त्यांचा प्रकाश मालवला नाही
बायबल काळात, परागती व अडचणी अनुभवलेले यहोवाचे विश्वासू साक्षीदार होते. त्यांनी विरोधाला व उघड अपयशांना तोंड दिले. तरीपण, निरुत्साहाने त्यांनी हार मानली नाही. परिणामतः, त्यांचा प्रकाश मालवला नाही.
उदाहरणार्थ, यहुदाच्या धर्मत्यागी राष्ट्रासाठी देवाचा संदेष्टा होण्याची कामगिरी संदेष्टा यिर्मयाला देण्यात आली होती. त्याने जेरूसलेमच्या भावी नाशाच्या इशाऱ्याची घोषणा केली. (यिर्मया १:११-१९) परिणामस्वरूप, तो विपत्ती घोषक असल्याचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या त्याच्या देशवासियांचा त्याला पुष्कळदा सामना करावा लागला.
देवाच्या घरातील प्रमुख अधिपती, पशहूर याजक याने यिर्मयाने जो संदेश दिला होता त्यासाठी त्याला फटके मारले व खोड्यांत अडकवून ठेवले. ही जणू परागती झाल्यावर, यिर्मया म्हणाला: “मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करितो. कारण मी बोलू लागलो की जुलूम, लूट हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे [यहोवाचे, NW] वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे.” तो संदेष्टा इतका निरुत्साही झाला होता की तो म्हणाला, “मी त्याचे [यहोवाचे] नाव काढणार नाही; यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.”—यिर्मया २०:१, २, ७-९.
तथापि, यिर्मया निरुत्साहीपणाला बळी पडला नाही. ‘यहोवाच्या वचनाची’ घोषणा करत त्याने असे म्हटले: “माझ्या हाडांत कोंडलेला अग्नि जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्मया २०:८, ९) देवाच्या घोषणा करण्यास आवेशाने प्रवृत्त झाल्यामुळे, पवित्र आत्म्याने यिर्मयाला टिकून राहण्यास मदत केली व त्याने आपली कामगिरी पूर्ण केली.
निरुत्साही करणाऱ्या कारणांपुढे प्रेषित पौलाने नमते घेतले असते, तर त्याच्याकडेही अशी अनेक कारणे होती. त्याने नैसर्गिक विपत्ती, नौकाभंग, छळ व मारहाण ही सहन केली. याखेरीज, ‘सर्व मंडळ्यांविषयीची चिंता हे त्याच्या मनावरचे ओझे होते.’ (२ करिंथकर ११:२३-२८) होय, पौलाला दररोज समस्यांना तोंड द्यावे लागत होते, त्याने ज्या नवीन मंडळ्यांना प्रस्थापित होण्यास मदत दिली त्यांच्याविषयी तो चिंता करत होता. शिवाय, तो अपरिपूर्ण होता व ‘शरीरातील कांटा’ म्हणजे बहुधा क्षीण दृष्टी याजशी त्याला लढा द्यावा लागत होता. (२ करिंथकर १२:७; रोमकर ७:१५; गलतीकर ४:१५) काहीजण पौलाच्या मागे त्याच्याविरूद्ध बोलत होते व हे त्याला नंतर कळत असे.—२ करिंथकर १०:१०.
तथापि, पौलाने निरुत्साहीपणाला त्याच्यावर मात करू दिले नाही. नाही, तो काही अतिमानुष नव्हता. (२ करिंथकर ११:२९, ३०) त्याचा ‘आंतरिक अग्नी’ कशामुळे ज्वलंत राहिला? एक गोष्ट म्हणजे, त्याचे साथीदार अतिशय मदतदायी होते, काहीजण त्याच्यासोबत रोमपर्यंत देखील गेले जेथे त्याला घरात कैदी करून ठेवले होते. (प्रेषितांची कृत्ये २८:१४-१६) दुसरी गोष्ट म्हणजे, प्रेषित समतोल दृष्टीने त्याच्या परिस्थितीकडे पाहत होता. पौल नव्हे, तर त्याचा छळ करणारे व त्याचे विरोधक दोषी होते. त्याच्या पार्थिव जीवनाच्या शेवटी, त्याने त्याच्या सेवकपणाचे सकारात्मक पद्धतीने मूल्यमापन केले व म्हटले: “आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेविला आहे; प्रभु जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल.”—२ तीमथ्य ४:८.
याहून अधिक म्हणजे, पौल यहोवा देवाला नियमितपणे प्रार्थना करत असे, व ‘प्रभु त्याच्याजवळ उभा राहत असे व त्याला शक्ती देत असे.’ (२ तीमथ्य ४:१७) पौलाने म्हटले, “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) देव व सह-ख्रिश्चनांबरोबरील दळणवळण व त्यासोबतच त्याच्या सेवकपणाचे सकारात्मक पद्धतीने मूल्यमापन केल्याने यहोवाची सेवा चालू ठेवण्यास पौलाला मदत मिळाली.
देवाने पौलाला असे लिहिण्यास प्रेरित केले: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलतीकर ६:७-९) कोणते पीक? सार्वकालिक जीवन. तर मग, यिर्मया, पौल व शास्त्रवचनांमध्ये उल्लेखिलेल्या पुष्कळ इतर यहोवाच्या विश्वासू साक्षीदारांसारखे व्हा. होय, त्यांच्यासारखे व्हा व निरुत्साहीपणाला बळी पडू नका. तुमचा प्रकाश मालवू देऊ नका.—पडताळा मत्तय ५:१४-१६.
[२५ पानांवरील चित्रं]
पौल व यिर्मया यांनी त्यांचा प्रकाश मालवू दिला नाही