त्यांनी आमच्यासाठी उदाहरण मांडले
क्रॅग झंकर द्वारा कथन
आठ वर्षांपासून मी व माझी पत्नी, गेअल् पायनियर म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांचे पूर्ण वेळेचे सेवक आहोत. मागील सहा वर्षांपासून आम्ही ऑस्ट्रेलियातील मुळचे रहिवाशी असलेल्या एकाकी ग्रामीण भागात सेवा करत आहोत. आम्ही केवळ, माझ्या पालकांनी व आजी आजोबांनी मांडलेल्या उदाहरणाचे अनुकरण करत आहोत.
मला आता, खासकरून माझ्या आजी आजोबांविषयी तुम्हाला काही सांगू द्या. आम्ही मायेने त्यांना ओपा व ओमा असे म्हणत असू, जे डच भाषेत आजी आजोबा या समान होते. माझे आजोबा, चार्ल्स् हॅरिज्, मेलबर्न या ठिकाणी जवळ जवळ ५० वर्षे राहिले आहेत व तेथेच अजूनही आवेशाने सेवा करत आहेत.
पवित्र शास्त्रातील सत्य शिकणे
ओपाचा जन्म, ऑस्ट्रेलियाच्या बेटावरील प्रांतात असलेल्या टास्मानिया या लहान शहरात झाला होता. १९२४ मध्ये ते १४ वर्षांचे असताना, त्यांच्या वडिलांनी कप्पे असलेली खलाशाची पेटी लिलावातून आणली. आध्यात्मिक दृष्ट्या बोलायचे झाल्यास, ती खरीच धन असलेली पेटी होती. कारण, तिच्यात वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट् सोसायटीचे पहिले अध्यक्ष, चार्ल्स् टेझ रसेल यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच होता
असे वाटते की, ओपाच्या वडिलांना विशेषपणे पुस्तकात काही रस वाटत नव्हता, पण ओपाने वाचायला सुरवात केली आणि त्यात पवित्र शास्त्रातील महत्त्वाच्या सत्य गोष्टी आहेत हे त्यांनी लगेच ओळखले. यास्तव, त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशकांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना शोधण्यास सुरवात केली, ज्यांना आता यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाते. जे पवित्र शास्त्र सत्य ते शिकत होते त्यांना त्याविषयी अधिक स्पष्टीकरण मिळण्यासाठी त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती.
बरीच विचारपूस केल्यावर, दुसऱ्यांना शिकवण्याच्या कार्यात क्रियाशील असलेल्या तीन वयस्कर स्त्रिया त्यांना भेटल्या. तरुण चार्ल्स्वर त्यांचा अतिशय प्रभाव पडला. सरतेशेवटी, १९३० मध्ये त्यांनी स्वतःचे यहोवा देवाला समर्पण केले आणि पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. त्यांनी त्यांचे कसायाचे काम सोडून दिले व ते सिडनीच्या उत्तरेला गेले, तेथे त्यांना पूर्ण वेळेच्या सुवार्तिकाची नेमणूक मिळाली.
ऑस्ट्रेलियात पायनियरींग करणे
पुढील काही वर्षांनंतर, चार्ल्स्च्या क्षेत्रात, सिडनीतील बॉण्डी उपनगराचा समुद्रकिनारा तसेच, न्यू साऊथ वेल्स राज्यातील ग्रामीण भागाचा समावेश होता. त्यानंतर त्यांना पश्चिम ऑस्ट्रेलिया, खंडाच्या दुसऱ्या बाजूला हजारो किलोमीटर दूर असलेल्या पर्थ येथे नेमण्यात आले. सहा महिने त्यांनी पर्थच्या व्यापारी क्षेत्रात साक्षीकार्य केले. नंतर, इतर दोन पायनियरांसोबत त्यांना ऑस्ट्रेलियाच्या वायव्येकडील विरळ लोकवस्ती असलेल्या क्षेत्रात नेमणूक मिळाली.
आर्थर, विल्स्, जॉर्ज रोल्स्टन, आणि चार्ल्स् या तिघांसाठी प्रचाराच्या नेमणूकीचे क्षेत्र, इटलीच्या चौपट आकाराचे होते! विरळ लोकवस्ती, खेड्यापाड्याचा ओसाड प्रदेश व तीव्र उष्णता होती. कधी कधी, गुरढोरांचे ठिकाण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुरणातून ५०० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. ते वापरत असलेली मोटार १९३० च्या दर्जाच्या तुलनेत देखील मोडकळीस आलेली होती, परंतु त्यांच्यात दृढ विश्वास व करारीपणा देखील होता.
अरुंद, खड्डे असलेले चिखलाचे रस्ते उंटाच्या पावलांच्या खूणांनी एकमेकांना छेदलेले होते, आणि झाडाचे खोड असलेल्या बुंध्यांना (बुलडस्ट म्हटलेल्या) चिकणमातीने चोहोकडे धोकेदायकपणे लपवले होते. त्यामुळे अनेकदा मोटारीच्या र्स्प्रिगा तुटत असत. दोन प्रसंगी, मागील आंस (गाडीच्या दोन चाकांना जोडणारा) तुटला, व अनेक वेळा चाके चिरली गेली. पायनियरांनी त्यांचा पुढील प्रवास चालू ठेवण्यासाठी अनेकदा, मोटा गाडीच्या चिरलेल्या चाकालाच आतून जुन्या चाकांपासून तयार केलेली अस्तरे बनवली व त्याला खिळे ठोकले.
लहान असताना, मी ओपाला विचारले, हे कार्य अशा खडतर परिस्थितीत चालू ठेवण्यासाठी त्यांना कशामुळे उत्तेजन मिळाले. त्यांनी म्हटले, त्यांच्या दुरावण्यामुळे, यहोवाशी त्यांची जवळीक झाली होती. त्यांनी म्हटले की, एके काळी खडतर वाटणाऱ्या परिस्थितीचे पर्यवसान आध्यात्मिक आशीर्वादात झाले.
अनेक लोक भौतिक संपत्ती मिळवण्याची अधिक चिंता करत असल्याचे दिसत असताना, ओपाने मोठेपणा किंवा फाजील अहंकाराचा कोणताही संकेत न देता आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी मला आठवण करुन दिली, “कमी गोष्टी बाळगून जीवन जगणे अधिक उत्तम आहे, जरुरीचे वाटले तेव्हा येशू उघड्यावर झोपण्यास देखील इच्छूक होता, तर मग, आमच्या नेमणूकीत त्याची गरज पडल्यास आम्ही देखील तसेच करण्यास हवे.” (मत्तय ८:१९, २०) खरोखर, त्यांनी व त्यांच्या सोबत्यांनी तसेच केले.
परदेशी क्षेत्रात आमंत्रण दिले
१९३५ मध्ये ओपाला, दक्षिण पॅसिफिकच्या बेटावरील लोकांना साक्ष देण्याची, प्रचारकार्याची नवी नेमणूक मिळाली. इतर सहा जणांसोबत त्यांनी वॉचटावर सोसायटीच्या ५२ फुट लाईटबेअरर या जहाजाने प्रवास केला.
एके प्रसंगी, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला असलेल्या कोरल समुद्रात असताना, लाईटबेअररचे सहाय्यकारी इंजिन खराब झाले. वारा नसल्यामुळे, अनेक किलोमीटर ते कोरड्या जमिनीपासून निराधार अवस्थेत होते. विशाल खडकाच्या अटकावामुळे जहाज बुडण्याचा अधिक धोका असतानाही, उत्तम शांततेमुळे ओपाला आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांच्या डायरीत लिहिले, “समुद्र हा तलावाप्रमाणे शांत वाटत होता. त्या शांत समुद्रातील सूर्यास्त मी कधीही विसरणार नाही. दृष्य इतके सुंदर होते की, ते सर्व काळासाठी माझ्या स्मरणात बिंबले.”
खडकावर आदळण्यापूर्वी, वारा पूर्ववत वाहू लागला, आणि जहाजाच्या शिडांच्या आधारे ते पापुआ न्यूगिनियातील पोर्ट मोर्सबे, येथपर्यंत सुरक्षित पोहोचले, व तेथे त्यांनी इंजिन दुरूस्त केले. त्यांनी पोर्ट मोर्सबेहून इंडोनेशियाच्या थर्स्सडे बेटापर्यंत प्रवास केला. त्यानंतर इंडोनेशियाचे मोठे बेट, जावा येथे ते गेले. “विषुवृत्ताभोवती गुंफलेली मोत्यांची माळ” याचे असे वर्णन केलेल्या देशासाठी ओपाने अधिक प्रेम विकसित केले. तेव्हा इंडोनेशिया डच वसाहतीचे असल्यामुळे, आजोबा डच आणि इंडोनेशियन या दोन्ही भाषा शिकले. तरीपण, प्रचारकार्यात ते सादर करीत असलेले साहित्य: डच, इंडोनेशियन, चीनी, इंग्रजी, आणि अरेबिक अशा पाच भाषेतील होते.
पवित्र शास्त्रावरील साहित्य सादर करण्यास ओपा अतिशय निपूण होते. एकदा बटाव्हियातील (आता जाकार्ता) केल्म् डेशॉन वॉचटावर डेपोचे प्रमुख होते. त्यांना, आमच्या प्रचारकार्याची बारकाईने पाहणी करणाऱ्या डच अधिकाऱ्याने बोलावले. “पूर्व जावामध्ये काम करणारे किती लोक तुझ्याकडे आहेत?” अधिकाऱ्याने विचारले केली.
बंधू डेशॉन यांनी म्हटले, “केवळ एकच.”
“मी त्यावर विश्वास ठेवावा असे तुला वाटते का?” अधिकारी खेकसला. “वितरण केलेले तुमचे साहित्य पाहून दिसते की त्या ठिकाणी तुमचे बरेच सैन्य असले पाहिजे!”
ओपाला त्यांच्या जीवनातील ती फारच चांगली पूरक गोष्ट वाटते. परंतु ते त्या पात्रतेचे होते, कारण प्रत्येक महिन्याला १,५०० ते ३,००० च्या जवळपास साहित्याचे वाटप करणे ही त्यांच्यासाठी काही असामान्य गोष्ट नव्हती.
विवाह, बंदी, व युद्ध
ओपाने डिसेंबर १९३८ मध्ये, विल्हेलमिना या इंडोनेशियन तरुणीबरोबर विवाह केला. ती माझी आजी झाली. ओमा किंवा आजी दयाळू, शांत, उद्योगी, आणि सौम्य स्वभावाची होती. मला माहीत आहे की, माझ्या बालवयापासून ती माझी जवळची मैत्रिण होती.
ओपा आणि ओमाच्या विवाहानंतर त्यांनी पायनियर सेवा एकत्र चालू ठेवली. तोपर्यंत लाईटबेअररचे इतर खलाशी सदस्य, जगातील इतर भागात गेले व काही घरी परतले. परंतु ओपाने इंडोनेशियाला त्यांचे घर बनवले, आणि तेथेच राहण्याचा त्यांनी निश्चय केला.
दुसरे जागतिक महायुद्ध तोंडावर असताना, डच सरकार इंडोनेशियावर अधिकार चालवत होते, व पाळकांच्या दबावाखाली कार्य करत होते. त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर मर्यादा लादण्यास आरंभ केल्याने शेवटी आमच्या कामावर बंदी आणली गेली. यास्तव, केवळ पवित्र शास्त्राचा वापर करुन मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये प्रचार केला जात होता. ओपा आणि ओमाने भेट दिलेल्या प्रत्येक शहरात त्यांना अधिकाऱ्यांच्यापुढे चौकशीकरता नेण्यात आले. त्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवले. बंदी आल्यावर काही दिवसातच ओमाच्या मेहुण्याला त्याच्या ख्रिस्ती तटस्थतेमुळे तुरुंगात टाकण्यात आले. तो डच सरकारच्या अधिकाराखाली असलेल्या तुरुंगातच मरण पावला.
ओपा आणि ओमा, राहण्याची व्यवस्था असलेल्या झाकलेल्या गाडीमध्ये राहत होते. या गाडीचा उपयोग करुन, त्यांनी जावातील सर्व ठिकाणी प्रचार केला. १९४० मध्ये, जपानी लष्कराच्या हल्ल्याचे भय जाणवले. त्यानंतर, त्यांना मुलगी झाली, नंतर ती माझी आई बनली. दोन वर्षांपूर्वी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट् सोसायटीचे त्यावेळचे अध्यक्ष, जे. एफ. रदरफोर्ड यांनी दिलेल्या भाषणाच्या शीर्षकावरून त्यांनी त्या लहान बाळाचे नाव व्हिक्टरी ठेवले. बाळाचा जन्म होईपर्यंत ते प्रचार कार्य करत राहिले.
१९४२ च्या पूर्वार्धात, ओपा, ओमा आणि व्हिक्टरी डच मालवाहू बोटीने बोर्निओहून परतत असताना, जपानी विनाशिकेतून बंदूकीचा मोठा आवाज ऐकू आला होता. सर्व दिवे बंद झाले आणि लोक किंचाळले. अशाप्रकारे, माझ्या कौटुंबिक जीवनात युद्ध शिरले. ते परत बंदरावर सुरक्षित पोहोचले असले तरी, जपानी सैनिकांनी काही दिवसातच जावाला वेढले, आणि डच अधिकाऱ्यांनी ओपा आणि ओमा कोठे राहतात ते जपानी सैनिकांना सांगितले.
जपान्यांनी त्यांना शोधल्यावर त्यांच्या मालकीच्या वस्तू, इतकेच नव्हे तर, व्हिक्टरीची खेळणी देखील लुबाडली व त्यांना दोन वेगवेगळ्या छळ छावण्यांमध्ये ठेवले. व्हिक्टरीला ओमासोबत ठेवले. ओपा त्यांना पुढील साडे तीन वर्षे भेटू शकले नाहीत.
छळ छावण्यांतील जीवन
ओपाच्या स्थानबद्धतेत, त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात—सुरबिआ ते इंगॉवी, बांडुंग, आणि शेवटी चिमॉहेकडे स्थलांतरीत केले. सतत होत असलेले हे स्थलांतर सुटकेसाठी केलेल्या संघटित योजनेला उधळून टाकणारे होते. तुरुंगातील कैदी, बहुधा डच, काही ब्रिटीश व काही ऑस्ट्रेलियातील होते. तुरूंगात असताना, ओपाने न्हाव्याचे काम शिकून घेतले, अजूनही अधुन मधून ते काम करतात. त्यांचे किंग जेम्स व्हर्शन, पवित्र शास्त्र, हे एकच धार्मिक पुस्तक ठेवण्यास त्यांना परवानगी दिली होती.
मध्यंतरीच्या काळात, ओमा आणि व्हिक्टरीला एका छावणीतून दुसऱ्या छावणीत स्थलांतरीत केले जात होते. या छावण्यांतून स्त्रियांना, बाहेरील “सामाजिक कार्यासाठी” छावणीचा लष्करी अधिकारी बोलावत असे. तथापि, काही कारणास्तव, ओमाची कधीही निवड केली नव्हती. नंतर तिला समजले की, स्त्रियांना जपानी सैनिकांच्या वेशा व्यवसाय करण्यासाठी नेले जात होते.
जपानी सैनिकांना स्त्री बालकांविषयी काही आपुलकी नसल्यामुळे, ओमा व्हिक्टरीला नेहमीच मुलाचे कपडे घालीत आणि तिचे केस कमी ठेवत असे. व्हिक्टरी या नावामुळे, ते नाव कशाला चित्रित करते, हे जाणण्याची छावणीच्या लष्करी अधिकाऱ्याला इच्छा असल्याने मोठी समस्या उद्भवली होती. व्हिक्टरी (विजय) जपानी सैनिकांच्या सम्राटासाठी की अमेरिकेतील सैनिकांसाठी?
“देवाच्या राज्याचा सर्व पार्थिव सरकारांवर विजय!” माझ्या आजीने अभिमानाने सांगितले.
“जपानी सैनिकांच्या सम्राटासाठी विजय” असे म्हणण्याचे नाकारल्यामुळे, ओमा आणि तिच्या पाच वर्षाच्या मुलीला उष्ण कटिबंधातील रखरखीत उन्हात आठ तास, सावधान या स्थितीत सरळ उभे राहण्याची जबरदस्तीने शिक्षा दिली. तेथे सावली नव्हती, पाणी नव्हते, त्यांना बसायचे नव्हते, आणि खाली पहायचे नव्हते. परंतु, यहोवाच्या मदतीने ते या भयानक कसोटीत बचावले.
ओमाच्या स्थानबद्धतेनंतर एकाच वर्षात छावणीच्या लष्करी अधिकाऱ्याने तिला सांगितले की तिचा नवरा मेला! तिने अतिशय दुःखाने ओपाचे चित्र तिच्या मोडकळीस आलेल्या पेटीच्या मागील बाजूला लावले आणि दुःख असतानाही ती तेथेच राहिली.
तुरुंगातील छावण्यात खडतर जीवन होते. प्रत्येकासाठी दैनंदिन मिळणारी शिधा, न्याहारीसाठी एक कप टॅपिओका, दुपारच्या जेवणाला साबुदाण्यापासून तयार केलेला १९० ग्रॅमचा ब्रेड, आणि संध्याकाळच्या जेवणासाठी, पाण्यासारख्या असलेल्या भाजीपाल्याच्या रस्यात एक कपभर भात इतकेच मिळत असे. अशा या अपुऱ्या शिधेमुळे, होणारी कुपोषणाची अवस्था सामान्य होती, आणि जुलाबाचे बळी दररोज मरत होते.
ओपाच्या स्थानबद्धतेनंतर त्यांना पिलॅग्रा आणि पौष्टिक जलोदर (उपासमारीचा आजार) सहन करावा लागला. लहान मुलगी, व्हिक्टरी उपासमारीमुळे मरु नये म्हणून ओमा स्वतःचे जेवण तिला देत असल्यामुळे, ओमा देखील मरायच्या बेतास आली होती. क्रुरता आणि उपासमार नित्याच्या गोष्टी बनल्या. त्यांचा देव, यहोवा याच्या जवळ राहिल्यानेच केवळ त्या बचावू शकल्या.
मला ओपाच्या आवडीची म्हण चांगली आठवते: “स्वातंत्र्य हे, ईश्वरी व्यक्ती, यहोवाच्या एकवाक्यतेत आहे.” खडतर तुरूंगवास सहन करत असताना देखील ओपाने स्वतःला ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र असल्याचे समजले. त्यांना व ओमाला यहोवासाठी जी प्रीती होती, तिने निश्चितच ‘सर्व काही सहन करण्यास’ त्यांना मदत केली. (१ करिंथकर १३:७) देवासोबत तोच जवळचा नातेसंबंध राखण्यासाठी आता मी व गेल झटत आहोत.
स्वातंत्र्य आणि विलक्षण पुनर्मीलन
शेवटी, १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपले. जपानच्या स्वाधीन झाल्यावर लगेच, ओपाला रेल्वेने वाहून नेले जात होते. डज्कार्ता ते बांडुंगच्या मार्गावर असताना इंडोनेशियन सैनिकांनी रेल्वे थांबवली. जपानचे शत्रूत्व नव्हते तरी, डचपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंडोनेशियन झगडत होते. रेल्वे अचानक चालू झाल्याचे इतके आश्चर्य वाटले की, ज्यामुळे ओपा इंग्रजी बोलण्याचे विसरून गेले. त्याऐवजी ते डच भाषेत बोलू लागले. इंडोनेशियन लोकांकरता डच ही शत्रूंची भाषा होती, आणि शत्रूंना ठार मारावयाचे होते.
सैनिक ओपाला शोधत असताना, सुदैवाने त्यांना त्यांचा ऑस्ट्रेलियातील वाहकाचा परवाना सापडला, ज्याविषयी ते विसरुन गेले होते. इंडोनेशियाचे ऑस्ट्रेलियाबरोबर युद्ध नव्हते ही आनंदाची गोष्ट होती. वाहकाच्या या परवान्याने जणू ईश्वरी हस्तक्षेपासारखे ओपाच्या ऑस्ट्रेलियातील नागरिकत्वाला शाबीत केल्यामुळे ते त्याची कदर बाळगतात. कारण, केवळ तासाभरातच त्याच ठिकाणी त्या सैनिकांनी रेल्वेने जाणाऱ्या १२ डच लोकांना ठार मारले.
या घटनेनंतर लगेच, ओमा आणि व्हिक्टरी युद्धाने ग्रस्त असलेल्या प्रदेशात वाहतुकीसाठी थांबलेले होते. ते रस्त्याच्या बाजूला बसलेले असताना, सैनिकांना तसेच नागरिकांना घेऊन चाललेल्या ट्रकची मोठी रांग होती. अचानक, कोणतेही सबळ कारण नसताना ती रांग थांबली. ओमाने जवळ असलेल्या ट्रकवर दृष्टी टाकली तेव्हा, पाहते तो काय आश्चर्य, एका कृश मनुष्याला तिने लगेच ओळखले. तो तिचा पती होता! त्यांच्या पुनर्मीलनाच्या भावनांना शब्द व्यक्त करू शकत नाहीत.
परत ऑस्ट्रेलियात
इंडोनेशियात ११ वर्षे राहिल्यानंतर, १९४६ मध्ये आजोबा त्यांच्या कुटुंबासहित ऑस्ट्रेलियात पोहोचले तेव्हा, त्यांना जीवन जगणे इतके सोपे नव्हते. ते युद्धाला गेलेल्या शरणार्थीप्रमाणे परतले—कंगाल, अपुरा आहार, तसेच अनेक स्थायिक लोकांनी त्यांच्याविषयी संशय बाळगला. आशियातील देशांतर करणाऱ्या लोकांविरूद्ध असलेल्या जातीय पूर्वग्रहाचा ओमा आणि व्हिक्टरीला सामना करावा लागला. ओपाला त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तसेच, घरातील गरजा पुरवण्यासाठी जास्त वेळ अधिक परिश्रम करावे लागले. या हलाखीच्या काळात देखील ते टिकून राहिले आणि त्यांच्या आध्यात्मिकतेत शाबूत राहिले.
आता ४८ वर्षांनंतर, ओपा मेलबर्नमध्ये राहतात आणि तेथे ते घरोघरच्या सेवेत अजूनही भाग घेतात. त्यांनी व्हिक्टरी आणि तिच्या मुलांनी सत्याचा स्वीकार करून यहोवाला त्यांच्या जीवनाचे समर्पण केल्याचे, तसेच प्रत्येकाने पूर्णवेळेच्या पायनियर सेवेत प्रवेश केल्याचे पाहिले आहे.
देस झंकर, जे माझे वडील झाले, व हिक्टरी यांचा १९५० च्या दशकात बाप्तिस्मा झाला. देस १९५८ मध्ये ऑस्ट्रेलियातील बेथेल कुटुंबाचे सदस्य बनले. नंतर खास पायनियर सेवा करत असलेल्या व्हिक्टरीसोबत त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी पायनियरींग केली व नंतर त्यांना प्रवासी सेवेसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर माझा जन्म झाला, व मला वाढविण्यासाठी त्यांना प्रवासी कार्य सोडावे लागले. तरीपण, २७ वर्षांनंतर पप्पा अजूनही पायनियरींग करीत आहेत.
१९९० च्या पूर्वाधात ओमाचा मृत्यू घरी शांतीत झाला. त्याच घरात माझी आई मोठी झाली होती. मेलबर्नच्या याच घरी मी तसेच माझा धाकटा भाऊ व धाकटी बहीण देखील लहानचे मोठे झालो. या घरात एकत्र राहण्याचा आमच्या कुटुंबाला खरा आशीर्वाद मिळाला. कधी कधी घरात अतिशय अडचण होत होती परंतु, त्याविषयी कधी काळजी करत बसल्याचे मला आठवत नाही. माझ्या विवाहानंतर पहिली चार वर्षे माझी पत्नी गेल देखील येथे राहात होती, व तिला ते आवडले. शेवटी आम्ही आमच्या नव्या नेमणूकीसाठी जाताना मी रडलो. कारण त्या घरात मला अधिक साहाय्य आणि प्रेम मिळाले होते.
आता, गेअल् आणि माझ्याजवळ आनंदासाठी भरपूर कारण आहे, कारण आम्ही माझ्या पालकांनी व त्यांच्या पालकांनी जे केले तसेच आम्ही करु शकलो. आम्ही घर सोडल्यावर, पूर्ण वेळेच्या सेवेत यहोवाची इच्छा करण्यासाठी जात असल्यामुळे आम्हाला सांत्वन मिळाले. आम्ही आमच्या विश्वासू पूर्वजांच्या उत्तम उदाहरणांचे अनुकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहोत. दारिद्य्र, आणि अनेक वर्षे जपानी छळ छावण्यात असल्यामुळे या कठीण नेमणूकीत कार्य करताना त्यांना देखील यासारखेच सांत्वन मिळाले.—२ करिंथकर १:३, ४.
राजा दाविदाने यहोवाला म्हटलेल्या प्रेरित शब्दांद्वारे ओपाला नेहमी सांत्वन मिळाले: “तुझी प्रेमळ-कृपा जीवनाहून उत्तम आहे.” (स्तोत्रसंहिता ६३:३, NW) त्या प्रेमळ-कृपेचा अनंतकाळ आनंद घेण्याची माझ्या आजोबांची नेहमीच तीव्र इच्छा होती. त्यांच्यासोबत त्यामध्ये सहभागी होण्याची त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची देखील तीच इच्छा आहे.
[२१ पानांवरील चित्रं]
ओमा आणि ओपा हॅरीज्
[२३ पानांवरील चित्रं]
क्रॅग झंकर (मागे), त्यांची पत्नी, आई-वडील, व धाकटा भाऊ व बहिणीसोबत