वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ८/१ पृ. १४-१९
  • आजतागायत यहोवाकडून शिकवण्यात आलेले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आजतागायत यहोवाकडून शिकवण्यात आलेले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शिक्षक-विद्यार्थ्यांचा आदर्श नातेसंबंध
  • विस्तारित स्वरूपाचा शैक्षणिक कार्यक्रम
  • मंडळीच्या सभांमध्ये शिकवले जाणे
  • मोठ्या सभांमध्ये शिकवले जाणे
  • शिक्षण देण्यासाठी देवाकडून शिकवलेले
  • यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास शिकवलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवा—शिक्षण देणारा देव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • “ईश्‍वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • ईश्‍वरी शिक्षणाच्या लाभांचा आनंद मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ८/१ पृ. १४-१९

आजतागायत यहोवाकडून शिकवण्यात आलेले

“परमेश्‍वराने [यहोवा, NW] मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे.”—यशया ५०:४.

१, २. (अ) यहोवाने आपल्या आवडत्या विद्यार्थ्याला कशासाठी तयार केले आणि त्याचा काय परिणाम झाला? (ब) येशूने त्याच्या शिक्षणाच्या उगमाबद्दल कशी कबुली दिली?

यहोवा देव पिता बनला तेव्हापासून तो शिक्षक आहे. त्याच्या काही मुलांनी बंड केल्यावर काही काळानंतर त्याने आपल्या आवडत्या विद्यार्थ्याला, त्याच्या ज्येष्ठ पुत्राला पृथ्वीवरील सेवकपणाकरता तयार केले. (नीतिसूत्रे ८:३०) यशयाचा ५० वा अध्याय या विद्यार्थ्याला भविष्यसूचकपणे या प्रकाराने सादर करून म्हणतो: “शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभु परमेश्‍वराने [यहोवा, NW] मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे.” (यशया ५०:४) येशूने पृथ्वीवर असताना त्याच्या पित्याच्या शिक्षणाचा अवलंब केल्यामुळे तो सर्व ‘कष्टी व भाराक्रांत जनांस’ तजेला देणारा उगम ठरला.—मत्तय ११:२८-३०.

२ पहिल्या शतकात येशूने बरीच सामर्थ्यशाली कृत्ये केली. त्याने अंधांचे डोळे उघडले आणि मृतांना देखील पुन्हा जिवंत केले, तरी त्याच्या काळात तो लोकांमध्ये एक शिक्षक म्हणूनच प्रामुख्यत्वे प्रसिद्ध होता. त्याचे अनुयायी तसेच त्याच्या विरोधकांनी देखील त्याला गुरूजी असेच संबोधले. (मत्तय ८:१९; ९:११; १२:३८; १९:१६; योहान ३:२) येशूने शिकवलेल्या गोष्टींचे श्रेय स्वतःस कधीही दिले नाही, उलट त्याने नम्रपणे हे कबूल केले: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.” “मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्‍या गोष्टी बोलतो.”—योहान ७:१६; ८:२८; १२:४९.

शिक्षक-विद्यार्थ्यांचा आदर्श नातेसंबंध

३. यहोवा ज्यांना शिक्षण देतो त्यांच्या बाबतीत केवढी आस्था घेऊन आहे हे यशयाची भविष्यवाणी कशी सूचित करते?

३ उत्तम शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यक्‍तिगत, जाणीवपूर्वक व प्रेमळ आस्था घेतो. यहोवा देव, तो शिकवीत असलेल्या लोकांमध्ये अशीच आस्था घेतो हे यशयाचा ५० वा अध्याय दाखवतो. “तो रोजरोज सकाळी मला जागे करितो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो,” असे भविष्यवादात नमूद आहे. (यशया ५०:४) येथील भाषा, एखादा शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरता सकाळीच उठवतो असे सुचवते. या भविष्यवाणीच्या अवलंबनाबद्दल विवेचन मांडताना एका बायबल प्रामाण्यांचे परीक्षण असे आहे: “कल्पना अशी आहे की, भावी मुक्‍तिदाता . . . जणू देवाच्या शाळेत होता; व तो इतरांना शिक्षण देण्यास लायक होणार होता. . . . मशीहा ईश्‍वरी शिक्षणाद्वारे मानवजातीचा शिक्षक होण्याकरता उल्लेखनियरित्या लायक असणार होता.”

४. येशूने त्याच्या पित्याच्या शिक्षणाला कसा प्रतिसाद दिला?

४ वास्तविकपणे, विद्यार्थी त्यांच्या शिक्षकाच्या शिक्षणाला प्रतिसाद देत असतात. येशूने त्याच्या पित्याच्या शिक्षणाला कसा प्रतिसाद दिला? त्याचा प्रतिसाद, आपण यशया ५०:५ मध्ये जे वाचतो त्याच्या अनुषंगाने होता: “प्रभु परमेश्‍वराने [यहोवा] माझे कान उघडिले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही.” होय, येशू शिकून घेण्यास उत्सुक होता. एका प्रसिद्ध वाक्यप्रचाराप्रमाणे तो कान देणारा होता. यापेक्षा अधिक म्हणजे, त्याच्या पित्याने जे जे त्याला सांगितले ते सर्व करण्यासाठी तो तयार होता. तो फितूर नव्हता; उलटपक्षी त्याने म्हटले: “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”—लूक २२:४२.

५. (अ) आपल्याला या पृथ्वीवर ज्या परीक्षा सहन कराव्या लागणार ते येशूला आधीच माहीत होते, हे कशावरून सूचित होते? (ब) यशया ५०:६ मधील भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

५ देवाची इच्छा करीत राहिल्यामुळे कोणते संभाव्य परिणाम उद्‌भवतील याची माहिती पुत्राला कळवण्यात आली होती असे भविष्यवाणी दर्शवते. हे शिकवलेला जे काही म्हणतो त्याद्वारे, दाखवले आहे: “मी मारणाऱ्‍यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्‍यांपुढे आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही.” (यशया ५०:६) भविष्यवाणीने सुचवल्याप्रमाणे येशूला पृथ्वीवर फार क्रुरतेने वागवण्यात आले. मत्तय या प्रेषिताने लिहिले: ‘ते त्याच्या तोंडावर थुंकले आणि कोणी त्याला चपडाका मारिल्या.’ (मत्तय २६:६७) हे सा. यु. ३३ च्या वल्हांडणाच्या रात्री धार्मिक पुढाऱ्‍यांच्या हातून घडले. दुसऱ्‍या दिवशी मरण्याकरता खांबावर टांगले जाण्याआधी रोमी शिपायांनी त्याला निर्दयीपणे चाबकाने मारले तेव्हा येशू मारणाऱ्‍यांपुढे स्तब्ध राहिला.—योहान १९:१-३, १६-२३.

६. काय हे दाखवते की, येशूने त्याच्या शिक्षकावरील स्वतःचा आत्मविश्‍वास कधीच गमावला नाही आणि त्याच्या आत्मविश्‍वासाला कसे प्रतिफळ मिळाले?

६ आधीच शिक्षण मिळालेल्या या पुत्राने त्याच्या शिक्षकावरील आत्मविश्‍वास कधीच ढळू दिला नाही. हे, भविष्यवाणीत दाखवल्याप्रमाणे त्याने जे म्हटले त्याद्वारे दिसून येते: “प्रभु परमेश्‍वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही.” (यशया ५०:७) येशूच्या शिक्षकाच्या मदतीवरील त्याच्या आत्मविश्‍वासाला समृद्ध प्रतिफळ मिळाले. त्याच्या पित्याने त्याला उच्च केले, देवाच्या इतर सर्व सेवकांपेक्षा श्रेष्ठ दर्जा देऊन त्याला आशीर्वादित केले. (फिलिप्पैकर २:५-११) आपण सुद्धा यहोवाच्या शिक्षणाला आज्ञाधारकपणे मानले व त्यापासून “मागे फिरलो नाही,” तर आपल्यापुढे देखील भव्य आशीर्वाद राखून ठेवले आहेत. ते शिक्षण, आजतागायत, आपणाला कसे उपलब्ध करून दिले आहे हे आपण पाहू या.

विस्तारित स्वरूपाचा शैक्षणिक कार्यक्रम

७. यहोवाने पृथ्वीवर स्वतःचे शिक्षण कसे चालवले?

७ पहिल्या शतकात ईश्‍वरी शिक्षण देण्यासाठी यहोवाने त्याचा पृथ्वीवरील प्रतिनिधी, येशू ख्रिस्ताचा उपयोग केला होता हे आपण आधीच पाहिले आहे. (योहान १६:२७, २८) शिक्षणाकरता येशूने सतत देवाच्या वचनाला अधिकार म्हणून दर्शवले व याद्वारे त्याने, ज्यांना शिकवले त्यांच्यापुढे उदाहरण मांडले. (मत्तय ४:४, ७, १०; २१:१३; २६:२४, ३१) त्यानंतर, यहोवाचे शिक्षण अशा शिकवल्या गेलेल्या लोकांच्या सेवकपणाद्वारे पृथ्वीवर पुढे चालू राहिले. येशूने त्यांना जी आज्ञा दिली होती ती लक्षात आणा: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) शिष्य करण्यात आल्यावर ते ‘जिवंत देवाची मंडळी, देवाचे घर’ याचे भाग बनले. (१ तीमथ्य ३:१५) त्यांच्या वैयक्‍तिक मंडळ्या तयार होऊन त्यामध्ये त्यांना यहोवाद्वारे शिक्षण देण्यात येत असे. (प्रेषितांची कृत्ये १४:२३; १५:४१; १६:५; १ करिंथकर ११:१६) ईश्‍वरी शिक्षण आजपर्यंत असेच चालत आले आहे का?

८. अंत येण्याआधी प्रचाराचे कार्य पृथ्वीवर मार्गदर्शित केले जाणार याबद्दल येशूने कसे सूचित केले?

८ होय, खरेच! येशूने त्याच्या मृत्यूच्या तीन दिवसांआधी भाकीत केले की, युगाची समाप्ती होण्याआधी एक भव्य प्रचाराचे काम करण्यात येईल. “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल,” असे त्याने म्हटले. हे जागतिक स्वरूपाचे प्रचाराचे कार्य व शैक्षणिक कार्यक्रम ज्या माध्यमाद्वारे मार्गदर्शित करण्यात येईल त्याचे वर्णन येशूने पुढे दिले. त्याच्या सेवकांना आध्यात्मिक अन्‍न देण्याचे माध्यम किंवा साधन राहील अशा ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाबद्दल’ तो बोलला. (मत्तय २४:१४, ४५-४७) यहोवा देवाने या ‘दासाचा’ उपयोग सबंध पृथ्वीवर राज्य आस्थेची देखरेख करण्यासाठी केला आहे.

९. विश्‍वासू व बुद्धिमान दास कोणाचा मिळून बनतो?

९ आज विश्‍वासू व बुद्धिमान दास राज्य वारसदारांच्या शेषांचा मिळून बनलेला आहे. हे अभिषिक्‍त ख्रिस्ती, १,४४,००० पैकी पृथ्वीवरील शेष असून ते ‘ख्रिस्ताचे आहेत’ व ‘अब्राहामाच्या संतानाचा’ भाग आहेत. (गलतीकर ३:१६, २९; प्रकटीकरण १४:१-३) या विश्‍वासू व बुद्धिमान दासाला तुम्ही कसे ओळखू शकता? खासपणे ते करीत असलेले काम व त्यांचे देवाच्या वचनाला, बायबलला चिकटून राहणे याद्वारे.

१०. यहोवाच्या शिक्षणाला चालना द्यावी म्हणून दास वर्ग कोणत्या साधनांचा उपयोग करत आहे?

१० यहोवा या ‘दासाचा’ आज लोकांना शिकवण्याचे माध्यम म्हणून उपयोग करून घेत आहे. या दासवर्गाच्या सदस्यांनी १९३१ मध्ये यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वतःला लावून घेतले. यानंतर लाखो लोकांनी त्यांच्याशी सहवास ठेवला; त्यांनी ते नाव धारण केले व देवाच्या राज्याची घोषणा त्यांच्यासोबत मिळून केली. टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक, हे नियतकालिक, ‘दास’ शैक्षणिक कार्यात उपयोगात आणणारे प्रमुख साधन आहे. तथापि, पुस्तके, पुस्तिका, माहितीपत्रके, पत्रिका व सावध राहा! नियतकालिक यासारख्या इतर प्रकाशनांचाही उपयोग केला जातो.

११. ‘दासाने’ कोणत्या प्रशाला चालवल्या आहेत व यापैकीची प्रत्येक प्रशाला कोणता हेतू साध्य करते?

११ याखेरीज, ‘दास’ विविध प्रशाला चालवतो. यात वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला हा पाच महिने चालवण्यात येणारा शिक्षणक्रम असून तो तरुण सेवकांना विदेशी सुवार्तिक कार्याकरता तयार करतो; तसेच दोन महिन्यांची सेवकपण तालीम प्रशाला आहे, ज्यामध्ये अविवाहित वडील व सेवा-सेवकांना खास ईश्‍वरशासित नेमणुकींकरता तालीम दिली जाते. याचप्रमाणे राज्य सेवा प्रशाला देखील आहे, जी ख्रिस्ती वडील व सेवा-सेवकांना अधूनमधून त्यांच्या मंडळीच्या जबाबदारीसंबंधाने सूचना पुरवते. शिवाय पायनियर सेवा प्रशाला पूर्ण वेळेच्या सुवार्तिकांना त्यांच्या प्रचाराच्या कार्यात अधिक प्रभावी बनण्यासाठी तयार करते.

१२. शैक्षणिक कार्यक्रमाचा साप्ताहिक भाग कोणता आहे?

१२ शैक्षणिक कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यहोवाच्या लोकांच्या जगभरातील ७५,५०० पेक्षा अधिक मंडळ्यातून दर आठवडी चालवण्यात येणाऱ्‍या पाच सभा होय. तुम्हाला या सभांचा होता होईल तेवढा लाभ मिळतो का? तेथे दिल्या जाणाऱ्‍या सूचनांकडे लक्ष दिल्याने तुम्ही त्यावर खरोखर विश्‍वास ठेवत आहात आणि जणू देवाच्या शाळेत आहात असे खरोखरीच दाखवता का? तुमची आध्यात्मिक प्रगती तुम्हाला “सुशिक्षितांची जिव्हा” मिळाली असल्याचे इतरांना स्पष्टपणे दाखवते का?—यशया ५०:४; १ तीमथ्य ४:१५, १६.

मंडळीच्या सभांमध्ये शिकवले जाणे

१३. (अ) यहोवाचा त्याच्या लोकांना शिक्षण देण्याचा आज एक महत्त्वाचा मार्ग कोणता आहे? (ब) आपल्याला टेहळणी बुरूज याबद्दलची आपली कदर कशी दाखवता येईल?

१३ टेहळणी बुरूज शैक्षणिक माध्यम असे वापरून यहोवा त्याच्या लोकांना बायबलचा साप्ताहिकरित्या अभ्यास करण्याद्वारे खासपणे शिकवतो. हे यहोवाकडून शिक्षण दिले जाणारे स्थान या अर्थाने तुम्ही या सभेकडे बघता का? यशया ५०:४ विशेषतः येशूला लागू होणारे असले तरी जे “सुशिक्षितांची जिव्हा” मिळवण्याच्या देवाच्या तरतुदींचा स्वतःकरता लाभ करून घेऊ इच्छितात अशा सर्वांना ते लागू होऊ शकते. टेहळणी बुरूज नियतकालिकाबद्दल तुम्हाला मोल वाटत आहे हे तुम्ही, त्याचा प्रत्येक अंक मिळताच लवकरात लवकर वाचून काढण्याद्वारे दाखवू शकता. मग, टेहळणी बुरूज याचा मंडळीत अभ्यास होत असता, तेथे उपस्थित राहून तसेच तुमच्या आशेची जाहीर घोषणा करण्यासाठी तयार राहून तुम्हाला यहोवाबद्दल वाटणारी कदर व्यक्‍त करता येईल.—इब्रीयांस १०:२३.

१४. (अ) सभेमध्ये विवेचने मांडणे हा महत्त्वपूर्ण विशेषाधिकार का आहे? (ब) तरुणांनी दिलेली कोणत्या प्रकारची विवेचने अधिक उत्तेजनात्मक असतात?

१४ तुम्ही सभांमध्ये जी उत्तरे देता त्याद्वारे तुम्हाला यहोवाच्या भव्य शैक्षणिक कार्यक्रमात भाग मिळू शकतो याची समज आहे का? सभेमध्ये विवेचन सादर करणे हा आपण “प्रीति व सत्कर्मे” करायला एकमेकांना उत्तेजन देण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे, यात काहीच प्रश्‍न नाही. (इब्रीयांस १०:२४, २५) या बोध देणाऱ्‍या कार्यक्रमात मुले देखील सहभागी होऊ शकतात का? होय, निश्‍चितपणे. लहान मुलांनी हृदयापासून दिलेली उत्तरे वडीलधाऱ्‍यांना पुष्कळदा प्रोत्साहनदायक ठरतात. काहीवेळा मुलांनी केलेल्या विवेचनांमुळे सभेमध्ये उपस्थित असणाऱ्‍या नव्या लोकांना बायबलच्या सत्यामध्ये अधिक रस घेण्यास चालना मिळाली आहे. काही मुले त्यांची उत्तरे थेट परिच्छेदातून वाचून दाखवण्याची किंवा त्यांच्या कानात प्रौढ जी उत्तरे सांगतात ती सांगण्याची स्वतःला सवय लावून आहेत. पण जेव्हा ते आपली उत्तरे स्वतः चांगली तयारी करून देतात तेव्हा ते अधिक उत्तेजनात्मक वाटते. अशा प्रकारातील विवेचन आमचा महान शिक्षक याला तसेच त्याच्या उच्च शैक्षणिक कार्यक्रमाला खरेपणाने सन्मान देते.—यशया ३०:२०, २१.

१५. मुलांना अधिक परिणामकारक उत्तरे देण्याची मदत करावी म्हणून पालक काय करू शकतात?

१५ मुलांना देवाची स्तुती करण्यामध्ये सहभाग घेण्याची इच्छा आहे हे पाहणे आनंदाचे आहे. मुलांच्या स्तुतीयोग्य उद्‌गारांची येशूने कदर केली. (मत्तय २१:१५, १६) एक ख्रिस्ती वडील असे निरीक्षण करतात: “मी लहान होतो तेव्हा टेहळणी बुरूज अभ्यासामध्ये उत्तर देण्याची माझी इच्छा होती. एक उत्तर तयार करण्यास मदत दिल्यावर माझे वडील मला ते निदान सात वेळा म्हणावयास लावत.” तुमच्या कौटुंबिक बायबल अभ्यासात तुम्हा पालकांना टेहळणी बुरूज यामधील निवडक परिच्छेदांवरील उत्तरे स्वतःच्या शब्दांत सांगण्याची मदत तुमच्या मुलांना करता येईल. यहोवाच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होणे मोठा विशेषाधिकार आहे याबद्दल त्यांना कदर वाटू देण्याची मदत करा.

१६. ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा कोणता फायदा लाभला आहे आणि कोण प्रशालेत स्वतःचे नाव दाखल करू शकतात?

१६ इतर ख्रिस्ती सभांमध्ये दिल्या जाणाऱ्‍या शिक्षणाबद्दल देखील, ती माहिती देण्याचा विशेषाधिकार मिळालेल्यांनी तसेच सादर करण्यात आलेला बोध ऐकणाऱ्‍यांनी गंभीर विचार करावयास हवा. आता ५० पेक्षा अधिक वर्षे यहोवाने साप्ताहिक ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा उपयोग लाखो पुरुष व स्त्रियांना राज्याचा संदेश अधिक प्रभावीपणे सादर करण्याकरता तालीम देण्यासाठी केला आहे. जे मंडळीसोबत क्रियाशील सहवास ठेवून आहेत अशांना तसेच अलीकडेच सभांना उपस्थित राहू लागलेल्या व स्वतःचे जीवन ख्रिस्ती तत्त्वांच्या अनुषंगाने व्यतीत करणाऱ्‍या लोकांना या प्रशालेत नाव दाखल करता येईल.

१७. (अ) कोणत्या खास उद्देशास्तव जाहीर भाषण सभेची योजना करण्यात आली होती? (ब) जाहीर भाषणाच्या वक्त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

१७ शैक्षणिक कार्यक्रमाचा बऱ्‍याच काळापासून असणारा एक भाग म्हणजे जाहीर भाषणाची सभा होय. त्याचे नाव सुचवते त्याप्रमाणे ही सभा खासपणे साक्षीदार नसलेल्या लोकांना मूलभूत बायबल शिक्षणाचा परिचय घडावा म्हणून आयोजित केली आहे. तेव्हा, भाषण देणाऱ्‍या व्यक्‍तीने ती माहिती, पहिल्यांदाच संदेश ऐकणाऱ्‍याला समजू शकेल अशा पद्धतीने सादर केली पाहिजे. याचा अर्थ, साक्षीदार नसलेल्यांना न समजणाऱ्‍या अशा संज्ञा, जसे की, “दुसरी मेंढरे,” “बंधू,” “शेष” यांचे स्पष्टीकरण करून सांगणे हा होय. जाहीर भाषणाच्या सभेला उपस्थित राहणाऱ्‍या लोकांचा विश्‍वास तसेच जीवनशैली आजच्या समाजात मान्य असली, तरी शास्त्रवचनांच्या अगदी विसंगतीत असू शकेल, पण वक्त्याने नेहमी चाणाक्ष राहावे व अशा विश्‍वासांची किंवा जीवनशैलींची थट्टा करू नये.—पडताळा १ करिंथकर ९:१९-२३.

१८. मंडळीच्या आणखी कोणत्या साप्ताहिक सभा आहेत आणि त्या कोणता उद्देश साध्य करतात?

१८ मंडळीचा पुस्तक अभ्यास अशी सभा आहे जेथे विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या मार्गदर्शनाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रकाशनाचा बायबलसोबत दर आठवडी अभ्यास केला जातो. सध्या कित्येक देशांत प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! हे प्रकाशन अभ्यासले जात आहे. सेवा सभा यहोवाच्या लोकांना राज्य सुवार्तेच्या प्रचाराच्या कामात आणि शिष्य बनवण्यामध्ये पूर्ण सहभाग घेता यावा म्हणून सज्ज करण्यास तयार केलेली आहे.—मत्तय २८:१९, २०; मार्क १३:१०.

मोठ्या सभांमध्ये शिकवले जाणे

१९. दर वर्षी कोणत्या मोठ्या मेळाव्यांची योजना ‘दास’ करतो?

१९ खऱ्‍या ख्रिश्‍चनांना बोध व खास उत्तेजन मिळावे म्हणून ‘विश्‍वासू दासाने’ मागील शंभरपेक्षा अधिक वर्षे अधिवेशने व संमेलनांचे आयोजन केले. आता दरवर्षी अशा तीन मोठ्या सभा भरवल्या जातात. यामध्ये एक-दिवसीय संमेलन समाविष्ट असून याला एका विभागात असणाऱ्‍या मंडळ्यांचा गट उपस्थित राहतो. वर्षाच्या दरम्यान, प्रत्येक गट दोन दिवसांच्या मेळाव्याला देखील उपस्थित राहतो, ज्याला विभागीय संमेलन म्हणतात. याशिवाय, प्रांतीय अधिवेशनाचा सुद्धा मेळावा आहे, ज्याला अनेक विभाग उपस्थित राहतात. काही वर्षांमध्ये, आंतरराष्ट्रीय अधिवेशने आयोजित करण्यात येतात. कित्येक देशांतून भेट देणाऱ्‍या साक्षीदारांसोबतचे हे मोठे मेळावे यहोवाच्या लोकांना विश्‍वासाला खरेच उभारक आहेत!—पडताळा अनुवाद १६:१६.

२०. यहोवाच्या साक्षीदारांच्या मोठ्या मेळाव्यांत सातत्याने कशावर भर देण्यात आला आहे?

२० सीडर पॉईंट, ओहायो, अमेरिका येथे १९२२ मध्ये जेव्हा साधारण १०,००० लोक अधिवेशनाला आले तेव्हा वक्त्याच्या “हाच तो दिवसांचा दिवस आहे. पाहा, राजा राज्य करीत आहे! तुम्ही त्याचे जाहीर प्रतिनिधी आहात. या कारणास्तव, राजा व त्याचे राज्य याची जाहिरात करा, जाहिरात करा, जाहिरात करा” या उत्तेजनामुळे प्रतिनिधींना मोठे स्फुरण आले. अशा मोठ्या अधिवेशनांनी प्रचार कार्यावर सातत्याने भर दिला आहे. उदाहरणार्थ, १९५३ मध्ये न्यूयॉर्क सिटीमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये सर्व मंडळ्यांत, घरोघरच्या कार्याची तालीम देणाऱ्‍या कार्यक्रमाच्या प्रस्थापनेबद्दल घोषणा करण्यात आली. त्याचा अवलंब पुष्कळ देशांतील राज्य प्रचाराच्या कार्यावर सकारात्मक परिणाम करणारा ठरला.

शिक्षण देण्यासाठी देवाकडून शिकवलेले

२१. कोणता विशेषाधिकार स्वीकारण्याची आपली इच्छा असावी, पण कोणता उद्देश चुकवू नये?

२१ आज पृथ्वीवर यहोवाचा अद्‌भुत शैक्षणिक कार्यक्रम आहे हे नक्की! याचा लाभ घेतात ते सर्व यहोवाने शिकवलेले, होय, ते “सुशिक्षितांची जिव्हा” मिळालेल्यांमध्ये असू शकतील. जणू देवाच्या शाळेत असण्याचा तो केवढा विशेषाधिकार आहे! तरीपण, हा विशेषाधिकार स्वीकारताना आपण त्याचा उद्देश चुकवता कामा नये. यहोवाने येशूला शिकवले, ज्यामुळे तो इतरांना शिकवू शकला आणि येशूने त्याच्या शिष्यांना शिकवले की ज्यामुळे ते देखील त्याने केलेले तेच कार्य अधिक मोठ्या प्रमाणावर करू शकले. याचप्रमाणे, आपण इतरांना शिक्षण द्यावे म्हणून आज आपल्याला यहोवाच्या भव्य शैक्षणिक कार्यक्रमात तालीम देण्यात येत आहे.—योहान ६:४५; १४:१२; २ करिंथकर ५:२०, २१; ६:१; २ तीमथ्य २:२.

२२. (अ) मोशे व यिर्मयाला कोणती समस्या होती, पण ती कशी सोडवण्यात आली? (ब) राज्य प्रचाराचे काम पूर्ण होत आहे याकडे देवाचे लक्ष असेल याबद्दलची कोणती हमी आपल्याला असू शकते?

२२ “मी बोलका नाही,” असे मोशेप्रमाणे किंवा “मला बोलावयाचे ठाऊक नाही,” असे यिर्मयाप्रमाणे तुम्ही कधी म्हणता का? यहोवाने त्यांना जशी मदत दिली तशीच तो तुम्हाला देखील मदत देईल. “मी तुझ्या मुखास साहाय्य होईन,” असे त्याने मोशेला म्हटले. तो यिर्मयाला असे म्हणाला: “तू भिऊ नको; . . . मी तुझ्याबरोबर आहे.” (निर्गम ४:१०-१२; यिर्मया १:६-८) जेव्हा धर्मविरोधकांनी येशूच्या शिष्यांनी उगे राहावे असे इच्छिले तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” (लूक १९:४०) परंतु तेव्हा धोंड्यांनी ओरडण्याची गरज नव्हती; तशीच आजही नाही, कारण यहोवा त्याचा राज्य संदेश देण्याकरता त्याच्या शिक्षण दिलेल्या सुशिक्षितांच्या जिव्हांचा उपयोग करीत आहे.

तुम्हाला उत्तर देता येईल?

◻ यशयाच्या ५० व्या अध्यायात शिक्षक-विद्यार्थ्याचा कोणता आदर्श नातेसंबंध ठळकपणे दाखवण्यात आला आहे?

◻ यहोवाने विस्तारित स्वरूपाचा शैक्षणिक कार्यक्रम कसा तडीस नेला आहे?

◻ यहोवाच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे काही पैलू कोणते आहेत?

◻ यहोवाच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होणे हा भव्य विशेषाधिकार का आहे?

[१६ पानांवरील चित्रं]

मुलांनी दिलेली हृदयापासूनची विवेचने वडीलधाऱ्‍यांना पुष्कळदा उत्तेजनात्मक ठरतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा