त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
इसहाकसाठी वधू शोधणे
विहिरीच्या जवळ बसलेला तो वयस्कर मनुष्य फार थकलेला होता. त्याने आणि त्याच्या सेवकांनी आपल्या दहा उंटावरून नजीकच्या बैरशेबापासून ते उत्तरेकडील अरामनहराईम [मेसोपोटामिया] असा प्रवास केला होता—हे अंतर ८०० किलोमीटर पेक्षाही अधिक आहे.a ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहंचले तेव्हा हा दमलेला प्रवासी या ठिकाणी त्याला पार पाडावयाच्या कामगिरीचा विचार करण्यासाठी विसावला. हा इसम होता तरी कोण आणि त्याने हा दमछाक करून टाकणारा प्रवास का केला होता?
हा मनुष्य अब्राहामाच्या ‘घरातील सर्वांत जुना’ सेवक होता. (उत्पत्ति २४:२) या अहवालात त्याचे नाव नसले तरी तो अलियेजर होता हे उघड आहे कारण ‘माझ्या घरात जन्मलेला पुत्र’ असे अब्राहामाने ज्याविषयी म्हटले तो त्याचा ‘वारस व्हावयाचा’ होता. (उत्पत्ति १५:२, ३, NW) अर्थात, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा अब्राहाम आणि सारा अनपत्य होते. आता त्यांचा पुत्र इसहाक ४० वर्षांचा झाला होता आणि अलियेजर जरी अब्राहामाचा प्रमुख वारस नसला तरी तो अद्यापही त्याचा सेवक होता. म्हणून अब्राहामाने त्याला आव्हानात्मक विनंती केली तेव्हा त्याने त्याप्रमाणे केले. ती आव्हानात्मक विनंती कोणती होती?
आव्हानात्मक कामगिरी
अब्राहामाच्या दिवसांत विवाहाचा परिणाम केवळ कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण वंश किंवा प्राचीन समाजावरही होत असे. यास्तव, पालकांनी आपल्या मुलांसाठी विवाहसोबती शोधण्याचा तेव्हाचा प्रघात होता. तथापि, आपला पुत्र इसहाक यासाठी वधू शोधण्याच्या संबंधाने अब्राहामाला पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागले. स्थानिक कनानी लोकांच्या अधम मार्गांमुळे त्यांच्यापैकी एखादी मुलगी करण्याचा विचार मनात आणणे सुद्धा अशक्य होते. (अनुवाद १८:९-१२) पुरुषाने आपल्या वंशात विवाह करावा, असा तेव्हाचा परिपाठ असला तरी अब्राहामाचे नातेवाईक शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या उत्तरेकडील मेसोपोटामियात राहत होते. परंतु अब्राहाम इसहाकला त्याठिकाणी घेऊन जाऊ शकत नव्हता कारण यहोवाने त्याला अभिवचन दिले होते: “हा देश [कनान देश] मी तुझ्या संततीला देईन.” (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति २४:७) यास्तव अब्राहामाने अलियेजरला म्हटले: “माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी [तू] नवरी पाहून आणशील.”—उत्पत्ति २४:४.
लांबचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, अलियेजर विहिरीच्या शेजारी विश्रांती घेत असता त्याच्यावर सोपविलेल्या कामगिरीचा विचार करत होता. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यासाठी विहिरीवर येतील हे त्याने ओळखले. यास्तव, त्याने यहोवाला याचना केली: “असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासहि मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो; यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे.”—उत्पत्ति २४:१४.
तो अद्याप प्रार्थना करीत होता तोच रिबका नामक कोणी एक सुंदर तरुणी तेथे आली. अलियेजरने तिला म्हटले: “तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज.” रिबकेने त्याला पाणी पाजले आणि असे म्हटले: “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांस पोटभर पाजते.” असे म्हणणे, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला यासारखी गोष्ट नव्हती कारण तहान लागलेला एक उंट फक्त दहा मिनिटांत ९५ लिटर पाणी पिऊ शकतो! अलियेजरच्या उंटांना तेवढी तहान लागलेली असो किंवा नसो परंतु रिबकेला हे ठाऊक होते, की तिने प्रस्तुत केलेली सेवा पूर्ण करण्यासाठी तिला परिश्रम करावे लागणार होते. खरोखर, “तिने त्वरा करून घागर डोणीत रिचविली व पुनः पाणी आणावयास ती विहिरीकडे धावत गेली; असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले.”—उत्पत्ति २४:१५-२०.
यहोवाच्या मार्गदर्शनाची जाण होऊन अलियेजरने तिला सोन्याची नथ आणि दोन बांगड्या दिल्या ज्यांचे मूल्य आजच्या सुमारे १,४०० डॉलर इतके होते. अब्राहामाचा भाऊ नाहोर याची आपण नात असल्याचे रिबकेने सांगितले तेव्हा अलियेजरने यहोवाला प्रार्थना करून त्याचे आभार मानले. त्याने म्हटले: “परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावाच्या घरी पोचविले आहे.” (उत्पत्ति २४:२२-२७) अलियेजरला रिबकेच्या कुटुंबाकडे आणण्यात येते. कालांतराने रिबका इसहाकची पत्नी झाली आणि मशीहाची अर्थाच ख्रिस्ताची पूर्वज होण्याचा सुहक्क तिला प्राप्त झाला.
आपल्यासाठी धडा
इसहाकसाठी देवभीरू नवरी शोधण्याचे अलियेजरचे प्रार्थनापूर्वक प्रयत्न यहोवाने आशीर्वादित केले. तथापि, हे लक्षात ठेवा, की अब्राहामापासून संतान उत्पन्न करण्याच्या यहोवाच्या उद्देशाशी इसाहकाच्या विवाहाचा थेट संबंध होता. यामुळे या अहवालाद्वारे आपण असा निष्कर्ष काढता कामा नये, की जो कोणी विवाहसोबत्यासाठी प्रार्थना करतो त्याला तो विवाहसोबती चमत्काराने प्राप्त होईल. परंतु आपण यहोवाच्या तत्त्वांना जडून राहिल्यास जीवनातील परिस्थितीमुळे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यास तो आपल्याला सामर्थ्य देईल—मग ती आव्हाने वैवाहिक जीवनात असोत अगर सडेपणात असोत.—१ करिंथकर ७:८, ९, २८; पडताळा फिलिप्पैकर ४:११-१३.
यहोवाच्या पद्धतीने गोष्टी करण्यासाठी अलियेजरला प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. आपल्याला देखील हे दिसून येईल, की यहोवाच्या दर्जांशी तंतोतंत जुळवून घेणे प्रत्येक वेळी इतके सोपे नसते. उदाहरणार्थ, ईश्वरशासित कार्यात विघ्न न आणणारी नोकरी, देवभीरू विवाहसोबती, उभारणीकारक सोबती, हिणकस नसणारे मनोरंजन प्राप्त करणे कदाचित अवघड असेल. (मत्तय ६:३३; १ करिंथकर ७:३९; १५:३३; इफिसकर ४:१७-१९) तरी देखील बायबल तत्त्वांसंबंधी हातमिळवणी करण्याचे नाकारणाऱ्यांस यहोवा सामर्थ्य देऊ शकतो. बायबल अभिवचन देते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.
[तळटीप]
a उंटांचा सरासरी वेग विचारात घेतला तर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी २५ पेक्षा अधिक दिवस लागले असतील.