राज्य घोषकांचा वृत्तान्त
क्यूबा येथे ‘मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार उघडले आहे’
प्रेषित पौल हा देवराज्याच्या सुवार्तेचा एक उल्लेखनीय प्रचारक होता. त्याने, आज्ञाधारक मानवजातीला निर्माणकर्त्याने दिलेल्या सार्वकालिक जीवनाच्या अभिवचनांविषयी इतरांसोबत बोलण्याच्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. आणखी कितीतरी लोकांना मदत करण्यासाठी अनुकूल ठरणार होती अशी नवीन परिस्थिती पौलाने प्राचीन इफिसला भेट देत असताना ओळखली. तो म्हणाला: “मी इफिस येथे राहीन; कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे.”—१ करिंथकर १६:८, ९.
क्यूबा येथील यहोवाच्या साक्षीदारांना देखील ते एका नवीन परिस्थितीत असल्याचे आढळत आहे. अद्याप अधिकृत नोंद झालेली नसली तरीसुद्धा, आता साक्षीदारांना त्यांच्या बायबल आधारित आशेबद्दल त्यांच्या देशवासीयांना सांगण्याची मोकळीक आहे. अलीकडील काळात क्यूबाच्या सरकारने विविध धार्मिक गटांना मोकळेपणाने कार्य करू देण्याबद्दल प्रांजळ अभिरूची व्यक्त केली आहे. राष्ट्रपती कॅस्ट्रो यांनी जाहीररित्या, यहोवाच्या साक्षीदारांचा उल्लेख, क्यूबन सरकारशी आता सुधारलेले नातेसंबंध असलेला एक धार्मिक गट या शब्दांत केला आहे.
या बदललेल्या परिस्थितीकरवी साक्षीदारांसाठी, “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार उघडले आहे.” उदाहरण द्यायचे झाल्यास, यहोवाच्या साक्षीदारांनी अलीकडेच क्यूबा येथे एक शाखा दफ्तर सुरू केले; हे शाखा दफ्तर त्यांना या देशातील प्रचार कार्याचा समन्वय साधण्यासाठी साहाय्य करते. साक्षीदारांपैकी ६५,००० पेक्षा अधिक जण, बायबलचा अभ्यास करण्यासाठी व त्यास समजून घेण्यासाठी लोकांना मदत करीत आहेत. ते टेहळणीबुरूज व सावध राहा! या नियतकालिकांसारख्या बायबल आधारित साहित्याचा उपयोग करतात. नीतिमत्तेकडे कल असणाऱ्या अनेक क्यूबन लोकांना यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केल्यामुळे लाभ प्राप्त होत आहे.
साक्षीदार या सबंध बेटावर लहानलहान गटांमध्ये नियमित सभा देखील चालवतात. कधीकधी तर त्यांना जवळजवळ १५० लोकांच्या गटांत मोठी संमेलने आयोजित करण्याची सुसंधी देखील लाभते. ते क्यूबाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या परवानगीचे मोल जाणतात; त्याकरवी त्यांना आपल्या आध्यात्मिक बंधुभगिनींसोबत एकत्र होण्याची, देवाचे गुणगान करण्याची व एकमेकांसोबत प्रार्थना करण्याची संधी प्राप्त होते.
अलीकडेच, “ईश्वरी भय” प्रांतीय अधिवेशन हे केवळ तीन सप्ताहांतांच्या काळादरम्यान १,००० पेक्षा अधिक ठिकाणी संपन्न झाले. एका वृत्तानुसार, प्रत्येक अधिवेशनात “सुव्यवस्था, शिस्त व शांतता” प्रदर्शित झाली. याबद्दल अधिकाऱ्यांनी साक्षीदारांचे अभिनंदन केले.
सबंध जगात, प्रांजळ ख्रिस्ती लोक देवराज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची देवाने दिलेली आज्ञा पूर्ण करण्यासाठी झटतात. त्याच वेळेस ते सरकारी अधिकाऱ्यांसोबत शांततापूर्ण संबंध राखण्याच्या दृष्टीने देखील झटतात. (तीत ३:१) यहोवाचे साक्षीदार पौलाच्या सल्ल्याचे पालन करतात, ज्याने असे लिहिले: “तर सर्वांत प्रथम हा बोध मी करितो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तूती करावी; राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.”—१ तीमथ्य २:१, २.