राज्य घोषकांचा वृत्तान्त
रशियातील “तान्हेले” असणाऱ्यांसाठी मदत
येशूने म्हटले, “जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृत्प होतील.” (मत्तय ५:६) रशियात सुमारे ७० वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत धार्मिक कार्यास स्वातंत्र्य नव्हते तेथील अनेकांची आध्यात्मिक तहान क्षमविण्यासाठी यहोवाचे साक्षीदार त्यांना कशा प्रकारे मदत करीत आहेत, हे खालील अनुभव दाखवून देतात.
▪ वॅलेन्टीना नामक एका स्त्रीला बायबलमधील अनेक गंभीर प्रश्न भेडसावत होते ज्यांची उत्तरे तिला कित्येक वर्षे मिळाली नव्हती. उदाहरणार्थ, तिला या गोष्टीचे आश्चर्य वाटले: ‘येशूने कोणाला प्रार्थना केली?’ येशूने कदाचित त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीला प्रार्थना केली असावी असा तिने तर्क केला आणि त्या व्यक्तीच्या नावाविषयी ती विचार करू लागली.
ती रशियन ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये गेली. तथापि, या धर्मात तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. समाधान न झाल्याने ती प्रॉटेस्टंट चर्चमध्ये गेली, परंतु तेथे देखील तिला स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत. कोठे जावे हे न कळल्यामुळे वॅलेन्टीनाने स्वतः उत्तरे शोधावी म्हणून बायबल वाचण्यास प्रारंभ केला—परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तिने मदतीसाठी प्रार्थना केली.
काही काळानंतर यहोवाच्या साक्षीदारांनी तिचे दार ठोठावले. देवाचे नाव यहोवा असल्याचे त्यांनी तिला बायबलमधून दाखविले. येशूने कोणास प्रार्थना केली, हे अखेरीस तिला उमगले! तिने साक्षीदारांसोबत बायबलचा नियमितपणे अभ्यास सुरू केला. वॉच टावर सोसायटीद्वारे प्रकाशित करण्यात आलेले साहित्य वाचण्यासाठी आणि बायबलमधील शास्त्रवचने पाहण्यासाठी तिने अनेक रात्री जागरणे केली. आपल्याला सत्य मिळाले आहे या अनुमानास येण्यास वॅलेन्टीना जास्त वेळ लागला नाही. तीन महिन्यांच्या आतच तिने प्रचार कार्यात भाग घेण्यास सुरवात केली आणि त्यानंतर दोन महिन्यांनी तिने बाप्तिस्मा घेतला. सत्यासाठी केलेल्या प्रार्थनापूर्वक शोधाचे तिला प्रतिफळ मिळाले.
▪ एका साक्षीदाराने दूरवरच्या क्षेत्रात प्रचार करण्यासाठी बसने प्रवास केला. प्रवासाच्या दरम्यान तो एका युवतीशी बायबलच्या अभिवचनांविषयी बोलला, परंतु त्या युवतीला त्यांत काही विशेष रस वाटला नाही. दोन महिन्यांनंतर या साक्षीदाराने त्याच क्षेत्रात जाहीर भाषण देण्यासाठी दुसऱ्यांदा प्रवास केला. भाषणानंतर तो एका नवोदित मनुष्याला भेटला आणि त्याला विचारले: “बायबलमधील सुवार्तेविषयी तुमच्यासोबत याआधी कोणी बोलले आहे का?” त्या मनुष्याने उत्तर दिले, “होय, तुम्हीच तर माझ्याशी बोललात.” तो विनोद करीत असल्याचे साक्षीदाराला वाटले. परंतु त्यानंतर त्या युवकाने सविस्तर सांगितले, की दोन महिन्यांपूर्वी तो बसने प्रवास करीत असताना एका साक्षीदाराचे आणि युवतीचे संभाषण त्याच्या कानांवर पडले होते. “मला आणखी जाणून घेण्याची इच्छा होती परंतु तुम्ही बसमधून उतरला आणि मला वाटले, की यहोवाच्या साक्षीदारांसोबत माझी पुन्हा कधीही भेट होणार नाही. त्यानंतर माझ्या कामाच्या ठिकाणी माझी भेट एका मनुष्याबरोबर झाली जो यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करीत आहे. आणि म्हणूनच मी येथे आलो!”
या मनुष्याने आणि त्याच्या पत्नीने बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. तो जी नोकरी करीत होता ती बायबल तत्त्वांच्या विरोधात असल्याचे त्याला अगदी थोड्याच अवधीत कळून आले. देवासमोर चांगली सद्सद्विवेकबुद्धी ठेवण्याची त्याची इच्छा असल्याने त्याने त्याची नोकरी बदलली. आता तो देवाच्या राज्याविषयी इतरांना सांगण्यास प्रत्येक संधीचा फायदा घेतो. त्याची पत्नी देखील तिच्या बायबल अभ्यासामध्ये प्रगती करीत आहे.
रशियातील विशाल क्षेत्रातील सर्व प्रामाणिक लोकांना असे म्हणण्यात यहोवाच्या साक्षीदारांना आनंद होतो: ‘या! आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.’—प्रकटीकरण २२:१७.