अंत्युखियाचा थीऑफिलस कोण होता?
“तूमला ख्रिस्ती म्हणतोस, जणू हे नाम धारण करण्यास निंदात्मक आहे, परंतु मी माझ्या वतीने हे उघडपणे कबूल करतो, की मी ख्रिस्ती आहे व देवास प्रिय होण्यास व त्याची सेवा करण्यास उपयुक्त होण्याच्या आशेने मी हे नाम धारण करतो.”
अशाप्रकारे थीऑफिलस, थीऑफिलसकडून ऑटॉलिकसला असे शीर्षक असलेल्या तीन भागाच्या त्याच्या साहित्याची प्रस्तावना करतो. दुसऱ्या शतकातील धर्मत्यागाविरुद्ध प्रतिकार करण्याची ही त्याची सुरवात आहे. ख्रिस्ताचा अनुयायी म्हणून थीऑफिलस धैर्याने स्वतःची ओळख सिद्ध करतो. ग्रीक भाषेतील त्याच्या नावाच्या अर्थाच्या सुसंगतेत “देवाचा परमप्रिय” असेल अशा प्रकारे आपले व्यवहार करण्यास तो निश्चयी असल्याचे दिसते. मात्र हा थीऑफिलस होता तरी कोण? तो कोणत्या काळात जगत होता? तसेच त्याने काय साध्य केले?
व्यक्तिगत इतिहास
थीऑफिलसच्या व्यक्तिगत इतिहासाबद्दल थोडीबहुतच माहिती आहे. गैर-ख्रिस्ती पालकांद्वारे त्याचे संगोपन करण्यात आले होते. थीऑफिलसने पुढे शास्त्रवचनांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतरच ख्रिस्ती धर्म स्वीकारला. सीरिया अंत्युखिया, ज्याला आज तुर्कस्तानातील अन्ताकिया म्हणतात येथील एका मंडळीचा तो बिशप बनला.
येशूच्या आज्ञेच्या अनुषंगाने पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी अंत्युखियाच्या लोकांत प्रचार केला. लूकने त्यांच्या यशाची नोंद करून म्हटले: “तेव्हा प्रभूचा [यहोवा, NW] हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले.” (प्रेषितांची कृत्ये ११:२०, २१) ईश्वरी निर्देशनानुसार, येशू ख्रिस्ताचे अनुयायी ख्रिस्ती म्हणून ओळखले गेले. ही संज्ञा प्रथम सुरिया अंत्युखियात लागू करण्यात आली होती. (प्रेषितांची कृत्ये ११:२६) सा. यु. पहिल्या शतकात, प्रेषित पौलाने सुरिया अंत्युखियास मार्गक्रमण केले व ते त्याचे आरंभस्थान बनले. बर्णबा आणि पौल व त्यांच्याबरोबर योहान, यांनी अंत्युखियाहून त्यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यास प्रारंभ केला.
अंत्युखियातील आरंभीचे ख्रिस्ती, त्यांच्या नगरातील प्रेषितांच्या भेटींमुळे अतिशय उत्तेजित झाले असतील. देव वचनाच्या सत्याप्रती त्यांचा उत्साही प्रतिसाद निःसंशये, काही प्रमाणात पहिल्या शतकातील नियमन मंडळाच्या प्रतिनिधींच्या विश्वास बळकट करणाऱ्या भेटींमुळे होता. (प्रेषितांची कृत्ये ११:२२, २३) अंत्युखियातील कित्येक रहिवासी यहोवा देवाला आपले जीवन समर्पण करत आहेत हे पाहणे त्यांच्यासाठी किती उत्तेजनात्मक असावे! तथापि, याच्या १०० पेक्षा अधिक वर्षांनंतरच्या काळात थीऑफिलस अंत्युखियात राहात होता.
ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या काळापासून गणना केल्यास, थीऑफिलस हा सहावा बिशप होता असे इतिहासकार युसीबीअसने सांगितले. थीऑफिलसने पाखंडी मतांविरुद्ध पुष्कळ मौखिक चर्चा व खंडन यांची नोंद केली आहे. त्याच्या काळातील डजनावारी आत्मसमर्थकांपैकी तो एक आहे.
त्याच्या लिखाणांवर एक नजर
आधीच्या संवादाच्या प्रत्युत्तरात, या सुरवातीच्या शब्दांनी थीऑफिलस मूर्तिपूजक ऑटॉलिकसला लिहितो: “एक अस्खलित भाषा आणि आलंकारिक शैली, भ्रष्ट मनांच्या अतिदीन मनुष्यांना त्यांच्या अहंकाराला हवाहवासा वाटणारा आनंद आणि स्तुती देतात.” थीऑफिलस स्पष्टीकरण देऊन म्हणतो: “सत्यावर प्रेम करणारा आलंकारिक भाषणांकडे लक्ष देत नाही तर त्या भाषणाच्या खऱ्या अर्थाचे परीक्षण करतो . . . तू पोकळ शब्दांनी माझ्यावर भडिमार करून, लाकूड आणि पाषाणाच्या, घडवलेल्या व आकार देण्यात आलेल्या, कोरलेल्या व खोदलेल्या, ज्या केवळ मूर्ती आणि मनुष्यांच्या हातच्या कृती असल्यामुळे त्यांना दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, अशा तुझ्या दैवतांची तू फुशारकी मारतोस.”—पडताळा स्तोत्र ११५:४-८.
थीऑफिलस मूर्तीपूजेच्या चुकीच्या युक्तिवादाचा गौप्यस्फोट करतो. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीत तो वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात, परंतु परिणामकारकरित्या सत्य देवाचा मूळ स्वभाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. तो अशाप्रकारे विवरण करतो: “देवाचे स्वरूप शब्दातीत व अवर्णनीय असून दैहिक नेत्रांनी त्याला पाहता येत नाही. कारण त्याचे वैभव अनाकलनीय, त्याची महानता अगाध, त्याची उंची अकल्पनीय, त्याचे सामर्थ्य अतुलनीय, त्याची सुज्ञता अद्वितीय, त्याचे चांगुलपण अननुकरणीय, त्याचा कृपाळुपणा अनुच्चारणीय आहे.”
देवाच्या या वर्णनात आणखी भर घालून, थीऑफिलस पुढे म्हणतो: “परंतु, तो प्रभू आहे कारण तो विश्वावर राज्य करतो; पिता आहे कारण सर्व गोष्टींच्या आधी तो अस्तित्वात आहे; घडवणारा व सृष्टिकर्ता, कारण तो विश्वाचा निर्माणकर्ता व बनविणारा आहे; सर्वोच्च असल्यामुळे तो सर्वांपेक्षा उच्च आहे; आणि सर्वसमर्थ कारण तो स्वतः राज्य करतो व सगळ्यांना सामावून घेतो.”
नंतर देवाच्या खास पूर्ततांवर लक्ष केंद्रित करून, थीऑफिलस त्याच्या तपशीलवार व काहीशा पुनरावृत्तियुक्त लिखाण शैलीत पुढे असे म्हणतो: “कारण स्वर्ग तर त्याचे कार्य आहेत, पृथ्वी त्याची निर्मिती, समुद्र त्याच्या हातचे कृत्य; मानवाला त्याने घडवले आहे व मानव त्याचे प्रतिरूप आहे, सूर्य, चंद्र आणि तारे त्याची उत्पत्ती असून चिन्हे, ऋतु, दिवस आणि वर्ष यांसाठी बनवले आहेत अशासाठी, की त्यांनी मानवाची सेवा करावी व मानवाचे दास व्हावे; आणि अस्तित्वविरहीत असणाऱ्या गोष्टींपासून देवाने सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या यासाठी, की त्याच्या कार्यांद्वारे त्याची थोरवी ज्ञात होईल व तो ओळखला जाईल.”
त्याच्या दिवसातील खोट्या दैवतांविरुद्ध त्याने केलेल्या हल्ल्याचा आणखी एक नमुना, त्याने ऑटॉलिकसला लिहिलेल्या पुढील शब्दांतून लक्षात येतो: “ज्यांची तुम्ही भक्ती करता, त्यांची नावे वस्तुतः मृत लोकांची नावे आहेत. . . . आणि ते लोक कोणत्या प्रकारचे होते बरे? शनी हा स्वजातियभक्षक असून स्वतःच्याच मुलाबाळांचा नाश करणारा व त्यांना गिळंकृत करणारा नव्हता का? आणि त्याचा पुत्र बृहस्पति याचा उल्लेख केला तर, . . . कशाप्रकारे त्यास एका बकरीने दूध पाजले होते . . . आणि त्याची इतर कृत्ये, म्हणजे त्याचे गोत्रगमन, व्यभिचार आणि तीव्र वासना, या गोष्टी लक्षात येतात.”
त्याचा वादविषय आणखी पुढे वाढवून, थीऑफिलस मूर्तिपूजेविरुद्धची आपली भूमिका आणखी बळकट करतो. तो अशाप्रकारे टिपण करतो: “इजिप्शियन लोक ज्यांची उपासना करतात अशा बहुविध प्राण्यांची, सरपटणारे आणि गुरेवासरे, वनपशू आणि पक्षी आणि जलातील मत्से यांची हकीकत मी सांगू काय? . . . ग्रीकचे लोक आणि इतर राष्ट्रे, पाषाण व लाकूड आणि इतर प्रकारच्या भौतिक वस्तूंची भक्ती करतात. पण मी तर जिवंत व सत्य देवाची उपासना करतो,” असे थीऑफिलस जाहीर करतो.—पडताळा २ शमुवेल २२:४७; प्रेषितांची कृत्ये १४:१५; रोमकर १:२२, २३.
अनमोल साक्षीपुरावा
ऑटॉलिकसचे खंडन करणाऱ्या थीऑफिलसच्या तीन भाग असलेल्या साहित्यातील सूचना व प्रबोधनांचे अनेक पैलू असून ते तपशीलवार आहेत. थीऑफिलसचे इतर लेख हेरमॉजेनेझ आणि मॉरसन यांच्या विरुद्ध आहेत. त्याने सूचनात्मक व बोधपर पुस्तके देखील लिहून शुभवर्तमानांवर भाष्य केले. तथापि, ऑटॉलिकसला लिहिलेली तीन पुस्तके केवळ एका हस्तलिखित प्रतीमध्ये जतन करून ठेवलेली आहेत.
पहिले पुस्तक, ख्रिस्ती धर्माच्या बचावार्थ ऑटॉलिकसला लिहिलेले एक समर्थन आहे. ऑटॉलिकसला लिहिलेले दुसरे पुस्तक, प्रचलित गैर-ख्रिस्ती धर्म, तर्कावर अधिष्ठित सिद्धांत, तत्त्वज्ञ आणि कवी यांच्या विरोधात वादविवाद करते. थीऑफिलसच्या तिसऱ्या पुस्तकात, मूर्तिपूजक साहित्याची तुलना शास्त्रवचनांशी केली आहे.
अद्यापही, सत्याचे वचन केवळ एक काल्पनिक कथा आहे असा ऑटॉलिकसचा दृष्टिकोन असावा, हे थीऑफिलसच्या तिसऱ्या पुस्तकाच्या प्रारंभातून दिसून येते. थीऑफिलस ऑटॉलिकसला दोष देऊन असे ठासून म्हणतो: “तू बुद्धिहीन लोकांना खुशीने सहन करतोस. नाहीतर निरर्थक शब्दांनी प्रभावित होण्यास आणि सार्वत्रिक असलेल्या अफवेवर विश्वास ठेवण्यास, तू मूर्ख लोकांमुळे प्रभावित झाला नसतास.”
ती “सार्वत्रिक अफवा” काय होती? थीऑफिलस तिच्या उगमास उघड करतो. “[आम्ही] जे देवाचे उपासक व ख्रिस्ती म्हटलेले त्या आम्हास” निंदात्मक लोक “अधर्मी जिव्हेने आम्हावर खोटा आरोप लावतात, व आम्हा सगळ्यांच्या पत्नी सामाईक असून यथेच्छपणे त्यांच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले जातात, असे ते निश्चयाने सांगतात आणि आम्ही आमच्या स्वतःच्या बहिणींसोबत गोत्रगमन करतो, आणि सर्वात अपवित्र व असंस्कृत गोष्ट ही, की आम्ही मानवाचे मांस सेवन करतो.” दुसऱ्या शतकातील नाममात्र ख्रिश्चनांबद्दल, मूर्तिपूजक लोकांच्या ह्या अतिशय चुकीच्या दृष्टिकोनाविरुद्ध लढत देण्यासाठी थीऑफिलसने प्रयत्न केले. देवाच्या ईश्वरप्रेरित वचनातील सत्याच्या प्रकाशाचा त्याने उपयोग केला.—मत्तय ५:११, १२.
थीऑफिलसने बायबलच्या इब्री व ग्रीक वचनांचा जो उपयोग केला व त्यांचा संदर्भ घेतला, तो देवाच्या वचनाशी किती परिचित होता याची साक्ष देतात. शुभवर्तमानांवर भाष्य करणाऱ्या प्राचीन लोकांपैकी तो एक होता. थीऑफिलसने घेतलेल्या अनेक वचनांचा संदर्भ, त्याच्या काळात हयात असणाऱ्या विचारसरणीविषयी विपुल सूक्ष्मदृष्टी पुरवते. त्याने शास्त्रवचनांशी असणाऱ्या त्याच्या परिचयाचा उपयोग मूर्तिपूजक तत्त्वांवरील त्यांचे अफाट श्रेष्ठत्व प्रकट करण्यासाठी केला.
थीऑफिलसच्या साहित्याची योजना, त्याचा उपदेशपर स्वर आणि पुनरावृत्तीयुक्त शैली काहींना अपीलकारक वाटणार नाही. भाकीत केलेल्या धर्मत्यागाने त्याच्या दृष्टिकोनाच्या यथार्थपणावर कोठवर परिणाम केला असावा हे आता आपण सांगू शकत नाही. (२ थेस्सलनीकाकर २:३-१२) तरीसुद्धा, सा. यु. १८२ च्या जवळपास त्याच्या मृत्यूच्या काळापर्यंत, थीऑफिलस जणू एक अथक आत्मसमर्थक बनला होता, ज्याचे लिखाण आधुनिक काळातील प्रामाणिक ख्रिश्चनांसाठी फायदेकारक आहेत.
[३० पानांवरील चित्रं]
थीऑफिलसने धैर्याने ऑटॉलिकसच्या युक्तिवादांचे खंडन केले
[Pictures Credit on line page 28, 30]
Illustrations on page 28 and 30 reproduced from Illustrite Pracht-Bible/Heilige Schrift des Alten und Neuen Testaments, nach der deutschen Uebersetzung D. Martin Luther’s