातील कापणी
  • आणखी पुढे जाणे
  • हाग्गयचे शेवटले संदेश
  • सर्व जण यहोवाची स्तुती करोत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “मी तुम्हाबरोबर आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • आपले हात दृढ करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • “मी सर्व राष्ट्रांना हलवीन”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १/१ पृ. १२-२२

यहोवाच्या भवनाचे महान वैभव

‘मी हे भवन वैभवाने भरीन, असे सेनाधीश यहोवा म्हणतो.’—हाग्गय २:७.

१. पवित्र आत्मा, विश्‍वास आणि कार्य यांजशी कसा संबंधित आहे?

यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकीला घरोघरचे प्रचार कार्य करताना, एक पेन्टेकॉस्टल बाई भेटली जी तिला म्हणाली, ‘पवित्र आत्मा आम्हाला मिळाला पण कार्य करणारे लोक तुम्ही आहात.’ तिला अगदी चाणाक्षपणे समजावण्यात आले, की ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे त्यांना स्वाभाविकपणे देवाचे कार्य करण्यास प्रेरणा मिळते. याकोब २:१७ म्हणते: “विश्‍वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.” यहोवाच्या आत्म्याच्या साहाय्याने त्याच्या साक्षीदारांनी बळकट विश्‍वास विकसित केला आहे आणि त्याने त्यांना धार्मिक कार्ये—खासकरून, ‘सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवण्यास’ लावून ‘आपले भवन वैभवाने भरवले आहे.’ हे कार्य यहोवाचे समाधान होईपर्यंत केले जाते तेव्हा “शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

२. (अ) यहोवाच्या कार्यात स्वतःला गुंतवून ठेवल्याने कोणते आशीर्वाद मिळतील? (ब) कोणत्याही स्पष्ट ‘विलंबाचा’ आपण आनंद का मानावा?

२ येशूच्या या शब्दांवरून आपण हा निष्कर्ष काढतो, की आज आपले कार्य, आपल्यावर सोपवलेल्या ‘धन्यवादित देवाच्या गौरवाची सुवार्ता’ इतरांना प्रचार करण्यावर केंद्रित असले पाहिजे. (१ तीमथ्य १:११) यहोवाच्या सेवेत आपण स्वतःला जितक्या आनंदाने गुंतवून ठेवू, तितक्याच जलदगतीने अंत जवळ येत असल्यासारखे आपल्याला वाटेल. हबक्कूक २:२, ३ येथे आपण यहोवाच्या शब्दांविषयी असे वाचतो: ‘हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणाही माणसाला तो चटकन वाचता येईल. कारण हा दृष्टान्त नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.’ होय, ‘या दृष्टान्तास’ “विलंब लागला तरी” तो खरा ठरेलच. आपण येशूच्या राज्य शासनाच्या ८३ व्या वर्षांत असल्यामुळे, आपण आता विलंबाच्या काळात आहोत, असे काहींना वाटू शकते. परंतु, अंत अद्याप आला नाही याबद्दल आपण आनंदी असू नये का? १९९० च्या या दशकादरम्यान, चमत्कारिक असे भासेल, पण पूर्व युरोप, आफ्रिकेचे काही भाग आणि इतर राष्ट्रांमध्ये सुवार्तेच्या प्रचारावरील बंदी हटवण्यात आली आहे. हा स्पष्ट “विलंब,” अलीकडेच खुल्या झालेल्या या क्षेत्रांमधून आणखी ‘मेंढरांना’ येण्यासाठी समय देत आहे.—योहान १०:१६.

३. ‘या पिढीवरील’ आपल्या अद्ययावत समजेने आपल्याला देवाचे कार्य तातडीने करण्यास प्रवृत्त का करावे?

३ “त्याला विलंब लागावयाचा नाही,” असे संदेष्टा म्हणतो. येशू म्हणाला होता की, “हे सर्व पूर्ण होईपर्यंत” सध्याची दुष्ट पिढी नाहीशी होणार नाही. (मत्तय २४:३४) त्याच्या या बोलण्याचा अर्थ, आपल्या अद्ययावत समजेनुसार आपले प्रचार कार्य इतके तातडीचे नाही असा होतो का?a ही गोष्ट अगदी उलट असल्याचे वस्तुस्थिती दाखवते! आपली समकालीन पिढी, सर्व गत इतिहासात दुष्टाई व भ्रष्टाचाराच्या अतुल्य अवस्थेत फसत चालली आहे. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २:४०.) आपण तातडीने कार्य केले पाहिजे. (२ तीमथ्य ४:२) मोठ्या संकटाच्या समयाविषयीच्या सर्व भविष्यवाण्या, ते अचानक, क्षणात, नकळत—चोराप्रमाणे येईल असे दाखवतात. (१ थेस्सलनीकाकर ५:१-४; प्रकटीकरण ३:३; १६:१५) “म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्तय २४:४४) मानवजातीची ही भक्‍तीहीन पिढी विनाशाच्या उंबरठ्यावर असताना, जगीक आकर्षणांच्या “गाळात लोळण्यास” परतून चिरकालीक जीवनाची बहुमूल्य आशा बाजूला सारण्यास आपल्याला निश्‍चितच आवडणार नाही!—२ पेत्र २:२२; ३:१०; लूक २१:३२-३६.

४. कोणत्या परिस्थितीने, ‘यथाकाळी खावयाच्या अन्‍नाच्या’ अधिक साठ्याची मागणी केली आहे व ही गरज कशी भागवण्यात आली?

४ मानवजातीने जेव्हा ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात पदार्पण केले तेव्हा येशूच्या भविष्यवाणीनुसार १९१४ मध्ये “वेदनांचा प्रारंभ” झाला. दुःख, शोकांतिक घटना आणि स्वैराचार आजच्या दिवसापर्यंत फोफावला आहे. (मत्तय २४:३-८, १२) त्याच वेळी, यहोवाने अभिषिक्‍त विश्‍वासू आणि बुद्धिमान दास वर्गाला, धन्याच्या अर्थात ख्रिस्ताच्या घराण्याला आध्यात्मिक अन्‍न “यथाकाळी खावयास” देण्याची आज्ञा दिली आहे. (मत्तय २४:४५-४७) हा मशिही राजा स्वर्गातील आपल्या सिंहासनावरून आता संपूर्ण पृथ्वीवर आध्यात्मिक भरवणुकीच्या आश्‍चर्यकारक कार्यक्रमाला मार्गदर्शित करत आहे.

विपुल “शिधासामुग्री”

५. ‘अन्‍नाच्या’ मुख्य पदार्थाकडे कोणत्या प्रकारचे लक्ष दिले जात आहे?

५ “शिधासामुग्री” तयार करण्याविषयी विचार करा. (लूक १२:४२) ख्रिस्ती मेनूतील मुख्य पदार्थ, देवाचे वचन, बायबल आहे. बायबल परिणामकारकतेने शिकवायचे आहे, तर वाचण्याजोग्या व अचूक अनुवादाची प्रथम गरज आहे. अनेक वर्षांपासून ही गरज प्रगतीशीलपणे पूर्ण केली जात आहे, विशेषकरून याची सुरवात १९५० मध्ये झाली जेव्हा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द ख्रिश्‍चन ग्रीक स्क्रिपचर्स इंग्रजीत प्रकाशित झाले. १९६१ पर्यंत, संपूर्ण बायबलचे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन उपलब्ध झाले व इतर प्रमुख भाषांमध्ये त्याच्या आवृत्त्या लगेचच आल्या. १९९६ च्या सेवा वर्षादरम्यान प्रदर्शित झालेल्या  ३ खंडांमुळे एकूण संख्या  २७ इतकी वाढली, ज्यातील  १४ पूर्ण बायबल आहेत. बायबलचे तसेच बायबल साहाय्यांचे हे काम हाताळण्यासाठी सुमारे १,१७४ समर्पित ख्रिस्ती पूर्ण वेळेसाठी आता ७७ देशांमध्ये अनुवादाचे काम करत आहेत.

६. संस्थेने बायबल प्रकाशनांची मागणी कशी पूर्ण केली आहे?

६ अनुवादकांच्या या मोठ्या संख्येच्या कार्याला आधार देऊन वॉच टावर संस्थेच्या  २४ छपाई शाखा पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात प्रकाशने तयार करत आहेत. आजपर्यंत, जादा हायस्पीड रोटरी छपाई यंत्रे प्रमुख शाखांमध्ये बसवण्याचे काम चालू आहे. टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचे उत्पन्‍न प्रत्येक महिन्यात वाढत चालले आहे, दोन्ही मिळून एकूण ९४,३८,९२,५०० प्रती छापल्या जातात, या वर्षाची ही १३.४ टक्के वाढ आहे. अमेरिका, इटली, कोरिया, जर्मनी, जपान, फिनलंड, ब्राझील, व मेक्सिको येथे बायबल आणि हार्डबाऊंड पुस्तकांचे उत्पन्‍न, १९९५ पासून  ४० टक्क्यांनी वाढून १९९६ मध्ये ७,६७,६०,०९८ प्रती इतके झाले आहे. इतर शाखांनीसुद्धा, साहित्य उत्पन्‍नात एकूण वाढ करण्यासाठी बऱ्‍याच प्रमाणात हातभार लावला आहे.

७. यशया ५४:२ कशाप्रकारे आज अधिक तातडीचे होत आहे?

७ पूर्व युरोप आणि आफ्रिका येथील यहोवाच्या साक्षीदारांवरील बंदी उठवल्यामुळे १९९० च्या दशकादरम्यान पुष्कळ वाढ होणे आवश्‍यक बनले आहे. या ठिकाणी पुष्कळांना आध्यात्मिक अन्‍नाची भूक आहे. यास्तव, “आपल्या डेऱ्‍याची जागा वाढीव, आपल्या राहुट्याच्या कनाथी पसरू दे; अटकाव करू नको; आपल्या दोऱ्‍या लांब कर, मेखा पक्क्या ठोक,” हे बोलावणे अधिक तातडीचे होते.—यशया ५४:२.

८. कोणता उदार प्रतिसाद आर्थिक साहाय्य पुरवण्यास हातभार लावत आहे?

८ अशाप्रकारे, संस्थेच्या १०४ शाखांमध्ये तरतुदी वाढवण्याची गरज भासत आहे. नव्याने खुल्या झालेल्या बहुतेक क्षेत्रांमध्ये कडक आर्थिक परिस्थितीमुळे या विस्तारासाठी लागणाऱ्‍या खर्चाचा बहुतांश भाग, अधिक समृद्ध असलेल्या राष्ट्रांतून जगव्याप्त कार्यासाठी येणाऱ्‍या वर्गण्यांद्वारे भागवला जातो. आनंदाची गोष्ट म्हणजे, मंडळ्या आणि अनेक जण, पूर्ण अंतःकरणाने निर्गम ३५:२१ मधील सारानुसार प्रतिसाद देत आहेत: ‘नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ति झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने यहोवाच्या कार्यासाठी वर्गणी दिली.’ या उदार देण्यामध्ये ज्यांचा ज्यांचा भाग आहे अशा सर्वांचे आम्ही आता या प्रसंगी आभार मानतो.—२ करिंथकर ९:११.

९. रोमकर १०:१३, १८ ची पूर्णता आज कशी होत आहे?

९ खरेच, १९९६ दरम्यान वॉच टावर संस्थेच्या प्रकाशनांनी पृथ्वीच्या टोकांपर्यंत यहोवाच्या नावाचा आणि उद्देशाचा महिमा केला आहे. प्रेषित पौलाने भाकीत केल्याप्रमाणेच ते आहे. योएलची भविष्यवाणी आणि १९ वे स्तोत्र उद्धृत करीत त्याने लिहिले: “‘जो कोणी प्रभुचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’ पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? होय, खरोखर ऐकले होते. ‘त्याचा नाद सर्व पृथ्वीवर, व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोंचले’” (रोमकर १०:१३, १८) यहोवा या बहुमोल नावाचे गौरव करून त्याच्या लोकांनी त्याचे भवन वैभवाने भरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. परंतु ही घोषणा खासकरून १९९६ दरम्यान कशी यशस्वी ठरली बरे? कृपया, १८ ते २१ पृष्ठांवरील तक्‍त्‌याचे जरा परीक्षण करा.

विश्‍वभरातील कापणी

१०. पृष्ठे १८ ते २१ वरील तक्‍त्‌यात संक्षिप्त वर्णिलेल्या यहोवाच्या लोकांच्या कार्यहालचालींमध्ये तुम्हाला कोणते उल्लेखनीय वैशिष्ट्ये दिसतात?

१० “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा” हे लूक १०:२ मधील येशूचे शब्द पूर्वी कधी इतके वजनदार वाटले नाहीत. तुम्ही या हाकेस प्रतिसाद देत आहात का? पृथ्वीवरील लाखो लोक देत आहेत. १९९६ दरम्यान क्षेत्र सेवेचा अहवाल देणाऱ्‍या राज्य प्रचारकांच्या ५४,१३,७६९ नवीन उच्चांकांवरून याची साक्ष मिळते. शिवाय, ३,६६,५७९ नवीन बंधू आणि भगिनींचा बाप्तिस्मा झाला. ‘यहोवाच्या उपासना भवनाला वैभवाने भरण्यात’ आता भाग घेणाऱ्‍या ‘सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तूंना’ आपण किती मौल्यवान समजतो!—हाग्गय २:७.

११. आपल्या सर्वांकडे अत्यानंद करण्याचे कारण का आहे?

११ नव्याने खुल्या झालेल्या क्षेत्रांमध्ये होणाऱ्‍या विस्ताराचे अहवाल उल्लेखनीय आहेत. अशा वाढीचा आनंद लुटणाऱ्‍या इतरांना पाहून आपल्याला हेवा वाटतो का? उलट आपल्याला त्यांना पाहून आनंद होतो. सर्व राष्ट्रांमध्ये पहिल्यांदा लहानशी सुरवात झाली. हाग्गयचा समकालीन संदेष्टा जखऱ्‍या याने लिहिले: “कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानितो काय?” (जखऱ्‍या ४:१०) ज्या राष्ट्रांमध्ये साक्ष कार्याचा चांगला जम बसला आहे तेथे आता लाखो राज्य प्रचारक आहेत व बहुतेक वेळा, मोठमोठाल्या शहरांमध्ये तर दर आठवडी क्षेत्र पूर्ण केले जाते. पूर्वी बंदी असलेल्या क्षेत्रांना यहोवा आता तारणासाठी संधी देतो तेव्हा आपणास मंद होण्याचे काही कारण आहे का? कदापि नाही! येशूने म्हटले, “शेत हे जग आहे.” (मत्तय १३:३८) यहुदी व्यवस्थिकरणाच्या शेवटास आरंभीच्या शिष्यांनी ज्याप्रमाणे पूर्णपणे साक्ष दिली त्याचप्रमाणे आजही पूर्णपणे साक्ष देण्याची गरज आहे.—प्रेषितांची कृत्ये २:४०; १०:४२; २०:२४; २८:२३.

आणखी पुढे जाणे

१२. “नीट समोर” चालत राहण्यासाठी आपल्याला कोणती प्रेरणा मिळते? (तसेच, “‘पृथ्वीच्या दिगंतापासून’ कापणी करणे” हा चौकोन पाहा.)

१२ होय, आपण यहोवाच्या देवदूतीय वैभवी रथाच्या बरोबरीने “नीट समोर” चालत राहिले पाहिजे. (यहेज्केल १:१२) आपल्याला पेत्राच्या शब्दांची आठवण होते: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या राष्ट्रांतील आपल्या बांधवांचा उदाहरणीय आवेश आपल्याला प्रेरणा देवो. हर्मगिदोनाचा उद्रेक होण्यातील स्पष्ट विलंब, या देशांतील हजारोंना तसेच चांगल्याप्रकारे उरकलेल्या क्षेत्रांतील अनेकांना एकत्र करण्यासाठी वाव देत आहे. पण, गैरसमज करून घेऊ नका कारण, “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” (सफन्या १:१४) पूर्णपणे किंवा चांगल्याप्रकारे अंतिम साक्ष देण्यात आपणही भाग घेण्याची घाई केली पाहिजे!

१३, १४. (अ) १९९६ दरम्यान प्रकाशनांच्या वाटपाविषयी काय म्हटले जाऊ शकते? (ब) प्रत्येक वर्षी मंडळ्या कोणत्या खास योजना आखू शकतात व त्यात भाग घेण्यासाठी तुम्ही कशी योजना करीत आहात?

१३ सेवा तक्‍त्‌यात सर्वच सविस्तर माहिती आली नसली तरी, गत वर्षादरम्यान बायबल, पुस्तके आणि नियतकालिकांच्या वाटपात विलक्षण वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, संपूर्ण जगभरात नियतकालिकांचे वाटप १९ टक्के वाढ दर्शवते, एकूण ५४,३६,६७,९२३ प्रतींचे वाटप करण्यात आले होते. आपली नियतकालिके—रस्त्यावर, बागेत, बसथांब्यांवर, व्यापारी क्षेत्रांत—अष्टपैलू प्रचारासाठी उचित आहेत. अहवाल दाखवतात, की वारंवार राज्याचा प्रचार केल्या जाणाऱ्‍या काही क्षेत्रांमध्ये, पेशेवाईक लोक आपल्या नियतकालिकांचा दर्जा पाहून प्रभावित झाले आहेत व बायबल अभ्यास स्वीकारत आहेत.

१४ दर वर्षी एप्रिल महिन्यादरम्यान, घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी संपूर्ण दिवसभर प्रचार करण्याची मोहीम करून मंडळ्या बहुधा खास नियतकालिक कार्याची योजना आखतात. एप्रिल १९९७ दरम्यान तुमची मंडळी यामध्ये भाग घेईल का? एप्रिलची उल्लेखनीय नियतकालिके तयार करण्यात आली आहेत व जगभरात त्यांची एकाच वेळी होणारी प्रस्तुती खरोखर प्रभावकारी ठरावी! सायप्रसच्या बेटावर, “शक्य तितक्या प्रत्येकाला राज्य संदेश सांगणे” या घोषवाक्याचा उपयोग करून मंडळ्यांनी प्रत्येक महिन्याला अशा निर्धारित नियतकालिक कार्यात भागही घेतला व त्या वर्षी २,७५,३५९ नियतकालिकांचे वाटप करून नवीन उच्चांक गाठला. ही ५४  टक्के वाढ आहे!

हाग्गयचे शेवटले संदेश

१५. (अ) यहोवाने हाग्गयद्वारे आणखी संदेश देण्याचे कारण काय? (ब) हाग्गयच्या तिसऱ्‍या संदेशातून आपल्याला कोणता धडा मिळतो?

१५ यहोवाने हाग्गयला आपला दुसरा संदेश दिल्याच्या ६३ दिवसांनंतर तिसरी घोषणा देऊन पाठवले जिच्याकडे आपण आज लक्ष दिले पाहिजे. हाग्गय असा बोलला जणू काय यहुदी तेव्हा मंदिराचा पाया घालत होते, पण खरे पाहता, त्यांनी तो १७ वर्षांपूर्वीच घातला होता. यहोवाला पुन्हा एकदा शुद्धिकरणाची आवश्‍यकता भासली. याजक आणि लोक आपआपल्या जबाबदारींची काळजी घेण्यामध्ये हलगर्जी बनल्यामुळे यहोवाच्या दृष्टीत अशुद्ध होते. आजही यहोवाचे काही लोक, जगाच्या अनुज्ञेयी व भौतिक जीवनशैलीत स्वतःला गुरफटून तशाचप्रकारे हलगर्जी होऊ शकतात का? यहोवाच्या नावाची स्तुती करण्यासाठी ‘आजपासून व इथूनपुढे’ आपण सर्वांनी लक्ष पुरवणे अत्यावश्‍यक आहे व “आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन,” या त्याच्या अभिवचनाची आपण खात्री बाळगू शकतो.—हाग्गय २:१०-१९; इब्री लोकांस ६:११, १२.

१६. कोणत्या प्रकारचे ‘हलवणे’ जवळ आले आहे व त्याचा परिणाम काय होईल?

१६ त्याच दिवशी, हाग्गयला ‘सेनाधीश यहोवाकडून’ चौथे आणि शेवटले वचन मिळाले. ‘आकाश व पृथ्वीला हालवून सोडण्यामध्ये’ काय समाविष्ट आहे ते त्याने असे म्हणून कळवले की, “मी राज्यांचे राजासन उलथून टाकीन व राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन, आणि रथ व त्यांत स्वारी करणारे यांना उलथून टाकीन, आणि घोडे व त्यांचे स्वार, प्रत्येक आपल्या भावाच्या तरवारीने खाली पडतील.” (हाग्गय २:६, २१, २२, पंडिता रमाबाई भाषांतर) यहोवा पृथ्वीला हर्मगिदोनमध्ये पूर्णपणे शुद्ध करील तेव्हा हे ‘हलवणे’ थांबेल. तोपर्यंत नवीन जगाकरता मानवी समाजाचे केंद्र बनण्यासाठी “सर्व राष्ट्रांच्या मोलवान्‌ वस्तु” आत आलेल्या असतील. आनंदोस्तव व यहोवाची स्तुती करण्यासाठी किती उत्तम कारणे!—हाग्गय २:७, पं. र. भा; प्रकटीकरण १९:६, ७; २१:१-४.

१७. येशूला, ‘मुद्रेच्या अंगठीसारखे’ कसे करण्यात आले आहे?

१७ आपल्या भविष्यवाणीच्या समाप्तीत हाग्गय लिहितो: “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो: त्या दिवशी, हे जरुब्बाबेला, . . . मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्‍वर म्हणतो; कारण मी तुला निवडिले आहे, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो.” (हाग्गय २:२३) प्रांताधिकारी जरुब्बाबेल आणि महायाजक यहोशवा यांची पार्थिव जेरुसलेममध्ये जी वेगवेगळी कार्यपदे होती ती आता, ख्रिस्त येशू स्वर्गामध्ये यहोवाचा प्रतिनमुनेदार मशिही राजा व महायाजक या नात्याने पार पाडत आहे. यहोवाच्या उजव्या बोटातील अधिकृत मुद्रेच्या अंगठीसारखा, येशू, “होय” या नात्याने, ‘देवाची ती अनेक अभिवचने’ खरी ठरण्यासाठी यहोवाचे साधन ठरला आहे. (२ करिंथकर १:२०; इफिसकर ३:१०, ११; प्रकटीकरण १९:१०) बायबलचा संपूर्ण भविष्यसूचक संदेश, राजा आणि याजकीय खंडणीदाता या नात्याने यहोवाने केलेल्या ख्रिस्ताच्या तरतुदीवर लक्ष केंद्रित करतो.—योहान १८:३७; १ पेत्र १:१८, १९.

१८. समारोपातील ‘सेनाधीश यहोवाचे म्हणणे’ याची आल्हाददायक पूर्णता कशी होईल?

१८ खरेच, आपल्या या दिवसांमध्ये, यहोवाच्या तेजोमय आध्यात्मिक मंदिरात महान वैभव पाहण्यास मिळते! शिवाय, यहोवाने सैतानाच्या सर्व व्यवस्थेचे उच्चाटन केल्यानंतर लगेचच, “मी या स्थळाला शांति देईन, असे सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो,” ही हाग्गय २:९ ची आल्हादकारक पूर्णता भविष्यात होईल. “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार . . . सेनाधीश परमेश्‍वराचा आवेश हे सिद्धीस नेईल,” असे ज्याच्याविषयी लिहिले तो “शांतीचा अधिपति,” अर्थात यहोवाची ‘मुद्रेची अंगठी,’ ख्रिस्त येशू याने शाश्‍वती दिलेली चिरस्थायी, विश्‍वव्यापी शांती—कायमची शांती येईल! (यशया ९:६, ७) यहोवाच्या उपासना भवनाचे वैभव त्याच्या सार्वत्रिक सार्वभौम सत्तेच्या शांतीमय परिसरात चिरकाल परावर्तीत होईल. आपण त्या भवनात कायम राहो!—स्तोत्र २७:४; ६५:४; ८४:१०.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, १९९५ अंकातील “‘दुष्ट पिढीतून’ बचावलेले” आणि “जागृत राहण्याचा काळ” लेख पाहा.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?

◻ आज यहोवाचे भवन ‘वैभवाने’ कसे भरत आहे?

◻ सुवार्तेचा प्रचार करणे पूर्वी इतके तातडीचे का नव्हते?

◻ १९९६ सेवा वर्ष अहवाल तातडीने प्रचार करण्यासाठी कोणती प्रेरणा देतो?

◻ ख्रिस्त कशाप्रकारे यहोवाची ‘मुद्रेची अंगठी’ या नात्याने कार्य करीत आहे?

[१५ पानांवरील चौकट]

‘पृथ्वीच्या दिगंतापासून’ कापणी करणे

यशया ४३:६ येथे आपण यहोवाने दिलेली आज्ञा वाचतो: “अटकाव करू नको; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या.” पूर्व युरोपमध्ये या वचनाची आज अपवादात्मक पूर्णता होत आहे. मॉल्दोवाच्या भूतपूर्व कम्युनिस्ट राष्ट्राचेच बघा. तेथे जितकी खेडी आहेत त्यातील अर्धी लोकसंख्या आता साक्षीदार आहे. प्रचारासाठी क्षेत्र शोधण्यासाठी त्यांना दूरपर्यंत प्रवास करावा लागतो, पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत! या मंडळ्यांतील अनेक प्रचारक, १९५० च्या दशकाच्या सुरवातीला सायबेरियात बंदिवासात नेलेल्यांची मुले आहेत. आता त्यांची कुटुंबे कापणीच्या कार्यात अग्रगामी आहेत. १२,५६५ प्रचारकांपैकी गत वर्षी १,९१७ जणांचा बाप्तिस्मा झाला. तेथे ४३ मंडळ्या आहेत आणि प्रत्येक मंडळीत जवळजवळ १५० प्रचारक आहेत, शिवाय नूतन सेवा वर्षांत चारांचे आठ विभाग झाले आहेत.

याशिवाय, अल्बेनियातील वाढ देखील उल्लेखनीय आहे. तेथे मुठभर एकनिष्ठ साक्षीदार आहेत ज्यांनी सुमारे ५० वर्षांदरम्यान सर्वात क्रूर हुकूमशाही सहन केली. त्यांच्यातील पुष्कळांची हत्या करण्यात आली. यावरून, “तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरूंगात टाकणार आहे; . . . मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन,” या येशूने दिलेल्या अभिवचनाची आठवण होते. (प्रकटीकरण २:१०; तसेच योहान ५:२८, २९; ११:२४, २५ देखील पाहा.) आता आपल्याला अल्बेनियात काय पाहावयास मिळते? निश्‍चितच, “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील,” या यशया ६०:२२ मधील यहोवाने दिलेल्या अभिवचनाची विस्मयजनक पूर्णता! १९९० मध्ये केवळ एका प्रचारकाने सेवेचा अहवाल दिला होता. परंतु, इटली आणि इतर देशांतील अनेक ‘कामकऱ्‍यांनी,’ ‘तुम्ही जाऊन सर्व लोकांस शिष्य करा, त्यास बाप्तिस्मा द्या,’ या येशूच्या बोलावण्याला प्रतिसाद दिला. (मत्तय २८:१९; लूक १०:२) १९९६ मध्ये येशूच्या मृत्यूच्या स्मारक विधीच्या काळापावेतो, ७७३ प्रचारक क्षेत्रसेवेत सक्रिय होते आणि यांनी त्यांच्या स्मारक सभांना, प्रचारकांच्या संख्येपेक्षा आठपट, अर्थात ६,५२३ जणांना एकत्र केले! दूर क्षेत्रांतून विलक्षण उपस्थितीचा अहवाल देण्यात आला. स्थानीय प्रचारक नसले तरी, कुक्स आणि दिवयेक या शहरांमध्ये अनुक्रमे १९२ आणि २३० जण उपस्थित होते. क्रूयमध्ये केवळ एक प्रचारक असताना २१२ उपस्थित होते. कोर्च येथील ३० प्रचारकांनी ३०० पेक्षा अधिकांसाठी भाड्याने श्रोतृगृहाची व्यवस्था केली. तितके लोक श्रोतृगृहात तुडुंब भरल्यानंतर, आणखी २०० जणांना जागा नसल्यामुळे माघारी जावे लागले. खरेच, कापणीकरता तयार असलेले शेत!

रुमानियाकडून पुढील अहवाल येतो: “आम्ही घरोघरचे कार्य करताना, एका मनुष्याला भेटलो जो म्हणाला, की तो एक यहोवाचा साक्षीदार आहे. तो एका लहानशा गावात राहात होता जेथे आमच्या माहितीप्रमाणे कोणी साक्षीदार नव्हते. त्याने आम्हाला सांगितले, की त्याच्या व्यतिरिक्‍त आणखी १५ जण आहेत जे अनेक वर्षांपासून गुरुवारी आणि रविवारी सभा संचालित करत आले आहेत व त्यांनी घरोघरच्या कार्यास सुरवात केली होती. दुसऱ्‍या दिवशी आम्ही त्या गावी गेलो. दोन खोल्यांमध्ये १५ पुरुष, स्त्रिया आणि मुले आमची वाट पाहत बसले होते व त्यांनी आमच्याकडून २० पुस्तके आणि अलिकडील २० नियतकालिके स्वीकारली. बायबल अभ्यास कसा घ्यावा ते आम्ही त्यांना दाखवले. आम्ही एकत्र मिळून गाणी गायिली व त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे दिली. त्या गटामध्ये पुढाकार घेणाऱ्‍याने कबूल केले: ‘काही दिवसांपूर्वीच मी, एखादा मेंढपाळ पाठवावा अशी यहोवाकडे अश्रू ढाळीत प्रार्थना केली होती आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळालं.’ आम्हाला अतिशय आनंद झाला व एखाद्या अनाथ मुलाला आपला पिता सापडल्याप्रमाणे तो आम्हाला निघताना म्हणाला: ‘कृपया आम्हाला विसरून जाऊ नका. पुन्हा एकदा आम्हाला भेटण्याकरता या!’ आम्ही पुन्हा गेलो व आता त्या गावात सात बायबल अभ्यास चालवले जात आहेत. अनेक नवनवीन क्षेत्रांमध्ये, लोकांना आवडणाऱ्‍या बायबल साहित्यांतून आश्‍चर्यकारकपणे कार्याची सुरवात होते, यावरून हे कार्य ईश्‍वरी उगमाकडून असल्याचे दिसून येते.”

[१८-२१ पानांवरील तक्‍ता]

(For fully formatted text, see publication.)

[१६, १७ पानांवरील चित्र]

“सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” समुद्राच्या बेटांवर (१), दक्षिण अमेरिका (२), आफ्रिका (३), आशिया (४), उत्तर अमेरिका (५), व युरोप (६) मध्ये एकत्र केल्या जात आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा