वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 ३/१ पृ. १९-२४
  • यहोवा भरपूर क्षमा करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा भरपूर क्षमा करतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काही पापांची क्षमा होत नाही
  • त्यांच्या पातकांची क्षमा झाली नाही
  • त्यांच्या पापांची क्षमा झाली
  • देवाच्या क्षमाशीलतेबद्दल आत्मविश्‍वास राखण्याजोगी कारणे
  • वडील वर्गाकडून मदत
  • देव बळ पुरवतो
  • तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • यहोवा, ‘क्षमा करायला तयार असणारा’ देव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाने तुम्हाला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 ३/१ पृ. १९-२४

यहोवा भरपूर क्षमा करतो

“दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्‍वराकडे [यहोवा, न्यू.व.] वळो; . . . कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.”—यशया ५५:७.

१. यहोवाच्या क्षमेचा स्वीकार करणाऱ्‍यांना आता कोणता आशीर्वाद आहे?

पश्‍चात्ताप करणाऱ्‍या अपराध्याला यहोवा क्षमा करतो व त्याला तो सध्या आध्यात्मिक नंदनवनात मनाची शांती देतो. याचे कारण हे की, ते या गरजा पूर्ण करतातः “परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्‍वराकडे [यहोवा, न्यू.व.] वळो; म्हणजे तो त्याजवर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.”—यशया ५५:६, ७.

२. (अ) यशया ५५:६, ७मध्ये म्हटल्याप्रमाणे ‘यहोवाचा शोध घेणे,’ व ‘त्याच्याकडे परत वळणे’ याचा काय अर्थ होतो? (ब) बाबेलात बंदिवान असणाऱ्‍या यहूद्यांनी यहोवाकडे परत वळण्याची का गरज होती, आणि त्यापैकी काहींच्या बाबतीत काय घडले?

२ ‘यहोवाचा शोध घेण्यासाठी’ व तो स्वीकार करू शकेल या हेतूने त्याचा धावा करण्यासाठी दुष्ट माणसाने आपला चुकीचा मार्ग सोडून दिला पाहिजे व इतरांना कसलीही इजा करण्याचे त्याने टाळण्यास हवे. ‘यहोवाकडे वळ’ण्याची गरज दाखवते की, त्या अपराध्याने देवासोबत एकेकाळी असणारे सलगीचे नाते तोडून टाकले होते. हेच यहूदातील रहिवाशांबद्दल घडले होते; त्यांच्या अविश्‍वासूपणामुळे देवाने त्यांना बाबेलात बंदिवान करुन पाठविले. यास्तव, त्या बंदिवान यहूद्यांनी आपल्या चुकीद्वारे घडलेल्या बाबेलोनी दास्यत्वाबद्दल आणि त्यांच्या स्वगृहाच्या ७० वर्षांच्या निर्जनावस्थेबद्दल पश्‍चात्ताप करून यहोवाकडे परत वळण्याची गरज होती. मग, इ. स. पूर्वी ५३७ मध्ये सरकारी फर्मानानुसार देवभिरु यहूदी शेषांची बाबेलातून सुटका झाली व ते आपल्या देशी परतले. (एज्रा १:१-८; दानीएल ९:१-४) त्या पुनर्स्थापनेचा परिणाम इतका भव्य दिसला की, यहूदाच्या प्रदेशाची तुलना एदेनाच्या नंदनवनासोबत करण्यात आली.—यहेज्केल ३६:३३-३६.

३. आध्यात्मिक इस्राएलाच्या शेषांना, यहूदामध्ये परतलेल्या पश्‍चात्तापी देवभिरु बंदिवानांसारखाच कसा अनुभव घडला?

३ बाबेलोनी दास्यत्वातून यहूदाकडे परतलेल्या देवभिरु यहूद्यांसारखा अनुभव आध्यात्मिक इस्राएलांच्या बाबतीत घडला. (गलतीकर ६:१६) आध्यात्मिक इस्राएलांनी पहिल्या जागतिक युद्धानंतर लगेच आपले मार्ग व विचार यात काही बदल केला. मोठी बाबेल, खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य यामधून देवाच्या कृपेमुळे १९१९ मध्ये त्यांचा बंदिवास संपला. त्यांनी मनुष्याचे भय तसेच यहोवाच्या कार्यात दाखवलेली निष्क्रियता याबद्दलच्या पापाबद्दल पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्यांना मोठ्या बाबेलातून मुक्‍त केले, त्यांच्या हक्काच्या आध्यात्मिक वतनामध्ये त्यांना परत वसविले आणि त्याच्या राज्याचा संदेश प्रचार करण्यासाठी पुन्हा उपयोग करून घेतला. यानंतर, देवाच्या लोकांमध्ये आध्यात्मिक नंदनवन बहरू लागले व त्याद्वारे देवाच्या पवित्र नामाचा सन्मान घडू लागला. (यशया ५५:८-१३) अशाप्रकारे प्राचीन मूळ नमूना आणि आधुनिक काळचा नमूना याद्वारे स्पष्ट पुरावा मिळतो की, ईश्‍वरी क्षमा मिळाल्यावर आशीर्वाद येतात आणि यहोवा खरेपणाने पश्‍चात्ताप्यांना भरपूर क्षमा करतो.

४. यहोवाच्या काही सेवकांना कशाचे भय वाटते?

४ यास्तव, यहोवाचे आधुनिक काळातील सेवक त्याच्या क्षमेवर भरवसा ठेवू शकतात. त्यांच्यापैकी काहींना आपल्या गत चुकांबद्दल खरीच उद्विग्नता वाटली आणि दोषी भावनांनी त्यांना जवळजवळ चिरडून टाकले. आपण आध्यात्मिक नंदवनात वसाहतीस असण्यास पात्र नाही असे त्यांना वाटले. खरे म्हणजे काहींनी तर क्षमा होऊ न शकणारे पातक केले आहे आणि यहोवाची क्षमा कधीही मिळू शकणार नाही असे वाटू लागले होते. हे असे असू शकते का?

काही पापांची क्षमा होत नाही

५. काही पापांची क्षमा होत नाही असे का म्हणता येते?

५ काही पापांची क्षमा होत नाही. येशू ख्रिस्ताने म्हटलेः “प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची मनुष्यांस क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविषयीचे जे दुर्भाषण त्याची क्षमा होणार नाही.” (मत्तय १२:३१) अशाप्रकारे, देवाचा पवित्र आत्मा वा त्याची क्रियाशील शक्‍ती याविरुद्ध केल्या जाणाऱ्‍या निंदेला क्षमा मिळू शकत नाही. अशाप्रकारच्या पापाची समांतरता प्रेषित पौलाने हे लिहिताना स्पष्ट केली: “जे एकदा प्रकाशित झाले ते जर पतित झाले तर त्यांस पश्‍चात्ताप होईल असे पुनः नवीन करणे अशक्य आहे; हे त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळणे व त्याचा उघड अपमान करणे असे आहे.”—इब्रीयांस ६:४-६.

६. एखादे पाप क्षमा होण्याजोगे आहे की नाही हे कशावरून ठरते?

६ क्षमा न होऊ शकणारे पाप कोणी आचरले आहे ते केवळ देवालाच माहीत असते. तथापि, पौलाने असे लिहून याबद्दल काही प्रकाश पाडलाः “कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण जाणूनबुजून पाप केले तर पापांबद्दल यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही. न्याय होण्याची भयंकर अशी मार्गप्रतीक्षा ही काय ती राहतात.” (इब्रीयांस १०:२६, २७) स्वेच्छा बाळगणारा जाणूनबुजून कृति करीत असतो, किंवा तो “हट्टी आणि बहुधा विपर्यस्त स्वार्थी इच्छेने भारावलेला” असतो. (वेबस्टर्स न्यू कॉलेजिएट डिक्शनरी) सत्य समजून आल्यावर जो स्व-ईच्छेने व हट्टीपणाने पापाचरण करीत राहतो त्याची क्षमा होणार नाही. अशाप्रकारे एखादे पातक नव्हे तर ते करण्यामध्ये समाविष्ट असणारी हृदयाची स्थिती, स्वेच्छेची पातळी या गोष्टी ते पातक क्षमा होण्याजोगे आहे की नाही हे ठरवतात. उलटपक्षी, पातक करणाऱ्‍या ख्रिश्‍चनाला जेव्हा आपल्या पातकाबद्दल खरेपणाने वाईट वाटत असते त्यावेळी ती स्थिती कशी असते? त्याला वाटत असणारी गाढ चिंता, त्याने खरे पाहता, क्षमा होऊ न शकणारे पातक केलेले नाही असे सुचवीत असते.

त्यांच्या पातकांची क्षमा झाली नाही

७. येशूचे काही धार्मिक विरोधक क्षमा न होण्याजोगे पाप करीत होते असे आम्ही का म्हणू शकतो?

७ येशूचा विरोध करणाऱ्‍या काही यहूदी धार्मिक पुढाऱ्‍यांनी स्वेच्छेने, क्षमा न होण्याजोगे पातक केले. येशूने चांगली कृत्ये केली व चमत्कारही केले व याद्वारे देवाच्या पवित्र आत्म्याचे कार्य होत असल्याचे त्यांनी पाहिले होते तरी त्या कामाचे श्रेय त्या धर्माधिकाऱ्‍यांनी बालजबूब किंवा दियाबल सैतानाला दिले. त्यांना पूर्ण समज होती तरीही त्यांनी देवाच्या आत्म्याच्या नाकारता न येणाऱ्‍या कार्याविरुद्ध पातक केले. हे क्षमा न होण्याजोगे पातक होते; कारण येशूने म्हटलेः “जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; या युगी नाही व येणाऱ्‍या युगीही नाही.”—मत्तय १२:२२-३२.

८. यहूदा इस्कर्योतचे पाप क्षमा न होण्याजोगे का होते?

८ यहूदा इस्कर्योतचे पाप देखील क्षमा न होण्याजोगे होते. त्याने येशूचा स्वेच्छेने विश्‍वासघात केला; हा मार्ग त्याचा ढोंगीपणा व अप्रामाणिकपणामुळे जाणूनबुजून उद्‌भवला गेला. याचे एक उदाहरण पाहू जाता, मरीया भारी किंमतीच्या सुगंधी तेलाने येशूचा अभिषेक करीत असल्याचे यहूदाने बघितले, तेव्हा त्याने विचारलेः “हे सुगंधी तेल पाऊणशे रुपयांस विकून ते गरिबांस का दिले नाही?” याबद्दल प्रेषित योहान पुढे म्हणतोः “त्याला [यहूदा] गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती; तीत जे टाकण्यात येई ते तो चोरून घेत असे, म्हणून असे म्हणाला.” यानंतर लवकरच यहूदाने चांदीच्या केवळ ३० तुकड्यांसाठी येशूचा विश्‍वासघात केला. (योहान १२:१-६; मत्तय २६:६-१६) हे खरे की, नंतर यहूदाला पस्तावा वाटला व त्याने आत्महत्त्या केली. (मत्तय २७:१-५) पण त्याची क्षमा झाली नाही, कारण त्याने हेतूपुरस्सर व सातत्याने आचरलेले स्वार्थी मार्गाक्रमण व त्याचे घातकी कृत्य यांनी ते पाप पवित्र आत्म्याविरुद्ध केले असल्याचे स्पष्टपणे प्रतिबिंबित केले. यामुळेच, येशूने यहूदाला “नाशाचा पुत्र” असे केवढे समर्पक रितीने म्हटले!—योहान १७:१२; मार्क ३:२९; १४:२१.

त्यांच्या पापांची क्षमा झाली

९. दावीदाने बथशेबासोबत केलेल्या पापाची देवाने का क्षमा केली?

९ स्वेच्छेने करण्यात येणारी पापे ही देव ज्या चुकांची क्षमा करतो अशांच्या अगदी विरुद्ध असतात. याचे उदाहरण म्हणून इस्राएलाचा राजा दावीद याचा विचार करा. त्याने उरीयाची बायको बथशेबा हिच्याबरोबर व्यभिचार केला; नंतर यवाबाद्वारे त्याने उरीयाला लढाईत ठार मारण्याची योजना केली. (२ शमुवेल ११:१-२७) मग, देवाने दावीदावर का दया दाखवली? प्रामुख्यत्वे देवराज्याच्या करारामुळे आणि दावीदाची स्वतःची दयाळूता व त्याने केलेला खरा पश्‍चात्ताप यामुळे.—१ शमुवेल २४:४-७; २ शमुवेल ७:१२; १२:१३.

१०. पेत्रानेही गंभीर पातक केले होते तरी देवाने त्याची का क्षमा केली?

१० तसेच प्रेषित पेत्राचा देखील विचार करा. त्याने येशूचा पुनपुनः नकार करून फार गंभीर पाप केले. मग, देवाने पेत्राला का क्षमा केली? यहूदा इस्कर्योतसारखा पेत्र देव व ख्रिस्त यांच्या सेवेत अप्रामाणिक नव्हता. या प्रेषिताचे पातक दैहिक अशक्‍तपणामुळे घडले, आणि त्याला खरा पश्‍चात्ताप झाला व तो “मोठ्या दुःखाने रडला.”—मत्तय २६:६९-७५.

११. तुम्ही “पश्‍चात्ताप” याची व्याख्या कशी देऊ शकाल, आणि कोणी खराच पश्‍चात्तापी असल्यास त्याने काय करावयास हवे?

११ वरील उदाहरणे स्पष्ट करतात की, कोणी गंभीर पापे केली असली तरी त्याला यहोवा देवाची क्षमा मिळू शकते. पण या क्षमेसाठी कोणत्या प्रवृत्तीची गरज आहे? देवाकडून क्षमा मिळण्यासाठी पातक करणाऱ्‍या ख्रिश्‍चनाने खरा पश्‍चात्ताप दाखवला पाहिजे. पश्‍चात्ताप करणे याचा अर्थ, “गत चुकांबद्दल पश्‍चात्ताप दाखवून पापापासून मागे वळणे” असा, किंवा “एखाद्याने जे केले आहे वा करीत आहे त्याबद्दल दुःख वा पश्‍चात्ताप वाटणे” असा आहे. (वेबस्टर्स थर्ड न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी) खरा पश्‍चात्तापी त्याच्या पातकामुळे यहोवाचे नाम व त्याची संस्था यांजवर जी निंदा, दुःख किंवा समस्या आणल्या गेल्या त्यासंबंधाने तीव्र खेद प्रदर्शित करतो. पश्‍चात्ताप वाटणारा पातकी त्यानुसारची फळे, व पश्‍चात्तापाला अनुसरून असणारी कृत्ये करतो. (मत्तय ३:८; प्रे. कृत्ये २६:२०) उदाहरणार्थ, त्याने कोणाची लुबाडणूक केली असल्यास झालेल्या नुकसानाची भरपाई करून देण्यासाठी तो व्यवहार्य पावले उचलील. (लूक १९:८) अशा या पश्‍चात्तापी ख्रिश्‍चनाला यहोवा आपली भरपूर क्षमा करील असे मानण्याची योग्य शास्त्रवचनीय कारणे आहेत. ती कारणे कोणती?

देवाच्या क्षमाशीलतेबद्दल आत्मविश्‍वास राखण्याजोगी कारणे

१२. स्तोत्रसंहिता २५:११ सुचविते त्याप्रमाणे एखादा पश्‍चात्तापी व्यक्‍ती क्षमेसाठी कसल्या आधारावर प्रार्थना करू शकतो?

१२ पश्‍चात्ताप झालेला एखादा पातकी यहोवाच्या नामाच्या आधारावर त्याच्याकडे क्षमेसाठी आत्मविश्‍वासाने प्रार्थना करू शकतो. दावीदाने काकळूत केलीः “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] तू आपल्या नामासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; ती फार झाली आहे.” (स्तोत्रसंहिता २५:११) अशी प्रार्थना व पातक्याने देवाच्या नावाचा जो अपमान घडवून आणला आहे त्याबद्दल त्याला वाटणारा पश्‍चात्ताप या गोष्टी, त्याने भावी काळात अशाप्रकारातील गंभीर पातक करण्याला प्रतिबंध घालणाऱ्‍या ठरल्या पाहिजेत.

१३. ईश्‍वरी क्षमेसंबंधाने प्रार्थना कोणती भूमिका पार पाडते?

१३ चुका घडलेल्या पण पश्‍चात्तापी असणाऱ्‍या आपल्या सेवकांच्या कळकळीच्या प्रार्थनांना यहोवा देव उत्तर देतो. उदाहरणार्थ, दावीदाने बथशेबासोबत आचरलेल्या पापाचा अघोरीपणा कळल्यावर दावीदाने जी कळकळीची प्रार्थना केली त्याकडे देवाने दुर्लक्ष केले नाही. खरे म्हणजे दावीदाने स्तोत्रसंहितेच्या ५१ अध्यायात व्यक्‍त केलेले उद्‌गार त्याच्या दीनवाणीने केलेल्या याचना प्रकटवतात. त्याने अशी याचना केलीः “हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करूणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुऊन माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.”—स्तोत्रसंहिता ५१:१, २, १७.

१४. येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास प्रदर्शित करणाऱ्‍यांना देव क्षमा देतो याबद्दल शास्त्रवचने कोणती हमी देतात?

१४ येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना देव क्षमा प्रदान करतो. पौलाने लिहिलेः “त्याच्या रक्‍ताच्या द्वारे आपल्याला मुक्‍ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे.” (इफिसकर १:७) याच अर्थाने प्रेषित योहानाने देखील असे लिहिलेः “अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांस लिहितो. जर कोणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित आहे; आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.”—१ योहान २:१, २.

१५. देवाच्या दयेचा अनुभव उपभोगण्यासाठी त्या पश्‍चाताप्याने काय करण्यास हवे?

१५ यहोवाची दया पश्‍चाताप्याला विश्‍वासाचा हा आधार देते की, त्याला क्षमा मिळू शकते. नेहम्याने म्हटलेः “तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस.” (नेहम्या ९:१७; पडताळा निर्गम ३४:६, ७.) अर्थात, ईश्‍वरी क्षमा अनुभवण्यासाठी त्या पातक्याने देवाच्या नियमांचे अवलंबन केलेच पाहिजे. स्तोत्रकर्त्याने म्हटले तसे, “मजवर करूणा कर म्हणजे मी जगेन; कारण तुझे शास्त्र माझा पूर्णानंद आहे. हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यू.व.] तुझी करूणा थोर आहे, तू आपल्या निर्णयांस अनुसरून मला उत्तेजित कर.”—स्तोत्रसंहिता ११९:७७, १५६.

१६. यहोवा आमची पापीष्ठ स्थिती लक्षात आणतो यामुळे कोणते सांत्वन मिळते?

१६ यहोवा आमची पापीष्ठ स्थिती लक्षात घेतो ही वस्तुस्थिती देखील पश्‍चाताप्याला सांत्वन देते आणि देवाकडे क्षमेसाठी आत्मविश्‍वासाने प्रार्थना करण्याचे कारण पुरवते. (स्तोत्रसंहिता ५१:५; रोमकर ५:१२) स्तोत्रकर्त्या दावीदाने हे घोषित करताना खरोखरी सांत्वनदायक खात्री दिली की, “आमच्या पातकांच्या मानाने त्याने [यहोवाने] आमचे पारिपत्य केले नाही. त्याने आमच्या दुष्कर्मांच्या मानाने आम्हास प्रतिफल दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्‍यांवर विपुल आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो लक्षात ठेवतो.” (स्तोत्रसंहिता १०३:१०-१४) होय, आमचा स्वर्गीय पिता हा कोणा मानवी पालकापेक्षा खूपच दयाळू व कनवाळू आहे.

१७. एखाद्याचा देवास केलेल्या विश्‍वासू सेवेचा गत अहवाल क्षमेसंबंधाने कोणते वर्चस्व राखून आहे?

१७ पश्‍चातापी क्षमेसाठी हा आत्मविश्‍वास राखून प्रार्थना करू शकतो की, यहोवा त्याच्या पूर्वीच्या विश्‍वासू सेवाकार्याच्या अहवालाची विस्मृति होऊ देणार नाही. नेहम्या आपल्या पापाच्या क्षमेबद्दल प्रार्थना करीत नव्हता, पण तो असे म्हणालाः “हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.” (नेहम्या १३:३१) पश्‍चात्ताप झालेल्या ख्रिश्‍चनाला या शब्दांमध्ये सांत्वन आढळून येईलः “तुमचे कार्य व जी प्रीती तुम्ही त्याच्या नामावर दाखवली तीही देवाने विसरावी असा तो अन्यायी नाही.”—इब्रीयांस ६:१०.

वडील वर्गाकडून मदत

१८. एखाद्या ख्रिश्‍चनाच्या पापाने त्याला आध्यात्मिक दृष्ट्या आजारी बनवले असल्यास त्याने काय करावे?

१८ एखाद्या ख्रिश्‍चनाच्या पापाने त्याला आध्यात्मिक दृष्ट्या आजारी बनवले आहे व त्याला आता आध्यात्मिक नंदनवनामध्ये राहण्यास किंवा प्रार्थना करण्यास पात्र नाही असे वाटत असल्यास काय? “त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या [यहोवा, न्यू.व.] नावाने त्याला तेल लावावे व त्याजवर ओणवून प्रार्थना करावी,” असे शिष्य याकोबाने लिहिले. “विश्‍वासाची प्रार्थना दुखणाइतांस वाचवील. प्रभू [यहोवा, न्यू.व.] त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल.” होय, मंडळीतील वडील पश्‍चातापी विश्‍वासू जनासोबत व त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतात आणि त्याला आध्यात्मिक आरोग्य पुन्हा मिळू शकेल अशी आशा धरू शकतात.—याकोब ५:१४-१६.

१९. कोणाला बहिष्कृत करण्यात आले असल्यास त्याने क्षमा मिळण्यासाठी व परत घेतले जाण्यासाठी काय केले पाहिजे?

१९ पश्‍चात्ताप न दाखवणाऱ्‍या पाप्याला न्यायदान देणारी समिती बहिष्कृत करत असली तरी त्याने क्षमा होऊ न शकणारे पातक केले आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तथापि, क्षमा होण्यासाठी व मंडळीत परत घेतले जाण्यासाठी त्याने देवाच्या नियमांचे नम्रपणे पालन करावयास हवे, पश्‍चात्तापास योग्य अशी फळे दाखवली पाहिजे व वडीलांना परत घेण्याबद्दल याचना केली पाहिजे. प्राचीन करिंथच्या मंडळीत एका व्यभिचाऱ्‍याला बहिष्कृत केल्यावर पौलाने लिहिलेः “अशा मनुष्याला मोठ्या पक्षाने दिलेली शिक्षा पुरे; त्या मनुष्याने आपल्या दुःखातिशयात बुडून जाऊ नये म्हणून तुम्ही उलट त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे हे बरे. यामुळे मी तुम्हांस विनंती करतो की, तुम्ही त्यांजवर प्रीती करण्याचे ठरवा.”—२ करिंथकर २:६-८; १ करिंथकर ५:१-१३.

देव बळ पुरवतो

२०, २१. आपण क्षमा न होणारे पातक केले आहे अशी काळजी वाटणाऱ्‍या व्यक्‍तीला कोणती गोष्ट साहाय्यक ठरू शकते?

२० आपण क्षमा न होण्याजोगे पाप केले आहे अशी चिंता ढासळते आरोग्य किंवा त्रास यामुळे वाटत असल्यास पुरेशी विश्रांती व झोप घेणे या गोष्टी लाभदायक ठरू शकतील. तथापि, तुम्ही पेत्राचे हे शब्द खासपणे लक्षात ठेवण्यास हवेत की, “त्याजवर [देव] तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो.” सैतान तुम्हाला कधीही निराश न करो, कारण पेत्र पुढे म्हणतोः “सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. त्याच्याविरूद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहा. जगातील तुमच्या बंधुवर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहेत हे लक्षात असू द्या. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, कृपेचा देव स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील.”—१ पेत्र ५:६-१०.

२१ यास्तव, तुम्ही पश्‍चात्तापदग्ध आहात, पण आपण क्षमा न होण्याजोगे पाप केले आहे अशी तुम्हाला भीती वाटत असेल तर देवाचे मार्ग नेहमी सूज्ञ, न्यायी, व प्रेमळ असतात हे लक्षात ठेवा. या कारणामुळे तुम्ही त्याला विश्‍वासाने प्रार्थना करा. “विश्‍वासू व बुद्धिमान दास” याजमार्फत जे आध्यात्मिक अन्‍न दिले जात आहे ते घेत राहा. (मत्तय २४:४५-४७) आपल्या विश्‍वासू बांधवांसोबत एकत्र मिळत राहा आणि ख्रिस्ती सेवकपणात नियमाने भाग घ्या. यामुळे तुमचा विश्‍वास दृढ होईल आणि मग, देवाने तुमच्या पापांची क्षमा केली नाही अशी भीती तुम्हाला चिंताक्रांत करणार नाही.

२२. आता आम्ही कशाचा विचार करणार आहोत?

२२ यहोवा भरपूर क्षमा करतो या गोष्टीची जाणीव राखून आध्यात्मिक नंदनवनात निवास करणाऱ्‍यांना मोठे सांत्वन मिळू शकते. तरीही, त्यांचे जीवन आज कोणा समस्याविना नाही. कोणा प्रिय व्यक्‍तीचा मृत्यु घडला आहे किंवा एखादा प्रिय मित्र फारच आजारी आहे म्हणून एखादा निराश असू शकेल. आम्ही पाहणारच आहोत की, या व इतर परिस्थितीत यहोवा मदत देतो व त्याच्या लोकांचे नेतृत्व आपल्या पवित्र आत्म्याद्वारे करतो.

तुमची काय उत्तरे आहेत?

▫ यहोवा ‘भरपूर क्षमा करतो’ याबद्दल कोणता पुरावा आहे?

▫ कोणत्या पापाची क्षमा होऊ शकत नाही?

▫ कोणत्या परिस्थितीत एखाद्याच्या पापांची क्षमा होऊ शकते?

▫ पश्‍चात्ताप्याला देवाच्या क्षमेबद्दल का आत्मविश्‍वास वाटावा?

▫ पश्‍चाताप्यांना कोणती मदत उपलब्ध आहे?

[२१ पानांवरील चित्रं]

दावीद व पेत्राला क्षमा का मिळाली, पण यहूदा इस्कर्योतला ती का मिळू शकली नाही हे तुम्हाला ठाऊक आहे का?

[२३ पानांवरील चित्रं]

मंडळीतील वडीलांनी दिलेली मदत एखाद्या ख्रिश्‍चनाला आध्यात्मिक रितीने मदत देण्यास पुष्कळ काही करू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा