‘घरच्यांची तरतूद करणे’—न्यूनविकसित राष्ट्रांमध्ये हे आव्हान झेलणे
“जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे,” असे प्रेषित पौल म्हणाला. (१ तीमथ्य ५:८) समृद्ध देशांमध्ये एखाद्या कुटुंबाचे पालनपोषण करणे इतके कठीण झाले आहे तर न्यूनविकसित देशामध्ये तर ते बहुतेकवेळा याहीपेक्षा भयानक आव्हान असते.
उदाहरणार्थ, आफ्रिकेत आर्थिक हालअपेष्टा अगदी सामान्य आहेत, त्यामध्ये काहीच असामान्य असे नाही. नोकऱ्या तुरळक आहेत, व जेव्हा उपलब्ध असतात तेव्हा निव्वळ उपजीविकेच्या साधनांसाठी दोघा पतिपत्नीला नोकरी करावी लागते. काम मिळवण्याकरता कुटुंब प्रमुखांना आपल्या सोबत्यांना व मुलांना कदाचित महिन्यांकरता—अथवा वर्षांकरता सोडून दूरदूर प्रवास करावा लागतो. राहण्याकरता योग्यप्रकारचे घर मिळणे देखील कठीण होऊ शकते. पुष्कळ आफ्रिकन कुटुंबे मोठी असतात; त्यामुळे निवासस्थाने लहान वाटतात, मूलभूत सुखसोयींचा अभाव वाटू लागतो. बहुतेक वेळा तेथे रोगट परिस्थिती असते.
याशिवाय, स्थानीय रुढी, पुरातन परंपरा आणि लोकप्रिय दृष्टिकोन कदाचित देवाचे वचन, बायबलच्या आत्म्याच्या विरुद्धतेत असतील. विवाह आणि मुलांबाबतच्या काही प्रचलित मनोवृत्तींचा विचार करा. काही कुटुंब प्रमुखांना वाटते, की घराचे भाडे देणे व शाळेची आवश्यक फी देणे, एवढीच त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या पत्नींवर—आणि काही वेळा मोठ्या मुलांवरही—अन्न व कपडालत्ता यासारख्या मूलभूत गोष्टी पुरवण्याचे काम सोपवले जाते.
“मी कमवलेला पैसा माझा आहे, आणि तू कमवलेला पैसाही माझाच आहे,” असा काही पतींचा दृष्टिकोन असतो. यामुळे बहुतेकवेळा कमवणाऱ्या पत्नींना याचा राग येतो. टान्झानियाच्या एका स्त्रीने अशी तक्रार केली: “आमच्यासाठी किंवा मुलांसाठी नव्हे तर पिण्यावर पैसा उडवला जातो. आम्ही काम वाटून घेतो, किंवा बहुतेक काम आम्ही करतो पण तो, हा माझा पैसा आहे—मी कमवलेला पैसा आहे असे म्हणून आमच्याकडून काढून घेतो.”
परंतु, ख्रिश्चन लोक स्थानीय संस्कृती किंवा लोकप्रिय मतांआधी देवाच्या वचनाला प्राधान्य देतात. एखाद्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याबाबत बायबल साहाय्यकारी मार्गदर्शन पुरवते. उदाहरणार्थ, “आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे,” असे ते म्हणते. (२ करिंथकर १२:१४) यास्तव, काम करू शकणारे देव-भीरू पुरुष आळशीपणाने कुटुंबाला अन्न वस्त्र पुरवण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नींवर अथवा मोठ्या मुलांवर सोपवत नाहीत; ती जबाबदारी रास्तपणे कुटुंब प्रमुखावर येते.—१ करिंथकर ११:३.
पतीची मिळकत त्याच्या कुटुंबाच्या सर्वच गरजा पूर्ण करण्याइतपत पुरेशी नसेल ही गोष्ट खरी आहे. पण त्याची पत्नी लौकिक नोकरी करत असल्यास, ख्रिस्ती पुरुषाला याचा राग येणार नाही. उलट, तो तिला त्याची सन्मानित “सहकारिणी” म्हणूनच वागवेल. (मलाखी २:१४) अशाप्रकारे तो, तिने कष्टाने मिळवलेला पैसा निष्ठुरपणे हिसकावून घेऊन तिच्या भावनांची कदर न करता उधळून टाकणार नाही. उलट, तो आणि त्याची पत्नी दोघे एकत्र बसून ‘एकमेकांशी मसलत’ करतील व त्यांचा सर्व पैसा संपूर्ण कुटुंबाच्या लाभास्तव कसा वापरता येईल हे ठरवतील. (नीतिसूत्रे १३:१०) शक्य तेथे, पती आपल्या पत्नीला बायबल काळातील ‘सद्गुणी स्त्रीने’ उपभोगल्याप्रमाणे काही प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्यही देतो. (नीतिसूत्रे ३१:१०, ११, १६) अशा बाबींमध्ये बायबल सल्ल्याचे अनुकरण केल्यास कौटुंबिक सौख्य व समाधान वाढते.
बेरोजगारीची आव्हाने झेलणे
बेरोजगारीच्या समस्येचा विचार करा. कमी नोकऱ्या व कमी पगार असतो तेव्हा पुष्कळ आफ्रिकी कुटुंब प्रमुखांनी घरापासून दूर असलेल्या—खाणीत, कारखान्यात, शेतावर व मळ्यातील नोकऱ्या शोधून काढल्या. एखादा ख्रिस्ती पुरुष अशा स्थितीत असल्यास, सहउपासकांपासून दूर गेल्याचे व अतिशय वाईट संगतीची झळ लागत असल्याचे त्याला जाणवेल. (नीतिसूत्रे १८:१; १ करिंथकर १५:३३) त्याचे कुटुंब, शक्य तितकी काटकसर करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असताना, आध्यात्मिकरीत्या पुढाकार घेण्याकरता किंवा भावनिक पाठिंबा देण्याकरता पिता घरी नसल्यामुळे त्यांना बहुधा पुष्कळ काही सहन करावे लागू शकते. उपरोधिकपणे, दीर्घ अनुपस्थितीमुळे जी गोष्ट टाळावयास हवी होती तीच नेमकी घडू शकते—आर्थिक हालअपेष्टा.
एक माता म्हणते: “माझे पती सोनं खणण्यासाठी गेले. त्यांनी एक किंवा जास्तीतजास्त दोन महिन्यांनी परत घरी येण्याचं ठरवलं होतं. पण ते एक वर्षांपर्यंत लांबत गेलं! मला एकटीला सहा मुलांना सांभाळावे लागले. घराचं भाडं थकलं होतं. माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मला दवाखान्याची बिलं भरायची होती. आम्हाला कपडालत्ता हवा होता, शिवाय पोटाची खळगी भरण्यासाठी तर रोज खावं लागत होतं. मला नोकरी नव्हती. ते फार कठीण होतं. सर्वात कठीण काम म्हणजे मुलांची आध्यात्मिकरीत्या काळजी घेणे—कौटुंबिक अभ्यास, सभा आणि प्रचारकार्य. यहोवाच्या सहकार्याने आम्ही कसेबसे सावरू शकलो.”
काही मातांनाही अशा तऱ्हेने कामासाठी आपल्या कुटुंबांना अनेक काळासाठी सोडून जाण्यास भाग पडले. काही जणी प्रवासी व्यापारी म्हणून काम करून उपजीविका करतात, त्या क्वचितच घरी दिसतात. यामुळे मोठ्या मुलांना जबरदस्तीने, खाण्यापिण्याची काळजी घेण्याकरता, घरातील कामकाजाकरता आणि लहान भावंडांना शिस्त लावण्याकरता पालकीय भूमिका पेलावी लागते. यामुळे आध्यात्मिक कार्यांमध्ये पूर्ण भाग घेता येत नाही. होय, कुटुंबावरील ताण तीव्र असू शकतो!
अर्थात, आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा एखाद्या पालकाला आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याकरता दूरवरची नोकरी शोधण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय उरत नाही. खरे तर, बायबल काळामध्ये याकोबाच्या पुत्रांना इजिप्तमधून अन्नसामग्री आणण्यासाठी आपल्या कुटुंबांना मागे सोडून जावे लागले. (उत्पत्ति ४२:१-५) आजही अशाच प्रकारच्या परिस्थिती उद्भवतात तेव्हा, कुटुंब प्रमुखांनी, दूरची नोकरी जो काही आर्थिक लाभ मिळेल यास, दीर्घ काळपर्यंतच्या वियोगामुळे येणाऱ्या आध्यात्मिक व भावनिक हानीसोबत तोलून पाहिले पाहिजे. पुष्कळ कुटुंबे दीर्घकाळपर्यंत विभक्त होण्याऐवजी आर्थिक हालअपेष्टा सहन करण्याचे पसंत करतात. ते १ तीमथ्य ६:८ मधील पौलाचे शब्द ध्यानात ठेवतात की, “आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—पडताळा नीतिसूत्रे १५:१७.
बहुतेकवेळा प्रवासासाठी पर्याय असतात. पुढाकार व कल्पकता प्रदर्शित करून काही जण फायदेकारक सेवा पुरवून एखादा व्यवसाय चालू करू शकले आहेत.a (पडताळा नीतिसूत्रे ३१:२४.) किंवा, कदाचित इतर जण ज्यांना हलके समजतात अशी कमी दर्जाची कामे स्वीकारावी लागतील. (इफिसकर ४:२८) स्वतः प्रेषित पौलाने इतरांवर आर्थिकरीत्या ओझे होण्याचे टाळण्यासाठी “रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.” (२ थेस्सलनीकाकर ३:८) ख्रिस्ती पुरुष आज हा कित्ता अनुसरू शकतात.
शाळेच्या समस्या
शाळांची आणखी एक समस्या आहे. काही दूरच्या क्षेत्रांमध्ये एक सामान्य गोष्ट म्हणजे, पालकांना आपल्या मुलांना पुरेसे शिक्षण मिळण्याकरता दीर्घ काळापर्यंत नातेवाईकांसोबत राहण्यासाठी पाठवावे लागते. आपल्या पालकांपासून विभक्त झाल्यामुळे अशा मुलांना अनेक वेळा सभांना उपस्थित राहण्यास अथवा क्षेत्र सेवेत भाग घेण्यास कठीण जाते. आवश्यक शिस्त नसल्यामुळे ते सहजपणे वाईट संगतीला बळी पडतात. परिणामतः, पुष्कळांनी ख्रिस्ती मार्गाक्रमण सोडून दिले आहे.
लौकिक शिक्षणामुळे फायदे मिळतात यात काही प्रश्न नाही. परंतु बायबल आध्यात्मिक शिक्षणाला सर्वोच्च मूल्य देते व अशा प्रकारचे शिक्षण देण्याची जबाबदारी देवाने पालकांना दिली आहे. (अनुवाद ११:१८, १९; नीतिसूत्रे ३:१३, १४) पण दीर्घ काळासाठी मुलाला दूर पाठवल्यामुळे कदाचित ‘यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्याला वाढवण्यासाठी’ पालक जो प्रयत्न करतात तो क्षीण होऊ शकतो.—इफिसकर ६:४.b
शिक्षणाच्या स्थानिक संधी अपुऱ्या असतात तेव्हा पालकांना आपल्या मुलांना मूलभूत कौशल्य जितके शिकवता येईल तितके शिकवण्यापलिकडे काही दुसरे करता येऊ शकत नाही. आपला “महान शिक्षक” यहोवा याच्याकडूनही मदत दिली जाते. (यशया ३०:२०, NW) यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय मंडळ्या पुष्कळ शैक्षणिक तरतुदी पुरवतात. पुष्कळ मंडळ्या साक्षरता वर्ग चालवतात. त्याचप्रमाणे ईश्वरशासित सेवा प्रशाला, ही देखील एखाद्या मुलाची वाचण्याची व अस्खलितपणे बोलण्याची क्षमता तीक्ष्ण करण्याकरता फायदेकारक तरतूद आहे.
मुलांना जन्म देण्याविषयी समतोल दृष्टिकोन
अनेक मुले असल्यास त्यांचे संगोपन करणे विशेषकरून कठीण होऊ शकते. आफ्रिकन पालक नेहमी म्हणतील की त्यांना मुले आवडतात; म्हणून हवी तितकी मूले ते होऊ देतात! आर्थिक साधनसंपत्ती या दृष्टिने मुलांकडे पाहिले जात असले तरी, अनेक पालक इतक्यांचे चांगले संगोपन करू शकत नाहीत.
अर्थातच, “संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे,” असे बायबल म्हणते. (स्तोत्र १२७:३) परंतु, इस्राएलमधील अनुकूल परिस्थितीच्या काळादरम्यान हे लिहिण्यात आले होते याची नोंद घ्या. नंतर, कडक दुष्काळ व युद्धाने मुलांना जन्म देणे अडचणीचे बनवले. (विलापगीत २:११, २०; ४:१०) अनेक न्यूनविकसित राष्ट्रांमध्ये अस्तित्वात असलेल्या कठीण परिस्थितीकडे पाहता, जबाबदार ख्रिश्चनांनी, ते खरोखरच किती मुलांना अन्न, वस्त्र, निवारा व प्रशिक्षण देऊ शकतात याचा गंभीर विचार केला पाहिजे. खर्च अजमावल्यानंतर, अनेक जोडपी परंपरेविरुद्ध जाऊन त्यांना होणाऱ्या मुलांची संख्या मर्यादित ठेवणे बरे राहील असा निर्णय घेतात.c—पडताळा लूक १४:२८.
हे ‘शेवटल्या काळचे कठीण दिवस’ आहेत हे स्पष्ट आहे. (२ तीमथ्य ३:१-५) हे व्यवस्थीकरण जसजसे त्याच्या अपरिहार्य समाप्तीस वाटचाल करते तसतसे न्यूनविकसित राष्ट्रांमधील कुटुंबांवर दबाव येतच राहतील यात काही शंका नाही. तरीदेखील, देवाच्या वचनाच्या तत्त्वांचे जवळून अनुकरण केल्यास, कुटुंब प्रमुख त्यांच्या कुटुंबाच्या शारीरिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यात यशस्वी ठरू शकतात, कारण जे यहोवाची सेवा एकनिष्ठेने करतात अशांना तो पुढील अभिवचन देतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (इब्री लोकांस १३:५) होय, निर्धन राष्ट्रांमध्येही ख्रिस्ती जन आपल्या घरच्यांची तरतूद करण्याचे आव्हान यशस्वीरीत्या झेलू शकतात!
[तळटीपा]
a आमच्या या नियतकालिकाच्या सोबतच्या सावध राहा! ऑक्टोबर २२, १९९४, (इंग्रजी) अंकातील “न्यूनविकसित राष्ट्रांमध्ये व्यवसायांची सुरवात करणे” हा लेख पाहा.
b आणखी माहितीकरता, ऑगस्ट १५, १९८२ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील “वाचकांचे प्रश्न” पाहा.
c gbr 13-1 या माहितीपत्रकातील “कुटुंब नियोजन—जागतिक विषय बनतो” श्रृंखलेत फायदेकारक माहिती पुरवण्यात आली होती.