स्त्री—भविष्याचे चित्र काय?
“मानवाचा इतिहास हा पुरुषाने स्त्रीवर केलेल्या जुलूमांनी आणि अन्यायांनी भरलेला आहे.” असे स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध केलेला निषेध म्हणून अमेरिकेत १५० वर्षांआधी लिहिलेल्या न्यूयॉर्कच्या सेनका फॉल्स, डेक्लेरेशन ऑफ सेंटीमेंट्स यात म्हटले होते.
तेव्हापासून प्रगती झाली आहे यात काही शंका नाही, पण संयुक्त राष्ट्रांचे जगातल्या स्त्रिया १९९५ (इंग्रजी) हे प्रकाशन म्हणते त्यानुसार अद्याप पुष्कळ प्रगती व्हावयाची बाकी आहे. “बहुतेकदा, स्त्रियांचे आणि पुरुषांचे दोन भिन्न जग असते,” असा ते अहवाल देते, “की जेथे शिक्षण आणि कामाच्या संधी, आरोग्य, व्यक्तिगत सुरक्षा आणि फावला वेळ या बाबतीत पुष्कळ फरक असतो.”
याची जागरूकता वाढल्याने राष्ट्रांनी स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नियम केले आहेत. पण नियम काही अंतःकरणांमध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नाहीत; अन्याय आणि भेदभावाची मुळे तर तेथेच रुजलेली आहेत. उदाहरणार्थ, वेश्या बालिकांच्या दुरावस्थेचा जरा विचार करा. या आंतरराष्ट्रीय काळिमेविषयी न्यूझवीकने म्हटले: “मुलांचे लैंगिक शोषण होऊ नये म्हणून बनवलेल्या कायद्याचे हेतू चांगले असतात पण ते बहुधा परिणामकारक नसतात.” त्याचप्रमाणे, फक्त कायदा असला की हिंसा टळते अशातली ही बाब नाही. “पुरावा दाखवून देतो की, स्त्रियांविरुद्ध अत्याचार ही एक व्यापक जागतिक समस्या आहे,” असे मानवी विकास अहवाल १९९५ यात म्हटले आहे. “बहुतांश नियम अशा अत्याचारापुढे निकामी ठरतात—सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्ये बदलली तर कदाचित हे शक्य आहे.”—तिरपे वळण आमचे.
सहसा “सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्ये” ही खोलवर मुळावलेल्या परंपरेवर आधारित असतात—यात बदल घडवणे हे काही हातचे काम नाही. “परंपरेनुसार पुरुषांचा असा समज आहे की, स्त्रियांवर प्रेम करण्याऐवजी त्यांचा वापर करावा, त्यांची काळजी घेण्याऐवजी त्यांना राबवावं,” असे मध्यपूर्वेतील एक स्त्री म्हणते. “परिणामी, स्त्रीला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार नसतो, तिला हक्क नसतात आणि स्वतःची परिस्थिती सुधारणे तर दूरचीच गोष्ट असते.”
पती आणि पित्यांना शिक्षण
सन १९९५ मध्ये बीजिंग, चीनमध्ये स्त्रियांवरील एका जागतिक परिषदेने प्रस्ताव मांडलेले द प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शनने घोषित केले की, “सर्वांनी तातडीने आणि एकमताने कार्य केले” तरच स्त्रियांचा जेथे आदर होईल असे “शांतीमय, न्याय्य आणि सुसंस्कृत जग” सांधता येऊ शकते.
स्त्रियांचे जीवन ‘शांतीमय, न्याय्य आणि सुसंस्कृत’ करण्याच्या प्रयत्नांची सुरवात आधी घरात, अर्थात पतींद्वारे आणि पित्यांद्वारे केली जावी. याबाबतीत, यहोवाच्या साक्षीदारांची खात्री पटली आहे की, बायबल शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्या पत्नींशी आणि मुलींशी आदराने व विचारशीलतेने व्यवहार करण्याची देव अपेक्षा करतो असे शिकल्यानंतर पुरुष लागलीच ही गोष्ट मनावर घेतात आणि त्याप्रमाणे करतात हे त्यांनी पाहिले आहे.
मध्य आफ्रिकेत, चार मुले असलेला एक विवाहित पुरुष पेड्रो, आता आपल्या पत्नीच्या गरजांकडे लक्ष देतो. मुलांना सांभाळण्यात तो तिला हातभार लावतो आणि घरी पाहुणे येतात तेव्हा त्यांना जेवण वाढण्याचे कामही तो करतो. अशी ही विचारशील मनोवृत्ती त्याच्या देशात अगदीच परकी आहे. आपल्या पत्नीची प्रशंसा करून तो तिला कशामुळे सहयोग देतो?
“मी बायबलचा अभ्यास करू लागलो तेव्हा पतीच्या भूमिकेविषयी मी दोन महत्त्वपूर्ण तत्त्वं शिकलो,” असे पेड्रो म्हणतो. “पत्नीकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टिकोनावर त्यांचा खूप मोठा प्रभाव पडला आहे. १ पेत्र ३:७ मधले पहिले तत्त्व सांगते की, पतीने आपल्या पत्नीला ‘अधिक नाजूक व्यक्ती’ असे समजून आदर दिला पाहिजे. इफिसकर ५:२८, २९ मधील दुसरे तत्त्व सांगते की, पतीने पत्नी ‘आपलेच शरीर आहे असे समजून’ तिच्याशी व्यवहार केला पाहिजे. त्या सल्ल्याचे अनुसरण केल्यापासून आमची जवळीक आणखीनच वाढली आहे. म्हणून आम्ही पुरुषांनी स्थानिक रीतीरिवाजांपेक्षा देवाच्या सल्ल्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे.”
पश्चिम आफ्रिकेचा मायकल कबूल करतो की, बायबलचा अभ्यास करण्याआधी तो आपल्या पत्नीला चांगली वागणूक देत नव्हता. “मला राग यायचा तेव्हा मी तिला चोपायचो सुद्धा,” तो कबूल करतो. “पण बायबलने मला शिकवले की माझ्या सवयीत बदल केला पाहिजे. आता माझा राग काबूत ठेवून माझ्या पत्नीवर स्वतःच्या शरीराप्रमाणे प्रेम करायचा मी खूप प्रयत्न करतो. आणि आधीपेक्षा आता आम्ही दोघे खूप सुखी आहोत.” (कलस्सैकर ३:९, १०, १९) त्याची पत्नी कम्फर्टही कबूल करते: “आता मायकल मला आमच्या समाजातल्या इतर पतींप्रमाणे नव्हे, तर जास्त आदराने आणि प्रेमाने वागवतो. आम्ही दोघे मिळून कोणत्याही समस्यांविषयी चर्चा करू शकतो आणि एकत्र मिळून कामही करू शकतो.”
पेड्रो आणि मायकल आपापल्या पत्नींचा आदर आणि कदर करायला शिकले कारण देवाच्या वचनातील सल्ले त्यांनी मनावर घेतले ज्यांमध्ये स्पष्ट केले आहे की, स्त्रियांवर केलेला अन्याय निर्माणकर्त्याला अत्यंत असंतुष्ट करतो.
स्त्रियांबद्दल देवाची चिंता
स्त्रिया आणि त्यांच्या कल्याणाविषयी देवाला नेहमीच चिंता वाटली आहे. आपल्या पहिल्या पालकांच्या बंडाळीचा परिणाम म्हणून अपरिपूर्णतेमुळे स्त्रियांवर “स्वामित्व” चालवले जाईल असे देवाने त्यांना सांगितले असले, तरी देवाचा मुळात तसा उद्देश नव्हता. (उत्पत्ति ३:१६) त्याने हव्वेला आदामासाठी “अनुरूप” सहचरी म्हणून आणि साथीदार म्हणून निर्मिले होते. (उत्पत्ति २:१८) प्राचीन इस्राएलला दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात, यहोवाने विधवांना दिल्या जाणाऱ्या गैरवागणुकीची स्पष्टपणे निंदा केली आणि त्यांना दयाळुपणाने वागवण्याची व मदत करण्याची सूचना इस्राएलांना दिली.—निर्गम २२:२२; अनुवाद १४:२८, २९; २४:१७-२२.
आपल्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण करत येशूने स्त्रियांना कमीपणा दाखवणाऱ्या त्याच्या काळातल्या सर्वसामान्य परंपरेला जुमानले नाही. तो स्त्रियांशी दयाळुपणे बोलायचा—ज्यांची ख्याती चांगली नव्हती अशांसोबतही. (लूक ७:४४-५०) शिवाय, येशू, आरोग्य समस्या असलेल्या स्त्रियांना आनंदाने मदत करी. (लूक ८:४३-४८) एके प्रसंगी, एक विधवा तिचा एकुलता एक मुलगा नुकताच मरण पावला असल्याने शोक करत होती, तेव्हा तो तत्काळ तिरडीजवळ गेला आणि त्याने त्या तरुण मनुष्याला पुनरुत्थित केले.—लूक ७:११-१५.
स्त्रिया ह्या येशूच्या प्रारंभिक शिष्यांपैकी होत्या आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सर्वात पहिल्या साक्षीदार देखील होत्या. पाहुणचार, दया आणि धैर्य यांची उदाहरणे म्हणून लुदिया, दुर्कस आणि प्रिस्क या स्त्रियांविषयी बायबल प्रशंसोद्गार काढते. (प्रेषितांची कृत्ये ९:३६-४१; १६:१४, १५; रोमकर १६:३, ४) त्याचप्रमाणे, प्रारंभिक ख्रिश्चनांना, स्त्रियांप्रती आदर दाखवण्याचे शिकवले गेले होते. प्रेषित पौलाने आपल्या सह-मिशनरी तीमथ्याला “वडील स्त्रियांस मातासमान मानून, तरुण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान” वागवायला सांगितले.—१ तीमथ्य ५:२.
आदर प्राप्त झालेल्या स्त्रिया
तुम्ही ख्रिस्ती पुरुष असल्यास, स्त्रियांप्रती तोच आदर तुम्हीही दाखवाल. परंपरेच्या नावाखाली तुम्ही त्यांच्याशी दुर्व्यवहार करणार नाही. शिवाय, स्त्रियांना आदरपूर्ण वागणूक दिल्याने तुमच्या विश्वासाची स्पष्ट साक्ष मिळू शकते. (मत्तय ५:१६) ख्रिस्ती तत्त्वांचा अवलंब होताना पाहिल्याने आपल्याला कोणता फायदा झाला याविषयी आफ्रिकेतली सलिमा ही तरुण स्त्री वर्णन करते.
“मी अशा वातावरणात लहानाची मोठी झाले की जिथं स्त्रियांना आणि मुलींना अतिशय वाईट वागणूक मिळायची. माझी आई १६ तास कामावर राबायची पण एखादं काम राहून गेलं की तिला फक्त कुरकूर ऐकायला मिळायची. माझे वडील तर पिऊन आले की तिला बेदम मारायचे. आमच्या भागातल्या बाकीच्या स्त्रियांची सुद्धा हीच गत होती. पण ही वागणूक चुकीची आहे हे मला माहीत होतं—त्यामुळं आमच्या जीवनात फक्त निराशा आणि दुःख वाढत होतं. परंतु, ही परिस्थिती बदलण्याचा काही मार्ग नव्हता.
“मी किशोरवयात असताना यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागले. स्त्रियांना आदर दिला पाहिजे हे प्रेषित पेत्राचे शब्द वाचल्यावर मी खूप प्रभावित झाले. पण मी विचार केला, ‘आमची इथली परंपरा पाहिली तर हा सल्ला कोणीही पाळत नसेल.’
“परंतु, मी राज्य सभागृहात, जिथं साक्षीदारांच्या सभा भरतात तिथं गेले तेव्हा स्त्रियांनी आणि पुरुषांनी देखील मला खूप प्रेमळपणे वागवले. मला आणखीनच आश्चर्य वाटलं की, तिथले पती आपल्या पत्नींची खरोखर काळजी घेत होते. माझा तिथल्या लोकांशी परिचय वाढला तेव्हा सगळ्या साक्षीदारांकडून ही अपेक्षा केली जाते हे मला कळालं. काही पुरुष माझ्यासारख्या पार्श्वभूमींतून आलेले होते, तरी आता ते स्त्रियांना आदराने वागवत होते. या मोठ्या कुटुंबात मी सुद्धा सामील व्हावं असं मला वाटू लागलं.”
कायमचा उपाय
सलिमाने जो आदर निरीक्षिला तो काही आकस्मिक नव्हता. तो देवाच्या वचनावर आधारित असलेल्या शिक्षण कार्यक्रमाचा परिणाम होता; देव ज्याप्रमाणे लोकांची प्रशंसा करतो त्याप्रमाणे एकमेकांचा आदर करण्यास तो लोकांची मदत करतो. यावरून आता काय केले जाऊ शकते आणि देवाच्या राज्याची सत्ता सबंध पृथ्वीवर स्थापली जाईल तेव्हा सगळीकडे काय केले जाईल हे दिसून येते. (दानीएल २:४४; मत्तय ६:१०) हे स्वर्गीय राज्य सर्व अन्यायाचा अंत करून टाकील. बायबल आपल्याला आश्वासन देते: “तुझी [यहोवाची] न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात.”—यशया २६:९.
आता देखील, धार्मिकतेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाने लाखो लोकांच्या विचारसरणीत परिवर्तन होत आहे. सर्व जिवंत मानव देवाच्या राज्याधीन होतील तेव्हा हे शिक्षण जगभर पसरेल आणि आदामाच्या पापामुळे स्त्रियांवरील पुरुषांच्या अत्याचाराचा नायनाट होईल. देवाचा नियुक्त राजा, येशू ख्रिस्त, आपल्या सत्तेला स्त्रियांविरुद्धच्या अत्याचाराने कलंकित होऊ देणार नाही. ख्रिस्ताच्या त्या राज्यसत्तेचे वर्णन देताना बायबल म्हणते: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील.”—स्तोत्र ७२:१२-१४.
या लेखमालेत स्त्रियांच्या समस्यांवर भर दिला होता. तथापि, अनेक पुरुषांनाही गैरवागणूक मिळते असे समजले जाते. सबंध इतिहासात, सामर्थ्यवान आणि दुष्ट पुरुषांनी, पुरुषांविरुद्ध त्याचप्रमाणे स्त्रियांविरुद्ध अवर्णनीय गुन्हे केले आहेत. आणि काही स्त्रियांनी देखील तेच केले आहे. उदाहरणार्थ, बायबलमध्ये ईजबेल, अथल्या आणि हेरोदिया सारख्या दुष्ट स्त्रियांनी निष्पाप रक्त सांडल्याची माहिती दिली आहे.—१ राजे १८:४, १३; २ इतिहास २२:१०-१२; मत्तय १४:१-११.
यास्तव, सर्व मानवजातीला देवाच्या राज्य सत्तेखालील नवीन जगाची आवश्यकता आहे. लवकरच तो दिवस उजाडेल तेव्हा, स्त्रिया किंवा पुरुषांनाही भेदभावाचा किंवा वाईट वागणुकीचा सामना करावा लागणार नाही. त्याउलट, सर्वांसाठी प्रत्येक दिवस “उदंड शांतिसुखाचा” असेल.—स्तोत्र ३७:११.
[१३ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती पती बायबल सूचनांचे अनुसरण करून आपल्या पत्नींना आदर आणि सन्मान देतात