तुम्हाला दिलगिरी व्यक्त करण्याची खरोखरच आवश्यकता आहे का?
‘मी कधीही दिलगिरी व्यक्त करीत नाही,’ असे जॉर्ज बर्नर्ड शॉ यांनी लिहिले. ‘जे झाले ते झाले,’ असे कदाचित इतर जण म्हणतील.
आपल्या आत्मसन्मानास ठेच पोहंचेल म्हणून कदाचित आपण आपला दोष मान्य करण्याचे नाकारतो. दुसऱ्या व्यक्तीमध्ये खोट आहे अशी कदाचित आपण कारणमीमांसा करू. किंवा दिलगिरी व्यक्त करण्याची आपली इच्छा असेल परंतु संबंधित बाबीकडे अखेरीस दुर्लक्ष होईपर्यंत त्याकडे दिरंगाई करण्याचा आपला कल असेल.
तर मग, दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता आहे का? त्यामुळे खरोखरच काही साध्य होऊ शकते का?
प्रीती दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडते
बंधुप्रीती हे येशू ख्रिस्ताच्या खऱ्या अनुयायांचे ओळखचिन्ह आहे. त्याने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) शास्त्रवचने ख्रिश्चनांना आर्जवतात, की त्यांनी “एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति” करावी. (१ पेत्र १:२२) सखोल प्रीती आपल्याला दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडते. का? कारण मानवी अपरिपूर्णता अपरिहार्यपणे क्लेशमय भावनांस कारक आहे आणि त्या भावनांवर उपाययोजना न केल्यास त्या भावना प्रीतीमध्ये अडथळा ठरतात.
उदाहरणार्थ, ख्रिस्ती मंडळीतील एखाद्यासोबत असलेल्या व्यक्तिगत मतभेदांमुळे आपण कदाचित त्यासोबत न बोलण्याचे पसंत करू. आपण एखाद्याचे मन दुखविले असल्यास प्रेमळ नातेसंबंध कशा प्रकारे पुर्ववत करता येऊ शकतो? अनेक बाबतींत, दिलगिरी व्यक्त करण्याद्वारे आणि त्यानंतर सस्नेह संभाषणासाठी प्रयास करण्याद्वारे असे करता येते. आपण आपल्या सहविश्वासू बांधवांच्या प्रेमाचे ऋणी आहोत आणि एखादा दुखविला गेल्यानंतर आम्हाला क्षमा करा असे आपण म्हणतो तेव्हा आपण त्या कर्जाची काही प्रमाणात परतफेड करतो.—रोमकर १३:८.
उदाहरणादाखल: मेरी कारमेन आणि पाकी या दोन ख्रिस्ती स्त्रिया असून त्यांची पुष्कळ दिवसांपासून मैत्री होती. तथापि, मेरी कारमेन हिने अपायकारक चहाडीवर विश्वास ठेवला आणि पाकीसोबतीची तिची मैत्री थंडावली. काहीही कारण न सांगता तिने पाकीला हेतुतः टाळले. जवळजवळ एका वर्षानंतर त्या चहाडीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे मेरी कारमेनला कळले. तिची प्रतिक्रिया काय होती? पाकीकडे जाण्यास आणि अगदी वाईट वागल्याबद्दल स्वतःला झालेला अतिशय पश्चात्ताप नम्रपणे व्यक्त करण्यास तिला प्रीतीने प्रेरित केले. त्यानंतर त्या दोघी जणी मनसोक्त रडल्या आणि तेव्हापासून त्या जिवलग मैत्रिणी राहिल्या आहेत.
आपण काही चुकीचे केले आहे, असे आपल्याला कदाचित वाटत नसेल तरी देखील दिलगिरी व्यक्त केल्यामुळे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. मॅन्युएलला आठवते: “अनेक वर्षांपूर्वी आपल्या एका आध्यात्मिक बहिणीवर रुग्णालयात औषधोपचार चालू होते तेव्हा मी आणि माझी पत्नी तिच्या घरी राहिलो. तिच्या आजारपणात तिला आणि तिच्या मुलांना मदत करण्यासाठी आम्हाला जे काही शक्य होते ते सर्व आम्ही केले. परंतु ती रुग्णालयातून घरी परतल्यानंतर, आम्ही घरच्या खर्चाचा योग्य तऱ्हेने विनियोग लावला नाही, अशी तक्रार तिने तिच्या एका मित्राकडे केली.
“आम्ही तिच्या घरी गेलो आणि तिला सांगितले, की आमचे तारुण्य आणि अल्पानुभव यांमुळे कदाचित आम्हाला तुमच्याप्रमाणे बाबींची काळजी घेता आली नाही. तिने लगेचच असे म्हणून प्रतिक्रिया दाखवली, की ती आमची ऋणी आहे आणि आम्ही तिच्यासाठी जे काही केले त्याबद्दल ती आमची खरोखरच कृतज्ञ आहे. समस्येचे निरसन झाले होते. गैरसमज निर्माण होतात तेव्हा नम्रपणे क्षमा मागण्याचे महत्त्व या अनुभवाने मी शिकलो.”
प्रीती दाखविल्यामुळे आणि ‘शांतीला पोषक असणाऱ्या गोष्टींच्या मागे लागल्यामुळे’ यहोवाने या दांपत्याला आशीर्वादित केले. (रोमकर १४:१९) प्रीतीमध्ये इतरांच्या भावनांच्या जाणीवेचा देखील समावेश होतो. पेत्र आपल्याला “सहानुभूती” दाखविण्याचा सल्ला देतो. (१ पेत्र ३:८, NW) आपल्याकडे सहानुभूती असल्यास, आपल्या अविचारी शब्दामुळे किंवा कृतीमुळे एखाद्यास झालेल्या दुःखाची आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेने जाणीव होते आणि आपण दिलगिरी व्यक्त करण्यास प्रवृत्त होऊ.
“नम्रतारुपी कमरबंद बांधा”
विश्वासू ख्रिस्ती वडिलांमध्ये देखील अधूनमधून तीव्र मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. (पडताळा प्रेषितांची कृत्ये १५:३७-३९.) हे असे प्रसंग आहेत ज्यावेळी दिलगिरी व्यक्त करणे फार लाभदायक ठरेल. परंतु वडिलास किंवा इतर कोणत्याही ख्रिश्चनास दिलगिरी व्यक्त करणे जड जात असल्यास त्याला कोणत्या गोष्टीने मदत होईल?
नम्रता ही गुरुकिल्ली आहे. प्रेषित पेत्राने सल्ला दिला: “एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारुपी कमरबंद बांधा.” (१ पेत्र ५:५) हे खरे आहे, की एका हाताने टाळी वाजत नाही, परंतु नम्र ख्रिस्ती आपल्या स्वतःच्या चुकांवर विचार करतो आणि त्या मान्य करण्यास तयार असतो.—नीतिसूत्रे ६:१-५.
ज्या व्यक्तीकडे दिलगिरी व्यक्त केली जाते त्या व्यक्तीने तिचा नम्रपणे स्वीकार केला पाहिजे. उदाहरणादाखल, समजा दोन माणसे दोन विभिन्न डोंगरांच्या शिखरांवर उभे आहेत आणि त्यांना एकमेकांसोबत बोलायचे आहे. त्या दोघांमध्ये मोठी दरी असल्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर पडते आणि संभाषण करणे अशक्य होते. तथापि, त्या दोघांपैकी एक जण खाली उतरतो आणि दुसरा मनुष्य देखील त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करतो तेव्हा मात्र त्यांना सहजपणे संभाषण करणे शक्य होते. त्याचप्रमाणे, दोघा ख्रिश्चनांना त्यांच्यातील मतभेद दूर करायचे असल्यास, वरील उदाहरणावरून पाहता त्यांनी नम्रपणे त्या दरीमध्ये भेटावे आणि त्यानंतर योग्य प्रकारे दिलगिरी व्यक्त करावी.—१ पेत्र ५:६.
दिलगिरीचा विवाहामध्ये फार मोठा अर्थ होतो
दोघा अपरिपूर्ण मनुष्यांचा विवाह अपरिहार्यपणे दिलगिरी व्यक्त करण्याच्या अनेक संधी पुरवतो. पती आणि पत्नी दोघेही सहानुभूतीशील असल्यास आणि त्यांनी अविचारीपणे काही बोलले अथवा केले असल्यास ही सहानुभूती त्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडेल. नीतिसूत्रे १२:१८ याकडे अंगुली दर्शविते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” “अविचाराचे भाषण” पूर्णपणे टाळता येऊ शकत नाही, परंतु प्रामाणिक दिलगिरी व्यक्त करण्याद्वारे त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. अर्थातच असे करण्यासाठी निरंतर जागृतता आणि प्रयत्न यांची गरज असते.
आपल्या विवाहाविषयी सूझनa म्हणते: “जॅक* आणि मी मागील २४ वर्षांपासून विवाहबद्ध आहोत, तरी देखील आम्ही अजूनही एकमेकांबद्दलच्या अनेक नवनवीन गोष्टी शिकत आहोत. खेदाची गोष्ट म्हणजे, काही काळापूर्वी आम्ही विभक्त झालो आणि काही आठवडे एकमेकांपासून वेगवेगळे राहिलो. तथापि, आम्ही वडिलांकडून शास्त्रवचनीय सल्ला ऐकला आणि पुन्हा एकत्र आलो. आम्हाला आता या गोष्टीची जाणीव होते, की आमच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये फार तफावत असल्यामुळे कदाचित आमच्यामध्ये खटके उडतील. असे होते तेव्हा आम्ही लगेचच दिलगिरी व्यक्त करतो आणि एकमेकांचे दृष्टिकोन समजावून घेण्यासाठी खरोखरच विशेष प्रयत्न करतो. मला हे सांगण्यास आनंद होतो, की आमच्या विवाहामध्ये उल्लेखनीयरीत्या सुधारणा झाली आहे.” जॅक पुढे म्हणतो: “आम्ही असे क्षण ओळखण्यास देखील शिकलो आहोत ज्यावेळी आम्ही निराश होण्याच्या बेतात असतो. अशा वेळी आम्ही एकमेकांशी अधिक संवेदनशीलतेने वागतो.”—नीतिसूत्रे १६:२३.
तुमचा दोष नाही, असे तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे का? सखोल भावनांचा समावेश होतो तेव्हा दोष कोणाचा आहे हे अपक्षपातीपणे ठरविणे कठीण असते. परंतु विवाहामधील शांती ही प्रमुख बाब आहे. इस्राएली स्त्री अबीगईल हिचा विचार करा; तिच्या पतीने दावीदाशी दुर्व्यवहार केला होता. तिच्या पतीच्या मुर्खपणाचे तिच्या डोक्यावर खापर फोडता येत नव्हते तरी देखील तिने दिलगिरी व्यक्त केली. तिने याचना केली, “आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा.” दावीदाने तिचा विचार करून प्रतिक्रिया दाखविली; त्याने नम्रपणे हे मान्य केले, की ती तेथे नसती तर त्याने निरपराध रक्त सांडले असते.—१ शमुवेल २५:२४-२८, ३२-३५.
त्याचप्रमाणे जुन नामक एक ख्रिस्ती स्त्री जी ४५ वर्षांपासून विवाहित आहे तिला, यशस्वी विवाहासाठी दिलगिरी व्यक्त करण्यात प्राथमिकता घेणे ही बाब आवश्यक असल्याचे वाटते. ती म्हणते: “मी स्वतःला सांगते, की माझ्या व्यक्तिगत भावनांपेक्षा आमचा विवाह हा अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते तेव्हा मी विवाहास हातभार लावत आहे, असे मला वाटते.” जीम नामक एक वयस्कर मनुष्य म्हणतो: “क्षुल्लक बाबींमध्येही मी माझ्या पत्नीकडे दिलगिरी व्यक्त करतो. तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हापासून ती लगेचच हताश होते. म्हणून मी नियमितपणे तिच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणतो, ‘प्रिये मला क्षमा कर. तुला दुखविण्याचा माझा हेतू नव्हता.’ यामुळे एखाद्या रोपट्यास पाणी दिल्यानंतर ते जसे टवटवीत होते त्याप्रमाणे ती देखील लगेचच प्रफुल्लित होते.”
आपण ज्या व्यक्तीवर फार प्रेम करतो अशा व्यक्तीचे आपण मन दुखविल्यास संबंधित व्यक्तीकडे त्वरित दिलगिरी व्यक्त केल्यास ते फार परिणामकारक ठरते. मिलॉग्रॉस मनापासून असे म्हणून मान्य करते: “आत्मविश्वासाची कमी ही माझी समस्या आहे आणि माझ्या पतीच्या कठोर शब्दामुळे मी दुःखी होते. परंतु ते माझ्याकडे दिलगिरी व्यक्त करतात तेव्हा मला लगेचच हायसे वाटते.” यथायोग्यपणे, शास्त्रवचने आपल्याला सांगतात: “ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.”—नीतिसूत्रे १६:२४
दिलगिरी व्यक्त करण्याच्या कौशल्याचा अवलंब करा
आवश्यक आहे तेव्हा आपण दिलगिरी व्यक्त करण्याचा अवलंब केल्यास आपल्याला कदाचित अनुकूलरीत्या प्रतिक्रिया दाखविणारे लोक भेटतील. आणि कदाचित ते स्वतः देखील दिलगिरी व्यक्त करतील. आपण एखाद्याचे मन दुखवले असे आपल्याला वाटते तेव्हा वेळ दवडण्याऐवजी आणि चूक मान्य करण्यास अळमटळम करण्याऐवजी दिलगिरी व्यक्त करण्याची सवय करून का घेऊ नये? दिलगिरी हे दुर्बलतेचे लक्षण आहे, असे कदाचित जगाला वाटेल, परंतु यामुळे ख्रिस्ती प्रौढत्वाचा खरोखरच एक पुरावा मिळतो. अर्थातच, आपल्याला अशा लोकांपैकी होण्यास आवडणार नाही जे चूक केल्याचे मान्य करतात पण आपली जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, आम्हाला क्षमा करा, असे दिखाऊपणे आपण कधी म्हणतो का? आपण उशिरा येतो आणि मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, परंतु वेळेवर येण्याच्या बाबतीत सुधारणा करण्याचा निर्धार आपण करतो का?
तर मग, आपल्याला दिलगिरी व्यक्त करण्याची खरोखरच गरज आहे का? होय, आपल्याला तसे करण्याची आवश्यकता आहे. आपण असे करण्यास बाध्य आहोत आणि इतर देखील. अपरिपूर्णतेमुळे होणारे दुःख कमी करण्यात दिलगिरी साहाय्य करू शकते आणि दिलगिरीमुळे कमकुवत नातेसंबंध पुर्ववत होऊ शकतात. आपण ज्या-ज्यावेळी दिलगिरी व्यक्त करतो त्या-त्यावेळी तो आपल्यासाठी नम्रतेचा एक धडा असतो आणि इतरांच्या भावनांविषयी अधिक संवेदनक्षम होण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण देत असते. याचा परिणाम म्हणून सहविश्वासू, वैवाहिक सोबती आणि इतरजण आपल्याकडे या दृष्टिकोनातून पाहतील, की आपण त्यांच्या प्रेमास आणि विश्वासास पात्र आहोत. आपल्याला मनःशांती लाभेल आणि देव आपल्याला आशीर्वादित करील.
[तळटीपा]
a त्यांची नावे खरी नाहीत.
[२३ पानांवरील चित्रं]
प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त केल्याने ख्रिस्ती प्रेमास प्रेरणा मिळते