वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ८/१ पृ. ४-८
  • जीवाकरता एक चांगली आशा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवाकरता एक चांगली आशा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इब्री शास्त्रवचनांतील जीव
  • ग्रीक प्रभाव
  • जीवाबद्दल प्रारंभिक ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन
  • शिकवणुकीचा मूळ उगम
  • मृत्यूनंतर जीवन—बायबल काय म्हणते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • पुनरुत्थानावरील तुमचा विश्‍वास किती भक्कम आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मृत्युच्या वेळी काय होते?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ८/१ पृ. ४-८

जीवाकरता एक चांगली आशा

रोमी सैन्याने याची अपेक्षा केली नव्हती. यहुदी बंडखोर सैन्याचा शेवटला किल्ला, अर्थात मसादाच्या डोंगरावरील किल्ल्यावर चढाई करत असताना त्यांच्या शत्रूंवर भीषण हल्ला करण्यासाठी, योद्ध्‌यांच्या आरडाओरड्यासाठी, स्त्रिया व मुले यांच्या किंकाळ्यांसाठी त्यांनी स्वतःला सज्ज केले. याउलट, त्यांनी फक्‍त ज्वालांचा तडतड असा आवाज ऐकला. त्या जळणाऱ्‍या नगरदुर्गाच्या आत जाऊन पाहिल्यावर रोमी सैन्याला दुःखद वस्तुस्थिती दिसली: त्यांचे शत्रू—सुमारे ९६० लोक—आधीच मरून पडले होते! यहुदी योद्धांनी पद्धतशीरपणे त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची आणि मग एकमेकांची कत्तल केली होती. शेवटल्या माणसाने स्वतःला ठार मारले होते.a कोणत्या कारणामुळे ते इतक्या मोठ्या प्रमाणात खून व आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले होते?

समकालीन इतिहासकार जोसीफस यांच्यानुसार, जीवाच्या अमरत्वावर विश्‍वास हे याचे मुख्य कारण होते. रोमी लोकांच्या हातून मरण पावणे किंवा दास्यत्व पत्करण्यापेक्षा आत्महत्या अधिक सन्माननीय ठरेल असे मसादातील झीलॉटांचा नेता, एलीयाजर बेन जॉईरने पहिल्यांदा त्याच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोक कचरत असलेले पाहिल्यावर त्याने आत्म्याविषयी एक भावनापूर्ण भाषण देण्यास सुरवात केली. त्याने त्यांना सांगितले, की शरीर हे केवळ एक भार आहे, जीवासाठी एक तुरूंग आहे. “परंतु, पृथ्वीवर फरपटत आणून त्याला जखडून ठेवणाऱ्‍या लोढण्यातून जेव्हा स्वातंत्र्य मिळते तेव्हा,” तो पुढे म्हणाला, “जीव त्याच्या ठिकाणी पुन्हा जातो, मग खरे पाहता त्याला एक आशीर्वादित अधिकार मिळतो व पूर्णपणे अमर्यादित शक्‍ती मिळते व स्वतः देवाप्रमाणे तोही मानवी डोळ्यांना अदृश्‍य राहतो.”

परिणाम? जोसीफस यांनी अहवाल दिला, एलीयाजरने याच विचारावर विस्ताराने बोलल्यानंतर, “त्याच्या श्रोत्यांनी त्याचे बोलणे अर्धवट थांबवून अनियंत्रित उत्साहामध्ये उतावळे होऊन कृती केली.” जोसीफस पुढे म्हणतात: “झपाटल्याप्रमाणे ते घाईघाईने गेले, प्रत्येकाची चढाओढ चालली होती, . . . त्यांच्या पत्नींचे, मुलांचे आणि मग स्वतःची कत्तल करण्यासाठी त्यांची इच्छा इतकी दुर्वार झाली होती.”

अमर जीवाचा सिद्धान्त मृत्यूविषयी असलेल्या सर्वसामान्य मानवी दृष्टिकोनात केवढ्या खोलवर फेरफार करू शकतो याचे उदाहरण या भयंकर अहवालावरून दिसून येते. या सिद्धान्तावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना, मृत्यू मानवाचा सर्वात घोर शत्रू नव्हे तर जीवाला एका श्रेष्ठ अस्तित्वाचा आनंद लुटण्यास मुक्‍त करणारे द्वार असल्याप्रमाणे पाहण्यास शिकवले जाते. परंतु त्या यहुदी झीलॉटांनी असा विश्‍वास का बाळगला? अनेक जण असा दावा करतील की त्यांची पवित्र लिखाणे, इब्री शास्त्रवचने, मानवाच्या शरीरामध्ये एक जाणता आत्मा असतो, मृत्यूनंतर जिवंत राहण्यासाठी शरीरातून बाहेर निघणारा जीव असतो अशी शिकवण देतात. हे खरे आहे?

इब्री शास्त्रवचनांतील जीव

एका शब्दात सांगावयाचे असल्यास, नाही. बायबलच्या अगदी पहिल्या पुस्तकात, अर्थात उत्पत्तीत आपल्याला सांगितले जाते, की आपण जीव नावाची कोणती गोष्ट बाळगत नसतो, तर आपण स्वतः जीव आहोत. आदामाच्या निर्मितीबद्दल आपण असे वाचतो: “मनुष्य जीवधारी प्राणी झाला.” (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति २:७) येथे जीव यासाठी वापरलेला इब्री शब्द नेफेश, इब्री शास्त्रवचनांमध्ये सुमारे ७०० पेक्षा अधिक वेळा आलेला आहे, परंतु त्यावरून केव्हाही देहभिन्‍न, दिव्य अथवा मनुष्याचा आत्मिक भाग असा अर्थ ध्वनित होत नाही. त्याउलट, जीव सगुणरूपाने युक्‍त, प्रत्यक्ष व शारीरिक आहे.

खाली दिलेली वचने तुम्ही तुमच्या स्वतःच्या बायबलमधून काढून वाचू शकता कारण प्रत्येक वचनात नेफेश, हा इब्री शब्द आलेला आहे. ती वचने स्पष्टपणे दाखवून देतात, की जीव जोखीम, धोका पत्करू शकतो आणि त्याचे अपहरण देखील केले जाऊ शकते (अनुवाद २४:७; शास्ते ९:१७; १ शमुवेल १९:११); तो वस्तूंना स्पर्श करू शकतो (ईयोब ६:७); त्याला गजाआड केले जाऊ शकते (स्तोत्र १०५:१८); त्याला खाण्याची इच्छा होऊ शकते, उपवासामुळे तो पीडित होऊ शकतो व भूक आणि तहान यांच्यामुळे व्याकूळ होऊ शकतो; तसेच खंगवून टाकणाऱ्‍या आजाराने पीडित होऊ शकतो किंवा दुःखामुळे त्याला निद्रानाश होऊ शकतो. (अनुवाद १२:२०; स्तोत्र ३५:१३; ६९:१०; १०६:१५; १०७:९; ११९:२८) म्हणजेच, तुमचा जीव तुम्ही स्वतः आहात, म्हणूनच तुम्ही जे काही अनुभवता तेच तुमचा जीवही अनुभवू शकतो.b

मग याचा अर्थ जीव खरोखरच मरतो असा होतो का? होय. मानवी जीव अमर आहेत असे सांगण्याऐवजी इब्री शास्त्रवचनांमध्ये त्याला चूक करण्याबद्दल ‘जिवे मारले,’ किंवा न्यायदंड दिला, मृत्यू होईल अशा रीतीने मारले, हत्या केली, नाश केला व तुकडेतुकडे केल्याचे सांगितले आहे. (निर्गम ३१:१४; अनुवाद १९:६; २२:२६; स्तोत्र ७:२) यहेज्केल १८:४ म्हणते, ‘जो जीव पाप करितो तो मरेल.’ स्पष्टपणे, आपण सर्वांनी पाप केल्यामुळे मृत्यू मानवी जीवांचा सर्वसामान्य शेवट आहे. (स्तोत्र ५१:५) पहिला मनुष्य आदाम याला सांगितले होते की पापाची शिक्षा मृत्यू होती—आत्मिक क्षेत्रात स्थलांतर होऊन अमरत्व प्राप्त करणे नव्हे. (उत्पत्ति २:१७) आदामाने पाप केले तेव्हा त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली: “तू माती आहेस आणि मातीला जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) आदाम आणि हव्वेचा मृत्यू झाल्यावर, बायबल ज्याला बहुतेकवेळा ‘मृत जीव’ किंवा ‘प्रेत’ म्हणते ती त्यांची अवस्था झाली.—गणना ५:२; ६:६.

यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही, की इब्री शास्त्रवचनातील जीव याबद्दल द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना असे म्हणतो: “जुन्या करारातील मनुष्याची कल्पना एकतेची आहे, जीव व शरीराच्या संयोगाची नाही.” तो पुढे म्हणतो: “नेफेश . . . या शब्दावरून शरीरापासून भिन्‍न कार्य करणारा, अशी समज होत नाही.”

यास्तव, विश्‍वासू यहुद्यांनी मृत्यूबद्दल कोणता विश्‍वास बाळगला असावा? सरळ शब्दांत मांडले तर, मृत्यू हा जीवनाच्या विरूद्ध असल्याचा त्यांनी विश्‍वास केला. आत्मा किंवा जीवन शक्‍ती मानवाच्या शरीरातून निघून गेल्यावर काय होते त्याबद्दल स्तोत्र १४६:४ आपल्याला सांगते: ‘त्याचा आत्मा जातो तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.’c त्याचप्रकारे, मृतांस “काहीच कळत नाही,” असे राजा शलमोनाने लिहिले.—उपदेशक ९:५.

पण मग मसादातील झीलॉटांसारख्या पहिल्या शतकातील अनेक यहुद्यांना जीवाच्या अमरत्वाची इतकी खात्री का होती बरे?

ग्रीक प्रभाव

यहुद्यांना ही कल्पना बायबलमधून नव्हे तर ग्रीक लोकांकडून मिळाली होती. सा. यु. पू सातव्या आणि पाचव्या शतकांच्या दरम्यान असे दिसते, की ही कल्पना गूढ ग्रीक धार्मिक तत्त्वप्रणालींतून ग्रीक तत्त्वज्ञानात शिरली. वाईट जीवांना यातनामय मोबदला मिळणार त्या मृत्योपरांत जीवनाची कल्पना बऱ्‍याच काळापासून अपीलकारक वाटत होती, आणि ही कल्पना रुढ होऊन सर्वत्र पसरली. तत्त्ववेत्त्यांनी जीवाच्या निश्‍चित स्वभावावर अमर्यादित काळासाठी वाद घातले. मृत्यूच्या वेळी जीव शरीराबाहेर श्रवण करता येईल अशा रीतीने गुणगुणत, चिवचिव किंवा सळसळ आवाज करीत बाहेर निघून जातो असा होमर यांनी दावा केला. एपिक्युरस म्हणाले, की जीव जड असल्यामुळे तो निश्‍चितच अतिसूक्ष्म होता.d

पण जीवाच्या अमरत्वाचा सर्वात मोठा समर्थक सा. यु. पू. चौथ्या शतकातील ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो होता. त्याचा शिक्षक सॉक्रेट्‌सच्या मृत्यूचे त्याने दिलेले वर्णन, अनेक शतकांनंतरच्या मसादाच्या झीलॉटांसारखे काहीसे मत प्रकट करते. ऑस्कर कुलमॉन या विद्वानाने म्हटल्याप्रमाणे: “सॉक्रेट्‌सला किती निवांत व शांतपणे मृत्यू आला ते प्लेटो आपल्याला दाखवतो. सॉक्रेट्‌सचा मृत्यू अगदी छान आहे. येथे मृत्यूच्या भयाचे चिन्ह नाही. सॉक्रेट्‌स मृत्यूला घाबरू शकत नाही, कारण मृत्यू आपल्याला शरीरापासून मुक्‍त करतो. . . . मृत्यू जीवाचा जिवलग मित्र आहे. असे तो आपल्याला शिकवतो; आणि म्हणूनच, त्याच्या शिकवणुकीच्या आश्‍चर्यकारक सुसंगतेत त्याचा मृत्यू होतो.”

मकॅबियन काळादरम्यान ख्रिस्तपूर्व दुसऱ्‍या शतकात यहुदी लोक ग्रीक लोकांकडून ही शिकवण आत्मसात करू लागले हे उघड आहे. सा. यु. पहिल्या शतकामध्ये परुशी व एस्सेनस—प्रभावकारी यहुदी धार्मिक गट—यांनी ही शिकवण उंचावून धरली, असे जोसीफस आपल्याला सांगतात. एक कविता जी कदाचित त्या शकात बनवण्यात आली होती हाच विश्‍वास प्रतिबिंबित करते.

परंतु येशू ख्रिस्ताविषयी काय? त्याने व त्याच्या अनुयायांनी ग्रीक धर्मातून आलेल्या या कल्पनेची शिकवण दिली का?

जीवाबद्दल प्रारंभिक ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी, ग्रीक लोक जीवाबद्दल जसा विश्‍वास बाळगत होते तसा बाळगला नाही. उदाहरणार्थ, येशूचा मित्र लाजर याच्या मृत्यूचा विचार करा. जर लाजराचा जीव अमर होता जो मृत्यूच्या वेळी मुक्‍त व आनंदी असा त्याच्या शरीरातून निघून गेला होता तर योहानाच्या ११ व्या अध्यायातील अहवाल आपल्याला वेगळा वाचावयाला मिळाला नसता का? लाजर जर जिवंत होता व स्वर्गामध्ये सुस्थितीत व जाणता होता तर येशूने नक्कीच त्याच्या अनुयायांना याच्याबद्दल सांगितले असते; उलटपक्षी तो इब्री शास्त्रवचनांशी सहमत होता व लाजर झोपी गेला आहे, तो बेशुद्ध असल्याचे त्याने त्यांना सांगितले. (११ वे वचन) आपला मित्र एका अजब नव्या अस्तित्वाचा आनंद लुटत होता या कारणामुळे येशूला निश्‍चितच आनंद झाला असता; परंतु, त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो सर्वांसमक्ष रडल्याचे आपल्याला दिसते. (३५ वे वचन) जर लाजराचा जीव स्वर्गामध्ये शाश्‍वत अमरत्वाचा आनंद लुटत होता तर येशूने इतक्या क्रूरपणे त्याला आणखी काही वर्षे जगण्यासाठी रोगट व मर्त्य मानवजातीच्या एका अपरिपूर्ण शारीरिक देहाच्या ‘कैदेत’ जाण्याचा हुकूम दिला नसता.

लाजर मृतातून उठला तेव्हा, एक मुक्‍त, देहभिन्‍न आत्मा या नात्याने त्याने चार आश्‍चर्यकारक दिवसांसाठी आनंद लुटल्याच्या ज्वलंत गोष्टी सांगितल्या का? नाही. त्याने तसे काहीच सांगितले नाही. जीवाच्या अमरत्वामध्ये विश्‍वास करणारे कदाचित म्हणतील, की लाजरचा हा अनुभव अवर्णनीय असल्यामुळे त्याने काही सांगितले नसावे. परंतु, हा वादविषय खात्री पटवून देत नाही; नाहीतरी, लाजरने निदान त्याच्या प्रियजनांना तरी सांगितले नसते का, की—त्याने एक अवर्णनीय आश्‍चर्यकारक अनुभव अनुभवला? पण मृतावस्थेत असताना लाजरने कोणते अनुभव अनुभवले याबद्दल काहीच सांगितले नाही. मृत्यू कसा असतो: या बव्हंशी केंद्रित असलेल्या मानवी जिज्ञासेच्या विषयावर स्तब्धता आहे. या स्तब्धतेचे केवळ एका मार्गाने स्पष्टीकरण दिले जाऊ शकते. त्याबद्दल सांगण्यासारखे काही नव्हते. मृत लोक निद्रेत, बेशुद्ध असतात.

यास्तव, मृत्यू जीवाचा मित्र आहे, अस्तित्वाच्या स्तरांदरम्यानचा केवळ एक मार्ग-विधी आहे असे बायबल त्याच्याविषयी सांगते का? नाही! खरे ख्रिश्‍चन, जसे की प्रेषित पौल मृत्यूला मित्र लेखत नव्हते; तो “शेवटला शत्रु” होता. (१ करिंथकर १५:२६) ख्रिश्‍चन असे मानतात, की देवाविरुद्ध पाप आणि बंड करण्याचा थेट परिणाम मृत्यू असल्यामुळे तो स्वाभाविक नव्हे तर भयंकर, अस्वाभाविक आहे. (रोमकर ५:१२; ६:२३) मानवजातीबद्दल असलेल्या देवाच्या मूळ उद्देशाचा तो मुळीच भाग नव्हता.

परंतु, जीवाच्या मृत्यूबाबत ख्रिश्‍चनांना कोणतीही आशा नाही असे नाही. लाजरचे पुनरुत्थान अनेक बायबल अहवालांपैकीचे एक आहे जे आपल्याला मृत जीवांसाठी असलेल्या खऱ्‍या, शास्त्रवचनीय आशेचे—पुनरुत्थानाच्या आशेचे सचित्र वर्णन देतात. बायबल दोन प्रकारच्या पुनरुत्थानाविषयीचे शिकवण देते. कबरेमध्ये निद्रावस्थेत असलेल्या धार्मिक किंवा अधार्मिक बहुसंख्य मानवजातीसाठी पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवन जगण्यासाठी पुनरुत्थानाची आशा आहे. (लूक २३:४३; योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५) येशूने ज्यांना त्याचा ‘लहान कळप’ असे संबोधले अशा एका लहान गटाकरता स्वर्गामध्ये आत्मिक प्राणी या नात्याने अमर जीवन जगण्यासाठी पुनरुत्थानाची आशा आहे. हे, ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताचे प्रेषित देखील समाविष्ट आहेत, ख्रिस्त येशूसोबत मानवजातीवर राज्य करतील आणि त्यांना परिपूर्णावस्थेप्रत पुन्हा नेतील.—लूक १२:३२; १ करिंथकर १५:५३, ५४; प्रकटीकरण २०:६.

पण मग, ख्रिस्ती धर्मजगताची चर्चेस पुनरुत्थानाऐवजी मानवी जीवाच्या अमरत्वाची शिकवण का देत असल्याचे आपल्याला आढळून येते? वेदान्ती वर्नर जेगर यांनी मागे १९५९ मध्ये द हार्वड थिऑलॉजिकल रिव्हू या पुस्तकात दिलेल्या उत्तराचा विचार करा: “ख्रिस्ती वेदान्ताचा जनक, ओरिजन, ॲलेक्झॅन्ड्रियाच्या शाळेत प्लेटोनिक तत्त्वज्ञानी होता, ही ख्रिस्ती सिद्धान्ताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण वास्तविकता होती. त्याने प्लेटोकडून घेतलेल्या जीवाच्या विस्तृत शिकवणी ख्रिस्ती सिद्धान्तामध्ये जोडल्या.” यास्तव, अनेक शतकापूर्वी यहुद्यांनी जे केले होते तेच चर्चने देखील केले! त्यांनी ग्रीक तत्त्वज्ञानासाठी बायबलच्या शिकवणुकींना सोडून दिले.

शिकवणुकीचा मूळ उगम

आता जीवाच्या अमरत्वाच्या सिद्धान्ताच्या बचावासाठी काही विचारतील, की ही एकच शिकवण, या किंवा त्या प्रकारे जगाच्या इतक्या सर्व धर्मांमध्ये का शिकवली जाते बरे? ही शिकवण या जगाच्या धार्मिक समाजामध्ये इतकी व्यापक का आहे याचे समर्पक कारण शास्त्रवचने आपल्याला देतात.

बायबल आपल्याला सांगते, की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे,” आणि सैतान “ह्‍या जगाचा अधिकारी” असल्याची विशिष्ट ओळख देते. (१ योहान ५:१९; योहान १२:३१) जगाचे धर्म सैतानाच्या प्रभावापासून मुक्‍त नाहीत हे उघड आहे. उलटपक्षी, त्यांनी आजच्या जगातील त्रास आणि झगड्यांना मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. आणि असे दिसते, की जीवाच्या बाबतीत ते सैतानाच्या विचारसरणीला अगदी स्पष्टपणे प्रतिबिंबित करतात. ते कसे?

सर्वात पहिल्या लबाडीची आठवण करा. देवाने आदाम आणि हव्वेला सांगितले होते, की त्यांनी जर त्याच्या विरुद्ध पाप केले तर त्यांच्यावर मृत्यू ओढवेल. पण सैतानाने, “तुम्ही खरोखर मरणार नाही,” अशी हव्वेला हमी दिली. (उत्पत्ति ३:४) अर्थात, आदाम आणि हव्वा मरण पावले; देवाने म्हटल्याप्रमाणे ते मातीस मिळाले. परंतु “लबाडीचा बाप,” सैतान याने त्याची पहिली लबाडी सोडून दिली नाही. (योहान ८:४४) बायबल सिद्धान्तापासून वाहवत गेलेल्या किंवा त्यांचा नकार करणाऱ्‍या अगणित धर्मांमध्ये त्याच कल्पनेचा प्रसार केला जातो: ‘तुम्ही खरोखर मरणार नाही. तुमच्या शरीराचा नाश होईल, पण तुमचा जीव, सर्वदा जिवंत राहील—देवासारखा!’ आस्थेची गोष्ट अशी, की सैतानाने हव्वेला ती ‘देवासारखी’ होणार होती असेही सांगितले होते!—उत्पत्ति ३:५.

तेव्हा, आपली आशा लबाडींवर किंवा मानवी तत्त्वज्ञानांवर नव्हे तर सत्यावर आधारित असणे किती उत्तम आहे बरे! एखाद्या अमर जीवाच्या राहत्या-अंदाजी ठिकाणाची काळजी करत बसण्यापेक्षा, आपले मृत प्रियजन कबरेमध्ये बेशुद्धावस्थेत आहेत ही खात्री बाळगणे किती उत्तम आहे बरे! मृतांच्या या निद्रेमुळे आपण घाबरून जाण्याची किंवा निराश होण्याची काही गरज नाही. एका दृष्टीने या मृतांकडे ते एका सुरक्षित ठिकाणी असल्याप्रमाणे आपण पाहू शकतो. सुरक्षित का बरे? कारण बायबल आपल्याला सांगते, की यहोवा ज्या मृत जणांवर प्रीती करतो ते एका खास अर्थाने जिवंत आहेत. (लूक २०:३८) ते त्याच्या स्मृतीत जिवंत आहेत. हा गहन सांत्वनदायक विचार आहे कारण त्याच्या स्मृतीला सीमा नाहीत. तो अगणित प्रिय मानवांना पुन्हा जिवंत करण्याची व त्यांना परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगण्याची संधी देण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.—पडताळा ईयोब १४:१४, १५.

यहोवाच्या अभिवचनांची पूर्तता होत असताना पुनरुत्थानाचा तो वैभवी दिवस येईल. (यशया ५५:१०, ११) “तुझे मृत जिवंत होतील, त्यांची प्रेते उठतील. मातीस मिळालेले जागे होतील आणि आनंदाने गजर करतील; कारण तुजवरील दहिवर हे प्रभातसमयीचे जीवनदायी दहिवर आहे; मृत सजीव होऊन मातीतून बाहेर येतील,” ही भविष्यवाणी पूर्ण होत असतानाचा विचार करा. (यशया २६:१९, द न्यू इंग्लिश बायबल) यास्तव, बाळ जसे आपल्या आईच्या गर्भात सुरक्षित असते तसेच कबरेत निद्रावस्थेत असलेले मृत जण सुरक्षित आहेत. फार लवकर त्यांचा “जन्म” होईल, परादीस पृथ्वीवर त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल!

याहूनही उत्तम दुसरी कोणती आशा असू शकेल का?

[तळटीपा]

a दोन स्त्रिया आणि पाच मुले लपून बसल्यामुळे वाचली असे म्हटले जाते. त्या स्त्रियांनी नंतर त्यांना कैद करणाऱ्‍या रोमी सैन्याला सविस्तर माहिती सांगितली.

b अर्थात, इतर शब्दांचा ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो त्याचप्रमाणे नेफेश या शब्दाच्या अर्थाच्या विविध छटा आहेत. उदाहरणार्थ, खोल भावनांच्या संबंधाने विशेषकरून तो, आंतरिक व्यक्‍तित्वाला सूचित करू शकतो. (१ शमुवेल १८:१) तो त्या जीवनाला देखील सूचित करू शकतो, की ज्याचा आनंद एक व्यक्‍ती जीव या नात्याने लुटत आहे.—१ राजे १७:२१-२३.

c “आत्मा” यासाठी असलेला, रुआख या इब्री शब्दाचा अर्थ “श्‍वास” किंवा “वायू” असा होतो. मानवांच्या संबंधाने तो जाणत्या आत्म्याला सूचित करत नाही तर द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थिओलॉजी (इंग्रजी), प्रमाणे “व्यक्‍तीच्या जीवन-शक्‍तीला” सूचित करतो.

d अशा प्रकारचा विक्षिप्त विचार करणारा हा शेवटला नव्हता. या शतकाच्या सुरवातीत, एका शास्त्रज्ञाने तर अनेक लोकांचे मृत्यूनंतर लगेच वजन पाहिले व ते वजन मृत्यूपूर्वी पाहिलेल्या वजनातून वजा करून जीवांचे वजन पाहिल्याचा दावा केला.

[७ पानांवरील चित्रं]

मृत्यू त्यांच्या जीवांना मुक्‍त करणार होता, असा मसादातील यहुदी झीलॉटांचा विश्‍वास होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा