पवित्र शास्त्र काळातील शिक्षण
“आपल्या मुलाबाळांस शिकवीत जा.”—अनुवाद ११:१९.
१. यहोवा आपल्या सेवकांच्या शिक्षणाबद्दल रस बाळगून आहे हे कशामुळे दिसते?
यहोवा हा महान शिक्षक आहे. त्याने आपल्या सेवकांना कधीही अज्ञानात सोडले नाही. तो त्याच्या ज्ञानाची सहभागिता त्यांच्यासोबत नेहमीच करत आला आहे. तो त्यांना आपली इच्छा व मार्ग शिकवतो. त्याचा एकुलता एक पुत्र कित्येक हजारो वर्षे त्याच्या बाजूला होता व तो देवाचा “कुशल कारागीर” या नात्याचे शिक्षण घेत होता. (नीतीसूत्रे ८:३०) पृथ्वीवर असताना येशूने म्हटले होतेः “पित्याने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो.” (योहान ८:२८) देव हा अतुल्य शिक्षक आहे असे संबोधून अलिहूने विचारलेः “त्याच्यासमान शिक्षण देणारा कोण आहे?” (ईयोब ३६:२२) यशया संदेष्ट्याने यहोवाला त्याच्या लोकांचा “महान शिक्षक” असल्याचे म्हटले व असे भाकित केले की, “तुझी सर्व मुले परमेश्वरापासून [यहोवा, न्यू.व.] शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.” (यशया ३०:२०; ५४:१३) या कारणामुळेच आपल्या बुद्धिमान प्राण्यांनी प्रज्वलित असावे व चांगले शिक्षित व्हावे ही यहोवाची इच्छा आहे यात संशय नाही.
कुलपित्यांच्या काळातील शिक्षण
२, ३. (अ) विश्वासू कुलपित्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल कोणता दृष्टिकोण धरला होता, आणि यहोवाने अब्राहामाला कोणती आज्ञा दिली होती? (ब) अब्राहामाच्या संतानाला शिक्षण देण्याची सूचना करण्यामागे कोणता भव्य उद्देश होता?
२ कुलपित्यांच्या काळात आपल्या घरच्या सदस्यांना व मुलांना शिक्षण देणे हा कुटुंब प्रमुखाचा मूलभूत विशेषाधिकार होता. मुलांना शिक्षण देणे हे देवाच्या सेवकांचे एक धार्मिक कर्तव्य होते. यहोवाने आपला सेवक अब्राहाम याबद्दल असे म्हटलेः “मी त्याच्याशी परिचय केला आहे तो अशासाठी की त्याने आपल्या लेकरांस व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] मार्गाला लावून न्यायनीतीचे आचरण करावयाची आज्ञा द्यावी, आणि परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] अब्राहामाविषयी जे बोलला ते त्यास प्राप्त करून द्यावे.”—उत्पत्ती १८:१९.
३ हे ईश्वरी विधान, यहोवाला शिक्षण केवढ्या महत्त्वाचे वाटत होते ते दाखवते. अब्राहाम, इसहाक व याकोब यांनी आपल्या घराण्यास यहोवाच्या धार्मिक व न्यायनीतीच्या मार्गांचे शिक्षण द्यावे अशी देवाने गरज प्रस्तुत केली; यामुळे भावी पिढ्यांना यहोवाच्या मार्गानुरुप आपले वर्तन राखता येणार होते. याद्वारे, यहोवा, अब्राहामाच्या संतानाबद्दल दिलेले भाकित पूर्ण करणार होता व “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे” आशीर्वादित करणार होता.—उत्पत्ती १८:१८; २२:१७, १८.
इस्राएलातील शैक्षणिक व्यवस्था
४, ५. (अ) इस्राएलातील शैक्षणिक व्यवस्था कोणत्या गोष्टीमुळे इतर राष्ट्रांच्या शिक्षणपद्धतीपासून वेगळी अशी दिसून आली? (ब) एन्सायक्लोपिडिआ ज्युडाईकामध्ये कोणता महत्त्वाचा फरक दाखवून देण्यात आला आहे, आणि कशामुळे या फरकाला अधिक पुष्टी मिळू शकली?
४ एन्सायक्लोपिडिआ ज्युडाईका असे म्हणतेः “प्राचीन इस्राएलात शैक्षणिक व्यवस्था कोणती होती हे समजण्याचा मूलभूत उगम पवित्र शास्त्र आहे.” इस्राएलमध्ये पहिला शिक्षक म्हणून यहोवाने मोशेचा वापर केला. (अनुवाद १:३, ५; ४:५) यहोवाकडून मिळालेली वचने मोशेने लोकांना दिली. (निर्गम २४:३) या कारणास्तव, देवच मुळात इस्राएलाचा प्रमुख शिक्षक होता. या कारणामुळेच इस्राएलात असणारी शैक्षणिक व्यवस्था इतर राष्ट्रांपेक्षा का भिन्न होती ते कळते.
५ वरचा संदर्भ पुढे म्हणतोः “मेसोपोटेमिया व मिसर यामध्ये उच्च शिक्षण किंवा पुस्तकी अभ्यास औपचारिक व केवळ शास्त्री वर्गापुरता मर्यादित होता; असा प्रकार इस्राएलात आढळत नाही. फरक हा इब्री लोक मूळाक्षरे इतक्या साधेपणाने लिहित असत त्यामध्ये निश्चये जाणवत होता. . . . शिक्षणाच्या इतिहासात मूळाक्षराने लिहिलेल्या लिखाणाचे महत्त्व नजरेआड होऊ देऊ नये. ते मिसर, मेसोपोटेमिया व दोन हजार वर्षांच्या कनान्याच्या सांप्रदायिक शास्त्री रूढीपासून वेगळे होते. शिक्षित असणे ही गोष्ट, गहन लेख व प्राचीन मिसरी भाषेची पवित्र लिपी यात पारंगत असणाऱ्या व्यावसायिक शास्त्री व याजकांचे ओळख देणारे चिन्ह राहिली नाही.”
६. इस्राएलाच्या इतिहासाच्या आरंभापासूनच इस्राएली लोक साक्षर होते याचा कोणता पवित्र शास्त्रीय पुरावा दिसतो?
६ इस्राएली लोकांना लिहिता वाचता येत होते असे पवित्र शास्त्र दर्शवते. वचनदत्त देशी जाण्याच्या आधीच इस्राएलांना आपल्या घराच्या चौकटीवर व फाटकांवर यहोवाचे कायदे लिहिण्याची आज्ञा देण्यात आली होती. (अनुवाद ६:१, ९; ११:२०; २७:१-३) ही आज्ञा लाक्षणिक स्वरुपाची होती तरी ती, सर्वसाधारण इस्राएलाला लिहितावाचता आले नसते तर काहीच उपयोगाची वाटली नसती. यहोशवा १८:९ व शास्ते ८:१४ यासारखी शास्त्रवचने दाखवतात की, इस्राएलात राजांच्या काळ सुरु होण्याच्या बऱ्याच आधी मोशे व यहोशवा या नेत्यांव्यतिरिक्त इतर लोकांना लिहिता येत होते.—निर्गम ३४:२७; यहोशवा २४:२६.
शिक्षणपद्धत
७. (अ) शास्त्रवचनांनुसार पाहिल्यास, इस्राएली मुलांना त्यांचे मूलभूत शिक्षण कोणाकडून मिळत असे? (ब) एका फ्रेंच बायबल प्रामाण्यांनी कोणती माहिती दिली?
७ इस्राएलात मुलांना अगदी लहानपणापासून बाप तसेच आई या दोघांकडून शिक्षण दिले जात होते. (अनुवाद ११:१८, १९; नीतीसूत्रे १:८; ३१:२६) डिक्शनरी डे ला बायबल या फ्रेंच शब्दकोषात ई. मॅनझेनो हे पवित्र शास्त्र प्रामाण्य म्हणतातः “मूल बोलायला लागताच ते नियमशास्त्रातील काही उतारे शिकत असे. त्याची आई एखादे वचन परत परत सांगे आणि ते मुलाने शिकून घेतल्यावर आई त्याला दुसरे वचन सांगत असे. नंतर, स्मरणात आधीच संग्रहीत केलेल्या शास्त्रवचनाचे लिखाण मुलाला आपल्या हाताने करावयाला शिकवले जाई. अशाप्रकारे त्याला वाचनाची ओळख करून देण्यात येत असे व मग मोठा झाल्यावर तो स्वतःच प्रभूच्या नियमांचे वाचन व मनन करून आपले धार्मिक शिक्षण पुढे नेत असे.”
८. इस्राएलात शिक्षणाची कोणती मूलभूत पद्धत वापरली जाई, पण त्यात कोणती महत्त्वाची वैशिष्ट्ये होती? (ब) कोणती स्मरण साधने वापरण्यात येत असत?
८ याद्वारे असे दिसते की, त्या काळी पाठांतर करणे ही मूळ शिक्षण पद्धत होती. यहोवाचे नियम व त्याचे लोकांशी असणारे दळणवळण यासंबंधीच्या शिकून घेतलेल्या गोष्टी अंतःकरणात खोलवर जावयाच्या होत्या. (अनुवाद ६:६, ७) त्यावर मनन करायचे होते. (स्तोत्रसंहिता ७७:११, १२) युवक तसेच वयस्करांनी शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पुष्कळ स्मरणसाधने वापरली जात. यामध्ये स्तोत्राच्या प्रत्येक ओळीत आरंभाला असलेली बाराखडी व त्यामुळे तयार होणारे नाव वा शब्द यांचे पठन (जसे की, नीतीसूत्रे ३१:१०-३१); अनुप्रास (किंवा त्याच अक्षराने वा ध्वनीने सुरु होणारे अक्षर); आणि नीतीसूत्रे याच्या ३०व्या अध्यायात दुसऱ्या भागात दिसणाऱ्या संख्यांचा वापर हे प्रकार होते. प्राचीन इब्री लेखनाचे उदाहरण समजले जाणारे गेझेर पंचाग वस्तुतः एका शाळकरी मुलाने स्मरणात असलेला लिहून काढलेला धडा आहे असे काही प्रामाण्यांना वाटते हे मोठे मनोरंजक आहे.
अभ्यासक्रम
९. (अ) इस्राएली मुलांसाठी कोणता महत्त्वाचा अभ्यासाचा कार्यक्रम होता? (ब) वार्षिक मेळाव्याबद्दल जे शिक्षण देण्यात येई त्याविषयी एक ज्ञानकोश काय म्हणतो?
९ इस्राएलामध्ये केवळ लिहिणे-वाचणे शिकून घेण्यापुरते शिक्षण मर्यादित नव्हते. इतिहास हा एक महत्त्वाचा विषय होता. यहोवाने आपल्या लोकांप्रीत्यर्थ ज्या ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्या शिकून घेणे हा अभ्यासक्रमातील मूलभूत भाग होता. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती पिढ्यान्पिढ्या शिकवायची होती. (अनुवाद ४:९, १०; स्तोत्रसंहिता ७८:१-७) वार्षिक मेळावे हे कुटुंबप्रमुखांना आपल्या मुलांना शिक्षण देण्याजोगे उत्कृष्ट प्रसंग होते. (निर्गम १३:१४; लेवीय २३:३७-४३) याबद्दल द इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिआ असे म्हणतोः “पित्याने घरी असताना मुलांना दिलेले शिक्षण आणि मेळाव्याच्या अभूतपूर्वतेबद्दल त्याने दिलेले स्पष्टीकरण इब्री मुलांना, देवाने गतकाली आपणास कसे प्रकटविले होते, त्यांनी आपले जीवन कसे जगावे आणि देवाने आपल्या लोकांसंबंधाने भविष्याबद्दल कोणती अभिवचने कळवली आहेत ते शिकवत असत.”
१०. मुलींना व मुलांना कोणती व्यावहारिक कामे शिकवली जात?
१० पालकांनी दिलेल्या शिक्षणात व्यावहारिक गोष्टी देखील होत्या. मुलींना घरची कामे शिकवली जात. नीतीसूत्रे पुस्तकाचा शेवटला अध्याय, ही कामे पुष्कळ व वेगवेगळी होती हे दाखवतो. त्यामध्ये विणणे, गुंफणे, रांधणे, व्यापार करणे, आणि घरातील सर्वसाधारण कामे होती. मुलांना साधारणपणे त्याच्या बापाचा प्रापंचिक व्यवसाय शिकवला जाई; त्यात शेतीविषयक कामे किंवा काही व्यवसाय वा कला होती. नंतरच्या काळात यहूदी रब्बींनी अशी म्हणच पाडलीः “जो आपल्या मुलाला कामधंदा शिकवत नाही, तो त्याला चोर बनवतो.”
११. इस्राएलातील शिक्षणाचा अंतर्भूत उद्देश कोणता होता हे कसे दिसते, आणि यात आजच्या युवकांसाठी कोणता धडा आहे?
११ इस्राएलात आध्यात्मिक खोली शिकवणारे शिक्षण दिले जात होते हे नीतीसूत्राच्या सबंध पुस्तकातून दिसते. सूज्ञान, शिस्त, समज, दृष्टि, न्याय, चतुरपणा, ज्ञान आणि विचारशैली यासारख्या उच्च गोष्टींचे शिक्षण “भोळ्यांना” देऊन त्यांच्यामध्ये परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय वाढवावे हा त्यामागील उद्देश होता. (नीतीसूत्रे १:१-७; २:१-१४) आजच्या देवाच्या सेवकांनी त्यामागील प्रेरणा लक्षात घेतल्यास त्यांना देखील स्वतःचे शिक्षण वाढविण्याची चालना मिळू शकेल.
याजक, लेवी व संदेष्टे
१२. इस्राएलातील लोकांना शिक्षण देण्यात पालकांशिवाय आणखी कोण सहभागी होत होते, आणि “नियम” असे ज्याचे भाषांतर आहे त्या इब्री शब्दाचा कोणता अर्थ होतो?
१२ पालक मूलभूत स्वरुपाचे शिक्षण देत असले तरी यहोवाने आपल्या लोकांना याजक, याजक नसणारे लेवी आणि संदेष्ट्याकरवी पुढील शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली. मोशेने लेवी वंशास आशीर्वाद देताना असे म्हटलेः “ते याकोबास तुझ्या अनुज्ञा, इस्राएलास तुझे नियमशास्त्र शिकवतील.” (अनुवाद ३३:८-१०) “नियम” याला इब्री भाषेत असणारा शब्द (तोह․राहʹ) “दाखवणे,” “शिकवणे,” “सूचना देणे” या क्रियापदाचे मूळ रुप ज्या शब्दात आहे त्यावरून तयार झाला आहे हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. द एन्सायक्लोपिडिआ ज्युडाईका म्हणतोः “या कारणामुळे [तोराह] या शब्दाचा अर्थ, ‘शिक्षण,’ ‘तत्त्व,’ किंवा ‘सूचना’ असा होतो.”
१३. इस्राएलाचे नियमशास्त्र इतर राष्ट्रांच्या कायदेशीर व्यवस्थेपेक्षा वेगळेच का होते?
१३ यामुळे इस्राएलांना इतर राष्ट्रांपासून व आधुनिक काळातील राष्ट्रांपासून वेगळे ठेवण्यात आले. आजच्या राजकारणी राष्ट्रांची नियमावली आहे पण प्रत्यक्षात जनतेला मात्र थोड्याच नियमांची माहिती आहे. जेव्हा लोकांना नियमांचा संघर्ष करावा लागतो तेव्हा आपल्या वतीने समर्थन करण्यासाठी त्यांना वकील करावे लागतात व त्यांना मोठी फी द्यावी लागते. कायदेविषयक शाळा खास लोकांसाठी आहेत. तरीपण इस्राएलात नियमशास्त्र हे देवाचे माध्यम होते; याद्वारे त्याच्या इच्छेच्या अनुषंगाने लोकांनी त्याची कशी भक्ती करावी व जीवन जगावे हे तो सांगत होता. इतर कायदेशीर नियमांच्या विरुद्ध यात देव व शेजाऱ्यावरील प्रीती यांचाही समावेश होता. (लेवीय १९:१८; अनुवाद ६:५) निमयशास्त्र हे व्यक्तिभावरहित विधिनियम नव्हते. त्यात जीवनाचा मार्ग शिकून घेण्यासाठी तत्त्वे, शिक्षण आणि सूचना होत्या.
१४. लेवीय याजकांना यहोवाने का नाकारले याचे एक कारण काय होते? (मलाखी २:७, ८)
१४ याजक व लेवी विश्वासू असेपर्यंत त्यांनी लोकांना शिकवण्याची जबाबदारी पूर्ण केली. तरीपण, बहुतेक वेळा राष्ट्राला प्रशिक्षित करण्यामध्ये त्यांची टाळाटाळ दिसली. अशाप्रकारे शिक्षणाच्या अभावामुळे याजक व लोक यांजवर घातक परिणाम ओढवणार होते. इ. स. पूर्वीच्या आठव्या शतकात यहोवाने हे भाकित केलेः “ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात, मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांस विसरेन.”—होशेय ४:६.
१५. (अ) याजकांशिवाय आणखी कोणाला यहोवाने इस्राएलात शिक्षक म्हणून पुढे आणले, आणि एका बायबल प्रामाण्यांनी शिक्षक या त्यांच्या भूमिकेबद्दल काय लिहिले? (ब) यहोवाचे ज्ञान व त्याचे मार्ग यांना धुडकावून दिल्यामुळे इस्राएल व यहूदाचे शेवटी काय झाले?
१५ यहोवाने याजकांसारखेच संदेष्ट्यांनाही शिक्षण देण्यास सामोरे आणले. आम्ही वाचतोः “परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] सर्व संदेष्टे व द्रष्टे यांच्या द्वारे इस्राएल व यहूदा यांस बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांस जे सगळे धर्मशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे यांच्या हाती तुम्हाकडे पाठविले होते त्यांस अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावे.” (२ राजे १७:१३) शिक्षक या नात्याने असणाऱ्या संदेष्ट्यांच्या भूमिकेबद्दल रोलान्ड डी वोक्स या फ्रेंच बायबल प्रामाण्यांनी लिहिलेः “संदेष्ट्यांना देखील लोकांना शिकवण्याची नेमणूक होती. हा त्यांच्या भविष्यकथन करण्याच्या कामातील एक भाग होता. भविष्यवादित प्रेरणा त्यांच्या प्रचाराला देवाच्या वचनाचा अधिकार देणारी झाली. बादशाही काळात संदेष्टे लोकांना धार्मिक व नैतिक शिक्षण देत; आणि या सर्व उत्तम शिक्षकांचे लोक ऐकून घेत असेही आम्ही म्हणू शकतो.” तथापि, याजक व लेवी यांनी बरोबरचे शिक्षण न दिल्यामुळे आणि यहोवाच्या संदेष्ट्यांचे न ऐकल्यामुळे इस्राएलांनी यहोवाचा मार्ग सोडून टाकला. शमरोन अश्शूरांपुढे इ. स. पू. ७४० मध्ये पडले आणि यरूशलेम व त्याच्या मंदिराचा नाश बाबेलोन्यांनी इ. स. पू. ६०७ मध्ये केला.
बंदिवान होण्याआधी व नंतरचे शिक्षण
१६, १७. (अ) दानीएल व त्याच्या तीन मित्रांवर कोणता शैक्षणिक कार्यक्रम लादण्यात आला? (ब) या बाबेलोनी शिक्षणातून पार पडण्याचे पण यहोवाला विश्वासू राहण्याचे यांना कशामुळे जमले?
१६ यरुशलेमाचा नाश होण्याच्या दहा वर्षे आधी यहोयाकीम राजा व राजपुत्रांचा एक गट व सरदार यांना बाबेलोनी राजा नबुखद्नेस्सराने नेले. (२ राजे २४:१५) यामध्ये दानीएल व तीन युवक सरदार होते. (दानीएल १:३, ६) या चौघांनी “खास्द्यांची विद्या व भाषा” शिकून घ्यावी याकरता तीन वर्षाची खास तालीम देण्याची योजना झाली. याशिवाय, “राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या द्राक्षारसातून त्यांचे नित्य खाणे पिणे” होण्याचीही तरतूद करण्यात आली. (दानीएल १:४, ५) यात कित्येक गोष्टींचा धोका संभवत होता. हा अभ्यासक्रम तीन वर्षे भाषा शिकण्यासंबंधीचा नसावा. “खास्दी” ही या संदर्भातील संज्ञा काहींच्या मते “बाबेलोनी लोक नसून शिकलेल्या लोकांचा गट” सूचित करण्यासाठी आहे. (द सोनसिनो बुक्स ऑफ द बायबल) दानीएलावर भाष्य करताना एफ. कील म्हणतातः “दानीएल व त्याच्या सोबत्यांना खास्दी याजक व शिकलेल्या लोकांचे ज्ञान शिकायला मिळणार होते; हे बाबेलोनच्या प्रशालेत शिकवले जाई.” राजा खात असलेले अन्न त्यांजवर नियमशास्त्राने आहारासंबंधाने जी मनाई लादली होती ती भंग करण्यास कारणीभूत होणार होते. तेव्हा त्यांचे कसे काय झाले?
१७ चार यहूदी सरदारांचा प्रतिनिधी म्हणून दानीएलाने आरंभापासूनच हे स्पष्ट केले की, त्यांच्या विवेकाचा भंग करणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे ते सेवन किंवा प्राशन करणार नाहीत. (दानीएल १:८, ११-१३) या दृढ भूमिकेवर यहोवाने आशीर्वाद पाठवले आणि त्याने हुद्यावर असणाऱ्या बाबेलोनी अधिकाऱ्यांचे मन मऊ बनवले. (दानीएल १:९, १४-१६) त्यांच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत बघता, या चार तरुण इब्र्यांच्या जीवनात नंतर घडलेल्या घटनांवरुन कळते की, बाबेली संस्कृतीचा तीन वर्षांचा कडक अभ्यास, यहोवा व त्याच्या शुद्ध भक्तीबद्दल त्यांना वाटणारा पूर्ण जिव्हाळा दूर सारू शकला नाही. (दानीएल अध्याय ३ ते ६) बाबेलोनच्या तीन वर्षांच्या उच्च शिक्षणक्रमात कसलीही इजा न होता टिकून राहण्यात यहोवाने त्यांना मदत दिली. “या चौघा तरूणांस सर्व विद्या व ज्ञान यात निपुण व प्रवीण केले; दानीएल हा सर्व दृष्टांत व स्वप्ने यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यांस जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्यांस दिसून येई.”—दानीएल १:१७, २०.
१८. बाबेलोनी बंदिवासानंतर यहूदामध्ये कोणता शैक्षणिक कार्यक्रम पार पाडण्यात आला?
१८ बाबेलोनी बंदिवासानंतर, “परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलांस त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा . . . कृतसंकल्प झाला होता,” त्या एज्रा याजकाने मोठे शैक्षणिक कार्य हाती घेतले. (एज्रा ७:१०) यामध्ये त्याला विश्वासू लेव्यांची साथ लाभली, यांनी “नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांग”ण्याची मदत दिली. (नेहम्या ८:७) एज्रा हा पवित्र शास्त्र प्रामाण्य, “पारंगत नक्कल लिहिणारा,” किंवा शास्त्री होता. (एज्रा ७:६) याच्या काळी शास्त्र्यांना वर्ग या नात्याचा मोठा दर्जा मिळाला.
रब्बी शाळा
१९. येशू पृथ्वीवर आला तेव्हा इस्राएलात कोणत्या वर्गातील शिक्षक दिसले, आणि कोणत्या महत्त्वाच्या कारणामुळेच तो किंवा त्याच्या शिष्यांनी यहूद्यांचे उच्च शिक्षण घेतले नाही?
१९ येशूचे पृथ्वीवर आगमन झाले तेव्हापर्यंत शास्त्री वर्ग शिक्षकांचा थोर वर्ग बनला होता व देवाच्या वचनाच्या खऱ्या शिक्षणाऐवजी तो सांप्रदायिक शिक्षणात अधिक गुरफटला होता. त्यांना “रब्बी” म्हणून घेणे आवडत होते; ती, “माझ्या थोर माणसा,” अशी सन्माननीय पदवी बनली होती. (मत्तय २३:६, ७, तळटीप) ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात शास्त्र्यांचा परुशांसोबत नेहमी संबंध दाखवला गेला; यापैकीचे काही नियमशास्त्राचे शिक्षक होते. (प्रे. कृत्ये ५:३४) येशूने या दोघा गटांना, ते सांप्रदाय तसेच “मनुष्यांचे नियम शास्त्र म्हणून शिकवून” देवाच्या वचनाला निरर्थक बनवत होते म्हणून दोष दिला. (मत्तय १५:१, ६, ९) यामुळे हे काही आश्चर्याचे नाही की, येशू किंवा त्याचे बहुतेक शिष्य रब्बींच्या शाळेत शिकले नव्हते.—योहान ७:१४, १५; प्रे. कृत्ये ४:१३; २२:३.
२०. पवित्र शास्त्र काळातील शिक्षणाबद्दलच्या या उजळणीने आम्हाला काय दाखवले आहे, आणि यहोवाच्या सेवकांना देखील शिक्षणाची गरज आहे हे कशावरून दिसते?
२० पवित्र शास्त्र काळातील शिक्षणाबद्दलचा हा आढावा आपल्याला, यहोवा हा त्याच्या लोकांचा महान शिक्षक असल्याचे दाखवतो. मोशेद्वारे देवाने इस्राएलात परिणामी शिक्षणाचे संघटन केले. पण नंतरच्या काळी यहूद्यांचे उच्च शिक्षण सामोरे आले, ज्याने देवाच्या वचनाच्या विरुद्ध गोष्टी शिकवल्या. येशू जरी अशा यहूद्यांच्या शाळांना गेला नाही तरी, तो प्रत्यक्षात असमान असा शिक्षक होता. (मत्तय ७:२८, २९; २३:८; योहान १३:१३) त्याने आपल्या शिष्यांना देखील, युगाच्या समाप्तीपर्यंत शिक्षण देण्याची नेमणूक दिली. (मत्तय २८:१९, २०) यासाठी त्यांना चांगले शिक्षक असण्यास हवे होते व शिक्षण जरुरीचे होते. यास्तव, खऱ्या ख्रिश्चनांनी आज शिक्षणाबद्दल कोणता दृष्टिकोण धरावा? याच प्रश्नाचे उत्तर पुढील लेखात मिळेल.
स्मरणशक्तीची परिक्षा
▫ यहोवा आपल्या सेवकांच्या शिक्षणाबद्दल आस्था बाळगून आहे याची आम्हाला कशी खात्री होते?
▫ इस्राएलातील शैक्षणिक व्यवस्था इतर राष्ट्रांपेक्षा कोणकोणत्या बाबतीत भिन्न होती?
▫ इस्राएली मुलांना कसले शिक्षण मिळाले?
▫ इस्राएलात कोणत्या शिक्षणपद्धती होत्या?
▫ यहूद्यांच्या उच्च शिक्षण देणाऱ्या शाळेत येशू व त्याचे शिष्य का गेले नाहीत?
[७ पानांवरील चित्रं]
बाबेलात दिले गेलेले कडक शिक्षण दानीएल व त्याच्या तीन सोबत्यांना यहोवापासून मार्गभ्रष्ट करू शकले नाही