वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १/१ पृ. २६-२९
  • आपण वाईटाचा वीट मानू या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण वाईटाचा वीट मानू या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मंडळी शुद्ध ठेवणे
  • अपरिहार्य परिणाम
  • बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती पाप करतो तेव्हा
  • बालक दुर्व्यवहार करणाऱ्‍याविषयी काय?
  • कमतरता, पाप आणि पश्‍चात्ताप यांची निश्‍चिती करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवा भरपूर क्षमा करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • यहोवाची शिक्षा नेहमी स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १/१ पृ. २६-२९

आपण वाईटाचा वीट मानू या

यहोवा पवित्र देव आहे. प्राचीन काळी तो ‘इस्राएलाचा पवित्र’ होता आणि त्यामुळे इस्राएलाने स्वच्छ, निष्कलंक असावे, अशी त्याने मागणी केली. (स्तोत्र ८९:१८) त्याने आपल्या निवडलेल्या लोकांना म्हटले: “मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीहि पवित्र व्हा.” (लेवीय ११:४५) ज्या कोणाची ‘यहोवाच्या डोंगरावर चढण्याची’ इच्छा होती त्याला ‘आपले हात स्वच्छ आणि मन शुद्ध ठेवायचे होते.’ (स्तोत्र २४:३, ४) म्हणजे केवळ पापमय कामे टाळण्यापेक्षाही अधिक काही करण्याची गरज होती. “दुष्कर्माचा द्वेष करणे” असा याचा अर्थ होता.—नीतिसूत्रे ८:१३.

यहोवाने प्रेमळपणे इत्थंभूत नियम दिले जेणेकरून इस्राएल राष्ट्रास पाप ओळखता आणि टाळता येऊ शकत होते. (रोमकर ७:७, १२) या नियमांत नैतिकतेविषयी कडक मार्गदर्शिका होत्या. व्यभिचार, समलिंगी कृत्ये, गोत्रगमन आणि पशूगमन या सर्व गोष्टी अपवित्र आध्यात्मिक प्रदूषक म्हणून ओळखल्या गेल्या. (लेवीय १८:२३; २०:१०-१७) अशा नीच कार्यांसाठी अपराधी ठरलेल्या लोकांचा इस्राएल राष्ट्रामधून उच्छेद करण्यात आला.

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळी जेव्हा ‘देवाचे इस्राएल’ बनले तेव्हा त्यांच्यासाठीही अशाच प्रकारचे नियम देण्यात आले. (गलतीकर ६:१६) ख्रिश्‍चनांनी देखील ‘वाईटाचा वीट’ मानायचा होता. (रोमकर १२:९) इस्राएलास दिलेले यहोवाचे शब्द त्यांना सुद्धा लागू झाले: “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” (१ पेत्र १:१५, १६) अशा प्रकारची अपवित्र कामे जसे, की जारकर्म, व्यभिचार, समलिंगी कामे, पशूगमन आणि गोत्रगमन या गोष्टींद्वारे मंडळीने भ्रष्ट व्हावयाचे नव्हते. अशा गोष्टी करण्याचे थांबविण्यास नकार देणारे देवाच्या राज्यापासून वंचित राहतील. (रोमकर १:२६, २७; २:२२; १ करिंथकर ६:९, १०; इब्री लोकांस १३:४) या ‘शेवटल्या काळातील’ ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ हेच दर्जे लागू होतात. (२ तीमथ्य ३:१; योहान १०:१६) परिणामी, अभिषिक्‍त ख्रिस्ती आणि दुसरी मेंढरे स्वच्छ आणि निरोगी लोक होतात जेणेकरून यहोवाचे साक्षीदार या नात्याने ते त्यांच्या देवाच्या नावाचा अंगीकार करू शकतात.—यशया ४३:१०.

मंडळी शुद्ध ठेवणे

उलटपक्षी, जग सर्व प्रकारच्या अनैतिकतेकडे दुर्लक्ष करते. खरे ख्रिस्ती वेगळे असले तरी त्यांनी हे विसरता कामा नये, की सध्या यहोवाची सेवा करीत असलेले अनेक जण एके काळी या जगातच होते. “बेतालपणात” गुरफटून पापी शरीराच्या इच्छांप्रमाणे आणि विचारांप्रमाणे वागण्यात काही वावगे नाही, असे आपल्या पवित्र देवाला ओळखण्यापूर्वी अनेकांना वाटत होते. (१ पेत्र ४:४) राष्ट्रांतील नीच लोकांच्या घृणित परिपाठांचे वर्णन केल्यानंतर प्रेषित पौलाने म्हटले: “तुम्हांपैकी कित्येक तसे होते.” तथापि, त्याने पुढे असे म्हटले: “तरी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.”—१ करिंथकर ६:११.

किती सांत्वना देणारे हे विधान! एखाद्या मनुष्याने आपल्या आधीच्या जीवनात काहीही केले असले तरी ख्रिस्ताविषयीच्या वैभवी सुवार्तेचा त्याच्या हृदयावर परिणाम होतो तेव्हा तो स्वतःमध्ये परिवर्तन करतो. तो विश्‍वास बाळगतो आणि यहोवा देवाला स्वतःचे समर्पण करतो. तेथून पुढे तो देवाच्या दृष्टीने धुतलेले शुद्ध नैतिक जीवन जगतो. (इब्री लोकांस ९:१४) त्याने आधी केलेल्या पातकांची क्षमा केली जाते आणि तो ‘पुढील गोष्टींकडे लक्ष लावू’ शकतो.a—फिलिप्पैकर ३:१३, १४; रोमकर ४:७, ८.

यहोवाने पश्‍चात्तापी दावीदाला त्याने केलेल्या हत्येची आणि व्यभिचाराची क्षमा केली तसेच यहोवाने मनश्‍शेलाही त्याने केलेली अनैतिक मूर्तिपूजा आणि अतिशय रक्‍तपात यांची क्षमा केली. (२ शमुवेल १२:९, १३; २ इतिहास ३३:२-६, १०-१३) आपण पश्‍चात्ताप केल्यास तसेच प्रामाणिकपणे आणि नम्रपणे त्याच्याकडे गेल्यास तो आपल्याला क्षमा करण्यास तयार असतो यामुळे आपण त्याचे खरोखरच कृतज्ञ होऊ शकतो. यहोवाने दावीदाला आणि मनश्‍शेला क्षमा केली होती तरी देखील या दोघा मनुष्यांना—त्यांच्याबरोबर इस्राएलास—त्यांच्या पापमय कृत्यांच्या परिणामांनिशी जीवन जगावे लागले. (२ शमुवेल १२:११, १२; यिर्मया १५:३-५) त्याचप्रमाणे, पश्‍चात्तापी पापी लोकांस यहोवा क्षमा करतो तरी सुद्धा त्यांच्या कृत्यांचे असे काही परिणाम असू शकतात जे टाळता येऊ शकत नाहीत.

अपरिहार्य परिणाम

उदाहरणार्थ, अनैतिक स्वैरवर्तन आचरणारा आणि एड्‌स रोगाची लागण झालेला एखादा मनुष्य सत्याचा स्वीकार करील आणि स्वतःच्या जीवनात परिवर्तन करून समर्पण करील आणि बाप्तिस्मा घेईल. आता तो आध्यात्मिकरीत्या शुद्ध ख्रिस्ती असून देवासोबत त्याचा नातेसंबंध आहे आणि भवितव्यासाठी त्याला वैभवी आशा आहे; तरी देखील त्याला अद्यापही एड्‌स आहेच. या रोगामुळे तो कालांतराने मरण पावेल, दुःखद परंतु त्याच्या आधीच्या वर्तनाचा अटळ परिणाम. काही ख्रिश्‍चनांच्या बाबतीत गतकाळातील गंभीर अनैतिकतेचे परिणाम कदाचित इतर मार्गांनी कायम राहतील. त्यांच्या बाप्तिस्म्याच्या काही वर्षांनंतर, कदाचित या व्यवस्थीकरणातील त्यांच्या उर्वरित जीवनकालापर्यंत देखील पूर्वीच्या अनैतिक जीवनशैलीमध्ये परतण्याच्या त्यांच्या शरीरातील उत्कट इच्छांच्या विरोधात त्यांना संघर्ष करावा लागेल. अनेक जण यहोवाच्या आत्म्याच्या मदतीद्वारे विरोध करण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु त्यांना हा संघर्ष कायमस्वरूपी करावा लागतो.—गलतीकर ५:१६, १७.

अशा प्रकारचे लोक जोपर्यंत आपल्या उत्कट इच्छा नियंत्रणात ठेवतात तोपर्यंत ते पाप करत नाहीत. परंतु ते पुरुष असल्यास शक्‍तिमान शारीरिक आवेगांशी संघर्ष करीत असताना ते कदाचित मंडळीतील जबाबदारी न ‘मिळविण्याचे’ सुज्ञपणे ठरवतील. (१ तीमथ्य ३:१) असे का? कारण त्यांना माहीत आहे, की मंडळी वडिलांवर विश्‍वास ठेवते. (यशया ३२:१, २; इब्री लोकांस १३:१७) वडिलांसोबत अनेक खासगी बाबींवर विचार-विनिमय केला जातो आणि त्यांना नाजूक परिस्थिती हाताळावी लागते हे ते ओळखून आहेत. अशुद्ध शारीरिक इच्छांच्या विरोधात सतत संघर्ष करीत असताना अशा प्रकारचे जबाबदारीचे स्थान मिळविण्यासाठी एखाद्याने केलेला प्रयत्न त्याच्यासाठी प्रेमळपणाचा, सुज्ञतेचा तसेच वाजवी देखील होणार नाही.—नीतिसूत्रे १४:१६; योहान १५:१२, १३; रोमकर १२:१.

बाप्तिस्मा घेण्यापूर्वी एखादा मनुष्य बालक दुर्व्यवहार करणारा असल्यास इतर परिणाम होऊ शकतो. तो जेव्हा सत्य शिकतो तेव्हा ते क्रूर पाप मंडळीत न आणण्याद्वारे तो पश्‍चात्ताप करतो आणि परिवर्तन करतो. त्यानंतर तो कदाचित चांगली प्रगती करील, आपल्या वाईट आवेगांवर पूर्णपणे ताबा मिळवेल आणि मंडळीतील जबाबदारीचे स्थान ‘मिळविण्याचा’ त्याचा मानस देखील असेल. तथापि, बालक दुर्व्यवहार करणारा गतकाळातील मनुष्य म्हणून त्याची समाजात अद्यापही वाच्यता होत असल्यास काय? तो ‘अदूष्य, बाहेरच्या लोकांनी चांगली साक्ष दिलेला, दोषारोपापासून मुक्‍त’ असेल का? (१ तीमथ्य ३:१-७, १०; तीत १:७) नाही, तो असणार नाही. यास्तव, तो मंडळीतील विशेषाधिकारांस पात्र ठरणार नाही.

बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती पाप करतो तेव्हा

यहोवा हे जाणतो, की आपण कमजोर आहोत आणि बाप्तिस्म्यानंतर देखील आपण पापात पडू शकतो. प्रेषित योहानाने त्याच्या दिवसांतील ख्रिश्‍चनांना लिहिले: “तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.” (१ योहान २:१, २) होय, पापात पडणाऱ्‍या बाप्तिस्माप्राप्त ख्रिश्‍चनांनी खरा पश्‍चात्ताप आणि त्यांच्या वाईट मार्गांचा त्याग केल्यास—यहोवा त्यांना येशूच्या अर्पणाच्या आधारावर क्षमा करील.

याचे उदाहरण पहिल्या शतकातील करिंथ मंडळीत दिसून आले. नवीनच स्थापन झालेल्या मंडळीतील गोत्रगमन जारकर्माची बाब प्रेषित पौलाच्या कानांवर आली आणि संबंधित मनुष्याला बहिष्कृत करण्यात यावे म्हणून त्याने सूचना दिल्या. पाप केलेल्या व्यक्‍तीने कालांतराने पश्‍चात्ताप केल्यानंतर त्याचा पुनःस्वीकार करावा, अशी शिफारस पौलाने मंडळीला केली. (१ करिंथकर ५:१, १३; २ करिंथकर २:५-९) अशा प्रकारे, यहोवाचे प्रेमळ कृपाळूपणाचे हितकारक सामर्थ्य आणि येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचे मोठे मोल यांद्वारे त्या मनुष्याची पातकापासून शुद्धी झाली. अशाच प्रकारच्या गोष्टी आज होऊ शकतात. तथापि, घोर पातक करणारा बाप्तिस्माप्राप्त मनुष्य पश्‍चात्ताप करतो तेव्हा त्याला यहोवाच्या दृष्टीने क्षमा होते, तरी देखील त्याच्या पातकाचे परिणाम त्यानंतरही कायम राहू शकतात.—नीतिसूत्रे १०:१६, १७; गलतीकर ६:७.

उदाहरणार्थ, एखाद्या बाप्तिस्माप्राप्त मुलीने जारकर्म केल्यास, ती कदाचित आपल्या कामाद्वारे वास्तविक खेद व्यक्‍त करील आणि कालांतराने मंडळीच्या मदतीने आध्यात्मिक आरोग्य पुनः संपादित करील. परंतु तिच्या अनैतिकतेमुळे तिला दिवस गेले तर? आता मात्र तिने जे काही केले होते त्यामुळे तिचे संपूर्ण जीवन अटळपणे बदलले आहे. व्यभिचार करणारा मनुष्य पश्‍चात्ताप करील आणि कदाचित त्याला बहिष्कृत केले जाणार नाही. परंतु त्याच्या निरपराध विवाहित पत्नीकडे त्याला घटस्फोट देण्यासाठी शास्त्रवचनीय आधार आहे आणि कदाचित ती तसे करण्याची निवड देखील करील. (मत्तय १९:९) तिने असे केल्यास, या मनुष्याला जरी यहोवाने क्षमा केलेली असली तरी केलेल्या पापाचे मोठे परिणाम त्याला आपल्या उर्वरित जीवनात भोगावे लागतील.—१ योहान १:९.

दुसऱ्‍या स्त्रीशी विवाह करण्यास्तव आपल्या पत्नीचा निर्दयीपणे घटस्फोट देणाऱ्‍या मनुष्याबद्दल काय? कदाचित तो कालांतराने पश्‍चत्ताप करील आणि मंडळीत त्याचा पुनःस्वीकार करण्यात येईल. काही वर्षांनंतर तो प्रगती करील आणि “प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न” करील. (इब्री लोकांस ६:२) परंतु जोपर्यंत त्याची पहिली बायको सोबत्याविना राहते तोपर्यंत तो मंडळीतील जबाबदारीच्या पदावर सेवा करण्यासाठी पात्र ठरणार नाही. पहिल्या बायकोला घटस्फोट देण्यासाठी त्याच्याकडे शास्त्रवचनीय आधार नसल्यामुळे तो “एका स्त्रीचा पति” नाही.—१ तीमथ्य ३:२, १२.

ख्रिश्‍चनाने वाईटाचा वीट का विकसित करावा हे समजण्यासाठी ही सबळ कारणे नाहीत का?

बालक दुर्व्यवहार करणाऱ्‍याविषयी काय?

बाप्तिस्माप्राप्त प्रौढ मनुष्य एखाद्या मुलाशी लैंगिकरीत्या दुर्व्यवहार करीत असल्यास काय? हा पापी मनुष्य इतका वाईट आहे का ज्यास यहोवा कधीही क्षमा करणार नाही? असे शंभर टक्के म्हणता येणार नाही. “पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण” अक्षम्य असल्याचे येशूने म्हटले. सत्याचे ज्ञान मिळाल्यानंतर देखील बुद्धिपुरस्सर जो पाप करीत राहतो अशा पापांबद्दल यापुढे यज्ञ नाही, असे पौलाने म्हटले. (लूक १२:१०; इब्री लोकांस १०:२६, २७) परंतु एखाद्या मुलाशी गोत्रगमन अथवा इतर प्रकारे—लैंगिक दुर्व्यवहार करणाऱ्‍या प्रौढ ख्रिश्‍चनाला—क्षमा मिळू शकत नाही, असे बायबल कोठेही म्हणत नाही. खरोखर, त्याने मनापासून प्रामाणिकपणे पश्‍चात्ताप केल्यास आणि आपल्या वागणुकीत बदल केला तर त्याची पातके धुऊन शुद्ध होऊ शकतात. तथापि, त्याने विकसित केलेल्या चुकीच्या शारीरिक आवेगांच्या विरोधात अद्यापही संघर्ष करणे त्याच्यासाठी अगत्याचे असेल. (इफिसकर १:७) तो टाळू शकणार नाही असे परिणाम देखील असू शकतात.

तो ज्याठिकाणी राहतो तेथील नियमाच्या आधारावर दुर्व्यवहार करणाऱ्‍यास कदाचित कारावास भोगावा लागेल किंवा शासन त्याच्यावर इतर प्रकारचे निर्बंध लागू करील. यावेळी मंडळी त्याला पाठीशी घालणार नाही. खेरीज, या मनुष्याने गंभीर दोष दाखविलेला आहे त्यामुळे त्या दोषावर विचार करण्यात येईल. तो पश्‍चात्तापी वाटल्यास आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी, क्षेत्र सेवेत सहभागी होण्यासाठी, ईश्‍वरशासित प्रशालेत आणि सेवा सभेतील थेटपणे उपदेश न देणाऱ्‍या भागांत सहभागी होण्यासाठी त्याला उत्तेजन देण्यात येईल. परंतु याचा असा अर्थ होत नाही, की तो मंडळीतील जबाबदारीच्या पदावर सेवा करण्यासाठी पात्र ठरेल. याची शास्त्रवचनीय कारणे कोणती आहेत?

याचे एक कारण म्हणजे, वडिलाने “संयमी” असले पाहिजे. (तीत १:८) हे खरे आहे, की आपल्यांपैकी कोणीही संयमात परिपूर्ण नाही. (रोमकर ७:२१-२५) परंतु बालक लैंगिक दुर्व्यवहारच्या पापात पडणारा प्रौढ समर्पित ख्रिस्ती विकृत शारीरिक कमतरता प्रकट करतो. अनुभवाने हे दाखवून दिले आहे, की अशा प्रकारचा प्रौढ मनुष्य इतर मुलांशी दुर्व्यवहार करील. हे खरे, की बालक दुर्व्यवहार करणारा प्रत्येक जण हे पाप पुनःपुन्हा करणार नाही, परंतु अनेक जण तसे करतात. मुलांशी पुन्हा दुर्व्यवहार करण्यास जबाबदार कोण आहे आणि कोण नाही, हे सांगण्यासाठी मंडळी हृदय पारखू शकत नाही. (यिर्मया १७:९) यास्तव, पौलाने तीमथ्याला दिलेला सल्ला मुलांशी दुर्व्यवहार केलेल्या बाप्तिस्माप्राप्त प्रौढांच्या बाबतीत खास अर्थाने लागू होतो: “उतावळीने कोणावर हात ठेवू नको, आणि दुसऱ्‍याच्या पापांत तुझे अंग असू नये.” (१ तीमथ्य ५:२२) आपल्या मुलांच्या संरक्षणार्थ, बालक दुर्व्यवहार करणारा म्हणून ओळखण्यात येणारा मनुष्य मंडळीतील जबाबदारीच्या पदासाठी पात्र ठरत नाही. याशिवाय तो पायनियर होऊ शकत नाही अथवा इतर विशेष अर्थात पूर्ण-वेळेची सेवा करू शकत नाही.—निर्गम २१:२८, २९ येथील तत्त्व पडताळा.

काही जण कदाचित विचारतील, ‘काहींनी इतर प्रकारची पातके करून पश्‍चात्ताप केला नाही का आणि नंतर पुन्हा आपल्या पापाची पुनरावृत्ती केली नाही का?’ होय, असे झाले आहे, पण इतर बाबींचा देखील विचार करण्यास हवा. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य दुसऱ्‍या प्रौढ व्यक्‍तीकडे अनैतिक आगेकूच करतो, तेव्हा त्या प्रौढ व्यक्‍तीने त्याच्या अथवा तिच्या आगेकुचीस प्रतिकार करण्यास हवा. मुलांना फसवणे, संभ्रमात टाकणे किंवा दहशत बसविणे अधिक सोपे असते. मुलांच्या अल्पबुद्धीविषयी बायबल सांगते. (नीतिसूत्रे २२:१५; १ करिंथकर १३:११) नम्र निष्पापपणाचे उदाहरण म्हणून येशूने मुलांचा वापर केला. (मत्तय १८:४; लूक १८:१६, १७) अनुभवाचा पूर्णपणे अभाव या गोष्टीचा मुलांच्या निष्पापपणात समावेश होतो. बहुतेक मुले मन-मोकळी, आनंद देण्यासाठी उत्सुक असतात आणि अशा प्रकारे ही मुले ओळखीच्या व विश्‍वासातल्या कारस्थानी प्रौढ मनुष्याच्या दुर्व्यवहाराचे लक्ष्य ठरतात. यास्तव, मंडळीच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी मंडळी यहोवासमोर जबाबदार आहे.

चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळालेली मुले आपल्या पालकांची, वडिलांची आणि इतर प्रौढ व्यक्‍तींची आज्ञा पाळण्याचे आणि त्यांचा सन्मान करण्याचे शिकतात. (इफिसकर ६:१, २; १ तीमथ्य ५:१, २; इब्री लोकांस १३:७) या सन्मानित व्यक्‍तींपैकी कोणी एकाने मुलाच्या विश्‍वासाचा गैरवापर करून त्याला किंवा तिला लैंगिक कामे करावीत म्हणून जबरदस्ती केल्यास अथवा फसविल्यास तसे करणे म्हणजे धक्कादायक विपर्यास होईल. अशा प्रकारे लैंगिक दुर्व्यवहार करण्यात आलेल्यांना परिणीत होणाऱ्‍या भावनात्मक आघातावर मात करण्यासाठी बहुतेकवेळा अनेक वर्षे लागतात. यास्तव, अशा प्रकारचा बालक दुर्व्यवहार करणारा इसम मंडळीच्या कडक शिस्तीस आणि निर्बंधांस पात्र आहे. अशा वेळी जबाबदार व्यक्‍ती म्हणून त्याचा विचार होता कामा नये, उलटपक्षी मंडळीच्या निष्कलंक शुद्धतेचा विचार करण्यात यावा.—१ करिंथकर ५:६; २ पेत्र ३:१४.

बालक दुर्व्यवहार करणारा खरोखर पश्‍चात्ताप करत असल्यास बायबल तत्त्वांच्या अवलंबनातील सुज्ञता तो ओळखेल. वाईटाचा वीट करण्याचे तो खरोखर शिकत असल्यास त्याने आधी जे केले त्याचा तो तिरस्कार करील आणि आपल्या पापाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तो शिकस्त करील. (नीतिसूत्रे ८:१३; रोमकर १२:९) तसेच, तो यहोवाच्या प्रेमाच्या महानतेसाठी त्याचे निश्‍चितच आभार व्यक्‍त करील ज्याचा परिणाम म्हणून त्याच्यासारखा पश्‍चात्तापी पापी आपल्या पवित्र देवाची अद्यापही उपासना करू शकतो आणि या पृथ्वीवर जे राहतील त्या “सरळ” जणांमध्ये असल्याची अपेक्षा करू शकतो.—नीतिसूत्रे २:२१.

[तळटीपा]

a मे १, १९९६ या टेहळणी बुरूज अंकातील “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.

[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]

पश्‍चात्तापी पापी लोकांस यहोवा क्षमा करतो तरी सुद्धा त्यांच्या कृत्यांचे असे काही परिणाम असू शकतात जे टाळता येऊ शकत नाहीत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा