योग्य प्रकारच्या धर्माला ओळखण्यासोबत जबाबदारी येते
“जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.”—लूक ११:२८.
१. योग्य प्रकारच्या धर्माची ओळख झाल्यावर, त्याभोवती कोणत्या प्रकारचे लोक त्यांचे जीवन केंद्रित करतात?
योग्य प्रकारचा धर्म ओळखणे एवढेच पुरेसे नाही. आम्ही जे योग्य व सत्य आहे त्यावर प्रेम करणारे असलो तर, एकदा आम्हाला योग्य प्रकारचा धर्म सापडला की, त्याभोवती आम्ही आमचे जीवन उभारू. खरा धर्म केवळ एक मानसिक तत्त्वज्ञान नाही; तो जीवनाचा मार्ग आहे.—स्तोत्रसंहिता ११९:१०५; यशया २:३; पडताळा प्रे. कृत्ये ९:२.
२, ३. (अ) येशूने, देवाची इच्छा करण्याच्या महत्त्वावर जोर कसा दिला? (ब) योग्य प्रकारचा धर्म माहीत असलेल्या प्रत्येकांवर कोणती जबाबदारी येते?
२ देवाने दाखविलेल्या त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याच्या महत्त्वावर येशू ख्रिस्ताने जोर दिला. ज्याला डोंगरावरील प्रवचन म्हणून ओळखले गेले त्याच्या समारोपात, येशूने प्रकट केले की; त्याला प्रभुजी म्हणणाऱ्या (ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे) सर्वांनाच देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही केवळ देवाची इच्छा करणाऱ्यांचाच होईल. त्याने म्हटले की, इतरांना “अनाचार करणारे” म्हणून धिक्कारण्यात येईल. अनाचार करणारे म्हणून का बरे? कारण पवित्र शास्त्र सांगते की, देवाची इच्छा करण्यात मागे पडणे म्हणजे, पाप करणे आणि सर्व पाप अनाचार आहे. (मत्तय ७:२१-२३; १ योहान ३:४; पडताळा रोमकर १०:२, ३.) एखाद्या व्यक्तीला योग्य प्रकारचा धर्म माहीत असेल. जे त्याचे शिक्षण देतात त्यांची तो प्रशंसा करीत असेल. त्याचे पालन करणाऱ्यांचे कौतुक करीत असेल. परंतु त्याच्यावर खऱ्या धर्माचे आचरण स्वतःच्या जीवनात करण्याची देखील जबाबदारी आहे. (याकोब ४:१७) तो या जबाबदारीला स्वीकारत असल्यास, त्याला त्याचे जीवन अर्थपूर्ण झालेले दिसेल, आणि कोणत्याही मार्गापासून मिळू न शकणाऱ्या आनंदाचा तो अनुभव घेईल.
३ मागील लेखात आपण, योग्य प्रकारच्या धर्माच्या सहा ओळखचिन्हांचा विचार केला. त्यातील प्रत्येक चिन्ह, केवळ योग्य प्रकारच्या धर्माची ओळखच देण्यास मदत करीत नाही तर, ते वैयक्तिकरित्या आव्हाने आणि सुसंध्या प्रस्तुत करते. कशाप्रकारे बरे?
तुम्ही देवाच्या वचनाला कसा प्रतिसाद देता?
४. (अ) नवोदित लोक यहोवाच्या साक्षीदारांसोबत सहवास राखू लागतात तेव्हा, साक्षीदार पवित्र शास्त्राचा वापर करतात त्याविषयी लवकरच ते कशाचे निरीक्षण करतात? (ब) यहोवाच्या सेवकांवर आध्यात्मिकतेत चांगली भरवणूक करण्याचा परिणाम काय होतो?
४ यहोवाचे साक्षीदार नवोदित आस्थेवाईकांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना, जे काही शिकविले जात आहे ते पवित्र शास्त्रातून आहे हे लगेच त्यांच्यातील अनेकांना कळून येते. त्यांना त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी, चर्च संप्रदाय, मानवी तत्त्वज्ञान, किंवा प्रमुख लोकांच्या मतांचा संदर्भ दिला जात नाही. देवाचे स्वतःचे वचन अधिकारयुक्त आहे. ते राज्य सभागृहात जातात तेव्हा, तेथे देखील पवित्र शास्त्र एक मुख्य पाठ्यपुस्तक असल्याचे पाहतात. प्रामाणिक सत्य शोधक, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पाहत असलेल्या आनंदातील प्रमुख गोष्ट म्हणजे, देवाच्या वचनातून आध्यात्मिकरित्या त्यांची चांगली भरवणूक होते ही आहे. व हे समजण्यास त्यांना जास्त काळ लागत नाही.—यशया ६५:१३, १४.
५. (अ) यहोवाच्या साक्षीदारांचे निरीक्षण करणाऱ्यांना कोणते आव्हान प्रस्तुत केले आहे? (ब) ते साक्षीदारांच्या आनंदात कसे सहभागी होऊ शकतात?
५ हे ओळखल्यावर, तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया दाखवाल? तुम्हाला त्याचा अर्थ समजल्यावर, तुम्ही रास्तपणे केवळ अक्रियाशील निरीक्षक असू शकणार नाही, किंवा तसे असण्याची इच्छाही बाळगू नये. पवित्र शास्त्र दाखवते की, जे “केवळ ऐकणारे” आहेत, परंतु “वचनाप्रमाणे आचरण” करणारे नाही, ते ‘खोट्या तर्काद्वारे स्वतःची फसवणूक करतात.’ (याकोब १:२२) ते स्वतःची फसवणूक करतात. ते काही जरी म्हणत असले तरी, त्यांना काही समजत नाही, ते देवाची आज्ञाभंग करतात म्हणजे ते त्याच्यावर खरेपणाने प्रीती करत नाही. विश्वासाचा केलेला दावा कार्यात न उतरविल्यास, तो मृत विश्वास होतो. (याकोब २:१८-२६; १ योहान ५:३) उलटपक्षी, यहोवावरील प्रीतीने प्रवृत्त होऊन ‘कृती करणाऱ्याला’ “आपल्या कामात धन्यता मिळेल.” होय, येशू ख्रिस्ताने म्हटले, “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.”—याकोब १:२५; लूक ११:२८; योहान १३:१७.
६. आम्ही देवाच्या वचनाची खरेपणाने गुणग्राहकता बाळगल्यास, वैयक्तिकरित्या कोणत्या संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करु?
६ देवाच्या इच्छेच्या ज्ञानात वाढल्यावर व शिकलेल्या पुढील गोष्टींचा अवलंब केल्यास तो आनंद वाढू लागेल. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न कराल? लक्षावधी अशिक्षित असलेल्या लोकांनी वाचन करण्याचे शिकण्यासाठी कठीण परिश्रम केले. त्यांनी हे परिश्रम विशेषपणे शास्त्रवचने वाचता यावीत तसेच, इतर लोकांना शिकवता यावे म्हणून केले. इतर जण प्रत्येक दिवशी, पवित्र शास्त्र आणि मदतदायक पवित्र शास्त्राभ्यासाचे साहित्य, जसे की टेहळणी बुरुज वाचण्यास काही वेळ खर्च करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठतात. तुम्ही व्यक्तिगतरित्या पवित्र शास्त्राचे अनुक्रमे वाचन किंवा अभ्यासाच्या इतर साहित्यात उद्धृत केलेली शास्त्रवचने पवित्र शास्त्रातून उघडून पडताळत असताना, यहोवाच्या नियमांकडे आणि आज्ञांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, व आमच्या मार्गदर्शनाकरता तेथे दिलेल्या अनेक तत्त्वांना जाणण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक भाग, देवाविषयी, त्याचा उद्देश, आणि मानवजातीसोबत त्याच्या व्यवहाराविषयी काय प्रकट करतो त्यावर मनन करा. यास तुमच्या अंतःकरणावर प्रभाव पाडण्यासाठी वेळ द्या. पवित्र शास्त्राचा सल्ला तुमच्या वैयक्तिक जीवनात पूर्णपणे लागू करण्याचे मार्ग आहेत का यावर विचार करा.—स्तोत्रसंहिता १:१, २; १९:७-११; १ थेस्सलनीकाकर ४:१.
यहोवाला देत असलेली तुमची उपासना पूर्ण आहे का?
७. (अ) देवाची उपासना करण्याच्या लोकांच्या प्रयत्नांवर त्रैक्याच्या सिद्धांताने कसा परिणाम केला? (ब) एखादी व्यक्ती यहोवाविषयीचे सत्य शिकते तेव्हा काय होऊ शकते?
७ खरा देव त्रैक्य नाही, हे शिकणे लक्षावधी लोकांसाठी सांत्वन देणारी गोष्ट आहे. “ते एक रहस्य आहे” अशा स्पष्टीकरणाने त्यांना कधी संतुष्ट केले नाही. ते अनाकलनीय असणाऱ्या देवाजवळ कसे जातील बरे? त्या शिक्षणाच्या परिणामामुळे, त्यांचा पित्याकडे (ज्याचे नाव त्यांनी चर्चमध्ये कधीही ऐकले नाही) दुर्लक्ष करण्याचा व देवाप्रमाणे येशूची उपासना करण्याचा किंवा त्यांची उपासना मरियेला (तिच्याविषयी ती “देवाची आई” म्हणून शिकवले होते) देण्याचा कल झाला. परंतु, यहोवाच्या एका साक्षीदाराने पवित्र शास्त्र उघडून त्यांना यहोवा हे देवाचे वैयक्तिक नाव दाखवले, तेव्हा त्यांनी अंतःकरणपूर्वक आनंद व्यक्त केला. (स्तोत्रसंहिता ८३:१८) हे ईश्वरी नाव दाखवल्यानंतर व्हेन्झुएलातील एका स्त्रीला इतका आनंद झाला की तिने, ते मौल्यवान सत्य तिला दाखवणाऱ्या तरुण साक्षीदार बहिणीला अक्षरशः आलिंगन दिले. आणि गृह पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची सहमती दर्शवली. अशा लोकांनी, येशूने त्याच्या पित्याला “माझा पिता व तुमचा पिता” असे म्हटले आणि त्याने त्याला “एकच खरा देव,” असे संबोधले, हे शिकल्यावर त्यांना समजले की पवित्र शास्त्र, देव अनाकलनीय नसल्याचे शिकवते. (योहान १७:३; २०:१७) यहोवाचे गुण त्यांना माहीत होतात तसे, त्यांना त्याच्याजवळ असल्याचे वाटते, त्याला प्रार्थना करु लागतात, आणि त्याला संतुष्ट करण्याची त्यांची इच्छा असते. कोणत्या परिणामास्तव?
८. (अ) यहोवासाठी असलेल्या त्यांच्या प्रीतीमुळे, व त्याला संतुष्ट करण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे, लाखो लोकांनी काय केले? (ब) ख्रिस्ती बाप्तिस्मा महत्त्वाचा का आहे?
८ मागील दहा वर्षांत, सहा खंडातील तसेच शेकडो बेटांवरील २५,२८,५२४ लोकांनी त्यांच्या जीवनाचे यहोवाला समर्पण केले व मग पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे समर्पण प्रकट केले. तुम्ही त्यांच्यातील एक होता का, किंवा बाप्तिस्म्यासाठी तुम्ही आता तयारी करत आहात का? खऱ्या ख्रिश्चनांच्या जीवनात बाप्तिस्मा ही महत्त्वपूर्ण घटना आहे. येशूने त्याच्या अनुयायांना, सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करण्याची व बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली. (मत्तय २८:१९, २०) येशूचा स्वतःचा बाप्तिस्मा झाल्यावर लगेच यहोवा स्वर्गातून बोलला हे उल्लेखनीय आहे. तो असे बोलला: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”—लूक ३:२१, २२.
९. यहोवासोबत मान्यताप्राप्त नातेसंबंध राखण्यासाठी, आमच्याकडून कशाची आवश्यकता आहे?
९ यहोवासोबतचा मान्यताप्राप्त नातेसंबंध प्रिय मानण्यासारखा आहे. तुम्ही समर्पण आणि बाप्तिस्म्याद्वारे या संबंधाची सुरवात केली आहे तर, त्यास बिघडविणाऱ्या कोणत्याही गोष्टीला टाळा. जीवनाच्या समस्या आणि भौतिक गोष्टींच्या चिंता यामुळे त्याला दुय्यम स्थान देऊ नका. (१ तीमथ्य ६:८-१२) नीतीसूत्रे ३:६ मधील सल्ल्याच्या सुसंगतीत मनापासून राहा: “तू आपल्या सर्व मार्गांत [यहोवाचा] आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”
ख्रिस्ताची प्रीती किती खोल रीतीने तुमच्यावर परिणाम करते?
१०. आम्ही यहोवाला करीत असलेली उपासना, येशूकडे दुर्लक्ष का होऊ देत नाही?
१० यहोवाच खरा देव असल्याची योग्य गुणग्राहकता बाळगल्याने, येशू ख्रिस्ताकडे दुर्लक्ष करण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरणार नाही. उलटपक्षी, प्रकटीकरण १९:१० म्हणते: “येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.” उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत, यहोवाच्या उद्देशात येशू ख्रिस्ताच्या भूमिकेविषयी प्रेरित भविष्यवाण्या सविस्तर माहिती पुरवितात. एखादी व्यक्ती त्या सविस्तर माहितीसोबत परिचित होते तसे, ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या शिकवणीमुळे झालेला अर्थाचा अनर्थ आणि गैरसमज यापासून वेगळे असे अत्यंत आकर्षक चित्र उभे राहते.
११. पवित्र शास्त्र देवाच्या पुत्राविषयी जे शिकवते ते शिकण्याचा परिणाम, पोलंडमधील एका स्त्रीवर कसा झाला?
११ देवाच्या पुत्राविषयीचे सत्य समजल्यावर एखाद्या व्यक्तीवर त्याचा गहन परिणाम होऊ शकतो. हीच गोष्ट पोलंडमधील डनूटा नावाच्या स्त्रीची होती. तिचा यहोवाच्या साक्षीदारांसोबत आठ वर्षांपासून संपर्क होता. ते शिकवत असलेले तिला आवडत होते, परंतु खऱ्या भक्तीला ती आपल्या जीवनाचा मार्ग बनवत नव्हती. नंतर, तिला सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाची एक प्रत मिळाली. त्यामध्ये ख्रिस्ताच्या जीवनाविषयी सोप्या पद्धतीने समजावले आहे.a संध्याकाळी, फक्त एक अध्याय वाचण्याच्या हेतूने तिने पुस्तक उघडले. परंतु, तिने पूर्ण पुस्तक वाचून काढल्यावरच ते खाली ठेवले. ती रडू लागली. “यहोवा, मला क्षमा कर,” अशी ती विनवणी करु लागली. तिने जे काही वाचन केले त्याच्या परिणामामुळे, यहोवा आणि त्याच्या पुत्राने दाखवलेल्या प्रीतीला तिने पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या रीतीने पाहिले. तिला कळले की, आठ वर्षांपासून, देव सहनशीलतेने पुरवत असलेल्या मदतीस ती कृतघ्न होऊन झिडकारत होती. १९९३ मध्ये येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या आधारावर तिने तिच्या समर्पणास बाप्तिस्म्याद्वारे प्रकट केले.
१२. आमच्या जीवनावर येशू ख्रिस्ताविषयीच्या अचूक ज्ञानाचा परिणाम कसा होतो?
१२ “आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अचूक ज्ञानाचा” संबंध, क्रियाशील व फलदायी ख्रिस्ती असण्यासोबत आहे. (२ पेत्र १:८, NW) तुमचा राज्याच्या संदेशाची सहभागिता इतरांसोबत करण्यात कितपत भाग असेल? एखादा किती कार्य करु शकतो ते बहुविश्व परिस्थितींवर अवलंबून असते. (मत्तय १३:१८-२३) काही अशा गोष्टी असतात ज्यांच्यात आम्ही बदल करु शकत नाही; परंतु बाकीच्यात आपण बदल करु शकतो. ते ओळखण्यासाठी आणि जे बदल करावयाचे ते करण्यास आम्हाला काय प्रवृत्त करील? प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्ताची प्रीति आम्हाला आवरुन धरते”; दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास, त्याने आमच्यासाठी स्वतःचे जीवन देण्यासाठी जी प्रीती दाखवली ती अधिकच उल्लेखनीय आहे, त्या प्रीतीबद्दल आमची गुणग्राहकता जशी वाढत जाते तशी आमची अंतःकरणे भारावून जातील. याच्या परिणामामुळे, स्वार्थी ध्येयांचा पाठलाग करीत राहणे आणि अधिक प्रमाणात स्वतःला संतुष्ट करण्यासाठी जगणे, उचित नसल्याचे आम्हाला समजते. उलटपक्षी, ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना जे कार्य करण्यासाठी शिकवले त्याला प्रथम स्थान देण्यासाठी आम्ही आमच्या कारभारात सुधारणा करतो.—२ करिंथकर ५:१४, १५.
जगापासून अलिप्त—किती प्रमाणात?
१३. ज्या धर्माने स्वतःला जगाचा भाग बनवले आहे, त्याचा भाग आम्ही का असू नये?
१३ ख्रिस्ती धर्मजगताने आणि इतर धर्मांनी, जगाचे भाग असण्याच्या इच्छेमुळे विक्रम स्थापित केला हे पाहणे कठीण नाही. चर्चमधील निधीचा वापर क्रांतीकारी कार्यांच्या आर्थिक मदतीसाठी केला जातो. पाळक, गनिमी सैनिक बनले आहेत. वृत्तपत्रे प्रतिदिन पृथ्वीच्या विविध भागात एकमेकांबरोबर भांडणाऱ्या धार्मिक बंडखोरांविषयी अहवाल देतात. त्यांच्या हातातून रक्त टपकत आहे. (यशया १:१५) तसेच जगभरातील पाळक, राजकीय क्षेत्रात नाक खूपसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. खऱ्या उपासकांचा यात कोणताही भाग नाही.—याकोब ४:१-४.
१४. (अ) जगापासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी आम्ही वैयक्तिकपणे कशाला टाळले पाहिजे? (ब) जगिक प्रवृत्त्या आणि सवयांनी मोहीत होण्याचे टाळण्यासाठी आम्हाला काय मदत करु शकते?
१४ परंतु जगापासून अलिप्तता, यामध्ये अधिक काही गोवलेले आहे. जगाची विशेष लक्षणे, पैशाचे प्रेम, आणि पैशाने विकत घेता येणाऱ्या गोष्टी, वैयक्तिक मोठेपणाची अभिलाषा, आणि सुखविलासाचा अविरत पाठलाग, व यासोबत इतरांसाठी खऱ्या काळजीची उणीव, लबाड्या, अपशब्द, अधिकाराविरूद्ध बंडाळी, आणि आत्मसंयम दाखविण्यात अपयश याद्वारे दिसतात. (२ तीमथ्य ३:२-५; १ योहान २:१५, १६) आमच्या स्वतःच्या अपूर्णतेमुळे, कधी कधी आम्ही काही बाबतीत ही लक्षणे दाखवतो. अशा मोहांना टाळण्यासाठी आम्ही करत असलेल्या झगडल्याला काय मदत करु शकते? आम्हाला, या सर्वांमागे कोणाचा हात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) एखादे कृत्य किती आकर्षक वाटत असले तरी, किंवा त्याप्रमाणे किती लोक राहत असले तरी, यहोवाचा प्रमुख विरोधक, दियाबल सैतानाचा यामागे हात असल्याचे आम्हाला समजते तेव्हा, खरोखर ते किती कुरूप आहे.—स्तोत्र ९७:१०.
तुमची प्रीती कोठवर पोहोचते?
१५. योग्य प्रकारच्या धर्माला ओळखण्यासाठी, तुम्ही निरीक्षलेली निःस्वार्थी प्रीती तुम्हाला कशी मदत करील?
१५ तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत प्रथमच संगती ठेवण्यास सुरवात केली तेव्हा, जगाच्या आत्म्याच्या विपरीत असलेली प्रीती त्यांच्यामध्ये पाहून ती तुम्हाला अपीलकारक वाटली, यात काही संशय नाही. निःस्वार्थी प्रीतीवरील जोर, यहोवाच्या शुद्ध उपासनेला इतर सर्व प्रकारच्या उपासनेपासून वेगळे करतो. कदाचित याच गोष्टीने यहोवाचे साक्षीदार खऱ्या धर्माचे खरेच आचरण करीत आहेत, याबद्दल तुमची खात्री पटवली असेल. स्वतः येशू ख्रिस्ताने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५.
१६. आमच्या ख्रिस्ती प्रीतीला विशाल करण्यासाठी, वैयक्तिकरितीने कोणत्या सुसंधी आम्हापाशी आहेत?
१६ हा गुण, तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य असल्याची देखील ओळख देतो का? विशाल प्रमाणात प्रीती दाखविण्यासाठी असे काही मार्ग आहेत का? आम्ही सर्व हे करु शकतो यात काही शंका नाही. राज्य सभागृहात इतरांसोबत केवळ मैत्रिपूर्ण असणेच पुरेसे नाही. तसेच, ज्यांची आमच्यावर प्रीती आहे अशांवरच आम्ही प्रीती करीत असल्यास, आम्ही जगापासून किती वेगळे असू शकतो? पवित्र शास्त्र आर्जवते की, “मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा.” (१ पेत्र ४:८) कोणासाठी आम्ही अधिक प्रीती दाखवू शकतो? आमच्यापासून वेगळी पार्श्वभूमी असलेला तसेच विशिष्ट गोष्ट करण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला चीड येत असलेल्या एखाद्या ख्रिस्ती बांधवासाठी किंवा बहिणीसाठी का? आजारपण किंवा वयोमानामुळे सभेला नियमित उपस्थित राहता येत नाही, अशांसाठी का? आमच्या वैवाहिक सोबत्यासाठी का? किंवा, कदाचित आमच्या वृद्ध आईवडिलांसाठी? काही जण प्रीतीसहित आत्म्याची फळे दाखविण्यात चांगले कार्य करीत होते तेव्हा, कठीण परिस्थितीला तोंड देताना, अधिकच निर्बल झालेल्या कौटुंबिक सदस्याची जवळजवळ पूर्ण काळजी घेण्याची परिस्थिती उद्भवल्यावर त्यांना असे वाटले की, ते या सर्व गोष्टी पुन्हा एकदा शिकत आहेत. अर्थातच अशा परिस्थितीचा सामना करताना देखील आमची प्रीती, आमच्या घरातील सदस्यांवरील प्रीतीपेक्षा पुढे जाण्यास हवी.
राज्याची साक्ष देणे —तुमच्याकरता किती महत्त्वाचे आहे?
१७. यहोवाच्या साक्षीदारांच्या भेटीने व्यक्तिगतपणे आम्हाला लाभ झाला असल्यास, काय करण्यास आम्हाला प्रवृत्त केले पाहिजे?
१७ आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती दाखवण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे, त्यांना देवाच्या राज्याची साक्ष देणे हा होय. येशूने सांगितलेले हे कार्य लोकांचा केवळ एकच गट करत आहे. (मार्क १३:१०) ते यहोवाचे साक्षीदार आहेत. वैयक्तिकरित्या आम्हाला त्याचा फायदा झाला आहे. आता, इतरांना मदत करण्याची सुसंधी आमच्याजवळ आहे. याबाबतीत आम्ही देवाचा दृष्टिकोन पाहिल्यास, आमच्या जीवनात या कामाला प्राथमिकता असेल.
१८. यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) या पुस्तकाच्या वाचनाने राज्याच्या साक्षीकार्यात आमचा सहभाग कशाप्रकारे वाढवला जाऊ शकतो?
१८ राज्याचा संदेश या शेवटल्या काळात पृथ्वीच्या दूरवरील भागात कशाप्रकारे नेला जात आहे, त्याचा शिरशिरी भरविणारा अहवाल यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) या पुस्तकात दिला आहे. तुम्हाला इंग्रजी वाचता येत असल्यास, न चुकता त्याचे वाचन करा. तसेच वाचन करत असताना, राज्याची साक्ष देण्याच्या कामात वैयक्तिकांनी सहभागिता केलेल्या सर्व मार्गांची खास नोंद करा. ज्यांच्या उदाहरणाचे तुम्हाला अनुकरण करता येईल असे कोणी आहेत का? आमच्या सर्वांसाठी अनेक संध्या खुल्या आहेत. त्यांचा चांगला उपयोग करण्यास, यहोवासाठी असलेली आमची प्रीती आम्हाला प्रवृत्त करो.
१९. योग्य प्रकारचा धर्म माहीत झाल्यावर, त्यासोबत स्वीकारलेल्या जबाबदारीमुळे आम्हाला कसा फायदा झाला?
१९ यास्तव, यहोवाची इच्छा करण्यासाठी आम्ही स्वतःला लागू केले तर, जीवनाचा काय अर्थ आहे, या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळते. (प्रकटीकरण ४:११) आम्ही येथून पुढे निष्फळतेच्या भावनेत चाचपडत राहणार नाही. संपूर्ण अंतःकरणाने यहोवा देवाच्या सेवेत लागू करण्याशिवाय, स्वतःला समर्पित करुन मोठी संतुष्टता मिळणारे इतर कोणतेही कार्य नाही. तसेच ते किती महान भवितव्य राखून आहे! त्याच्या नवीन जगात अनंतकाळापर्यंत समाधानकारक जीवन, ज्यामध्ये आम्ही, मानवजातीला देवाने निर्माण केलेल्या प्रेमळ उद्देशाच्या पूर्ण एकवाक्यतेत आमच्या कार्यक्षमतेचा वापर करु शकू.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकॉ. ने प्रकाशित केलेले.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ एखाद्या धर्माने, पवित्र शास्त्राचा देवाचे वचन म्हणून स्वीकार करणे व खरा देव म्हणून यहोवाचा आदर करणे महत्त्वाचे का आहे?
▫ खरा धर्म, खंडणीदाता म्हणून येशूच्या भूमिकेबद्दल काय शिकवतो?
▫ ख्रिस्ती लोकांनी जगापासून अलिप्त राहून निःस्वार्थी प्रीतीचे आचरण का केले पाहिजे?
▫ योग्य प्रकारच्या धर्मात राज्याची साक्ष देण्याची कोणती भूमिका आहे?
[१६ पानांवरील चित्रं]
खऱ्या उपासनेच्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करण्यास बाप्तिस्मा हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सर्व जगभरात, प्रत्येक महिन्याला २५,००० लोक ते पाऊल उचलतात
रशिया
सेनेगल
पापूआ न्यू गिनी
अमेरिका
[१७ पानांवरील चित्रं]
इतरांसोबत पवित्र शास्त्राच्या सत्याची सहभागिता करणे खऱ्या उपासनेचा भाग आहे
अमेरिका
अमेरिका
ब्राझिल
हाँग काँग