जेरुसलेम—तुमच्या “आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक” आहे का?
“जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानिले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.” —स्तोत्र १३७:६.
१. बॅबिलोनहून परतलेले यहुदी लोक देवाने निवडलेल्या शहराला कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे?
यहुद्यांनी पहिल्यांदा सा.यु.पू. ५३७ मध्ये जेरुसलेममध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून आता ७० वर्षे उलटली होती. देवाच्या मंदिराची पुनर्बांधणी झाली असली, तरी शहर मात्र अद्यापही पडीक अवस्थेतच होते. एव्हाना, बॅबिलोनमध्ये राहणाऱ्या यहुदी लोकांची एक नवीन पिढी लहानाची मोठी झाली होती. साहजिकच, जेरुसलेमविषयी त्यांच्यापैकी अनेकांच्या भावना स्तोत्रकर्त्याच्या या गीतात व्यक्त झाल्या होत्या: “हे यरुशलेमे, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.” (स्तोत्र १३७:५) पण काही लोकांनी जेरुसलेमचे केवळ स्मरणच केले नाही, तर त्यांनी आपल्या चालचलनातून देखील हे दाखवून दिले, की हे शहर त्यांच्या “आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक” होते.—स्तोत्र १३७:६.
२. एज्रा कोण होता आणि त्याला कशाप्रकारे आशीर्वाद मिळाला?
२ एज्रा याजकाचेच उदाहरण घ्या. आपल्या मायदेशी परत जाण्याआधीही त्याने जेरुसलेममधील खऱ्या उपासनेच्या वाढीकरता मोठ्या आवेशाने काम केले होते. (एज्रा ७:६, १०) असे केल्याने एज्राला फार मोठा आशीर्वाद मिळाला. बॅबिलोनमध्ये राहणाऱ्या यहुदी कैद्यांच्या दुसऱ्या तुकडीला जेरुसलेममध्ये घेऊन जाण्याची त्याला परवानगी देण्यात आली. हे महत्त्वाचे कार्य पार पाडण्याची अमूल्य संधी एज्राला द्यावी अशी इच्छा पारसच्या राजाच्या मनात यहोवानेच घातली होती. इतकेच काय, तर “मंदिर शोभिवंत करावे” म्हणून राजाने त्यांना जाताना खूप सोने आणि चांदी देखील दिली.—एज्रा ७:२१-२७.
३. आपल्याला सर्वात जास्त चिंता जेरुसलेमविषयीच आहे हे नहेम्याने कसे दाखवून दिले?
३ सुमारे १२ वर्षांनंतर आणखी एका यहुदी मनुष्यानेही अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतला; हा मनुष्य होता नहेम्या. तो शूशनमध्ये पारस राजाच्या राजवाड्यात, अर्तहशश्त राजाचा प्यालेबरदार म्हणून कामाला होता. हे काही साधेसुधे काम नव्हते, एक अतिशय प्रतिष्ठेचे काम होते. पण नहेम्याच्या नजरेत मात्र हा ‘आनंदाचा मुख्य विषय’ नव्हता. उलट, जेरुसलेमला जाऊन त्याचे बांधकाम करावे असे त्याला मनापासून वाटत होते. याविषयी नहेम्या कित्येक महिने देवाला प्रार्थना करत राहिला; त्याच्या प्रार्थनेच्या उत्तरात यहोवा देवाने त्याला आशीर्वादित केले. नहेम्याला वाटणारी चिंता पाहून पारसच्या राजाने त्याच्यासोबत आपले सैन्य धाडले आणि जेरुसलेमचे पुनर्वसन करण्याचा अधिकार त्याला देण्यात आला आहे या आशयाची पत्रेही त्याला दिली.—नहेम्या १:१–२:९.
४. यहोवाच्या उपासनेत मिळणारा आनंद इतर कोणत्याही गोष्टींत मिळणाऱ्या आनंदापेक्षा मोठा आहे, हे आपण कसे दाखवू शकतो?
४ एज्रा, नहेम्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या कित्येक यहुद्यांनी हे अगदी स्पष्टपणे दाखवून दिले, की जेरुसलेममध्ये केंद्रित असलेल्या यहोवाच्या उपासनेशिवाय त्यांच्याकरता दुसरी कोणतीही महत्त्वाची गोष्ट नव्हती—ही उपासना त्यांच्या “आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक” होती, याचा अर्थ आणखी कोणताही आनंद या उपासनेत त्यांना मिळणाऱ्या आनंदापेक्षा मोठा नव्हता. आज अनेक लोक यहोवाकडे, त्याच्या उपासनेकडे आणि त्याच्या आत्म्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या संघटनेकडे वरील प्राचीन लोकांप्रमाणेच पाहतात. अशांना प्राचीन लोकांचे हे उदाहरण पाहून किती उत्तेजन मिळते! तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का? देवाच्या समर्पित लोकांसोबत यहोवाची उपासना करण्याची अमूल्य संधी मिळाली, यातच तुम्हाला सर्वात मोठा आनंद आहे हे देवाला आवडणारी कामे धीराने करत राहण्याद्वारे तुम्ही दाखवून देता का? (२ पेत्र ३:११) असे करण्याचे आणखी उत्तेजन आपल्याला मिळावे म्हणून, एज्रा जेरुसलेमला गेल्यामुळे कोणते उत्तम परिणाम घडून आले यावर आपण विचार करू.
आशीर्वाद आणि जबाबदाऱ्या
५. एज्राच्या काळात यहुदाच्या रहिवाशांना कोणते महान आशीर्वाद मिळाले?
५ एज्राच्या सोबत जेरुसलेमला परतणाऱ्या सुमारे ६,००० लोकांनी मंदिराकरता देणगी म्हणून आपल्यासोबत सोने आणि चांदी आणली. आज त्याची किंमत केल्यास ती जवळजवळ १४० कोटी रुपये इतकी होईल. आधी जे यहुदी जेरुसलेमला परतले होते, त्यांनी सोबत आणलेल्या सोन्याचांदीपेक्षा सातपट अधिक सोनेचांदी या लोकांनी आपल्यासोबत आणली होती. जेरुसलेम आणि यहुद्याच्या रहिवाशांनी माणसांच्या आणि सोन्या-चांदीच्या स्वरूपात मिळालेल्या मदतीकरता यहोवाचे किती मनापासून आभार मानले असतील! परंतु जेव्हा देव भरपूर आशीर्वाद देतो तेव्हा त्यांसोबत आपल्यावर जबाबदारीही येते.—लूक १२:४८.
६. एज्राला त्याच्या देशात काय आढळले आणि हे त्याला कळले तेव्हा त्याने काय केले?
६ एज्राला लवकरच असे समजले, की अनेक यहुद्यांनी देवाची आज्ञा मोडून मूर्तिपूजक धर्मांच्या स्त्रियांशी विवाह केला होता, आणि यांमध्ये काही याजक आणि वडीलजनही होते. (अनुवाद ७:३, ४) देवाच्या नियमशास्त्राच्या करारातील आज्ञेचा अशारितीने भंग करण्यात आला आहे हे पाहून एज्राला अतिशय दुःख झाले, आणि हे साहजिक होते. “हे मी ऐकले तेव्हा मी आपली वस्त्रे व झगा फाडून . . . चिंताक्रांत होऊन खाली बसलो.” (एज्रा ९:३) तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या चिंतातुर इस्राएली लोकांसमोर एज्राने यहोवाकडे आपले अंतःकरण मोकळे केले. सर्व लोक त्याचे कान देऊन ऐकत असताना त्याने प्राचीन काळातील इस्राएलांनी केलेल्या देवाच्या अवज्ञेबद्दल आणि मूर्तिपूजक लोकांसोबत लग्न केल्याने होणाऱ्या ज्या परिणामांबद्दल देवाने बजावले होते, त्याविषयी सांगितले. शेवटी तो म्हणाला: “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तू न्यायी आहेस, आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहो; आज आमची स्थिति अशीच आहे; आम्ही तुजपुढे अपराधी आहो; यामुळे तुझ्यासमोर कोणास उभे राहता येत नाही.”—एज्रा ९:१४, १५.
७. (अ) पाप केलेल्यांशी वागताना एज्राने कोणते उत्तम उदाहरण मांडले? (ब) एज्राच्या दिवसांतील दोषी लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?
७ एज्राने “आम्ही” या सर्वनामाचा उपयोग केला. खरे तर त्याचा कोणताही दोष नसताना, त्याने स्वतःचा त्या दोषी लोकांमध्ये समावेश केला. एज्राला झालेले दुःख पाहून, आणि त्याची विनम्र प्रार्थना ऐकून लोकांचे मन हेलावून गेले; आणि त्यांना झालेला पश्चात्ताप त्यांच्या कार्यांतून दिसून आला. त्यांनी स्वतःहूनच यावर एक जहाल उपाय सुचवला—तो असा, की देवाच्या नियमशास्त्राचा भंग केलेल्या सर्व लोकांनी आपापल्या मूर्तिपूजक पत्नींना मुलांसमवेत त्यांच्या मायदेशी परत पाठवून द्यावे. त्यांच्या या म्हणण्याला एज्राने संमती दिली आणि त्याने सर्व दोषी लोकांना असे करण्याचे उत्तेजन दिले. पारसच्या राजाने एज्राला अधिकार दिला असल्यामुळे, तो नियमशास्त्राचा भंग करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देऊ शकत होता किंवा जेरुसलेममधून आणि यहुदामधून अशा लोकांना हद्दपार करू शकत होता. (एज्रा ७:१२, २६) परंतु त्याला असे करण्याची काही गरज पडली नाही. “सगळ्या मंडळीने” म्हटले: “तू सांगतोस त्याप्रमाणे करणे आम्हास उचित आहे.” याखेरीज त्यांनी कबूल केले, की “आम्ही या बाबतीत मोठा अपराध केला आहे.” (एज्रा १०:११-१३) एज्रा या पुस्तकाच्या १० व्या अध्यायात अशा १११ पुरुषांची नावे देण्यात आली आहेत ज्यांनी वरील निर्णयानुसार आपल्या मूर्तिपूजक पत्नींना आणि त्यांच्यापासून झालेल्या आपल्या मुलांना पाठवून दिले.
८. विदेशी पत्नींना त्यांच्या देशांत परत पाठवण्याची कडक कारवाई कोणत्या अर्थाने मानवजातीच्या हिताची होती?
८ या कारवाईमुळे केवळ इस्राएल राष्ट्राचाच नव्हे, तर एका अर्थाने संपूर्ण मानवजातीचा फायदा झाला. या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले असते, तर इस्राएली लोक त्यांच्या आसपासच्या राष्ट्रांत सामावून गेले असते. आणि असे झाले असते, तर संपूर्ण मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी अभिवचनयुक्त संततीची वंशावळ दूषित झाली असती. (उत्पत्ति ३:१५; २२:१८) अभिवचनयुक्त संतान यहुदा वंशाचा राजा दावीद याचाच वंशज आहे हे खात्रीने म्हणता आले नसते. सुमारे १२ वर्षांनंतर या महत्त्वपूर्ण गोष्टीवर पुन्हा लक्ष देण्यात आले आणि तेव्हा “इस्राएल वंशातील लोक विदेश्यांपासून निराळे झाले.”—नहेम्या ९:१, २; १०:२९, ३०.
९. सत्य न मानणाऱ्यांशी विवाहबद्ध असलेल्या ख्रिश्चनांकरता बायबलमध्ये कोणता चांगला सल्ला देण्यात आला आहे?
९ या अहवालावरून आजचे यहोवाचे सेवक काय शिकू शकतात? आज ख्रिश्चनांना नियमशास्त्राचा करार लागू होत नाही. (२ करिंथकर ३:१४) ते “ख्रिस्ताचा नियम” पाळतात. (गलतीकर ६:२) त्यामुळे, जर एखादी ख्रिस्ती व्यक्ती सत्य न मानणाऱ्या व्यक्तीशी विवाहबद्ध असेल तर अशावेळेस ती पौलाच्या पुढील सल्ल्याचे पालन करते: “जर कोणाएका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली, आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असली, तर त्याने तिला सोडू नये.” (१ करिंथकर ७:१२) याशिवाय, ख्रिस्ती नसलेल्या व्यक्तीशी लग्न झालेल्यांनी आपले वैवाहिक जीवन यशस्वी बनवण्याकरता विशेष प्रयत्न करावेत, असे बायबल स्पष्टपणे सांगते. (१ पेत्र ३:१, २) या उपयुक्त सल्ल्याचे पालन केल्यामुळे बहुतेकवेळा आशीर्वादच मिळाला आहे आणि ख्रिस्ती नसलेल्या सोबत्याची खऱ्या उपासनेबद्दल असणारी मनोवृत्ती बदलली आहे. त्यांपैकी काही तर विश्वासू बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती झाले आहेत.—१ करिंथकर ७:१६.
१०. आपल्या विदेशी पत्नींना ज्या १११ इस्राएली पुरुषांनी परत पाठवले त्यापासून ख्रिस्ती कोणता धडा शिकू शकतात?
१० पण, आपल्या विदेशी पत्नींना परत पाठवणाऱ्या इस्राएलांच्या उदाहरणावरून अविवाहित ख्रिश्चनांना मात्र एक चांगला धडा नक्कीच शिकायला मिळतो. तो असा, की सत्य न मानणाऱ्या मुलामुलींशी लग्न करण्याचा त्यांनी विचारच करू नये. अशाप्रकारचा नातेसंबंध टाळताना कदाचित मन कठोर करावे लागेल, कदाचित तुमच्या भावनाही दुखावतील. पण आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळत राहावा असे वाटत असल्यास हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. ख्रिश्चनांना आदेश देण्यात आला आहे: “विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.” (२ करिंथकर ६:१४) लग्नाच्या विचारात असणाऱ्या अविवाहित ख्रिश्चन व्यक्तीने केव्हाही, खऱ्या अर्थाने सत्य मानणाऱ्या व्यक्तीशीच लग्न करण्याचा विचार करावा.—१ करिंथकर ७:३९.
११. त्या १११ इस्राएली पुरुषांप्रमाणे, आपल्या आनंदाचा मुख्य विषय कोणता आहे याची कशाप्रकारे परीक्षा होऊ शकते?
११ याशिवायही अनेक बाबतीत, जेव्हा ख्रिश्चनांच्या लक्षात आणून दिले गेले की त्यांनी निवडलेला मार्ग हा बायबलनुसार अयोग्य आहे तेव्हा त्यांनी स्वतःमध्ये बदल केला. (गलतीकर ६:१) अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बायबलनुसार अयोग्य असून त्यांमुळे एखादी व्यक्ती देवाच्या संघटनेमध्ये राहण्यास अपात्र ठरू शकते; या नियतकालिकात अशाच कित्येक गोष्टींविषयी वेळोवेळी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ, ड्रग्सचा दुरुपयोग आणि तंबाखुचा वापर ही गंभीर पापे आहेत हे १९७३ साली यहोवाच्या लोकांना अगदी स्पष्टपणे समजले. देवाच्या मार्गावर चालत राहायचे असेल, तर “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध” करणे आवश्यक आहे. (२ करिंथकर ७:१) अनेक लोकांनी बायबलचा हा सल्ला मनापासून स्वीकारला आहे; जुनी सवय सोडताना सुरवातीला त्यांना नक्कीच त्रास झाला, पण तो सहन करायला ते तयार होते कारण देवाच्या शुद्ध उपासकांपैकी आपणही असावे असे त्यांना मनापासून वाटत होते. लैंगिकतेबद्दल, योग्य पेहरावाविषयी, नोकरी-धंदा, करमणुकीचे प्रकार आणि संगीत इत्यादींची विचारपूर्वक निवड करण्याविषयी बायबलच्या आधारावर अगदी स्पष्ट मार्गदर्शन देण्यात आले आहे. आपणही त्या १११ इस्राएली पुरुषांप्रमाणे, बायबलची तत्त्वे आपल्या लक्षात आणून दिली जातात तेव्हा ‘सुधारणूक स्वीकारण्यास’ तयार असले पाहिजे. (२ करिंथकर १३:११, NW) असे केल्याने आपण दाखवून देतो, की यहोवाच्या पवित्र लोकांसोबत राहून त्याची उपासना करण्याचा सुहक्क आपल्या “आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक” आहे.
१२. सा.यु.पू. ४५५ मध्ये काय झाले?
१२ विदेशी बायकांना त्यांच्या देशांत पाठवण्याच्या घटनेनंतर पुढील १२ वर्षांत काय घडले याविषयी बायबल आपल्याला काही सांगत नाही. इस्राएलच्या आसपासच्या देशांचे त्यांच्याशी शत्रुत्व नक्कीच वाढले असणार कारण त्यांच्या देशांतील कित्येक मुलींची लग्ने रद्द झाली होती. सा.यु.पू. ४५५ मध्ये नहेम्या लष्करासोबत जेरुसलेमध्ये आला. त्याला यहुदाचा प्रांताधिपती म्हणून नेमण्यात आले होते. शिवाय, पारस राजाच्या पत्रानुसार त्याला जेरुसलेम शहराचे पुनर्वसन करण्याचा अधिकार देण्यात आला होता.—नहेम्या २:९, १०; ५:१४.
आसपासच्या मत्सरी राष्ट्रांचा विरोध
१३. खोटा धर्म मानणाऱ्या यहुदाच्या आसपासच्या राष्ट्रांची मनोवृत्ती कशी होती आणि नहेम्याने कशी प्रतिक्रिया व्यक्त केली?
१३ खोटा धर्म मानणाऱ्या आसपासच्या राष्ट्रांनी नहेम्याचा येण्याचा उद्देश जाणून त्याला विरोध करण्यास सुरवात केली. त्यांच्या पुढाऱ्यांनी त्याला धमकावत म्हटले: ‘तू राजाविरुद्ध बंड करितोस काय?’ यहोवावर पूर्ण विश्वास ठेवून नहेम्याने त्यांना उत्तर दिले: “स्वर्गीचा देव आम्हास यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार; पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा यादगिरी काहीएक नाही.” (नहेम्या २:१९, २०) तटबंदीच्या दुरुस्तीच्या कामास सुरवात झाली तेव्हा हेच शत्रू त्यांची थट्टा करू लागले: हे दुर्बळ यहुदी काय करणार? आंच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगाऱ्यांतून निवडून ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय? त्यांच्या बांधकामावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील.” त्यांना प्रतिटोला मारण्याऐवजी नहेम्याने देवाला अशी प्रार्थना केली: “हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे; ते निर्भर्त्सना करीत आहेत ती त्यांची शिरी उलट आण.” (नहेम्या ४:२-४) सदैव यहोवावर विसंबून राहण्याची नहेम्याची ही वृत्ती खरोखर शिकण्यासारखी आहे!—नहेम्या ६:१४; १३:१४.
१४, १५. (अ) शत्रूंच्या विरोधाने हिंसक वळण घेतले तेव्हा नहेम्याने काय केले? (ब) भयंकर विरोध असतानाही यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांचे आध्यात्मिक उभारणीचे काम कसे चालू ठेवले आहे?
१४ प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम पार पाडण्यासाठी आजचे यहोवाचे साक्षीदारही देवावर विसंबून राहतात. विरोध करणारे त्यांची थट्टा करून त्यांच्या कामात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा देवाच्या संदेशामध्ये आस्था दाखवणारे काही लोक या उपहासाला बळी पडून माघार घेतात. थट्टा केल्याचा काही फायदा न झाल्यास कधीकधी हे विरोधी लोक आणखीनच पेटून उठतात आणि मारहाण वगैरे करण्याची धमकी देतात. जेरुसलेमची तटबंदी उभारणाऱ्यांच्या बाबतीतही हेच घडले. पण नहेम्याने त्यांच्या धमक्यांना भीक घातली नाही. उलट, त्याने तटबंदीचे काम करणाऱ्या लोकांना शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षणाकरता शस्त्रे दिली आणि त्यांचा विश्वास मजबूत केला; तो त्यांना म्हणाला: “त्यांची भीति धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”—नहेम्या ४:१३, १४.
१५ नहेम्याच्या काळाप्रमाणे आज यहोवाच्या साक्षीदारांनाही भयंकर विरोधाला तोंड द्यावे लागते; पण अशातही आपले आध्यात्मिक उभारणीचे काम पूर्ण करण्याकरता त्यांना चांगल्याप्रकारे सज्ज करण्यात आले आहे. ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाने’ वेळोवेळी आध्यात्मिक अन्न पुरवून देवाच्या लोकांचा विश्वास मजबूत केल्यामुळे त्यांना बंदी असलेल्या ठिकाणीसुद्धा शिष्य बनवण्यात यश आले आहे. (मत्तय २४:२५) आणि यामुळे, यहोवाच्या आशीर्वादाने संपूर्ण पृथ्वीवरील त्यांच्या संख्येत सतत वाढ झाली आहे.—यशया ६०:२२.
आपसांतील समस्या
१६. यहुद्यांमध्येच अशा कोणत्या समस्या होत्या ज्यांमुळे जेरुसलेमच्या तटबंदीचे बांधकाम करणाऱ्यांचा उत्साह मावळण्याचा धोका निर्माण झाला?
१६ जेरुसलेमच्या भिंतीचे बांधकाम पूर्ण होत गेले तसतसे काम अधिक अवघड होऊन बसले. याच दरम्यान एक अशी समस्या पुढे आली जिच्यामुळे बांधकाम करणाऱ्यांचा उत्साह मावळतो की काय अशी भीती वाटू लागली. अन्नाच्या तुटवड्यामुळे काही यहुद्यांना आपल्या मुलाबाळांना खाऊ घालणे आणि पारस सरकारला कर देणे कठीण झाले. त्यांच्यापैकी श्रीमंत असलेल्या काही यहुद्यांनी त्यांना अन्नधान्य आणि पैसे उधार दिले. पण घेतलेले पैसे आपण व्याजासहित परत करू याची खात्री देण्यासाठी त्यांना आपली मुलेबाळे आणि जमिनी या श्रीमंत यहुद्यांकडे ठेवणे भाग पडले; मात्र हे देवाच्या नियमशास्त्राच्या विरोधात होते. (निर्गम २२:२५; लेवीय २५:३५-३७; नहेम्या ४:६, १०; ५:१-५) आता हे यहुदी सावकार गरीब यहुद्यांच्या जमिनी बळकावण्याची धमकी देत होते आणि त्यांच्या मुलांना गुलाम म्हणून विकावे अशी त्यांच्यावर जबरदस्ती करत होते. ही निर्दयी आणि धनलोभी प्रवृत्ती पाहून नहेम्या अतिशय संतापला. जेरुसलेमच्या तटबंदीच्या कामावर यहोवाचा निरंतर आशीर्वाद राहावा म्हणून नहेम्याने लागलीच पावले उचलली.
१७. बांधकामावर यहोवाचा आशीर्वाद निरंतर राहावा म्हणून नहेम्याने काय केले आणि त्याचा काय परिणाम झाला?
१७ “एक मोठी सभा” भरवण्यात आली. त्यामध्ये नहेम्याने या श्रीमंत लोकांच्या लक्षात आणून दिले, की त्यांचे हे वागणे यहोवाला नाखुश करणारे होते. त्यानंतर त्याने सर्व दोषी लोकांना ज्यांमध्ये काही याजकही होते, कळकळीची विनंती केली, की त्यांनी लोकांकडून घेतलेले सर्व व्याज आणि ज्यांना व्याज देणे शक्य नव्हते अशांकडून बेकायदेशीरपणे हडपलेल्या जमिनी त्यांना परत कराव्यात. आनंदाची गोष्ट म्हणजे, हे दोषी लोक यास कबूल झाले: “आम्ही त्यांस ती परत देतो; आम्ही त्यांच्यापासून काही मागणार नाही; तू म्हणतोस त्याप्रमाणे आम्ही करितो.” ते केवळ बोलायचे म्हणून असे बोलले नाहीत कारण बायबल म्हणते, की ‘त्यांनी नहेम्याच्या वचनाप्रमाणे केले.’ तेव्हा एकत्र झालेल्या इस्राएलच्या सर्व लोकांनी यहोवाची स्तुती केली.—नहेम्या ५:७-१३.
१८. यहोवाच्या साक्षीदारांची कशामुळे सर्वत्र प्रशंसा केली जाते?
१८ आपल्याविषयी काय? यहोवाचे साक्षीदार कोणालाही स्वार्थीपणे लुबाडत नाहीत; त्याउलट ते आपल्या बांधवांना आणि संकटात सापडलेल्या इतर गरजू लोकांनाही मोठ्या उदारतेने मदत करतात आणि यासाठी त्यांची सर्वत्र प्रशंसा केली जाते. त्यामुळे नहेम्याच्या दिवसांप्रमाणे आजही अनेकांनी आभार मानून यहोवाची स्तुती केली आहे. पण दुसरीकडे पाहता, व्यापार आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना लुबाडणे किती चुकीचे आहे हे दाखवण्याकरता ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाला’ बायबलमधून मार्गदर्शन द्यावे लागले आहे. काही देशांमध्ये वधुमूल्य मागणे हे काही नवीन नाही, पण बायबल आपल्याला स्पष्टपणे इशारा देते, की लोभी लोकांना आणि लुबाडणूक करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. (१ करिंथकर ६:९, १०) बहुतेक ख्रिश्चनांनी या सल्ल्याचे पालन केले आहे. यावरून प्राचीन काळातील त्या यहुद्यांची आठवण येते ज्यांना आपल्याच गरीब बांधवाना लुटताना आपण किती मोठे पाप करत आहोत याची जाण झाली.
जेरुसलेमची तटबंदी पूर्ण होते
१९, २०. (अ) जेरुसलेमची तटबंदी पूर्ण झाल्यानंतर खोट्या धर्माच्या विरोधकांवर त्याचा काय परिणाम झाला? (ब) यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक देशांत कोणत्या प्रकारचा विजय मिळवला आहे?
१९ नानाप्रकारच्या विरोधांना तोंड दिल्यानंतर ५२ दिवसांनी जेरुसलेम शहराची तटबंदी पूर्ण झाली. विरोध करणाऱ्यांवर याचा काय परिणाम झाला? नहेम्याने म्हटले: “आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणाऱ्या विदेशी लोकांना भीति व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यांस दिसून आले.”—नहेम्या ६:१६.
२० आजही कितीतरी ठिकाणी देवाच्या कार्याला वेगवेगळ्या मार्गांनी विरोध सुरूच आहे. पण यहोवाच्या साक्षीदारांना विरोध करणे किती व्यर्थ आहे, हे लाखो लोकांना आता दिसून आले आहे. उदाहरणार्थ, नात्सी जर्मनी, पूर्व युरोप आणि अनेक आफ्रिकी देशांत प्रचार कार्याला दडपून टाकण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत; शिवाय, ‘हे काम देवाकडून’ होत आहे हेही बरेच लोक आता मान्य करू लागले आहेत. अशा देशांत ज्यांनी पुष्कळ काळापासून यहोवाच्या उपासनेला “आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक” मानून विश्वासूपणे काम केले आहे त्यांच्याकरता हे किती मोठे प्रतिफळ!
२१. पुढील लेखात आपण कोणत्या महत्त्वाच्या घटनांवर विचार करणार आहोत?
२१ जेरुसलेम शहराच्या तटबंदीचे आनंदमय समर्पण होण्याआधी ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्यांविषयी आपण पुढील लेखात पाहू. संपूर्ण मानवजातीला ज्याच्यामुळे लाभ होईल, अशा महान शहराची लवकरच कशाप्रकारे पूर्णता होईल यावरही आपण चर्चा करू.
तुम्हाला आठवते का?
◻ एज्रा आणि इतर लोकांनी जेरुसलेमबद्दल कसा आनंद व्यक्त केला?
◻ अनेक यहुद्यांच्या कोणत्या चुका सुधारण्याचा प्रयत्न एज्राने आणि नहेम्याने केला?
◻ एज्रा आणि नहेम्या यांच्या अहवालांवरून तुम्ही कोणता धडा शिकू शकता?
[१५ पानांवरील चित्र]
नहेम्याने सर्वात जास्त महत्त्व शूशनमधील प्रतिष्ठेच्या कामाला नव्हे, तर जेरुसलेमला दिले
[१६, १७ पानांवरील चित्रं]
आपले अतिमहत्त्वपूर्ण प्रचार कार्य निरंतर करत राहण्याकरता आपणही नहेम्याप्रमाणे मार्गदर्शनासाठी आणि सामर्थ्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करावी