बायबलने बदललं जीवन
“आता मला स्वत:ची किळस वाटत नाही, आणि मी खूप आनंदी आहे”—व्हिक्टोरिया टाँग
जन्म: १९५७
देश: ऑस्ट्रेलिया
पार्श्वभूमी: दुःखात गेलेलं लहानपण
माझं आधीचं जीवन:
मी ऑस्ट्रेलियाच्या न्यू कॅसल शहरातच लहानाची मोठी झाले. सात भावंडांमध्ये मी सगळ्यात मोठी होते. वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि आमचे आईवडील दोघंही खूप हिंसक होते. माझी आई मला खूप मारायची आणि खूप शिव्याही द्यायची. ती मला सारखी म्हणायची की ‘तू खूप वाईट आहेस, तू नरकात जळशील.’ ती असं बोलायची तेव्हा मला खूप भीती वाटायची.
माझी आई मला इतकं मारायची की बऱ्याचदा मला शाळा बुडवावी लागायची. त्यामुळे मी ११ वर्षांची असताना अधिकाऱ्यांनी मला आईवडिलांच्या ताब्यातून सोडवलं. त्यांनी मला आधी सरकारी संस्थेत आणि नंतर एका कॅथलिक आश्रमात ठेवलं. मग १४ वर्षांची झाल्यावर मी त्या आश्रमातून पळून गेले. मला घरी परत जायचं नव्हतं म्हणून मी सिडनी शहराच्या रस्त्यांवर राहू लागले.
रस्त्यांवर राहताना मला ड्रग्सचं आणि दारूचं व्यसन लागलं. तसंच मला अश्लील साहित्य पाहायची सवयही लागली. पुढे मी वेश्या बनले. एकदा तर मला एक खूप भयानक अनुभव आला. त्या वेळी मी काही दिवसांपासून एका माणसाच्या घरी राहत होते. त्याच्या मालकीचं नाईट क्लब होतं. एकदा दोन माणसं त्याला भेटायला आली तेव्हा त्याने मला आतल्या खोलीत पाठवलं. पण तरी मला त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. तो नाईट क्लबचा मालक मला त्या माणसांना विकायच्या गोष्टी करत होता. ती माणसं मला एका मालवाहू जहाजाच्या आत लपवून जपानला नेणार होती. तिथे मला एका बारमध्ये काम करायला लावायचा त्यांचा विचार होता. हे ऐकून मी खूप घाबरले. मी गॅलरीतून उडी टाकली आणि तिथून पळून गेले.
मग मला एक माणूस भेटला, जो सिडनीला फिरायला आला होता. मी त्याला माझ्यासोबत जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं. तो मला पैसे देईल असं मला वाटलं, पण माझी वाईट अवस्था पाहून त्याला माझी दया आली. आणि बऱ्याच वेळापासून मी काही खाल्लंही नव्हतं म्हणून तो जिथे राहत होता त्या ठिकाणी तो मला घेऊन गेला. तेव्हापासून मी तिथेच राहू लागले आणि एका वर्षानंतर आम्ही लग्न केलं.
बायबलने जीवन कसं बदललं?
मी जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागले तेव्हा सुरुवातीला माझ्या मनात खूप वेगवेगळ्या भावना आल्या. वाईट गोष्टींसाठी सैतान जबाबदार आहे हे समजल्यावर मला खूप राग आला. कारण लहानपणापासून मला हेच शिकवण्यात आलं होतं की देवच आपल्याला दुःख देतो. आणि जेव्हा मला कळलं की तो लोकांना शिक्षा देण्यासाठी नरकाच्या आगीत टाकत नाही, तेव्हा मला खूप दिलासा मिळाला. कारण अगदी लहानपणापासून मला या गोष्टीची खूप भीती वाटत होती.
साक्षीदारांबद्दल मला एक गोष्ट खूप आवडली. ती म्हणजे हे लोक आपला प्रत्येक निर्णय बायबलच्या तत्त्वांनुसार घेतात. ते विश्वासाबद्दल फक्त बोलतच नाहीत, तर त्याप्रमाणे वागतातसुद्धा. खरंतर, कोणाचंही माझ्याशी लगेच पटेल असा माझा स्वभाव नव्हता. पण तरीसुद्धा मी काहीही बोलले किंवा कसंही वागले, तरी साक्षीदार माझ्याशी नेहमी प्रेमाने आणि आदराने वागायचे.
आधी आलेल्या अनुभवांमुळे माझ्यात जराही आत्मसन्मान उरला नव्हता. खरंतर मला स्वतःची किळस वाटायची. आणि या भावनांशी झगडणं मला सगळ्यात कठीण गेलं. साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाल्यावरही बऱ्याच काळापर्यंत या भावना माझ्या मनात येतच राहिल्या. माझं यहोवावर प्रेम होतं. पण मला असं वाटायचं, की माझ्यासारख्या व्यक्तीवर यहोवा प्रेम करूच शकत नाही.
मग माझ्या बाप्तिस्म्याच्या १५ वर्षांनंतर असं काहीतरी घडलं, ज्यामुळे मी वेगळ्या प्रकारे विचार करू लागले. एकदा राज्य सभागृहात भाषण देताना एका भावाने याकोब १:२३, २४ या वचनांचा अर्थ समजावून सांगितला. त्यात सांगितलंय की देवाचं वचन एका आरशासारखं आहे. आणि जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा यहोवा आपल्याला जसं पाहतो तसं आपण स्वतःला पाहू शकतो. हे ऐकल्यावर मी विचार करू लागले, की यहोवा मला जसं पाहतो आणि मी जसं स्वतःला पाहते त्याच्यात फरक तर नाही ना? मला जाणवलं की फरक होता. पण तरी माझं मन हे मानायला तयार नव्हतं. मला अजूनही असं वाटत होतं, की माझ्यासारख्या व्यक्तीवर यहोवा प्रेम करेल हे शक्यच नाही.
मग काही दिवसांनंतर मी एक वचन वाचलं. त्यामुळे माझं जीवनच बदललं. ते वचन होतं, यशया १:१८. त्यात यहोवा म्हणतो, “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन. तुमची पापं रक्तासारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी शुभ्र केली जातील.” मला असं वाटलं की यहोवा म्हणतोय, “चल विकी, आपण बोलूया. मी तुला ओळखतो. तुझ्या हातून झालेल्या चुका मला माहितीएत. पण तरी मी तुझं मन पाहिलंय आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
त्या दिवशी मला झोपच लागली नाही. यहोवा माझ्यावर प्रेम करू शकतो हे अजूनही मला खरं वाटत नव्हतं. पण मग मी येशूच्या खंडणी बलिदानाबद्दल विचार करू लागले. तेव्हा अचानक मला जाणवलं की यहोवा इतक्या वर्षांपासून माझ्या बाबतीत धीर दाखवत होता. आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे तो मला वेगवेगळ्या मार्गांनी दाखवत होता. पण त्याबदल्यात इतकी वर्षं मी त्याला असं म्हणत होते, “तुझं मन इतकं मोठं कसं असू शकतं, की तू माझ्यावरही प्रेम करशील? माझी पापं इतकी मोठीएत की तुझ्या मुलाचं बलिदान अपुरं पडेल.” जणू काही यहोवाने दिलेली खंडणीची भेट मी झिडकारत होते, नाकारत होते. पण शेवटी, खंडणीच्या सुंदर भेटीबद्दल विचार केल्यावर मला हे जाणवलं की यहोवाचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे.
मला झालेला फायदा:
आता मला स्वत:ची किळस वाटत नाही, आणि मी खूप आनंदी आहे. माझे आणि माझ्या पतीचे संबंधसुद्धा आणखी सुधारले आहेत. आणि माझ्या अनुभवांमुळे मी दुसऱ्यांना मदत करू शकते, याचा मला खूप आनंद आहे. आता यहोवासोबतचं माझं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चाललंय.