“सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा”
“आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पाहा.”—मलाखी ३:१०.
१. (अ) इ. स. पूर्वीच्या पाचव्या शतकात यहोवाने त्याच्या लोकांना कोणते निमंत्रण दिले? (ब) पहिल्या शतकात यहोवा न्यायनिवाड्यासाठी मंदिरात आला तेव्हा काय घडले?
इ.स. पूर्वीच्या पाचव्या शतकात इस्राएली लोक यहोवाला अविश्वासू बनले होते. त्यांनी दशमांश देण्याचे थांबवले होते आणि मंदिरात हलक्या दर्जाची अर्पणे आणीत होते. तरीसुद्धा यहोवाने त्यांना अभिवचन दिले की, त्यांनी सगळा दशमांश भांडारात आणला तर तो जागा पुरणार नाही इतका आशीर्वाद त्यांच्यावर ओतणार होता. (मलाखी ३:८-१०) याच्या सुमारे ५०० वर्षांनी यहोवा आपल्या कराराचा निरोप्या येशू याच्या प्रतिनिधीत्वाद्वारे यरुशलेमाच्या मंदिरात न्यायनिवाड्यासाठी आला. (मलाखी ३:१) इस्राएल सबंध राष्ट्र या नात्याने उणे पडले होते, पण जे विशिष्ट यहोवाकडे परतले अशांना त्याने समृद्धपणे आशीर्वादित केले. (मलाखी ३:७) त्यांचा अभिषेक होऊन ते यहोवाचे आध्यात्मिक पुत्र, एक नवी उत्पत्ती, “देवाचे इस्राएल” झाले.—गलतीकर ६:१६; रोमकर ३:२५, २६.
२. मलाखी ३:१-१० ची दुसरी पूर्णता केव्हा व्हावयाची होती, आणि याबद्दल आम्हाला काय करण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे?
२ याच्या साधारण १,९०० वर्षांनी म्हणजेच १९१४ मध्ये येशूला देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ करण्यात आले व यामुळे मलाखी ३:१-१० च्या प्रेरित वचनांची दुसरी पूर्णता होण्यास प्रारंभ झाला. या रोमांचक घटनेच्या अनुषंगाने आज ख्रिश्चनांना सगळा दशमांश भांडारात आणण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे. आपण तसे केल्यास आम्हाला देखील जागा पुरणार नाही इतका आशीर्वाद अनुभवास येत असल्याचा अनुभव घडेल.
३. (अ) पहिल्या शतकात, (ब) पहिल्या जागतिक महायुद्धाआधी यहोवासाठी मार्ग तयार करणारा निरोप्या कोण होता?
३ मंदिरात त्याच्या येण्याबद्दल यहोवाने असे म्हटलेः “पहा, मजपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो.” (मलाखी ३:१) याच्या पहिल्या शतकाच्या पूर्णतेबद्दल पाहिल्यास बाप्तिस्मा करणारा योहान इस्राएलापाशी पापाच्या पश्चातापाचा संदेश घेऊन आला. (मार्क १:२, ३) तर मग, यहोवाने मंदिरात दुसऱ्यांदा येण्याआधी काही तयारी करण्याची गरज होती का? होय. पहिल्या जागतिक युद्धाच्या दशकांआधी जगाच्या दृश्यात पवित्र शास्त्र विद्यार्थी दिसले. यांनी पवित्र शास्त्राच्या शुद्ध तत्त्वांचे शिक्षण दिले आणि त्रैक्य तसेच नरकाग्नी यासारख्या देव-निंदात्मक तत्त्वांना उघड करून दाखवले. त्यांनी १९१४ मध्ये विदेश्यांच्या काळाची समाप्ती घडेल असा इशारा देखील दिला. पुष्कळांनी सत्याच्या या ज्योतिवाहकांना प्रतिसाद दिला.—स्तोत्रसंहिता ४३:३; मत्तय ५:१४, १६.
४. प्रभूच्या दिवशी कोणत्या प्रश्नाचे निरसन होणार होते?
४ पवित्र शास्त्र ज्याला “प्रभूचा दिवस” म्हणते तो १९१४ या वर्षापासून सुरु झाला. (प्रकटीकरण १:१०) या दिवसात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडावयाच्या होत्या; यामध्ये “विश्वासू व बुद्धिमान दास” याची ओळख आणि त्याची “[धन्याच्या] सर्वस्वावर” नेमणूक या गोष्टीही समाविष्ट होत्या. (मत्तय २४:४५-४७) मागे १९१४ मध्ये हजारो चर्चेसनी स्वतः ख्रिस्ती असल्याचा दावा केला होता. तर मग, धनी येशू ख्रिस्त, आपला विश्वासू व बुद्धिमान दास कोण असेल हे कोणत्या गटाच्या बाबतीत ठरवणार होता? हाच प्रश्न, यहोवा मंदिरात आल्यावर सोडवण्यात येणार होता.
आध्यात्मिक मंदिरात येणे
५, ६. (अ) यहोवा न्यायनिवाड्यासाठी कोणत्या मंदिरी आला? (ब) ख्रिस्ती धर्मजगताला यहोवाकडून कोणता न्याय मिळाला?
५ पण तो कोणत्या मंदिरात आला? यरूशलेमातील खरोखरीच्या मंदिरात निश्चितच नव्हे. कारण त्या मंदिरापैकींचे शेवटले मागे इ. स. ७० मध्ये नष्ट झाले. तरीपण, त्या यरुशलेमाचे प्रतिबिंब असणारे एक भव्य मंदिर यहोवाला आहे. पौलाने या मोठ्या मंदिराबद्दल बोलणी केली व ते केवढे भव्य आहे, तसेच स्वर्गात पवित्र स्थानी आहे व त्याचे अंगण या पृथ्वीवर आहे हे दाखवले. (इब्रीयांस ९:११, १२, २४; १०:१९, २०) याच मोठ्या आध्यात्मिक मंदिरी यहोवा न्यायनिवाड्याच्या कामासाठी आला.—पडताळा प्रकटीकरण ११:१; १५:८.
६ हे केव्हा घडले? जो भरदार पुरावा उपलब्ध आहे त्यावरून १९१८ मध्ये.a याचा कोणता परिणाम दिसला? ख्रिस्ती धर्मजगताच्या बाबतीत यहोवाने पाहिले की, त्याचे हात रक्ताने भरलेले आहेत व तो एक भ्रष्ट अशी धार्मिक व्यवस्था बनला आहे, ज्याने या जगासोबत व्यभिचार केला आहे, धनवानांसोबत मैत्री संपादली आणि गरीबांना जाच दिला; तसेच खऱ्या भक्तीचे आचरण करण्याऐवजी त्याने खोटी तत्त्वे शिकवली. (याकोब १:२७; ४:४) मलाखीद्वारे यहोवाने त्यांना हा इशारा दिलाः “मी न्याय करावयाला तुम्हाकडे येईन आणि जादुगीर, व्यभिचारी, खोटे साक्षी यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजूरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ यांजवर जुलूम करणारे, . . . यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.” (मलाखी ३:५) ख्रिस्ती धर्मजगताने हे सर्व काही केले आणि जे अधिक वाईट तेच केले. यहोवाने याला, खोट्या धर्माचे जगव्याप्त भव्य साम्राज्य, मोठी बाबेल यासोबत धिक्कारले असून त्यांचा नाश करणार आहे हे १९१९ पर्यंत स्पष्ट दिसून आले. तेव्हापासून पुढे धार्मिक लोकांना हे आव्हान देण्यात आलेः “माझ्या लोकांनो, तिच्यातून निघा.”—प्रकटीकरण १८:१, ४.
७. येशूने आपला विश्वासू व बुद्धिमान दास असल्याची ओळख कोणाबद्दल दिली?
७ मग, हा विश्वासू व बुद्धिमान दास कोण होता? पहिल्या शतकात तो, बाप्तिस्मा करणारा योहान व कराराचा निरोप्या येशू यांच्या साक्षीकार्याला प्रतिसाद देणारा लहान गट होता. आमच्या शतकात, १९१४च्या पहिल्या जागतिक युद्धाआधी पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी केलेल्या तयारीच्या कार्याला काही हजारोंनी प्रतिसाद दिला. यांना पहिल्या जागतिक युद्धामध्ये खूपच कठीण छळ सहन करावा लागला, पण यांनी आपले अंतःकरण यहोवाशी जडले असल्याचे दाखवून दिले.
शुद्धीकरणाचे काम
८, ९. मागे १९१८ मध्ये विश्वासू व बुद्धिमान दासाला कोणत्या प्रकारच्या शुद्धतेची गरज होती, आणि यहोवाने याबद्दल कोणते अभिवचन दिले होते?
८ तथापि, या गटाचे देखील शुद्धीकरण होणे जरुरीचे होते. ज्यांनी त्यांच्यासोबत आपली संगत जडविली होती ते काहीजण, विश्वासाचे शत्रू असल्याचे दिसून आले आणि अशांना काढून टाकणे अवश्य होते. (फिलिप्पैकर ३:१८) बाकीचे काहीजण यहोवाची सेवा करण्याची जबाबदारी खांदी उचलण्याच्या बाबतीत इच्छुक नव्हते, यामुळे ते ओघाओघाने मागे पडले. (इब्रीयांस २:१) याशिवाय, काही बाबेली प्रथाही रेंगाळल्या होत्या, त्या काढून टाकायच्या होत्या. विश्वासु व बुद्धिमान दासाची संघटनात्मक रितीने देखील शुद्धी व्हावयाची होती. या जगासंबंधाने तटस्थतेचे धोरण समजून त्याचा अवलंब करावयाचा होता. याचप्रमाणे जग दिवसेंदिवस भ्रष्ट होत असता मंडळीबाहेर नैतिक व आध्यात्मिक अशुद्धता काढून टाकण्यासाठी जोरदार लढत द्यावयाची होती.—पडताळा यहूदा ३, ४.
९ होय, शुद्धीकरण जरुरीचे होते, आणि यहोवाने सिंहासनाधिष्ट येशूबद्दल हे प्रेमळ भाकित केले होतेः “रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल, लेवींच्या वंशजास तो शुद्ध करेल; त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे तो शुद्ध करेल; मग ते धर्माने परमेश्वराला [यहोवा, न्यू.व.] बलि अर्पण करतील.” (मलाखी ३:३) यहोवाने १९१८ पासून आपल्या कराराच्या निरोप्याद्वारे लोकांना शुद्ध करण्याचे त्याचे अभिवचन पूर्ण केले आहे.
१०. देवाचे लोक कसल्या प्रकारची अर्पणे आणतात, आणि यहोवा अशांना कोणते निमंत्रण देतो?
१० यहोवाने रुपे गाळून शुद्ध करणाऱ्या बाबतीत जी हालचाल केली त्याद्वारे ख्रिस्ताचे अभिषिक्त बांधव आणि त्यांना यहोवाच्या सेवेत साथ देणाऱ्या मोठ्या लोकसमुदायाला लाभ मिळाला. (प्रकटीकरण ७:९, १४, १५) धर्माने बलि करण्यात ते संघटना या नात्याने सामोरे आले व अद्यापही करीत आहेत. त्यांचे अर्पण “पूर्वीच्या दिवसांप्रमाणे प्राचीन वर्षाप्रमाणे . . . परमेश्वराला [यहोवा, न्यू.व.]” आवडते. (मलाखी ३:४) यहोवाने यांनाच भविष्यवादितपणे हे निमंत्रण दिलेः “‘माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे,’ सेनाधीश यहोवा म्हणतो, ‘मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पाहा.’”—मलाखी ३:१०.
अर्पण व दशमांश
११. आता मोशेच्या नियमशास्त्रात देण्यात आलेल्या अर्पणांची का गरज राहिलेली नाही?
११ मलाखीच्या काळी लोक धान्य, फळे, जनावरे यासारखी खरी अर्पणे व दशमांश देत असत. येशूच्या काळीही विश्वासू इस्राएलांनी मंदिरात खरी अर्पणे आणली होती. तथापि, येशूच्या मृत्युनंतर या सर्वात बदल झाला. नियमशास्त्र रद्द झाले व त्याबरोबर विशिष्ट भौतिक अर्पणे व दशमांश देण्याची आज्ञा देखील संपुष्टात आली. (इफिसकर २:१५) येशूने नियमशास्त्राखालील भविष्यवादित अर्पणांचा नमूना पूर्ण केला. (इफिसकर ५:२; इब्रीयांस १०:१, २, १०) आता ख्रिस्तीजन कोणते अर्पण व दशमांश देऊ शकतात?
१२. ख्रिस्ती जन कोणत्या आध्यात्मिक स्वरुपाची अर्पणे व यज्ञे वाहतात?
१२ यांच्यासाठी आध्यात्मिक स्वरुपाची अर्पणे खास प्रकारची आहेत. (पडताळा फिलिप्पैकर २:१७; २ तीमथ्य ४:६.) उदाहरणार्थ, प्रचाराचे कार्य हे देखील एक अर्पण आहे असे पौलाने याप्रकारे म्हटलेः “आपण त्याच्याच द्वारे देवाला उपकारस्मरणरुपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्या ओठांचे फळ असा आहे.” त्याने आणखी एका आध्यात्मिक प्रकारच्या अर्पणाचा उल्लेख करून असे म्हटलेः “परोपकार व दानधर्म करणे विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (इब्रीयांस १३:१५, १६) जेव्हा पालक आपल्या मुलांना पायनियरींगच्या कार्यात शिरण्याचे प्रोत्साहन देत असतात तेव्हा ते जणू यहोवाला त्यांचे अर्पण देत असतात. हे, देवाने ज्याला विजय मिळवून दिला त्या इफ्ताहाने आपल्या मुलीचे जे “होमार्पण केले,” [न्यू.व.] त्यासारखेच आहे.—शास्ते ११:३०, ३१, ३९.
१३. ख्रिश्चनांनी आपल्या उत्पन्नाचा खरा दशमांश देण्याची का जरुरी नाही?
१३ पण दशमांशाबद्दल काय? ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसमध्ये जसे केले त्याप्रमाणेच ख्रिस्ती जनांनी आपल्या भौतिक प्राप्तीतून दशमांश वेगळा काढून तो यहोवाच्या संस्थेला द्यावा का? नाही, त्याची आता गरज नाही. ख्रिश्चनांसाठी असा काही नियम आहे असे शास्त्रवचने सांगत नाही. पौल यहूदीयातील गरजवंतांसाठी देणग्या गोळा करत होता त्यावेळी अमुक एक टक्का द्यावा असे त्याने म्हटले नाही. उलट तो म्हणालाः “प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये. कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो.” (२ करिंथकर ९:७) खास सेवेत असलेल्या लोकांबद्दल बोलताना तो म्हणाला की, काहींचा निर्वाह स्वेच्छेने देण्यात आलेल्या अनुदानावर होत असला तरी काम करण्याची व स्वतःचा उदरनिर्वाह करण्याची त्याची तयारी होती. (प्रे. कृत्ये १८:३, ४; १ करिंथकर ९:१३-१५) या उद्देशास्तव कसलाही दशमांश आकारण्यात येत नव्हता.
१४. (अ) दशमांश हा, आम्ही यहोवाला आमचे सर्वस्व देण्याचे का प्रतिनिधित्व करीत नाही? (ब) मग, दशमांशाद्वारे कशाचे प्रतिनिधित्व केले जाते?
१४ स्पष्टपणे बघता, ख्रिश्चनांसाठी दशमांश काही गोष्टीचे सूचक किंवा दर्शक आहे. तो दहावा हिस्सा आहे, आणि दहा ही संख्या पवित्र शास्त्रात पृथ्वीबद्दलच्या गोष्टींची पूर्णता दाखवीत असल्यामुळे दशमांश हा आम्ही जे सर्व आमचे आहे त्याच्या देण्याची सूचकता दाखवतो का? नाही, जेव्हा आम्ही यहोवाला आपले समर्पण करतो आणि पाण्याचा बाप्तिस्मा घेतो तेव्हा आम्ही आमचे सर्वकाही यहोवाला देऊन टाकत असतो. आमच्या समर्पणाच्या काळापासून आमच्यापाशी स्वतःचे असे काही राहात नाही; ते सर्व यहोवाच्या मालकीचे बनते. तरीपण, यहोवा वैयक्तिकांना त्यांच्याकडील प्राप्तीचा विनियोग करण्याची मुभा देतो. यास्तव, आम्ही यहोवाच्या सेवेस्तव आमच्या प्राप्तीचा जो भाग देतो, किंवा त्याच्या सेवाकार्यामध्ये त्याच्या प्रेमामुळे तसेच आम्ही त्याचे आहोत ही जाणीव राखल्यामुळे जे काही देत असतो त्याचे प्रतिनिधित्व करते. आधुनिक काळचा दशमांश हा निव्वळ दहावा हिस्सा असण्यास नको. तो काही प्रकरणात कदाचित त्यापेक्षाही कमी असू शकेल. पण इतरांच्या बाबतीत तो त्यापेक्षा मोठा असेल. प्रत्येक जण त्याच्या अंतःकरणाला जी प्रेरणा मिळते आणि त्याची परिस्थिती त्याला जे शक्य करून देते तेच तो आणतो.
१५, १६. आमच्या आध्यात्मिक दशमांशामध्ये कशाकशाचा समावेश होतो?
१५ या आध्यात्मिक दशमांशामध्ये कशाकशाचा समावेश होतो? एक गोष्ट म्हणजे आपण यहोवाला आपला वेळ व शक्ती देतो. आम्ही सभा, संमेलने व अधिवेशन यांना उपस्थित राहण्यास आणि सेवा कार्यासाठी जो वेळ देतो तो यहोवाला दिल्यासारखा आहे व हा आमचा दशमांश आहे. याचप्रमाणे आजाऱ्यांना भेटण्यात आणि इतरांना मदत देण्यासाठी जो वेळ खर्च करतो तोही दशमांशच आहे. राज्य सभागृह बांधणी कामात मदत देणे आणि राज्य सभागृहाची स्वच्छता व त्याचे संगोपन करण्याचे काम संभाळणे याही गोष्टी त्यातील एक भाग आहेत.
१६ आमच्या दशमांशात आर्थिक अनुदानाचाही समावेश होतो. अलिकडील वर्षांमध्ये यहोवाच्या संस्थेची अपूर्व वाढ होत असल्यामुळे आर्थिक बंधने वाढली आहेत. नव्या राज्यसभागृहांची, नवीन शाखा दप्तर सोयींची, नव्या संमेलन सभागृहांची आणि जे आधीच बांधलेले आहेत अशांची काळजी वाहण्याची गरज आहे. ज्यांनी मोठा व्यक्तिगत रुपाचा त्याग सोसून खास सेवेसाठी स्वतःला उपलब्ध केले आहे अशांच्या खर्चाला हातभार लावणे हे देखील जबरदस्त आव्हान आहे. मिशनरी, प्रवासी पर्यवेक्षक आणि खास पायनियर्स यांच्या खर्चासाठी चार कोटीपेक्षा अधिक डॉलर्स १९९१ मध्ये लागले; हे सर्व काही ऐच्छिक अनुदानाद्वारे प्राप्त झाले.
१७. आम्ही आध्यात्मिक दशमांश म्हणून काय द्यावे?
१७ आम्ही आध्यात्मिक दशमांश म्हणून काय द्यावे? यहोवा त्याची टक्केवारी ठरवीत नाही. तरीपण, आमच्या समर्पणाची जाण, यहोवा व आमच्या बांधवाबद्दल वाटणारे खरे प्रेम, तसेच लोकांचे जीवन पणाला लागले आहे यामुळे निकड आहे ही वाटणारी जाणीव या सर्वांमुळे आम्ही पूर्ण रुपाचा आध्यात्मिक दशमांश द्यावा असे उत्तेजन आपल्याला मिळते. यहोवाची सेवा जितक्या अधिक प्रमाणात करता येते तितकी करण्याची प्रेरणा आम्हाला होते. आपण आपला हात आखडून घेतला; किंवा स्वतःला व आमच्या मिळकतीला आपण कुरकूरीने देत राहिलो तर ते जणू यहोवाला ठकवण्यासारखे ठरू शकते.—पडताळा लूक २१:१-४.
जागा पुरणार नाही इतका आशीर्वाद
१८, १९. यहोवाच्या लोकांनी पूर्ण अर्थाने दशमांश आणल्यामुळे त्यांना कोणता आशीर्वाद मिळाला आहे?
१८ यहोवाच्या लोकांनी प्रचार कार्याच्या गरजांच्या बाबतीत १९१९ पासून आपला वेळ, शक्ती, आणि आर्थिक मदत अगदी उदारपणे देऊ केली आहे. त्यांनी खरेपणाने दशमांश भांडारात आणला आहे. यामुळे, यहोवाने देखील आपले अभिवचन पूर्ण केले आणि जागा पुरणार नाही इतका आशीर्वाद त्यांच्यावर ओतला आहे. हे, त्यांची संख्यावाढ ज्या नाट्यमय पद्धतीने झाली त्यावरून दिसून आले आहे. यहोवा आपल्या मंदिरी १९१८ मध्ये आला तेव्हा जे थोडे हजार जण त्याची सेवा करीत होते, तेव्हापासून आज अभिषिक्त जण व त्यांचे साथीदार, दुसरी मेंढरे यांची २२९ वेगवेगळ्या देशात ४० लाखांपेक्षा अधिक संख्येने वाढ झाली आहे. (यशया ६०:२२) यांची सत्याची समज प्राप्त होण्यामध्येही सतत वाढ होत राहिली आहे. हाही एक आशीर्वाद आहे. संदेष्ट्यांचे वचन आता त्यांना अधिक खात्रीशीर होत आहे. यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेबद्दल त्यांना वाटणारा आत्मविश्वास खरोखरी पूर्ण रुपाने दृढ झाला आहे. (२ पेत्र १:१९) ते “परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] शिकविलेले” लोक असे खऱ्या अर्थाने आहेत.—यशया ५४:१३.
१९ मलाखीद्वारे यहोवाने आणखी एका आशीर्वादाचे असे भाकित केलेः “तेव्हा परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय बाळगणारे एकमेकांस बोलले, ते परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] कान देऊन ऐकले व परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” (मलाखी ३:१६) ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या संस्थांमध्ये केवळ यहोवाचे साक्षीदारच त्याच्या नामाबद्दल विचार करतात आणि ते इतर राष्ट्रांमध्ये प्रसिद्ध करीत आहेत. (स्तोत्रसंहिता ३४:३) त्यांच्या विश्वासूपणाची यहोवाला आठवण आहे याबद्दलची खात्री दिल्यामुळे त्यांना किती आनंद होत आहे!
२०, २१. (अ) खऱ्या ख्रिश्चनांना कोणते आशीर्वादित नातेसंबंध अनुभवण्यास मिळत आहे? (ब) ख्रिस्ती धर्माच्या बाबतीत कोणता फरक अधिकाधिक स्पष्ट होत आहे?
२० अभिषिक्त शेष यहोवाचे खास लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर एकत्रित होणारा मोठा लोकसमुदाय खऱ्या भक्तीच्या आशीर्वादांचा लाभ त्यांच्यासह मिळवीत आहे. (जखऱ्या ८:२३) यहोवा मलाखीद्वारे यांना हे अभिवचन देतोः “सेनाधीश परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] म्हणतोः ‘मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांजवर दया करीन.’” (मलाखी ३:१७) यहोवाने यांच्याबद्दल एवढा कळकळीचा जिव्हाळा बाळगावा हा केवढा आशीर्वाद आहे!
२१ खरे व खोटे ख्रिस्ती यातील फरक आता अधिकाधिक स्पष्ट होत आहे. ख्रिस्ती धर्मजगत जगाच्या अशुद्धतेच्या खाईत जात असताना यहोवाचे लोक त्याच्या दर्जांना अनुसरून वागतात. यहोवाचे शब्द आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहेः “मग तुम्ही धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल.”—मलाखी ३:१८.
२२. आपण आमचा दशमांश पूर्ण अर्थाने दिल्यास आम्हाला कोणत्या आशीर्वादांचा आनंद अनुभवण्यास मिळेल?
२२ सर्व खोट्या ख्रिश्चनांचा जाब घेण्याचा दिवस लवकरच येईल. “‘पहा, भट्टीसारखा दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील,’ असे सेनाधीश परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] म्हणतो.” (मलाखी ४:१) इ. स. ७० मध्ये यहोवाने त्याच्या आध्यात्मिक राष्ट्राला जसे वाचवले तसे तो त्याच्या लोकांना यावेळीही वाचवील ही त्यांना खात्री आहे. (मलाखी ४:२) याबद्दल ते केवढे आनंदी आहेत! यास्तव, ती वेळ येईपर्यंत आपणापैकी प्रत्येक जण यहोवाला त्याच्या भांडारात पूर्ण रुपाचा दशमांश आणून आपले प्रेम व आमची कदर दाखवू या. तेव्हा तो देखील आम्हाला जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद देईल याचा आत्मविश्वास राखता येईल.
[तळटीपा]
a याबद्दल अधिक माहितीकरता जून १५, १९८७ चा वॉचटावर, पृष्ठे १४-२० पहा.
तुम्ही विवेचीत करू शकाल?
▫ आधुनिक काळात यहोवा त्याच्या कराराच्या निरोप्यासह त्याच्या मंदिरी कधी आला?
▫ विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे, आणि यांना १९१८ नंतर कोणत्या शुद्धीकरणाची आवश्यकता होती?
▫ खरे ख्रिस्ती यहोवाला कोणत्या आध्यात्मिक प्रकारातील अर्पणे आणतात?
▫ भांडारात कोणता दशमांश आणण्याचे ख्रिश्चनांना निमंत्रण आहे?
▫ आध्यात्मिक दशमांश दिल्यामुळे देवाचे लोक कोणत्या आशीर्वादांचा आनंद घेत आहेत?
[१६ पानांवरील चित्रं]
आमच्या आध्यात्मिक दशमांशामध्ये राज्य सभागृहाची बांधणी करण्याकरता लागणारी आमची शक्ती व उत्पन्न देऊ करण्याचा समावेश होतो
[१७ पानांवरील चित्रं]
यहोवाचा आशीर्वाद त्याच्या लोकांवर असल्यामुळे राज्य सभागृह व संमेलन सभागृहासारख्या अधिक बांधणीकामाची आवश्यकता भासत आहे