यहोवाचा आत्मा आपल्या लोकांना निरवतो
“तुझा उत्तम आत्मा मला सद्धर्मभूमीत नेवो.”—स्तोत्रसंहिता १४३:१०.
१, २. यहोवाच्या निष्ठावंत सेवकांना कोणकोणत्या गोष्टींमुळे त्रास संभवत असेल?
‘मला खूपच निराश झाल्यासारखे वाटत आहे! मला कोठून सांत्वन मिळणार? मला देवाने सोडून दिले आहे का?’ असे तुम्हाला कधी वाटले होते का? तसे असल्यास, तुम्ही यामध्ये एकटे नाही. यहोवाचे निष्ठावान सेवक समृद्ध अशा आध्यात्मिक नंदनवनात वसाहतीस आहेत तरी त्यांनाही काही वेळा मानवजातीला सर्वसाधारण असणाऱ्या त्रासदायक समस्या, परिक्षा आणि मोह यांना तोंड द्यावे लागत आहे.—१ करिंथकर १०:१३.
२ कदाचित तुम्ही दीर्घकालीन परिक्षा किंवा मोठ्या त्रासाच्या कारणांमुळे विचलीत बनला असाल. तुम्हाला कोणा प्रिय नातेवाईकाच्या निधनामुळे खूप दुःख झाले असेल आणि अगदी एकाकी वाटत असेल. किंवा तुमच्या प्रिय मित्राच्या आजारीपणामुळे तुमचे अंतःकरण त्रस्त झाले असावे. अशा परिस्थितीमुळे जीवनातील तुमचा आनंद, शांती हिरावली गेली असेल आणि तुमच्या विश्वासाला देखील धोका संभवत असेल. आता तुम्ही काय करावयास हवे?
देवाला त्याच्या आत्म्यासाठी विचारणा करा
३. शांती, आनंद यासारख्या गुणांना हिरावून घेतले जात असल्यास कोणती गोष्ट करणे सूज्ञतेचे असेल?
३ तुमची शांती, आनंद किंवा इतर कोणताही ईश्वरी गुण हिरावला जात असेल तर देवाच्या पवित्र आत्म्यासाठी किंवा त्याच्या क्रियाशील शक्तीसाठी प्रार्थना करणे सूज्ञतेचे असेल. ते का बरे? कारण यहोवाचा आत्मा चांगली फलप्राप्ती निर्माण करतो आणि त्यामुळे ख्रिस्ती जनांना समस्या, परिक्षा व मोहपाश यांना चांगल्या रितीने तोंड देता येते. “देहाची कर्मे” याबद्दल इशारा दिल्यावर प्रेषित पौलाने लिहिलेः “आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन ही आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.”—गलतीकर ५:१९-२३.
४. कोणा परिक्षा किंवा मोहपाश यांना तोंड देत असता आपल्या प्रार्थनेत स्पष्टोक्ती करणे हे का योग्य असेल?
४ ज्या तऱ्हेच्या परिक्षेला तुम्ही तोंड देत असाल, त्यावरून तुमची सौम्यता किंवा सौम्यभाव नाहीसा होऊ शकेल असा धोका तुम्हाला जाणवत असेल. अशावेळी यहोवा देवाला सौम्यता या आत्म्याच्या फळाबद्दल प्रार्थनेत स्पष्टता करा. तुम्ही कोणा मोहाला तोंड देत असल्यास तुम्हाला आत्मसंयम या फळाची अत्यंत गरज आहे. अर्थातच, मोहाचा प्रतिकार करण्यासाठी, सैतानापासून सुटका मिळण्यासाठी आणि परिक्षेत टिकून राहण्याकरता सूज्ञानासाठी ईश्वरी मदत मिळावी म्हणून प्रार्थना करणे अगदी योग्य असेल.—मत्तय ६:१३; याकोब १:५, ६.
५. आत्म्याच्या कोणत्या फळाबद्दल प्रार्थना करावी हे न समजण्याइतकी परिस्थिती अधिक त्रस्त असल्यास काय करता येण्याजोगे आहे?
५ तथापि, कधीकधी परिस्थिती इतकी त्रस्त स्वरुपाची असेल की आत्म्याच्या कोणत्या फळाची तुम्हाला गरज आहे हे समजू शकणार नाही. खरे म्हणजे, आनंद, शांती, सौम्यता आणि इतर ईश्वरी गुण देखील पणाला लागले असतील. मग काय? तेव्हा देवाला त्याच्या पवित्र आत्म्याविषयी व त्याने तुमच्या प्रकरणात ज्या ज्या फळांची गरज आहे ते देण्याबद्दल विचारणा का करू नये? प्रीती किंवा आनंद किंवा शांती किंवा आत्म्याच्या संमिश्र फळांची आवश्यकता असेल. याशिवाय, देवाला, त्याच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुरुप स्वतःला राखण्यासाठी मदत करावी म्हणून प्रार्थना करा; कारण तो त्याचा वापर आपल्या लोकांना निरवण्यासाठी करतो.
मदत देण्याची यहोवाची इच्छा आहे
६. येशूने आपल्या शिष्यांवर निरंतर प्रार्थना करण्याची गरज कशी ठसवली?
६ येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी प्रार्थनेबद्दल सूचना प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने काही अंशी देवाच्या आत्म्याबद्दल प्रार्थना करावी म्हणून आर्जविले. त्यांनी निरंतर प्रार्थना करावी हे स्पष्ट करण्याकरता येशूने प्रथम एका उदाहरणाचा उपयोग केला. तो म्हणालाः “तुम्हामध्ये कोण असा आहे की, त्याला मित्र असून तो त्याजकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतोः ‘गड्या मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून मजकडे आला आहे; आणि त्याला वाढावयास मजजवळ काही नाही.’ आणि तो आतून उत्तर देईलः ‘मला श्रम देऊ नको. आता दार लाविले आहे व माझी मुले मजजवळ निजली आहेत. माझ्याने उठवून तुला देववत नाही.’ मी तुम्हांस सांगतो, तो त्याचा मित्र आहे यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे जे काही पाहिजे ते उठून त्याला देईल.”—लूक ११:५-८.
७. लूक ११:११-१३ मधील येशूच्या शब्दांचा सारांश काय आहे, आणि ते शब्द आम्हाला देव व त्याच्या आत्म्याबद्दल कसली खात्री देतात?
७ यहोवा त्याच्या विश्वासू व समर्पित सेवकांमध्ये प्रत्येकाला मदत करण्याची इच्छा बाळगून आहे व तो त्यांच्या विनंत्या ऐकतो. पण, येशूने म्हटले त्याप्रमाणे एखादा ‘मागत राहतो’ तर ते त्याच्या अंतःकरणाची व्याकुळता व विश्वास प्रदर्शित करते. (लूक ११:९, १०) ख्रिस्ताने पुढे म्हटलेः “तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की, त्याच्याजवळ त्याच्या मुलाने भाकर मागितली असता तो त्याला धोंडा देईल? अगर मासा मागितला असता मासा न देता त्याला साप देईल किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तर तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल.” (लूक ११:११-१३) वारशाने पापीष्ठ असल्यामुळे एखादा ऐहिक पालक थोडाफार दुष्ट असला तरी तो आपल्या मुलाला जर चांगल्या गोष्टी पुरवतो, तर आमचा स्वर्गीय पिता, त्याचा निष्ठावंत असा कोणीही सेवक नम्रपणे पवित्र आत्मा मिळण्याची जेव्हा त्याला विचारणा करतो तेव्हा तो ते जरुर देईल.
८. स्तोत्रसंहिता १४३:१० दावीद, येशू व देवाच्या आधुनिक दिवसातील सेवकांना कसे लागू होते?
८ देवाच्या आत्म्यापासून लाभ मिळवण्याकरता आम्ही दावीदाप्रमाणेच त्याच्या नेतृत्वाला अनुसरण्याची इच्छा धरली पाहिजे. त्याने प्रार्थिलेः “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा मला सद्धर्मभूमीत नेवो.” (स्तोत्रसंहिता १४३:१०) इस्राएलाच्या शौल राजाने दाविदाला हद्दपार केले होते त्यामुळे दावीदाने देवाचा आत्मा त्याला मार्गदर्शित व्हावा अशी इच्छा धरली; यामुळे त्याचा मार्ग सरळ आहे याची खात्री त्याला होणार होती. काही वेळातच अब्याथार, देवाची इच्छा काय आहे ते निश्चित करण्यासाठी जे याजकाचे एफोद वापरीत ते घेऊन तेथे आला. याजकाचा प्रतिनिधी म्हणून अब्याथारने दावीदाला, यहोवास संतुष्ट करण्याजोगा मार्ग धरण्याचे मार्गदर्शन दिले. (१ शमुवेल २२:१७–२३:१२; ३०:६-८) दावीदाप्रमाणेच येशूला देखील यहोवाच्या आत्म्याद्वारे निरवण्यात आले व हेच ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांबद्दल एक वर्ग या नात्याने खरे ठरले आहे. समाजाने १९१८-१९च्या दरम्यान त्यांना जणू हद्दपार असल्याचे मानले होते; आणि त्यांच्या धार्मिक शत्रूंना वाटले की ते त्यांचा संहार घडवून आणतील. यावेळी अभिषिक्तांनी आपल्या निष्क्रिय स्थितीतून मार्ग दाखवण्याची देवाला विनंती केली आणि १९१९ मध्ये देवाने त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून त्यांची सुटका केली व त्याच्या सेवेत परत क्रियाशील बनवले. (स्तोत्रसंहिता १४३:७-९) खरेच, यहोवाचा आत्मा तेव्हा त्याच्या लोकांना मदत देऊन त्यांचे मार्गदर्शन करीत होता, आणि आजही तसेच होत आहे.
आत्मा कशी मदत देतो
९. (अ) पवित्र आत्मा कशाप्रकारे “कैवारी” म्हणून सेवा करतो? (ब) पवित्र आत्मा ही व्यक्ती नाही हे आपल्याला कसे कळते? (तळटीप बघा.)
९ येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याला “कैवारी” असे म्हटले. उदाहरणार्थ, तो त्याच्या अनुयायांना म्हणालाः “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांस दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. त्याने तुम्हांबरोबर सदासर्वदा राहावे म्हणून त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही. कारण ते त्याला पाहत नाहीत अगर त्याला ओळखीत नाहीत. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हांबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील.” इतर गोष्टींसमवेत हा “कैवारी” शिक्षक देखील असणार होता, कारण ख्रिस्ताने हे अभिवचन दिलेः “ज्याला पिता माझ्या नामाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण देईल.” हा आत्मा ख्रिस्ताबद्दल देखील साक्ष देणार होता म्हणून त्याने आपल्या शिष्यांना ही खात्री दिलीः “मी जावे हे तुम्हांस हितकारक आहे; मी न गेलो तर कैवारी तुम्हांकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुम्हांकडे पाठवीन.”—योहान १४:१६, १७, २६; १५:२६; १६:७.a
१०. पवित्र आत्मा मदतनीस असल्याचे आणखी कोणत्या प्रकाराने दिसून आले?
१० येशूने हा वचनदत्त पवित्र आत्मा इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी आपल्या अनुयायांवर स्वर्गातून ओतला. (प्रे. कृत्ये १:४, ५; २:१-११) मदतनीस या अर्थाने आत्म्याने त्यांना देवाची इच्छा व त्याचे उद्देश याबद्दल वाढती समज दिली आणि त्यांना त्याचे भविष्यवादित वचन उलगडून दाखवले. (१ करिंथकर २:१०-१६; कलस्सैकर १:९, १०; इब्रीयांस ९:८-१०) या मदतनीसाने येशूच्या शिष्यांना सबंध पृथ्वीभर साक्ष देण्यास सामर्थ्य दिले. (लूक २४:४९; प्रे. कृत्ये १:८; इफिसकर ३:५, ६) आज एखाद्या समर्पित ख्रिश्चनाने स्वतःला, देवाने त्याच्या “विश्वासू व बुद्धिमान दास” याजमार्फत तयार केलेल्या आध्यात्मिक तरतुदींच्या अधीन ठेवल्यास पवित्र आत्मा त्याला मदत देऊ शकतो. (मत्तय २४:४५-४७) यहोवाचा सेवक या नात्याने साक्ष देण्यामध्ये हा पवित्र आत्मा धैर्य व शक्ती देऊन मदत करू शकतो. (मत्तय १०:१९, २०; प्रे. कृत्ये ४:२९-३१) तथापि, पवित्र आत्मा देवाच्या लोकांना आणखी इतर प्रकाराने मदत देतो.
“अनिर्वाच्य उच्व्छासांनी”
११. एखादी परिक्षा चिरडून टाकणारी आहे असे दिसत असल्यास ख्रिश्चनाने काय करावे?
११ एखाद्या ख्रिश्चनाला वाटले की, तो चिरडून टाकणाऱ्या परिक्षेने घेरलेला आहे, तर त्याने काय करावे? त्याने पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करावी व त्याला आपले काम करू द्यावे! “तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावितो,” असे पौलाने म्हटले, “प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्व्छासांनी आपल्यासाठी विनंती करतो आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो.”—रोमकर ८:२६, २७.
१२, १३. (अ) त्रासाच्या परिस्थितीत सादर केलेल्या प्रार्थनांच्या बाबतीत रोमकर ८:२६, २७ खासपणे कसे लागू होणारे आहे? (ब) आशिया प्रांतात अत्यंत खडतर अशा दबावाखाली असता पौल व त्याच्या सहकाऱ्यांनी काय केले?
१२ ज्या पवित्र जनांसाठी देवाचा आत्मा विनंती करतो ते स्वर्गीय आशा असणारे येशूचे अभिषिक्त अनुयायी आहेत. तरीपण, तुम्हाला स्वर्गीय पाचारण असो की पृथ्वीवरील आशा असो, ख्रिस्ती या नात्याने तुम्हाला देवाच्या आत्म्याची मदत मिळू शकते. यहोवा कधीकधी एखाद्या विशिष्ठ प्रार्थनेला थेटपणे उत्तर देतो. तरीपण, केव्हा केव्हा तुम्हाला इतके त्रासल्यासारखे वाटले असेल की, तुम्हाला तुमच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत, तुम्ही केवळ आपल्या कण्हण्याद्वारे काकूळतीने यहोवाला विनंती करता. खरे म्हणजे, तुम्हासाठी चांगले ते काय असणार, त्याची तुम्हाला कल्पना नसते, आणि जर पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली नाही तर कदाचित चुकीच्या गोष्टीही मागाल. परंतु, देवाला माहीत आहे की, तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे व्हावे असे इच्छिता, आणि तुम्हाला खरी गरज कशाची आहे हे त्याला ठाऊक असते. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे त्याने पुष्कळ प्रार्थना त्याच्या वचनात लिखित करून ठेवल्या आहेत; आणि यांचा त्रस्त परिस्थितींशी संबंध आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७; २ पेत्र १:२१) या कारणामुळे त्या प्रेरित प्रार्थनेत असणारे विशिष्ट भाव, तुम्ही त्याचे सेवक या नात्याने व्यक्त करू इच्छिता हे तो बघू शकतो व तो तुमच्या प्रार्थनांना उत्तर देऊ शकतो.
१३ आशिया प्रांतात छळाचा अनुभव घेत असताना प्रेषित पौल व त्याच्या सहकाऱ्यांना प्रार्थना कशी करावी ते बहुधा माहीत झाले नसावे. ते ‘शक्तीपलिकडे अतिशयच दडपून गेले होते, इतके की, ते जगू किंवा जगणार नाही असे त्यांचे झाले होते.’ पण त्यांनी इतरांना त्यांच्या वतीने प्रार्थना करण्याची विनंती केली आणि पुनरुत्थान घडवून आणू शकणाऱ्या देवावर आपला भाव ठेवला व त्याने त्यांची सुटका घडवून आणली. (२ करिंथकर १:८-११) यहोवा त्याच्या सेवकांच्या प्रार्थना ऐकतो आणि तशी कृती करतो हे किती समाधान देणारे आहे!
१४. यहोवाने काही काळासाठी परिक्षेस राहण्याची अनुज्ञा दिल्यास कोणता चांगला परिणाम घडून येऊ शकतो?
१४ देवाच्या लोकांवर एक संघटना या नात्याने परिक्षा येतात. त्यांना पहिल्या जागतिक युद्धात छळ अनुभवावा लागला हे आपण आधीच पाहिले आहे. त्या काळी आपली भूमिका काय आहे याचे त्यांना स्पष्ट आकलन होऊ शकले नाही व त्यामुळे प्रार्थना खरी कशासाठी करावी हे त्यांना कळू शकले नव्हते, तरी यहोवाच्या वचनामध्ये भविष्यवादित प्रार्थना आहेत, ज्यांचे उत्तर त्याने त्यांच्यासाठी पुरविले. (स्तोत्रसंहिता ६९, १०२, १२६; यशया अध्याय १२) पण यहोवाने काही काळासाठी छळ चालू राहू देण्यासाठी अनुमती दिली तर काय? यामुळे साक्षी घडू शकते, काहींना सत्य स्वीकारण्यात मदत होऊ शकते आणि मग ख्रिश्चनांना आपल्या समविश्वासूंसाठी प्रार्थनेद्वारे किंवा इतर साहाय्य देण्याद्वारे आपली बंधुप्रीती प्रदर्शित करण्याची संधी मिळते. (योहान १३:३४, ३५; २ करिंथकर १:११) यहोवा आपल्या पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या लोकांना निरवतो, त्यांच्यासाठी चांगले तेच तो करतो आणि त्याच्या नावाचा सन्मान व पवित्रीकरण होऊ शकेल या अर्थाने सर्व गोष्टी घडवून आणतो हे लक्षात असू द्या.—निर्गम ९:१६; मत्तय ६:९.
आत्म्याला केव्हाही खिन्न करू नका
१५. यहोवाच्या आत्म्याने काय करावे यासाठी ख्रिस्तीजन त्याच्यावर विसंबून राहू शकतात?
१५ यास्तव, तुम्ही यहोवाचे सेवक असाल तर परिक्षेच्या वेळी व इतर वेळी पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. यानंतर त्याच्या मार्गदर्शनाला अनुसरा, कारण पौलाने लिहिलेः “देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, त्याच्यायोगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहा.” (इफिसकर ४:३०) देवाचा आत्मा हा एक शिक्का होता व आहे; तसेच तो विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांकरता स्वर्गातील अमर जीवन या ‘येणाऱ्या गोष्टींबद्दल विसार’ असा आहे. (२ करिंथकर १:२२; रोमकर ८:१५; १ करिंथकर १५:५०-५७; प्रकटीकरण २:१०) हे अभिषिक्त ख्रिस्ती तसेच पृथ्वीवर राहण्याची आशा धरणारे लोक यहोवाच्या आत्म्यावर, त्याने त्यांच्याखातर खूप काही करावे म्हणून विसंबून राहू शकतात. तो त्यांना विश्वासूपणाचे जीवन अनुसरण्यात आणि देवास असंतुष्ट करणाऱ्या, पवित्र आत्म्यास गमावून टाकणाऱ्या व चिरकालिक जीवनाची प्राप्ती अयशस्वी करणाऱ्या पापी कर्मांना टाळण्यात मदत देऊ शकतो.—गलतीकर ५:१९-२१.
१६, १७. एखादा ख्रिस्ती आत्म्याला कसा खिन्न करू शकतो?
१६ पण, एखादा ख्रिस्ती या आत्म्याला जाणूनबुजून किंवा अजाणपणे कसे खिन्न करू शकतो? यहोवा या आत्म्याचा वापर ऐक्य वाढीस लावण्याकरता आणि मंडळीत जबाबदार लोकांची नियुक्ती करण्यासाठी करीत असतो. यास्तव, मंडळीच्या कोणा सदस्याने नियुक्त वडीलांविरुद्ध कुरकुर सुरु केली, निंद्य अशा चहाड्या पसरवल्या आणि अशाच आणखी काही गोष्टी केल्यास तो देवाचा आत्मा शांती व ऐक्य राखण्याकरता जे मार्गदर्शन देऊन आहे त्याला अनुसरत नसतो. तो, साधारणपणे, पवित्र आत्म्याला खिन्न करतो.—१ करिंथकर १:१०; ३:१-४, १६, १७; १ थेस्सलनीकाकर ५:१२, १३; यहूदा १६.
१७ इफिसमधील ख्रिश्चनांना लिहिताना पौलाने लबाड्या, राग धरणे, चोरी, अभद्र भाषण, व्यभिचाराची लालसा, लज्जास्पद वागणूक आणि घाणेरडा विनोद याबद्दलचा इशारा दिला. कोणी ख्रिस्ती स्वतःला अशा गोष्टींमध्ये लोटून देतो तर तो पवित्र शास्त्रातील आत्म्याने प्रेरित असलेल्या सल्ल्याविरुद्ध कृति आचरीत असतो. (इफिसकर ४:१७-२९; ५:१-५) त्यामुळे हा देखील काही प्रमाणात देवाच्या आत्म्याला खिन्न करतो.
१८. देवाच्या आत्म्याने प्रेरित असलेल्या वचनातील सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात करणाऱ्या ख्रिस्ती माणसाचे काय होऊ शकते?
१८ खरे म्हणजे, यहोवाच्या आत्म्याने प्रेरित असलेल्या त्याच्या वचनातील सूचनांकडे दुर्लक्ष करण्याची सुरवात करणारा कोणीही ख्रिस्ती, अशा प्रवृत्त्या किंवा लक्षणे वाढवण्यास सुरवात करतो, ज्याचा परिणाम स्वेच्छेने पाप करण्यात व ईश्वरी संमती गमावण्यात होतो. तो जरी या क्षणी पापाचरण करीत नसला तरी बहुधा त्या दिशेकडे जाण्याचा त्याचा कल राहतो. अशाप्रकारे, आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या विरुद्ध दिशेला मार्ग धरणारा हा ख्रिस्ती त्याला खिन्न करतो. याद्वारे तो यहोवा, पवित्र आत्म्याचा जनक याचाही धिक्कार करतो व त्याला खिन्न करतो. देवावर प्रेम करणारा असे कधीही करू इच्छिणार नाही!
पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करीत राहा
१९. यहोवाच्या लोकांना आज पवित्र आत्म्याची इतकी गरज का भासत आहे?
१९ तुम्ही यहोवाचे सेवक असल्यास त्याच्या पवित्र आत्म्यासाठी सतत प्रार्थना करीत राहा. या “शेवटल्या काळी” कठीण दिवस असताना ख्रिश्चनांना देवाच्या आत्म्याची खरी गरज आहे. (२ तीमथ्य ३:१-५) दियाबल व त्याचे दुरात्मे यांना स्वर्गातून काढून टाकल्यावर आता पृथ्वीच्या परिसरात असल्यामुळे ते यहोवाच्या संस्थेविरुद्ध थैमान घालत आहेत. या कारणामुळे देवाच्या लोकांना पूर्वीपेक्षा सध्या त्याच्या पवित्र आत्म्याचे नेतृत्व किंवा मार्गदर्शन करण्याकरता आणि छळ व त्रासात टिकवून ठेवण्यासाठी अधिक गरज भासत आहे.—प्रकटीकरण १२:७-१२.
२०, २१. यहोवाचे वचन, आत्मा व त्याची संस्था यांचे मार्गदर्शन का अनुसरावे?
२० यहोवा देव आपल्या पवित्र आत्म्याद्वारे जी काही मदत देतो त्याबद्दल नेहमी कदर राखा. त्याच्या आत्म्याने प्रेरित असलेल्या वचनाच्या मार्गदर्शनाला अनुसरा. तसेच आत्म्याने मार्गदर्शित असलेल्या देवाच्या पृथ्वीवरील संस्थेला पूर्ण रूपाचे सहकार्य द्या. ज्यामुळे पवित्र आत्म्याला खिन्न केले जाईल अशा कसल्याही अशास्त्रीय मार्गाकडे वळण्यास स्वतःला वाव देऊ नका, कारण याचा परिणाम तो काढला जाण्यात आणि आध्यात्मिक विनाश घडण्यात होईल.—स्तोत्रसंहिता ५१:११.
२१ यहोवाच्या आत्म्याने स्वतःला निरवीत राहणे हा यहोवाला संतुष्ट करण्याचा व शांतीमय, आनंदी जीवन व्यतित करण्याचा एकमेव मार्ग आहे. येशूने पवित्र आत्म्याला “कैवारी,” किंवा “सांत्वन करणारा,” असे जे म्हटले ते ध्यानात ठेवा. (योहान १४:१६ न्यू.व. तळटीप) त्याच्याद्वारे देव ख्रिश्चनांना सांत्वन देऊन, छळास तोंड देण्यास तयार करीत असतो. (२ करिंथकर १:३, ४) आत्मा यहोवाच्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करण्याकरता सामर्थ्यवान बनवतो व उत्तम साक्ष देण्यासाठी हवे असणारे शास्त्रवचनीय मुद्दे आठवून देण्याची मदत देतो. (लूक १२:११, १२; योहान १४:२५, २६; प्रे. कृत्ये १:४-८; ५:३२) ख्रिस्तीजन आपल्या विश्वासाची परिक्षा प्रार्थना व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मिळालेल्या स्वर्गीय सूज्ञानाद्वारे पार करू शकतात. या कारणास्तव, जीवनाच्या सर्व परिस्थितीत ते देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करीत राहतात. याचा परिणाम यहोवाचा आत्मा त्याच्या लोकांना निरवण्यात होतो.
[तळटीपा]
a पवित्र आत्मा “कैवारी” आहे या व्यक्तिमत्वात दाखवला असला तरी तो प्रत्यक्षात व्यक्ती नाही, कारण ग्रीक नपुंसक सर्वनाम (‘ते’ या अर्थी) आत्म्याला लागू करण्यात आले आहे. ज्ञानाच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून इब्री स्त्रीलिंगी सर्वनाम उपयोगात आणण्यात आले आहे. (नीतीसूत्रे १:२०-३३; ८:१-३६) याशिवाय, पवित्र आत्मा “ओतण्यात आला,” जे कोणा व्यक्तीबद्दल घडून येऊ शकत नाही.—प्रे. कृत्ये २:३३.
तुमची उत्तरे काय आहेत?
▫ यहोवाच्या पवित्र आत्म्याबद्दल प्रार्थना का करावी?
▫ पवित्र आत्मा कसा मदतनीस आहे?
▫ आत्म्याला खिन्न करणे याचा काय अर्थ आहे, आणि ते आम्हाला कसे टाळता येईल?
▫ पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना का करीत राहावे व त्याच्या मार्गदर्शनाला का अनुसरावे?
[२६ पानांवरील चित्रं]
प्रेमळ पिता जसा आपल्या मुलाला चांगल्या गोष्टी देतो, तसेच यहोवा, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करणाऱ्या त्याच्या सेवकांना तो प्रदान करतो
[२८ पानांवरील चित्रं]
प्रार्थनाशील ख्रिश्चनांसाठी देवाचा पवित्र आत्मा कशी याचना करतो ते तुम्हाला माहीत आहे का?