खऱ्या उपासकांचा मोठा लोकसमुदाय—ते कोठून आले आहेत?
‘पहा! सर्व राष्ट्रे वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी . . . मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिला आहे.’—प्रकटीकरण ७:९.
१. प्रकटीकरणातील भविष्यसूचक दृष्टांत आज आपल्यासाठी अधिक आस्थेचे का आहेत?
जवळजवळ सा. युगाच्या पहिल्या शतकाच्या अंताला, प्रेषित योहानाने यहोवाच्या उद्देशासंबंधी अद्भुत घटनांचे दृष्टांत पाहिले. त्याने दृष्टांतात पाहिलेल्या काही गोष्टी आता पूर्ण होत आहेत. इतरांची पूर्णता नजिकच्या भवितव्यात व्हावयाची आहे. या सर्व घटना, सर्व सृष्टीसमोर यहोवाचे नाव पवित्र करण्याच्या त्याच्या महान उद्देशाच्या नाटकीय कळसावर केंद्रित आहेत. (यहेज्केल ३८:२३; प्रकटीकरण ४:११; ५:१३) शिवाय, या गोष्टींमध्ये आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनाचे भवितव्य गोवलेले आहे. ते कसे बरे?
२. (अ) प्रेषित योहानाने त्याच्या चवथ्या दृष्टांतात काय पाहिले? (ब) या दृष्टांतासंबंधी असलेले कोणते प्रश्न आपण विचारात घेणार आहोत?
२ प्रकटीकरणाच्या दृष्टांतातील चवथ्या मालिकेत योहानाने, ‘आमच्या देवाच्या दासांच्या’ कपाळांवर शिक्का मारेपर्यंत नाशाच्या वाऱ्यांना अडवून धरलेल्या देवदूतांना पाहिले. त्यानंतर त्याने सर्वात आनंदविणारी वाढ पाहिली—“सर्व राष्ट्री, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय” यहोवाची उपासना आणि त्याच्या पुत्राचा आदर ऐक्याने करत आहे. योहानाला सांगण्यात आले होते की हे लोक मोठ्या संकटातून बाहेर येतील. (प्रकटीकरण ७:१-१७) ‘आमच्या देवाचे दास’ असे वर्णन केलेले लोक कोण आहेत? तसेच संकटातून निभावलेल्यांचा “मोठा लोकसमुदाय” कोणाचा मिळून बनेल? तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल का?
‘आमच्या देवाचे दास’ कोण आहेत?
३. (अ) योहान १०:१-१८ मध्ये येशूने त्याच्या शिष्यांसोबतचा नातेसंबंध उदाहरण पुरवून स्पष्ट कसा केला आहे? (ब) येशूने त्याच्या बलिदानरुपी मृत्यूद्वारे त्याच्या मेंढरांसाठी काय शक्य केले?
३ येशूने त्याच्या मृत्यूच्या चार महिन्याआधी स्वतःला “उत्तम मेंढपाळ” आणि त्याचे शिष्य ज्यांच्यासाठी तो त्याचे जीवन बलिदान करणार होता त्यांना “मेंढरे” असे संबोधले. एका लाक्षणिक कळपात त्याला सापडलेल्या आणि त्यानंतर त्याने ज्यांची खास काळजी घेतली अशा मेंढरांचा त्याने खास उल्लेख केला. (योहान १०:१-१८)a येशूने प्रेमळपणे त्याच्या मेंढरांसाठी त्याचा जीव स्वाधीन करून त्यांना पाप आणि मृत्यूतून मुक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खंडणीचे मोल पुरवले.
४. येशूने येथे जे म्हटले त्याच्या अनुषंगाने मेंढरे या नात्याने एकत्र करण्यात आलेले प्रथम कोण आहेत?
४ परंतु हे सर्व करण्याआधी, येशूने उत्तम मेंढपाळ या नात्याने व्यक्तिगतरीत्या शिष्यांना जमवले. येशूच्या दाखल्यातील “द्वारपाळ” बाप्तिस्मा करणारा योहान याने पहिल्या शिष्यांची त्याच्यासोबत ओळख करून दिली. ‘अब्राहामाच्या संततीचा’ संयुक्त भाग होण्याच्या संधीला जे प्रतिसाद देतील अशा लोकांना येशू शोधत होता. (उत्पत्ती २२:१८; गलतीकर ३:१६, २९) त्याने त्यांच्या अंतःकरणात स्वर्गाच्या राज्याबद्दल गुणग्राहकता निर्माण केली व तो त्याच्या स्वर्गीय पित्याच्या घरी त्यांच्यासाठी जागा तयार करण्यास जाणार होता याची त्यांना खात्री दिली. (मत्तय १३:४४-४६; योहान १४:२, ३) त्याने अगदी उचितपणे म्हटले: “बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसापासून ते आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत.” (मत्तय ११:१२) ते ध्येय प्राप्त करण्यासाठी ज्यांनी त्याला अनुसरले ते येशूने सांगितलेल्या कळपातील आहेत हे शाबीत झाले.
५. (अ) प्रकटीकरण ७:३-८ मध्ये उल्लेखलेले ‘आमच्या देवाचे दास’ कोण आहेत? (ब) आध्यात्मिक इस्त्राएलांसोबत आणखी पुष्कळ जण उपासनेत भाग घेतील हे कोणती गोष्ट दाखवते?
५ प्रकटीकरण ७:३-८ मध्ये जे त्या स्वर्गीय ध्येयाप्रत यशस्वीरीत्या जातात त्यांनाही ‘आमच्या देवाचे दास’ असे संबोधले आहे. (पहा १ पेत्र २:९, १६.) तेथे उल्लेखिलेले १,४४,००० केवळ स्वाभाविक यहुदी आहेत का? येशूच्या दाखल्यातील लाक्षणिक कळपात केवळ यहुदीच आहेत का? निश्चितच नाही; ते देवाच्या आध्यात्मिक इस्त्राएलचे सदस्य आहेत जे सर्व येशूसोबत अब्राहामाच्या आध्यात्मिक संततीचे भागीदार आहेत. (गलतीकर ३:२८, २९; ६:१६; प्रकटीकरण १४:१, ३) कालांतराने निश्चितच एक काळ येईल जेव्हा निश्चित केलेली संख्या पूर्ण होईल. त्यानंतर काय? बायबलने भाकीत केल्याप्रमाणे, इतर जण—मोठा लोकसमुदाय—यहोवाची उपासना करण्यासाठी या आध्यात्मिक इस्त्राएलांना जाऊन मिळतील.—जखऱ्या ८:२३.
“दुसरी मेंढरे” —ते विदेशी ख्रिस्ती आहेत का?
६. योहान १०:१६ कोणत्या वाढीला निर्देशन करते?
६ योहान १०:७-१५ मध्ये एका मेंढवाड्याचा उल्लेख केल्यानंतर, येशूने आणखी एक गटाला असे म्हणून दृश्यात आणले की, “ह्या मेंढवाड्यातील नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीहि मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.” (योहान १०:१६) ती “दुसरी मेंढरे” कोण आहेत?
७, ८. (अ) दुसरी मेंढरे विदेशी ख्रिस्ती आहेत ही कल्पना एका चुकीच्या आधारावर का आधारलेली आहे? (ब) दुसऱ्या मेंढरांच्या ओळखीविषयीच्या आमच्या समजुतीचा पृथ्वीसाठी देवाच्या उद्देशांसोबत काय संबंध आहे?
७ ख्रिस्ती धर्मजगताच्या टीकाकारांचा सामान्यपणे असा दृष्टिकोन आहे की ही दुसरी मेंढरे विदेशी ख्रिस्ती असून नियमशास्त्र कराराच्या अधीन असलेले हे आधी सूचित केलेल्या मेंढवाड्यातील यहुदी आहेत तसेच हे दोन्ही गट स्वर्गात जातात. परंतु येशू, स्वतः यहुदी म्हणून जन्मला होता आणि त्याच्या राष्ट्रीयत्वामुळे तो नियमशास्त्राच्या कराराच्या अधीन होता. (गलतीकर ४:४) शिवाय, स्वर्गीय जीवनाचे प्रतिफळ मिळणाऱ्या दुसऱ्या मेंढरांना विदेशी ख्रिस्ती समजणारे लोक देवाच्या उद्देशातील एक महत्त्वाचा पैलू लक्षात घेण्यास अपयशी ठरतात. यहोवाने पहिल्या मानवांना निर्माण करून एदेन बागेत ठेवले तेव्हा त्याने हे स्पष्टपणे सांगितले की पृथ्वीवर लोकवस्ती व्हावी, सर्व पृथ्वी एक नंदनवन व्हावी व त्याची निगा राखणाऱ्या मानवांनी जीवनाचा आनंद चिरकाल लुटावा हा त्याचा उद्देश होता—त्यासाठी केवळ एक अट होती की त्यांनी त्यांच्या निर्माणकर्त्याचा सन्मान करून त्याची आज्ञा मानावी.—उत्पत्ती १:२६-२८; २:१५-१७; यशया ४५:१८.
८ आदामाने पाप केले तेव्हा यहोवाचा उद्देश निष्फळ ठरला नाही. आदाम ज्याची गुणग्राहकता बाळगण्यास अपयशी ठरला तिचा आनंद आदामाच्या संततीने लुटावा यासाठी देवाने प्रेमळपणे तरतूद केली. यहोवाने भाकीत केले की तो एक मुक्तीदाता, एक संतान निर्माण करील ज्याच्याद्वारे सर्व राष्ट्रांना आशीर्वाद उपलब्ध करून दिले जातील. (उत्पत्ती ३:१५; २२:१८) पृथ्वीवरील सर्व चांगले लोक स्वर्गात घेतले जातील असा त्या अभिवचनाचा अर्थ झाला नाही. येशूने त्याच्या शिष्यांना अशी प्रार्थना करावयास शिकवली: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) योहान १०:१-१६ मध्ये अभिलिखित केलेला दाखला त्याने सांगून अधिक काळ झाला नव्हता तोपर्यंत येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले, की त्याच्या पित्याने केवळ ‘लहान कळपालाच’ स्वर्गीय राज्य देण्याची मान्यता दिली होती. (लूक १२:३२, ३३) यास्तव आपण जेव्हा येशूने स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणवून घेतल्याचा व त्याच्या मेंढरांसाठी त्याचा जीव स्वाधीन केल्याचा तो दाखला वाचतो तेव्हा जे त्याच्या स्वर्गीय राज्याची पार्थिव प्रजा बनतील व ज्यांना तो त्याच्या प्रेमळ देखरेखीत आणतो, त्या बहुतांश लोकांना जर वगळले तर ते चुकीचे ठरेल.—योहान ३:१६.
९. १८८४ मध्येच, बायबल विद्यार्थ्यांनी दुसऱ्या मेंढरांची ओळख काय असेल असे समजले?
९ या पृथ्वीवर, देवाच्या मूळ उद्देशाला पूर्ण करणाऱ्या परिस्थितीत जगण्याची संधी दिली जाणाऱ्या लोकांची म्हणजेच, दुसऱ्या मेंढरांची ओळख १८८४ मध्येच वॉचटावरने करून दिली. इतर मेंढरातील काही लोक येशूच्या पार्थिव सेवेआधी हयात असावेत आणि मग मरण पावले असावेत हे त्या सुरवातीच्या बायबल विद्यार्थ्यांनी जाणले. परंतु, आणखी काही सविस्तर माहिती त्यांना योग्यरीतीने समजली नाही. उदाहरणार्थ, त्यांना असे वाटले की दुसऱ्या मेंढरांचे एकत्रीकरण सर्व अभिषिक्त जणांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ प्राप्त झाल्यावर होणार होते. तरीही, दुसरी मेंढरे केवळ विदेशी ख्रिस्ती नव्हते हेही त्यांनी निश्चितपणे जाणले. दुसऱ्या मेंढरांपैकी एक होण्याची संधी यहुदी आणि विदेशी दोहोंना तसेच सर्व राष्ट्र आणि वंशाच्या लोकांना उपलब्ध आहे.—पडताळा प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
१०. येशू ज्यांना खरोखर त्याची दुसरी मेंढरे समजतो त्यांच्यापैकी एक होण्यासाठी आपल्याबद्दल कोणती गोष्ट खरी असली पाहिजे?
१० येशूने दिलेल्या वर्णनानुसार असण्यासाठी, दुसरी मेंढरे असणाऱ्या लोकांनी, मग ते कोणत्याही वंशाचे किंवा जातीचे असोत, येशू ख्रिस्ताला उत्तम मेंढपाळ म्हणून ओळखले पाहिजे. यामध्ये काय गोवलेले आहे? लीनता आणि अनुसरण्याची स्वेच्छा हे मेंढरांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण त्यांनी प्रदर्शित केले पाहिजेत. (स्तोत्र ३७:११) लहान कळपाविषयी खरे आहे त्याप्रमाणे, त्यांनी ‘त्याची [उत्तम मेंढपाळाची] वाणी ओळखली’ पाहिजे व त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतरांना, स्वतःला बहकविण्याला वाव देऊ नये. (योहान १०:४; २ योहान ९, १०) आपल्या मेंढरांसाठी आपला जीव स्वाधीन करताना येशूने काय केले त्याच्या महत्त्वाची त्यांनी गुणग्राहकता बाळगावी आणि त्या तरतूदीवर पूर्ण भरवसा ठेवावा. (प्रेषितांची कृत्ये ४:१२) उत्तम मेंढपाळ त्यांना, केवळ यहोवाचीच पवित्र सेवा करण्यास, प्रथम राज्याचा शोध घेण्यास, जगापासून वेगळे राहण्यास व एकमेकांबद्दल आत्म-बलिदानाची प्रीती दाखण्यास आर्जवतो तेव्हा त्यांनी त्याची वाणी ‘ऐकलीच’ पाहिजे. (मत्तय ४:१०; ६:३१-३३; योहान १५:१२, १३, १९) येशू ज्यांच्याकडे त्याची दुसरी मेंढरे या नात्याने पाहतो त्यांच्या वर्णनाप्रमाणे तुम्ही आहात का? तुम्हाला तसे होण्याची इच्छा आहे का? जे खरोखर येशूची दुसरी मेंढरे होतात त्या सर्वांना किती मौल्यवान नातेसंबंध उपलब्ध होतो!
राज्याधिकाराला सन्मान
११. (अ) येशूने त्याच्या उपस्थितीच्या चिन्हामध्ये मेंढरे आणि शेरडे यांच्याविषयी काय म्हटले? (ब) येशू ज्यांचा उल्लेख करतो ते बंधू कोण आहेत?
११ येशूने हा दाखला दिल्यानंतर अनेक महिन्यानंतर तो पुन्हा जरुसलेममध्ये येतो. जैतुनाच्या डोंगरावर बसून मंदिराचे दृश्य पाहत असताना, त्याने त्याच्या शिष्यांना ‘त्याच्या येण्याच्या व ह्या युगाच्या समाप्तीच्या चिन्हाविषयीची’ सविस्तर माहिती दिली. (मत्तय २४:३) त्याने पुन्हा मेंढरांच्या एकत्रीकरणाविषयीची बोलणी केली. इतर गोष्टींपैकी, तो म्हणाला: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व रा जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील.” या दाखल्यात, येशूने दाखवले, की अशाप्रकारे राजाने ज्यांच्याकडे लक्ष दिले त्यांचा न्याय, त्यांनी त्याच्या ‘बंधूंना’ ज्याप्रमाणे वागवले त्याच्या आधारावर केला जाईल. (मत्तय २५:३१-४६) हे बंधू कोण आहेत? ते आत्म्याने अभिषिक्त ख्रिस्ती असल्यामुळे “देवाचे पुत्र” आहेत. येशू देवाचा ज्येष्ठ पुत्र आहे. यास्तव, ते ख्रिस्ताचे बंधू आहेत. प्रकटीकरण ७:३ मध्ये नमूद केलेले ते ‘आमच्या देवाचे दास आहेत,’ ज्यांना ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात भाग घेण्यासाठी मानवजातीतून निवडले आहे.—रोमकर ८:१४-१७.
१२. लोक ख्रिस्ताच्या बंधूंसोबत ज्याप्रकारे वागतात ते अतिमहत्त्वाचे का आहे?
१२ राज्याच्या या वारिसांबरोबर इतर मानव ज्याप्रकारे वागतात ते अति महत्त्वाचे आहे. येशू ख्रिस्त आणि यहोवा त्यांच्याकडे ज्या दृष्टीने पाहतात त्याच दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना पाहता का? (मत्तय २४:४५-४७; २ थेस्सलनीकाकर २:१३) या अभिषिक्त जणांबद्दल एखाद्या व्यक्तीची जी मनोवृत्ती आहे ती, स्वतः येशू ख्रिस्त आणि त्याचा पिता जो विश्वाचा सार्वभौम आहे या दोघांबद्दलच्या त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीला प्रतिबिंबित करते.—मत्तय १०:४०; २५:३४-४६.
१३. बायबल विद्यार्थ्यांना १८८४ मध्ये, मेंढरे आणि शेरडे यांचा दाखला किती प्रमाणात समजला?
१३ पृथ्वीवर परिपूर्ण जीवनाची आशा बाळगणारे या दाखल्यातील “मेंढरे” आहेत हे ऑगस्ट १८८४ च्या वॉचटावर अंकाने अगदी अचूकपणे निदर्शविले. तेव्हा असेही समजले, की ख्रिस्त त्याच्या वैभवी स्वर्गीय सिंहासनावर बसून राज्य करील त्यावेळी हा दाखला लागू झाला पाहिजे. तरीही, तेथे वर्णन केलेले वेगळे करण्याचे कार्य तो कधी सुरू करील किंवा ते किती काळ टिकेल हे त्यांना स्पष्टपणे समजले नव्हते.
१४. १९२३ मधील एका अधिवेशनाने बायबल विद्यार्थ्यांना येशूच्या भविष्यसूचक दाखल्याची पूर्णता कधी व्हावयाची होती याची समज मिळण्यासाठी कशी मदत दिली?
१४ परंतु, १९२३ मध्ये, एका अधिवेशनाच्या भाषणात, वॉचटावर सोसायटीचे भूतपूर्व अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी मेंढरे आणि शेरडांच्या दाखल्याच्या पूर्णतेच्या काळाचे स्पष्टीकरण दिले. का बरे? त्याचे एक कारण म्हणजे, तो दाखला दाखवतो त्याप्रमाणे राजाचे बंधू—निदान त्यांच्यापैकी काही जण—पृथ्वीवरच असतील. मानवातील केवळ आत्म्याने अभिषिक्त शिष्य त्याचे खरोखरचे बंधू म्हटले जातील. (इब्रीयांस २:१०-१२) हे लोक, संपूर्ण हजार वर्षीय राजवटीदरम्यान येशूने वर्णिल्याप्रमाणे लोकांना त्यांना चांगले वागवण्याची संधी देत पृथ्वीवर राहणार नाहीत.—प्रकटीकरण २०:६.
१५. (अ) येशूच्या दाखल्यातील मेंढरांना योग्यपणे ओळखण्यासाठी कोणत्या वाढींनी बायबल विद्यार्थ्यांना मदत केली? (ब) मेंढरांनी राज्याच्या गुणग्राहकतेचा पुरावा कसा दिला आहे?
१५ सन १९२३ च्या त्या भाषणात, मेंढरे आणि शेरड्यांच्या प्रभूने केलेल्या वर्णनानुसार लोकांना ओळखण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु त्या दाखल्याचा पूर्ण अर्थ स्पष्ट होईपर्यंत इतर बाबींना समजून घेणे आवश्यक होते. येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये, यहोवाने प्रगतीशीलपणे हे महत्त्वपूर्ण तपशील त्याच्या सेवकांच्या निदर्शनास आणले. “विश्वासू आणि बुद्धिमान दास” पृथ्वीवरील आत्म्याने अभिषिक्त असलेल्या ख्रिश्चनांचा संपूर्ण वर्ग आहे ही १९२७ मध्ये मिळालेली स्पष्ट समज त्या महत्त्वपूर्ण तपशीलात समाविष्ट आहे; तसेच योनादाबाने येहूसोबत केले त्याप्रमाणे यहोवाच्या अभिषिक्त सेवकांसोबत निर्भीडपणे ओळख देण्याची गरज १९३२ मध्ये समजली. (मत्तय २४:४५; २ राजे १०:१५) त्या काळी, प्रकटीकरण २२:१७ च्या आधारावर या मेंढरासमान लोकांना खासकरून राज्याचा संदेश इतरांपर्यंत घेऊन जाण्यात भाग घेण्याचे उत्तेजन दिले जात होते. मशीही राज्याबद्दलची त्यांची गुणग्राहकता त्यांना प्रभुच्या अभिषिक्त जणांबद्दल केवळ मानवहितवादी दया दाखवण्यास नव्हे तर ख्रिस्ताद्वारे यहोवाला त्यांचे जीवन समर्पित करण्यास व त्याचे अभिषिक्त जण जे कार्य करत आहेत त्यात आवेशाने भाग घेऊन त्यांच्यासोबत अगदी जवळचा सहवास ठेवण्यास भाग पाडणार होते. तुम्ही ते करत आहात का? जे करतात त्यांना राजा असे म्हणेल: “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” त्यांच्यापुढे राज्याच्या पार्थिव क्षेत्रातील परिपूर्णतेच्या सार्वकालिक जीवनाची भव्य आशा असेल.—मत्तय २५:३४, ४६.
“मोठा लोकसमुदाय”—ते कोठे जात आहेत?
१६. (अ) प्रकटीकरण ७:९ मधील मोठा समूह किंवा मोठा लोकसमुदाय याच्या ओळखीविषयी सुरवातीच्या बायबल विद्यार्थ्यांच्या कोणत्या चुकीच्या कल्पना होत्या? (ब) त्यांचा हा दृष्टिकोन कधी आणि कोणत्या आधारावर सुधारण्यात आला?
१६ काही काळासाठी, प्रकटीकरण ७:९, १० मधील मोठा समूह (किंवा मोठा लोकसमुदाय) योहान १०:१६ मधील दुसरी मेंढरे आणि मत्तय २५:३३ मधील मेंढरांपासून वेगळा असल्याचा विश्वास यहोवाचे सेवक करत होते. बायबल म्हणते, की ते “राजासनासमोर” उभे आहेत म्हणून असा विचार केला जात होता की ते स्वर्गात ख्रिस्तासोबत सहवारिस म्हणून राज्य करण्यासाठी राजासनावर नव्हे तर राजासनाच्या समोरच्या दुय्यम ठिकाणी असतील. ते कमी विश्वासू ख्रिस्ती होते ज्यांनी खऱ्या आत्मबलिदानाचा आत्मा प्रदर्शित केला नाही असा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन होता. १९३५ मध्ये तो दृष्टिकोन सुधारण्यात आला.b मत्तय २५:३१, ३२ या वचनांना विचारात घेऊन प्रकटीकरण ७:९ चे परीक्षण करण्यात आले आणि तेव्हा हे स्पष्ट झाले, की पृथ्वीवरील लोक “राजासनासमोर” असतील. देवाकडे विश्वासूपणाचे दोन दर्जे नाहीत हेही निदर्शनास आणले गेले. ज्या सर्वांना त्याची स्वीकृती प्राप्त होईल त्यांनी त्याला सत्वनिष्ठा राखलीच पाहिजे.—मत्तय २२:३७, ३८; लूक १६:१०.
१७, १८. (अ) पृथ्वीवरील चिरकालिक जीवनाच्या आशेकडे लक्ष लावलेल्यांच्या संख्येत १९३५ पासून कोणत्या कारणास्तव मोठी वाढ होऊ लागली? (ब) कोणत्या महत्त्वपूर्ण कार्यात मोठा लोकसमुदाय आवेशाने भाग घेत आहे?
१७ अनेक वर्षांसाठी यहोवाच्या लोकांनी पृथ्वीबद्दल देवाच्या उद्देशांविषयी बोलणी केली होती. १९२० च्या दशकात जे घडणार होते त्याची त्यांनी अपेक्षा केल्यामुळे “आता जिवंत असलेले लाखो कधीही मरणार नाहीत” असे त्यांनी घोषित केले. परंतु त्याकाळी जीवनासाठी असलेल्या देवाच्या तरतूदींना स्वीकारलेले लाखो नव्हते. ज्या बहुतांश लोकांनी सत्याचा स्वीकार केला त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याने स्वर्गीय जीवनाची आशा उत्पन्न केली. परंतु १९३५ नंतर विशेषकरून, एक उल्लेखनीय बदल घडून आला. वॉचटावर नियतकालिकाने पृथ्वीवरील चिरकालिक जीवनाच्या आशेकडे दुर्लक्ष केले होते असे नाही. अनेक दशकांपासून यहोवाचे सेवक त्याच्याविषयी बोलले होते आणि बायबलच्या वर्णनानुसार आहेत अशांना त्यांनी शोधले होते. परंतु, यहोवाच्या नियुक्त वेळी, मोठ्या लोकसमुदायाच्या भावी सदस्यांनी स्वतःला प्रकट केले या बाबीकडे त्याने त्याचे लक्ष पुरवले.
१८ उपस्थितीचे अहवाल दाखवतात, की अनेक वर्षांसाठी स्मारक विधीला उपस्थित राहणारे बहुतेक स्मारकविधीच्या बोधचिन्हांचा सहभाग घेत होते. परंतु १९३५ नंतरच्या २५ वर्षांमध्ये, ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वार्षिक स्मारकाची उपस्थिती सहभाग घेणाऱ्यांच्या संख्येपेक्षा नाट्यमयरीत्या शेकडो पटीने वाढली. हे इतर कोण होते? मोठ्या लोकसमुदायाचे भावी सदस्य. स्पष्टतः, त्यांना एकत्र करण्याचा आणि नजिक असलेल्या मोठ्या संकटातून बचावण्यासाठी त्यांना तयार करण्याचा यहोवाचा समय आला होता. भाकीत केल्याप्रमाणे, ते “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी” आले आहेत. (प्रकटीकरण ७:९) येशूने भाकीत केलेल्या कार्यात ते आवेशाने भाग घेतात ज्याविषयी येशू म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.
[तळटीपा]
a योहान १० अध्यायातील मेंडवाड्यांच्या बहुव्यापक व अद्ययावत चर्चेसाठी टेहळणी बुरुज फेब्रुवारी १५, १९८४, पृष्ठे १०-२०, ३१ पहा.
b ऑगस्ट १ आणि १५, १९३५ चे द वॉचटावर.
तुमचे विवेचन काय आहे?
▫ प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायातील दृष्टांत खास आस्थेचा का आहे?
▫ योहान १०:१६ ची दुसरी मेंढरे विदेशी ख्रिश्चनांपुरतीच मर्यादित का नाहीत?
▫ दुसऱ्या मेंढरांबद्दलच्या बायबलच्या वर्णनाप्रमाणे असणाऱ्यांबद्दल काय खरे असले पाहिजे?
▫ मेंढरे आणि शेरड्यांचा दाखला राज्याधिकाराबद्दलच्या सन्मानाला ठळकपणे कसा दाखवतो?
▫ प्रकटीकरण ७:९ च्या मोठ्या लोकसमुदायाला एकत्र करण्याची यहोवाची वेळ केव्हा आली हे काय सूचित करते?