वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१५ पृ. २६-३०
  • विल्यम टिंड्‌ल दूरदर्शी मनुष्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विल्यम टिंड्‌ल दूरदर्शी मनुष्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वासाचे पाऊल
  • नकार—का?
  • युरोपकडे व आणखी समस्या
  • विरोध असतानाही—यश
  • अँटवर्प, विश्‍वासघात व मृत्यू
  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग दोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • देवाचं वचन तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • शुद्ध उपासना—हळूहळू पुन्हा सुरू होते
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१५ पृ. २६-३०

विल्यम टिंड्‌ल दूरदर्शी मनुष्य

विल्यम टिंड्‌लचा जन्म इंग्लंडमध्ये “वेल्सच्या सीमेवर” बहुतेक ग्लाऊचेस्टरशायरमध्ये झाला, तरीपण अचूक ठिकाण व तारीख निश्‍चितपणे सांगता येणार नाही. ऑक्टोबर १९९४ मध्ये, ज्या मनुष्याने “आपल्याला आपले इंग्रजी बायबल” दिले, त्याची पाचशेवी जयंती इंग्लंडने साजरी केली. या कामासाठी टिंड्‌लला हुतात्मिक मरण आले. का बरे?

विल्यम टिंड्‌लने ग्रीक व लॅटिन भाषांचा सखोल अभ्यास केला होता. त्याला २१ वर्षांचा असतानाच जुलै १५१५ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्‌स ही पदवी मिळाली. सन १५२१ पर्यंत तो विधीपूर्वक नेमलेला रोमन कॅथलिक याजक बनला. त्या वेळी मार्टिन ल्यूथरच्या कार्यहालचालीमुळे जर्मनीमधील कॅथलिक धर्मात गोंधळ माजलेला होता. परंतु, १५३४ मध्ये राजा आठवा हेन्री याने रोमशी सर्व संबंध मिटवून टाकेपर्यंत इंग्लंड कॅथलिक देश होता.

टिंड्‌लच्या दिवसात इंग्रजी ही सर्वसामान्य भाषा असली, तरी सर्व शिक्षण लॅटिनमधून दिले जात होते. ती चर्चची त्याचप्रमाणे बायबलची देखील भाषा होती. सन १५४६ मध्ये, कौन्सिल ऑफ ट्रेंटने पुन्हा एकदा सांगितले, की केवळ जेरोमच्या पाचव्या शतकातील लॅटिन वलगेट याचाच उपयोग करण्यात यावा. तथापि, केवळ सुशिक्षित लोक ते वाचू शकत होते. इंग्लंडच्या लोकांना इंग्रजी भाषेतील बायबल व ते वाचण्याचे स्वातंत्र्य का मिळू नये? “जेरो[मी]ने देखील आपल्या मातृभाषेत बायबलचा अनुवाद केला, मग आपण का करू नये?” हा टिंड्‌लचा वाद होता.

विश्‍वासाचे पाऊल

ऑक्सफर्ड व शक्यतः कँम्ब्रीज येथे अधिक अभ्यास केल्यानंतरच्या काळात, टिंड्‌लने ग्लाऊचेस्टरशायरमध्ये जॉन वॉल्शच्या लहान मुलांना दोन वर्षांकरता शिकवणी दिली. या काळात बायबलचा अनुवाद इंग्रजीमध्ये करण्याची इच्छा त्याने बाळगली, व समांतर स्तंभांमध्ये ग्रीक व लॅटिन भाषा असलेल्या इरॅमसच्या नवीन बायबलच्या लिखाणाच्या साहाय्याने त्याच्या भाषांतराचे कौशल्य विकसित करण्याची संधी त्याला निःसंशये होती. सन १५२३ मध्ये, टिंड्‌लने वॉल्श कुटुंबासोबत राहणे सोडले व तो लंडनला गेला. लंडनचा बिशप, कुथबर्ट टंस्टलकडून त्याच्या भाषांतरासाठी परवानगी मिळवणे हा त्याचा उद्देश होता.

टंस्टलची परवानगी मिळवणे जरूरीचे होते कारण ऑक्सफर्ड येथे १४०८ मध्ये भरवलेल्या धर्माधिकाऱ्‍यांच्या सभेच्या सवलती ज्यांना ऑक्सफर्डचे संविधान असे ओळखले जात होते त्यामध्ये बिशपच्या परवानगीशिवाय प्रादेशिक भाषेत बायबलचे भाषांतर करणे किंवा वाचणे यावर बंदी होती. ह्‍या बंदीचे उल्लंघन करण्याचे धाडस केलेल्या लॉलर्डस म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या अनेक प्रवासी प्रचारकांना पाखंडी ठरवून जाळण्यात आले. हे लॉलर्ड, वलगेट मधून इंग्रजी भाषांतर केलेल्या जॉन वायक्लिफच्या बायबलमधून वाचत होते व त्याचे वितरण करत होते. ग्रीकमधून ख्रिस्ती लिखाणांचे एका नवीन, विश्‍वसनीय आवृत्तीमध्ये आपल्या चर्चसाठी व इंग्लंडमधील लोकांसाठी भाषांतर करण्याची वेळ आली असे टिंड्‌लला वाटले.

बिशप टंस्टल याने पुष्कळ विद्वता संपादन केली होती ज्याने इरॅमसलाही उत्तेजन देण्याकरता पुष्कळ काही केले होते. स्वतःच्या कौशल्याचा पुरावा म्हणून, टिंड्‌लने टंस्टलच्या मान्यतेसाठी ग्रीकचे फार कठीण लिखाण असलेले आयसोक्रेट्‌सचे एक औपचारिक भाषण भाषांतरित केले होते. टंस्टल मैत्रीचा हात पुढे करील व आश्रय देईल आणि शास्त्रवचनांचा अनुवाद करण्याची त्याची मागणी स्वीकारील याविषयी टिंड्‌ल अति आशावादी होता. बिशप काय करणार होता?

नकार—का?

टिंड्‌लचे ओळखपत्र होते, तरी टंस्टल त्याला भेटत नव्हता. तर मग, भेट घेण्यासाठी टिंड्‌लला लिहावे लागले. कालांतराने टंस्टलने टिंड्‌लची भेट घेण्याचा अनुग्रह केला की नाही हे इतके स्पष्ट नाही परंतु ‘माझ्या घरात जागा नाही,’ असे त्याचे उत्तर होते. टंस्टल टिंड्‌लशी मुद्दामहून अनादराने का वागला?

युरोपच्या खंडात ल्यूथरच्या धर्मसुधारणेच्या कार्यामुळे कॅथलिक चर्चला खूप चिंता वाटत होती, व इंग्लंडमध्ये त्याचे विपरित परिणाम होत होते. सन १५२१ मध्ये, राजा आठवा हेन्री याने पोपची बाजू घेऊन ल्यूथरच्या विरोधात एक जोरदार प्रबंध प्रकाशित केला. कृतज्ञतेमुळे पोपने हेन्रीला “विश्‍वासाचा संरक्षणकर्ता” ही पदवी बहाल केली.a हेन्रीचा प्रमुख अधिकारी, वॉल्से देखील ल्यूथरच्या अवैधपणे आयात केलेल्या पुस्तकांचा नाश करण्यात सक्रिय होता. टंस्टलला वाटत होते, की पोप, राजा व त्याचा प्रमुख अधिकारी यांना विश्‍वासू असणारा कॅथलिक बिशप या नात्याने, बंडखोर ल्यूथरप्रती समभावना दाखवणाऱ्‍या कोणत्याही विचाराला दाबून टाकणे हे आपले कर्तव्य आहे. टिंड्‌ल हा मुख्य संशयित व्यक्‍ती ठरला. का बरे?

वॉल्श कुटुंबासोबत निवास केलेल्या काळात, स्थानिक पाळकांची अज्ञानता व फाजील धर्माभिमान याविरुद्ध टिंड्‌ल निडरतेने बोलला होता. त्यांच्यापैकी जॉन स्टोक्सली होता ज्याला टिंड्‌लचा परिचय ऑक्सफर्डमध्ये झाला होता. कालांतराने लंडनचा बिशप म्हणून स्टॉक्सलीने कुथबर्ट टंस्टलची जागा घेतली.

एका उच्च पदावरील पाळकासोबत झालेल्या रुजवातीत देखील टिंड्‌लचा विरोध स्पष्ट दिसून येतो, तो पाळक म्हणाला: “पोपचा नियम नसण्यापेक्षा देवाचा नियम नसणे हे आमच्याकरता चांगले असेल.” संस्मरणीय शब्दात, टिंड्‌लचे उत्तर असे होते: ‘मी पोप व त्याच्या सर्व नियमांना अवमानतो. देवाने मला जिवंत ठेवले, तर लवकरच, नांगरधारी मुलाला तुमच्यापेक्षा अधिक शास्त्रवचनांचे ज्ञान होईल असे मी करीन.’

खोट्या पाखंडी आरोपांवर वोरचेस्टरमधील बिशपच्या अधिकारातील प्रदेशाच्या व्यवस्थापकासमोर टिंड्‌लला उभे राहावे लागले. “त्याने मला तीव्रपणे धमकी दिली व माझी निंदा केली,” असे टिंड्‌ल नंतर आठवून सांगतो, व पुढे म्हणतो की, त्याला “कुत्र्याप्रमाणे” वागवण्यात आले होते. परंतु, टिंड्‌लला पाखंडासाठी दोषी ठरवण्यास कोणताच पुरावा नव्हता. या सर्व गोष्टी, टंस्टलला त्याचा निर्णय देण्यास प्रभाव पडावा म्हणून गुप्तपणे कळवण्यात येत होत्या.

लंडनमध्ये एक वर्ष काढल्यावर, टिंड्‌लने असा समारोप केला: ‘नवीन कराराचा अनुवाद करण्यासाठी, लंडनच्या महाराजाच्या महालात जागा नव्हती, तसेच सबंध इंग्लंडमध्ये देखील त्यासाठी जागा नव्हती.’ त्याचे म्हणणे खरे होते. ल्यूथरच्या कार्यामुळे निर्माण झालेल्या दडपशाहीच्या वातावरणात, इंग्रजी भाषेत बायबल उत्पादित करण्यास इंग्लंडमधील कोणत्या मुद्रकाचे धाडस होईल? म्हणून, १५२४ मध्ये, टिंड्‌लने पुन्हा न परतण्याच्या हेतूने इंग्लिश खाडी पार केली.

युरोपकडे व आणखी समस्या

आपल्या मौल्यवान पुस्तकांसह टिंड्‌लला जर्मनीत आश्रय मिळाला. लंडनचा एक प्रभावी व्यापारी असलेला त्याचा मित्र हम्फ्रे मॉनमाऊथ याने दयाळुपणे दिलेले १० पाऊंड त्याने सोबत आणले. त्या काळी, टिंड्‌लने भाषांतर करण्याची योजना केलेल्या ग्रीक शास्त्रवचनांचे मुद्रण करण्यास हे दान पुरेसे होते. टिंड्‌लला साहाय्य देण्याच्या व ल्यूथरला समभावना दाखवण्याच्या निमित्ताने मॉनमाऊथला कालांतराने अटक करण्यात आली. चौकशी करून लंडनचा बुरूज येथे डांबण्यात आल्यावर, प्रमुख अधिकारी वॉल्से याच्याकडे लेखी क्षमेची याचना केल्यावरच मॉनमाऊथची सुटका करण्यात आली.

टिंड्‌ल, जर्मनीत नेमका कोठे गेला हे स्पष्ट नाही. तो हॅम्बर्ग येथे गेल्याचे काही पुराव्यावरून दिसून येते, जेथे त्याने एक वर्ष घालवले असावे. तो ल्यूथरला भेटला का? मॉनमाऊथविरुद्ध केलेल्या आरोपात तो भेटला असे सांगितले असले, तरी हे अनिश्‍चित आहे. एक गोष्ट निश्‍चित आहे: ग्रीक शास्त्रवचनांचा अनुवाद करण्यात टिंड्‌ल फार व्यग्र होता. आपल्या हस्तलिखितांचे मुद्रण तो कोठून करणार होता? कोलोन येथे पीटर क्वेंटेलकडे त्याने हे कार्य सोपवले.

विरोधक जॉन डोबनेक, जो कॉक्लीएस या नावाने ओळखला जात होता त्याला काय होत आहे हे कळेपर्यंत सर्वकाही सुरळीत चालले होते. कॉक्लीएसने तत्काळ त्याच्या ठावठिकाणाबद्दल आठवा हेन्री याच्या जवळच्या मित्राला सांगितले व त्याने लगेचच क्वेंटेलद्वारे मुद्रण केल्या जाणाऱ्‍या टिंड्‌लच्या भाषांतरावर बंदी आणली.

टिंड्‌ल व त्याचा साहाय्यक या दोघांनी आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला व सोबत मुद्रण झालेल्या मत्तयाच्या शुभवर्तमानाची पाने नेली. ऱ्‍हाईन नदीपासून वर वर्म्सकडे जाऊन त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण केले. कालांतराने, टिंड्‌लचा नवीन करार याच्या पहिल्या आवृत्तीच्या ६,००० प्रती उत्पादित करण्यात आल्या.b

विरोध असतानाही—यश

अनुवाद आणि मुद्रण एक समस्या होती. ब्रिटनला बायबल नेणे ही आणखी दुसरी समस्या होती. चर्च एजंट व ऐहिक अधिकारी इंग्लिश खाडीच्या पलीकडे माल न जाऊ देण्यास निश्‍चयी होते, परंतु मैत्रीपूर्ण व्यापाऱ्‍यांकडे उपाय होता. हे खंड, कापडाच्या व इतर मालाच्या गठ्ठ्यात लपवून इंग्लंडच्या किनाऱ्‍यापर्यंत व तेथून स्कॉटलंडमध्ये चोरून नेण्यात आले. टिंड्‌लला उत्तेजन देण्यात आले परंतु त्याच्या लढ्याची केवळ सुरवात झाली होती.

फेब्रुवारी ११, १५२६ रोजी, प्रमुख अधिकारी वॉल्से व त्याच्यासोबत ३६ बिशप व चर्चचे इतर उच्चपदस्थ लंडनमधील सेंट पॉलच्या कॅथड्रलमध्ये “पुस्तकांच्या मोठ्या पिशव्या आगीत टाकल्या जात असल्याचे” पाहण्यासाठी जमा झाले. त्यामध्ये टिंड्‌लच्या मौल्यवान अनुवादाच्या काही प्रती होत्या. या पहिल्या आवृत्तीच्या आता केवळ दोनच प्रती अस्तित्वात आहेत. एकमेव पूर्ण प्रत (केवळ शीर्षक पान नसलेली) ब्रिटिश लायब्ररीमध्ये आहे. उपरोधिक गोष्ट अशी की, ७१ पृष्ठे गायब असलेली दुसरी प्रत सेंट पॉलच्या कॅथड्रल ग्रंथालयातच सापडली. ती तेथे कशी पोहंचली, हे कोणालाही ठाऊक नाही.

निर्भयपणे, टिंड्‌ल आपल्या भाषांतराच्या नवीन आवृत्त्या उत्पादित करू लागला, ज्या इंग्रजी पाळकांनी पद्धतशीररित्या जप्त करून जाळून टाकल्या. नंतर टंस्टलने डावपेच बदलला. टिंड्‌लने लिहिलेली सर्व पुस्तके तसेच नवा करार देखील जाळून टाकावा म्हणून ऑगस्टीन पॅकींग्टन नावाच्या व्यापाऱ्‍याद्वारे ते सर्व विकत घेण्याचा करार त्याने त्याच्याशी केला. हे सर्व टिंड्‌लसोबत आयोजित करण्यात आले ज्याच्याशी पॅकींग्टनने करार केला होता. इतिहास (इंग्रजी) हे हालीचे पुस्तक असे म्हणते: “बिशपला पुस्तके, पॅकींग्टनला आभार व टिंड्‌लला पैसा मिळत होता. नंतर आणखी नवीन करारांचे मुद्रण झाले तेव्हा, इंग्लंडमध्ये असंख्य बायबल आले.”

पाळकवर्ग टिंड्‌लच्या अनुवादाच्या इतक्या कटूतेने विरोधात का होता? लॅटिन वलगेट जणू पवित्र लिखाणाला आच्छादित होते, पण टिंड्‌लच्या मूळ ग्रीकमधून केलेल्या अनुवादामुळे इंग्रजी लोकांना बायबलचा संदेश पहिल्यांदा स्पष्ट भाषेत देण्यात आला. उदाहरणार्थ, १ करिंथकर अध्याय १३ मध्ये, टिंड्‌लने अ·गाʹपे या ग्रीक शब्दाचे भाषांतर “औदार्य” असे करण्याऐवजी “प्रीती” असे करण्याचे निवडले. चर्चच्या इमारतींवर नव्हे, तर उपासकांवर जोर देण्यासाठी “चर्च” हा शब्द वापरण्याऐवजी “मंडळी” हा शब्द वापरण्याचा आग्रह त्याने धरला. तथापि, टिंड्‌लने “याजक” या शब्दाच्या जागी “वडील” हा शब्द व “प्रायश्‍चित करणे” याऐवजी “पश्‍चात्ताप” हा शब्द वापरल्याने पाळकांचे गृहीत धरलेले याजकीय अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात आले तेव्हा पाळकांना असह्‍य होणारे ते शेवटले कारण ठरले. डेवीड डॅनीएल याविषयी असे म्हणतात: “परगेटरी असे ठिकाण नाही; कानात कबूली देणे किंवा प्रायश्‍चित असे काही नाही. अशाप्रकारे चर्चच्या संपत्तीचे व सामर्थ्याचे दोन आधारस्तंभ कोसळले.” (विल्यम टिंड्‌ल—चरित्र) (इंग्रजी) टिंड्‌लच्या अनुवादाने ते आव्हान सादर केले व आधुनिक विद्वत्ता त्याच्या शब्दांच्या निवडीच्या अचूकतेला पूर्णपणे मान्यता देते.

अँटवर्प, विश्‍वासघात व मृत्यू

सन १५२६ व १५२८ च्या दरम्यान टिंड्‌लने अँटवर्पला स्थलांतर केले, जेथे त्याला इंग्रजी व्यापाऱ्‍यांमध्ये सुरक्षित असल्याचे वाटत होते. तेथे त्याने धनाच्या दुष्ट देवतेचा दाखला, ख्रिस्ती मनुष्याची आज्ञाधारकता व धर्माधिकाऱ्‍यांचा प्रघात (इंग्रजी) ही पुस्तके लिहिली. टिंड्‌लने आपले अनुवादाचे कार्य सुरू ठेवले व इब्री शास्त्रवचनांच्या इंग्रजी अनुवादात देवाचे नाव, यहोवा वापरणारा तो पहिला मनुष्य होता. हे नाव २० पेक्षा अधिक वेळा आढळते.

अँटवर्पमध्ये टिंड्‌ल जोपर्यंत त्याचा मित्र व दाता थॉमस पॉईंट्‌ससोबत राहिला तोपर्यंत वॉल्से व त्याच्या गुप्तहेरांच्या कारस्थानांपासून तो सुरक्षित होता. आजारी व गरीब लोकांची काळजी घेण्यामध्ये तो प्रसिद्ध बनला. कालांतराने, हेन्री फिलिप्स्‌ या इंग्रजी व्यक्‍तीने चतुराईने टिंड्‌लचा आत्मविश्‍वास जिंकला. परिणामतः, टिंड्‌लचा विश्‍वासघात करून त्याला ब्रस्सल्सच्या उत्तरेकडे दहा किलोमीटर अंतरावर वील्वोर्ड कॅसल येथे नेण्यात आले. तेथे १६ महिन्यांसाठी त्याला तुरुंगात ठेवले गेले.

फिलिप्स्‌ला कोणी सुपारी दिली असावी हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही, परंतु त्यावेळी लंडनमध्ये “पाखंड्यांना” जाळण्यात व्यग्र असणाऱ्‍या बिशप स्टॉक्सलीकडे संशयाचे बोट थेट निर्देश करते. सन १५३९ मध्ये आपल्या मृत्युशय्येवर असताना, स्टॉक्सलीने “त्याच्या जीवनकाळात पन्‍नास पाखंड्यांना जाळले होते याचा आनंद त्याला होता,” असे डब्ल्यू. जे. हीटन धर्मसुधारणेतील बायबल (इंग्रजी) यात म्हणतात. त्या संख्येत विल्यम टिंड्‌लचाही समावेश होता, ज्याला गळा दाबून ठार मारण्यात आल्यावर त्याचे शव ऑक्टोबर १५३६ मध्ये जाहीरपणे जाळण्यात आले.

फिलिप्स्‌ने जेथे आपले नाव नोंदवले होते त्या कॅथलिक लूवेन विद्यापीठातील तीन प्रमुख वेदान्तशास्त्री टिंड्‌लची न्यायचौकशी करणाऱ्‍या कामगिरीसाठी नेमले होते. लूवेनमधील तीन धर्मगुरू व तीन बिशप तसेच इतर उच्चपदस्थ देखील टिंड्‌लला पाखंडाचा आरोप लावून खंडन करण्यात आलेले व त्याला पाळकाच्या पदापासून वंचित केलेले पाहण्यासाठी तेथे उपस्थित होते. संभवतः, वयाच्या ४२ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाल्यावर सर्वांना आनंद झाला.

चरित्रलेखक रॉबर्ट डेमेअस शंभर वर्षांआधी असे म्हणाले, “टिंड्‌ल नेहमी त्याच्या निडर प्रामाणिकतेसाठी प्रसिद्ध होता.” जॉन फ्रीथ, ज्याला स्टॉक्सलीने लंडनमध्ये जाळले त्या आपल्या जोडीदाराला टिंड्‌लने असे लिहिले: “माझ्या विवेकबुद्धीविरुद्ध मी देव वचनातील एकही शब्दावयव बदलला नाही, व मला पृथ्वीवरील सर्वकाही, म्हणजे सुख, सन्मान किंवा धनसंपत्ती जरी दिली तरी मी तसे आजही करणार नाही.”

तर अशाप्रकारे, इंग्लंडच्या लोकांना सहजगत्या समजेल असे बायबल देण्याच्या विशेषाधिकारासाठी विल्यम टिंड्‌लने आपला प्राण दिला. त्याला किती मोठी किंमत द्यावी लागली—परंतु ते किती अमूल्य दान आहे!

[तळटीपा]

a त्या काळातील नाण्यांवर लागलीच फीडेई डेफेनसॉर असा छाप मारण्यात आला व हेन्रीने ही पदवी त्याच्या उत्तराधिकाऱ्‍यांना देखील बहाल केली जावी अशी मागणी केली. आज ब्रिटीश नाण्यांवरील अधिपतींच्या मुकुटावर फीड. डेफ., किंवा केवळ एफ.डी. असे पाहावयास मिळते. मनोरंजक गोष्ट अशी की, त्यानंतर राजा जेम्सला अर्पिलेल्या १६११ च्या किंग जेम्स व्हर्शन मध्ये “विश्‍वासाचा संरक्षणकर्ता” असे छापण्यात आले होते.

b ही संख्या अनिश्‍चित आहे; काही अधिकारी ती ३,००० आहे असे सांगतात.

[२९ पानांवरील चौकट]

आरंभीची भाषांतरे

सामान्य लोकांच्या भाषेत बायबलचे भाषांतर करण्याची टिंड्‌लची इच्छा अवाजवी किंवा पूर्वी कधीही न घडलेली घटना नव्हती. दहाव्या शतकात अँग्लो-सॅक्सनमध्ये एक अनुवाद करण्यात आला होता. युरोपमध्ये १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात, लॅटिनमधून भाषांतरीत केलेल्या छापील बायबलांवर निर्बंध न घालता त्यांचे वितरण केले होते: जर्मन (१४६६), इटालियन (१४७१), फ्रेंच (१४७४), झेक (१४७५), डच (१४७७) व कटालन (१४७८). सन १५२२ मध्ये, मार्टिन ल्यूथरने जर्मन भाषेत त्याचा नवा करार प्रकाशित केला. इंग्लंडला सुद्धा हेच करण्याची परवानगी का दिली जाऊ नये, केवळ याचीच मागणी टिंड्‌लने केली होती.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा