वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 ऑगस्ट पृ. १४-१९
  • यहोवाने तुम्हाला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने तुम्हाला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाने आपल्याला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवणं का गरजेचंय?
  • यहोवाने आपल्याला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?
  • यहोवा जे आठवणीत ठेवतो, ते विसरू नका
  • स्वतःच्या मनाला खातरी करून देत राहा
  • यहोवाची क्षमा—तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवा, ‘क्षमा करायला तयार असणारा’ देव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहोवा क्षमा करतो तेव्हा तो पापांची आठवण ठेवतो का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 ऑगस्ट पृ. १४-१९

अभ्यास लेख ३४

गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा

यहोवाने तुम्हाला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवा

“तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस.”—स्तो. ३२:५.

या लेखात:

यहोवा आपल्याला माफ करतो यावर आपण विश्‍वास का ठेवला पाहिजे आणि पश्‍चात्ताप करणाऱ्‍याला यहोवा माफ करतो याची खातरी आपल्याला बायबलमधून कशी मिळते, ते पाहू या.

१-२. जेव्हा एखादी पापी व्यक्‍ती पश्‍चात्ताप करते, तेव्हा तिला काय अनुभवायला मिळू शकतं? (चित्रसुद्धा पाहा.)

आधीच्या चुकांमुळे दोषी वाटणं काय असतं, हे दावीद राजाला माहीत होतं. (स्तो. ४०:१२; ५१:३; उपरीलेखन) कारण त्याने त्याच्या जीवनात काही गंभीर चुका केल्या होत्या. पण तरीही त्याने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं. (२ शमु. १२:१३) यामुळे यहोवा जेव्हा माफ करतो, तेव्हा किती हायसं वाटतं, हेसुद्धा त्याने अनुभवलं होतं.—स्तो. ३२:१.

२ यहोवा जेव्हा आपल्याला माफ करतो, तेव्हा किती हायसं वाटतं, हे दावीदसारखं आपणही अनुभवू शकतो. आपण जेव्हा मनापासून पश्‍चात्ताप करतो, आपली पापं कबूल करतो आणि ती पुन्हा न करण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न करतो, तेव्हा यहोवा आपली गंभीर पापंसुद्धा माफ करायला तयार असतो. (नीति. २८:१३; प्रे. कार्यं २६:२०; १ योहा. १:९) आणि यहोवा अशा प्रकारे माफ करतो, जणू काय आपल्याकडून ते पाप कधी घडलंच नव्हतं. हे समजल्यामुळे आपल्याला खरंच किती दिलासा मिळतो, नाही का?—यहे. ३३:१६.

दावीद राजा गच्चीवर बसून वीणा वाजवतोय आणि गातोय.

दावीदने यहोवाच्या क्षमेचं वर्णन करणारी बरीच स्तोत्रं रचली आहेत (परिच्छेद १-२ पाहा)


३-४. एका बहिणीचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तिला कसं वाटलं आणि या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

३ यहोवाने आपल्याला माफ केलंय, यावर विश्‍वास ठेवणं कधीकधी काही जणांना कठीण जातं. जेनिफर नावाच्या बहिणीलाही असंच वाटलं होतं. ती सत्यात वाढली होती. पण थोडी मोठी झाल्यावर ती चुकीच्या गोष्टी करू लागली आणि दुहेरी जीवन जगू लागली. काही वर्षांनी ती यहोवाकडे परत आली. तिने स्वतःमध्ये बदल केले आणि मग बाप्तिस्माही घेतला. ती म्हणते: “मी आधी खूप घाणेरड्या, अनैतिक गोष्टी केल्या. मला दारूचं भयंकर व्यसन होतं आणि मी खूप रागीट होते. माझं सगळं लक्ष फक्‍त पैसा कमावण्याकडेच होतं. मला माहीत होतं की जर मी मनापासून पश्‍चात्ताप केला, यहोवाकडे क्षमेची भीक मागितली, तर येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर तो मला माफ करेल. पण यहोवाने मला माफ केलंय हे मला पटतच नव्हतं.”

४ आपल्या आधीच्या चुकांसाठी यहोवाने आपल्याला माफ केलंय, यावर विश्‍वास ठेवणं तुम्हालाही कधीकधी कठीण जातं का? जर असं असेल, तर यहोवाने दावीदवर जी दया केली, त्याबद्दल त्याला कसं वाटलं हे आठवायचा प्रयत्न करा. यहोवा दयाळू असल्यामुळे त्याने दावीदला माफ केलं होतं आणि या गोष्टीची त्याला पूर्ण खातरी होती. अशीच खातरी आपल्यालाही असावी असं यहोवाला वाटतं. म्हणूनच आपण या लेखात दोन प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: यहोवाने आपल्याला माफ केलंय यावर आपण विश्‍वास का ठेवला पाहिजे? आणि असं करायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?

यहोवाने आपल्याला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवणं का गरजेचंय?

५. आपण काय विचार करावा असं सैतानाला वाटतं? उदाहरण द्या.

५ यहोवाने आपल्याला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवल्यामुळे आपण सैतानाच्या पाशात अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. लक्षात ठेवा, की यहोवाची सेवा करण्यापासून आपल्याला थांबवण्यासाठी सैतान काहीही करू शकतो. त्याचं हे ध्येय पूर्ण व्हावं, म्हणून तो आपल्याला असा विचार करायला लावू शकतो, की यहोवा आपल्याला कधीच माफ करणार नाही. पहिल्या शतकातल्या करिंथ मंडळीतल्या माणसाचा विचार करा. त्याने अनैतिक लैंगिक कृत्यं केली होती. आणि म्हणून त्याला मंडळीतून काढून टाकण्यात आलं होतं. (१ करिंथ. ५:१, ५, १३) नंतर त्या माणसाने पश्‍चात्ताप केला. पण मंडळीतल्या भाऊबहिणींनी त्याला माफ करू नये आणि त्याचं मंडळीत स्वागत करू नये, असं सैतानाला वाटत होतं. आणि जर खरंच तसं घडलं असतं, तर यहोवा त्याला कधीच माफ करणार नाही, असं त्याला वाटलं असतं. आणि ‘तो दुःखात इतका बुडून गेला’ असता, की त्याने यहोवाची सेवा करायचंच सोडून दिलं असतं. सैतानाचं आजही तेच ध्येय आहे आणि तो आजही त्याच डावपेचांचा वापर करतोय. पण आपण ‘त्याच्या डावपेचांबद्दल अंधारात आहोत असं नाही.’—२ करिंथ. २:५-११.

६. आपल्या मनावरचं दोषीपणाचं ओझं हलकं व्हावं म्हणून आपण काय करू शकतो?

६ यहोवा आपल्याला माफ करतो यावर विश्‍वास ठेवल्यामुळे आपल्या मनावरचं दोषीपणाचं ओझं हलकं होऊ शकतं. आपल्या हातून पाप घडतं, तेव्हा दोषी वाटणं साहजिक आहे. (स्तो. ५१:१७) आणि ही एक चांगली गोष्ट आहे. कारण यामुळे आपला विवेक आपल्याला ती चूक सुधारण्यासाठी पावलं उचलायला प्रवृत्त करू शकतो. (२ करिंथ. ७:१०, ११) पण पश्‍चात्ताप केल्यानंतरसुद्धा आपण जर बराच काळ दोषीपणाची भावना आपल्या मनात राहू दिली, तर कदाचित आपण यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ. याउलट, यहोवाने आपल्याला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवल्यामुळे आपल्याला दोषीपणाचं ओझं मागे सारता येईल. त्यामुळे आपल्याला यहोवाची सेवा त्याच्या इच्छेप्रमाणे म्हणजेच शुद्ध विवेकाने आणि आनंदाने करता येईल. (कलस्सै. १:१०, ११; २ तीम. १:३) मग यहोवा आपल्याला माफ करतो, याची स्वतःला खातरी पटवून देण्यासाठी आपण काय करू शकतो?

यहोवाने आपल्याला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

७-८. यहोवाने मोशेसमोर स्वतःचं वर्णन कसं केलं आणि यामुळे आपल्याला कशाची खातरी मिळते? (निर्गम ३४:६, ७)

७ यहोवाने स्वतःचं वर्णन कसं केलंय याचा विचार करा. यहोवाने मोशेला सीनाय पर्वतावर जे सांगितलं त्याचं उदाहरण घ्या.a (निर्गम ३४:६, ७ वाचा.) यहोवामध्ये बरेच चांगले गुण असले, तरी त्याने मोशेला त्याची ‘दया आणि करुणा,’ या गुणांबद्दल सांगायचं निवडलं. मग असा दयाळू आणि करुणामय देव मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍या त्याच्या सेवकाला माफ करणार नाही का? जर यहोवाने त्या व्यक्‍तीला माफ केलं नाही, तर तो एक दयाळू आणि करुणामय देव ठरणार नाही. पण आपल्याला माहीत आहे, की हे अशक्य आहे.

८ जर यहोवाने असं सांगितलंय की तो एक दयाळू देव आहे, तर ते शंभर टक्के खरंय. कारण तो कधीच खोटं बोलत नाही. (स्तो. ३१:५) त्यामुळे तो जे काही म्हणतो त्यावर आपण भरवसा ठेवू शकतो. जर तुम्हाला आधी केलेल्या पापांच्या दोषीपणाचं ओझं मागे सारायला कठीण जात असेल, तर तुम्ही स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकता: ‘यहोवा खरंच दयाळू आणि करुणामय देव आहे यावर माझा भरवसा आहे का? जो कोणी मनापासून पश्‍चात्ताप करतो त्याला तो नेहमी माफ करतो, याची मला खातरी आहे का? आणि जर या गोष्टींवर मला खरंच भरवसा आहे, तर त्याने मलाही माफ केलंय यावर मी विश्‍वास ठेवू नये का?’

९. पापांची क्षमा मिळणं याचा काय अर्थ आहे? (स्तोत्र ३२:५)

९ यहोवाने बायबलच्या लेखकांना त्याच्या क्षमेबद्दल जे लिहून ठेवायला सांगितलं त्यावर मनन करा. बायबलमध्ये यहोवाच्या क्षमेबद्दल दावीदने काय लिहिलं याचं उदाहरण घ्या. (स्तोत्र ३२:५ वाचा.) दावीद म्हणतो, “तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस.” क्षमा करणं यासाठी असलेल्या हिब्रू भाषेतल्या शब्दाचा अर्थ उचलून घेणं, बाजूला ठेवणं किंवा दूर घेऊन जाणं असा होऊ शकतो. जेव्हा यहोवाने दावीदला माफ केलं, तेव्हा एका अर्थाने त्याने त्याची पापं उचलून घेतली आणि दूर नेली. त्यामुळे दावीदच्या मनावरचं दोषीपणाचं ओझं हलकं झालं. (स्तो. ३२:२-४) आपल्यालासुद्धा असंच वाटू शकतं. जेव्हा आपण आपल्या पापांबद्दल मनापासून पश्‍चात्ताप करतो, तेव्हा यहोवा आपली पापं उचलून आपल्यापासून दूर घेऊन जातो. त्यामुळे आपल्याला दोषीपणाचं ते ओझं आपल्यासोबत ठेवण्याची गरज नाही.

१०-११. यहोवा “क्षमाशील” आहे या शब्दांवरून आपल्याला त्याच्याबद्दल काय कळतं? (स्तोत्र ८६:५)

१० स्तोत्र ८६:५ आणि तळटीप वाचा. या वचनात दावीद यहोवाबद्दल असं म्हणतो की तो “क्षमाशील” आहे. दुसऱ्‍या शब्दांत, तो क्षमा करायला तयार आहे. बायबलच्या एका संदर्भात यहोवाबद्दल असं म्हटलंय: “[तो] ‘क्षमा करणारा’ आहे. कारण ते त्याच्या स्वभावातच आहे.” असं आपण का म्हणू शकतो? वचनाच्या पुढच्या भागात याचं उत्तर मिळतं. तिथे असं म्हटलंय: “तुला हाक मारणाऱ्‍या सर्वांवर तुझं अपार प्रेम [किंवा, एकनिष्ठ प्रेम] आहे.” आधीच्या लेखात आपण जे शिकलो होतो ते तुम्हाला आठवत असेल. जे यहोवावर प्रेम करतात त्यांना तो वचन देतो, की तो त्यांच्यावर एकनिष्ठ प्रेम करेल आणि त्यांना कधीच सोडून देणार नाही. याच एकनिष्ठ प्रेमाने प्रवृत्त होऊन मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना तो “मोठ्या मनाने क्षमा” करतो. (यश. ५५:७) यहोवाने तुम्हाला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवायला तुम्हालाही जर कठीण जात असेल, तर तुम्ही स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकता: ‘जे यहोवाला दयेसाठी हाक मारतात आणि पश्‍चात्ताप करतात त्या सगळ्यांनाच तो माफ करायला तयार असतो, यावर माझा भरवसा आहे का? आणि जर यावर माझा भरवसा असेल, तर मी दयेसाठी मारलेली हाक ऐकून त्याने मलाही क्षमा केली नसेल का?’

११ यहोवा आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. आपण अपरिपूर्ण आहोत आणि आपल्याकडून नकळत चुका होतात हे त्याला माहीत आहे. या गोष्टीमुळे आपल्याला खरंच किती दिलासा मिळतो! (स्तो. १३९:१, २) दावीदच्या अजून एका स्तोत्रातून ही गोष्ट आणखीन स्पष्ट होते. त्यामुळेसुद्धा यहोवाला आपल्याला क्षमा करायची इच्छा आहे, या गोष्टीवरचा आपला भरवसा वाढवायला आपल्याला मदत होते.

यहोवा जे आठवणीत ठेवतो, ते विसरू नका

१२-१३. स्तोत्र १०३:१४ नुसार यहोवा आपल्याबद्दल काय आठवणीत ठेवतो आणि त्यामुळे तो काय करायला प्रवृत्त होतो?

१२ स्तोत्र १०३:१४ वाचा. यहोवा पश्‍चात्ताप करणाऱ्‍या त्याच्या सेवकांना माफ करायला का तयार असतो, यामागचं एक कारण दावीद या वचनात सांगतो. तो म्हणतो: “आपण फक्‍त माती आहोत, हे तो आठवणीत ठेवतो.” यावरून कळतं की यहोवाला आपली पापी वृत्ती चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर चला, ही गोष्ट समजून घ्यायला दावीदच्या शब्दांवर आणखी विचार करू या.

१३ दावीदने म्हटलं: “आपली रचना कशी करण्यात आली आहे हे यहोवाला चांगलं माहीत आहे.” यहोवाने आदामला ‘जमिनीतल्या मातीपासून’ बनवलं. त्यामुळे त्याला माणसांची रचना माहीत आहे आणि त्यांना कशाची गरज आहे हेसुद्धा माहीत आहे. उदाहरणार्थ, जगण्यासाठी माणसांना जेवण्याची, झोपण्याची आणि श्‍वास घेण्याची गरज आहे. परिपूर्ण मानवांनासुद्धा या गोष्टींची गरज असते. (उत्प. २:७) पण आदाम आणि हव्वाने जेव्हा पाप केलं, तेव्हा माती असण्याला आणखी एक अर्थ आला. तो म्हणजे, आदाम-हव्वा अपरिपूर्ण झाले. आणि आपण त्यांची मुलं असल्यामुळे आपल्यामध्येही पापी वृत्ती आली. म्हणून वाईट गोष्टी करण्याकडे आपला कल असतो. आपल्या या पापी वृत्तीबद्दल यहोवाला फक्‍त माहीतच नाही, तर दावीदने म्हटलं की तो हे “आठवणीत ठेवतो.” यासाठी असलेल्या हिब्रू भाषेतल्या शब्दाचा अर्थ एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी पाऊल उचलणं असा होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं झालं, तर दावीदच्या शब्दांचा अर्थ असा होतो: यहोवाला माहीत आहे, की आपण सगळेच कधी न्‌ कधी चुकतो. पण चूक झाल्यावर जेव्हा आपण मनापासून पश्‍चात्ताप करतो, तेव्हा तो आपल्यावर दया करायला आणि आपल्याला क्षमा करायला प्रवृत्त होतो.—स्तो. ७८:३८, ३९.

१४. (क) यहोवा आपल्याला किती प्रमाणावर माफ करतो, याबद्दल दावीदने काय सांगितलं? (स्तोत्र १०३:१२) (ख) यहोवा आपल्याला पूर्णपणे क्षमा करतो, हे आपल्याला दावीदने दिलेल्या उदाहरणावरून कसं कळतं? (“यहोवा आपली पापं माफ करतो आणि ती विसरून जातो” ही चौकट पाहा.)

१४ यहोवा आपल्याला किती प्रमाणावर माफ करतो? (स्तोत्र १०३:१२ वाचा.) दावीद म्हणतो की यहोवा जेव्हा आपल्याला माफ करतो, तेव्हा तो आपली पापं “पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,” तितक्या लांब घेऊन जातो. पूर्व आणि पश्‍चिम या दोन्ही दिशा एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि त्या कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. यावरून यहोवा आपल्या पापांची ज्या प्रकारे क्षमा करतो त्याबद्दल काय कळतं? याबद्दल एका संदर्भात असं म्हटलंय: “आपली पापं जर आपल्यापासून इतकी दूर नेली जाणार असतील, तर आपण याची खातरी ठेवू शकतो की त्याचा गंध, त्याचा ठावठिकाणा किंवा त्याची कोणतीच आठवणसुद्धा राहत नाही.” विचार करा, एखाद्या विशिष्ट वासाने आपल्याला एखाद्या गोष्टीची आठवण होऊ शकते. पण, यहोवा जेव्हा आपल्याला माफ करतो, तेव्हा तो आपली पापं आपल्यापासून इतकी दूर घेऊन जातो, की त्याचा गंधही राहत नाही. आणि त्यामुळे आपली पापं लक्षात ठेवण्याचं त्याच्याकडे कोणतंही कारण उरत नाही. तसंच, त्यासाठी तो आपल्याला दोषीही ठरवत नाही.—यहे. १८:२१, २२; प्रे. कार्यं ३:१९.

कोलाज: १. दावीद राजा छतावरून बथशेबाला अंघोळ करताना बघतो. २. तो कळकळून प्रार्थना करतो. ३. तो गुंडाळीवर लिहिताना विचार करतो.

यहोवा आपली पापं माफ करतो आणि ती विसरून जातो

बायबलमध्ये असं सांगितलंय, की यहोवा जेव्हा आपली पापं माफ करतो तेव्हा तो त्या गोष्टींची पुन्हा कधीच आठवण करत नाही. याचाच अर्थ, तो त्या पापांसाठी पुन्हा कधीच आपल्याला दोषी ठरवत नाही किंवा शिक्षाही करत नाही. (यश. ४३:२५) दावीद राजाच्या उदाहरणातून आपल्याला हे कळतं, की आपण आपल्या जीवनात कितीही गंभीर चुका केल्या असल्या, तरी यहोवा आपल्याला माफ करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यासोबतचं नातं पुन्हा मजबूत करता येऊ शकतं.

दावीदने गंभीर पापं केली होती. जसं की, त्याने व्यभिचार केला होता आणि खूनही केला होता. पण त्याने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं. दावीदने ताडन स्वीकारलं, स्वतःमध्ये सुधारणा केली आणि त्यानंतर शुद्ध उपासनेपासून तो कधीच भरकटला नाही.—२ शमु. ११:१-२७; १२:१३.

नंतर यहोवाने शलमोनला असं म्हटलं: “तुझे वडील दावीद यांच्यासारखं माझ्यासमोर खऱ्‍या मनाने आणि सरळ मार्गाने” चाल. (१ राजे ९:४, ५) यहोवा इथे दावीदच्या पापांचा उल्लेखही करत नाही. उलट, दावीद ज्या प्रकारे त्याचं आयुष्य जगला त्याबद्दल यहोवा म्हणतो, की तो खऱ्‍या मनाने आणि सरळ मार्गाने चालणारा व्यक्‍ती आहे. म्हणून यहोवाने दावीदला त्याच्या विश्‍वासूपणामुळे “भरपूर आशीर्वाद दिले.”—स्तो. १३:६.

यातून आपण काय शिकू शकतो? यहोवा जेव्हा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा तो पुन्हा त्यावर विचार करत नाही. उलट, तो आपल्यातल्या चांगल्या गोष्टी बघून आपल्याला आशीर्वाद देतो. (इब्री. ११:६) जर यहोवाने आपली पापं विसरायचं निवडलंय, तर मग आपण त्या पापांची आठवण का करावी?

१५. आपण आधी केलेल्या चुकांमुळे आपलं मन जर आपल्याला सतत खात असेल तर आपण काय करू शकतो?

१५ यहोवा आपल्याला माफ करतो यावर विश्‍वास ठेवायला स्तोत्र १०३ मधल्या दावीदच्या शब्दांमुळे आपल्याला कशी मदत होते? आधी केलेल्या पापांमुळे आपलं मन जर आपल्याला सतत खात असेल, तर आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो: ‘यहोवा जे आठवणीत ठेवतो ते मी विसरतोय का? म्हणजेच, माझ्या पापी वृत्तीबद्दल त्याला माहीत आहे आणि पश्‍चात्ताप करणाऱ्‍या माझ्यासारख्या पापी व्यक्‍तीला तो माफ करेल, हे मी विसरतोय का? तसंच, यहोवा जे विसरायचं निवडतो ते मी लक्षात ठेवतोय का? म्हणजेच, यहोवाने माझ्या ज्या पापांची क्षमा केली आहे आणि ज्यांबद्दल तो मला दोषी ठरवत नाही त्या गोष्टी मी लक्षात ठेवतो का?’ आपण आधी केलेल्या चुकांचा यहोवा कधीच विचार करत बसत नाही. म्हणून आपणसुद्धा करू नये. (स्तो. १३०:३) यहोवा आपल्याला माफ करतो, या गोष्टीवर जेव्हा आपण भरवसा ठेवतो, तेव्हा आपल्याला आपल्या आधीच्या चुकांसाठी स्वतःला माफ करायला आणि पुढे वाटचाल करायला मदत होते.

१६. आपण आधी केलेल्या पापांवर सतत विचार करणं धोक्याचं का आहे, हे समजावण्यासाठी एक उदाहरण द्या. (चित्रसुद्धा पाहा.)

१६ चला एका उदाहरणाचा विचार करू या. जेव्हा एखादी व्यक्‍ती गाडी चालवत असते, तेव्हा मागून येणारी गाडी तिला दिसावी म्हणून ती समोरच्या आरशात बघत असते. अधूनमधून आरशात पाहिल्यामुळे तिला गाडी चालवायला मदत होते. पण जर ती सतत त्या आरशाकडे बघत राहिली, तर ते तिच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. म्हणून जर त्या व्यक्‍तीला सुरक्षितपणे गाडी चालवायची असेल, तर तिने समोर लक्ष देणं गरजेचंय. अगदी तसंच, जर आपण अधूनमधून आधी केलेल्या चुकांचा विचार केला, तर त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. आपण त्या चुकांमधून बरंच काही शिकू शकतो. तसंच, त्या चुका पुन्हा न करण्यासाठीसुद्धा आपल्याला मदत होऊ शकते. पण आपण जर त्या चुकांचा सारखा विचार करत राहिलो, तर दोषीपणाच्या भावनेमुळे आपल्याला यहोवाच्या सेवेवर लक्ष लावता येणार नाही. म्हणून आपल्यासमोर ज्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष लावणं खूप गरजेचंय. आपण अशा रस्त्यावरून प्रवास करत आहोत, जो आपल्याला देवाच्या नवीन जगात घेऊन जातो. तिथे वाईट गोष्टी “कोणालाही आठवणार नाहीत.”—यश. ६५:१७; नीति. ४:२५.

एक माणूस नागमोडी रस्त्यावरून गाडी चालवत असताना आरशावर नजर टाकतोय.

गाडी चालवत असताना आरशात बघण्यापेक्षा पुढच्या रस्त्यावर लक्ष लावणं जास्त गरजेचं असतं, अगदी तसंच आपणसुद्धा आपल्या आधीच्या चुकांकडे लक्ष लावण्यापेक्षा आपल्याला भविष्यात कोणते आशीर्वाद मिळणार आहेत त्यावर लक्ष लावणं जास्त गरजेचंय (परिच्छेद १६ पाहा)


स्वतःच्या मनाला खातरी करून देत राहा

१७. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्याला क्षमा करायला तयार आहे, या गोष्टीची आपण स्वतःला खातरी करून देत राहणं का गरजेचंय?

१७ यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्याला माफ करायला तयार आहे, या गोष्टीची आपण आपल्या मनाला सतत खातरी करून दिली पाहिजे. (१ योहा. ३:१९, २०, तळटीप) का? कारण यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही आणि तो आपल्याला कधीच माफ करणार नाही अशी आपल्या मनाची खातरी पटावी, म्हणून सैतान काहीही करायला तयार आहे. आणि त्याचं ध्येय अजूनही तेच आहे. त्याची इच्छा आहे की आपण यहोवाची सेवा करायचं सोडून द्यावं. त्याला माहीत आहे, की त्याच्याकडे खूप कमी वेळ उरलाय. म्हणून तो त्यासाठी आणखीन जास्त प्रयत्न करेल. (प्रकटी. १२:१२) पण आपण कोणत्याही परिस्थितीत त्याला विजयी होऊ देऊ नये!

१८. यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला माफ करतो, या गोष्टीची स्वतःला खातरी पटवून देण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१८ यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे, या गोष्टीवरचा विश्‍वास वाढवण्यासाठी मागच्या लेखात दिलेले सल्ले लागू करायचा प्रयत्न करा. यहोवाने तुम्हाला माफ केलंय याची स्वतःला खातरी पटवून देण्यासाठी त्याने स्वतःबद्दल काय म्हटलंय यावर विचार करा. तसंच, त्याने त्याच्या क्षमेबद्दल बायबलच्या लेखकांना जे लिहून ठेवायला सांगितलंय, त्यावरही मनन करा. हे विसरू नका की आपण माती आहोत हे यहोवाला माहीत आहे आणि तो आपल्यापैकी प्रत्येकाशी खूप दयेने वागेल. लक्षात ठेवा, की तो जेव्हा माफ करतो तेव्हा पूर्ण मनाने माफ करतो. त्यामुळे दावीदने यहोवाच्या दयेबद्दल जितक्या आत्मविश्‍वासाने म्हटलं तितक्याच आत्मविश्‍वासाने तुम्हीही म्हणू शकाल: “यहोवा, ‘तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस,’ त्यासाठी तुझे मनापासून आभार!”—स्तो. ३२:५.

तुमचं उत्तर काय असेल?

  • यहोवाने आपल्याला क्षमा केली आहे या गोष्टीवर विश्‍वास ठेवणं का गरजेचंय?

  • यहोवाने आपल्याला क्षमा केली आहे या गोष्टीवर विश्‍वास ठेवायला तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते?

  • यहोवाने तुम्हाला क्षमा केली आहे या गोष्टीची स्वतःला खातरी पटवून देणं का गरजेचंय?

गीत १ यहोवाचे गुण

a १ ऑक्टोबर २००९ च्या टेहळणी बुरूज अंकातला “देवाच्या जवळ या—यहोवाने आपल्या गुणाबद्दल मोशेला सांगितले” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा