वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ९/१ पृ. २५-२८
  • विश्‍वसनीय देवाची सेवा करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वसनीय देवाची सेवा करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ग्रीसमधील आरंभीचे दिवस
  • मुलकी युद्धादरम्यान
  • विश्‍वासहार्य आशा मिळणे
  • धरपकड आणि तुरुंगवास
  • मतांतराचा दोषारोप
  • माझ्या मुलाचा मृत्यू
  • यहोवावर विश्‍वास ठेवण्यास इतरांना मदत करणे
  • श्रीमंत वारसा
  • यहोवावर विश्‍वास ठेवण्याचा निर्धार
  • यहोवाच्या प्रेमळ हाताखाली सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मला ऑस्ट्रेलियात खरे धन प्राप्त झाले
    सावध राहा!—१९९४
  • यहोवा ज्यास पात्र आहे ते त्याला देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ९/१ पृ. २५-२८

विश्‍वसनीय देवाची सेवा करणे

किमॉन प्रोगॉकीस यांच्याद्वारे कथित

ती १९५५ या वर्षातील कडाक्याच्या थंडीची सायंकाळ होती. यॉरगोस हा आमचा १८ वर्षांचा मुलगा किऑस्कमध्ये कामास होता; परंतु तो अद्याप घरी न आल्यामुळे मला आणि माझी पत्नी, यानूला हिला चिंता वाटू लागली. अनपेक्षितपणे एका पोलिसाने आमचा दरवाजा ठोठावला. त्याने म्हटले, “तुमचा मुलगा सायकलवरून घरी येत असताना त्याला एका मोटारीची धडक बसली आणि त्यात तो मृत्युमुखी पडला.” त्यानंतर तो थोडासा जवळ आला आणि माझ्या कानात कुजबूजला: “ते तुम्हाला हा अपघात असल्याचे सांगतील, परंतु माझ्यावर विश्‍वास ठेवा, त्याची हत्या करण्यात आली आहे.” स्थानिक पाळक आणि काही निमलष्करी नेत्यांनी त्याला मारण्याचा कट केला होता.

त्यावर्षांमध्ये, जेव्हा ग्रीस संघर्ष आणि कष्टमय काळातून सावरत होता, तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असणे धोकादायक होते. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च आणि निमलष्करी संघटनांच्या शक्‍तीची मला चांगलीच कल्पना होती कारण मी १५ पेक्षा अधिक वर्षांपासून त्यांचा सक्रिय सदस्य राहिलो होतो. सुमारे ४० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबातील वातावरण दुःखमय झाले होते अशा काही घटनांविषयी मी तुम्हाला सांगतो.

ग्रीसमधील आरंभीचे दिवस

माझा जन्म १९०२ मध्ये ग्रीसमधील खालकिस नगराजवळ असणाऱ्‍या लहानशा गावातील एका श्रीमंत घरात झाला. स्थानिक राजकारणात माझे वडील सक्रिय भाग घेत होते आणि आमचे कुटुंब ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चचे धर्मपरायण सदस्य होते. माझे बहुतेक देशवासी निरक्षर होते त्यावेळी मी मात्र राजकीय आणि धार्मिक पुस्तकांचा उत्सुक वाचक बनलो.

२० व्या शतकाच्या सुरवातीला गरिबी आणि अन्याय सर्वत्र बोकाळला होता यामुळे जगामध्ये चांगली परिस्थिती यावी अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. माझ्या देशवासीयांच्या दुःखमय परिस्थितीत धर्माने सुधारणा केली पाहिजे असा मी विचार केला. माझा धर्माकडे कल असल्यामुळे मी आमच्या समाजातील ग्रीक ऑर्थोडॉक्स पाळक बनावे, असे गावातील प्रमुख व्यक्‍तींनी सुचवले. तथापि, मी अनेक धार्मिक शिक्षणसंस्थांना भेटी दिल्या होत्या तसेच बिशप आणि धर्माधिकाऱ्‍यांसोबत मी अनेक विस्तृत चर्चा देखील केल्या होत्या; तरी देखील मी अशा प्रकारच्या जबाबदारीस तयार अथवा इच्छुक असल्याचे मला वाटले नाही.

मुलकी युद्धादरम्यान

त्यानंतर कित्येक वर्षांनी म्हणजे एप्रिल १९४१ मध्ये ग्रीसवर नात्सीने ताबा मिळविला. यामुळे हत्या, अन्‍नटंचाई, हानी, असंख्य मानवी यातना यांचा समावेश असणाऱ्‍या काळाचा आरंभ झाला. त्यानंतर तीव्र विरोधी चळवळ निर्माण झाली आणि नात्सी आक्रमकांशी लढणाऱ्‍या गनिमी सैनिकांच्या एका गटात मी सामील झालो. परिणामी, माझ्या घरास कित्येक वेळा आग लावण्यात आली; मी गोळीबारात जखमी झालो तसेच माझ्या पिकाची नासाडी देखील करण्यात आली. १९४३ च्या सुरवातीस माझ्या कुटुंबाला आणि मला उंच-सखल दऱ्‍याखोऱ्‍यात पलायन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. ऑक्टोबर १९४४ मध्ये जर्मन आधिपत्य संपेपर्यंत आम्ही तेथे राहिलो.

जर्मन गेल्यानंतर आंतरिक राजकीय आणि मुलकी संघर्षाचा विस्फोट झाला. मी ज्या गनिमी विरोधी गटात होतो त्या गटाचे मुलकी युद्धातील एक प्रमुख लढाऊ दलात रुपांतर झाले. न्याय, समानता, आणि मित्रत्वाबाबतीत असणारे कम्युनिस्ट आदर्श मला आवडले तरी वास्तविक परिस्थितीमुळे अखेरीस माझा अक्षरशः भ्रमनिरास झाला. मला गटात वरचे स्थान होते त्यामुळे अधिकार लोकांना भ्रष्ट करीत असल्याचे मी स्वतः पाहिले. उदात्त सिद्धान्त आणि आदर्श असतानाही स्वार्थ आणि अपरिपूर्णता या गोष्टी उत्तम राजकीय उद्देशांची विल्हेवाट लावतात.

मला ज्या गोष्टीमुळे विशेष धक्का बसला ती म्हणजे मुलकी युद्धाच्या विविध पक्षांमध्ये ऑर्थोडॉक्स पाळक त्यांच्याच धर्मातील लोकांना मारण्यासाठी हातांत शस्त्र घेत होते! मी स्वतःला म्हटले, ‘आम्ही येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधित्त्व करतो, असे हे पाळक कसे म्हणू शकतात? कारण त्याने ताकीद दिली आहे: “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.“’—मत्तय २६:५२.

सन १९४६ मधील मुलकी युद्धाच्या वेळी मी मध्य ग्रीसमधील लामिया नगराच्या आसपास भूमिगत होतो. माझे कपडे पूर्णपणे विरले होते त्यामुळे मी माझे वेषांतर करून नवीन कपडे शिवण्यासाठी शहरातील शिंप्याकडे जाण्याचे ठरविले. मी तेथे गेलो तेव्हा त्याठिकाणी एक गरमागरम वादविषय चालू होता आणि मी देखील त्यात नकळत सहभागी झालो; परंतु मी त्यावेळी राजकारणाविषयी काहीही बोललो नाही, उलटपक्षी धर्म या माझ्या जुन्या आवडत्या विषयावर मी बोललो. तेथील उपस्थित लोकांनी माझ्या माहितीपूर्ण दृष्टिकोनांना अजमावल्यानंतर त्यांनी मला ‘धर्मशास्त्राचा प्राध्यापक’ असणाऱ्‍या विशिष्ट व्यक्‍तीशी बोलण्याचे सुचवले. लगेचच ते त्याला आणण्यासही गेले.

विश्‍वासहार्य आशा मिळणे

त्यानंतर जी चर्चा झाली त्यात माझ्या विश्‍वासांचा पाया काय आहे, असे या “प्राध्यापकाने” मला विचारले. “पवित्र पिता आणि चर्चमधील धर्माधिकाऱ्‍यांच्या सभा,” मी उत्तर दिले. माझ्या बोलण्याचे खंडन करण्याऐवजी त्याने त्याच्या लहान आकाराच्या बायबलमधील मत्तय २३:९, १० हे वचन काढले आणि तेथील येशूचे शब्द मला वाचण्यास सांगितले: “पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय.”

त्यावेळी माझे डोळे उघडले! हा मनुष्य सत्य सांगत असल्याचा अर्थबोध मला झाला. यहोवाचा साक्षीदार असल्याची त्याने स्वतःची ओळख दिल्यानंतर मी त्याकडे वाचण्यासाठी काही साहित्य मागितले. त्याने माझ्यासाठी बायबलच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकावर विवेचन देणारे प्रकाश (इंग्रजी) नामक पुस्तक आणले आणि ते पुस्तक मी माझ्या भूमिगत ठिकाणी नेले. पुष्कळ काळापासून प्रकटीकरणातील श्‍वापदे माझ्यासाठी एक रहस्य राहिले होते, परंतु आता मी शिकलो होतो, की ती श्‍वापदे आपल्या या २० व्या शतकातील राजकीय संघटनांचे प्रतिनिधित्त्व करतात. आपल्या काळासाठी बायबलचा अर्थ व्यवहार्य आहे आणि मला त्याचा अभ्यास केला पाहिजे व त्यातील सत्यांच्या एकवाक्यतेत मी माझे जीवन आणले पाहिजे, या गोष्टीचे मला आकलन होऊ लागले.

धरपकड आणि तुरुंगवास

त्यानंतर थोड्याच कालावधीत, मी ज्याठिकाणी लपून बसत असे त्याठिकाणी सैन्यांनी अचानक छापा घातला आणि मला अटक केली. मला अंधारकोठडीत टाकण्यात आले. काही काळापासून सैन्य माझ्या शोधात होते त्यामुळे मला मृत्युदंड होईल, असे मला वाटत होते. जो यहोवाचा साक्षीदार माझ्याशी पहिल्यांदा बोलला होता त्याने माझी त्या कोठडीत भेट घेतली. त्याने मला यहोवावर पूर्णपणे विश्‍वास ठेवण्याचे उत्तेजन दिले आणि मी तसे केले. शिक्षा म्हणून मला इकारियाच्या एजियन द्वीपावर सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले.

तेथे पोहंचल्याबरोबर मी स्वतःची ओळख एक कम्युनिस्ट म्हणून नव्हे, तर यहोवाचा साक्षीदार अशी दिली. बायबल सत्यांविषयी जे शिकले होते अशा इतर जणांना देखील तेथे तडीपार म्हणून धाडण्यात आले होते, त्यामुळे मी त्यांचा शोध घेतला आणि आम्ही एकत्र मिळून नियमितरीत्या बायबलचा अभ्यास करीत होतो. शास्त्रवचनांतून अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि आपला विश्‍वसनीय देव, यहोवा याबद्दल अधिक समज प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी मला मदत केली.

माझी शिक्षा १९४७ मध्ये संपली तेव्हा मला सरकारी अभियोक्‍त्‌याच्या दफ्तरात हजर राहण्यास फर्मावण्यात आले. माझ्या वागणुकीमुळे प्रभावित होऊन त्याने मला सांगितले, की मला पुन्हा तडीपार होऊ नये म्हणून मी त्याचा नावाचा उल्लेख करू शकतो. या काळादरम्यान माझे कुटुंब अथेन्समध्ये राहण्यास आले होते; तेथे आल्यानंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीसोबत सहवास राखण्यास मी सुरवात केली आणि लवकरच यहोवाला समर्पणाचे प्रतीक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.

मतांतराचा दोषारोप

ग्रीसमध्ये मतांतराचा निषेध करणारे कायदे १९३८ आणि १९३९ मध्ये संमत करण्यात आले होते त्यामुळे तेथील यहोवाच्या साक्षीदारांचा अनेक दशके छळ करण्यात आला. यास्तव, १९३८ ते १९९२ पर्यंत ग्रीसमधील साक्षीदारांना १९,१४७ वेळा अटक करण्यात आली आणि न्यायालयांनी त्यांना एकूण ७५३ वर्षांची शिक्षा दिली त्यांपैकी ५९३ वर्षांची शिक्षा वास्तविकपणे तुरुंगात घालविण्यात आली होती. मला व्यक्‍तिगतरीत्या देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केल्यामुळे ४० पेक्षा अधिक वेळा अटक झाली आणि एकूण २७ महिने मी वेगवेगळ्या कारागृहांत शिक्षा भोगली.

एकदा तर मला खालकिसमधील ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या पाळकाला पत्र लिहिल्यामुळे अटक करण्यात आली होती. सन १९५५ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना ख्रिस्ती धर्मजगत किंवा ख्रिस्ती विश्‍वास—यांपैकी कोण “जगाचा प्रकाश” आहे? (इंग्रजी) ही पुस्तिका सर्व पाळकांना पाठविण्याचे आर्जविण्यात आले होते. उच्च पदावर असणाऱ्‍या एका पाळकाला मी पत्र लिहिल्यामुळे त्याने माझ्याविरुद्ध मतांतराची फिर्याद केली. खऱ्‍या ख्रिश्‍चनाने देवाच्या राज्याचा प्रचार करण्यास हवा या बाध्यतेस स्पष्ट करण्याद्वारे न्यायालयीन चौकशीच्या वेळी साक्षीदार मुखत्यार तसेच स्थानिक वकील दोघांनी अत्यंत उत्तमपणे वकिली केली.—मत्तय २४:१४.

न्यायालयाच्या अध्यक्ष न्यायाधीशाने आर्किमॅन्ड्रीट (चर्चचा उच्चपदाधिकारी ज्याचे स्थान बिशपच्या खालोखाल असते) यास विचारले: “तुम्ही पत्र आणि पुस्तिका वाचली का?”

“नाही,” त्याने मोठ्या आवेशाने उत्तर दिले, “मी लिफाफा उघडल्याबरोबर त्यांना फाडून टाकून दिले!”

“तर मग या मनुष्याने तुमचे मतांतर केले असे तुम्ही कसे म्हणू शकता?” अध्यक्ष न्यायाधीशाने विचारले.

त्यानंतर आमच्या मुखत्याराने प्राध्यापकांची आणि इतरांची उदाहरणे सादर केली ज्यांनी पुस्तकांचे अनेक गठ्ठे सार्वजनिक पुस्तकालयात दिले होते. “त्या लोकांनी इतरांचे मतांतर करण्याचा प्रयत्न केला असे तुम्ही म्हणाल का?” असे त्याने विचारले.

स्पष्टपणे, अशा कार्यामुळे कोणत्याही प्रकारचे मतांतर होत नाही. “निर्दोष” असा निकाल ऐकल्यावर मी यहोवाचे आभार मानले.

माझ्या मुलाचा मृत्यू

सामान्यतः ऑर्थोडॉक्स पाळकांच्या चिथावणीमुळे माझा मुलगा यॉरगोस याला देखील सारखे सतावण्यात येत होते. देव राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याच्या त्याच्या युवा आवेशामुळे त्याला देखील अनेकदा अटक करण्यात आली होती. अखेरीस, विरोधकांनी त्याला ठार मारण्याचे ठरविले आणि त्याचवेळी आम्हा बाकीच्यांना प्रचार थांबविण्याचा इशाराही दिला.

यॉरगोसच्या मृत्यूची बातमी जो पोलीस घरी घेऊन आला होता त्याने सांगितले, की स्थानिक ग्रीक ऑर्थोडॉक्स पाळक आणि काही निमलष्करी नेत्यांनी आमच्या मुलाला ठार मारण्याचा कट रचला होता. त्या भीतीप्रद काळात अशा प्रकारचे “अपघात” सर्वसामान्य होते. त्याच्या मृत्यूमुळे आम्हाला दुःख झाले होते तरी देखील प्रचार कार्यात सक्रिय राहण्याचा आणि यहोवावर पूर्णपणे विश्‍वास ठेवण्याचा आमचा निर्धार यामुळे आणखी बळकट झाला.

यहोवावर विश्‍वास ठेवण्यास इतरांना मदत करणे

सन १९६० या दशकाच्या मध्यास अथेन्सपासून सुमारे ५० किलोमीटर दूर असलेल्या स्कॉलॉ ऑरोपासच्या समुद्रकिनाऱ्‍यावर वसलेल्या गावात माझी पत्नी आणि मुले उन्हाळ्याच्या महिन्यांत जात असत. त्यावेळी तेथे कोणीही साक्षीदार राहात नव्हते त्यामुळे आम्ही तेथील आसपासच्या लोकांना अनौपचारिक साक्ष देत असू. काही स्थानिक शेतकऱ्‍यांनी अनुकूल प्रतिसाद दिला. पुरुष सहसा दिवसा शेतांत काम करीत असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत रात्री उशिरा बायबल अभ्यास करीत होतो आणि त्यांपैकी अनेकजण साक्षीदार झाले.

यहोवा आमच्या प्रयत्नांना कशा प्रकारे आशीर्वादित करीत आहे हे पाहिल्याने आम्ही सुमारे १५ वर्षांपर्यंत आस्थेवाईकांसोबत बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी प्रत्येक सप्ताहात तेथे जात होतो. आम्ही ज्या लोकांचा तेथे अभ्यास घेत होतो त्यांपैकी जवळजवळ ३० लोकांनी प्रगती करून बाप्तिस्मा घेतला आहे. सुरवातीला, अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आणि सभा संचालित करण्यासाठी मला नियुक्‍त करण्यात आले. त्यानंतर या गटाची एक मंडळी झाली आणि आज मालाकासा येथील या मंडळीत शंभर पेक्षा अधिक साक्षीदार आहेत. आम्ही ज्यांना मदत केली त्यांपैकी चार जण आता पूर्ण-वेळेचे सेवक या नात्याने सेवा करीत असल्याचे पाहून मन आनंदाने उल्लासते.

श्रीमंत वारसा

मी यहोवाला माझे जीवन समर्पित केले होते त्यानंतर थोड्याच अवधीत माझ्या पत्नीने आध्यात्मिकरीत्या प्रगती करण्यास सुरवात केली आणि बाप्तिस्मा घेतला. छळाच्या कठीण काळात सुद्धा तिचा विश्‍वास बळकट होता तसेच तिच्या सचोटीत ती दृढ आणि स्थिर राहिली. मला वारंवार अटक झाल्यामुळे तिला ज्या अनेक संकटांना सामोरे जावे लागले त्याविषयी तिने कधीही तक्रार केली नाही.

पुष्कळ वर्षांपासून आम्ही दोघांनी मिळून अनेक बायबल अभ्यास संचालित केले आणि तिने सरळ आणि उत्साही पद्धतीने अनेकांना मदत केली आहे. सध्या, तिच्याकडे नियतकालिक मार्ग आहे ज्यामध्ये पुष्कळ लोकांचा समावेश आहे ज्यांना ती नियमितपणे टेहळणी बुरूज आणि सावध राहा! देते.

खरे तर, माझ्या पत्नीच्या प्रेमळ आधारामुळे हयात असलेली माझी तीन मुले तसेच त्यांची कुटुंबे म्हणजे माझी सहा नातवंडे आणि चार पतवंडे यहोवाच्या सेवेत सक्रिय आहेत. मी आणि माझ्या पत्नीने छळ आणि कडा विरोध सहन केला होता; परंतु त्यांना असा अनुभव आला नाही तरी देखील त्यांनी त्यांचा संपूर्ण विश्‍वास यहोवावर टाकला आहे आणि ते त्याच्या मार्गानुसार वाटचाल करीत आहेत. आमच्या प्रिय यॉरगोसचे पुनरुत्थान होऊन तो पुन्हा एकदा आम्हाला भेटेल तेव्हा आम्हाला किती आनंद झालेला असेल!

यहोवावर विश्‍वास ठेवण्याचा निर्धार

या सर्व वर्षांदरम्यान यहोवाचा आत्मा आपल्या लोकांना कार्यान्वयित करीत असल्याचे मी पाहिले आहे. मानवी प्रयत्नांवर आपण आपला विश्‍वास टाकू शकत नाही, हे पाहण्यास मला त्याच्या आत्म-निर्देशित संघटनेने मदत केली आहे. चांगल्या भवितव्यासाठी असणारी त्यांची आश्‍वासने निरर्थक आहेत वास्तविकतेत ती महान लबाडीशिवाय काही नाही.—स्तोत्र १४६:३, ४.

उतरते वय आणि गंभीर आरोग्य समस्या असताना देखील मी माझी दृष्टी राज्य आशेच्या वास्तविकतेकडे लावून आहे. खोट्या धर्मात आणि राजकीय माध्यमांद्वारे चांगली परिस्थिती आणण्याच्या प्रयत्नांत घालविलेल्या अनेक वर्षांचा मला आता खरोखरच पश्‍चात्ताप होतो. मला जगण्याची पुन्हा संधी मिळाल्यास निःसंदेह मी पुन्हा एकदा यहोवाची अर्थात विश्‍वसनीय देवाची सेवा करण्याचा निर्णय घेईन.

(किमॉन प्रोगॉकीस अलीकडेच मृत्यूमध्ये निद्रिस्थ झाले. त्यांना पृथ्वीवरील आशा होती.)

[२६ पानांवरील चित्रं]

किमॉन यांचे आपली पत्नी, यानूलासोबतचे अलीकडील छायाचित्र

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा