जीव अमर आहे का?
मित्रजन आणि कुटुंबातील सदस्य शांतपणे त्या उघड्या दफनपेटीजवळ जातात. त्यामध्ये ठेवलेल्या एका १७ वर्षीय मुलाला ते पाहतात. त्याच्या शाळेतील मुले तर त्याला ओळखू देखील शकत नाहीत. किमो थेरपीमुळे त्याचे सर्व केस गळाले होते; कर्करोगामुळे त्याचे बरेच वजन घटले होते. हा खरोखरच त्यांचा मित्र असू शकत होता का? काही आठवड्यांआधी तो कल्पना, प्रश्न, उत्साह—जीवन यांनी भरलेला होता! त्या मुलाची आई अश्रू ढाळत वारंवार म्हणते: “टॉमी आता खूष आहे. देवाला टॉमी आपल्यासोबत स्वर्गामध्ये हवा होता.”
या दुःखी मातेला तिचा मुलगा अजूनही जिवंत आहे या कल्पनेमुळे थोडीफार आशा व दिलासा मिळतो. चर्चमध्ये तिला अशी शिकवण देण्यात आली आहे, की जीव अमर आहे व ते व्यक्तिमत्त्व, विचार, आठवणी यांचे केंद्र आहे—“अहं.”a तिला वाटते, की तिच्या मुलाचा जीव मरण पावलेलाच नाही; जिवंत जीव असल्यामुळे त्याने मृत्यूनंतर त्याचे शरीर सोडले व देव आणि देवदूतांबरोबर राहण्यासाठी स्वर्गात गेला.
दुःखाच्या काळात मानवी अंतःकरण आशेच्या कोणत्याही किरणाला घट्ट पकडून राहते, म्हणून, इतके लोक असा विश्वास का करतात हे समजणे कठीण नाही. उदाहरणार्थ, जे. पॅटरसन-स्मीथ हे वेदान्ती यानंतरचे (भवितव्याचे) शुभवर्तमान (इंग्रजी), या पुस्तकात स्वतःला कसे व्यक्त करतात ते पाहा, “मृत्यूनंतर जे काही येते त्याच्या तुलनेत मृत्यू काहीच नाही—तो आपल्याला त्या अजब, अजब, अजब दुनियेत घेऊन जातो.”
मानवाच्या देहात अमर जीव आहे, तो जाणता जीव शरीराचा नाश झाल्यावरही जिवंत राहतो असा, संपूर्ण जगभरात आणि अनेक धर्म व संस्कृतींत लोकांचा विश्वास आहे. हा विश्वास बहुधा ख्रिस्ती धर्मजगताच्या हजारो धर्मांमध्ये आणि संप्रदायांमध्ये रुढ आहे. यहुदी धर्माचा देखील तो अधिकृत सिद्धान्त आहे. हिंदूंचा विश्वास आहे, की आत्मन् किंवा जीवाला काळाच्या सुरवातीला निर्माण करण्यात आले होते, जन्माच्या वेळी तो शरीरात बंदिस्त असतो व पुनर्जन्माच्या कायमस्वरूपी चक्रात तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. मुस्लिम लोक विश्वास करतात, की जन्माच्या वेळी जीव अस्तित्वात येतो व शरीराचा मृत्यू झाल्यानंतरही जिवंत राहतो. इतर विश्वास—आफ्रिकी चेतनवादी, शिंटो आणि एकप्रकारे बौद्ध लोक सुद्धा—त्याच विषयावर भिन्न शिकवणुकी देतात.
अस्वस्थ करणारे काही प्रश्न
जीवाच्या अमरत्वाची कल्पना निर्विवाद व सर्वत्र मानली जात असली तरीसुद्धा, तिच्यामुळे अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न उद्भवतात. उदाहरणार्थ, लोकांना त्यांच्या एखाद्या प्रिय व्यक्तीने उदाहरणीय जीवन व्यतीत केले नसल्यास त्याचा जीव कोठे जातो याचा प्रश्न पडतो. त्याचा पुनर्जन्म जीवनाच्या कोणत्याही खालच्या स्तरात होईल का? किंवा स्वर्गात जाण्याच्या योग्यतेचा होण्यासाठी अग्नी क्रियेतून त्याला शुद्ध केले जाते त्या पर्गेटरीत त्याला पाठवण्यात आले आहे? त्याहूनही बिकट म्हणजे, जळजळत्या नरकात चिरकालासाठी त्याचा छळ केला जाईल का? की, अनेक चेतनवादी शिकवतात त्याप्रमाणे तो एक भटकणारा आत्मा आहे ज्याला नेहमी खूष करावे लागेल?
अशा शिकवणी जिवंत असलेल्यांच्या आशा भारी बनवतात. मरण पावलेल्या आपल्या प्रियजनांचा आत्मा बदला घेईल या भीतीने आपण त्यांना खूष करावे का? भयंकर पर्गेटरीमधून बाहेर येण्यास आपण त्यांना मदत केली पाहिजे का? की, नरकामध्ये त्यांना होणाऱ्या यातनांचा केवळ विचार करून आपण थरथर कापले पाहिजे? किंवा आपण काही जिवंत प्राण्यांना असे वागवले पाहिजे का की जणू काय मरण पावलेल्या मानवांचे जीव त्यांच्यामध्ये आहेत?
स्वतः देवाबाबत उद्भवलेले प्रश्न देखील मनास क्षुब्ध करणारे आहेत. उदाहरणार्थ, सुरवातीला ज्या मातेचा उल्लेख करण्यात आला आहे तिच्या सारख्या अनेक पालकांना, देवाने त्यांच्या लेकराचा अमर जीव त्याच्या सोबत स्वर्गामध्ये राहण्यासाठी “नेला,” या कल्पनेमुळे पहिल्यांदा सांत्वन मिळते. परंतु, काही काळ लोटल्यावर काहींच्या मनात असा विचार येऊ लागतो की, हा कोणत्या प्रकारचा देव असावा बरे, जो एका निष्पाप लेकराला कोणत्यातरी भयानक आजाराने पीडित करतो व अकाली मृत्यूद्वारे अचानक त्याला आपल्या दुःखी पालकांपासून वेगळे करून स्वतःबरोबर राहण्यासाठी त्याला स्वर्गामध्ये नेतो. अशा प्रकारच्या देवामध्ये न्याय, प्रेम, दया कोठे आहे? काही जण तर अशा देवाच्या बुद्धीबद्दलही आक्षेप घेतात. ते असे विचारतात, की काहीही झाले तरी सर्वांना सरतेशेवटी स्वर्गात जगायचे आहे तर मग, एक बुद्धिमान देव या जीवांना सुरवातीलाच पृथ्वीवर का ठेवील? याचा अर्थ पृथ्वीची निर्मिती खरोखरच एक प्रचंड स्वरूपाचा व्यर्थ प्रयत्न नव्हे का?—पडताळा अनुवाद ३२:४; स्तोत्र १०३:८; यशया ४५:१८; १ योहान ४:८.
स्पष्टतः मग, मानवी जीवाच्या अमरत्वाचा सिद्धान्त कोणत्याही प्रकारे शिकवला जात असला तरी बुचकळ्यात पाडणारे प्रश्न, विसंगती देखील निर्माण करतो. का बरे? कारण या शिकवणुकीमुळे होणाऱ्या त्रासाचा संबंध तिच्या उगमाशी आहे. या शिकवणुकींची मुळे शोधून काढण्यास तुम्हाला प्रबोधनकारक वाटेल; आणि स्वतः बायबल जीव या विषयी काय म्हणते ते जाणल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सर्वसामान्यपणे जग जे शिकवते त्यापेक्षा बायबल, मृत्यूनंतरच्या जीवनाची एक उत्तम आशा प्रदान करते.
[तळटीपा]
a लोक, इंग्रजी शब्द सोल (soul) याचा सामान्यपणे संबंध मराठीतील आत्मा या शब्दाची लावत असले तरी या आणि पुढील लेखात सोल (soul) या इंग्रजी शब्दाचा अनुवाद जीव असाच करण्यात आला आहे.