अपुल्लोस ख्रिस्ती सत्याचा वक्तृत्वपूर्ण उद्घोषक
सर्व राज्य उद्घोषकांनी, ख्रिस्ती मंडळीचे अनेक अथवा अल्प वर्षांपासून सदस्य असले, तरी सुवार्तेचे प्रचारक या नात्याने प्रगती करण्यात आवड बाळगली पाहिजे. यावरून देवाच्या वचनाचे आपले ज्ञान व इतरांना शिकवण्याची आपली क्षमता वाढवणे ध्वनित होते. काहींकरता याचा अर्थ आव्हाने झेलणे, समस्यांवर मात करणे किंवा अधिक कार्यासाठी स्वतःला उपलब्ध करणे असा होऊ शकतो.
बायबलमध्ये, प्राचीन काळातील भक्तिमान पुरुष आणि महिलांची अनेक उदाहरणे आहेत जे विविध मार्गांनी मोठी आध्यात्मिक प्रगती करण्यात यशस्वी झाले व त्यांच्या परिश्रमांबद्दल त्यांना प्रतिफळ मिळाले. अपुल्लोस हा त्यांच्यापैकी एक होता. शास्त्रवचने आपल्याला त्याची ओळख करून देतात तेव्हा तो ख्रिस्ती शिकवणुकींची अपूर्ण समज असलेला मनुष्य आहे; परंतु काही अल्प वर्षांनंतर, तो पहिल्या शतकातील मंडळीचा प्रवासी प्रतिनिधी या नात्याने कार्य करत असतो. कशामुळे तो इतकी प्रगती करू शकला? त्याच्याजवळ असे गुण होते ज्यांचे आपण सर्वांनी अनुकरण केल्यास आपला फायदा होईल.
“शास्त्रपारंगत”
वर्ष सा. यु. ५२ च्या सुमारास, बायबल लेखक लूकनुसार, “अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहूदी इफिसास आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते; आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला.”—प्रेषितांची कृत्ये १८:२४-२६.
आलेक्सांद्रिया, इजिप्त, रोमच्या खालोखाल जगातील दुसरे महान शहर आणि यहुदी व ग्रीक लोकांकरता त्या काळातील सर्वात महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र होते. अपुल्लोसने बहुधा, त्या शहरातील सर्वात मोठ्या यहुदी समाजात शिक्षण घेतल्या कारणाने त्याने इब्री शास्त्रवचनांविषयी ज्ञान व विशिष्ट वक्तृत्व प्राप्त केले होते. अपुल्लोसला येशूची माहिती कोठून मिळाली होती याविषयी तर्क करणे कठीण आहे. “खरे तर तो एक प्रवासी—कदाचित प्रवासी व्यापारी होता आणि अशाच एखाद्या ठिकाणी भेट देताना त्याची ख्रिस्ती प्रचारकांसोबत गाठ पडली असावी,” असे एफ. एफ. ब्रुस हे विद्वान सुचवतात. काहीही असले तरी, त्याने अचूकपणे येशूविषयी सांगितले व शिकवले तरीपण, असे दिसते की सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट पूर्वी त्याला साक्ष देण्यात आली होती; कारण त्याला “केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता.”
येशूचा अग्रदूत या नात्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सर्व इस्राएल राष्ट्राला शक्तिशाली साक्ष दिली होती आणि पश्चात्तापाचे द्योतक म्हणून अनेकांनी त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला होता. (मार्क १:५; लूक ३:१५, १६) बहुतांश इतिवृत्तकारांनुसार, रोमी साम्राज्यातील यहुदी लोकसंख्येपैकी अनेक लोकांचे येशूविषयीचे ज्ञान जॉर्डनच्या किनाऱ्यावर जितका प्रचार करण्यात आला होता तेवढ्यापर्यंतच सीमित राहिले. “त्यांचा ख्रिस्ती विश्वास, आपल्या प्रभूच्या सेवेच्या सुरवातीच्या वेळी जेथे होता तेथेच राहिला. ख्रिस्ताच्या मृत्यूच्या पूर्ण अर्थाविषयी ते अज्ञानी होते; कदाचित, त्यांना त्याच्या पुनरुत्थानाची वस्तुस्थिती देखील ठाऊक नव्हती,” असे डब्ल्यू. जे. कॉनीबर व जे. एस. हाऊसन म्हणतात. असे दिसते, की अपुल्लोसलाही सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतण्यात आल्याचे माहीत नव्हते. तरीदेखील, त्याने येशूविषयी काही अचूक माहिती प्राप्त केली होती व त्याने ती आपल्याजवळच ठेवली नाही. खरे पाहता, त्याला जे माहीत होते त्याबद्दल बोलण्याकरता तो धैर्याने संधी शोधत होता. परंतु त्याचा आवेश व जोश अद्याप अचूक ज्ञानाप्रमाणे नव्हता.
आवेशी परंतु नम्र
लूकचा अहवाल पुढे सांगतो: “प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.” (प्रेषितांची कृत्ये १८:२६) अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांना कदाचित याची जाणीव झाली असावी, की अपुल्लोसच्या विश्वासामध्ये आणि त्यांच्या विश्वासामध्ये बरेच साम्य होते, पण त्यांनी सर्व जनतेसमोर त्याच्या अपूर्ण समजेत सुधारणा करण्याचा प्रयत्न न करून सुज्ञता दाखवली. अपुल्लोसला मदत करण्याच्या हेतुने त्यांनी बहुधा त्याच्यासोबत बऱ्याचवेळा व्यक्तिगत चर्चा केल्या असतील. “शास्त्रवचनांमध्ये . . . सशक्त” असलेल्या मनुष्याने, अपुल्लोसने कशी प्रतिक्रिया दाखवली? (प्रेषितांची कृत्ये १८:२४, किंग्डम इंटरलिनियर) सर्व शक्यतेनुसार, अपुल्लोस, अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांना भेटण्याआधी काही काळाकरता सार्वजनिकरीत्या त्याच्या अपूर्ण संदेशाचा प्रचार करत असावा. एका गर्विष्ठ व्यक्तीने कोणतीही सुधारणूक अगदी सहजरीत्या नाकारली असती, पण अपुल्लोस आपले ज्ञान पूर्ण करण्याकरता नम्र व कृतज्ञ होता.
अपुल्लोसची तीच नम्र मनोवृत्ती, करिंथ मंडळीला इफिसच्या बांधवांकडून शिफारसीचे एक पत्र स्वीकारण्यातील स्वेच्छा यांमध्येही स्पष्ट दिसते. अहवाल पुढे म्हणतो: “नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले.” (प्रेषितांची कृत्ये १८:२७; १९:१) अपुल्लोसने आपल्या गुणांनुसार आपल्याला स्वीकारण्यात यावे अशी मागणी केली नाही तर ख्रिस्ती मंडळीची व्यवस्था मर्यादेने अनुसरली.
करिंथमध्ये
करिंथमध्ये अपुल्लोसच्या सेवेचे पहिले परिणाम सर्वोत्कृष्ट होते. प्रेषितांची कृत्ये पुस्तक अशा प्रकारे अहवाल देते: “तो तेथे पोहंचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहूद्यांचे खंडण करीत असे.”—प्रेषितांची कृत्ये १८:२७, २८.
अपुल्लोसने मंडळीच्या सेवेकरता स्वतःला वाहून घेतले, त्याच्या तयारीने व आवेशाने बांधवांना उत्तेजन दिले. त्याच्या यशाची गुरुकिल्ली काय होती? अपुल्लोसकडे निश्चितच स्वाभाविक क्षमता होत्या व यहुद्यांबरोबर सर्वांसमक्ष वादविवाद कायम ठेवण्यात तो धैर्यवान होता. पण त्याहूनही अधिक, त्याने शास्त्रवचनांचा उपयोग करून तर्कवितर्क केला.
अपुल्लोसचा करिंथ लोकांवर जोरदार प्रभाव होता तरीपण, दुर्दैवाने त्याच्या प्रचारामुळे अनपेक्षित नकारात्मक परिणाम उद्भवले. ते कसे? पौल आणि अपुल्लोस दोघांनी मिळून करिंथमध्ये राज्य सत्याचे बीज पेरून त्याला खतपाणी घालण्याचे चांगले काम केले होते. पौलाने तेथे सा. यु. ५० च्या सुमारास, अपुल्लोस तेथे येण्याच्या दोन वर्षांपूर्वी प्रचार केला होता. सा. यु. ५५ च्या सुमारास जेव्हा पौलाने करिंथकरांना आपले पहिले पत्र लिहिले त्यावेळेपर्यंत तेथे फुटी निर्माण झाल्या होत्या. काही जण अपुल्लोसला त्यांचा नेता मानत होते तर इतर जणांना पौल किंवा पेत्र आवडत होते अथवा काहीजण फक्त ख्रिस्ताला धरून होते. (१ करिंथकर १:१०-१२) काही जण म्हणत होते: “मी अपुल्लोसाचा” आहे. असे का?
पौल आणि अपुल्लोस जो प्रचार करत होते तो एकच होता पण त्यांची व्यक्तिमत्वे विभिन्न होती. पौल स्वतः आपल्याविषयी सांगतो की तो, “भाषण करण्यात अप्रवीण” होता, आणि दुसऱ्या बाजूला अपुल्लोस ‘वक्तृत्वपूर्ण’ होता. (२ करिंथकर १०:१०; ११:६) त्याच्याकडे क्षमता असल्यामुळे करिंथमधील यहुदी समाजातील काही त्याचे ऐकू शकले. तो ‘यहुद्यांचे जोरदारपणे खंडण करण्यात’ यशस्वी ठरला पण पौल अल्प काळाआधीच सभास्थान सोडून गेला होता.—प्रेषितांची कृत्ये १८:१, ४-६.
अपुल्लोसकडे काहींचा कल असण्याचे कदाचित हे कारण असावे का? पुष्कळ विवेचनकर्ते हा सिद्धान्त मांडतात, की तत्त्वज्ञानी चर्चा करण्याच्या ग्रीक लोकांमधील जन्मजात इच्छेमुळे काहींना अपुल्लोसची अधिक उत्तेजक प्रस्तुती आवडली असावी. “बहाणा करत नसलेला व वक्तृत्वाचा अभाव असलेला वक्ता पौल, याच्यापेक्षा [अपुल्लोसाच्या] अलंकारिक भाषाशैलीमुळे आणि त्याच्या दृष्टान्तरुप कथनामुळे त्याने अनेकांची प्रशंसा मिळवली होती,” असे झुजेपा रिकॉटी सुचवतात. जर खरोखरच विशिष्ट लोकांनी बांधवांमध्ये फूटी पाडण्यासाठी अशा प्रकारच्या वैयक्तिक आवडींना चुकीने अनुमती दिली, तर पौलाने ‘ज्ञान्यांच्या ज्ञानाला’ उंचावण्याबद्दल खरमरीत टीका का केली हे समजणे सोपे जाते.—१ करिंथकर १:१७-२५.
परंतु अशा प्रकारची टीका पौल आणि अपुल्लोसमध्ये खटके उडाल्याचे सूचित करत नाही. हे दोन प्रचारक कडवे विरोधक होते जे करिंथकरांचा स्नेह मिळवण्यासाठी झगडत होते अशा काहींनी मनःकल्पित कल्पना केल्या असल्या तरी, शास्त्रवचने तसे काहीही सांगत नाहीत. स्वतःला एखाद्या पक्षाचा नेता करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, अपुल्लोस करिंथ सोडून इफिसला गेला होता आणि पौल विभाजित मंडळीला त्याचे पहिले पत्र लिहित होता तेव्हा तो त्याच्याबरोबर होता.
त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फूट अथवा स्पर्धा नव्हती; उलट, ते दोघे खरे तर करिंथमधील समस्यांना सोडवण्याकरता परस्पर आत्मविश्वासाने एकमेकांना सहकार्य देत होते. पौलाला कदाचित, करिंथमधील काही जणांविषयी शंका होत्या पण अपुल्लोसबद्दल निश्चितच नाही. त्या दोघांचे कार्य पूर्णपणे सुसंगत होते; त्यांच्या शिकवणुकी पूरक होत्या. पौलाच्या तोंडच्या शब्दांना उद्धृत केल्यास: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले,” कारण दोघेही “देवाचे सहकारी” होते.—१ करिंथकर ३:६, ९, २१-२३.
पौलाप्रमाणे, करिंथकर अपुल्लोसचा मोठा सन्मान करत होते, त्याने आणखी एकदा त्यांना भेट द्यावी अशी इच्छा ते धरत होते. परंतु पौलाने अपुल्लोसला करिंथला पुन्हा जाण्याचे आमंत्रण दिले तेव्हा त्या आलेक्सांद्रियाकराने नकार दिला. पौल म्हणतो: “आपला बंधु अपुल्लोस ह्याने . . . . तुम्हाकडे यावे, म्हणून मी त्याची फार विनवणी केली; तथापि आताच यावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती; सवड होईल तेव्हा तो येईल.”(१ करिंथकर १६:१२) आणखी विभाजनांचा उद्रेक होईल या भीतीने, अथवा तो इतरत्र कोठे तरी व्यग्र असल्यामुळे कदाचित अपुल्लोस तेथे पुन्हा जाण्यास कुचराई करत होता.
अपुल्लोस जेव्हा क्रीटला आणि कदाचित क्रीटच्या पलीकडे प्रवास करीत होता तेव्हा त्याचा शास्त्रवचनांमध्ये शेवटला उल्लेख करण्यात आला आहे. पुन्हा एकदा पौलाने आपला स्नेही आणि सहकारी याच्याबद्दल विशेष लक्ष दाखवून तीताला, अपुल्लोस आणि त्याच्यासोबत प्रवास करणारा सोबती जेना यांना प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी पुरवण्यास सांगितले. (तीत ३:१३) या समयापर्यंत, ख्रिस्ती प्रशिक्षणाच्या सुमारे दहा वर्षांनंतर अपुल्लोसने मंडळीचा प्रवासी प्रतिनिधी या नात्याने कार्य करण्याकरता बरीच प्रगती केली होती.
आध्यात्मिक वाढ सुलभ करणारे ईश्वरी गुण
आलेक्सांद्रियाकर प्रचारकाने आधुनिक दिवसातील सुवार्तेच्या सर्व प्रचारकांकरता आणि अर्थातच आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्यांकरता उत्तम उदाहरण मांडले. तो जितका वक्तृत्वपूर्ण होता तसे आपण कदाचित नसू पण त्याचे ज्ञान आणि शास्त्रवचनांचा वापर करण्यातील त्याच्या क्षमतेचे अनुकरण करण्यास आपण निश्चितच झटू शकतो व अशाप्रकारे सत्याच्या प्रामाणिक शोधकांना मदत करू शकतो. अपुल्लोसच्या आवेशी कार्याच्या उदाहरणाद्वारे, “ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले.” (प्रेषितांची कृत्ये १८:२७) अपुल्लोस नम्र, आत्म-बलिदानी, आणि इतरांची सेवा करण्यास स्वेच्छिक होता. आपण सर्व जण “देवाचे सहकारी” असल्यामुळे ख्रिस्ती मंडळीमध्ये स्पर्धा किंवा मोठेपणाची हाव यांना थारा नाही हे त्याला योग्यपणे समजले होते.—१ करिंथकर ३:४-९; लूक १७:१०.
अपुल्लोसप्रमाणे आपणही आध्यात्मिक प्रगती करू शकतो. यहोवा आणि त्याच्या संघटनेने आपला होता होईल तितका उपयोग करावा अशा स्थितीत स्वतःला ठेवून आपली पवित्र सेवा सुधारण्यास अथवा वाढवण्यास आपण इच्छुक आहोत का? असल्यास, आपण ख्रिस्ती सत्याचे आवेशी विद्यार्थी व उद्घोषक होऊ.