ख्रिस्ती स्त्रिया सन्मान व आदर यास पात्र आहेत
‘पतींनो, त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्याबरोबर सुज्ञतेने सहवास ठेवा.’—१ पेत्र ३:७.
१, २. (अ) येशूने झऱ्याजवळ शोमरोनी स्त्रीसोबत केलेल्या संभाषणामुळे कोणती चिंता वाटली व का? (तळटीप देखील पाहा.) (ब) शोमरोनी स्त्रीला प्रचार करून येशूने काय प्रदर्शित केले?
सा.यु. ३० च्या शेवटाला, दुपारी सूखार नगराजवळील एका प्राचीन झऱ्याकडे, येशूने स्त्रियांशी कसा व्यवहार केला जावा हे प्रकट केले. शोमरोन देशाच्या डोंगराळ भागात संपूर्ण सकाळ फिरून तो झऱ्याजवळ थकलेल्या, भुकेल्या व तान्हेल्या अवस्थेत येतो. तो झऱ्याजवळ बसला असता, एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यास तेथे येते. येशूने तिला म्हटले, “मला प्यावयाला पाणी दे.” ती स्त्री आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिली असेल. तिने विचारले: “आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे?” नंतर, येशूचे शिष्य अन्न घेऊन आल्यावर आश्चर्यचकित झाले, येशू ‘एका स्त्रीबरोबर का बोलत’ होता याबद्दल ते बुचकळ्यात पडले होते.—योहान ४:४-९, २७.
२ या स्त्रीने प्रश्न का विचारला व शिष्यांनी चिंता का केली? ती एक शोमरोनी होती, व यहुद्यांचे शोमरोन्यांसोबत काही व्यवहार नव्हते. (योहान ८:४८) परंतु स्पष्टतः, चिंतेचे आणखी एक कारण होते. त्या वेळी, रब्बींच्या सांप्रदायाप्रमाणे पुरुषांनी जाहीरपणे स्त्रियांशी बोलायचे नव्हते.a तरीसुद्धा, येशूने या प्रामाणिक अंतःकरणाच्या स्त्रीला उघडपणे प्रचार केला तसेच तो मशीहा होता हे देखील तिला प्रकट केले. (योहान ४:२५, २६) अशा प्रकारे, अशास्त्रवचनीय सांप्रदायांनी येशू जखडला जाणार नाही हे त्याने दाखवले. त्यामध्ये स्त्रियांना तुच्छ लेखणाऱ्या सांप्रदायांचाही समावेश होता. (मार्क ७:९-१३) त्याउलट, स्त्रियांशी सन्मान व आदरासह व्यवहार केला जावा हे येशूने केलेल्या व शिकवलेल्या गोष्टींद्वारे दर्शवले.
येशूने स्त्रियांशी कसा व्यवहार केला
३, ४. (अ) ज्या स्त्रीने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला तिला त्याने कसा प्रतिसाद दाखवला? (ब) येशूने ख्रिस्ती पुरुषांसाठी खासकरून पर्यवेक्षकांसाठी उत्तम उदाहरण कसे मांडले?
३ येशू स्त्रियांशी जो व्यवहार करत होता त्यावरून लोकांबद्दलचा त्याचा कनवाळू गुण दिसून आला. एके प्रसंगी, १२ वर्षांपासून रक्तस्रावाचा त्रास असणाऱ्या एका स्त्रीने त्याला लोकसमुहात गाठले. तिच्या अवस्थेमुळे ती विधीनुसार अशुद्ध होती, म्हणून ती तेथे यायला नको होती. (लेवीय १५:२५-२७) परंतु, बरे होण्याची अत्यंत गरज असल्यामुळे ती येशूच्या नकळत मागे गेली. तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केल्यावर ती तत्काळ बरी झाली! ज्याची कन्या अत्यंत आजारी होती त्या याइराच्या घरी येशू जात होता तरी देखील तो थांबला. त्याच्यातून शक्ती गेल्याचे कळाल्यावर, त्याला स्पर्श केलेल्या व्यक्तीला तो शोधू लागला. शेवटी, ती स्त्री थरथर कापत त्याच्यासमोर येऊन त्याच्या पाया पडली. लोकसमुदायात असल्याबद्दल किंवा त्याच्या वस्त्रांना परवानगीशिवाय स्पर्श केल्याबद्दल येशूने तिला रागावले का? याच्या उलट, तिला तो फारच प्रेमळ व चांगला असा वाटला. तो म्हणाला: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” येशूने एखाद्या स्त्रीला “मुली” असे थेट उद्देशून बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या शब्दामुळे तिच्या अंतःकरणाला किती समाधान मिळाले असेल!—मत्तय ९:१८-२२; मार्क ५:२१-३४.
४ येशूने नियमशास्त्राच्या अक्षरशः अर्थाच्या पलीकडे पाहिले. त्यामागील सार आणि कृपा व कनवाळुपणाची गरज त्याने ओळखली. (पडताळा मत्तय २३:२३.) येशूने त्या आजारी स्त्रीच्या निराशजनक परिस्थितीला पाहिले व ती विश्वासाने प्रवृत्त झालेली होती हे विचारात घेतले. अशा प्रकारे, त्याने ख्रिस्ती पुरुषांकरता विशेषतः पर्यवेक्षकांकरता एक चांगले उदाहरण मांडले. एखादी ख्रिस्ती बहीण वैयक्तिक समस्या किंवा विशेषतः एखाद्या अडचणीच्या किंवा परीक्षेच्या परिस्थितीला तोंड देत असेल, तर तिने तत्काळ उच्चारलेले शब्द किंवा कृती यांच्या पलीकडे वडिलांनी पाहावे व परिस्थिती तसेच हेतू विचारात घ्यावेत. सल्ला किंवा सुधारणुकीऐवजी, धीर, समजूतदारपणा व कनवाळुपणा आवश्यक आहे हे अशा प्रकारच्या ज्ञानावरून दाखवले जाईल.—नीतिसूत्रे १०:१९; १६:२३; १९:११.
५. (अ) स्त्रियांवर रब्बींच्या सांप्रदायांनी निर्बंध कसे घालण्यात आले होते? (तळटीप पाहा.) (ब) पुनरुत्थित येशूला पाहणारे व त्याच्याविषयी साक्ष देणारे प्रथम कोण होते?
५ येशू पृथ्वीवर होता त्या काळातील स्त्रिया, रब्बींच्या सांप्रदायांनी जखडलेल्या असून त्यांना कायदेशीर साक्षीदार होण्यास निर्बंध होता.b सा. यु. ३३ च्या निसान १६ ला सकाळी, येशूला मृतातून पुनरुत्थित केल्यावर लगेचच काय झाले त्याचा विचार करा. पुनरुत्थित येशूला प्रथम पाहण्यास व इतर शिष्यांना त्यांचा प्रभू उठवला गेला आहे याची साक्ष प्रथम देणारे कोण असेल बरे? तो मरेपर्यंत खिळण्याच्या ठिकाणी राहिलेल्या स्त्रियाच होत्या.—मत्तय २७:५५, ५६, ६१.
६, ७. (अ) कबरेजवळ आलेल्या स्त्रियांना येशूने काय सांगितले? (ब) येशूच्या पुरुष शिष्यांनी स्त्रियांच्या साक्षीला प्रथम कशी प्रतिक्रिया दाखवली व त्यावरून काय शिकले जाऊ शकते?
६ आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भल्या पहाटे, मरीया मग्दालीया व इतर स्त्रिया येशूच्या शरीराला सुगंधद्रव्ये लावण्यासाठी कबरेजवळ गेल्या. रिकामी कबर पाहून, मरीया, पेत्र व योहानाला सांगण्यास पळत गेली. इतर स्त्रिया तेथेच थांबल्या. लवकरच, त्यांना एक देवदूत दिसला व येशूला उठवण्यात आले आहे असे त्याने त्यांना सांगितले. “लवकर जाऊन त्याच्या शिष्यांस सांगा,” अशी देवदूताने सूचना दिली. या स्त्रिया ही बातमी देण्यास घाईघाईने जात असताना, येशू स्वतः त्यांच्यासमोर आला. “जा माझ्या भावास सांगा,” असे त्याने त्यांना म्हटले. (मत्तय २८:१-१०; मार्क १६:१, २; योहान २०:१, २) देवदूताच्या भेटीची जाणीव नसलेली दुःखित झालेली मरीया मग्दालीया रिकाम्या कबरेजवळ पुन्हा आली. येशू तेथे तिच्यासमोर येतो, व तिने शेवटी त्याला ओळखल्यावर तो म्हणतो: “माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.”—योहान २०:११-१८; पडताळा मत्तय २८:९, १०.
७ येशू प्रथम पेत्र, योहान किंवा इतर पुरुष शिष्यांपैकी कोणालाही दिसू शकला असता. त्याऐवजी, या स्त्रियांना त्याच्या पुनरुत्थानाचे पहिले साक्षीदार करून आणि त्याबद्दल त्याच्या पुरुष शिष्यांना जाऊन सांगण्याकरता नेमून त्याने त्यांना कृपा दाखवण्याचे ठरवले. सुरवातीला पुरुषांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? अहवाल म्हणतो: “परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही.” (लूक २४:११) ही साक्ष स्त्रियांनी दिल्यामुळे ती स्वीकारण्यास त्यांना कठीण वाटले असे होऊ शकते का? तसे असल्यास, येशूला मृतातून उठवण्यात आले होते याचा विपुल पुरावा त्यांना कालांतराने प्राप्त झाला. (लूक २४:१३-४६; १ करिंथकर १५:३-८) आज ख्रिस्ती पुरुष त्यांच्या आध्यात्मिक बहिणींची निरीक्षणे विचारात घेतात तेव्हा सुज्ञतेने कार्य करतात.—पडताळा उत्पत्ति २१:१२.
८. येशूने स्त्रियांशी केलेल्या व्यवहारावरून काय प्रकट केले?
८ येशूने स्त्रियांशी कसा व्यवहार केला हे जाणणे खरोखर आनंदविणारे आहे. स्त्रियांशी व्यवहार करताना तो नेहमी कनवाळू व पूर्णपणे संतुलित होता व त्याने त्यांना कधीही उंचावले किंवा कमी लेखले नाही. (योहान २:३-५) त्यांची प्रतिष्ठा काढून घेणारे व देवाचे वचन रद्द करणारे रब्बींचे सांप्रदाय त्याने नाकारले. (पडताळा मत्तय १५:३-९.) स्त्रियांशी सन्मान व आदरासह व्यवहार करून, त्यांना कशी वागणूक द्यावी याबद्दल यहोवाला कसे वाटते हे येशूने प्रत्यक्ष प्रकट केले. (योहान ५:१९) ख्रिस्ती पुरुषांनी अनुकरण करावे म्हणून येशूने एक उत्तम उदाहरण देखील मांडले.—१ पेत्र २:२१.
स्त्रियांविषयी येशूच्या शिकवणी
९, १०. येशूने स्त्रियांविषयीच्या रब्बींच्या सांप्रदायांचे खंडन कसे केले आणि परूश्यांनी घटस्फोटाविषयी प्रश्न विचारल्यावर तो काय म्हणाला?
९ येशूने रब्बींच्या सांप्रदायांचे खंडन केले व केवळ त्याच्या कृतींनीच नव्हे, तर शिकवणींनी देखील स्त्रियांना प्रतिष्ठा दिली. उदाहरणार्थ, त्याने घटस्फोट व व्यभिचाराबद्दल काय शिकवले त्याचा विचार करा.
१० घटस्फोटाविषयी, येशूला असा प्रश्न विचारण्यात आला: “कोणत्याहि कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” मार्कच्या अहवालानुसार, येशूने म्हटले: “जो कोणी आपल्या बायकोला [जारकर्माच्या कारणाशिवाय] टाकतो व दुसरे लग्न करितो तो तिच्याविरूद्ध व्यभिचार करितो; आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीहि व्यभिचार करिते.” (मार्क १०:१०-१२; मत्तय १९:३, ९) या सोप्या शब्दांनी स्त्रियांच्या प्रतिष्ठेबद्दल आदर दाखवला. कसा बरे?
११. “जारकर्माच्या कारणाशिवाय” हे येशूचे शब्द विवाह बंधनाविषयी काय सूचित करतात?
११ प्रथम, (मत्तय शुभवर्तमानाच्या अहवालात आढळणाऱ्या) “जारकर्माच्या कारणाशिवाय” या शब्दांनी, येशूने दाखवले की, विवाह बंधनाला क्षुल्लक लेखू नये किंवा ते सहजगत्या मोडू नये. बायकोच्या हातून एखादा खाद्यपदार्थ बिघडणे किंवा एखाद्या परपुरुषासोबत बोलणे यासारख्या क्षुल्लक कारणांसाठी त्या वेळी रूढ असणारी रब्बींची शिकवण घटस्फोटाला अनुमती देत होती. एवढेच काय तर, पतीला त्याच्या नजरेत एखादी अधिक सुंदर स्त्री दिसल्यावरही घटस्फोटाला अनुमती दिली जात होती! एक बायबल विद्वान निरीक्षण करतो: “येशू बोलत होता तेव्हा त्याने केले त्याप्रमाणे, . . . विवाहाला योग्य ते स्थान देऊन तो स्त्रियांना आधार देत होता.” अर्थात, विवाह, एखाद्या स्त्रीला सुरक्षित वाटेल असे कायमचे बंधन असले पाहिजे.—मार्क १०:६-९.
१२. “तिच्याविरूद्ध व्यभिचार करितो” या शब्दांवरून येशू कोणत्या नवीन विचाराचा परिचय करून देत होता?
१२ दुसरी गोष्ट, “तिच्याविरुद्ध व्यभिचार करितो,” या अभिव्यक्तीकरवी, येशूने रब्बींच्या न्यायालयात मान्यता नसणाऱ्या दृष्टिकोनाची सुरवात केली—पतीने आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करण्याची कल्पना. द एक्सपोसिटर्स बायबल कॉमेंटरी स्पष्टीकरण देते: “रब्बींच्या यहुदी धर्मात, एखादी स्त्री आपल्या पतीशी अप्रामाणिक राहून व्यभिचार करत होती; त्याचप्रमाणे एखादा पुरुष, दुसऱ्या पुरुषाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवून त्याच्याविरुद्ध व्यभिचार करत होता. परंतु एखादा पुरुष काहीही झाले तरी आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार कधीही करत नव्हता. येशूने, पतीलाही पत्नीप्रमाणेच नैतिक जबाबदारी देऊन, स्त्रियांचे स्थान व प्रतिष्ठा उंचावली.”
१३. घटस्फोटाच्या बाबतीत, ख्रिस्ती व्यवस्थेमध्ये पुरुष व स्त्रियांकरता एकच दर्जा असेल हे येशूने कसे दाखवून दिले?
१३ तिसरी गोष्ट, “तिने आपल्या नवऱ्याला सोडले” या वाक्यांशामुळे एखाद्या अविश्वासू पतीला घटस्फोट देण्याच्या स्त्रीच्या हक्काला येशूने ओळखले—ही माहीत असलेली प्रथा असली, तरी त्या काळी यहुदी नियमाखाली ती सामान्य नव्हती.c असे म्हटले जात असे की, “एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने किंवा इच्छेविना घटस्फोट दिला जाऊ शकत होता परंतु एखाद्या पुरुषाला केवळ त्याच्याच इच्छेने घटस्फोट दिला जाऊ शकत होता.” तथापि, येशूप्रमाणे ख्रिस्ती व्यवस्थेमध्ये पुरुष व स्त्रियांना एकच दर्जा लागू होईल.
१४. आपल्या शिकवणींवरून येशूने काय प्रतिबिंबित केले?
१४ येशूच्या शिकवणी स्त्रियांच्या कल्याणासाठी स्पष्टतः सखोल चिंता प्रकट करतात. यास्तव, काही स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या चीजवस्तूंनी येशूच्या गरजा भागवण्याइतपत त्याच्याविषयी प्रेम का दाखवले हे समजणे कठीण नाही. (लूक ८:१-३) येशूने म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.” (योहान ७:१६) येशूने शिकवलेल्या गोष्टींद्वारे, स्त्रियांविषयी यहोवाची प्रेमळ कदर प्रतिबिंबित केली.
“त्यांना मान द्या”
१५. पतींनी आपल्या पत्नींना कसे वागवावे याविषयी प्रेषित पेत्राने काय लिहिले?
१५ येशूने स्त्रियांशी कसा व्यवहार केला हे प्रेषित पेत्राने प्रत्यक्ष निरीक्षिले. सुमारे ३० वर्षांनंतर, पेत्राने पत्नींसाठी प्रेमळ सल्ला दिला व लिहिले: “पतींनो, तसेच तुम्हीहि आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) “त्यांना मान द्या” या पेत्राच्या शब्दांचा काय अर्थ होता?
१६. (अ) “मान” असे भाषांतरीत केलेल्या ग्रीक नामाचा अर्थ काय आहे? (ब) यहोवाने येशूला रूपांतराच्या वेळी सन्मानित कसे केले, व आपण यातून काय शिकतो?
१६ एका शब्दकोशकाराच्या म्हणण्यानुसार, “मान” (टाइ·मीʹ) या ग्रीक नामाच्या भाषांतराचा अर्थ, “किंमत, मोल, सन्मान, आदर,” असा होतो. या ग्रीक शब्दाची रूपे “सन्मान” व “मूल्यवान” अशी देण्यात आली आहेत. (प्रेषितांची कृत्ये २८:१०; १ पेत्र २:७) पेत्राच्या २ पेत्र १:१७ मधील त्याच शब्दाच्या रूपाचे परीक्षण केल्यास, एखाद्याला सन्मान देण्याचा काय अर्थ होतो याबद्दल आपल्याला सूक्ष्मदृष्टी प्राप्त होते. तेथे येशूच्या रूपांतराच्या संदर्भात त्याने म्हटले: “कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” येशूच्या रूपांतराच्या वेळी, यहोवाने येशूबद्दल आपली स्वीकृती व्यक्त करून आपल्या पुत्राला इतरांच्या समक्ष सन्मानित केले. (मत्तय १७:१-५) यास्तव, आपल्या पत्नीला सन्मान देणारा पुरुष, तिची मानहानी करत नाही किंवा तिला तुच्छ लेखत नाही. त्याउलट, तो—खाजगी जीवनात आणि लोकांसमक्ष—आपल्या बोलण्यावरून व कृतींवरून तिला महत्त्व देत असल्याचे प्रदर्शित करतो.—नीतिसूत्रे ३१:२८-३०.
१७. (अ) सन्मान ख्रिस्ती पत्नींचा हक्क का आहे? (ब) देवाच्या नजरेत पुरुषाला एखाद्या स्त्रीपेक्षा अधिक महत्त्व आहे असा विचार त्याने का करू नये?
१७ पेत्र म्हणतो, हा सन्मान ख्रिस्ती पतींनी आपल्या पत्नींना ‘दिला पाहिजे.’ तो त्यांच्यावर कृपा म्हणून दिला जाऊ नये, तर त्यांच्या पत्नींचा हक्क म्हणून दिला पाहिजे. असा सन्मान मिळण्याचा पत्नींचा हक्क का आहे? पेत्र स्पष्टीकरण देतो, कारण “तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा.” सा. यु. पहिल्या शतकात, पेत्राचे पत्र मिळालेल्या सर्व पुरुष व स्त्रियांना ख्रिस्ताबरोबर सोबतीचे दास होण्यासाठी बोलवण्यात आले. (रोमकर ८:१६, १७; गलतीकर ३:२८) त्यांना मंडळीत समान जबाबदाऱ्या नव्हत्या परंतु कालांतराने त्या ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्यात भाग घेणार होत्या. (प्रकटीकरण २०:६) आज देखील, देवाच्या अधिकांश लोकांना पार्थिव आशा असताना, कोणत्याही ख्रिश्चनाने मंडळीतील विशेषाधिकारांमुळे देवाच्या नजरेत स्त्रियांपेक्षा त्याला अधिक महत्त्व आहे असा विचार करणे एक गंभीर चूक होईल. (पडताळा लूक १७:१०.) पुरुष व स्त्रियांना देवासमोर समांतरतेचे आध्यात्मिक स्थान आहे, कारण येशूच्या बलिदानरूपी मृत्यूने पुरुष व स्त्रिया या दोघांकरता एकसारखी संधी खुली केली आहे—ती म्हणजे, सार्वकालिक जीवन डोळ्यांपुढे ठेवून पाप व मृत्यूच्या शिक्षेतून मुक्तता.—रोमकर ६:२३.
१८. एखाद्या पतीने आपल्या पत्नीला सन्मान द्यावा यासाठी पेत्र कोणते भाग पाडणारे कारण देतो?
१८ एखाद्या पतीने आपल्या पत्नीला सन्मान का द्यावा याचे आणखी एक प्रवृत्त करणारे कारण “म्हणजे, तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” “व्यत्यय” ही अभिव्यक्ती, (एन·कोʹप्टो) या ग्रीक क्रियापदातून येते ज्याचा अक्षरशः अर्थ “कापणे” असा होतो. वाईन यांच्या एक्सपोसिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टामेंट वर्डस् नुसार ती “रस्ता उद्ध्वस्त करून किंवा वाटेत धारदार वस्तू ठेवून अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविषयी वापरण्यात येत होती.” यास्तव, आपल्या बायकोला सन्मान न देणाऱ्या पतीला त्याच्या प्रार्थना व देवाच्या ऐकण्यामध्ये अडथळा आहे असे आढळेल. देवाकडे जाण्यास आपण अपात्र आहोत असे त्या मनुष्याला वाटेल किंवा यहोवा ऐकण्यास तयार नसेल. स्पष्टतः, पुरुष स्त्रियांशी कसा व्यवहार करतात याबद्दल यहोवाला खूप चिंता आहे.—पडताळा विलापगीत ३:४४.
१९. मंडळीमध्ये पुरुष व स्त्रिया परस्पर आदरासह एकत्र सेवा कशी करू शकतात?
१९ सन्मान देण्याचे बंधन केवळ पतींवरच नाही. एखाद्या पतीने प्रेमाने व प्रतिष्ठेने आपल्या पत्नीशी व्यवहार करून तिला सन्मान दिला पाहिजे त्याचप्रमाणे, पत्नीने देखील अधीन राहून व सखोल आदर दाखवून पतीला सन्मान दिला पाहिजे. (१ पेत्र ३:१-६) त्याशिवाय, पौलाने ख्रिश्चनांना ‘एक दुसऱ्याला आदर दाखवा’ असे आर्जवले. (रोमकर १२:१०) मंडळीतील पुरुष व स्त्रियांनी, परस्पर आदरासह एकत्रितपणे सेवा करण्यासाठी ही हाक आहे. अशी मनोवृत्ती असते, तेव्हा नेतृत्व करणाऱ्यांचा अधिकार क्षीण केला जाईल अशा पद्धतीने ख्रिस्ती स्त्रिया बोलणार नाहीत. या उलट, त्या वडिलांना पाठिंबा व सहकार्य देतील. (१ करिंथकर १४:३४, ३५; इब्रीयांस १३:१७) आपल्या वतीने, ख्रिस्ती पर्यवेक्षक ‘वडील स्त्रियांस मातासमान व तरुण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणींसमान’ वागवतील. (१ तीमथ्य ५:१, २) सुज्ञतेने, वडील आपल्या ख्रिस्ती बहिणी जे काही सांगतात त्या गोष्टींना नम्रतापूर्वक विचारात घेतील. यास्तव, एखादी बहीण ईश्वरशासित मस्तकपदाबद्दल आदर दाखवते व आदराने एखादा प्रश्न विचारते किंवा लक्ष देण्याजोगी एखादी गोष्ट दाखवते त्या वेळी वडील तिच्या प्रश्नाला किंवा समस्येला आनंदाने विचारात घेतील.
२०. शास्त्रवचनीय अहवालानुसार, स्त्रियांशी कसा व्यवहार केला पाहिजे?
२० एदेनमध्ये पापाची सुरवात झाल्यापासून, पुष्कळ संस्कृतींमधील स्त्रियांना अनादराचे स्थान देण्यात आले आहे. परंतु, त्यांनी अशा प्रकारच्या वागणुकीचा अनुभव करावा असा यहोवाचा मूलतः उद्देश नव्हता. स्त्रियांबद्दल कोणतेही सांस्कृतिक दृष्टिकोन असले, तरी इब्री व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील अहवाल स्पष्टपणे दाखवतात, की ईश्वरी स्त्रियांशी आदर व सन्मानासह व्यवहार केला पाहिजे. देवाने प्रदान केलेला त्यांचा तो हक्क आहे.
[तळटीपा]
a द इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया स्पष्टीकरण देतो: “पुरुष पाहुण्यांसोबत स्त्रिया जेवत नव्हत्या आणि पुरुषांना स्त्रियांशी बोलण्यास उत्तेजन दिले जात नसे. . . . सार्वजनिक ठिकाणी स्त्रीशी संभाषण करणे विशेषतः लोकपवादाचे होते.” यहुदी मिशनाह, रब्बींच्या शिकवणींच्या संग्रहाने असा सल्ला दिला: “स्त्रीजातीशी अधिक बोलू नका. . . . स्त्रीजातीशी अधिक बोलणारा स्वतःवर अरिष्ट ओढवून घेतो व नियमशास्त्राच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो आणि तो शेवटी गेहेन्नात जाईल.”—अबोथ १:५.
b ख्रिस्ताच्या काळातील पॅलेस्टाईन (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “काही बाबतीत, स्त्रियांना अगदी दासाच्या बरोबरीनेच वागवले जात होते. उदाहरणार्थ, आपल्या पतीचा मृत्यू सिद्ध करण्याशिवाय तिला न्यायालयात पुरावा सादर करण्याची परवानगी नव्हती.” लेवीय ५:१ ला उद्देशून मिशनाह स्पष्टीकरण देतो: “‘पुराव्याच्या शपथेचा’ [नियम] पुरुषांना लागू होतो, परंतु स्त्रियांना होत नाही.”—शेबुओथ ४:१.
c राजा हेरोदची बहीण सालोम हिने आपल्या पतीला, “त्यांचा विवाह संपुष्टात आणणारे दस्तऐवज पाठवले, जे यहुदी नियमानुसार नव्हते. कारण आमच्याकडून (केवळ) पुरुषाला तसे करण्याची परवानगी आहे,” असा पहिल्या शतकातील यहुदी इतिहासकार जोसेफस अहवाल देतो.—यहूदी अवशेष, १५, २५९ [७, १०].
तुमचे उत्तर काय आहे?
◻ येशू स्त्रियांशी सन्मान व आदरासह व्यवहार करत होता हे कोणत्या उदाहरणांवरून प्रदर्शित होते?
◻ येशूच्या शिकवणींनी स्त्रियांच्या प्रतिष्ठेबद्दल आदर कसा दाखवला?
◻ एखाद्या पतीने आपल्या ख्रिस्ती पत्नीला सन्मान का द्यावा?
◻ सर्व ख्रिश्चनांना सन्मान दाखवण्याचे कोणते बंधन आहे?
[१७ पानांवरील चित्रं]
ईश्वरी स्त्रियांनी प्रथम पुनरुत्थित येशूला पाहिले ही त्यांच्याकरता आनंदाची गोष्ट होती व त्याने त्यांना त्याविषयीची साक्ष त्याच्या बांधवांकडे देण्यास पाठवले