देवाच्या आरंभीच्या सेवकांमध्ये स्त्रियांची प्रतिष्ठित भूमिका
“परमेश्वर [यहोवा, NW] देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” —उत्पत्ति २:१८.
१. एक बायबल शब्दकोश, प्राचीन काळातील स्त्रियांच्या परिस्थितीचे वर्णन कसे करतो?
“आधुनिक पाश्चिमात्य समाजात स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे ते प्राचीन भूमध्य किंवा जवळच्या पौर्वात्य देशांमध्ये कधीही दिले जात नव्हते. दास, मान्यवर पौरांच्या आणि लहान मुले प्रौढांच्या अधीन होते त्याप्रमाणे स्त्रियांनी पुरुषांच्या अधीन असण्याची सर्वसामान्य रीत होती. . . . मुलांना मुलींपेक्षा अधिक महत्त्व दिले जात असे आणि लहान मुलींना तीव्र हवामानात मरावयास सोडून दिले जात असे.” एक बायबल शब्दकोश प्राचीन काळातील स्त्रियांच्या जीवनाच्या परिस्थितीबद्दल असे वर्णन करतो.
२, ३. (अ) एका अहवालाप्रमाणे, आज पुष्कळ स्त्रियांची काय परिस्थिती आहे? (ब) कोणते प्रश्न उद्भवतात?
२ जगाच्या पुष्कळ भागांमध्ये आज परिस्थिती चांगली नाही. सन १९९४ मध्ये, अमेरिका सरकारी खात्याच्या मानवी हक्कांच्या वार्षिक अहवालाने पहिल्यांदाच स्त्रियांना देण्यात येणाऱ्या वागणुकीकडे लक्ष वेधले. “दररोजचा भेद एक वास्तविकता आहे असे १९३ च्या राष्ट्रांची माहिती दाखवते,” असे न्यूयॉर्क टाईम्सच्या मथळ्याने त्या अहवालाविषयी म्हटले.
३ जगभरात, विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या पुष्कळ स्त्रिया यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांशी सहवास राखत असल्यामुळे, काही प्रश्न उद्भवतात: येथे वर्णिलेली वागणूक देवाने मूलतः स्त्रियांसाठी उद्देशली होती त्या प्रकारची आहे का? बायबल काळात यहोवाच्या उपासकांमधील स्त्रियांना कशी वागणूक देण्यात येत असे? तसेच, आज स्त्रियांना कशी वागणूक देण्यात यावी?
“साहाय्यक” आणि ‘अनुरूप व्यक्ती’
४. पहिला मनुष्य एदेन बागेत काही वेळ एकटाच राहिल्यानंतर, यहोवाने कोणते निरीक्षण केले, आणि मग देवाने काय केले?
४ एदेन बागेत आदाम काही काळापर्यंत एकटा राहिल्यावर, यहोवाने निरीक्षिले: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” (उत्पत्ति २:१८) आदाम परिपूर्ण पुरुष असला, तरी निर्माणकर्त्याच्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी आणखी कशाची तरी गरज होती. ती गरज पूर्ण करण्यासाठी, यहोवाने स्त्रीला निर्माण केले व त्यांचा पहिला विवाह केला.—उत्पत्ति २:२१-२४.
५. (अ) बायबल लेखकांनी “साहाय्यक” असे दिलेले इब्री नाम बहुधा कसे वापरले आहे? (ब) यहोवाने पहिल्या स्त्रीला ‘अनुरूप व्यक्ती’ असे सूचित केलेल्या वस्तुस्थितीवरून काय दाखवले जाते?
५ “साहाय्यक” आणि ‘अनुरूप व्यक्ती’ हे शब्द, स्त्रीची देवाने नेमलेली भूमिका कमीपणाची होती असे दर्शवतात का? अगदी याच्या उलट. बायबलचे लेखक बहुतेक वेळा “साहाय्यक” असे दिलेले (एʹजेर) हे इब्री नाम देवाकरता लागू करतात. उदाहरणार्थ, यहोवा “आमचे साहाय्य व ढाल” आहे. (स्तोत्र ३३:२०; निर्गम १८:४; अनुवाद ३३:७) होशेय १३:९ मध्ये यहोवा स्वतःला इस्राएलचा “साहाय्यकर्ता” असे म्हणतो. ‘अनुरूप व्यक्ती’ असे भाषांतरीत केलेल्या (नेʹगेध) या इब्री शब्दाच्या बाबतीत, बायबलचा एक विद्वान असे स्पष्टीकरण देतो: “अपेक्षिलेले साहाय्य त्याच्या दैनिक कार्यात किंवा मुले होऊ देण्यासाठी दिलेली केवळ मदतच नव्हे, . . . तर साहचर्याने पुरवलेला आपसातील पाठिंबा आहे.”
६. स्त्रीची निर्मिती केल्यावर, काय म्हटले गेले आणि का बरे?
६ यास्तव, यहोवा स्त्रीचे वर्णन “साहाय्यक” आणि ‘अनुरूप व्यक्ती’ असे करतो त्यात काहीच कमीपणाचे नाही. स्त्रीला स्वतःची वेगळीच मानसिक, भावनिक व शारीरिक घडण होती. ती पुरुषासाठी योग्य अशी पुरक व समाधानकारक अनुरूप व्यक्ती होती. प्रत्येक जण भिन्न होता, परंतु निर्माणकर्त्याच्या उद्देशानुरूप ‘पृथ्वी व्यापून टाकण्यासाठी’ प्रत्येकाची गरज होती. स्पष्टतः, स्त्री व पुरुष या दोघांची निर्मिती केल्यावरच, “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्पत्ति १:२८, ३१.
७, ८. (अ) एदेन बागेत पापाची सुरवात झाल्यावर, स्त्रीच्या भूमिकेवर परिणाम कसा होणार होता? (ब) यहोवाच्या उपासकांपैकी, उत्पत्ति ३:१६ च्या पूर्णतेविषयी कोणते प्रश्न उद्भवतात?
७ पाप घडल्यावर, पुरुष व स्त्रीच्या परिस्थितीत बदल घडला. यहोवाने त्या दोघांनाही पापी म्हणून शिक्षा सुनावली. “मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन,” असे यहोवाने हव्वेला म्हटले. जणू त्यानेच हे केले असल्याप्रमाणे, तो अनुमती देत असलेल्या शक्यतेविषयी बोलतो. त्याने पुढे म्हटले: “तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” (उत्पत्ति ३:१६) त्या काळापासून, पुष्कळ पत्नींवर त्यांच्या पतींनी बहुतेकवेळा कठोरतेने वर्चस्व गाजवले आहे. साहाय्यक आणि अनुरूप व्यक्ती म्हणून त्यांना महत्त्व देण्याऐवजी, त्यांना वारंवार बहुधा एखाद्या नोकर किंवा दासाप्रमाणे वागवण्यात आले आहे.
८ तथापि, यहोवाच्या स्त्री उपासकांसाठी, उत्पत्ति ३:१६ च्या पूर्णतेचा काय अर्थ होता? त्यांना कनिष्ठतेचा आणि मानहानीचा खालचा दर्जा देण्यात आला होता का? मुळीच नाही! परंतु, आज काही समाजांमध्ये स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या व अस्वीकृत वाटत असतील अशा काही चालीरीती व प्रथांविषयी सांगणाऱ्या बायबल अहवालांबद्दल काय?
बायबलचे रीतीरिवाज समजणे
९. स्त्रियांना गोवणाऱ्या बायबल काळातील रीतींचा आपण विचार करतो, तेव्हा कोणत्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
९ बायबल काळात, देवाच्या सेवकांमध्ये स्त्रियांना चांगली वागणूक दिली जात असे. अर्थात, त्या काळी स्त्रियांविषयीच्या काही रीतीरिवाजांचा विचार करत असता, अनेक गोष्टींना लक्षात ठेवणे मदतदायी ठरेल. प्रथम, दुष्ट पुरुषांकडून स्वार्थी वर्चस्वामुळे उत्पन्न झालेल्या असंतोषजनक परिस्थितींविषयी बायबल सांगते तेव्हा, स्त्रियांना अशी वागणूक देण्यास देवाची मान्यता होती असा त्याचा अर्थ होत नाही. दुसरी गोष्ट, यहोवाने काही काळाकरता त्याच्या सेवकांमध्ये विशिष्ट चालीरीतींना सहन केले असले, तरी स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी त्याने त्या चालीरीतींवर नियंत्रण ठेवले. तिसरी गोष्ट, आधुनिक दर्ज्यांनी प्राचीन रीतीरिवाजांचे मूल्यमापन केले जाऊ नये याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे. आजच्या लोकांना चांगले न वाटणारे विशिष्ट रीतीरिवाज त्या वेळच्या स्त्रियांना मानहानीकारकच वाटत असतील असे नाही. अशा काही उदाहरणांचा आपण विचार करू या.
१०. बहुपत्नीकत्वाच्या रूढीविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन होता, आणि त्याने एक पत्नी असण्याचा आपला दर्जा कधीच बदलला नाही हे कशावरून दिसून येते?
१० बहुपत्नीकत्व: यहोवाच्या मूळ उद्देशानुरूप, एखाद्या पत्नीला आपल्या पतीवर दुसऱ्या स्त्रीचा अधिकार असावा हे मान्य नव्हते. देवाने आदामाकरता केवळ एकच पत्नी निर्माण केली. (उत्पत्ति २:२१, २२) एदेनमधील बंडाळीनंतर, बहुपत्नीकत्वाची रूढी सर्वात आधी काइनच्या वंशावळीत दिसून आली. कालांतराने ती एक रीत बनली व यहोवाच्या काही उपासकांनी ती स्वीकारली. (उत्पत्ति ४:१९; १६:१-३; २९:२१-२८) यहोवाने बहुपत्नीकत्वास अनुमती दिली व यामुळे इस्राएलची लोकसंख्या वाढण्यास मदत मिळाली, तरी त्याने या रीतीवर नियंत्रण ठेवून स्त्रियांचा विचार केला. त्यामुळे पत्नी व त्यांची मुले यांना संरक्षण मिळू शकत होते. (निर्गम २१:१०, ११; अनुवाद २१:१५-१७) त्या शिवाय, यहोवाने एक पत्नी असावी हा आपला मूळ दर्जा कधीही सोडला नाही. नोहा व त्याचे पुत्र, ज्यांना ‘फलद्रुप व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका’ ही आज्ञा पुन्हा देण्यात आली होती, ते सर्व एक एक पत्नी असणारे होते. (उत्पत्ति ७:७; ९:१; २ पेत्र २:५) इस्राएलबरोबरील आपल्या नातेसंबंधाचे प्रतीक देताना देव स्वतःला एकच पत्नी असलेल्या पतीप्रमाणे दाखवतो. (यशया ५४:१, ५) त्यानंतर, येशू ख्रिस्ताने एक पत्नीकत्वाचा देवाचा मूळ दर्जा पुनर्स्थापित केला आणि तो आरंभीच्या ख्रिश्चनांच्या मंडळीत अनुसरला जात होता.—मत्तय १९:४-८; १ तीमथ्य ३:२, १२.
११. बायबल काळात वधू-किंमत का दिली जात होती, आणि हे स्त्रियांकरता अप्रतिष्ठेचे होते का?
११ वधू-किंमत देणे: प्राचीन इस्राएलचे—जीवन व संस्था (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “मुलीच्या कुटुंबाला विशिष्ट रक्कम देणे किंवा त्या रक्कमेच्या मूल्याइतकीच वस्तू देणे हे निश्चितच इस्राएली विवाहाला खरेदीचे बाह्य स्वरूप देते. परंतु, ही [वधू-किंमत] स्त्रीसाठी दिलेल्या किंमतीपेक्षा कुटुंबाला भरपाई म्हणून दिलेली किंमत असे समजले जात असे.” (तिरपे वळण आमचे.) यास्तव, वधू किंमत दिल्याने, स्त्रीच्या कुटुंबाला तिच्या मदतीची तसेच तिच्या कुटुंबाला तिची काळजी घेण्यात जे परिश्रम लागले व खर्च झाला याची भरपाई केली जात असे. यास्तव, स्त्रीला गौण समजले जाण्याऐवजी, कुटुंबासाठी ती किती महत्त्वाची होती हे त्यावरून खात्रीशीर प्रतिपादन केले जात होते.—उत्पत्ति ३४:११, १२; निर्गम २२:१६; टेहळणी बुरुज, जानेवारी १५, १९८९, पृष्ठे २१-४ पाहा.
१२. (अ) काही वेळेस, शास्त्रवचनांमध्ये विवाहित पुरुष व स्त्रियांचा उल्लेख कसा करण्यात आला होता व या संज्ञा स्त्रियांसाठी अपमानकारक होत्या का? (ब) यहोवाने एदेनमध्ये वापरलेल्या संज्ञेविषयी कोणती गोष्ट लक्षणीय आहे? (तळटीप पाहा.)
१२ ‘मालक’ या नात्याने पती: सा. यु. पू. १९१८ च्या सुमारास, आब्राहाम व साराच्या जीवनातील एक घटना दाखवून देते की, त्यांच्या समयापर्यंत एखाद्या विवाहित पुरुषाला ‘मालक’ (इब्री, बाʹआल) व विवाहित स्त्रीला ‘मालकीची व्यक्ती’ (इब्री बेʽउ·लाहʹ) असे मानणे रूढ झाले होते. (उत्पत्ति २०:३) त्यानंतर, या अभिव्यक्ती काही वेळेस शास्त्रवचनांमध्ये वापरण्यात आल्या होत्या, व पूर्व ख्रिस्ती स्त्रियांना त्या अपमानकारक वाटल्या असे कोठेच दिसून येत नाही.a (अनुवाद २२:२२) तथापि, स्त्रियांना त्या मालमत्ता असल्याप्रमाणे वागणूक द्यावयाची नव्हती. मालमत्ता किंवा धनाची खरेदी केली जाऊ शकत होती, विकली जाऊ शकत होती तसेच तिला वारशाने मिळवलेही जाऊ शकत होते, परंतु पत्नीच्या बाबतीत असे नव्हते. एक बायबलचे नीतिसूत्र म्हणते, “घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत; सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते.”—नीतिसूत्रे १९:१४; अनुवाद २१:१४.
प्रतिष्ठित भूमिका
१३. देव-भिरु पुरुषांनी यहोवाचे उदाहरण अनुसरले व त्याच्या नियमशास्त्राचे पालन केले तेव्हा, स्त्रियांवर त्याचा काय परिणाम झाला?
१३ तर मग, ख्रिस्तपूर्व काळात, देवाच्या सेवकांमध्ये स्त्रियांची भूमिका काय होती? त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिले जात होते व कसे वागवले जात होते? सोप्या शब्दात सांगायचे, तर देव-भिरू पुरुषांनी यहोवाचे स्वतःचे उदाहरण अनुसरले व त्याच्या नियमशास्त्राचे पालन केले तेव्हा, स्त्रियांना त्यांची प्रतिष्ठा मिळाली व पुष्कळ हक्कांचा व विशेषाधिकारांचा आनंद त्यांनी लुटला.
१४, १५. इस्राएलमध्ये स्त्रियांना आदर दिला जात होता हे कसे दिसून येते आणि यहोवाच्या पुरुष-उपासकांनी त्यांना आदर द्यावा अशी अपेक्षा तो योग्यपणे का करू शकतो?
१४ स्त्रियांना आदर द्यावयाचा होता. इस्राएलला दिलेल्या देवाच्या नियमशास्त्राने पिता तसेच माता या दोहोंचाही आदर करण्याची आज्ञा दिली होती. (निर्गम २०:१२; २१:१५, १७) लेवीय १९:३ म्हणते, “तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्याचे भय बाळगावे.” एके प्रसंगी, बथशेबा, तिचा पुत्र शलमोन याजकडे आली तेव्हा, आदरभावाने “राजा तिचे स्वागत करण्यासाठी उठला व तिला दंडवत” केला. (१ राजे २:१९) एन्सायक्लोपिडीया जूडायका म्हणतो: “देवाचे इस्राएलबद्दल प्रेम याची एखाद्या पतीचे आपल्या पत्नीबद्दल असलेले प्रेम याजशी केलेली भविष्यसूचक तुलना केवळ स्त्रियांना आदर दिल्या जाणाऱ्या समाजातच केली जाऊ शकत होती.”
१५ स्त्रियांना आदर द्यावा अशी अपेक्षा यहोवा आपल्या पुरुष उपासकांकडून करतो कारण तो स्वतः त्यांना आदर देतो. शास्त्रवचनांमध्ये असे दिसून येते की, यहोवा उदाहरणासाठी स्त्रियांचे अनुभव वापरतो व आपल्या भावना त्यांच्या भावनांसारख्या आहेत अशी तुलना करतो. (यशया ४२:१४; ४९:१५; ६६:१३) यामुळे यहोवाला कसे वाटते हे समजण्यास वाचकांना मदत होते. मनोरंजक गोष्ट अशी की, यहोवा स्वतःला लागू करतो ती “दया” व “करुणा” यासाठी असलेली इब्री संज्ञा “उदर” यासाठी असलेल्या शब्दाशी जवळून संबंधित आहे व तिचे वर्णन “मातृत्वाची भावना” असे केले जाऊ शकते.—निर्गम ३३:१९; यशया ५४:७.
१६. ईश्वरी स्त्रियांच्या सल्ल्याला महत्त्व दिले जात होते हे कोणती उदाहरणे दाखवतात?
१६ ईश्वरी स्त्रियांच्या सल्ल्यास महत्त्व दिले जात होते. एके प्रसंगी, देव-भिरु आब्राहाम, आपली धार्मिक पत्नी सारा हिचा सल्ला ऐकण्यास कां-कू करत होता तेव्हा, यहोवाने त्याला म्हटले: “सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक.” (उत्पत्ति २१:१०-१२) एसावच्या हित्ती बायका, “इसहाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या.” त्यांचा पुत्र याकोब याला हित्तीशी विवाह करायचा असल्यास रिबकाला किती दुःख भोगावे लागेल हे तिने कालांतराने व्यक्त केले. इसहाकाची प्रतिक्रिया काय होती? अहवाल सांगतो, “तेव्हा इसहाकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की, कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नको.” होय, रिबकाने प्रत्यक्षात सल्ला दिला नसला, तरी तिच्या पतीने असा निर्णय घेतला ज्यामुळे तिच्या भावनांची कदर केली गेली. (उत्पत्ति २६:३४, ३५; २७:४६; २८:१) राजा दावीदाने अबीगईलेची विनवणी ऐकल्यामुळे नंतरचा रक्तदोष टळला.—१ शमुवेल २५:३२-३५.
१७. स्त्रियांना कुटुंबामध्ये थोडाफार अधिकार होता हे कशावरून दिसते?
१७ कुटुंबात स्त्रियांना थोडाफार अधिकार होता. “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको,” असे मुलांना आर्जवण्यात आले होते. (नीतिसूत्रे १:८) नीतिसूत्रे अध्याय ३१ मधील ‘सद्गुणी स्त्रीचे’ वर्णन दाखवते की, एक मेहनती विवाहित स्त्री केवळ घरदारच सांभाळत नव्हती, तर मालमत्तेचा कारभार हाताळू शकते, उत्पादनशील शेती करू शकते, छोटा धंदा चालवू शकते व तिच्या सुज्ञतेच्या शब्दांसाठी सुपरिचितही असू शकते. त्या स्त्रीला यहोवाविषयी जी स्तुती करण्याजोगी आदरयुक्त भीती होती ती सर्वांहून महत्त्वाची गोष्ट होती. म्हणूनच, अशा पत्नीचे मूल्य “मोत्यांहून अधिक” होते! दागिने व सजावटीच्या उद्देशांसाठी, मौल्यवान लाल पोवळ्याचे अतिशय मूल्य होते.—नीतिसूत्रे ३१:१०-३१.
देवाची खास कृपा पावलेल्या स्त्रिया
१८. बायबल काळात काही स्त्रियांवर कोणत्या प्रकारे खास कृपा दाखवली गेली?
१८ बायबल काळात, काहींवर यहोवाने जी खास कृपा दाखवली त्यावरून स्त्रियांची तो कदर करतो हे दिसून आले. हागार, सारा व मानोहाची पत्नी यांना देवदूतांनी भेटी दिल्या, त्यांनी त्यांना ईश्वरी मार्गदर्शन दिले. (उत्पत्ति १६:७-१२; १८:९-१५; शास्ते १३:२-५) निवासमंडपात, ‘सेवा करीत असलेल्या स्त्रिया’ होत्या व शलमोनाच्या न्यायालयात गायिका होत्या.—निर्गम ३८:८; १ शमुवेल २:२२; उपदेशक २:८.
१९. काही वेळेस, यहोवाने स्त्रियांना त्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी कोणत्या प्रकारे उपयोगात आणले?
१९ इस्राएलच्या इतिहासात, यहोवाने अनेकवेळा त्याचे प्रतिनिधीत्व करण्यास किंवा त्याच्या वतीने बोलण्यास स्त्रीचा उपयोग केला. दबोरा संदेष्ट्रीविषयी आपण वाचतो: “इस्राएल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत.” (शास्ते ४:५) इस्राएलने कनानी राजा याबीनचा पराभव केल्यानंतर, दबोराला खरोखर खास विशेषाधिकार मिळाला. स्पष्टतः, यहोवाच्या प्रेरित अहवालाचा कालांतराने भाग बनलेले विजयाचे गीत तिने देखील काही अंशी लिहिले.b (शास्ते, अध्याय ५) काही शतकांनंतर, राजा योशियाने यहोवाकडून विचारपूस करण्यास संदेष्ट्री हुल्दाकडे एक प्रतिनिधीमंडळ पाठवले. त्यामध्ये महायाजकाचाही समावेश होता. “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,” असे हुल्दा अधिकार वाणीने उत्तर देऊ शकली. (२ राजे २२:११-१५) त्या प्रसंगी, राजाने प्रतिनिधीमंडळाला एका संदेष्ट्रीकडे जाण्यास आज्ञापिले परंतु यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी हे केले होते.—पडताळा मलाखी २:७.
२०. स्त्रियांच्या भावना व कल्याणाची यहोवा कदर करतो हे कोणत्या उदाहरणांवरून दिसते?
२० यहोवाने आपल्या काही स्त्री-उपासकांसाठी पावले उचलली त्या घटनांवरून त्याला स्त्रियांच्या कल्याणाबद्दल चिंता वाटत होती हे स्पष्ट होते. आब्राहामची सुंदर पत्नी सारा हिची अब्रू वाचवण्यासाठी त्याने दोनदा मध्यस्थी केली. (उत्पत्ति १२:१४-२०; २०:१-७) देवाने याकोबाची नावडती बायको लेआ हिची “कूस वाहती” केली जेणेकरून तिला मुलगा झाला व अशा प्रकारे तिच्यावर कृपा केली. (उत्पत्ति २९:३१, ३२) इजिप्तमध्ये, दोन देव-भिरु इस्राएली सुईणींनी बालहत्येपासून इब्री मुलांना वाचवण्यासाठी स्वतःचे जीव धोक्यात घातले तेव्हा, यहोवाने प्रशंसेने “त्यांची घराणी स्थापित केली.” (निर्गम १:१७, २०, २१) त्याने हन्नाच्या कळकळीने केलेल्या प्रार्थनेचे देखील उत्तर दिले. (१ शमुवेल १:१०, २०) एका संदेष्ट्याच्या विधवेचे कर्ज फेडण्याकरता एक सावकार तिची मुले घेण्यास तयार झाला तेव्हा, यहोवाने तिला वाऱ्यावर सोडले नाही. प्रेमळपणे, तिच्या तेलाचा साठा वाढवून कर्ज फेडण्यासाठी देवाने एलीशा संदेष्ट्याला समर्थ केले. अशा प्रकारे तिने तिचे कुटुंब व तिची प्रतिष्ठा टिकवली.—निर्गम २२:२२, २३; २ राजे ४:१-७.
२१. इब्री शास्त्रवचने स्त्रियांबद्दल कोणते संतुलित वर्णन देतात?
२१ यास्तव, स्त्रियांविषयी, तुच्छतेचा दृष्टिकोन राखण्यास उत्तेजन देण्याऐवजी, इब्री शास्त्रवचने देवाच्या सेवकांमधील या स्त्रियांबद्दल संतुलित वर्णन देतात. उत्पत्ति ३:१६ च्या पूर्णतेपासून यहोवाने त्याच्या स्त्री-उपासकांना सुरक्षित ठेवले नाही, तरी यहोवाचे उदाहरण अनुसरणारे व त्याचे नियमशास्त्र ऐकणारे धार्मिक पुरुष, स्त्रियांना प्रतिष्ठेने व आदरासह वागणूक देत होते.
२२. येशू पृथ्वीवर येईपर्यंत, स्त्रियांची भूमिका कशी बदलली होती आणि कोणते प्रश्न विचारले आहेत?
२२ इब्री शास्त्रवचने पूर्ण झाल्यानंतरच्या शतकांत, यहुदी लोकांमध्ये स्त्रियांची भूमिका बदलली. येशू पृथ्वीवर येईपर्यंत, रब्बींच्या सांप्रदायांनी स्त्रियांच्या धार्मिक विशेषाधिकारांवर व सामाजिक जीवनावर पुष्कळ निर्बंध घातले होते. येशूने ज्या पद्धतीने स्त्रियांशी व्यवहार केला त्यावर अशा सांप्रदायांचा प्रभाव पडला का? आज ख्रिस्ती स्त्रियांशी कसा व्यवहार केला जावा? हे प्रश्न पुढील लेखामध्ये चर्चिले जातील.
[तळटीपा]
a इब्री शास्त्रवचनांमध्ये, विवाहित पुरुष व स्त्रियांना अधिककरून “पती” (इब्री, इश) व “पत्नी” (इब्री, इश·शाहʹ) असे सूचित केले आहे. उदाहरणार्थ, एदेन बागेत यहोवाने ‘मालक’ व ‘मालकीची व्यक्ती’ नव्हे, तर “नवरा” व “बायको” या संज्ञा वापरल्या होत्या. (उत्पत्ति २:२४; ३:१६, १७, पं. र. भाषांतर) दास्यत्वातून परतल्यावर, इस्राएल, यहोवाला पश्चात्तापी होऊन “माझा धनी” नव्हे तर “माझा पती” म्हणेल असे होशेयच्या भविष्यवाणीने भाकीत केले. यावरून, “धनी” या संज्ञेपेक्षा “पती” या संज्ञेचा अधिक प्रेमळ अर्थ सूचित होतो असे सुचवले जाऊ शकते.—होशेय २:१६.
b शास्ते ५:७ मध्ये दबोराचा संदर्भ देऊन पहिल्या व्यक्तीचा उपयोग केला गेला ही लक्षणीय गोष्ट आहे.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ देवाने नेमून दिलेल्या स्त्रियांच्या भूमिकेविषयी “साहाय्यक” व ‘अनुरूप व्यक्ती’ हे शब्द काय दाखवतात?
◻ स्त्रियांना गोवणाऱ्या बायबल काळातील रीतींचा आपण विचार करतो, तेव्हा काय लक्षात ठेवले पाहिजे?
◻ आरंभीच्या काळातील देवाच्या सेवकांमध्ये स्त्रियांची प्रतिष्ठित भूमिका होती हे कशावरून दिसून येते?
◻ ख्रिस्तपूर्व काळात, यहोवाने स्त्रियांवर कोणत्या प्रकारे खास कृपा दाखवली?