आमचा समृद्ध आध्यात्मिक वारसा
फिलिप्प एफ. स्मिथ यांच्याद्वारे निवेदित
“अंधःकारमय आफ्रिकेत सर्वत्र प्रकाशू शकेल असा दिवा लावण्यात आला आहे.” यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९२ च्या वार्षिक अहवाल पुस्तकात पृष्ठ ७५ वर वरील वाक्य वाचताना आम्हाला किती आनंद वाटला! हे शब्द आमचे आजोबा फ्रँक डब्ल्यू. स्मिथ यांनी त्या काळातील वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष बंधू जोसेफ एफ. रदरफोर्ड यांना १९३१ मध्ये एका पत्रात लिहिले होते. आजोबांनी, त्यांचा व त्यांच्या धाकट्या बंधूने केलेल्या प्रचार यात्रेचा अहवाल कळविण्यासाठी ते लिहिले होते.
या १९९२ च्या वार्षिक पुस्तकाने स्पष्ट केले: “ग्रे स्मिथ व त्यांचे थोरले बंधू फ्रँक, हे केप टाऊनचे [दक्षिण अमेरिका] दोन धैर्यवान पायनियर सेवक ब्रिटिश पूर्व आफ्रिकेकडे सुवार्तेचा प्रचार करण्याची शक्यता आहे काय ते शोधण्यासाठी निघाले. त्यांनी डी सोटो या कारचे रूपांतर काफल्यात (हाऊस कारमध्ये) केले व तिला पुस्तकांच्या ४० खोक्यांसहित जहाजावर चढवले व ते केनियाचे बंदर मोम्बासाकडे निघाले.”
ब्रदर रदरफोर्ड यांना लिहिलेल्या पत्रात आजोबांनी मोम्बासा ते केनियाची राजधानी नैरोबी येथपर्यंत करण्यात आलेल्या प्रवासाचे वर्णन केले: “आम्ही अत्यंत भयानक स्वप्नासारखा आमचा मोटारीचा प्रवास आरंभिला; असा प्रवास मी कधीही केला नव्हता. आम्हाला ५८० किलोमीटरचा पल्ला गाठण्यास तब्बल चार दिवस लागले . . . मैलामैलागणिक मला फावडे घेऊन बाहेर यावे लागले; उंचवटे सपाट करावे लागले, खड्डे बुजवावे लागले, उसाप्रमाणे दिसणारे गवत काढावे लागले आणि मोटारीच्या चाकांना पकड मिळावी म्हणून दलदलीत झाडपाला भरावा लागला.”
नैरोबीमध्ये आल्यावर, फ्रँक व ग्रे यांनी बायबल साहित्य वितरित करण्यासाठी सलग २१ दिवस काम केले. आजोबांनी लिहिले: “विविध अहवालांनुसार, साक्षकार्याने नैरोबीच्या धार्मिक लोकांत मोठी गडबड निर्माण केली.” यानंतर आजोबांना घरी त्यांच्या दोन वर्षांच्या डॉनवन या मुलाकडे तसेच त्यांची पत्नी फिलस हिजकडे परतण्याची उत्सुकता लागली. ती तेव्हा त्यांचा दुसरा मुलगा फ्रँक, म्हणजेच आमचे वडील, यांना जन्म देण्याच्या बेतात होती. आजोबा मोम्बासामधून पहिल्या जहाजाने निघाले खरे, पण घरी पोहंचण्याच्या आतच त्यांना मलेरियाने पछाडले व त्यात ते वारले.
मी, माझी थोरली बहीण व धाकटा भाऊ वार्षिक अहवाल पुस्तकातील त्या अहवालावर मनन करू लागलो तेव्हा आमचे मन आमच्या प्रिय वडिलांकडे वळाले. १९९२ चे वार्षिक पुस्तक मिळण्याच्या काही महिन्यांआधी १९९१ मध्ये त्यांना हृदय शस्त्रक्रियेतील समस्यांमुळे मृत्यू आला. त्यांना त्यांच्या वडिलांना कधीच भेटता आले नव्हते तरी त्यांनी यहोवाबद्दल सखोल प्रीती दाखवण्यात त्यांच्या वडिलांचा कित्ता गिरवला होता. साधारण २८ वर्षानंतर आपला मुलगा १९५९ मध्ये पूर्व आफ्रिकेकडे ख्रिस्ती सेवक या नात्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जाणार हे जाणून आजोबांना किती आनंद झाला असता!
वडिलांचे आरंभीचे जीवन
आमच्या वडिलांचा जन्म जुलै २०, १९३१ रोजी केप टाऊन येथे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या दोन महिन्यानंतर झाला; त्यांना त्यांचेच नाव दिले गेले. आरंभापासूनच वडिलांनी यहोवावर प्रेम दाखवले. केवळ नऊ वर्षाचे असताना ते केप टाऊनच्या मुख्य रेल्वे स्थानकावर संदेश लिहिलेला मोठा पुठ्ठा गळ्यात अडकवून साक्षकार्य करू लागले तेव्हा त्यांच्या वर्गमित्रांनी त्यांची थट्टा केली. अकराव्या वर्षी त्यांनी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आपले समर्पण चिन्हांकित केले. कधी कधी वडिलांना एकट्यानेच सबंध रस्त्यावर साक्षकार्य करण्याची नेमणूक मिळे. ते १८ वर्षांचे होईपर्यंत केप टाऊनच्या उपनगरात वृद्ध ख्रिस्ती बहिणींच्या एका गटासोबत टेहळणी बुरूज अभ्यास चालवीत होते.
वॉचटावर संस्थेने, पुढील वर्षी युरोपात आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवली जाणार आहेत असे १९५४ मध्ये घोषित केले. वडिलांना तेथे जाण्याची खूपच इच्छा होती, पण केप टाऊन येथून तेथे जाण्याइतके पुरेसे पैसे त्यांच्यापाशी नव्हते. तेव्हा त्यांनी उत्तर ऱ्होडेशियातील (सध्याचे झांबिया) तांब्याच्या खाणींमध्ये केमिस्ट म्हणून तीन महिने काम करण्याचे कंत्राट घेतले. अशुद्ध धातूची पारख करण्याच्या सुविधा आफ्रिकन जंगलात होत्या.
उत्तर ऱ्होडेशिया येथे खूप आफ्रिकन साक्षीदार असल्याचे वडिलांना माहीत होते, त्यामुळे तेथे पोहंचल्यावर त्यांनी त्यांना शोधून काढले व त्यांच्या सभा कोठे होतात ते जाणून घेतले. त्यांना स्थानिक भाषा बोलता येत नव्हती तरीसुद्धा ते त्यांच्याशी सहवास ठेवून असत आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या माईन मंडळीच्या सभांना नियमित जात. खाणीत काम करणारे युरोपियन लोक जातीभेद मानत होते व ते आफ्रिकन लोकांना शाब्दिक शिव्याशाप देऊन हा कलुषितपणा दाखवत असत. परंतु आमचे वडील नेहमीच दयाळू होते.
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर साक्षीदार नसलेला एक आफ्रिकन कामगार वडिलांकडे आला व त्याने विचारले: “आम्ही तुम्हाला कोण म्हणून संबोधतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?” त्या माणसाने स्मित केले व म्हटले: “आम्ही तुम्हाला ब्वाना [मिस्टर] वॉचटावर असे म्हणतो.”
वडील १९५५ मध्ये युरोपातील “विजयी राज्य” संमेलनांना उपस्थित राहू शकले. तेथे त्यांना मेरी जॉहॉरीऊ भेटली, जी पुढील वर्षी त्यांची पत्नी झाली. त्यांच्या विवाहानंतर ते अमेरिकेत पर्मा, ओहायो येथे राहू लागले.
पूर्व आफ्रिकेकडे
अमेरिकेतील एका प्रांतीय अधिवेशनात उपस्थितांना, जेथे सेवकांची गरज अधिक होती तेथे जाऊन कार्य करण्याचे निमंत्रण देण्यात आले. आमच्या पालकांनी पूर्व आफ्रिकेकडे जाण्याचे ठरवले. वॉचटावर संस्थेने सुचवल्याप्रमाणेच त्यांनी केले. त्यांनी परतीच्या प्रवासाच्या तिकिटाला लागणारे पुरेसे पैसे जमवले; ते अशासाठी की, जर वडिलांना काम मिळाले नाही तर परतण्याची अडचण येऊ नये कारण त्या क्षेत्रात ज्यांच्याकडे कामाचा परवाना होता अशांनाच राहण्याची परवानगी मिळत असे.
पासपोर्ट, विसा व रोगप्रतिबंधक लस टोचून घेतल्यावर जुलै १९५९ मध्ये आईवडील व्यापारी जहाजाने न्यूयॉर्कपासून केप टाऊन द्वारे मोम्बासा येथे गेले. एकंदर प्रवास चार आठवड्यांचा होता. मोम्बासा येथे गोदीवर ख्रिस्ती बांधवांनी त्यांचे उबदार स्वागत केले. ते गरज होती तेथे कार्य करण्यासाठी आधी आले होते. ते नैरोबी येथे आल्यावर वडिलांना त्यांच्यासाठी एक पत्र आलेले दिसले. ते युगांडाच्या एन्टेबीमधील जिऑलॉजिकल सर्वे खात्याकडून आले होते. त्यात केमिस्टच्या जागेसाठी त्यांनी केलेल्या अर्जाचे उत्तर होते. आईवडिलांनी युगांडामधील कॅम्पालाकडे जाणारी गाडी धरली; तेथे वडिलांची मुलाखत घेण्यात आली व त्यांना कामावर ठेवले गेले. तेव्हा, एन्टेबी-कॅम्पाला विभागात केवळ एकच साक्षीदार होता व त्याचे नाव जॉर्ज कॅडू हे होते.
लुगांदा ही स्थानिक भाषा शिकण्याकरता वसाहतीच्या सरकारने वडिलांना खर्च दिला. त्यांना आनंद झाला, कारण सेवकपणात अधिक प्रभावी व्हावे म्हणून त्यांनी ती भाषा शिकण्याची योजना केली होती. नंतर वडिलांनी “राज्याची ही सुवार्ता” ह्या पुस्तिकेचे लुगांदा भाषेत भाषांतर करण्याची मदत देखील दिली.
वडील इतरांना साक्ष देण्यात मोठे निर्भीड होते. ते खात्यातील सर्व युरोपियन लोकांसोबत बोलले आणि युगांडाच्या लोकांत त्यांनी प्रचारामध्ये नियमित सहभागिता घेतली. त्यांनी युगांडाच्या आफ्रिकन महान्यायप्रतिनिधींना देखील साक्ष दिली. या गृहस्थाने केवळ राज्य संदेशच ऐकला नाही, तर आईवडिलांना घरी जेवायला देखील बोलावले.
माझी थोरली बहीण ॲन्थी हिचा जन्म १९६० मध्ये झाला व मी १९६५ मध्ये जन्मलो. आमचे कुटुंब कम्पाला या राजधानीच्या शहरातील लहान पण वाढत्या मंडळीतील बंधूभगिनींशी मिळून राहू लागले. एन्टेबीच्या जवळपास गोऱ्या साक्षीदारांपैकी एकच असल्यामुळे आम्हाला मोठे मनोरंजक अनुभव आले. एकदा वडिलांचे एक मित्र अनपेक्षितपणे एन्टेबी येथे आले व त्यांनी वडिलांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी “येथे यहोवाचे साक्षीदार असणारे कोणी युरोपियन जोडपे तुम्हाला माहीत आहे का” अशी विचारणा करीपर्यंत त्यांना पत्ता शोधून काढण्यात यश मिळू शकले नाही. त्या व्यक्तीने त्या मित्राला सरळ आईवडिलांच्या घरीच आणून सोडले.
आम्हाला काही कठीण अनुभव सुद्धा आले, ज्यात दोन शस्त्रसिद्ध क्रांत्यांमधून जावे लागले. एके काळी, सरकारी तुकडी एखाद्या विशिष्ट वंशाच्या गटाचा कोणी दिसला की लगेच गोळीबार करीत असे. रात्रंदिवस नुसता गोळीबार चाले. संध्याकाळी ६ पासून ते सकाळ ६ पर्यंत संचारबंदी असल्यामुळे दुपारी माझ्या पालकांच्या घरी एन्टेबी येथे सभा घेतल्या जात.
नंतर संचारबंदी उठवल्यावर वडील आम्हाला कॅम्पाला येथे टेहळणी बुरूज अभ्यासाला घेऊन गेले. एका सैनिकाने आम्हावर बंदूक रोखली व आमची गाडी थांबवली आणि आम्ही कोठे जात आहोत ते विचारले. मी तर तेव्हा केवळ लहान बाळ होतो व ॲन्थी पाच वर्षांची होती. जेव्हा वडिलांनी शांतपणे स्पष्टीकरण दिले व आमचे बायबल व साहित्य दाखवले तेव्हा त्याने आम्हाला जाऊ दिले.
युगांडामध्ये साधारण आठ वर्षे राहिल्यावर १९६७ मध्ये आमच्या पालकांनी आरोग्य समस्या व कुटुंबाच्या जबाबदारीमुळे अमेरिकेला परतण्याचे ठरवले. आम्ही कॅनफील्ड, ओहायो मंडळीचे सदस्य झालो, तेथे वडिलांनी मंडळीतील वडील म्हणून सेवा केली. आमच्या पालकांना कम्पालाच्या लहान मंडळीबद्दल जसे प्रेम वाटत होते तसेच येथेही बांधवांबद्दल प्रेम वाटू लागले.
प्रेमळ ख्रिस्ती संगोपन
माझा धाकटा भाऊ डेव्हिड १९७१ मध्ये जन्मला. आमची वाढ होत असताना आमचे संगोपन प्रीतीने भरलेल्या व उबदार वातावरणात झाले. हा परिणाम आमचे पालक एकमेकांसोबत जे प्रेमळ नाते राखून होते त्यातून घडला यात काही संशय नाही.
आम्ही लहान होतो तेव्हा आमचे वडील रात्री झोपण्याच्या वेळी आम्हाला बायबलची एक गोष्ट वाचून दाखवत, प्रार्थना करत व आईच्या नकळत सोनेरी वेष्टन असलेले एक चॉकलेट देत असत. आम्ही कोठेही असलो तरी टेहळणी बुरूज अभ्यास कुटुंब मिळूनच करीत होतो. आम्ही सुटीवर असताना एकदा डोंगरावर बसून तर दुसऱ्या प्रसंगी समुद्र न्याहाळत आम्ही अभ्यास केला. ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे दिवस असत असे वडील नेहमी म्हणायचे. ते म्हणत की, कौटुंबिकरित्या अभ्यास केल्यामुळे मिळणाऱ्या आनंदास मुकणाऱ्या लोकांबद्दल त्यांना वाईट वाटत असे.
यहोवावर प्रीती दाखवण्यासंबंधाने वडिलांनी उदाहरणाद्वारे शिकवले. जेव्हा जेव्हा टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! नियतकालिकांचे नवे अंक येत किंवा नवे वॉचटावर प्रकाशन मिळत, तेव्हा वडील प्रकाशनांचे तर पूर्ण वाचन करायचे. बायबलचे सत्य आम्ही कधीही कमी मोलाचे समजू नये तर त्याची मोलवान ठेव्याप्रमाणे कदर केली पाहिजे हे आम्ही वडिलांपासून शिकलो. आमचा एक मोलवान ठेवा म्हणजे वडिलांचे रेफरन्स बायबल होय. त्यामध्ये अभ्यासातून शिकलेल्या गोष्टींची नोंद प्रत्येक पानावर केलेली आढळते. जेव्हा समासातील त्यांच्या नोंदीचे आम्ही वाचन करतो तेव्हा आम्हाला जणू ते अद्याप शिकवत व सूचना देत असल्याचा भास होतो.
शेवटपर्यंत विश्वासू
मे १६, १९९१ मध्ये प्रचारकार्यात असताना वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. काही आठवड्यांनंतर त्यांची हृदयाची खुली शस्त्रक्रिया झाली व ती यशस्वीरित्या पार पडल्याचे दिसले. तथापि, शस्त्रक्रियेनंतरच्या रात्री आम्हाला इस्पितळामधून फोन आला. वडिलांना रक्तस्त्राव होत होता व डॉक्टरांना चिंता वाटत होती. रक्तस्त्राव थांबावा म्हणून त्यांना पुन्हा शस्त्रक्रियेकरता दोनदा नेण्यात आले, पण त्यात यश मिळू शकले नाही. वडिलांचे रक्त साखळत नव्हते.
दुसऱ्या दिवशी वडिलांची प्रकृती चिंताजनक होत असता डॉक्टरांनी प्रथम आईला व नंतर धाकट्या भावाला बाजूला घेऊन वडिलांना रक्त संक्रमण करण्याची संमती द्यावी म्हणून त्यांच्यावर दबाव आणला. तरीपण, वडिलांनी पूर्वीच डॉक्टरांना सांगून ठेवले होते की ते कोणत्याही परिस्थितीत रक्त संक्रमण घेणार नाहीत. रक्त नाकारण्याबद्दलच्या शास्त्रवचनीय कारणांचे स्पष्टीकरण त्यांनी त्यांना दिले होते, पण रक्तहीन पर्यायांना स्वीकारण्यास काहीही हरकत नाही असे ते म्हणाले होते.—लेवीय १७:१३, १४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.
तेव्हा वैद्यकीय वर्तुळाच्या बऱ्याच सदस्यांच्या अंतःस्थ द्वेषामुळे अत्यंत संतप्त वातावरण निर्माण केले. हे तसेच, वडिलांची खालावत चाललेली प्रकृती यामुळे कधीकधी आम्ही अवाजवी परिस्थिती सहन करीत आहोत असे वाटू लागले. आम्ही यहोवाकडे मदतीकरता प्रार्थना केली आणि आम्हाला देण्यात आलेल्या व्यावहारिक सल्ल्यांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. या कारणामुळे, आम्ही अतिदक्षता विभागात जात होतो तेव्हा चांगला पेहराव घालत होतो व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी आदरभावाने वागत होतो. आम्ही अर्थभरीत प्रश्न विचारून आमच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल सक्रिय आस्था घेतली आणि वडिलांची काळजी घेण्यात गोवलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
आमचे प्रयत्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. काही दिवसातच तप्त वातावरणाचे दयावंत परिस्थितीत रूपांतर झाले. काही परिचारिका ज्या पूर्वी वडिलांची काळजी घेत, त्यांना तेथे काम देण्यात आले नव्हते तरी त्या येऊन वडिलांची प्रकृती विचारीत. एक डॉक्टर पूर्वी आमच्याबरोबर खूप उद्धटपणे वागत होते, पण तेच इतके मवाळ बनले की, त्यांनी येऊन आईची विचारपूस देखील केली. आमची मंडळी व नातेवाईकांनी देखील आम्हाला प्रेमळ आधार दिला. त्यांनी जेवण व सांत्वनपर कार्ड पाठवले व आम्हाखातर प्रार्थना केली.
तथापि, वडिलांनी उपचाराला योग्य प्रतिसाद दिला नाही हे वाईट घडले. आधीच्या शस्त्रक्रियेनंतर दहा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला वडिलांबद्दल मनापासून दुःख वाटते. कधी कधी तर वडील गेल्याची भावना खूपच भारावून सोडते. तथापि, आमच्या देवाचे अभिवचन आहे की, तो ‘प्रतिदिनी आमचा भार’ वाहील आणि आम्ही पूर्वी नव्हतो तितक्या अधिकपणे त्याच्यावर विसंबून राहण्यास शिकलो.—स्तोत्र ६८:१९.
यहोवाची सेवा विश्वासूपणे करीत राहण्याचा आमचा सर्वांचा निर्धार आहे म्हणजे आम्हाला नव्या जगात वडिलांना पुन्हा पाहण्याचा आनंद मिळू शकेल.—मार्क ५:४१, ४२; योहान ५:२८; प्रेषितांची कृत्ये २४:१५.
[२१ पानांवरील चित्रं]
केप टाऊनमध्ये फ्रँक स्मिथ त्याची आई फिलस हिजबरोबर
[२२ पानांवरील चित्रं]
आईवडील त्यांच्या विवाहाच्या वेळी
[२३ पानांवरील चित्रं]
एन्टेबमधील पहिल्या बाप्तिस्म्यासाठी बांधवांनी एका आफ्रिकन प्रमुखाचा तलाव भाड्याने घेतला
सांप्रदायिक पद्धतीने अभिवादन करणे
[२४ पानांवरील चित्रं]
वडिलांचा मृत्यू होण्याच्या थोड्या आधी, आईवडिलांचा फोटो