संयुक्त कुटुंब या नात्याने यहोवाची सेवा करणे
ॲन्टोन्यू सांतालोर यांच्याद्वारे कथित
माझ्या बाबांनी सन १९१९ मध्ये इटली सोडली तेव्हा ते १७ वर्षांचे होते. उत्तम जीवनाच्या शोधात ते ब्राझील येथे राहण्यास गेले. कालांतराने, साउ पाउलु राज्याच्या कुशीतील एका लहान नगरात त्यांनी न्हाव्याचे एक दुकान टाकले.
सन १९३८ मध्ये मी सात वर्षांचा होतो तेव्हा एके दिवशी बाबांनी त्यांच्या दुकानात आलेल्या एका मनुष्याकडून बायबलचा ब्राझीलेर अनुवाद प्राप्त केला. दोन वर्षांनंतर आई खूप आजारी पडली आणि मृत्यूपर्यंत ती तशीच राहिली. बाबाही आजारी पडले, म्हणून आम्ही सर्व जण, म्हणजे आई, बाबा, माझी बहीण ॲन व मी साउ पाउलु शहरातील आमच्या नातेवाईकांकडे राहायला गेलो.
साउ पाउलु येथे शिकत असताना मी, विशेषकरून ऐतिहासिक लिखाणांचा उत्सुक वाचक बनलो. त्यांच्यामध्ये अधूनमधून बायबलचा उल्लेख केला जात असे हे पाहून मी प्रभावित झालो. साउ पाउलु सार्वजनिक ग्रंथालयातून मी उसने घेतलेल्या एका कादंबरीत अनेक वेळा डोंगरावरील प्रवचनाचा उल्लेख होता. तेव्हाच, मला ते प्रवचन स्वतः वाचून काढायचे होते म्हणून मी एक बायबल मिळवण्याचा निश्चय केला. पुष्कळ वर्षांआधी बाबांनी प्राप्त केलेले बायबल मी शोधू लागलो आणि मला ते एका पेटीच्या तळाला ठेवल्याचे आढळून आले; ते तिथे सात वर्षांपासून पडून होते.
आमचे कुटुंब कॅथलिक असल्यामुळे मला केव्हाही बायबल वाचण्याचे उत्तेजन मिळाले नव्हते. आता, मी त्यातील अध्याय आणि वचन स्वतःहून काढण्यास शिकलो. मी त्यातले केवळ डोंगरावरील प्रवचनच नव्हे तर मत्तयाचे संपूर्ण पुस्तक व इतर बायबल पुस्तकेही आवडीने वाचून काढली. ज्या वैशिष्ट्याने येशूच्या शिकवणुकी व चमत्कार सादर केले होते त्यामुळे मी प्रभावित झालो.
कॅथलिक धर्म, मी बायबलमधून ज्या गोष्टी वाचल्या त्याच्यापेक्षा किती वेगळा असल्याची मला जाणीव झाल्यामुळे मी प्रेसबिटेरीयन चर्चला जाऊ लागलो आणि ॲनही माझ्याबरोबर येऊ लागली. तरीपण, माझ्या अंतःकरणात मला एकप्रकारची पोकळी जाणवली. अनेक वर्षांपासून मी उत्सुकतेने देवाचा शोध घेत होतो. (प्रेषितांची कृत्ये १७:२७) एका चांदण्या रात्री मी विचारमग्न होतो तेव्हा ‘मी येथे का आहे? जीवनाचा उद्देश काय आहे?’ असे प्रश्न माझ्या मनात आले. घराच्या परड्यात एका विविक्त ठिकाणी मी गेलो, गुडघे टेकले आणि प्रार्थना केली, ‘प्रभू देवा, तू आहेस तरी कोण? मला तुझी ओळख कशी होऊ शकेल?’ त्यानंतर, थोड्या कालावधीतच मला माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले.
बायबल सत्य शिकणे
सन १९४९ मध्ये एके दिवशी, बाबा स्ट्रीटकारमधून खाली उतरत असताना एक तरुण स्त्री त्यांच्याजवळ आली. तिने त्यांना टेहळणी बुरुज व सावध राहा! नियतकालिके दिली. त्यांनी टेहळणी बुरुज नियतकालिकाची वर्गणी भरली आणि तिला आमच्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन सांगितले, की त्यांना दोन मुले आहेत जी प्रेसबिटेरियन चर्चला जातात. त्या स्त्रीच्या भेटीदरम्यान, तिने ॲनला मुले (इंग्रजी) नावाचे एक पुस्तक देऊन तिच्यासोबत एक बायबल अभ्यास चालू केला. नंतर मीही अभ्यासाला बसू लागलो.
नोव्हेंबर १९५० मध्ये आम्ही पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. तेथे देव सत्य होवो हे पुस्तक प्रकाशित झाले आणि आम्ही त्या पुस्तकाचा आमचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करून बायबल अभ्यास करीत राहिलो. आम्हाला लगेचच समजून आले, की आम्हाला सत्य मिळाले होते व एप्रिल १९५१ मध्ये आम्ही यहोवाला आमच्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. बाबांनीही काही वर्षांनंतर आपले समर्पण केले व १९८२ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत देवासोबत ते विश्वासू राहिले.
पूर्ण-वेळेच्या सेवेत आनंदी
जानेवारी १९५४ मध्ये, मी अजूनही २२ वर्षांचा होतो तेव्हा, यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तरात, ज्याला बेथेल म्हटले जाते तेथे सेवा करण्यासाठी मला स्वीकारण्यात आले. तेथे पोहंचल्यावर मला कळाले, की रिचर्ड मुक नामक एक व्यक्ती जो माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठा होता तो शाखा पर्यवेक्षक आहे. सन १९५५ मध्ये प्रवासी पर्यवेक्षकांची, ज्यांना तेव्हा विभागीय सेवक म्हटले जाई, अत्यंत गरज होती त्यावेळी या सेवेत कार्य करण्यासाठी पाच जणांची निवड करण्यात आली ज्यामध्ये माझा देखील समावेश होता.
मला रीओ ग्रांदे दो सुलच्या राज्यात नेमण्यात आले. मी तेथे कार्य करण्यास सुरवात केली तेव्हा तेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या केवळ ८ मंडळ्या होत्या पण १८ महिन्यांच्या आत २ नवीन मंडळ्या व २० एकाकी गट स्थापन झाले. आज याच क्षेत्रामध्ये, यहोवाच्या साक्षीदारांचे १५ विभाग आहेत ज्यामध्ये प्रत्येकी २० मंडळ्या समाविष्ट आहेत! सन १९५६ च्या अंताला, माझा विभाग चार लहान लहान भागांमध्ये विभागण्यात आला असून त्यामध्ये चार विभागीय सेवक कार्य करतील असे मला कळविण्यात आले. तेव्हा मला एका नवीन नेमणुकीकरता बेथेलला पुन्हा जाण्याचे मार्गदर्शन देण्यात आले.
अनेक विभागात सेवा करणारा प्रवासी सेवक अर्थात प्रांतीय सेवक म्हणून मला उत्तरेकडील ब्राझीलमध्ये नेमण्यात आले होते, हे ऐकून मला आश्चर्यही झाले व आनंदही वाटला. ब्राझीलमध्ये तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांचे १२,००० सेवक होते आणि त्या देशात दोन प्रांत होते. रिचर्ड वुटके दक्षिण भागात कार्य करीत होते आणि माझ्याकडे उत्तरेकडचा भाग होता. बेथेलमध्ये आम्हाला यहोवाच्या साक्षीदारांनी निर्माण केलेले कार्यरत असणारी नवीन जग संस्था व नवीन जग संस्थेचा आनंद हे इंग्रजी चित्रपट दाखवण्यासाठी वापरावे लागणारे चित्रदर्शक कसे चालवावे त्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
त्याकाळी प्रवास अतिशय वेगळा होता. साक्षीदारांपैकी कोणाकडेही वाहन नसल्यामुळे मी होडी, रो बोट, बैलगाडी, घोडागाडी, सामानाची गाडी, ट्रक आणि एकदा विमानाने प्रवास केला. सांतारेमेत उतरण्यासाठी ॲमझॉन जंगलावरून उड्डाण करणे रोमांचकारी होते; हे शहर, ॲमझॉनच्या तोंडाशी असलेले बेलेम व ॲमेझोनास प्रांताची राजधानी मनॉस या दोघांच्या मध्ये होते. तेव्हाच्या प्रांतीय सेवकांना फार कमी विभागीय संमेलनांमध्ये कार्य करावे लागत असे, म्हणून मी माझा बहुतेक वेळ संस्थेचे चित्रपट दाखवण्यात घालवत असे. मोठाल्या शहरांमध्ये, शेकडो जण उपस्थित राहत.
उत्तर ब्राझीलमधील ॲमझॉन क्षेत्र पाहून मी जास्त प्रभावित झालो. एप्रिल १९५७ मध्ये मी तेथे सेवा करत असताना ॲमेझॉन नदी आणि तिच्या उपनद्या भरभरून वाहत होत्या. दोन झाडांमध्ये पडदा लावून जंगलात एक चित्रपट दाखवण्याचा विशेषाधिकार मला मिळाला. चित्रदर्शकाला लागणारी वीज, जवळच्या नदीवर नांगर टाकून उभ्या केलेल्या मोटारबोटीतून घेण्यात आली होती. तो पहिला चित्रपट होता जो बहुतेक श्रोत्यांनी पाहिला.
मग लागलीच मी बेथेल सेवेसाठी पुन्हा आलो आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे, १९५८ मध्ये मला न्यूयॉर्क शहरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या “ईश्वरी इच्छा” या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा सुहक्क मिळाला. आठ दिवसीय अधिवेशनाच्या शेवटल्या दिवशी १२३ राष्ट्रांतील २,५३,९२२ प्रतिनिधींनी याँकी स्टेडियम आणि जवळचे पोलो ग्राऊंड्स खचून भरले होते.
माझ्या जीवनातील परिवर्तनांचा आनंद लुटणे
बेथेलला येऊन जास्त दिवस झाले नाहीत तोच माझी गाठ क्लेर बर्डन्टशी पडली आणि मार्च १९५९ मध्ये आम्ही लग्न केले. आम्हाला बाहियाच्या प्रांतामध्ये विभागिय कार्यासाठी नेमण्यात आले, तेथे आम्ही जवळजवळ एक वर्ष कार्य केले. क्लेर आणि मी तेथील बांधवांचा नम्रपणा, आदरातिथ्य, उत्साह, आणि प्रेम यांची आनंदाने आठवण करतो; ते आर्थिकदृष्ट्या गरीब असले तरी राज्याच्या फलप्राप्तीमध्ये समृद्ध होते. मग आमची बदली साउ पाउलु राज्यात झाली. तेथेच १९६० मध्ये, माझ्या पत्नीला दिवस गेले आणि आम्हाला पूर्ण वेळेची सेवा सोडावी लागली.
माझ्या पत्नीचा जन्म झाला होता त्या सेंट कॅटारिनाच्या राज्यात जाऊन राहण्याचे आम्ही ठरवले. गेरझॅन हा आमच्या पाच मुलांपैकी ज्येष्ठ होता. त्याच्यानंतर, १९६२ मध्ये गिलसन, १९६५ मध्ये तलीता, १९६९ मध्ये टारस्यो आणि १९७४ मध्ये जॅनिस ह्यांचा जन्म झाला. यहोवामुळे आणि तो पुरवत असलेल्या सल्ल्यामुळे आम्ही या सर्वांना ‘यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याचे’ आव्हान झेलू शकलो.—इफिसकर ६:४.
आम्ही आमचे प्रत्येक अपत्य मौल्यवान समजतो. स्तोत्रकर्त्याने केवढ्या योग्यपणे आमच्या भावना व्यक्त केल्या: “पाहा! संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे.” (स्तोत्र १२७:३) ‘यहोवाने दिलेल्या कोणत्याही धनाला’ आम्ही जसे सांभाळले असते त्याप्रमाणे समस्या असतानाही आम्ही त्याच्या वचनात आढळणाऱ्या सूचनांना ध्यानात ठेवून आमच्या मुलांची काळजी घेतली आहे. त्याचे अनेक प्रतिफळ आहेत. सर्व पाच जणांनी एकापाठोपाठ, वेगवेगळे व स्वतःहून येऊन आम्हाला, यहोवास त्यांनी केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून ते बाप्तिस्मा घेऊ इच्छित असल्याची त्यांची इच्छा व्यक्त केली तेव्हा आम्हाला अवर्णनीय आनंद झाला.—उपदेशक १२:१.
आमच्या मुलांच्या निवडी
गेरझॅनने डाटा प्रोसेसींगचा कोर्स केल्यानंतर लगेच, पेशेवाईक करियर निवडण्याऐवजी पूर्ण वेळेची सेवा निवडून बेथेलमध्ये सेवा करण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा तर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण पहिल्या पहिल्यांदा गेरझॅनसाठी बेथेल सेवा इतकी सोपी नव्हती. त्याला बेथेलमध्ये जाऊन चार महिने झाल्यावर आम्ही त्याला भेट देण्यासाठी गेलो आणि निघताना त्याच्या चेहऱ्यावरील उदासीनता पाहून मला अतिशय वाईट वाटले. मागून येणारी वाहने दर्शवणाऱ्या आमच्या कारच्या आरशातून मी त्याला पाहिले, तो आम्हाला रस्त्यावरील पहिले वळण घेईपर्यंत पाहत होता. माझे डोळे अश्रुंनी भरले असल्यामुळे घरी जाण्यासाठी आम्हाला कराव्या लागणाऱ्या ७०० किलोमीटरच्या प्रवासाला निघण्याआधी मला कार रस्त्याच्या कडेला घ्यावी लागली.
गेरझॅनला बेथेल सेवा खरोखरच आवडली. तेथे जवळजवळ सहा वर्षांपर्यंत राहिल्यानंतर त्याने हाईड बेस्सरसोबत लग्न केले आणि त्या दोघांनी आणखी दोन वर्षांपर्यंत बेथेलमध्ये सेवा केली. हाईडला नंतर दिवस गेल्यामुळे त्यांना बेथेल सोडावे लागले. आता सहा वर्षांची त्यांची मुलगी सिंथिया त्यांच्यासोबत राज्य कार्यांमध्ये सहभाग घेते.
गेरझॅनला बेथेलमध्ये भेट देऊन जास्त काळ लोटला नव्हता तोच, गिलसन, ज्याने व्यवसाय प्रशासनाचे त्याचे पहिले वर्ष पूर्ण केले होते म्हणाला, की त्यालाही तेथे सेवा करायची आहे. बेथेलमध्ये एक वर्ष काम केल्यानंतर तो पुन्हा त्याचा व्यवसाय कोर्स घेईल अशी त्याने योजना केली होती. पण मग त्याच्या योजना बदल्या व तो बेथेल सेवेतच राहिला. सन १९८८ मध्ये त्याने विवियन गोनसाल्वीस, या पायनियरसोबत विवाह केला. पूर्ण वेळेच्या सेवकांना पायनियर असे संबोधले जाते. तेव्हापासून ते बेथेलमध्ये एकत्र कार्य करीत आहेत.
आमचा आनंद असाच कायम राहिला जेव्हा आमच्या तिसऱ्या अपत्याने, तलिताने मसुदालेखनाचा कोर्स घेतल्यानंतर १९८६ साली पायनियर सेवेत सामील होण्याचे निवडले. तीन वर्षांनंतर तिलाही बेथेलमध्ये बोलावण्यात आले. सन १९९१ मध्ये तिने, बेथेलमध्ये दहा वर्षांपासून सेवा करणाऱ्या झूस कोसबरोबर विवाह केला. विवाहित जोडपे या नात्याने ते आजवर तेथे सेवा करत आहेत.
त्यानंतरच्या टारस्योनेही “बाबा, मला बेथेलला जायचं,” हे आम्ही आधी तीनदा ऐकलेले वाक्य बोलून दाखवले तेव्हा मला आणि माझ्या पत्नीला आणखीनच आनंद झाला. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला व १९९१ मध्ये त्यानेही त्याच्या बेथेल सेवेची सुरवात केली व तो तेथे १९९५ पर्यंत होता. अशा प्रकारे त्याने तीन वर्षांकरता आपल्या ज्वानीचा उत्साह यहोवाच्या राज्य हिताची बढती करण्यासाठी उपयोगात आणला हे पाहून आम्हाला खरोखर आनंद वाटतो.
आमचं शेंडं फळ जॅनिस, हिने यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या १३ व्या वर्षी बाप्तिस्मा घेतला. शाळेत शिकत असताना तिने एक वर्ष सहायक पायनियर म्हणून कार्य केले. मग सप्टेंबर १, १९९३ रोजी तिने गॅसपर शहरातील आमच्या मंडळीत नियमित पायनियर म्हणून कार्य करण्यास आरंभ केला.
सफलतेचा मार्ग
यहोवाच्या उपासनेत कुटुंबाला संयुक्त ठेवण्याचे रहस्य काय असावे बरे? एखादा जादूचा मंत्र असेल असा माझा विश्वास नाही. यहोवाने, ख्रिस्ती पालकांनी अनुसरावे म्हणून त्याच्या वचनात मार्गदर्शन पुरवले असल्यामुळे आम्ही उपभोगलेल्या सर्व उत्तम प्रतिफळांचे श्रेय त्यालाच गेले पाहिजे. आम्ही केवळ त्याचे मार्गदर्शन अनुसरण्याचा प्रयत्न केला. (नीतिसूत्रे २२:६) आमच्या सर्व मुलांनी माझ्याकडून लॅटिन भावना आणि आपल्या आईकडून व्यावहारिक जर्मन आत्मा वारशाने घेतला आहे. परंतु, सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट जी त्यांनी आमच्याकडून घेतली ती आहे आध्यात्मिक वारसा.
आमचे घरगुती जीवन राज्य हितांभोवती केंद्रित होते. या हितांना प्रथम स्थानी ठेवणे इतके सोपे नव्हते. उदाहरणार्थ, नियमित बायबल अभ्यास करणे आम्हाला नेहमी कठीण होते तरीही आम्ही हार मानली नाही. प्रत्येक लेकराला त्याच्या जीवनाच्या प्रारंभिक दिवसांपासून ख्रिस्ती सभांना तसेच संमेलनांना व अधिवेशनांना आणले जाई. फक्त आजारपण किंवा आणीबाणीचा प्रसंग सभांना उपस्थित राहण्यास आम्हाला अटकाव करीत असे. याशिवाय, मुले आपल्या कोवळ्या वयापासूनच आमच्यासोबत ख्रिस्ती सेवेत येत असत.
ते सुमारे दहा वर्षांचे होते तेव्हापासून त्यांनी ईश्वरशासित सेवा सभांमध्ये भाषणे देण्यास सुरवात केली. आम्ही त्यांना त्यांचे पहिले भाषण तयार करण्यास मदत केली, अख्खे भाषण कागदावर लिहून घेण्याऐवजी भाषणाची केवळ रुपरेषा वापरण्याचे उत्तेजन त्यांना दिले. त्यानंतर मात्र प्रत्येकाने आपआपले भाषण तयार केले. तसेच, ते १० ते १२ च्या वयोगटात होते तेव्हा प्रत्येक जण सेवेत नियमितरीत्या भाग घेऊ लागला. हाच एक जीवनमार्ग त्यांच्या परिचयाचा होता.
आमच्या मुलांचे संगोपन करण्यात माझी पत्नी क्लेर हिचा सिंहाचा वाटा होता. ते खूपच लहान होते तेव्हा क्लेर रोज रात्री त्यांना बायबलची एक गोष्ट वाचून दाखवून प्रत्येकासोबत प्रार्थना करीत असे; मुले या वयात त्यांना जे काही शिकवले जाते ते एखाद्या स्पंजप्रमाणे सर्व काही शोषून घेतात. तिने गमावलेल्या परादीसपासून पुनःप्राप्त केलेल्या परादीसपर्यंत (इंग्रजी) व थोर शिक्षकाचे ऐका या पुस्तकांचा खूप चांगला फायदा घेतला.a यहोवाच्या साक्षीदारांनी पुरवलेली दर्शन श्रवण साधने उपलब्ध झाली तेव्हा आम्ही त्यांचाही उपयोग केला.
मुलांना दररोज अवधानाची आवश्यकता आहे याला ख्रिस्ती पालक या नात्याने आमचा अनुभव पुष्टी देतो. गाढ प्रीती, व्यक्तिगत आवड व भरपूर वेळ या गोष्टी तरुण मुलांना लागणाऱ्या मूलभूत गरजांपैकी आहेत. या गरजांना पूर्ण करण्यासाठी आमच्या क्षमतांचा होता होईल तितका उपयोग करणे ही आमची पालकीय जबाबदारी आहे केवळ असा दृष्टिकोन आम्ही बाळगला नाही तर ती जबाबदारी पूर्ण करून खूप आनंद मिळवला.
खरेच, पालकांना स्तोत्र १२७:३-५ मधील शब्दांच्या पूर्णतेची जाणीव होणे संतोषजनक आहे; जेथे लिहिले आहे: “पाहा! संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य!” संयुक्त कुटुंब या नात्याने यहोवाची सेवा केल्यामुळे आम्ही निश्चितच आनंदी आहोत!
[तळटीपा]
a सर्व वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले.
[२६ पानांवरील चित्रं]
ॲन्टोन्यू सांतालोर आपल्या निकटच्या कुटुंबियांसमवेत