वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ९/१५ पृ. १६-२१
  • यहोवा तुमच्या खात्यात त्याची अनुकूल मान्यता जमा करो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा तुमच्या खात्यात त्याची अनुकूल मान्यता जमा करो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ज्ञान आपल्याला जबाबदार ठरवते
  • आपल्या सेवेबद्दल जबाबदार
  • कुटुंब या नात्याने उत्तम हिशेब देणे
  • वडील हिशेब देतात—कसे?
  • उत्तम हिशेब देत राहा
  • सर्वांना देवाला हिशेब द्यावयाचा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • नहेम्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • ‘बऱ्‍याने वाइटाला जिंका’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • जेरुसलेम—तुमच्या “आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक” आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ९/१५ पृ. १६-२१

यहोवा तुमच्या खात्यात त्याची अनुकूल मान्यता जमा करो

‘हे माझ्या देवा माझी आठवण कर. माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.’—नहेम्या १३:२२, ३१.

१. यहोवा देवास समर्पित झालेल्यांना त्याला उत्तम हिशेब देण्यास कोणती गोष्ट साहाय्य करते?

यहोवाला उत्तम हिशेब देता यावा म्हणून त्याच्या सेवकांकडे सर्व आवश्‍यक मदत आहे. का? कारण त्याच्या पार्थिव संघटनेचा भाग या नात्याने त्यांचा देवाशी जवळचा संबंध आहे. त्याने त्यांना आपले उद्देश प्रकट केले आहेत व त्याच्या पवित्र आत्म्याकरवी मदत आणि आध्यात्मिक सूक्ष्मदृष्टी पुरवली आहे. (स्तोत्र ५१:११; ११९:१०५; १ करिंथकर २:१०-१३) या खास परिस्थितींना विचारात घेता, यहोवा त्याच्या पार्थिव सेवकांकडून त्यांच्या स्वतःचा, ते ज्या स्थितीत आहेत त्याचा आणि त्याच्या शक्‍तीद्वारे व त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीद्वारे ते जे काही साध्य करतात त्याचा तो प्रेमळपणे हिशेब मागतो.

२. (अ) नहेम्याने कोणत्या मार्गांनी देवाला स्वतःचा चांगला हिशेब दिला? (ब) नहेम्याने त्याच्या नावाच्या बायबल पुस्तकाचा समारोप कोणत्या विनंतीने केला?

२ पर्शियाचा राजा अर्तहशश्‍त (लाँगीमेनस) याचा प्यालेबरदार नहेम्या याने देवाला स्वतःचा चांगला हिशेब दिला. (नहेम्या २:१) नहेम्या यहुद्यांचा शासक बनला व शत्रुत्वाच्या आणि धोक्याच्या परिस्थितींमध्येही त्याने जेरुसलेमची भिंत पुनः बांधली. खऱ्‍या उपासनेच्या आवेशाने त्याने देवाचे नियमशास्त्र अंमलात आणले आणि गांजलेल्यांबद्दल चिंता व्यक्‍त केली. (नहेम्या ५:१४-१९) नहेम्याने, लेव्यांस स्वतःला नियमितपणे शुद्ध करण्यास, वेशीवर पहारा ठेवण्यास व शब्बाथाचा दिवस पवित्र मानण्यास आर्जवले. म्हणूनच तो प्रार्थना करू शकला: “हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझ्या याहि कामगिरीचे स्मरण ठेव, आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझा बचाव कर.” शिवाय नहेम्याने अगदी उचितपणे त्याच्या ईश्‍वर प्रेरित पुस्तकाचा समारोप अशा विनंतीने केला: “हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.”—नहेम्या १३:२२, ३१.

३. (अ) भले करणाऱ्‍या व्यक्‍तीचे वर्णन तुम्ही कसे कराल? (ब) नहेम्याच्या मार्गाक्रमणावर मनन केल्यावर आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू?

३ भले करणारा मनुष्य सद्‌गुणी असतो व इतरांचा फायदा होईल अशी नेक कृत्ये करतो. नहेम्या असाच एक मनुष्य होता. त्याला देवाबद्दल आदरयुक्‍त भय होते आणि खऱ्‍या उपासनेबद्दल मोठा आवेश होता. एवढेच नव्हे तर, देवाच्या सेवेत त्याला मिळालेल्या विशेषाधिकारांबद्दल तो कृतज्ञ होता आणि त्याने यहोवाला स्वतःचा चांगला हिशेब दिला. त्याच्या मार्गाक्रमणावर मनन केल्याने आपण स्वतःला असे विचारण्यास प्रवृत्त होऊ शकतो, की ‘देवाने मला दिलेल्या विशेषाधिकारांकडे व जबाबदाऱ्‍यांकडे मी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताला मी स्वतःबद्दल कोणत्या प्रकारचा हिशेब देत आहे?’

ज्ञान आपल्याला जबाबदार ठरवते

४. येशूने आपल्या अनुयायांना कोणता आदेश दिला व ‘सार्वकालिक जीवनाबद्दल योग्य मनोवृत्ती असलेल्यांनी’ काय केले?

४ येशूने आपल्या अनुयायांना हा आदेश दिला: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) लोकांना शिकवून शिष्य बनवायचे होते. शिकवलेले व ‘सार्वकालिक जीवनाबद्दल योग्य मनोवृत्ती असलेले’ येशूने केले त्याप्रमाणे बाप्तिस्मा घेणार होते. (प्रेषितांची कृत्ये १३:४८; मार्क १:९-११) त्यांना, त्याने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी पाळण्याची इच्छा अंतःकरणापासून होणार होती. देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेतल्याने व त्याचा अवलंब केल्याने ते समर्पणाच्या निर्णयाप्रत येणार होते.—योहान १७:३.

५, ६. याकोब ४:१७, हे वचन आपण कसे समजावे? त्याच्या अवलंबनाचे उदाहरण द्या.

५ आपले शास्त्रवचनीय ज्ञान जितके सखोल तितकाच उत्तम आपल्या विश्‍वासाचा पाया असतो. यासोबतच, देवाला आपल्याला हिशेब देण्याची जबाबदारी वाढते. याकोब ४:१७ म्हणते: “चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे.” हे विधान प्रत्यक्षात, पूर्णपणे देवावर अवलंबून राहण्याऐवजी बढाई मारण्याविषयी शिष्य याकोबाने नुकतेच जे म्हटले त्याचे अनुमान आहे. एखाद्या व्यक्‍तीला हे ठाऊक आहे, की यहोवाच्या मदतीविना ती काहीही चिरस्थायी साध्य करू शकत नाही पण ती त्याप्रमाणे कार्य करत नसल्यास ते पाप आहे. परंतु याकोबाचे हे शब्द दुर्लक्षित पापांसंबंधीही लागू होऊ शकतात. उदाहरणार्थ, येशूने दिलेल्या शेरडे आणि मेंढरे यांच्या दाखल्यात शेरडांना त्यांच्या वाईट कृत्यांबद्दल नव्हे तर ख्रिस्ताच्या बांधवांना मदत न करण्याबद्दल धिक्कारले आहे.—मत्तय २५:४१-४६.

६ एका मनुष्यासोबत यहोवाचे साक्षीदार अभ्यास करत होते परंतु त्याने धूम्रपान सोडून द्यावे हे त्याला माहीत असूनसुद्धा तो सोडत नसल्यामुळे त्याची आध्यात्मिक प्रगती मंद होती. एका वडिलांनी त्याला याकोब ४:१७ वाचावयास सांगितले. या शास्त्रवचनाच्या महत्त्वावर विवेचन दिल्यानंतर वडील म्हणाले: “तुमचा बाप्तिस्मा झाला नसला तरी तुम्ही देवासमोर जबाबदार आहात आणि तुम्ही तुमच्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे.” आनंदाची गोष्ट अशी की, त्या मनुष्याने या गोष्टीकडे कान दिला, धूम्रपान सोडून दिले व काही काळातच तो यहोवा देवाला त्याच्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेण्याच्या योग्यतेचा झाला.

आपल्या सेवेबद्दल जबाबदार

७. ‘देवाविषयीच्या ज्ञानाबद्दल’ कदर दाखवण्याचा एक मार्ग कोणता?

७ आपल्या निर्माणकर्त्याला संतुष्ट करण्याची आपली अंतःकरणपूर्वक मनीषा असली पाहिजे. ‘देवाविषयीच्या ज्ञानाबद्दल’ कदर दाखवण्याचा एक मार्ग, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याने शिष्य बनवण्याबद्दल दिलेला आदेश पूर्ण करणे हा होय. देवाबद्दल आणि आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल आपल्याला असलेली प्रीती व्यक्‍त करण्याचाही तो मार्ग आहे. (नीतिसूत्रे २:१-५; मत्तय २२:३५-४०) होय, देवाविषयी आपल्याला असलेले ज्ञान आपल्याला जबाबदार ठरवते व आपण सहमानवांकडे संभाव्य शिष्य या नात्याने पाहण्याची आवश्‍यकता आहे.

८. पौलाला, तो आपल्या सेवेबद्दल देवास जबाबदार आहे असे वाटले असे आपण का म्हणू शकतो?

८ प्रेषित पौलाला हे माहीत होते, की पूर्ण अंतःकरणाने सुवार्तेचा स्वीकार करून तिचे अनुपालन केल्यामुळे उद्धार प्राप्त होतो तर तिचा नकार केल्यास नाश ओढवू शकतो. (२ थेस्सलनीकाकर १:६-८) म्हणूनच तर त्याच्या सेवेबद्दल तो यहोवास जबाबदार आहे असे त्याला वाटले. वास्तविक पाहता, पौल आणि त्याच्या सहकाऱ्‍यांनी आपल्या सेवेची इतकी गुणग्राहकता बाळगली, की ते त्या सेवेतून आर्थिक लाभ मिळवत होते, अशी इतरांवर छाप पाडण्याचेही ते टाळत होते. शिवाय, पौलाच्या अंतःकरणाने त्याला असे म्हणावयास प्रवृत्त केले: “जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही; कारण मला ती सांगणे भाग आहे; . . . मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!”—१ करिंथकर ९:११-१६.

९. सर्व ख्रिश्‍चनांना कोणते उल्लेखनीय ऋण फेडायचे आहे?

९ आपण यहोवाचे समर्पित सेवक असल्यामुळे ‘सुवार्ता सांगणे आपल्याला भाग आहे.’ राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्याचा आपल्याला आदेश देण्यात आला आहे. आपण स्वतःला देवास समर्पित केले तेव्हा ही जबाबदारी स्वीकारली. (पडताळा लूक ९:२३, २४.) शिवाय, आपल्याला एक ऋण फेडायचे आहे. पौल म्हणाला: “हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्‍यांचा मी ऋणी आहे. ह्‍याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्‍या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.” (रोमकर १:१४, १५) पौल एक ऋणको होता, कारण लोकांनी सुवार्ता ऐकावी आणि आपले जीवन वाचवावे म्हणून त्यांना प्रचार करणे त्याचे कर्तव्य होते हे त्याला माहीत होते. (१ तीमथ्य १:१२-१६; २:३, ४) म्हणूनच त्याला दिलेला आदेश पूर्ण करण्याकरता व सहमानवांचे ऋण फेडण्याकरता त्याने कष्ट घेतले. ख्रिस्ती या नात्याने आपल्यालाही एक ऋण फेडायचे आहे. देव, त्याचा पुत्र आणि आपले शेजारी यांच्याबद्दल आपल्याला असलेली प्रीती व्यक्‍त करण्याचा प्रमुख मार्ग राज्याचा प्रचार हा आहे.—लूक १०:२५-२८.

१०. काय करण्याद्वारे काहींनी त्यांची सेवा वाढवली?

१० देवाला स्वीकारयोग्य हिशेब देण्याचा एक मार्ग म्हणजे, आपली सेवा वाढवण्यासाठी आपल्या क्षमतांचा उपयोग करणे होय. उदाहरण द्यायचे झाल्यास: ब्रिटनमध्ये, अलीकडील वर्षांमध्ये अनेक राष्ट्रांतील लोकांचा लोंढा येत आहे. अशा लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जाण्याकरता, सुमारे ८०० पायनियर (पूर्ण-वेळेचे राज्य प्रचारक) आणि इतर शेकडो साक्षीदार विविध भाषा शिकत आहेत. यामुळे सेवेसाठी उत्तम प्रेरणा मिळाली आहे. चिनी वर्गाला शिकवणाऱ्‍या एका पायनियर भगिनीने म्हटले: “इतर साक्षीदारांना, लोकांस सत्य सांगता यावे म्हणून, मी त्यांना माझी भाषा शिकवेन असा विचार कधीही केला नव्हता. हे खरोखरच किती संतोषजनक आहे!” तुम्ही देखील तुमची सेवा अशाप्रकारे वाढवू शकाल का?

११. एका ख्रिस्ती स्त्रीने अनौपचारिक साक्ष दिल्याचा परिणाम काय झाला?

११ गटांगळ्या खाणाऱ्‍या मनुष्याला वाचवण्यासाठी आपल्यातील प्रत्येक जण बहुधा कसोशीने प्रयत्न करील. यहोवाचे सेवक याचप्रमाणे संधी मिळेल तेथे साक्ष देण्यासाठी त्यांच्या क्षमतांचा वापर करण्यास उत्सुक असतात. अलीकडेच, एक साक्षीदार भगिनी बसमध्ये एका स्त्री शेजारी बसली आणि शास्त्रवचनांबद्दल तिच्याशी बोलू लागली. हे ऐकल्यावर आश्‍चर्यचकित होऊन तिने अनेक प्रश्‍न विचारले. ही भगिनी बसमधून उतरणार होती इतक्यात, त्या स्त्रीने तिला आपल्यासोबत घरी येण्याची गळ घातली कारण तिचे आणखी पुष्कळ प्रश्‍न होते. साक्षीदार कबूल झाली. परिणाम? बायबलचा अभ्यास चालू करण्यात आला आणि सहा महिन्यांनंतर ती स्त्री बाप्तिस्मा न घेतलेली राज्य प्रचारक झाली. काही काळातच ती स्वतः सहा गृह बायबल अभ्यासांचे संचालन करू लागली. राज्य सेवेमध्ये एखाद्याच्या क्षमतांचा उपयोग केल्यामुळे हे केवढे रोमहर्षक प्रतिफळ!

१२. क्षेत्र सेवेमध्ये सेवक या नात्याने आपल्या क्षमतांना प्रभावकारीपणे कामी कसे लावता येऊ शकते?

१२ सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या १९२ पानी पुस्तकासारख्या प्रकाशनांचा क्षेत्रसेवेमध्ये उपयोग करून आपण सेवक या नात्याने आपल्या क्षमतांना प्रभावकारीपणे कामी लावू शकतो. एप्रिल १९९६ पर्यंत यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या लिखाण समितीने ज्ञान पुस्तकाचे १४० पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशन करण्यास परवानगी दिली होती आणि तोपर्यंत तर या पुस्तकाच्या ३,०५,००,००० प्रती १११ भाषांमध्ये आधीच प्रकाशित झाल्या होत्या. हे पुस्तक, बायबल विद्यार्थ्यांना देवाचे वचन आणि त्याचे उद्देश यांविषयी पुरेसे ज्ञान घेऊन यहोवास समर्पण करून बाप्तिस्मा घेण्यास मदत मिळावी या उद्देशाने लिहिण्यात आले होते. राज्य प्रचारक आता, एकाच विद्यार्थ्याबरोबर वर्षांनुवर्षे गृह बायबल अभ्यास घेणार नसल्यामुळे, ते अधिक लोकांबरोबर अभ्यास संचालन करू शकतात किंवा घरोघरच्या कार्यात अथवा सेवेच्या इतर प्रकारात जास्तीत जास्त सहभाग घेऊ शकतात. (प्रेषितांची कृत्ये ५:४२; २०:२०, २१) देवाला ते जबाबदार आहेत याची जाणीव असल्यामुळे ते ईश्‍वरी इशाऱ्‍यांकडे लक्ष आकर्षित करत आहेत. (यहेज्केल ३३:७-९) परंतु त्यांचा मुख्य उद्देश, यहोवाचा सन्मान करणे व या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतासाठी अजूनही राहिलेल्या अल्प समयात होता होईल तितक्या अधिक लोकांना सुवार्तेविषयी शिकण्यास मदत करणे हा आहे.

कुटुंब या नात्याने उत्तम हिशेब देणे

१३. ईश्‍वरी कुटुंबांनी नियमितपणे बायबल अभ्यास का करावा?

१३ खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार करणारी प्रत्येक व्यक्‍ती आणि कुटुंब देवाला जबाबदार आहे, यास्तव त्यांनी “प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न” केला पाहिजे व “विश्‍वासांत दृढ” राहिले पाहिजे. (इब्री लोकांस ६:१-३; १ पेत्र ५:८, ९) उदाहरणार्थ, ज्ञान पुस्तकाचा अभ्यास करून बाप्तिस्मा घेतलेल्यांनी, नियमितरीत्या सभांना उपस्थित राहून बायबल आणि इतर ख्रिस्ती प्रकाशने वाचून त्यांचे शास्त्रवचनीय ज्ञान वाढवले पाहिजे. ईश्‍वरी कुटुंबांमध्ये नियमित कौटुंबिक अभ्यास असला पाहिजे कारण तो ‘सावध राहण्याचा, विश्‍वासात स्थिर राहण्याचा, मर्दासारखे वागण्याचा, खंबीर होण्याचा’ एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. (१ करिंथकर १६:१३) तुम्ही तुमच्या घरातील मस्तक आहात तर, तुमचे कुटुंब आध्यात्मिकरीत्या सुपोषित आहे याची खात्री करण्यास तुम्ही देवासमोर जबाबदार आहात. पौष्टिक शारीरिक अन्‍न ज्याप्रमाणे निरोगी राहण्यास मदत करते त्याचप्रमाणे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ‘विश्‍वासात खंबीरपणे’ टिकून राहण्याकरता विपुल व नियमित आध्यात्मिक अन्‍नाची गरज आहे.—तीत १:१४.

१४. चांगल्या प्रकाराने शिकवण मिळालेल्या एका इस्राएल मुलीने दिलेल्या साक्षीमुळे काय झाले?

१४ तुमच्या घरात मुले असल्यास, त्यांना योग्य आध्यात्मिक प्रशिक्षण दिल्याबद्दल देव तुमच्या खात्यात त्याची अनुकूल मान्यता जमा करील. अशा प्रकारचे शिक्षण, देवाचा संदेष्टा अलीशा याच्या दिवसांमध्ये सिरियन लोकांनी बंदिवासात नेलेल्या एका लहानशा इस्राएली मुलीच्या जसे फायद्याचे ठरले तसेच त्यांच्याही लाभाचे ठरेल. ही मुलगी, नामान नावाचा एक सिरियन सेनापती जो कोडी होता त्याच्या पत्नीची दासी झाली. ती लहान असली तरी आपल्या धनिणीस म्हणाली: “शोमरोनातल्या संदेष्ट्यांशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते! त्याने त्याचे कोड बरे केले असते.” तिच्या साक्षीमुळे नामान इस्राएलला गेला, जॉर्डन नदीत सात वेळा स्नान करण्याबद्दल अलीशाने सांगितल्याप्रमाणे सरतेशेवटी मान्य केले आणि त्याचे कोड निघून गेले. शिवाय, नामान यहोवाचा एक उपासक झाला. ह्‍यामुळे त्या मुलीला केवढा आनंद झाला असावा बरे!—२ राजे ५:१-३, १३-१९.

१५. पालकांनी आपल्या मुलांना उत्तम आध्यात्मिक प्रशिक्षण देणे महत्त्वपूर्ण का आहे? उदाहरण द्या.

१५ सैतानास वश असलेल्या व नीतिमूल्ये नसलेल्या या जगात देव-भीरू मुले वाढवणे इतके सोपे नाही. (१ योहान ५:१९) परंतु तीमथ्याची आजी लोईस आणि आई युनीके या दोघींनी त्याला बालपणापासून यशस्वीरीत्या शास्त्रवचने शिकवली. (२ तीमथ्य १:५; ३:१४, १५) तुमच्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास करणे, त्यांना नियमितरीत्या ख्रिस्ती सभांना घेऊन जाणे व हळूहळू त्यांना तुमच्यासोबत क्षेत्रसेवेत नेणे या सर्व गोष्टी प्रशिक्षणाच्या नमुन्याचा एक भाग आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला देवाला हिशेब द्यावा लागेल. आता ऐंशीच्या घरात असलेली वेल्समधील एक ख्रिस्ती स्त्री आठवण करून सांगते, की १९२० च्या दशकाच्या सुरवातीला तिचे वडील एका डोंगरावरून दहा किलोमीटर चालून (जाऊन येऊन २० किलोमीटर) पुढील खोऱ्‍यातील खेडूतांना बायबल हस्तपत्रिकांचे वाटप करण्यासाठी जात तेव्हा तिला आपल्यासोबत घेत असत. “अशा वेळी माझ्या बाबांनी माझ्या मनावर सत्य बिंबवले,” असे ती कृतज्ञतेने म्हणते.

वडील हिशेब देतात—कसे?

१६, १७. (अ) प्राचीन इस्राएलमधील आध्यात्मिक प्रौढ वडीलवर्ग कोणत्या विशेषाधिकारांचा आनंद लुटत होते? (ब) प्राचीन इस्राएलमधील परिस्थितीशी तुलना केल्यास आज ख्रिस्ती वडिलांकडून अधिक अपेक्षिले का जाते?

१६ सुज्ञ मनुष्य शलमोन म्हणतो: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत, धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीतिसूत्रे १६:३१) परंतु, देवाच्या लोकांच्या मंडळीत केवळ वय एखाद्याला जबाबदारी घेण्यास सज्ज करीत नाही. प्राचीन इस्राएलमधील आध्यात्मिक प्रौढ वडीलवर्ग, न्याय करण्याकरता, शांती, योग्य व्यवस्था व आध्यात्मिक आरोग्य कायम राखण्याकरता न्यायाधीश व अमलदार या नात्याने कार्य करीत होते. (अनुवाद १६:१८-२०) ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीतही ही गोष्ट खरी असली तरी, या व्यवस्थीकरणाचा शेवट जसजसा जवळ येतो तसतसे वडिलांकडून अधिक अपेक्षिले जाते. असे का?

१७ इस्राएल लोक ‘निवडलेले लोक’ होते ज्यांना देवाने प्राचीन इजिप्तमधून सोडवले होते. त्यांचा मध्यस्थ, मोशे याच्याद्वारे त्यांना नियमशास्त्र मिळाले असल्यामुळे त्यांच्या वंशजाचा जन्म एका समर्पित राष्ट्रात झाला होता व त्यांना यहोवाचे उद्देश माहीत होते. (अनुवाद ७:६, ११) परंतु, आज अशा समर्पित राष्ट्रात कोणाचाही जन्म होत नाही आणि तुलनात्मकरीत्या फार कमी लोकांचे संगोपन शास्त्रवचनीय सत्याशी चांगल्याप्रकारे परिचित असलेल्या ईश्‍वरी कुटुंबांमध्ये होते. ‘सत्यात चालण्यास’ अलीकडेच सुरवात केलेल्यांना खासकरून शास्त्रवचनीय तत्त्वांनुरुप कसे जगावे याबद्दल कदाचित मार्गदर्शन लागेल. (३ योहान ४) ‘सुवचनांचा नमुना राखत असताना’ व यहोवाच्या लोकांना मदत करत असताना विश्‍वासू वडिलांच्या खांद्यांवर केवढी ही जबाबदारी आहे!—२ तीमथ्य १:१३, १४.

१८. मंडळीतील वडिलांनी कोणत्या प्रकारचे साहाय्य देण्यास सज्ज असले पाहिजे व का?

१८ चालण्यास शिकणारे मूल अडखळून खाली पडू शकते. त्याला असुरक्षित वाटते व पालकीय साहाय्य आणि धीर यांची आवश्‍यकता असते. यहोवास समर्पित असलेली व्यक्‍ती अशाच प्रकारे आध्यात्मिकरीत्या अडखळू किंवा खाली पडू शकते. देवाच्या नजरेत योग्य किंवा चांगले ते करण्यासाठी झटावे लागते हे प्रेषित पौलाला देखील आवश्‍यक वाटले. (रोमकर ७:२१-२५) देवाच्या कळपाच्या मेंढपाळांनी चूक केलेल्या परंतु खरा पश्‍चात्ताप करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रेमळ साहाय्य दिले पाहिजे. गंभीर चूक केलेल्या एका समर्पित स्त्रीला वडिलांनी भेट दिली तेव्हा आपल्या समर्पित पतीदेखत ती म्हणाली: “मला माहीत आहे की तुम्ही मला बहिष्कृत कराल!” परंतु, कुटुंबाला आध्यात्मिकरीत्या पूर्ववत करण्यासाठी काही मदत हवी आहे का त्याबद्दल वडिलांना जाणून घ्यायचे होते हे जेव्हा तिला नंतर सांगण्यात आले, तेव्हा तिला रडू आवरले नाही. वडिलांना हिशेब द्यावा लागेल याची जाणीव असल्यामुळे एका पश्‍चात्तापी सहविश्‍वासूला मदत करण्यास त्यांना आनंद वाटला.—इब्री लोकांस १३:१७.

उत्तम हिशेब देत राहा

१९. कशाप्रकारे आपण देवाला आपला चांगला हिशेब देत राहू शकतो?

१९ मंडळीतील वडिलांनी व देवाच्या इतर सर्व सेवकांनी यहोवाला स्वतःचा उत्तम हिशेब देत राहणे आवश्‍यक आहे. आपण देवाच्या वचनाशी जडून राहिलो व त्याची इच्छा पूर्ण करत राहिलो तरच असे करू शकतो. (नीतिसूत्रे ३:५, ६; रोमकर १२:१, २, ९) आपण विशेषतः, विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे केले पाहिजे. (गलतीकर ६:१०) तथापि, कापणीचे अद्यापही खूप काम आहे व कामकरी थोडे आहेत. (मत्तय ९:३७, ३८) तेव्हा, अविश्रांतपणे राज्याच्या संदेशाचा प्रचार करून आपण इतरांचे बरे करू या. आपण आपले समर्पण पूर्ण केले, त्याच्या इच्छेची पूर्ती केली आणि विश्‍वासूपणे सुवार्तेचा प्रचार केला तर यहोवा आपल्या खात्यात त्याची अनुकूल मान्यता जमा करील.

२०. नहेम्याच्या मार्गाक्रमणावर मनन केल्याने आपण काय शिकतो?

२० यास्तव, प्रभूच्या कामात आपण भरपूर कार्य करीत राहू या. (१ करिंथकर १५:५८) तसेच आपण नहेम्याचा विचार करतो तेव्हा बरे करतो ज्याने जेरुसलेमची भिंत पुन्हा बांधली, देवाचे नियमशास्त्र अंमलात आणले व खऱ्‍या उपासनेला आवेशाने बढती दिली. त्याने केलेल्या भल्या कामांबद्दल यहोवा देव त्याचे स्मरण करील अशी त्याने प्रार्थना केली. तुम्ही होता होईल तितके यहोवास भक्‍तिमान ठराल असे होवो व तो तुमच्या खात्यात त्याची अनुकूल मान्यता जमा करो.

तुमची उत्तरे काय आहेत?

◻ नहेम्याने कोणते उदाहरण मांडले होते?

◻ ज्ञान आपल्याला देवासमोर जबाबदार का ठरवते?

◻ आपण आपल्या सेवेत यहोवा देवास स्वीकारयोग्य हिशेब कसा देऊ शकतो?

◻ देवाला उत्तम हिशेब देण्याकरता कुटुंबे काय करू शकतात?

◻ ख्रिस्ती वडील हिशेब कसा देतात?

[१८ पानांवरील चित्रं]

पौलाप्रमाणे आपणही राज्य उद्‌घोषक या नात्याने देवाला उत्तम हिशेब देऊ शकतो

[१९ पानांवरील चित्रं]

तुमची मुले नामानच्या घरातील त्या लहानग्या इस्राएली मुलीप्रमाणे विश्‍वासात दृढ आहेत का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा