वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ८/१ पृ. ९-१४
  • यहोवा—शिक्षण देणारा देव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा—शिक्षण देणारा देव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पिता, शिक्षक, पती
  • यहोवाचे महत्त्वपूर्ण शिक्षण
  • शिकवलेल्यांचा मोठा लोकसमुदाय
  • यहोवा कसे शिकवतो
  • नंदनवन आणविणारे सरकार
    नंदनवन आणविणारे सरकार
  • देवाचे शांतीचे सरकार
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • आजतागायत यहोवाकडून शिकवण्यात आलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • सर्पाचे संतान—कसे उघडकीस आणण्यात आले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ८/१ पृ. ९-१४

यहोवा—शिक्षण देणारा देव

“ते सर्व देवाने [यहोवा, NW] शिकविलेले असे होतील.”—योहान ६:४५.

१. येशू कफर्णहूममध्ये आता काय करत आहे?

येशू ख्रिस्ताने नुकतेच चमत्कार संपन्‍न केले होते व तो आता गालील समुद्राजवळील कफर्णहूम गावामध्ये सभास्थानात शिक्षण देत असलेला आढळतो. (योहान ६:१-२१, ५९) “मी . . . स्वर्गातून उतरलो आहे,” असे त्याने म्हणताच पुष्कळजण अविश्‍वासाचा सूर काढतात. ते कुरकूर करू लागतात: “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग, मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो?” (योहान ६:३८, ४२) त्यांना दटावून येशू जाहीर करतो: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.”—योहान ६:४४.

२. येशूने पुनरुत्थानाबद्दल दिलेल्या अभिवचनावर विश्‍वास ठेवण्याचा कोणता आधार आहे?

२ देवाचे राज्य आधिपत्य गाजवते त्या शेवटल्या दिवशी पुनरुत्थान होणे—केवढे हे अद्‌भुत अभिवचन! या अभिवचनावर आपल्याला विश्‍वास ठेवता येईल, कारण त्यास पिता, यहोवा देवाचे पाठबळ आहे. (ईयोब १४:१३-१५; यशया २६:१९) मृतजन परत जिवंत होतील हे शिक्षण देणारा यहोवा खरोखरच “सर्वांपेक्षा महान शिक्षक आहे.” (ईयोब ३६:२२, टुडेज्‌ इंग्लिश व्हर्शन) पित्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून येशू पुढे म्हणतो: “संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने [यहोवा] शिकविलेले असे होतील.’”—योहान ६:४५.

३. आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

३ “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून [यहोवा] शिक्षण पावतील,” असे ज्यांच्याबद्दल यशया संदेष्ट्याने लिहिले त्यांच्यापैकी एक असणे हा खराच एक विशेषाधिकार असणार. (यशया ५४:१३) आपण शिक्षण पावलेले असू शकतो का? त्याला पुत्रांसमान कोण आहेत व त्याचे शिक्षण कोणाला मिळाले आहे? यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्याकरता असे कोणते महत्त्वपूर्ण शिक्षण आम्ही जाणून घेतले पाहिजे व त्यानुरूप हालचाल केली पाहिजे? यहोवाने गतकाळात कसे शिक्षण दिले व आज तो त्याचप्रमाणे शिक्षण देत आहे का? या प्रश्‍नांचा आपण विचार करणार आहोत.

पिता, शिक्षक, पती

४. यहोवाकडून शिक्षण मिळालेले त्याचे पहिले पुत्र कोण होते?

४ यहोवाने स्वतःचा एकुलता एक पुत्र, मानव प्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वातील येशू याची निर्मिती केली तेव्हा तो प्रथमतःच पिता व शिक्षक बनला. त्याला “शब्द” असे म्हणण्यात येते, कारण तो यहोवाचा प्रमुख प्रवक्‍ता होता. (योहान १:१, १४; ३:१६) हा शब्द “[पित्यापाशी] कुशल कारागीर” होता व त्याने पित्याच्या शिक्षणापासून खूप चांगले शिकून घेतले. (नीतिसूत्रे ८:२२, ३०) खरे म्हणजे, त्याच्याच द्वारे पित्याने आत्मिक ‘देवपुत्रांसहित’ इतर सर्व गोष्टी निर्माण केल्यामुळे तो देवाचा प्रतिनिधी व साधनभूत असा झाला. या सर्वांना देवाकडून शिक्षण मिळवण्यात केवढा आनंद वाटला असावा! (ईयोब १:६; २:१; ३८:७; कलस्सैकर १:१५-१७) नंतर, आदाम या पहिल्या मनुष्याची निर्मिती झाली. तो देखील “देवाचा पुत्र” होता आणि यहोवाने याला शिक्षण दिल्याचे बायबल प्रकट करते.—लूक ३:३८; उत्पत्ति २:७, १६, १७.

५. आदामाने कोणता मोलवान विशेषाधिकार गमावला, पण यहोवाने कोणाला शिकवले व का?

५ आदामाने स्वतःच्या इच्छापूर्ण बंडखोरीमुळे देवाचा पुत्र असण्याचा विशेषाधिकार गमावला हे दुःखाचे आहे. या कारणामुळे, त्याचे वंशज, केवळ देवाचे पुत्र असण्याच्या नातेसंबंधाचा दावा, त्यांचा जन्म घडला या आधारावर करू शकत नव्हते. तरी पण ज्या अपरिपूर्ण लोकांनी यहोवाकडे मार्गदर्शन प्राप्तीकरता पाहिले अशांना त्याने शिकवले. उदाहरणार्थ, नोहा हा ‘देवाबरोबर चालणारा’ ‘नीतिमान मनुष्य’ असल्याचे सिद्ध झाले, यामुळे यहोवाने त्याला शिक्षण दिले. (उत्पत्ति ६:९, १३–उत्पत्ति ६:१३ ते ७:५) अब्राहाम आज्ञाधारकपणामुळे स्वतःबाबतीत “देवाचा मित्र” असल्याचे शाबीत करू शकला, यामुळे त्याला देखील यहोवाकडून शिक्षण मिळाले.—याकोब २:२३; उत्पत्ति १२:१-४; १५:१-८; २२:१, २.

६. यहोवाने कोणाबद्दल “पुत्र” असल्याचा दृष्टिकोन बाळगला व तो त्यांच्यासाठी कशा प्रकारचा शिक्षक होता?

६ याच्या बऱ्‍याच काळानंतर, मोशेच्या दिवसांत, यहोवा इस्राएल राष्ट्रासोबत कराराच्या नातेसंबंधात सामील झाला. त्यामुळे ते राष्ट्र त्याचे निवडलेले लोक बनले व त्याकडे त्याचा “पुत्र” म्हणून पाहण्यात येऊ लागले. देवाने म्हटले: “इस्राएल हा माझा पुत्र . . . आहे.” (निर्गम ४:२२, २३; १९:३-६; अनुवाद १४:१, २) या कराराच्या नातेसंबंधाला अनुलक्षून इस्राएल लोक, यशया संदेष्ट्याने लिहिले त्याप्रमाणे, “हे परमेश्‍वरा, तू आमचा पिता आहेस,” असे म्हणू शकत होते. (यशया ६३:१६) यहोवाने आपली पित्याची जबाबदारी पत्करली व त्याची मुले, इस्राएल राष्ट्राला प्रेमळपणे शिकवले. (स्तोत्र ७१:१७; यशया ४८:१७, १८) ते जेव्हा अविश्‍वासू बनले तेव्हा खरे पाहता, त्याने दयाळुपणे त्यांना अशी विनंती केली: “मुलांनो, मागे फिरा.”—यिर्मया ३:१४.

७. इस्राएलाने यहोवासोबत कोणते नातेसंबंध उपभोगला?

७ इस्राएलासोबतच्या कराराच्या नातेसंबंधामुळे यहोवा त्या राष्ट्राचा लाक्षणिकपणे पती देखील बनला व ते त्याची लाक्षणिक पत्नी बनले. तिच्याबद्दल यशया संदेष्ट्याने लिहिले: “तुझा निर्माणकर्ता तुझा पति आहे; सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा] हे त्याचे नाम.” (यशया ५४:५; यिर्मया ३१:३२) यहोवाने पती या नात्याने सन्माननीय भूमिका पूर्ण केली, तरी इस्राएल राष्ट्र अविश्‍वासू पत्नी बनले. “इस्राएलाच्या घराण्या, बायको बेइमान होऊन आपल्या पतीस सोडिते तसे तुम्ही मजशी बेइमान झाला आहा,” असे यहोवाने म्हटले. (यिर्मया ३:२०) यहोवा त्याच्या अविश्‍वासू पत्नीच्या मुलांना विनंती करीत राहिला; तो त्यांचा “महान शिक्षक” राहिला.—यशया ३०:२०, NW; २ इतिहास ३६:१५.

८. यहोवाने इस्राएलाचा एक राष्ट्र या नात्याने धिक्कार केला असला तरी त्याला अद्याप कोणती प्रतिनमुनेदार लाक्षणिक पत्नी आहे?

८ इस्राएलाने देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचा धिक्कार केला व ठार मारले तेव्हा देवानेही त्याचा धिक्कार केला. तेव्हापासून यहुदी राष्ट्र त्याची लाक्षणिक पत्नी म्हणून व तो त्या राष्ट्राच्या भटकलेल्या मुलांचा पिता व शिक्षक म्हणून राहिला नाही. (मत्तय २३:३७, ३८) तथापि, इस्राएल केवळ नमुनेदार किंवा लाक्षणिक पत्नी होते. प्रेषित पौलाने यशया ५४:१ चे अवतरण घेतले, ज्यात ‘मूल न झालेल्या वंध्येबद्दल’ सांगण्यात आले आहे व ही, ‘विवाहित स्त्री,’ स्वाभाविक इस्राएल राष्ट्रापेक्षा वेगळी आहे. अभिषिक्‍त ख्रिस्ती त्या “मूल न झालेल्या वंध्ये”ची मुले आहेत असे पौल प्रकट करतो व तिला तो “वर असलेली यरुशलेम” असे संबोधतो. या प्रतिनमुनेदार, लाक्षणिक स्त्रीमध्ये देवाच्या आत्मिक प्राण्यांच्या स्वर्गीय संघटनेचा समावेश आहे.—गलतीकर ४:२६, २७.

९. (अ) ‘तुझी मुले यहोवाकडून शिक्षण पावतील’ असे येशूने म्हटले तेव्हा तो कोणाचा उल्लेख करत होता? (ब) लोक कोणत्या आधारावर देवाची आध्यात्मिक मुले बनतात?

९ यास्तव, येशूने कफर्णहूमाच्या सभास्थानामध्ये यशयाचा भविष्यवाद उद्धृत करून “ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील,” असे म्हटले तेव्हा तो, देवाची पत्नीसमान स्वर्गीय संघटना, “वर असलेली यरुशलेम” हिच्या भावी ‘मुलांबद्दल’ बोलत होता. स्वर्गातून उतरलेला देवाचा प्रतिनिधी, येशू ख्रिस्त, याच्या शिकवणींचा स्वीकार करून त्या यहुदी श्रोत्यांना देवाच्या पूर्वी वांझ असलेल्या स्त्रीची मुले होऊन “पवित्र राष्ट्र,” ‘देवाचा आध्यात्मिक इस्राएल’ बनता येत होते. (१ पेत्र २:९, १०; गलतीकर ६:१६) येशूने देवाचे आध्यात्मिक पुत्र बनण्याची जी भव्य संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दलचे वर्णन करताना प्रेषित योहानाने लिहिले: “जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.”—योहान १:११, १२.

यहोवाचे महत्त्वपूर्ण शिक्षण

१०. एदेनमध्ये बंड घडल्यावर लगेच यहोवाने ‘संततीबद्दल’ काय शिकवले आणि ही संतती कोण असल्याचे शाबीत झाले?

१० यहोवा, प्रेमळ पिता या नात्याने त्याच्या मुलांना त्याचे उद्देश कळवतो. या कारणामुळेच, जेव्हा एका बंडखोर दूताने पहिल्या मानवी जोडप्याला आज्ञाभंग करण्यासाठी चिथावले, तेव्हा यहोवाने लगेचच, या पृथ्वीला परादीस बनवण्याचा उद्देश पूर्ण करण्याकरता तो काय करणार आहे त्याबद्दलची सूचना दिली. त्याने म्हटले, “जुनाट साप,” दियाबल सैतान आणि “स्त्री” यांच्यामध्ये तो वैर स्थापन करणार होता. या स्त्रीची “संतति” प्राणघातक हल्ला करून सैतानाचे “डोके” फोडील असे त्याने यानंतर स्पष्ट केले. (उत्पत्ति ३:१-६, १५; प्रकटीकरण १२:९; २०:९, १०) ती स्त्री—नंतर ओळख देण्यात आलेली “वर असलेली यरुशलेम”—देवाची आत्मिक प्राण्यांची स्वर्गीय संघटना आहे हे आपण पाहिले आहेच. पण तिची “संतति” कोण आहे? तो देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त, स्वर्गातून पाठवलेला आहे व तोच सरतेशेवटी सैतानाला नष्ट करणार आहे.—गलतीकर ४:४; इब्रीयांस २:१४; १ योहान ३:८.

११, १२. यहोवाने ‘संततीबद्दलच्या’ महत्त्वपूर्ण शिक्षणाचा कसा विस्तार केला?

११ ‘संततीबद्दलच्या’ या महत्त्वपूर्ण शिक्षणाचा अधिक विस्तार, यहोवाने अब्राहामाला हे अभिवचन देताना या प्रकारे केला: “मी . . . वृद्धिच वृद्धि करून तुझी संतति आकाशातील ताऱ्‍यांइतकी . . . होईल असे करीन . . . पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्याद्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१७, १८) अब्राहामाची अभिवचन देण्यात आलेली “संतति” येशू ख्रिस्त आहे, पण इतर देखील या संतानाचा भाग बनतील याचे स्पष्टीकरण करण्यासाठी यहोवाने प्रेषित पौलाचा उपयोग केला. पौलाने लिहिले, “तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहा.”—गलतीकर ३:१६, २९.

१२ ते संतान, ख्रिस्त, यहुदाच्या बादशाही वंशातून येईल व ‘राष्ट्रे त्याच्या आज्ञांकित होतील,’ असे यहोवाने देखील प्रकट केले. (उत्पत्ति ४९:१०) यहुदा वंशाच्या दावीद राजाच्या बाबतीत यहोवाने अभिवचन दिले: “त्याची संतति सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करीन. त्याची संतति सर्वकाळ राहील व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.” (स्तोत्र ८९:३, ४, २९, ३६) गाब्रिएल देवदूताने येशूच्या जन्माची घोषणा केली तेव्हा त्याने ते मूल देवाचा नियुक्‍त शास्ता, दावीदाचे संतान होते असे म्हटले. “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील,” असे गाब्रिएल म्हणाला, व त्याने पुढे म्हटले, “आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; . . . व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”—लूक १:३२, ३३; यशया ९:६, ७; दानीएल ७:१३, १४.

१३. यहोवाचे आशीर्वाद मिळवण्याकरता आपण त्याच्या शिक्षणाला कसा प्रतिसाद दाखवला पाहिजे?

१३ आपल्याला यहोवाचे आशीर्वाद मिळवावयाचे आहेत, तर देवाच्या राज्याचे हे महत्त्वाचे शिक्षण जाणून घेऊन त्यानुरूप हालचाल केली पाहिजे. येशू स्वर्गातून खाली आला होता, तो देवाचा नियुक्‍त राजा आहे—पृथ्वीवर परादीसची पुनर्स्थापना होत आहे याची देखरेख ठेवणारे बादशाही संतान आहे—आणि तो मृतांचे पुनरुत्थान करील असा आपण विश्‍वास ठेवला पाहिजे. (लूक २३:४२, ४३; योहान १८:३३-३७) कफर्णहूममध्ये येशू मृतांच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला तेव्हा तो खरे बोलत होता हे यहुद्यांच्या ध्यानात यावयास हवे होते. एवढेच काय, केवळ काही आठवड्यांआधी, बहुधा कफर्णहूम येथेच त्याने सभास्थानाच्या अध्यक्षीय अधिकाऱ्‍याच्या १२ वर्षाच्या मुलीचे प्रत्यक्ष पुनरुत्थान केले होते! (लूक ८:४९-५६) खरेच, यहोवाच्या राज्याबद्दल आशेची प्रेरणा देणाऱ्‍या शिक्षणावर विश्‍वास ठेवण्याजोगे व त्याच्या सुसंगतेत वागण्याजोगे आपल्याजवळ देखील पुरेसे कारण आहे!

१४, १५. (अ) येशूला यहोवाचे राज्य केवढे महत्त्वपूर्ण वाटते? (ब) यहोवाच्या राज्याबद्दल आपण स्वतः समजले पाहिजे व आपल्याला त्याचे स्पष्टीकरण देता आले पाहिजे असे काय आहे?

१४ येशूने स्वतःचे पार्थिव जीवन यहोवाच्या राज्याबद्दलचे शिक्षण देण्याच्या कार्यास्तव समर्पित केले. त्याला त्याने त्याच्या सेवकपणाचा विषय बनवले शिवाय आपल्या अनुयायांना त्याकरता प्रार्थना करण्यासाठीही सांगितले. (मत्तय ६:९, १०; लूक ४:४३) स्वाभाविक यहुदी “राज्याचे पुत्र” बनण्याच्या मार्गावर होते, परंतु विश्‍वासाच्या उणीवेमुळे बहुतेकांनी तो विशेषाधिकार गमावला. (मत्तय ८:१२; २१:४३) केवळ ‘लहान कळपाला’ “राज्याचे पुत्र” होण्याचा विशेषाधिकार मिळतो हे येशूने प्रकटविले. हे “पुत्र” त्याच्या स्वर्गीय राज्यात “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” होतात.—लूक १२:३२; मत्तय १३:३८; रोमकर ८:१४-१७; याकोब २:५.

१५ पृथ्वीवर राज्य करण्यासाठी ख्रिस्त राज्याच्या किती वारसदारांना स्वर्गात घेईल? बायबलनुसार केवळ १,४४,०००. (योहान १४:२, ३; २ तीमथ्य २:१२; प्रकटीकरण ५:१०; १४:१-३; २०:४) तथापि, आपल्याला “दुसरी मेंढरे” आहेत असे येशूने म्हटले; ती राज्याच्या अंमलाखाली त्याची पार्थिव प्रजा होतील. हे परादीस पृथ्वीवर सदासर्वकाळ परिपूर्ण आरोग्य व शांती अनुभवतील. (योहान १०:१६; स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३, ४) राज्याबद्दल यहोवाचे शिक्षण स्वतः समजून त्याची स्पष्टता आपल्याला करता आली पाहिजे.

१६. यहोवाचे कोणते महत्त्वपूर्ण शिक्षण आपण शिकून घेण्याची व ते अनुसरण्याची गरज आहे?

१६ प्रेषित पौलाने यहोवाच्या आणखी एका महत्त्वपूर्ण शिक्षणाची ओळख करून दिली. त्याने म्हटले: “एकमेकांवर प्रीति करावी, असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे.” (१ थेस्सलनीकाकर ४:९) यहोवाला संतुष्ट करण्याकरता आपण हे प्रेम दाखवले पाहिजे. “देव प्रीति आहे,” असे बायबल म्हणते आणि आपण प्रेम दाखवण्याचे त्याचे उदाहरण अनुसरले पाहिजे. (१ योहान ४:८; इफिसकर ५:१, २) ही दुःखाची गोष्ट आहे की, देव आपल्याला आपल्या सहमानवांवर प्रीती दाखवण्याचे जे शिक्षण देतो ते शिकून घेण्यात पुष्कळ लोकांनी खूपच अपयश दाखवले. पण आपल्याबद्दल काय? आपण यहोवाच्या या शिक्षणाला प्रतिसाद दिला आहे का?

१७. आपण कोणाच्या प्रवृत्तीचे अनुकरण करावे?

१७ आपण यहोवाचे संपूर्ण शिक्षण स्वीकारणे महत्त्वपूर्ण आहे. आपली मनोवृत्ती ही त्या बायबलच्या स्तोत्रकर्त्यांप्रमाणे असावी, ज्यांनी लिहिले: “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे.” “तुझे नियम मला शिकीव. [चांगुलपणा], विवेक व ज्ञान मला दे . . . तुझे निर्णय मला शिकीव.” (स्तोत्र २५:४, ५; ११९:१२, ६६, १०८) तुमच्या भावना या स्तोत्रकर्त्यांप्रमाणेच असल्या, तर यहोवाकडून शिक्षण मिळालेल्या मोठ्या समूहातील तुम्ही एक असू शकाल.

शिकवलेल्यांचा मोठा लोकसमुदाय

१८. आपल्या काळी काय घडेल असे यशया संदेष्ट्याने भाकीत केले?

१८ आपल्या काळात जे घडणार त्याच्याबद्दल यशया संदेष्ट्याने भाकीत केले: “शेवटल्या दिवसांत असे होईल की परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, . . . लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, ‘चला, आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांस आपले मार्ग शिकवो.’” (यशया २:२, ३, तिरपे वळण आमचे; मीखा ४:२) यहोवाकरवी शिकवलेले हे लोक कोण आहेत?

१९. यहोवाद्वारे शिक्षण प्राप्त होण्यामध्ये आज कोणाचा समावेश होत आहे?

१९ हे, ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणाऱ्‍या लोकांव्यतिरिक्‍त इतरजण आहेत. येशूने त्याला “दुसरी मेंढरे—राज्याची पार्थिव प्रजा—राज्य वारसदारांच्या ‘लहान कळपाशिवाय’ असतील असे म्हटल्याचे आपण आधीच पाहिले आहे. (योहान १०:१६; लूक १२:३२) “मोठ्या संकटातून” बचावणारा “मोठा लोकसमुदाय” हा दुसरी मेंढरे या वर्गाचा भाग आहे व तो येशूने ओतलेल्या रक्‍तावर विश्‍वास ठेवण्यामुळे यहोवासमोर संमतीकारक भूमिकेचा आनंद घेत आहे. (प्रकटीकरण ७:९, १४) यशया ५४:१३ मध्ये सांगण्यात आलेली “मुले” यामध्ये दुसरी मेंढरे थेटपणे समाविष्ट नसली तरी, यहोवापासून शिक्षण प्राप्त केल्याचा त्यांना आशीर्वाद मिळाला आहे. या कारणामुळे ते देवाला ‘पिता’ असे उचितपणे संबोधतात, कारण सरतेशेवटी, तो “सनातन पिता,” येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांचा आजोबा बनेल.—मत्तय ६:९; यशया ९:६.

यहोवा कसे शिकवतो

२०. यहोवा कोणत्या मार्गांनी शिकवतो?

२० यहोवा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो. उदाहरणार्थ, तो हे, त्याच्या अस्तित्वाबद्दल व त्याच्या थोर बुद्धीबद्दल साक्ष देणाऱ्‍या सर्जनशील कार्यांद्वारे शिकवतो. (ईयोब १२:७-९; स्तोत्र १९:१, २; रोमकर १:२०) याखेरीज, तो थेट दळणवळणाद्वारे शिकवतो, जसे त्याने मनुष्य प्रकृतीपूर्वीच्या येशूला शिकवले. याचप्रमाणे, अहवालात लिहिल्यानुसार, तीनदा तो स्वर्गातून पृथ्वीवरील लोकांसोबत थेटपणे बोलला.—मत्तय ३:१७; १७:५; योहान १२:२८.

२१. यहोवाने स्वतःचा प्रतिनिधी म्हणून खासपणे कोणत्या देवदूताला वापरले, पण इतरांनाही त्याने वापरले हे आपल्याला कसे कळते?

२१ यहोवा आपला ज्येष्ठपुत्र “शब्द” याच्यासहित इतर स्वर्गदूतांच्या प्रतिनिधीत्वांचा देखील उपयोग करतो. (योहान १:१-३) यहोवाला त्याचा परिपूर्ण मानवी पुत्र आदाम याच्याशी थेटपणे बोलता आले असते, तरी त्याने त्याच्या वतीने मनुष्य प्रकृतीपूर्वीच्या येशूचा उपयोग केला असावा. (उत्पत्ति २:१६, १७) हाच तो, “देवाचा दूत” असावा जो “इस्राएली सेनेच्या पुढे चालत असे” आणि याच्याच बाबतीत यहोवाने अशी आज्ञा केली: ‘त्याचे म्हणणे ऐका.’ (निर्गम १४:१९; २३:२०, २१) तसेच, यहोशवाला दृढ करण्यासाठी ज्या ‘परमेश्‍वराच्या सेनापतीने’ त्याला दर्शन दिले तो देखील निःसंशये मनुष्य प्रकृतीपूर्वीचा येशू होता. (यहोशवा ५:१४, १५) यहोवा शिक्षण देण्याकरता इतर देवदूतांचा देखील उपयोग करतो, जसे त्याने मोशेच्याबाबतीत त्याचे नियमशास्त्र देण्याकरता वापरले होते.—निर्गम २०:१; गलतीकर ३:१९; इब्रीयांस २:२, ३.

२२. (अ) यहोवाने शिकवण्यासाठी पृथ्वीवरील कोणाचा वापर केला? (ब) यहोवा आज मानवांना प्रामुख्यत्वे कोणत्या माध्यमाद्वारे शिक्षण देतो?

२२ याशिवाय, यहोवा देव शिक्षण देण्याकरता मानवी प्रतिनिधींना वापरतो. इस्राएलातील पालकांनी आपल्या मुलांना शिकवायचे होते; संदेष्टे, याजक, राजपुत्र व लेव्यांनी राष्ट्राला यहोवाचे नियमशास्त्र शिकवले. (अनुवाद ११:१८-२१; १ शमुवेल १२:२०-२५; २ इतिहास १७:७-९) येशू पृथ्वीवर देवाचा प्रधान प्रवक्‍ता होता. (इब्रीयांस १:१, २) येशूने नेहमी म्हटले की, तो जे शिकवत होता ते वस्तुतः त्याच्या पित्याकडून त्याने जे शिकून घेतले होते तेच होते; परिणामतः त्याचे श्रोते जणू यहोवाकडून शिकवले जात होते. (योहान ७:१६; ८:२८; १२:४९; १४:९, १०) यहोवाने आपली वचने लिहून ठेवली होती आणि आज तो मानवांना प्रामुख्यत्वे या प्रेरित शास्त्रवचनांतून शिकवतो.—रोमकर १५:४; २ तीमथ्य ३:१६.

२३. पुढील लेखात कोणत्या प्रश्‍नांवर विचार केला जाईल?

२३ ‘शेवटल्या दिवसांत [आपण राहत आहोत त्या काळात] पुष्कळ लोकांना यहोवाच्या मार्गाचे शिक्षण मिळेल,’ असे अभिवचन शास्त्रवचने देत असल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण काळात जगत आहोत. (यशया २:२, ३) हे शिक्षण कसे दिले जाते? सध्या प्रगतीपथावर असलेल्या यहोवाच्या भव्य शैक्षणिक कार्यक्रमाचा लाभ मिळवण्याकरता तसेच त्यात सहभागी होण्याकरता आपण काय केले पाहिजे? अशा प्रश्‍नांचा आपण पुढील लेखात विचार करणार आहोत.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ यहोवा पिता, शिक्षक व पती कसा बनला?

◻ यहोवा ‘संततीबद्दल’ काय शिकवतो?

◻ देवाने दिलेले कोणते महत्त्वपूर्ण शिक्षण आपण पालन करण्यास हवे?

◻ यहोवा कसे शिकवतो?

[१० पानांवरील चित्रं]

याईराच्या मुलीचे पुनरुत्थान केल्यामुळे येशूने पुनरुत्थानाबद्दल दिलेल्या अभिवचनावर विश्‍वास ठेवण्यास आधार मिळाला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा