भयाने जगावर पकड का बसवली आहे?
भयामध्ये कोणास जगावेसे वाटते? साधारण व्यक्ती, त्याच्या जीवाला किंवा मालमत्तेला कोणताही धोका नसेल, अशी सुरक्षितता इच्छितो. यासाठीच अनेक जण, हिंसेने पिडित असलेल्या भागाला सोडून दुसरीकडे जाऊन राहतात. परंतु, भीतीला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी तर सगळीकडेच आहेत.
आण्विक शस्त्र आणि अणुभट्टयांच्या अपघातांचा धोका, मानवांचा नाश होण्याच्या भीतीला जागृत करतो. बेसुमार वाढलेली हिंसा भीती वाढवते. अनेकांना याचे भय लागून आहे की, एड्स हा रोग, या शतकाचा सर्वात जास्त जीवघेणा साथीचा रोग होईल. आमच्या पर्यावरणाचा नाश, हे भय इतर आणखी भयांतील एक आहे. हे सर्व भय विशेष विलक्षणीय आहे का? तसेच, भय नसलेल्या जगात राहण्याची आम्ही आशा बाळगू शकतो का?
जगव्याप्त भय विलक्षणीय
आजचे जगव्याप्त भय विलक्षणीय आहे, कारण त्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये आधीच भाकीत केले होते. येशू ख्रिस्ताने त्याच्या शेवटल्या दिवसांच्या भविष्यवाणीमध्ये, अशा काही परिस्थितींचा उल्लेख केला ज्या भयाला कारणीभूत ठरतील. त्याने म्हटले: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ आणि भूमीकंप होतील.” येशू, ‘अनीतीची वाढ होईल’ याविषयीही बोलला. १९१४ पासून, अतुलनीय युद्धे, दुष्काळ, भूमीकंप आणि अनीती यांच्या परिणामामुळे तीव्र भय आणि जीवित हानी झाली आहे.—मत्तय २४:७-१४.
लोकांची मनोवृत्ती देखील, आज भयात आणखी भर घालत आहे. २ तीमथ्य ३:१-४ मध्ये आपण, प्रेषित पौलाचे भविष्यसूचक शब्द वाचतो: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रुर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी अशी ती होतील.” या शेवटल्या दिवसांमध्ये आम्ही अशा लोकांनी घेरलेलो असल्यामुळेच इतके भय आहे!
हे जग कशाची अपेक्षा करू शकते
येशूने या समयाची तुलना, नोहाच्या काळातील जगाच्या शेवटल्या दिवसांसोबत केली. निसंशये, तेव्हा देखील लोकांमध्ये अधिक भय होते कारण, पवित्र शास्त्राचा ऐतिहासिक अहवाल सांगतो: “त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.” यास्तव, “देव नोहाला म्हणाला, ‘सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे.’” (उत्पत्ती ६:११, १३) ते दुष्ट जग इतके हिंसक बनले होते की, देवाने त्याचा गोलार्धव्याप्त जलप्रलयाकरवी अंत केला. परंतु, यहोवा देवाठायी प्रीती असल्यामुळे त्याने धार्मिक नोहा आणि त्याच्या कुटुंबाला बचावून ठेवले.—२ पेत्र २:५.
यास्तव, आजचे हिंसक जग कशाची अपेक्षा करू शकते? दुसऱ्यांचे भले करण्याऐवजी त्यांच्याबद्दल तीव्र अपमान दाखवणे याचाच देवाला वीट आहे. हे स्तोत्रकर्त्याच्या शब्दांवरून स्पष्ट दिसते: “परमेश्वर [यहोवा, NW] नीतिमानाला कसास लावितो, त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो.” (स्तोत्र ११:५) यहोवाने नोहाच्या दिवसातील हिंसक जगाचा अंत केला. तर मग, देवाने भय-प्रेरक हिंसेने पछाडलेल्या या जगाचा अंत करावा अशी आम्ही अपेक्षा करू नये का?
प्रेषित पेत्राला, ख्रिस्ताच्या उपस्थितीविषयी बोलण्यासाठी, आणि सध्याच्या दुष्ट जगावर येणाऱ्या नाशाविषयी भाकीत करण्यासाठी ईश्वरीय प्रेरणा झाली. त्याने लिहिले: “स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.’” पेत्राने मग, मानवजातीवर राज्य करणाऱ्या अपूर्ण व्यवस्थेला चित्रित करण्यासाठी “आकाश” ही संज्ञा, आणि अधार्मिक मानवी समाजासाठी “पृथ्वी” हा शब्द वापरला. त्याने म्हटले, “कारण ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा [नोहाच्या दिवसात] पाण्याने बुडून नाश झाला; पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवली आहेत.”—२ पेत्र ३:३-७.
याच विचारांच्या मालिकेत, पौलाने दर्शविले की, ख्रिस्त आणि त्याचे शक्तिशाली देवदूत ‘जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा ते सूड उगवतील . . . युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.’ (२ थेस्सलनीकाकर १:६-९) पवित्र शास्त्राचे शेवटले पुस्तक, राष्ट्रांना “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी” एकत्रित करण्याविषयी बोलते, आणि आम्हाला याची हमी देते की, यहोवा “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करील.—प्रकटीकरण ११:१८; १६:१४-१६.
भीतीचा नव्हे तर आनंदाचा समय
पवित्र शास्त्राने या जगासाठी ज्या गोष्टी भाकीत केल्या त्या ऐकून घाबरून जाण्याऐवजी, सरळ मनाच्या लोकांना आनंद करण्याचे कारण आहे. यहोवा फार लवकर या दुष्ट जगावर अंत आणील, परंतु हे, धार्मिकतेची आवड बाळगणाऱ्यांसाठीच केले जाईल. सध्याच्या व्यवस्थिकरणाच्या ईश्वरी शेवटापाठोपाठ काय येणार आहे? देवाच्या स्वर्गीय राज्याखाली एक नवी व्यवस्था, ज्याच्याविषयी येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकवले होते! तो म्हणाला: “ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) देवाची या पृथ्वीवर इच्छा पूर्ण झाल्यावर कोणते बदल होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते?
युद्धे आणि त्यांचे भय यांचा अंत झालेला असेल. स्तोत्र ४६:९ म्हणते: “[यहोवा देव] दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो; [युद्धाचे] रथ अग्नीत जाळून टाकितो,” (NW). तेव्हा, लोक “आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यास घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.
प्राणघातक आजार त्यानंतर कधीच भयाला कारणीभूत होणार नाहीत की जीव घेणार नाहीत. ईश्वरी अभिवचन म्हणते: “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) वा! किती ते आनंदाचे कारण!
गुन्हे आणि हिंसा याजशी संबंधित असणारे भय हे देखील, गतकाळातील गोष्टीत जमा होईल. स्तोत्र ३७:१०, ११ अभिवचन देते: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”
सध्याच्या भयाची जागा, खरी शांती आणि सुरक्षितता कसे घेतील बरे? एक धार्मिक सरकार—देवाचे राज्य याच्याद्वारे. आमच्या काळाविषयी, दानीएल २:४४ स्पष्टपणे सांगते: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” यहोवाचा नियुक्त राजा, येशू ख्रिस्ताला, ‘त्याच्या पायाखाली सर्व शत्रु ठेवीपर्यंत राज्य केले पाहिजे.’ (१ करिंथकर १५:२५) येशूची हजार वर्षीय राजवट, अनंतकाळासाठी आनंदी मानवांनी वसलेल्या नंदनवनमय पृथ्वीबद्दल देवाच्या मूळ उद्देशाला पूर्ण करील.—लूक २३:४३; प्रकटीकरण २०:६; २१:१-५.
त्या नंदनवनमय पृथ्वीवर, एक सुदृढ भय असेल. ते “यहोवाचे भय” असेल. (नीतिसूत्रे १:७, NW) वास्तविक पाहता, आम्हाला हे भय आताही असले पाहिजे. कारण, हा सखोल भीतीयुक्त आदर तसेच आपल्याला देवाची प्रेमळ कृपा व चांगुलपणा याबद्दल गुणग्राहकता वाटत असल्यामुळे कदाचित आम्हाकडून त्याला नाखूष करणारे असे काही तरी घडेल अशी वाटणारी भीती समाविष्ट आहे. या भयासाठी, यहोवावर पूर्ण भाव ठेवणे आणि त्याला विश्वासूपणे आज्ञाधारकता दाखवणे या गोष्टी आवश्यक आहेत.—स्तोत्र २:११; ११५:११.
भयजनक घटना, या शेवटल्या दिवसांना चिन्हांकित करतात. परंतु, जर आम्ही देवाबद्दलची आमची प्रीती शाबीत केली, तर आपण घाबरून जाण्याऐवजी आनंद करू शकतो. पवित्र शास्त्रीय भविष्यवाण्या दाखवतात की, या जगाचा ईश्वरी शेवट उंबरठ्यावर आहे. त्याची जागा, यहोवा देवाचे धार्मिकतेचे वचनदत्त नवे जग घेईल. (२ पेत्र ३:१३) निश्चितच, फार लवकर देवाच्या राज्य शासनाखाली, अहितकारक भय नसलेले एक जग येईल.
[६ पानांवरील चौकट]
एका किरकोळ अंकाचे सामर्थ्य
टॉमाश नावाच्या, पोलंड येथील एका तरुण पुरूषाला, कायद्याच्या अडचणीत सापडल्यामुळे ते राष्ट्र सोडून तेथून पळ काढावा लागला. सहा महिन्यांसाठी तो, तंबूत राहून, विविध कामे करून युरोपमध्येच भटकत होता. या दरम्यान, एक प्रश्न त्याच्या मनात सतत येत असे: जीवनाचा उद्देश काय आहे?
टॉमाशला पॉलिश भाषेत, द वॉचटावरची एक प्रत दिली गेली, तेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्याने ती प्रत अनेक वेळा वाचली आणि तो शोधत असलेले सत्य याच नियतकालिकात आहे हे त्याने ओळखले. टॉमाश २०० किलोमीटर भटकत भटकत झेलटर्स ताऊनुस, जर्मनी येथील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरात पोहचला. सोमवारी संध्याकाळी तेथे पोंहचल्यावर, त्याने त्याच्याकडील वॉचटावर नियतकालिकाची प्रत बाहेर काढून म्हटले: “या नियतकालिकात जे आहे त्याचे मला आणखी स्पष्टीकरण देणारे कोणीतरी हवे आहे. मी काय केले पाहिजे?”
त्याच संध्याकाळी, यहोवाच्या दोन साक्षीदारांनी, त्यांच्या संभाषणासाठी मूलविषय म्हणून पवित्र शास्त्राचा वापर करून टॉमाशसोबत जीवनाच्या उद्देशाबद्दलची बोलणी केली. आणखी शिकण्याच्या जिज्ञासेने, टॉमाश त्या आठवड्यात प्रत्येक दिवशी शाखा दप्तरात, पवित्र शास्त्राचा आणि तुम्ही पृथ्वीवर अनंतकालसाठी जगू शकाल या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी येत होता.
टॉमाशला पोलंडला गेल्यावर समस्यांचा सामना करावा लागणार होता तरीही, त्याने पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने, झेलटर्स शाखा दप्तरात आल्यावर केवळ चार दिवसानंतर, लगेचच, म्हणजे शुक्रवारी, टॉमाश त्याच्या मायदेशी परतण्यासाठी निघाला. पोलंड येथे पोहचल्यावर त्याने लागलीच यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करण्यास सुरवात केली. टॉमाशने जलदगतीने प्रगती केली व तो जे काही शिकत होता त्याविषयी इतरांसोबत बोलू लागला. ऑक्टोबर १९९३ मध्ये, झेलटर्सला पहिल्यांदा भेट दिल्यानंतर केवळ चार महिन्यांनी, तो बाप्तिस्मा प्राप्त झालेला यहोवाचा एक साक्षीदार बनला.
द वॉचटावरच्या केवळ एका प्रतीने या तरुण पुरूषाला जीवनाच्या उद्देशाविषयी बारकाईने चौकशी करण्यास मदत केली!
[७ पानांवरील चित्रं]
येशू ख्रिस्ताकरवीच्या राज्य शासनाखाली भय, पुन्हा कधीच जगावर पकड बसवणार नाही