वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ९/१५ पृ. ३-७
  • सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांच्या फळांवरून ओळखलेले
  • सावधगिरीची गरज
  • फळाचे परीक्षण करा
  • निर्णायक कृती करण्याचा समय
  • तुमचा धर्म देवास खरोखरी संतुष्ट करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • देवाला मान्य असलेली उपासना
    बायबल नेमके काय शिकवते?
  • धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
    धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?
  • योग्य धर्म तुम्हाला सापडला का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ९/१५ पृ. ३-७

सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात का?

सर्वच धर्म देवाला संतुष्ट करतात असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला माहीत असलेला उपासनेचा कोणताही प्रकार, निदान काही प्रमाणात कदाचित चांगले वर्तन ठेवण्याचे प्रोत्साहन देतो. पण देवाला संतुष्ट करण्यासाठी एवढेच पुरेसे आहे का?

काही जण म्हणतात, ‘तुम्ही प्रांजळपणे उपासना केलीत तर देव संतुष्ट होतो. सर्व धर्मांमध्ये चांगल्याच गोष्टी आहेत.’ उदाहरणार्थ, बहाय धर्माने जगातील नऊ मुख्य धर्मांतील विश्‍वास आपल्यात स्वीकारून वरीलप्रमाणे दृष्टिकोन अंमलात आणला आहे. हे सर्व, ईश्‍वरी उगमाकडून व एकाच सत्याचे पैलू आहेत असे या धार्मिक गटाला वाटते. ते कसे शक्य आहे?

शिवाय, एखादा धर्म त्याच्या अनुयायांना, सार्वजनिक ठिकाणी विषारी वायू ठेवण्याची आज्ञा देतो ज्यामुळे अनेकजण ठार मरण्याची शक्यता असते, तेव्हा असा धर्म देवाची मर्जी कशी संपादन करील असा प्रश्‍न विचारण्याचा तुमचा हक्क आहे. हा आरोप जपानमधील एका धार्मिक गटावर लावण्यात आला आहे. अथवा देव अशा धर्मावर संतुष्ट होतो का, की जो आपल्या अनुयायांना आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरतो? काही वर्षांपूर्वी, जिम जोन्स नावाच्या एका धार्मिक नेत्याच्या अनुयायांच्या बाबतीत असेच झाले.

पूर्वीच्या काळांकडे पाहून आपण स्वतःस विचारू शकतो, १६१८ पासून १६४८ पर्यंत लढलेल्या तीस वर्षांच्या युद्धाच्या बाबतीत पाहता धर्म, युद्ध चेतवतात तेव्हा ते देवाला संतुष्ट करू शकतात का? जगाचा विश्‍वव्यापी इतिहास (इंग्रजी) या पुस्तकानुसार, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यातील धार्मिक झगडे, “युरोपिय इतिहासातील सर्वात भयंकर युद्धांपैकी होते.”

तसेच, ११ व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंतच्या धर्मयुद्धांमुळे भीषण रक्‍तपात घडला. उदाहरणार्थ, पहिल्या धर्मयुद्धामध्ये, स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्‍या धर्मयुद्ध वीरांनी जेरुसलेमच्या मुस्लिम व यहुदी रहिवाशांची निर्घृणपणे कत्तल केली.

यासोबतच, १३ व्या शतकात सुरू झालेल्या व जवळजवळ ६०० वर्षे टिकून राहिलेल्या इन्क्विझिशन दरम्यान काय घडले त्याचा अंमळ विचार करा. धार्मिक पुढाऱ्‍यांच्या आज्ञेमुळे हजारो लोकांना छळण्यात व जाळण्यात आले. ख्रिस्ताचे पाळक—धर्मगुरुंचे किळसवाणे स्वरुप (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात पीटर दा रोझ म्हणतात: “[मानव] वंशाच्या इतिहासात, पोपच्या अधिकाराखाली [इन्क्विझिटर], मानव सभ्यतेवरील सर्वात क्रूर आणि निरंतर हल्ल्यास जबाबदार होते.” डॉमिनिकन चौकशी करणारे स्पेनचे तॉरकमादा यांच्याविषयी दा रोझ म्हणतात: “यांची नियुक्‍ती १४८३ मध्ये झाली, त्यांनी पंधरा वर्षांपर्यंत जुलमीरीत्या राज्य केले. ते १,१४,००० पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूस कारणीभूत होते, ज्यांच्यापैकी १०,२२० जणांना जाळण्यात आले.”

अर्थात, ख्रिस्ती धर्मजगताचे धर्मच केवळ रक्‍तदोषी नाहीत. फ्रेंच तत्त्वज्ञानी ब्लाझ पास्कल यांनी, पॉन्से नावाच्या पुस्तकात असे निरिक्षिले: “धार्मिक धारणा मनी बाळगून लोक जितक्या पूर्णपणे व आनंदाने दुष्ट कृत्य करतात, तितकाच आवेश ते इतर बाबतीत दाखवत नाहीत.”

त्यांच्या फळांवरून ओळखलेले

देवाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, एखाद्या धर्माची स्वीकार्यता केवळ एकाच घटकावर आधारित नसते. एखादा धर्म त्याला स्वीकारयोग्य होण्यासाठी, त्या धर्माच्या शिकवणुकी आणि कार्ये त्याचे लिखित सत्य वचन, बायबल याच्या अनुरुप असले पाहिजे. (स्तोत्र ११९:१६०; योहान १७:१७) देव-स्वीकृत उपासनेचे फळ यहोवा देवाच्या दर्जांच्या अनुरुप असावयास हवे.

येशू ख्रिस्ताने, डोंगरावरील त्याच्या प्रवचनात, देवाचे प्रतिनिधीत्व करणारे आहोत असा खोटा दावा करणारे संदेष्टे असतील असे सूचित केले. येशू म्हणाला: “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्‍यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१५-२०) हे शब्द आपल्याला आध्यात्मिकरीत्या सावध राहण्याची गरज असल्याचे दाखवतात. एखादा धार्मिक नेता किंवा गट देव आणि ख्रिस्त या दोघांना स्वीकारयोग्य आहे, असा आपण कदाचित विचार करू, पण तशाने आपली दिशाभूल होईल.

सावधगिरीची गरज

एखादा धर्म त्याला देवाची स्वीकृती असल्याचा दावा करत असला आणि त्याचे सेवक बायबलमधून उतारे वाचत असले, तरी देवाला संतुष्ट करणारा तो उपासनेचा प्रकार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचे नेते प्रभावकारी कृत्ये देखील करतील, ज्यावरून असे भासेल, की देव जणू काय त्यांच्याद्वारे कार्य करत आहे. तरीसुद्धा तो खोटा, देवास स्वीकारयोग्य असलेले फळ उत्पन्‍न न करणारा धर्म असू शकतो. मोशेच्या दिवसात जादूटोणा करणारे ईजिप्शियन याजक देखील प्रभावकारी कृत्ये करू शकत होते, पण त्यांना देवाची स्वीकृती निश्‍चितच नव्हती.—निर्गम ७:८-२२.

गत काळाप्रमाणे आजही अनेक धर्म, देव सांगत असलेल्या सत्याचे अनुपालन करण्याऐवजी मानवी कल्पना व तत्त्वज्ञान यांना बढती देतात. अशा वेळी, “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या,” हा बायबलचा इशारा खासकरून उचित ठरतो.—कलस्सैकर २:८.

चांगल्या आणि वाईट फळाबद्दल बोलल्यानंतर, येशू म्हणाला: “मला ‘प्रभुजी, प्रभुजी,’ असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.”—मत्तय ७:२१-२३.

फळाचे परीक्षण करा

स्पष्टतः मग, एखादा धर्म देवाला स्वीकारयोग्य आहे असा निष्कर्ष काढण्याआधी त्याची फळे पाहणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, तो धर्म राजकारणात गोवलेला आहे का? मग याकोब ४:४ मधील या शब्दांची नोंद घ्या: “जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” शिवाय, येशूने आपल्या खऱ्‍या अनुयायांविषयी म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) देवाच्या नजरेतील चांगला धर्म, अदृश्‍य आत्मिक प्राणी दियाबल सैतानाला, अर्थात “दुष्टाला वश” झालेल्या या जगाच्या राजकारणात भाग घेत नाही. (१ योहान ५:१९) उलट, देवाला स्वीकृत असलेला धर्म एकनिष्ठेने येशू ख्रिस्ताच्या अधिकाराखालील त्याच्या राज्याला समर्थन देतो आणि त्या स्वर्गीय सरकाराविषयीची सुवार्ता घोषित करतो.—मार्क १३:१०.

सविनय कायदाभंगास समर्थन देणारा धर्म देवाला स्वीकृत आहे का? प्रेषित पौलाने दिलेला सल्ला जर आपण ऐकला तर आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर स्पष्ट होते: “त्यांनी सत्ताधीश व अधिकारी ह्‍यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.” (तीत ३:१) अर्थात, आपल्या शिष्यांनी “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून” द्यायचे होते हे येशूने दाखवले.—मार्क १२:१७.

समजा, एखादा धर्म राष्ट्रांच्या युद्धात भाग घेण्याचे प्रोत्साहन देतो. पहिले पेत्र ३:११ आपल्याला ‘बरे ते करण्यास व शांतीच्या प्राप्तीसाठी झटण्यास’ आर्जवते. ज्या धर्माचे सदस्य दुसऱ्‍या राष्ट्रांतील त्यांच्या सहउपासकांची कत्तल करण्यास तयार असतात तो धर्म देवाला कसा संतुष्ट करू शकतो बरे? देवाची स्वीकृती असलेल्या धर्मातील सदस्य त्याचा प्रमुख गुण—प्रीती, प्रतिबिंबित करतात. शिवाय येशू म्हणाला: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) अशा प्रकारची प्रीती आणि राष्ट्रांच्या युद्धात चेतवला जाणारा हिंसक द्वेष यात कोणतीही गोष्ट साम्य नाही.

खरा धर्म झुंझार लोकांचे परिवर्तन शांतीच्या चाहत्यांमध्ये करतो. हे या शब्दांद्वारे भाकीत केले होते: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यशया २:४) खरी उपासना करणारे द्वेषाचे बोल ओकण्याऐवजी पुढील आज्ञेचे अनुपालन करतात: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.”—मत्तय २२:३९.

खरा धर्म आचरणारे, यहोवा देवाच्या उच्च दर्जांनुरुप जीवन व्यतीत करण्यास झटतात, अनैतिक जीवन-शैली आत्मसात करण्याचे नाकारतात. देवाचे वचन म्हणते: “अनीतिमान्‌ माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही; आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.”—१ करिंथकर ६:९-११.

निर्णायक कृती करण्याचा समय

खोटी उपासना आणि खरा धर्म यांतील फरक ओळखणे आवश्‍यक आहे. बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकात, खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याची ओळख, ‘पृथ्वीवरील राजांनी जिच्याबरोबर जारकर्म केले,’ ती लाक्षणिक वेश्‍या, “मोठी बाबेल” अशी दिली आहे. ती रक्‍तदोषी आहे आणि तिच्या हातात “अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला” आहे. (प्रकटीकरण १७:१-६) तिची कोणतीही गोष्ट देवाला स्वीकारयोग्य नाही.

हा समय निर्णायक कृती करण्याचा आहे. मोठ्या बाबेलमध्ये अद्यापही असलेल्या प्रामाणिक लोकांकरता आपला प्रेमळ निर्माणकर्ता हे बोलावणे पाठवतो: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा.”—प्रकटीकरण १८:४.

देवास संतुष्ट करणारा धर्म आचरण्याची तुमची इच्छा असल्यास तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांबरोबर चांगल्याप्रकारे परिचित का होत नाही? सोबत दिलेल्या यादीत शास्त्रवचनीय कारणांसह त्यांचे काही विश्‍वास दिले आहेत. साक्षीदारांचे विश्‍वास देवाच्या वचनाच्या एकवाक्यतेत आहेत का हे तुमच्या बायबलमधून तुम्ही पडताळून पहा. खऱ्‍या धर्माने जे फळ उत्पन्‍न केले पाहिजे असे तुम्हाला वाटते ते त्यांचा धर्म उत्पन्‍न करतो का याचा शोध करण्यासाठी तपासणी करा. तो तसे करत असल्याचे तुम्हाला आढळल्यास, देवाला संतोषविणारा धर्म तुम्हाला सापडलेला असेल.

[५ पानांवरील चौकट]

यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास

विश्‍वास बायबल आधार

देवाचे नाव यहोवा आहे निर्गम ६:३; स्तोत्र ८३:१८

बायबल देवाचे वचन आहे योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७

येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे मत्तय ३:१६, १७; योहान १४:२८

मानवजातीची उत्क्रांती झाली नाही उत्पत्ति १:२७; २:७

तर तिला निर्माण करण्यात आले होते

पहिल्या मनुष्याच्या पापामुळे मृत्यू ओढवला रोमकर ५:१२

मृत्यूनंतर जीव जिवंत राहत नाही उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४

नरक मानवजातीची सर्वसाधारण कबर आहे ईयोब १४:१३; प्रकटीकरण २०:१३

मृतांसाठी पुनरुत्थानाची आशा आहे योहान ५:२८, २९; ११:२५; प्रेषितांची कृत्ये २४:१५

ख्रिस्ताने आपले पार्थिव जीवन खंडणी मत्तय २०:२८; १ पेत्र २:२४; १ योहान २:१, २

या नात्याने आज्ञाधारक मानवांकरता वाहिले

प्रार्थना केवळ यहोवाला ख्रिस्ताद्वारे केल्या पाहिजेत मत्तय ६:९; योहान १४:६, १३, १४

नीतिविषयक बायबल नियम पाळले पाहिजेत १ करिंथकर ६:९, १०

उपासनेमध्ये प्रतिमांचा उपयोग करू नये निर्गम २०:४-६; १ करिंथकर १०:१४

भूतविद्या टाळली पाहिजे अनुवाद १८:१०-१२; गलतीकर ५:१९-२१

एखाद्याने आपल्या शरीरात रक्‍त घेऊ नये उत्पत्ति ९:३, ४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९

येशूचे खरे अनुयायी जगापासून अलिप्त राहतात योहान १५:१९; १७:१६; याकोब १:२७; ४:४

ख्रिस्ती सुवार्तेची साक्ष देतात, घोषणा करतात यशया ४३:१०-१२; मत्तय २४:१४; २८:१९, २०

पाण्यामध्ये पूर्णपणे बुडून घेतलेला मार्क १:९, १०; योहान ३:२२; प्रेषितांची कृत्ये १९:४, ५

बाप्तिस्मा देवास केलेल्या समर्पणाचे द्योतक आहे

धार्मिक पदव्या अशास्त्रवचनीय आहेत ईयोब ३२:२१, २२; मत्तय २३:८-१२

आपण ‘अंतसमयात’ जगत आहोत दानीएल १२:४; मत्तय २४:३-१४; २ तीमथ्य ३:१-५

ख्रिस्ताची उपस्थिती अदृश्‍य आहे मत्तय २४:३; योहान १४:१९; १ पेत्र ३:१८

सैतान ह्‍या जगाचा अदृश्‍य शासक आहे योहान १२:३१; १ योहान ५:१९

देव सद्य दुष्ट व्यवस्थिकरणाचा अंत करील दानीएल २:४४; प्रकटीकरण १६:१४, १६; १८:१-८

ख्रिस्ताच्या अधिकाराखालील देवाचे राज्य यशया ९:६, ७; दानीएल ७:१३, १४; मत्तय ६:१०

पृथ्वीवर धार्मिकतेत राज्य करील

ख्रिस्तासोबत स्वर्गामध्ये ‘लहान कळप’ लूक १२:३२; प्रकटीकरण १४:१-४; २०:४

राज्य करील

देव ज्यांचा स्वीकार करतो त्यांना लूक २३:४३; योहान ३:१६; प्रकटीकरण २१:१-४

अनंतकाळचे जीवन परादीस पृथ्वीवर प्राप्त होईल

[४ पानांवरील चित्रं]

इन्क्विझिशन दरम्यान हजारोंची कत्तल करण्यात आली

[६ पानांवरील चित्रं]

धर्मयुद्धांमुळे भयंकर रक्‍तपात घडला

[७ पानांवरील चित्रं]

खरा धर्म त्याच्या चांगल्या फळांवरून ओळखला जातो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा