त्यांनी यहोवाच्या इच्छेची पूर्ती केली
पेत्र पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रचार करतो
सा. यु. ३३ या वर्षाची ती मृदु वसंती सकाळ होती. वातावरण अतिशय रोमहर्षक होते! यहुदी अणि यहुदीयमतानुसारींच्या घोळक्यामुळे जेरुसलेमच्या रस्त्यावर गर्दी झाली होती. हे सर्व जण एलाम, मेसोपोटामिया, कॅप्पॅडोकिया, इजिप्त व रोम येथून आले होते. प्रत्येकाने आपल्या देशाप्रमाणे वस्त्र परिधान केलेले पाहणे व त्यांची विविध बोली ऐकणे किती रोमहर्षक होते! या खास प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी काहींनी सुमारे दोन हजार किलोमीटर प्रवास केला होता. कोणता प्रसंग? पेन्टेकॉस्ट—बार्लीच्या कापणीचा शेवट दाखवणारा आनंदाचा यहुदी सण.—लेवीय २३:१५-२१.
मंदिराच्या वेदीवरील अर्पणातून धुराचा लोट वर येत होता आणि लेवी हालेल (स्तोत्रसंहिता ११३ ते ११८) गात होते. सकाळी ९:०० वाजण्याच्या थोड्या वेळा आधी काहीतरी आश्चर्यचकित घडले. स्वर्गातून ‘मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला.’ तो, येशू ख्रिस्ताचे १२० शिष्य ज्या घरात जमले होते तेथे भरला. शास्त्रवचनीय अहवाल म्हणतो: “वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.”—प्रेषितांची कृत्ये २:१-४.
प्रत्येक जण आपापली बोली ऐकतो
थोड्याच वेळात अनेक शिष्यांचा समूह घराबाहेर पडू लागला. नवलाईची गोष्ट म्हणजे, ते तेथील समूहाच्या विविध भाषा बोलू शकत होते! पर्शियातून आलेल्या व्यक्तीने व इजिप्तच्या रहिवाश्याने, आपली भाषा एका गॅलिली रहिवाशाच्या तोंडून ऐकणे केवढे विस्मयकारक होते याची कल्पना करा. तेथील समूह भयचकित झाला होता हे समजण्याजोगे आहे. “हे काय असेल?” त्यांनी विचारले. काही जण शिष्यांची थट्टा करत म्हणाले: “हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”—प्रेषितांची कृत्ये २:१२, १३.
नंतर प्रेषित पेत्र उभा राहिला आणि समूहाला उद्देशून बोलू लागला. अन्य भाषा बोलण्याचे हे चमत्कारिक वरदान, “मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन,” असे देवाने योएल संदेष्ट्याला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता असल्याचे त्याने स्पष्टीकरण दिले. (प्रेषितांची कृत्ये २:१४-२१; योएल २:२८-३२) होय, देवाने नुकताच येशूच्या शिष्यांवर आपला पवित्र आत्मा ओतला होता. हा, येशू मृतातून उठला होता व सध्या स्वर्गामध्ये देवाच्या उजव्या हाताला असल्याचा स्पष्ट पुरावा होता. “म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभु व ख्रिस्त असे करून ठेवले आहे,” असे पेत्राने पुढे म्हटले.—प्रेषितांची कृत्ये २:२२-३६.
श्रोत्यांची प्रतिक्रिया काय होती? अहवाल सांगतो: “यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, बंधुजनहो, आम्ही काय करावे?” पेत्र त्यांना म्हणाला: ‘पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण बाप्तिस्मा घ्या.’ सुमारे ३,००० लोकांनी तसेच केले! त्यानंतर, ते ‘प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात तत्पर राहिले.’—प्रेषितांची कृत्ये २:३७-४२.
या स्मारकरूपी प्रसंगी पेत्राने बोलण्यात पुढाकार घेऊन, येशूने त्याला ज्या “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या” देण्याचे वचन दिले होते त्यांच्यातील पहिलीचा वापर केला. (मत्तय १६:१९) या किल्ल्यांनी विविध गटातील लोकांकरता खास विशेषाधिकार खुले केले. या पहिल्या किल्लीने, यहुद्यांना, आत्म्याने अभिषिक्त ख्रिस्ती होणे शक्य केले. नंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या किल्लीने हीच संधी समारियाच्या लोकांकरता व विदेशी यांच्याकरता खुली केली.—प्रेषितांची कृत्ये ८:१४-१७; १०:४४-४८.
आपल्याकरता धडे
यहुदी आणि यहुदीयमतानुसारी यांच्यावर देवाच्या पुत्राच्या मृत्यूची सामाजिक जबाबदारी असली, तरीदेखील पेत्राने त्यांना आदराने “बंधुजनहो” असे संबोधले. (प्रेषितांची कृत्ये २:२९) त्यांना दूषण देण्याचा नव्हे तर त्यांना पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त करण्याचा त्याचा उद्देश होता. म्हणूनच त्याने सकारात्मकपणे त्यांच्याशी बोलण्यास सुरवात केली. त्याने त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडल्या व त्याच्या मुद्यांना शास्त्रवचनीय संदर्भांचा आधार दिला.
आज, सुवार्तेचा प्रचार करणारे पेत्राच्या उदाहरणाचे अनुकरण करतात हे उचित आहे. त्यांनी त्यांच्या श्रोतृसमाजासोबत सामान्य आधार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून चाणाक्षपणे शास्त्रवचनांतून तर्क केला पाहिजे. सकारात्मकरीत्या बायबल सत्य सादर केल्यावर प्रामाणिक अंतःकरणाचे लोक याला प्रतिसाद देतील.—प्रेषितांची कृत्ये १३:४८.
पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राचा आवेश व धैर्य आणि सुमारे सात आठवड्यांआधी त्याने येशूचा केलेला नकार, यांमधील फरक उठून दिसतो. त्या प्रसंगी पेत्र मनुष्याच्या भयामुळे गर्भगळित झाला होता. (मत्तय २६:६९-७५) पण, येशूने पेत्रासाठी विनंती केली. (लूक २२:३१, ३२) प्रेषित पेत्रासमोर झालेल्या येशूच्या पुनरुत्थानोत्तर प्रकटणाने त्याला दृढ बनवले. (१ करिंथकर १५:५) परिणामतः, पेत्राचा विश्वास मोडकळीस आला नाही. थोडक्याच अवधीत तो धैर्याने प्रचार करत होता. यास्तव, त्याने केवळ पेन्टेकॉस्टच्या दिवशीच नव्हे तर त्याच्या उरलेल्या जीवनामध्ये देखील प्रचार केला.
पेत्राप्रमाणे आपणसुद्धा या नाहीतर त्या मार्गाने चूक केली असल्यास काय? आपण पश्चात्ताप करू, क्षमेसाठी प्रार्थना करू आणि आध्यात्मिक मदतीसाठी पावले उचलू या. (याकोब ५:१४-१६) तेव्हाच काय आपण या खातरीने पुढे जाऊ शकू, की आपल्या दयापूर्ण स्वर्गीय पित्या यहोवाला आपली पवित्र सेवा कबूल आहे.—निर्गम ३४:६.